.
.
चौकातला दिवा लाल झाला, गाड्या थांबल्या.
रस्ता ओलांडून फटाफट ते सगळे रस्त्याच्या बाजूला ठरलेल्या जागी आले.
मनातली काळजी, शंका, उत्सुकता इतरांना कळू नये याची सगळ्यांची धडपड चालू होती.
पण कदाचित जगण्याचा तितकासा अनुभव पाठीशी नसल्याने असेल, भावना लपवण्याच्या धडपडीत त्यांचे चेहरे जास्त बोलत होते.
“आले का समदे?” नंदाने विचारलं. ते विचारताना एक कमी आहे हे तिच्या लक्षात आलं.
“बच्चन यायचाय अजून, जरा रुकेंगे...” हवेली विनंतीचा - तिला एरवी न शोभणारा - सूर लावत म्हणाली.
कुणी काही बोललं नाही, पण कुणी जागचं हललंही नाही.
“वो देख बच्चन...” मन्या ओरडला.
वाहत्या रस्त्यावर, चौकात दिवा लाल व्हायची वाट पाहत पाच वर्षांचा बच्चन उभा होता. त्याचं खरं नाव इतरांना काय, त्यालाही माहीत नव्हतं. त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि ती त्याला बहुतेक जड झाली होती. दिवा लाल होताच गाड्या पुन्हा कचकन थांबल्या, दुसर्या बाजूला गती मिळाली.. बच्चन पळत पळत आला.
खान पुढं झाला. बच्चनच्या गालावरून हात फिरवत म्हणाला, “किदर लंबा गयेला था रे छोटू?”
बच्चन नुसताच हसला.
“चलो, शाळेच्या पीछे जाऊ. सुट्टी है, कुणी नसंल उधर.” जेमतेम आठ-नऊ वर्षांचा असेल खान. पण सगळे त्याच्या पाठोपाठ शाळेच्या मागच्या बाजूला निघाले.
ती शाळा म्हणजे या मुलांच्या दृष्टीने एक मोठी इमारत होती. त्यात दहा-बारा खोल्या होत्या. शाळेचं कुंपण बर्याच ठिकाणी मोडलं होतं. तिथे राहत नव्हतं कुणी. पण सकाळी भरपूर पोरं-पोरी आणि आठ-दहा मोठी माणसं यायची. दुपारी असेच आणखी काही जण यायचे. दिवाळी जवळ आली की सुट्टी असायची. या वेळी शाळेच्या आसपास गेलं तर चालायचं, कारण शिपाईसुद्धा कुठेतरी आत झोपलेला असायचा किंवा पत्ते खेळत असायचा.
शाळेकडे जाता जाता हळूहळू त्या मुलांचे चेहरे हसरे झाले.
लिंबाच्या सावलीत कोंडाळं करून ते बसले. मुंगीही आत शिरणार नाही इतके दाटीवाटीने बसले. प्रत्येकाच्या हातात प्लास्टिकची पिशवी, कागदाची पुरचुंडी, खोकं असं काही ना काही होतं. हातातलं दुसर्याला दिसू नये अशी प्रत्येकाची पुन्हा धडपड होती. डोळ्यांत चमक होती.
“आता समदे डोळे बंद करा.” नंदा म्हणाली.
“मी न्हाय करायचा” कंद्या जोरात ओरडला.
बच्चनने कंद्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, “घबरनेका नाय. नंदादीदी है ना.” सगळे हसले.
खान कंद्याला म्हणाला, “छोटूका डोका अच्चा है, उसका ऐकत जा.”
नंदा म्हणाली, “कंद्या, कोणबी घेणार नाही तुज्या हातातलं, मी हाये ना हितं? ”
नंदा त्या सगळ्यांची दीदी होती. कंद्याला तिचं म्हणणं पटलं.
“समदे डोळे बंद करा. मी तीन बार राम-सीतामाय-हनुमान बोलीन. तिसर्या येळी हनुमान बोल्ले की समद्यानी आपल्याजवळ जे काय हाय ते सबको दिखाना.” नंदा म्हणाली.
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
“राम-सीतामाय-हनुमान”
सगळ्यांनी डोळे उघडले आणि हातातला खजिना इतरांना दाखवायला सुरुवात केली.
नंदाच्या हातातल्या फाटक्या खोक्यात तीन लाडू होते.
खानच्या प्लास्टिक बॅगमध्ये काही सादळलेले फटाके होते.
बच्चन नशीबवान होता. एका बाईने त्याला शंकरपाळी दिली होती, त्याला थोडासा वास येत होता, पण त्या बाईने बच्चनला दहा रुपयांची नोट दिली होती.
कंद्याने पाकीट उघडलं आणि तो रडायला लागला. त्याच्या पाकिटात फक्त दोन वेफर्स होते.
हवेलीकडे बाकरवडी होती.
नानीला कागदात बांधलेली शेव मिळाली होती.
संगीला कसलीतरी वडी मिळाली होती.
“चलो, आपण भी दिवाळी मनवू.” बच्चन आनंदाने ओरडला. सगळे हसले.
नंदा आणि खानने खाण्याच्या पदार्थांची वाटणी केली. भूक तर होतीच प्रत्येकाला. तरी पोरं-पोरी एकमेकांना घासातला घास “ये देख, अच्चा है” म्हणत आग्रह करत देऊ लागली. कंद्याही रडू विसरून हसायला लागला. बघता बघता त्यांनी खाऊचा फडशा पाडला.
“आता क्या करनेका?” मिंटू म्हणाली.
“अब वो बडे चौकमे जायेंगे. याद रखना छोटू, लंबा नई जाना जादा. और कंद्या, केवल कारवालोंसे माँगना, बाईकवाले कुच्च नहीं देते. मिंटू, गाली मत देना किसीको....” खान सूत्रं हाती घेत एकेकाला सूचना द्यायला लागला.
ती साताठ मुलं-मुली पुढच्या चौकाकडे निघाली.
एक हात संगीच्या, तर दुसरा हवेलीच्या खांद्यावर टाकून नंदा चालायली लागली.
खानने एका हातात बच्चनचा, तर दुसर्या हातात मन्याचा हात घेतला.
“कित्ते दिन है दिवाली अजून?” संगीनं विचारलं.
“दिवाळी संपली काल,” नंदादीदी म्हणाली. “मंग आता लोकं उरलंसुरलं देतेत ना आपल्याला, अजून दोन चार दिस हाये म्हणायची आपली दिवाळी.” संगीला समजावत ती म्हणाली.
“त्याचं काय हाय संगे, आपली दिवाळी जरा उशिरा येतीय.” हवेली म्हणाली.
नंदाने मान डोलावली.
काय बोलावं ते न सुचून संगी आणि हवेली गप्प झाल्या.
बड्या चौकाचा रस्ता संपता संपत नव्हता.
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 1:47 am | अंतु बर्वा
चटका लावणारी कथा...
10 Nov 2015 - 1:53 am | चतुरंग
आता फराळाचा पहिला घास घेताना ही कथा आठवणार!
-रंगा
10 Nov 2015 - 7:29 am | बहुगुणी
आता यावर्षी तरी उशीर न होता उर्वरित दिवाळीत सर्वांना वेळेत फराळ मिळावा ही सदिच्छा.
10 Nov 2015 - 8:43 am | बिपिन कार्यकर्ते
_/\_
10 Nov 2015 - 9:37 am | सुधीर
काय ओ ताई, पहिल्याच दिवशी, पहिल्याच लेखात चटका लावलात.
असो, दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!
10 Nov 2015 - 9:50 am | सुमीत भातखंडे
आवडली...पण त्रास झाला वाचून
10 Nov 2015 - 10:28 am | यशोधरा
आई गं...
10 Nov 2015 - 11:24 am | पियुशा
लेखन फार सशक्त आहे तुमच :) पण अशी वेळ कुणावरही येउ नये हीच प्रार्थना --/\--
10 Nov 2015 - 11:57 am | आनंद कांबीकर
..
10 Nov 2015 - 1:48 pm | मितान
अशी मुलं खूप जवळून बघितली आहेत. एकेक चेहरा आठवला ! गलबलून आले :(
10 Nov 2015 - 3:18 pm | दिपक.कुवेत
समाजाचा हाहि भाग अस्वस्थ करतो.
10 Nov 2015 - 6:08 pm | नूतन सावंत
अतिवासताई,चटका लावणारी गोष्ट.
10 Nov 2015 - 6:26 pm | बोका-ए-आझम
आवडली.
10 Nov 2015 - 6:28 pm | मित्रहो
मनाला चटका लावून गेली.
10 Nov 2015 - 8:01 pm | अजया
कथा आवडली.
10 Nov 2015 - 9:24 pm | पैसा
कथा आवडली.
11 Nov 2015 - 2:51 am | चैत्रबन
वाचून कसतरीच झाल...
11 Nov 2015 - 9:16 am | एस
कथा आवडली. भूक ही जगातली सर्वात भयानक आग आहे हे अधोरेखित करणारी 'उशिरा' ही कथा.
11 Nov 2015 - 1:00 pm | गामा पैलवान
अतिवासताई,
कोणे एके काळी भारतात चोर आणि भिकारी नसंत हे आठवलं.
असो.
या जगात फक्त चार मूळ समस्या आहेत. त्या सोडून बाकी सगळ्या कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आहेत. त्या चार म्हणजे जन्म, मृत्यू, जरा (=म्हातारपण) आणि व्याधी (=रोग). या यादीत भूक ही पाचवी टाकावी का या संभ्रमात पडलोय.
आ.न.,
-गा.पै.
11 Nov 2015 - 5:36 pm | एक एकटा एकटाच
+१
11 Nov 2015 - 1:32 pm | अभ्या..
अर्रर्रर्रर्र
अवघड असते खरेच. :(
11 Nov 2015 - 1:35 pm | अभ्या..
अतिवास तै. ह्या मुलांची दिवाळी उशीरा झाली/होते अगदी जीवाला चटका लावते. एक अजून गोष्ट आहे. खूप लोकांची व्यावसायिकांची दिवाळी उशीराच होते. लोकांची सगळी दिवाळी पार पडल्यावर. आम्हीही त्यातलेच. काय करणार. :(
रुपयापुढे चालत नाही काही.
11 Nov 2015 - 5:04 pm | प्रभाकर पेठकर
डोळे भरून आले. शाळेच्या आवारात जीवनाचे धडे गिरविणारे निष्पाप जीव.
लहानपणी एका दिवाळीत, मी बडोद्याला माझ्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तिथे शेजारीच एक श्रीमंत गृहस्थ राहायचे. दिवाळीचे ४-५ दिवस ते एका मोठ्या टोपल्यात फटाके ठेवून ते रस्त्याच्या कडेला ठेवायचे. रस्ता त्यांच्या घराला लागूनच होता. त्यातून एकावेळी एक फटाका घेऊन कोणीही तो फोडावा. अट ही की घरी न्यायचा नाही तिथेच वाजवायचा. आजूबाजूची अनेक (कमीत कमी १५-२० तरी) मुले तिथे रोज जमायची आणि मनसोक्त फटाके फोडायची.
आज ह्या कथेने ती आठवण जागवली.
11 Nov 2015 - 5:38 pm | एक एकटा एकटाच
आता ह्या कथेला
"आवडली"
तरी कसं म्हणू
11 Nov 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृदयस्पर्शी !
11 Nov 2015 - 7:52 pm | सस्नेह
ही दिवाळी चटका लावून गेली..
12 Nov 2015 - 12:20 am | Maharani
छान कथा.आवडली.
12 Nov 2015 - 2:29 am | पद्मावति
चटका लावून गेली ही कथा...
12 Nov 2015 - 12:12 pm | इशा१२३
असे अनेक वाट पहाणारे चेहरे डोळ्यासमोर आले.अशी उशिराची दिवाळी कुणाच्याच नशीबी नको.
12 Nov 2015 - 12:19 pm | मुक्त विहारि
"देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे..
घेता घेता एक दिवस....देणार्याचे हात घ्यावे...."
अद्याप तरी देण्या इतपत हात सशक्त झाले नाहीत.पण कधी झालेच तर, ह्या अशा कथा, हात आखडता, घेवु देणार नाहीत.
कथा आवडली, हे सांगायला नकोच.
17 Nov 2015 - 5:30 pm | नाखु
सशक्त कथा आणि अगदी काल्पनीक नसलेली
12 Nov 2015 - 6:04 pm | सानिकास्वप्निल
कथा आवडली पण वाचून वाईट वाटले :(
16 Nov 2015 - 10:05 am | बांवरे
तुमची कथा प्रत्ययकारी आहे. स्तंभित करते !
16 Nov 2015 - 2:24 pm | चिगो
कानापाशी फटाका फुटावा तशी..
चटका लावणारी कथा..
__/\__
22 Nov 2015 - 5:49 pm | सोत्रि
.
- (चटका लागलेला) सोकाजी
24 Nov 2015 - 9:55 am | स्मिता_१३
कथा आवडली. चटका लाउन गेली
24 Nov 2015 - 4:57 pm | सूड
.
27 Nov 2015 - 8:12 am | सौन्दर्य
'भूक तर होतीच प्रत्येकाला. तरी पोरं-पोरी एकमेकांना घासातला घास “ये देख, अच्चा है” म्हणत आग्रह करत देऊ लागली.' हे वाक्य आणि त्यातील भावना एकदम जबरदस्त. मनाला चटका लावणारी गोष्ट. उशिरा दिवाळी कोणाच्याही नशिबी येऊ नये हीच त्या विधात्या जवळ प्रार्थना.
2 Dec 2015 - 9:12 am | नगरीनिरंजन
वास्तवदर्शी कथा आवडली.
24 Oct 2016 - 11:36 am | हेमंत लाटकर
छान ! कुठेतरी वाचल्यासारखे वाटते!