"मुग्धा"
उपमा विशेषण तुला पुरेना
नाव साजीरे ओठी ठरेना
कसे सुटावे क्लिष्ट कोडे
आई-बाबा, आजी-आजोबांनाही कळेना!
लखलख चमचम नभांगणातील | नक्षत्राचा तारा तू |
माणिक-मोती, नीलम पाचू | अव्वल रत्ना हिरा तू ||
तू परी तू मंदाकिनी | निलाक्षी सुनयना तू |
तू पल्लवी तू गोजिरी | सुहासिनी सुवदना तू ||
सकवार सोनाली तू | हळुवार हसरी स्मिता तू |
तू रूपाली तू रातराणी | सुमना तू प्राजक्ता तू ||
तू मधुरा तू काव्या | ओवी तू कादंबरी तू |
तू अक्षरा तू सुवर्णा | चित्रा तू किमया तू ||
तू वीणा तू वृंदा | विद्या तू विनया तू |
तू वंदना तू वज्रा | विरता तू विजया तू ||
तू योगिनी तू तेजस्विनी | कमला तू सीता तू |
तू राधा तू मीरा | तृप्ती तू, गीता तू ||
यज्ञा तू, गौरी-मंगला | दिव्या तू मानसी तू |
भैरवी-भूपाळी अन | स्वरा तू रागिनी तू ||
मेघा, वर्षा, नीरा तू | सरिता तू गंगा तू |
तू आर्या तू अवनी | संस्कृती, संयोगिता तू ||
तू श्वेतप्रभा तू पूर्वा | श्यामल वर्णा संध्या तू |
मोहक-मयुरी मुक्ता तू | संमोहिनी "मुग्धा" तू! ||
*********************************************************************************
मिळेल का?
एकच गाणे ओठांवर हे
मनास वाटे, कुणी ऐकावे
गाण्यात या हरवणारी
जोडी 'डूलांची' मिळेल का
रात्र थोडी सोंगे फार
अपेक्षांचा सलतो भार
खेळ आजचा पूर्ण कराया
वेळ 'उद्याचा' मिळेल का?
खुणावती पुन्हा त्या वाटा
आठवणींच्या कधी स्वप्नांच्या
सोबत मजला छान मजेची
त्या 'पायांची' मिळेल का?
वाटे मजला होउनी जावे
क्षणात हे अन क्षणात ते
अद्भुत, गूढ गुहेत कुठल्या
तो 'दिवा-जादूचा' मिळेल का?
उतरून खाली कल्पनेतून
मागतो मी डोळे उघडून
ओंजळीत सा-या पसाभर
दान 'सुखाचे' मिळेल का?
*********************************************************************************
हलके धरून
खट्याळ लडिवाळ
बट कुरवाळ
वाऱ्यावर लहराया!
डचमळे कसा
ओठ काठ,
मदिरेचा थाट
बेहोष कराया!
तंग तोकडी
चोळी निळी,
तुझी भोळी
लपविते काया!
भासे मज
लावण्य खाण,
तू जाण
अस्मानी सौंदर्या!
काव्य माझे
घडते अवघडते
अपुरे पडते
तुला वर्णाया!
प्रतिक्रिया
11 Nov 2015 - 7:31 am | मितान
मिळेल का ?
ही कविता सर्वात छान वाटली.
मुग्धा पण !
11 Nov 2015 - 10:20 am | बोका-ए-आझम
बाकीच्याही छान!
11 Nov 2015 - 12:54 pm | पैसा
आवडल्या
11 Nov 2015 - 1:03 pm | अभ्या..
छान कविता सॅन्डी.
.
पैल्या कवितेत आमच्या हिरॉइनचे नाव न आल्याने थोडे वाईट वाटले. ;)
मी देईन तिला त्यात अॅड करुन. ;)
11 Nov 2015 - 1:20 pm | चांदणे संदीप
:o
:-)
:D चालतंय की! ;-)
11 Nov 2015 - 9:39 pm | मित्रहो
तिन्ही कविता वेगवेगळ्या विषयावरच्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या
11 Nov 2015 - 10:19 pm | जव्हेरगंज
पैल्या कवितेतल्या पोरींची नावं वाचायला मज्जा आली..!
बादवे
11 Nov 2015 - 11:39 pm | एक एकटा एकटाच
कविता चांगल्या आहेत
"मिळेल का" ख़ास