[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥
वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥
प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥
अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥
आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥
कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥
वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥
आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥
वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥
आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
******************************************************************************************************
प्रतिक्रिया
4 Nov 2015 - 4:17 pm | विलासराव
( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.)
मलाही यावर वाचायला आवडेल. माझे मरण पाहिले मी डोळा अशी काहीतरी ओवी आहे त्यांची. या अनुभवालाच बहुतेक बुद्धांनी निर्वाण म्हटले आहे.
२५०० वर्षांपूर्वी बुद्धांनी कलापअसा शब्द वापरलाय. तो छोट्यात छोटा कण जो विघटित होत नाही या अर्थाने.
4 Nov 2015 - 9:37 pm | यनावाला
@दत्ताजी जोशी
............ ते म्हणतात
....
भौतिकी, रसायन, वैद्यक, जीवशास्त्र अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी प्रयत्नपूर्वक अनेक निसर्गनियम शोधले. त्यांची सत्यासत्यता ठरविण्याची वैज्ञानिक पद्धत विकसित केली. तदनुसार ते तपासले. अनेक वैज्ञानिकांनी तपासले. त्या नियमांचा संग्रह म्हणजे मानवाचे अर्जित ज्ञानभांडार. अर्जित म्हणजे मिळवलेले, प्राप्त केलेले. सत्याच्या कसोटीला उतरणार्या तत्त्वांनाच या भांडारात स्थान मिळते. त्यामुळे हे नियम विश्वासार्ह असतात. त्या आधारे निर्माण केलेले तंत्रज्ञान इच्छित कार्य करतेच असा सार्वत्रिक अनुभव येतो. या ज्ञानभांडारावर कोणाचा एकाधिकार नाही. सर्वांना ते मुक्तपणे उपलब्ध आहे.
आपण शाळा-कॉलेजात जे मूलभूत ज्ञान शिकतो ते या भांडारातील असते. खगोलशास्त्राच्या पुस्तकात ग्रहतार्यांची माहिती असते. पण त्यांत मंगळाची बाधा, शनीची साडेसाती, गुरुपुष्य योग, कालसर्पयोग इत्यादींचा उल्लेख नसतो. माणसाच्या जीवनावर ग्रह-तार्यांचा परिणाम होतो असेही कुठे म्हटलेले नसते. कारण हे ज्ञानाचे विषय नाहीत. शरीरशास्त्राच्या पुस्तकात हृदय, मेंदू, यकृत इ. इंद्रियांची माहिती असते. पण आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, इ.चा उल्लेख नसतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी ती प्रत्यक्ष दिसली पाहिजे असे नाही. तिचे जे गुणधर्म वर्णिलेले असतात,परिणाम सांगितलेले असतात त्यांतील एकाचा तरी अनुभव यायला हवा. तो व्यक्तिनिरपेक्ष हवा. तसेच स्थल-काल निरपेक्ष हवा. देव दिसत नाही ठीक आहे. पण तो दयाळू आहे. दीनांचा वाली आहे. संकटकाळी धावून येतो. सज्जनांचे रक्षण करतो. दुर्जनांचे निर्दालन करतो. असे गुणवर्णन आहे. त्यांतील एकाही गुणाचा, कधीही अनुभव येत नाही. म्हणून देव अस्तित्वात नाही असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
गणित, व्याकरण इ.विषय हे मानवाच्या निर्मित ज्ञान संग्रहातील आहेत. तेही आपण शाळा-कॉलेजात शिकतो. यावरून सत्यज्ञान कोणते ते ओळखता येते. अज्ञानाच्या मागे लागणे हितावह नाही.
4 Nov 2015 - 9:43 pm | मांत्रिक
यावर खूप बोलता येईल. पण उद्या बोलतो.
6 Nov 2015 - 7:46 pm | दत्ता जोशी
धन्यवाद.
:D :D
तो दोन बेडकांचा विनोद माहिती आहे का? don 't change the subject वाला? त्याची आठवण आली.
असो. दिवाळीच्या अनेक उत्तम शुभेच्छा...!
6 Nov 2015 - 9:25 pm | यनावाला
@ दत्ताजी जोशी,
जरा समजून घ्या. विषयाला धरूनच लिहिले आहे.तुमची शंका होती
....
..त्यांची सत्यासत्यता ठरविण्याची वैज्ञानिक पद्धत विकसित केली. तदनुसार ते तपासले. अनेक वैज्ञानिकांनी तपासले. त्या नियमांचा संग्रह म्हणजे मानवाचे अर्जित ज्ञानभांडार.आपण शाळा-कॉलेजात जे मूलभूत ज्ञान शिकतो ते या भांडारातील असते.म्हणून त्या वैज्ञानिक नियमांवर विश्वास ठेवणे, ते खरे मानणे योग्य आहे. हे ग्रंथप्रामाण्य नव्हे. सत्यता आधीच पडताळली आहे. असे त्याचे स्पष्टीकरण आहे. नियमांची सत्यता आधीच पडताळलेली असते. कृपया ते प्रतिसादलेखन पुन्हा वाचावे. म्हणजे खुलासा होईल.
6 Nov 2015 - 10:07 pm | संदीप डांगे
वालावलकरजी,
बुद्धांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत, येशूपासून तुकारामापर्यंत, कबीरापासून नानकजींपर्यंत सर्व दिग्गज मंडळींनी काही प्रयोग करून लिहून ठेवलंय. त्या मार्गाने निष्ठेने जाणार्यांनाही तसेच अनुभव येतात. गीता/ज्ञानेश्वरीचे फक्त बडबड पारायण करणार्याला ते नाहीच कळणार. तत्सम शाळेत जे विज्ञान शिकवले जाते ते अनेक वैज्ञानिकांनी प्रयोग करून सिद्ध केले आहे. सामान्य माणसांनी केले आहे का? सामान्य माणसाला ते शक्य आहे का? क्रोसिन बनवणे विज्ञानाच्या तत्त्वानुसार शक्य आहे, विमान बनवणे हे विज्ञानाच्या नियमांवर आधारित आहे. विमान वा क्रोसिन बनवण्याचे फक्त पुस्तक वाचून प्रत्येक सामान्य माणुस विमान व क्रोसिन नाही बनवू शकत. त्यासाठी काही मूलभूत गुण लागतात, काही गोष्टींचा सखोल अभ्यास लागतो. अध्यात्म असो वा विज्ञान कुठलीही गोष्ट मिळवायला अभ्यास लागतोच. बाजारात सामान्य माणसासाठी मिळणारे मोबाईल, टीवी, कार इत्यादी गॅजेट्स हे तंत्रज्ञानाचे उत्पादन आहे. हे विशिष्ट लोकांनी व्यवसायासाठी पैसा कमवण्यासाठी सिमित ज्ञान बाजारात उपलब्ध केले आहे. 'ज्याला शक्य आहे तो' ती प्रत्येक गोष्ट स्वतः बनवू शकतो. विज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध असले तरी एडिसन वैद्यकशास्त्रातले शोध लावू किंवा तपासू शकत नाही. प्रत्येकाच्या संशोधनाचे एक क्षेत्र आहे. ते म्हणतील ते सत्य मानायला लागतं. ते सत्य आहेच असे नसतं. विज्ञानाचे नियम तर दर नवीन संशोधनागणिक नेहमीच बदलत आले आहेत. न्युटन चूक आहे हे सिद्ध करायला आइन्स्टाईन व्हायला लागतं. पिंपळगाव बुद्रुकचा कुणी शेतमजूर ते सिद्ध करत बसेल का? त्यासाठी त्याला आइन्स्टाइन इतकी बुद्धीमत्ता व व्यासंग पाहिजेच.
"निकोला टेस्लाचं काय झालं?" ह्या प्रश्नाचं उत्तर आपण द्याल तर विज्ञान विज्ञान म्हणून आपण ज्या सर्वसमावेशक, सहिष्णु, अभ्यासू वैगेरे जगाचा अभिमान बाळगता ते विश्व खरंच विज्ञानाची मूलतत्वे पाळतं का नाही हेही समजून येईल. एडिसनने एसी करंट्च्या विरोधात किती अवैज्ञानिक आकांडतांडव केला हेही आपणास ठावूक असेल. तेव्हा एडीसन आपण बरोबरच आहोत हेच सांगत होता ना? त्याने का नाही सत्य तपासायला प्रयोग केले?
शाळामहाविद्यालयांतून टेस्ला सारख्या प्रभृतींचे काही शिकवल्या जाते का हो कुठे? मलाच टेस्लाचे नाव आयुष्याच्या ३२व्या वर्षी कळले. आइन्स्टाईन-एडिसनचे बालपणापासून माहित आहे. अशी भेदभाव करणारी विज्ञानवादी जमात नेमकी कुठली वैज्ञानिक तत्त्वे पाळत असते कोण जाणे.
7 Nov 2015 - 10:20 am | मांत्रिक
+१११११११११११
8 Nov 2015 - 1:21 am | कवितानागेश
टेसलाचे संशोधन जसे मारले गेलय तसच जगदीशचन्द्र बोस यांचेही मूलभूत संशोधन मारले गेलय.
असो.
फ़क्त अत्यंत खेदानी नमूद करते की "मी म्हणजे आपले स्वतः चे नाव" इतके पोरकट उत्तर मी आजपर्यंत ऐकले नाही. :-(
9 Nov 2015 - 3:40 pm | संदीप डांगे
जेटमाऊली,
टेस्लाचा 'तुकाराम' केलाय भांडवलवाद्यांनी.
9 Nov 2015 - 4:47 pm | यनावाला
कोsहम् ? या प्रश्नाचे "स्वनाम"हे उत्तर लीमा उजेट यांना पोरकट वाटते. वस्तुत: तेच खरे उत्तर आहे. प्रश्न बालिश आहे म्हणून उत्तर पोरकट वाटणे स्वाभाविक आहे. मी कोण ? कोठून आलो ? माझ्या जन्माचे उद्दिष्ट काय ? मृत्युपश्चात् मी कोठे जाणार ? हे प्रश्न बाष्कळ आहेत. आध्यात्मिकांना ते गूढ, गहन, गंभीर वाटतात. त्यांनी असल्या फुटकळ प्रश्नांचे वृथा अवडंबर माजवून ठेवले आहे. त्यांना सरळ, साधे, सोपे भावत नाही. गूढ, धूसर, गंभीर आवडते.
जनुकसातत्य राखणे ही जन्मदात्यांची नैसर्गिक ऊर्मी असते.(नॅचरल इन्स्टिंक्ट). त्या ऊर्मीतून अपत्याचा जन्म होतो. तो त्याचा पहिला आणि शेवटचा जन्म असतो. त्यामागे कोणाचा काही हेतू नसतो. आनंद मिळतो,सुख होते म्हणून हे घडते. (आपल्याला सर्वगुणसंपन्न पुत्ररत्न होणार असे हल्ली काही जोडप्यांना वाटते. ते गर्भसंस्कारांविषयींच्या भ्रामक कल्पनांमुळे). "कस्य त्वं, त्वं कुत आयात:। ध्यानं देहि त्वमिह भ्रात: ।" (अरे भाऊ इकडे लक्ष दे. तू कोण ? कोणाचा? कुठून आलास ?) या आदिशंकरांच्या प्रश्नांची खरी उत्तरे आपल्या पासपोर्टवर असतात. ती म्हणजे, आपले नाव. माता-पित्यांची नावे आणि जन्मगाव. म्हणून उगीच दृष्टी ऊर्ध्वदिशेला लावून,उभंटा गंभीर चेहरा आणि तोंडाचा चंबू करून "मी कोsssण ? असा उद्गार काढू नये. कुणाच्या कानीं गेला तर ,"अरे, या वयातच याला अल्झायमर झाला की काय ?" अशी शंका यायची!
* "मी म्हणजे कोण?" असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर "मी म्हणजे माझा मेंदू. " या उत्तराचे स्पष्टीकरण देता येते.
* "माझे मूळस्वरूप काय?" या प्रश्नाचे उत्तर उत्क्रांतिवादात सापडते. ते आहे "लास्ट युनि्व्हर्सल कॉमन अॅन्सेस्टर(luca). याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण देता येते.
*मृत्युपश्चात् मी कोठे जाणार? "...बहुतेकांचा मृत देह स्मशानात नेतात. तिथे दहन केले तर राख होते. दफन केले माती होते. थोडी हाडे उरतात. आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष-सूर्यलोक-चंद्रलोक-ब्रह्मलोक-अर्चिरादि मार्ग या सर्व कल्पनेच्या भरार्या आहेत.
*" शेवटी अमर काय राहाते ?".. यावर बृहदारण्यक उपनिषदात "याज्ञवल्क्य होवाच, नामेति। अनन्तं वै नाम" (याज्ञवल्क्य म्हणाले: नाव. ते दीर्घकाळ राहू शकते.")
[जनुके अमर असतात असेही म्हणता येईल...अट लागू.]
9 Nov 2015 - 5:53 pm | संदीप डांगे
विकिपीडीयावरील लेखातून:
Science is a systematic enterprise that builds and organizes knowledge in the form of testable explanations and predictions about the universe.
खुद्द विज्ञानाचा उद्देश म्हणून वरचे प्रश्न असतांना ते बाष्कळ कसे काय? आपण कोण, कुठून आलो ह्यावरच गेले कित्येक शतके विज्ञानाचे संशोधन व अनुमान लावने सुरू आहे ना? जर ते बाष्कळ असेल तर त्या संशोधनांची गरज काय?
परत तेच. तुमच्या नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय अध्यात्माबद्दल. बुवाबाजीवाल्यांना आध्यात्मिकचे लेबल लावू नका. तसेच पुलंनी वर्णिलेल्या आध्यात्मिक बाबांसारखेच अध्यात्माचे जग असते असेही समजू नका. खरे अध्यात्मिक गूरू साध्या, सरळ, सोप्या सामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करतात.
अपत्यांच्या जन्मासाठी शरीरसंबंध होतो की संभोगाचा आनंद, सुख मिळते म्हणून? नक्की काय ते एक ठरवा.
पासपोर्ट, नाव, गाव, माता-पिता नसणारे असंख्य लोक या भूतलावर आहेत. त्यांची ओळख काय असते? आज संदिप डांगे नावाचे अनेक लोक या जगात आहेत. एकाचे तर तंतोतंत संपूर्ण नाव माझे आहे. तर तो आणि मी एकच का? समजा त्याने आणि मी एकच घर घेतले राहायला. तर पासपोर्टवरचा पत्ताही सेम येईल. आईचेही नाव बदलून घेऊन माझ्या आईचेच ठेवले तर आम्ही दोघे म्हणजे एकच आहोत असे होईल काय? माणूस म्हणजे नाव, गाव, पत्ता यापेक्षा वेगळं काहीच नाही?
प्रयोगशाळेत राहून बर्याच वैज्ञानिकांना म्हणे, कधी कधी 'मी कोण व इथे काय करतोय' हा प्रश्न पडतो. तोही विनोदच समजावा का?
विज्ञानवाद्यांचे हमखास फसणारे स्पष्टीकरण. मी म्हणजे 'माझा' मेंदू - हा 'माझा' म्हणणारा कोण आहे?
मानवाच्या सिमित बुद्धीस पटणारे स्पष्टीकरण म्हणजेच सत्य अशी काही विज्ञानाची व्याख्या आहे का? कारण प्रत्येक मनुष्याची बुद्धी वेगवेगळ्या पातळीवरचे स्पष्टीकरण कबूल करते.
क्षणाक्षणाला मृत्यू घडतो, दोन वर्षात संपूर्ण मानवी देह नवा कोरा असतो. शरीरात दोन वर्षाआधीचे काही राहत नाही. ते सर्व कुठे जाते, हे नवीन कोठून येते? कसे येत? (विज्ञानाचेच प्रश्न आहेत बरंका..)
कसं आहे की जन्म-मृत्यू हेच भ्रम आहेत. सूर्यलोक-चंद्रलोक-ब्रह्मलोक ह्या कल्पनेच्या भरार्या नसून अनुभवाला शब्दात बसवता येत नसल्याने झालेल्या घोडचुका आहेत. कश्मिरात 'स्वर्ग कुठे असेल तर इथेच आहे' असे कुठल्या बादशाहने लिहून ठेवले आहे. त्याला काश्मिरचे वर्णन त्याच शब्दात करता येत होते. म्हणून त्याच्यासाठी कश्मिर हा स्वर्ग.
खरंच. नाव अमर राहते? कुणाचे? माझ्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाच्या खापर-पणजोबाचे नाव नाही राहिले अमर. काय झाले असावे ब्रे?
उर्जा अमर आहे. न जन्मते न मरते. उर्जेचीच आपण सर्व रुपे आहोत. एनर्जी अँड म्याटर, यु नो..? हेच अध्यात्म आहे साहेब. तुम्ही कोणा बुवा-बाबाजींच्या नादी लागून कायतरी गैरसमज करून घेतला आहे.
आर यु शुअर...?
9 Nov 2015 - 6:05 pm | मांत्रिक
+१११ डांगे साहेब...
अगदी मुद्देसूद प्रतिवाद आहे.
9 Nov 2015 - 7:34 pm | कवितानागेश
समजा, २ आयडेन्टिकल ट्विन्सचे एकच नाव ठेवले तर एकमेकांसमोर त्यांचा "हां मी की तो मी?" असा गोंधळ नक्कीच होणार नाही. किंवा एकाचे १० क्लोन्स केले आणि एकच नाव ठेवले तरी त्या ११ जणांमध्ये पुन्हा यातला नक्की मी कोण?, असा प्रश्न नक्की पडणार नाही. मग अशावे ळे स त्या प्रत्येकाच्या मी ची जाणीव वेगवेगळी असणार, नाव गाव वगैरे वरवरच्या गोष्टी सोडल्यास....
मग काय करायचे?
तोंडाचा चंबू न करताच हां प्रश्न कुणालाही नार्मल माणसाला पडू शकतो,हे लक्षात घेतले तर एकन्दरीत माणूस नक्की काय शोधायचा प्रयत्न करतोय हे लक्षात येईल.
मी म्हणजे माझा मेंदू हे उत्तर अर्धवट झाले. पुन्हा बुद्धी आणि मन अमूर्त आहेत असे तुम्हीच मागे एका प्रतिसादात लिहिलय. अमूर्त म्हणजे नक्की काय, आणि एखादी अमूर्त गोष्ट मूर्त परिणाम कशी काय घडवून आणत असते हेदेखिल आम्हा अडाणी लोकांना सांगा. अमूर्त मनात भीती वाटली की मूर्त शरीरातले हॉर्मोन्स बदलून घाम येतो, अति भीतीने केस उभे राहतात, क्वचित् पांढरेही होतात. अमूर्त बुद्धी म्हणजे नक्की काय. अमूर्त बुड्ढी मूर्त मेंदूत नक्की कुठे असते?
कोमामधल्या पेशन्ट्सच्या अनुभवांचे काय? हेदेखिल सांगा.
शिवाय उद्या माझामेंदू आणि माझ्याभावाचा मेंदू आम्ही एक्सचेंज केला तर त्याबरोबर बुद्धी आणि मन सुद्धा ट्रान्सफर होईल का?
हे सगळे प्रश्न तुमच्या प्रतिसादातून निर्माण झालेले आहेत. त्यांचा अध्यात्माशी संबंध नाही!
शिवाय यादन्यवल्क्य नक्की काय म्हणाले आहेत ते ज़रा बघून सांगते. इथे काहीतरी गोंधळ आहे नक्कीच.
4 Nov 2015 - 10:40 pm | कवितानागेश
या चर्चेचा उपयोग काय हे कुणी सांगेल का मला...
डोळ्यावर तथाकथित अर्धवट विज्ञानाची अत्यंत शहानापणाची पट्टी बांधलेले कधीच योग्य उदाहरणे वाचणार नाहीत.
5 Nov 2015 - 1:04 am | सतिश गावडे
अजून काही नक्की ठरलं नाही. ठरलं की तुम्हाला व्यनि करु.
अर्धवट विज्ञानाची शहानापणाची पट्टी म्हणजे काय?
5 Nov 2015 - 1:36 am | कवितानागेश
म्हणजे अर्ध्या हळ कुंडाने पिवळे होणे.
बेसिकली आपल्याला अजूनही बऱ्याच गोष्टी नक्की माहीत नाहीत, पण माणसात हल्ली उगिचच स्वतः ला खूपच शहाणे समजायची फयाशन आली आहे. अजून पुष्कळ ज्ञान मिलवन्याचे पोटेंशियल माणसात नक्कीच आहे, पण आपण खरोखर माणूस म्हणून स्वतः ची असलेली ताकद न वापरता भलत्या आणि फुसक्या गोष्टीन्वर स्वतः ला फार शहाणे हुशार उत्क्रांत वगैरे समजतो, असे माझे आजपर्यंतच्या माझ्या अनुभवावरून, वाचनावरुन, निरीक्षणावरून आणि शिक्षणावरून मत आहे.
5 Nov 2015 - 1:51 am | प्यारे१
उरलेलं अर्ध्ं हळकुंड कुठे मिळेल? डोक्याला थोड़ा मार लागलाय. उगाळून लावावी म्हणतो. ज्ञान प्राप्ती होईल ना?
5 Nov 2015 - 1:04 pm | विलासराव
सापडलच तर त्यातल अर्ध मलाही मिळायलाच हवे.
6 Nov 2015 - 8:16 pm | भाऊंचे भाऊ
खिक्क.
6 Nov 2015 - 6:22 pm | असंका
यनावाला साहेब,
धन्यवाद!
9 Nov 2015 - 3:36 pm | नंदन
फेसबुकवर सापडलेले एक रत्नः
14 Nov 2015 - 3:01 am | आरोह
न्यूटन चूक होता आणि आईनस्टाईन बरोबर??
कसे काय?? एक्सप्लेनशन ऐकायला आवडेल..मला वाटायचे दोघेही बरोबर
14 Nov 2015 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे
मी कोण? तथा कोह्म याच उत्तर आपल्या अध्यात्मात दिले आहे की? अहं ब्रह्मास्मि| हाय काय आन नाय काय?
ब्रह्म स्वयंभू आहे त्यामुळे पुढचे प्रश्न विचार नका? :)
15 Nov 2015 - 3:14 am | चित्रगुप्त
कोहं याचा उलगडा बुद्धि वा तर्कापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगाने होईल. शांत जागी स्वस्थ चित्ताने श्वास घेताना को, सोडताना हं असा ध्वनी मनातल्या मनात करत किमान तीन मिनीटे रोज नेमाने बसा. महिनाभरात बघा काय होते. अध्यात्म, विज्ञान वगैरे भंकस करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करून पहा .