उपासाचे कबाब!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
20 Oct 2015 - 6:44 pm

नवरात्रीचे नऊ दिवस उपास माझा नवरा गेली कित्येक वर्षे करतो.. पहिल्या २-३ माळा झाल्या की मग दूध, फळांवरून हळूहळू गाडी सा. खि., बटाट्याचा,रताळ्याचा किस, उपासाच्या भाजणीची थालिपिठ यावर येऊन ठेपते. काहीतरी वेगळे हवे आणि जास्त स्टार्ची,ऑयली नको अशी 'आखूडशिंगी बहुदुधी' डिश हवी असते. ह्यावर्षी ह्या मोडवर आल्यावर त्याने माझं डोकं न खाता चल जरा इंडियन स्टोअर मध्ये जाऊ असा विचार मांडला. तेथे गेल्यावर हा सुरण शोधू लागला. आता आम्ही काही राणीच्या देशात राहत नाही, ना उसगावात.. त्यामुळे आपल्याला हव्या त्या भारतीय गोष्टी हव्या तेव्हा मिळतीलच अशी खात्री अजिब्बात नसते आणि त्या परंपरेला अनुसरून सुरण काही मिळाला नाही.मग ह्या बाबाने लहानशी कच्ची पपई उचलली. "अरे ती पिकेपर्यंत दसराही होऊन जाईल, त्यापेक्षा पिकलेलीच घे ना.." ह्या माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केळावेफर्स करतो ती कच्ची केळी घेतली. "अरे,अरे.. ही तयार केळी घे ना.. " हे माझे म्हणणे बहुदा आजूबाजूच्या लोकांनीच ऐकले फक्त..
आता ह्याचे काय करायचे? ते कळू शकेल का मला? ह्या माझ्या प्रश्नाचे मात्र लगेच उत्तर आले.. कबाब!
"क्काय?" मी दुकानात आहे हे विसरून किंचाळलेच. "कबाब? अरे उपास आहेत ना तुझे? कबाब कसले करतोस?"
"अग बाई, उपासाचे कबाब! " "हॅ.. काहीतरी फेकू नकोस. मला फक्त शिगकबाब, रेशमी कबाब गेला बाजार हराभरा कबाब माहित आहेत आणि दसर्‍याच्या आधी मी ह्यातलं काहीही करणार नाहीये.." इति मी.. आमचे 'प्रेमळ संवाद' सुरू झालेत हे लक्षात आल्यावर पैसे चुकते करून तिथून बाहेरच पडलो.
घरी येताना म्हटले हे असं काही नसतं, उपासाचे कबाब बिबाब मी पहिल्यांदाच ऐकतेय. तर त्यावर दिनेश म्हणाला, "इंजिनिअरिंगला असताना आम्ही हे उपासाचे कबाब खायचो नेहमी, एका उडप्याच्या हाटेलात. त्यालाच एकदा ते मेसमध्ये बनवायला सांगितले आणि मेसच्या आचार्‍याला रेसिपी शिकायला लावली. मग आमच्या मेसमध्येही बरेचदा होत असत." दिनेश मनाने कॉलेजच्या दिवसात पोहोचला होता. त्यामुळे मेसच्या आचार्‍याकडून ह्याने कधी ती रेसिपी शिकली हा प्रश्न मनातच ठेवून कसे आणि काय करायचे ते सांग? म्हणत मी एकीकडे त्याच्या नकळत दुसरा ऑप्शन म्हणून बटाटे उकडून ठेवले आणि फळे आहेत ना ते पाहून ठेवले. हा प्रयोग फसला तर .. अशी शंका मनात होतीच पण बोलून दाखवता येत नव्हती.
एका मोठ्या केळ्याचे सालासकटच मोठे दोन तीन तुकडे करून ती सालं काळी होईपर्यंत मायक्रोवेव केली.(८०० वॅटला साधारण ३ते ४ मिनिटे)
पपई अर्धी चिरली.मग साल काढून किसली आणि तीही मायक्रोतून वाफवून काढली.(८०० वॅटला आधी ३ मिनिटे ,मग बाहेर काढून एकदा वरखाली करून परत २ मिनिटे)
आणि उरलेली अर्धी पपई फ्रिजमध्ये 'आ' वासून पडली.
लागले तर असू देत म्हणून उकडून ठेवलेल्या बटाट्यातले २ मध्यम बटाटेही घेतले.(सुरण नव्हता ना, नाहीतर तो सुध्दा साधारण २ बटाट्यांच्या एवढा घेतला असता.)
४-५ हिरव्या मिरच्या, बचकभर कोथिंबिर आणि चमचाभर जिरं वाटले. त्यातलं चमचाभर वाटण बाजूला काढले.
केळ्याची सालं काढून ती किसली. त्यावर उकडलेले बटाटे किसले त्यात वाफवलेला पपईचा किस असे तिन्ही किस एकत्र केले. त्यात जिरं मिरचीचे वाटण आणि मीठ घातले आणि हलके मळले. चक्क गोळा तयार झाला.
आता ह्याचे हराभरा कबाब सारखे कबाब कर.. असा हुकूम आला. मग त्याचे कबाब तयार केले.

.
हे कबाब शॅलो फ्राय केले.
वाडगाभर दह्यात एक मोठा चमचाभर दाण्याचं कूट, मीठ आणि मिरची+कोथिंबिर+ जिर्‍याच्या वाटणातलं चमचाभर वाटण घातलं. (समजलं आता चमचाभर वाटण बाजूला का काढून ठेवलं ते..)
गरम गरम कबाब त्या दह्यातल्या इन्स्टंट चटणी बरोबर चक्क चांगले लागत होते. म्हणून हा रेसिपी प्रपंच!
(आता ह्या सगळ्या गोष्टीतून रेसिपी शोधून काढायला सोपे जावे म्हणून ती ठळक केली आहे.)

.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

20 Oct 2015 - 6:46 pm | कविता१९७८

वाह टेस्टी टेस्टी

उशीरा आली पण आली ब्वा पाकृ .

आम्ही या उपासात मीठ खात नसल्यानं कसं जमेल कुणास ठाऊक!

सौंदाळा's picture

20 Oct 2015 - 7:00 pm | सौंदाळा

अतिशय टेम्प्टींग आणि नाविन्यपुर्ण पदार्थ.
नक्की करणार

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 7:12 pm | मांत्रिक

खतरा रेसिपी!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2015 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

आत्मुभटा कडून अत्यंत धन्यवाद

सदर पाक कृतिचि 1 प्रत आम्ही आमचे (गुरूजी लोकांना साबुदाणे) खिचड़ी खायला लावणायर्ा काही दू दू यजमानांस देणार आहोत..

करा अता हे उपवास कबाब म्हणाव!

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 7:32 pm | प्यारे१

विधी आहे म्हणून सांगा. नैवेद्यास लागतात.
सगळ्यांनी उपवास करायचा असतो नि हे 'स्वा(ती)दि(नेश)'ष्ट कबाब खायचे असतात.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

रैट रैट..तसंच सांगितल पायजे,नायतर ऐकत नैत लोकं ..दुत्त दुत्त! :-/

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2015 - 7:35 pm | प्रभाकर पेठकर

'उपासाचे कबाब' हे शिर्षक वाचल्यावर माझ्या डोळ्यांसमोर तुर्की टोपी घातलेला एखादा मुसलमान सोवळं नेसून सत्यनारायणाच्या पुजेला बसल्याचा भास झाला.

पाककृती सुरण घालून बनविली जाईल.

मधुरा देशपांडे's picture

20 Oct 2015 - 7:40 pm | मधुरा देशपांडे

मस्त दिसताहेत. दिनेशदादांना प्रत्यक्ष भेटीत पुन्हा पोच देईन. :)

वॉ व टेम्प्टिंग दिस्तायेत् कबाब

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 7:50 pm | बॅटमॅन

रेशिपी उत्तमच.

अवांतरः अलीकडे उपवासाच्या नावाखाली अक्षरशः काहीही बनवले जाते. अता उपवासाचे चिकन पाहिले की डोळे मिटायला मोकळा =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 11:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जिरं आणि साजुक तुपाच्या फोडणीमधलं चिकन खाल्लेलं नाहियेस का? पुढच्या भेटीत खिलवतो =))

बॅटमॅन's picture

21 Oct 2015 - 2:22 pm | बॅटमॅन

खाल्लंय की. साजूक तुपात बनवलेली बिर्यानी खाल्लेली आहे. पण ते कै उपवासाचं चिकन नाय होत. उपवासाच्या चिकनमध्ये तुमचे ते मसाले, तूप , कांदाटोम्याटो वगैरे चालत नाय. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे उपवासाचे पदार्थ असले तर उपास करायला एका पायावर तयार आहे :)

नूतन सावंत's picture

20 Oct 2015 - 7:52 pm | नूतन सावंत

स्वाती,झकास बरं का!उपास करत नसले तरी करून पाहायला हवेच कबाब.

त्रिवेणी's picture

20 Oct 2015 - 7:53 pm | त्रिवेणी

मस्त दिस्तायत कबाब.

मलाही वाटलं लेख उघडू का नको. ईटिव्ही ( कलर्स ) गुजराती चानेलवर असेच शाकाहारी पदार्थ फक्त नावं मोमो, कबाब ,हॅाट डॅाग्ज वगैरेनी असतात.कच्ची केळी ,सूरण,भरपूर हिरव्या मिरचा मिर्चा आणि चीज ( हे मात्र शाकाहारी आहे असा बय्राच जणांचा समज आहे)) घालून केलेले 'डिशेस' असतात.
दुसरी एक शंका आली - दादरी घटनेचा निशेध म्हणून एका संस्थळावर बीफचे पदार्थ दिले जात आहेत तसं तर नाही?
ठीक आहे. ही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेत आणि चांगली का नाही लागणार?सादरीकरण छान आहे.

ही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेतही सळईवरची चमचमीत भजी चांगली दिसताहेत

जरा मला अडाण्याला एक सांगा हो. सळई म्हणजे घुपसून फिरवून फिरवून भाजलेले की सळया असतेत त्यावर ठेवून भाजलेले? ग्रील म्हणतेत तेच ना?

चकण्याला चालल काय? ;)
रामकृष्ण हारी. येतेय इमान आमच्यासाठी आता लवकर. ;)

झकास रेसिपी! वाखु साठवली आहे.

एस's picture

20 Oct 2015 - 10:48 pm | एस

वाह!!?

ते बघा अभ्या संपादकांनी वाखू साठवली आहे.उगाच हिकडं धाग्याचं भजं झालं तर आपण दसरा पाहणार नाही.तू आपली छानशी सरस्वती काढ बघू सळईची चुकलं आकड्यांची दसय्रासाठी.

ते बघा अभ्या संपादकांनी वाखू साठवली आहे

मनमे लड्डू फुटा.
एक सेकंदभर वाटले मगाशी मिपा १० मिनिटे बंद झालते तेव्हाच मालकानी मला संपादक केले की काय? ;)
असो. सरस्वती येणार कंजूसकाका. पारंपारिकच येणार. :)

स्वातीताई, बर्‍याच रेशिप्या येऊन गेल्या तुझ्या! आता बोलवच मला. नवरात्रात बोलावल्यास पुण्य मिळेल.
पाकृ व फोटू आवडले. गप्प बसल्या गेले आहे.

रातराणी's picture

20 Oct 2015 - 11:16 pm | रातराणी

मस्त!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 11:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं दिसतय. कधीतरी करायला पाहिजे.

#अभ्या..,दहा मिनीटे मिपा बंद झाले अन मला वाटले मला संपादक केले की काय?"--
मिपा काय दौंड जंक्शन आहे दहा मिनिटात इंजेन बदलायला? इकडे कर्जतला इंजेनं साइडिंगला पडलेली आहेत तीनतीन-नंबराची वाट पहात.मेड-इन-जेपी तर म्हणे केव्हापासून शिट्या मारतंय असं ऐकून आहे.सगळी खटपट वाया जातेय.
आता आम्ही जातो कारशेडला.

सानिकास्वप्निल's picture

21 Oct 2015 - 12:33 am | सानिकास्वप्निल

मस्तं पाककृती स्वातीताई, फोटो पण छान :)

पद्मावति's picture

21 Oct 2015 - 1:18 am | पद्मावति

वाह, सही आहे आयडिया.
मस्तं लेखनशैली, पाककृती आणि फोटो.

स्रुजा's picture

21 Oct 2015 - 1:24 am | स्रुजा

कल्पक ! करुन बघणार नक्की. लेखनशैली पण सहीच.

मुक्त विहारि's picture

21 Oct 2015 - 7:57 am | मुक्त विहारि

धन्यवाद....

मस्तच स्वति ताई. छान दिसतायत कबाब.

दिपक.कुवेत's picture

21 Oct 2015 - 7:08 pm | दिपक.कुवेत

कबाब आवडलेच पण आधीच प्रास्तावीक अधीक आवडलं. फक्त तू दूकानात किंचाळताना कशी दिसशील हे ईमॅजीन करतोय.

आज हेच करायचा विचार होता, केप्रची उपास भाजणी दिसली. मग तिकडे मोर्चा वळवला.

पदम's picture

23 Oct 2015 - 12:17 pm | पदम

एकदम सही. करुन बघेन.

अनन्न्या's picture

29 Oct 2015 - 6:16 pm | अनन्न्या

मी पाहिलाच नव्ह्ता, आता करून पाहते.

पैसा's picture

29 Oct 2015 - 10:41 pm | पैसा

नवीन पाकृ. आणि लिखाण तर सुंदरच झालंय!