जगू द्या की त्यांना
जगण्याची खाज म्हणून जे-जे भोगायचं भोगतील त्या
धडपडतील-सावरतील-राहतील पुन्हा उभ्या आतल्या उर्मीने
ठासून मारणाऱ्या व्यवस्थेचे काढू द्या की भाऊ-बाप
भर चौकात मारतील गप्पा, लग्नसंस्थेच्या तुंबलेल्या गटाराचे खोलतील मेनहोल
सडलेल्या संस्कृतीचा करू द्या ना त्यांनाही विटाळ
किती दिवस ओरपणार विटाळातूनच गोल गरगरीत झालेला त्यांचा देह
दोन पायांमध्ये बाईपण शोधणाऱ्यान्ना मारू द्या त्यांना आडवं
पोसते त्यांच्याच गर्भाशयात पितृसत्ताक व्यवस्था तिला संपवताय गर्भात तुम्ही सांभाळताहेत रूढी-परम्परा तुमच्या भुंड्याखालचं धूडकं सांभाळावं इतक्या अदबीने
अन चिवडता समानता तिचीच तुम्ही
जनावरांच्या मुसक्या बांधून खुलेआम पळवणाऱ्या तुमच्या बाजारात
करताहेत तिचं नैतिक-लैंगिक,दमन,बांधतात तिचे पाय
त्यांच्या पेटीप्याक आयुष्याचे न्याहाळत रक्त वाढली तुमची हिडीस हिंस्त्र संस्कृती
सलाम ! लग्नसंस्थेला टिकविण्याच्या गोंडस प्रयत्नांना---
धर्मानेच वाढवली दुकानदारी,बुडवू द्या गुवाच्या गाडग्यात ती
कुजवलं वर्षानुवर्ष त्यांना धर्म-जात-वंश-लिंग-वर्णाच्या सडलेल्या टाकावू भागात
मित्रांनो,होता बळी तुम्हीही त्याच व्यवस्थेचे
तरी-निर्माण केलीत तुम्ही त्यांच्या गुलामीची प्रतीव्यवस्था
तुम्ही त्यांना भोगलं-डागलं-टाकलं-नासवलं कैक रित्या
तरीही त्या अजस्त्र झाडासारख्या घट्ट उभ्या मातीत इथल्या
जाहीरनामा स्वातंत्र्याचा जन्मजात मेंदूत त्यांच्या
स्वातंत्र्य : बेंबीच्या देठापासून बोलण्याचं
स्वातंत्र्य : स्व-इच्छेने आपलं स्त्रीत्व भोगण्याचं
स्वातंत्र्य : हव्या असणाऱ्या प्रिय व्यक्तीचा जैविक अंकुर उदरात वाढविण्याचं
स्वातंत्र्य : मैत्रीचं-आर्थिकतेचं-लादलेली नाती धुडकावन्याचं
स्वातंत्य्र : प्रत्येक स्त्री-शोषणाविरोधातला एल्गार आभाळभर पोहचविण्याचं
स्वातंत्र्य : बाईपणाच्या बुळबुळीत चिखलातून बाहेर पडून केवळ माणूसपणाच्या टोकाशी येऊन उभं राहण्याचं
---- नाही हा कुणा भ्रमिष्टाचा जाहीरनामा !
ती,
इथल्या आदी-अंताची साक्षी,साऱ्यांची आदिमाय
तिने नाही विभागले नदी-नाले-सीमा-निसर्गाला कधीच
तिने उभारलं चार भिंतीत उंबरठा घालून एक घर आतलं-बाहेरचं उमजण्यासाठी
तिने नाही नासवला पृथ्वीवरचा कुठलाच कोना
तिने जिथे जिथे भिरकावला मुठभर दाना तिथेच वसली तुमची वस्ती
तिने नाही उगवले बॉम्ब-काडतुसे-अफू,नाही बनवल्या बंदुकी अश्रुधुरांच्या नळकांड्या
तिने नाही फिरवले रणगाडे भरल्या घरांवर,नाही टिचवल्या बांगड्या सौभाग्याच्या
तिने नाही वाढवली सर्वहारांची चिपाडं झालेली पोटं
तिने थापल्या भाकरी,जागवली इथली जीवसृष्टी
तिने घातला जन्माला सुंदर माणूस
तुम्ही,
मोडले भाकरीचे तुकडे,वाढवली दाही दिशांत भूक
तुम्ही बाटवल्यात सीमा,वाढवलेत नक्षलवादी,साठवलेत भूमिगत सुरुंग
तुम्ही सडवली बेटं,नासवली माती क्षेपणास्रांच्या रेतीने
तुम्ही वाढवला जिहाद ट्विन्स टोवर्स उडवेस्तोवर
तुम्ही पिलात तेलांच्या विहिरी,केलेत गुलाम नमाजी देशांना
तुम्ही केलेत इराक बेचिराख,लटकवला जिगरबाज शहंशाह खुलेआम
तुम्ही हिरोशिमा-नागासाकीच्या येणाऱ्या पिढ्यांच्या दुधात कालवली बॉम्बची भुकटी
तुम्ही उतरवले लाल बावटे,डावलली किंमत श्रमाची
तुम्ही दाबल्या बुद्धाच्या आर्त प्रार्थना तिबेटमध्ये
तुम्ही केलेत फिमेल जेनायटल म्युटीलेशन सोमाली वाळवंटात
तुम्ही पाडला बाबरी मास्जीदीचा ढाच्या,घुसविल्यात भगव्या तलवारी स्त्रियांच्या गर्भात
तुम्ही केली उभी स्त्री रेडलाईट एरियात षंढत्व जोखण्यासाठी
तुम्ही वाढवला मानवी बाजार,रचली नवी अर्थव्यवस्था माणसांच्या गुलामीची
तुम्ही ठेवलात सतत पेटवत असंतोष गाव-शहर-देश-आंतरराष्ट्रापर्यंत
जेव्हा-जेव्हा हरलात,लावल्या स्त्रिया डावातही अनादी काळापासून
---त्या हरल्या-जिंकल्या तरी मांडतच गेल्या चुली
त्यांनी सांभाळली माणसं उदरात-पाठीवरही
आदी-अंताच्या साक्षी,आदिमायच्या वारसकरीन त्या
करायचे किती तह त्यांनी?बांधायच्या चर्चा?मागायचा जोगवा समानतेचा?
किती घोळवायची तुमची छप्पन भोकी संस्कृती?
किती लिहायचे वेगवेगळे जाहीरनामे?
लुब्रट काळमापन सुरूच अनौरस दारामागचं
मोजल्या का त्यांनी महारोगी पुवेजल्या पुटकुळ्या तुमच्या गुहेतल्या?
त्यांनी नाही तपासला कितव्या गाळीव कोषातला तुमचा डीएनए
नाही खरवडला समष्टीचा देहोदय,सारीच जैविक कुथाकुथ सारून बाजूला
तुमच्या वांझ संस्कृतीला त्या देतील गर्भाशय भाड्याने फळायला
किंवा,
घेऊ द्या त्यांच्या पदराखालच्या दिगंत शुभ्र झऱ्याखाली
तुमच्या तथाकथित संस्कृतीला
तरीही पुरून उरेल त्यांचा पान्हा
पोसेल समानता त्यांच्याच गर्भकोषातून...
आता तरी गाऊ द्या माणूसपणाचे सूक्त त्यांना,
त्यांच्याच उंच सुरात
....जगू द्या की त्यांनाही मुक्तपणे...!!!
-शामल गरुड
ई-५, प्राध्यापक सहनिवास,
मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परीसर,
कलिना, सांताकृझ (पूर्व), मुंबई -९८
प्रतिक्रिया
11 Nov 2015 - 7:35 am | मितान
बाप रे !
13 Nov 2015 - 11:27 pm | एस
अरे बाप रे!! :-O
20 Nov 2015 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नामदेव ढसाळ पंथातील कविता वाटली.
विद्रोह आणि नकार पोहचला.
-दिलीप बिरुटे