रुक्मिणीचा कृष्ण / रुक्मिणीचा कोण तू?
मीरेचा तू कृष्णसखा, तर आणिकही कुणासाठी भगवान तू
देवकीचा कान्हा तर राधेचा मनमोहन तू
पण कोणी कधीच न वदले मज
रुक्मिणीसाठी आहेस कोण तू?
मग स्वये रुक्मिणीच वदे, की माझ्यासाठी कोण तू.............
माझ्यासाठी तर ......
चिंब करणारा आषाढाचा पहिलावहिला मेघ तू
लखलखणारी विजेची तेजोमय रेघ तू
किनार्यावर झेपावणारी बेधुंद सागरलाट तू
घनगंभीर काळोखातील रविकिरणाची वाट तू
रिमझिम रिमझिम श्रावणसरीमधील गारवा तू
मनमुक्त गाणार्या कोकिलतानेतील मारवा तू
तप्त रेतीमधील मृगजळाचा भास तू
क्षितिजापल्याडच्या स्वर्गसुखाचा आभास तू
राधेचा जिवलग सखा अन मीरेचा ध्यास तू
रुक्मिणीसाठी मात्र क्षण अन क्षणाचा श्वास तू
चित्र - पियुशा
तुझ्या-माझ्यासवे - पाऊस
अवचित आभाळ भरलेले अन घन हे ओथंबलेले
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हे व्याकुळलेले
एका जुन्या वाटेवरती, एक पाऊल अडखळलेले
त्याच पुन्हा मृदगंधाशी एक नाते जडलेले
पुन्हा एकदा रिमझिमणार्या पावसाने तुला नि मला वेढलेले
पुन्हा एकदा रेशीमधारांनी सप्तसूर छेडलेले
ओल्या चिंब सरींवर एक गीत भिजलेले
तुझ्या-माझ्या प्रीतीचे क्षण सुंदर सजलेले
मेघदूतांच्या गर्दीमध्ये घननीळ दाटलेले
पावसाचे एक एक थेंब तुझ्या-माझ्यामध्ये वाटलेले
आयुष्याच्या वाटेवरती कृष्णमेघ बरसलेले
तुझ्यासवे आनंदाचे झाड पुन्हा बहरलेले
(चित्रः पियुशा)
-शीतल
मागे वळून पाहताना!!!!
जरा मागे वळून पाहताना
थोडे अंतर्मुख होताना
चांगल्या-वाईट काही स्मृती
मनामध्ये जागताना
बालपणीचा काळ सुखाचा
हे बालपणी न गमले
अन भविष्याची स्वप्ने रेखताना
बालपणही सरले
ममतेचे छत्र होते
अन सावरणारे कणखर हात होते
म्हणूनच, केवळ आनंदाचे झाड बहरले
अन दुःखाची झळ न पोहोचली मजपाशी
स्वत्वाची झिंग जी चढली
अन यशाची व्याख्याही कळली
तुटले बंद मायेचे, ममतेचे पाशही तोडले
जगण्याची उन्मत्त धुंदी
ते सारे ऋण विसरली
मज वाटे मन माझे कणखर
म्हणुनी पाश हे तुटले
मज तमा काय कुणाची?
माझे मीपण मीच घडवले
जे वाटे यश मिळाले,
ते फोल आहे सारे
अन ज्याला मी म्हणतो तत्त्व माझे,
त्याचे अस्तित्व नाही उरले
जगण्याची मध्यान्ह झाली
अन जाग मनाला आली
पण आता पाहता मागे
सारी वळणे मागेच उरली
वर उंच उंच जाताना
खाली सारेच लहान भासे
सारे आयुष्य पणाला लावून
टाकले नशिबाचे फासे
स्वतःसाठी जगता जगता
थोडे विसरलो जगण्याचे भान
कितीही मिळाले सुख तरीही
सुकली नाही तहान
जीवन ज्यांनी देऊ केले
अन जगण्यासही मज शिकवले,
त्यांची साथ सोडून देताना
मज जराही न उमगले
की मार्ग जरी हा सोपा
अन दिसतोही राजसा मोठा
तरी सोबतीस नाही कुणी
अन सारा हिशोब झाला उलटा
जगण्याचे गणित मांडले
हेच काय उणे ते केले
बेरीज करता सारी
हाती काही न उरले
झाल्या काही चुकाही
आता वेळही निघून गेली
क्षमा मागायची तरीही
आता आसपासही न दिसे कोणी
जरा मागे वळून पाहताना
थोडे अंतर्मुख होताना
चांगल्या-वाईट काही स्मृती
मनामध्ये जागताना
चित्रः पियुशा
-शीतल
दूर दूर जाताना!!!!
दूर दूर जाताना सूर थोडे घेऊन जा
प्रीतीच्या गाण्याच्या सुरेल आठवणी मात्र देऊन जा
दूर दूर जाताना पाश सारे तोडून जा
आठवणीचे रेशीमबंध सुजाणपणे सोडून जा
दूर दूर जाताना श्रावण सारा घेऊन जा
ओल्या आठवणीचा मृदगंध थोडा ठेवून जा
दूर दूर जाताना मोरपिसं सारी घेऊन जा
जाताना मात्र, हातांवर रंग थोडे सोडून जा
दूर दूर जाता सुखं सारी घेऊन जा
जाता जाता थोडे अश्रू मागे पापण्यावर ठेवून जा
-शीतल
शब्द माझे
रिते रिते शब्द माझे
नका लादू त्यावरी अर्थांचे ओझे
ते केवळ आहेत अक्षरांचे ऋणी
ना त्यांना बनवायचे आहे कोणाही ज्ञानी
मनाचे हुंकार ते, मनाचे दर्पण ते
ना बंधन त्यांना कोणत्याही अलंकार-वृत्ताचे
वाटले की वदले इतकेच अस्तित्व तयाचे
ना दुखवायचे कोणा, ना सांत्वनही करायचे स्वतःचे
मना दाटल्या विचारा जणू गवाक्ष मुक्तीचे
शब्द-शब्द हे पोकळ, पण तरीही निर्मळ
एकमेकात गुंफता जणू पवित्र गंगाजल
कधी होई ज्ञानेशाची ओवी
कधी तुकोबची गाथा, अन कधी मंगेशाची राधा
शब्द कधी तलवार तळपती मातृभूमीसाठी
कधी लोकमान्य, तर कधी स्वातंत्र्यसूर्याच्या हाती
कधी मृदू, कोमल इतुके, जणू नेत्रकडा ओलेती
जरी रिते अजुनी असती, पोकळ हे शब्द माझे
तेच माझे सांगाती, रिते करती माझ्या मनाचे हो ओझे
- शीतल
प्रतिक्रिया
11 Nov 2015 - 7:33 am | मितान
शब्द माझे ही कविता खूप छान !
11 Nov 2015 - 8:38 am | शीतल जोशी
धन्यवाद .शुभ दीपावली
11 Nov 2015 - 12:48 pm | पैसा
कविता आवडल्या. पियुशाची चित्रेही छान!
12 Nov 2015 - 12:43 pm | amol gawali
भावस्पर्शी
13 Nov 2015 - 11:12 pm | एस
सर्वच कविता छान आहेत. साहित्यसंपादकांना विनंती की धाग्यातल्या प्रत्येक कवितेचे शीर्षक हे ठळक व मोठे करावे. तसे कवितांना अनुक्रमांकही देता येतील.
23 Nov 2015 - 9:43 pm | शीतल जोशी
वाचकांना धन्यवाद