पान १५

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 11:49 pm

.
.
या महानगरीत राहायला आल्यापासून कामावरून घरी परतायला मी उपनगरी मेट्रो रेल्वेचा वापर करतो. माझे शिक्षण आणि नोकरीचा बहुतेक सर्व वेळ मध्यम आकाराच्या शहरात व्यतीत झाला आहे. त्यामुळे या महानगरीतल्या संस्थेच्या मुख्यालयामध्ये अचानक झालेली बदली स्वीकारावी की नाही, यावर घरात बराच खल झाला होता. बर्‍याच चर्चेनंतर बदलीने होणारी पदोन्नती व तिच्याशी संबंधित आर्थिक फायदा डोळ्याआड करणे शहाणपणाचे होणार नाही, हे स्पष्ट झाले. स्थलांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि आम्ही आमचे चंबूगबाळे गुंडाळून जराशा नाराजीनेच या महानगरीत दाखल झालो.

या महानगराच्या वेगाशी जमवून घेताना सुरुवातीला माझी चांगलीच तारांबळ उडाली होती. शहराच्या धमन्यांचे काम करणारे उपनगरी रेल्वेचे जाळे बरेच आश्चर्यचकित करणारे आहे हे मला माहीत असणे वेगळे आणि त्यातून रोज सकाळ-संध्याकाळी वाहत जाणे वेगळे! इथल्या गाड्या, दर स्थानकावर धमनी फुटल्यासारखी आतली माणसे सांडवत आणि काही अधिक माणसे आत कोंबून घेत पुढच्या स्थानकाच्या दिशेने दिवसभर सतत धावत असतात. लहान मुलाने वारुळावरच्या मुंग्यांची लगबग मोठ्या कुतूहलाने पाहावी तशी ही घाईगडबड मी सुरुवातीला न्याहाळत असे. काही दिवसांनी नवलाई संपली आणि कुतूहलाऐवजी मी हे सर्व काहीशा तटस्थपणे तर कधी त्रासिक चेहर्‍याने पाहायला लागलो. सहप्रवाशाचे अनाहूत धक्के आणि त्यांच्या घामाचे विविध दर्प नाकात शिरले की मला अजूनही कसेसेच होते. या सगळ्या अनुभवाला मी अजूनही रुळलेलो नाही आणि कधीकाळी रुळेन याबद्दल साशंक आहे. गाडीच्या गर्दीत असलो की माझ्या गावाबाहेर पाच-दहा मिनिटे दूर असलेल्या निसर्गरम्य परिसरातला एकांत मला प्रकर्षाने आठवतो आणि काळजात गलबलल्यासारखे होते.

एखाद्या दिवशी कामावरून परतताना बराच उशीर झाला की मात्र गर्दी संपून गेलेली असते. कधी कधी तर आख्ख्या डब्यात मी एकटाच असतो. माणसांनी ठासून भरलेल्या या महानगराच्या धबडग्यामध्ये एकांताचा अनुभव देणारे असे विरळ क्षण मला नेहमीच हवेहवेसे वाटतात.

त्या दिवशी मला उशीर झाला होता. आत शिरल्यावर सर्व डबाभर नजर फिरवली. दुसरे कोणी नाही हे पाहिल्यावर अभावितपणे माझ्या चेहर्‍यावर स्मित उमटले. माझ्या गाडीचा बराचसा मार्ग समुद्रकिनार्‍याने जातो. रेल्वेमार्गाच्या एका बाजूला समुद्रकिनारा, तर दुसरीकडे शहराचा झगमगाट असतो. समुद्राच्या बाजूला कमी उजेड आणि संध्याकाळचा भुरभुरणारा गार वारा असतो. दिवसभराचा शीण कमी करणार्‍या या दोन गोष्टींचा संगम मला हवाहवासा वाटतो. अर्थातच शक्यतो मी त्या बाजूचे आसन पटकावतो. डब्याच्या दोन दरवाजांच्या मधली खिडकी पकडून मी समाधानाने अंग सैल करून आसनावर विसावलो. ब्रीफकेस उघडून पुस्तक बाहेर काढले. खूण ठेवलेले पान उघडले... पान १५.

गाडी स्थानकावरून सुटली आणि तिने लगेच वेग पकडला. चाकांच्या आवाजाचा खड्खट्ट खड्खट्ट ठेका अधिकाधिक वेगवान होऊ लागला. नकळत माझ्या पायाने तो ठेका पकडला. या तालातला कोणता आवाज सर्वात जास्त मोठा आहे बरं? दुसरा... तिसरा... की चौथा? त्या तालावर मी जणू संमोहितसा झालो आणि आसनावर आणखी रेलत पाय पुढच्या बाकड्याच्या खाली ताणले. पापण्या जड होऊन कधी मिटल्या हे ध्यानातच आले नाही.

***************

कसलासा धक्का बसून मला जाग आली. गाडी स्थानकात शिरत होती. जग अजूनही धूसर होते. डोळे चोळत सावरून बसलो. रिकामा प्लॅटफॉर्म पाहून जरा बरे वाटले. यापुढेही माझा एकांत भंग करणारे कोणी असणार नव्हते. गाडी स्थानक सोडू लागली आणि ते खरे नाही हे समजले. मागच्या बाजूने दबत्या आवाजातले संभाषण आणि अस्फुट बायकी हसू ऐकू येऊ लागले. मान वळवून बघितले. मागच्या दरवाजाजवळच्या खांबाला रेलून एक पाठमोरी पुरुष आकृती आणि त्याच्यावर थोडीशी रेलून उभी असलेली तरुणी मला डोळ्यांच्या कोपर्‍यातून दिसली. एकांत भंग झाल्याने माझ्या मनात नापसंती उमटली. त्याच क्षणी, आपण त्यांच्याकडे रोखून पाहत आहे हे ध्यानात आले तर त्या जोडप्याला काय वाटेल, असा विचार मनात येऊन चेहरा पुढे वळवला आणि आसनावर सावरून बसलो. समुद्रावरून येणार्‍या वार्‍याचा झोत कमी करायला खिडकीची काच अर्धवट खाली ओढली. पुस्तक उघडले आणि खूण ठेवलेले पान काढले... पान १५.

मागच्या संभाषणाचे आवाज मोठे होत जवळ येऊ लागल्याचे माझ्या कानांना जाणवले. गाडीचा आख्खा डबा रिकामा आहे. तिकडे दूर दुसर्‍या टोकाला बसायचे सोडून हे लोक इकडे कशाला येताहेत? या सुंदर संध्याकाळी एकांत भंग करणार्‍या त्या जोडप्याचा मला राग आला होता. ते माझ्या समोरच्या बाजूला असलेल्या खिडकीजवळ बसले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न निष्फळ होऊन मी अधूनमधून डोळ्याच्या कोपर्‍यातून त्यांच्याकडे नजर टाकत होतो.

आता यांना इथेच कशाला बसायचेय?.. माझा जळफळाट चालूच होता. या सगळ्यात नकळत मी हातातले पुस्तक मिटले होते आणि त्यातली खूण खाली पडली होती. ती गडबडीत उचलत असताना आपण कुठपर्यंत वाचत आलो होतो ते क्षणभर आठवेचना! मला स्वतःचाच राग आला आणि काहीच न सुचल्याने मी खिडकीबाहेर पाहू लागलो. समुद्रावरून येणार्‍या वार्‍याने थंड झालेल्या डोक्याने काही वेळाने सांगितले... पान १५.

***************

"अरे, तिकडे बघ." ती अचानक चित्कारली.

"कुठे?" तो.

नकळत माझेही लक्ष त्या दोघांकडे गेलेच!

तिने बोट दाखवलेल्या दिशेने पाहत समुद्रावरच्या अथांग अंधारात तो तिला काय म्हणायचे आहे ते शोधत राहिला. बराच वेळ डोळे ताणून झाल्यावर तो जराशा चिडक्या आवाजात म्हणाला, "कशाबद्दल म्हणते आहेस तू?"

"अरे, तो प्रकाश. तिकडे, डावीकडे, उंचीवरचा." ती.

"तो होय. ते दीपगृह आहे." तो.

"हो. दीपगृह. मला दीपगृहे फार आवडतात... उंच, ताठ उभी राहून एकाकी अंधारात तरंगणार्‍या जहाजांना योग्य दिशा दाखवणारी." ती.

तो खळखळून हसला आणि म्हणाला, "छान, मग 'मी नेहमी माझी दिशा मीच ठरवते आणि त्याचा आजपर्यंत कधीच पश्चात्ताप झालेला नाही' असं म्हणत असतेस त्याचं काय?"

तिने लटक्या रागाची एक नजर त्याच्याकडे फेकली. पण लगेच गंभीर चेहरा करून ती बोलू लागली, "ते खरंय. पण कधी कधी असं वाटतं की माझ्या आयुष्यात जर या दीपगृहासारखं खंबीर, मार्गदर्शक कोणीतरी असतं, तर काय झालं असतं बरं? असं कोणी असणं किती आश्वासक असेल, नाही का? आणि... "

"चल, सोड ते. तुला माहीत आहे मला असला भावनिक येडपटपणा आवडत नाही ते." तो तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला. आपल्या आवाजातल्या कठोरपणाची त्याला जाणीव होऊन त्याने जीभ चावली आणि त्याच्या तोंडून अस्पष्ट "श्श्याsss..." निघाला. चेहर्‍यावर मार्दव आणून त्याने तिचा हात हळुवारपणे हातात घेतला आणि म्हणाला, "सॉsssरी. मला तसं म्हणायचं नव्हतं... निदान तुझ्याबाबतीत तरी मी बर्‍याच तडजोडी करतो, नाय का? पण तुला माहीत आहे मला या फालतू तत्त्वज्ञानाची आणि नसत्या भावनाविवशतेची चीड आहे. जीवन जसं येईल तसं त्याला तोंड द्यावं, उगा विचार करून डोक्याला भुंगा लावू नये, असं मला वाटतं. हे काय तुला परत परत सांगायलाच पाहिजे असं नाही." सारवासारव करताना त्याचा चेहरा बराच मृदू झाला होता आणि आवाज त्याच्या शब्दांतल्या परखड मतांशी सहमत नसण्याइतका हळुवार झाला होता.

त्याची ती धडपड बघून तिच्या चेहर्‍यावर स्मित उमटले, गालावर खळी फुलली. अचानक तिचा चेहरा सुंदर असल्याची जाणीव मला झाली... गोल टपोरे बोलके डोळे, नकटे नाक, काहीसे फुगीर गाल, खालचा ओठ वरच्यापेक्षा थोडासा मोठा आणि गौर गुलाबी कांती. चेहर्‍यावरचे स्मितहास्य या सगळ्याची शोभा अजूनच वाढवत होते. "म्हायतेय रे, आणि हीच तुझी गोष्ट मला आवडते. जरासे बेफिकीर असलेलेच पुरुष जास्त शोभून दिसतात." ती म्हणाली.

त्याच्या चेहर्‍यावरचा तणाव जरासा विरला. जरा वेळ दोघे एकमेकाच्या डोळ्यात पाहत राहिले. मग तो आपल्या जागेवरून हलून तिच्याकडे झुकला. त्याच्या भरदार शरीरयष्टीमागे तिची नाजूक काया लपून गेली. आता मला फक्त तिच्या चेहर्‍याचा काही भाग दिसत होता. अभावितपणे माझ्या तोंडून नाराजीचा अस्फुट स्वर निघाला आणि माझे मलाच अवघडल्यासारखे झाले. त्या दोघांना माझ्या अस्तिवाची जाणीव म्हणा, फिकीर म्हणा... नव्हती, हे जाणवल्यावर मी सुटकेचा निःश्वास सोडला.

तो काही वेळ आपल्या आसनात चुळबुळत राहिला. उगाचच कधी तिच्याकडे, तर कधी खिडकीबाहेरच्या अंधाराकडे पाहत राहिला. मग एकाएकी गोठल्यासारखा स्तब्ध झाला. विचारू की नको अशा मन:स्थितीत असल्यासारखा अचानक म्हणाला, "अजून काय आवडतं तुला... माझ्याबद्दल?" त्याचा आवाज किंचित घोगरा, किंचित कातर झाला होता... की मला तसा भास झाला होता?

तिने त्याच्याकडे चमकून पाहिले. तिच्या चेहर्‍यावरचे आश्चर्य लपून राहिले नव्हते. मिश्कीलपणे हसत इकडे तिकडे पाहत काही शोधत असल्याचा अभिनय करत ती म्हणाली, "अय्यय्ययो, हे भावनाविवश शब्द कुठून आले?"

त्याच्या चेहर्‍यावर नाराजी उमटली. काय करावे हे न सुचून क्षणभर तो स्तब्ध झाला. आपल्या आसनावर मागे सरला. अचानक उभे राहून त्याने दरवाजाच्या दिशेने एक पाऊल टाकले. दुसरे पाऊल उचलण्याअगोदर तिने त्याचा हात पकडला आणि सर्व ताकद लावून तिच्या बाजूच्या आसनावर ओढले. या अनपेक्षित झटक्याने तो आसनावर जवळजवळ कोसळलाच. त्याने काही बोलण्याअगोदर तिने त्याच्या खांद्याचे चुंबन घेतले होते आणि तिचा हात त्याच्या मानेच्या मागे जाऊन जणू एखाद्या लहानग्याचे सांत्वन करावे तसा कुरवाळू लागला होता.

"तुझ्यात ठासून भरलेला हा त्वेष मला आवडतो. तुला रागावलेले बघितले की रागाने फुत्कारणार्‍या आणि खुराने जमीन उकरणार्‍या बैलाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते... कधीही उधळून वाटेत येणार्‍या सगळ्या अडथळ्यांना गारद करण्याची ताकद असलेली... अंतिम विजय माझाच असे जाहीर करणारी ताकद!"

काही वेळ तसाच स्तब्धतेत गेला. आम्हा तिघांपैकी बहुतेक कोणालाच गाडीचा धडधडाट ऐकू येत नसावा. तिचा हात त्याच्या मानेवरून घरंगळत खांद्यावर आला आणि दंडांवरून घसरत खाली येत त्याच्या मजबूत पंज्यांवर स्थिरावला. तिने त्याचे हात आपल्या हातांत धरून थोडे वर उचलले. तिच्या नाजूक हातात त्याचे मजबूत पंजे जरासे विनोदीच दिसले. ते पंजे तिने उचलले असण्यापेक्षा त्यानेच ते तिच्या हातांना जड वाटू नये म्हणून उचलून धरले असावेत, असा विचार माझ्या मनात आला आणि मी मोठ्या कष्टाने माझे हसू दाबून धरले. गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात त्या दोघांच्याही हाताला एक गूढ वलय आल्यासारखे मला डोळ्याच्या कोपर्‍यातून दिसत होते.

"मला तुझे हे मजबूत हातसुद्धा आवडतात." तिने परत बोलायला सुरुवात केली. "तुझे जाडजूड, चौकोनी मजबूत हात आणि त्यांच्यावरच्या टरटरून फुगलेल्या धमन्या! संध्याकाळी जेव्हा तू टेनिसचा सेट संपवून घाम पुसायला येतोस, तेव्हा किंचित तांबूस झालेल्या तुझ्या हातावरचे दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे घामाचे थेंब बघायला मला आवडतात."

बोलू की नको अशा संभ्रमात काही वेळ स्तब्धतेत गेल्यावर तिने परत सुरुवात केली, "मला वाटतं... जर तू तुझा राग काबूत ठेवलास, तर बरंच काही साध्य करू शकशील... नक्कीच भरभक्कम असं काहीतरी."

तिचे शब्द जरासे नाट्यमय असले, तरी तिच्या आवाजात एक प्रामाणिकपणा आणि हळुवारपणा डोकावत होता. सुरुवातीला त्याच्या डोळ्यांत आणि आविर्भावात अविश्वासाची झाक जाणवत होती. पण, तिच्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या चेहर्‍यावरचा ताठरपणा हळूहळू कमी होत गेला. तिथे प्रथम स्मित उमलले. मग त्याची जागा अभिमानाने घेतली. त्याने हळुवारपणे तिला आपल्या जवळ खेचले. त्याच्या ओठांवर हात ठेवत तिने स्वतःला दूर केले आणि मिश्कीलपणे हसत म्हणाली, "आंआंआंsss कंट्रोल, कंट्रोल! बघ तुझं स्टेशन आलंसुद्धा. चल, उतर आता. लव्ह यू."

गाडी खरोखरच स्थानकात शिरत होती. चिडावे की खुशीने निरोप घ्यावा या संभ्रमातच त्याने त्याचे सामान उचलले आणि तो उभा राहिला. काय करावे हे न सुचल्यासारखे एक अवघडलेले अस्फुट स्मित त्याच्या चेहर्‍यावर उमटले. तिच्या दिशेने उडते चुंबन फेकत तो दरवाजाच्या दिशेने पाय ओढत गेला.

गाडी स्थानक सोडून पुढे जाऊ लागली, तसे तिने आपला हात खिडकीतून बाहेर काढून उडत्या चुंबनाची परतफेड केली आणि त्याच्या दिशेने बराच वेळ हात हलवत राहिली. स्थानक सोडून गाडीचे खडखट्ट खडखट्ट गाणे परत एकदा द्रुतलयीत सुरू झाले. तिने आपला हात आत घेतला आणि जणू काही आपण एका सार्वजनिक वाहनात आहोत याचे आत्ताच भान आल्यासारखी सर्व डब्यात नजर फिरवली. मी इतका वेळ दोघांकडे लक्ष ठेवून होतो हे तिच्या नजरेला पडू नये, यासाठी मी गडबडीने आसनात अजूनच खाली सरकलो आणि पुस्तक डोळ्यासमोर धरले... पान १५.

***************

अचानक धक्का बसून गाडी थांबली आणि मी जागा झालो. पुस्तक वाचताना केव्हा डोळा लागला, हे मला कळलेच नव्हते. झोपेत मी आसनावर बराच खाली सरकलेला होतो. वर सरकून सरळ बसताना अचानक पाठीतून तीव्र कळ आली, माझा चेहरा वेडावाकडा झाला आणि वेदनेचा एक चित्कार माझ्या तोंडून बाहेर पडला. माझ्याबरोबर एक सहप्रवासीही होती हे आठवून मला काहीसे अवघडल्यासारखे वाटले आणि माझी नजर सहजच तिच्या दिशेने वळली.

ती अजून त्याच जागेवर बसलेली होती आणि माझ्या धडपडीकडे पाहत होती. खिडकीतून येणार्‍या वार्‍याने भुरभुरणार्‍या केसांमुळे आणि बाहेरच्या शहराच्या रोषणाईच्या कमीजास्त होणार्‍या उजेडामुळे तिचा चेहर्‍याला एक किंचित तांबूस वलय येतजात होते. जणू आताच मुशीतून बाहेर काढलेली चमकती सुवर्णमूर्ती! परत एकदा ती सुंदर असल्याची ग्वाही मी स्वतःला दिली.

दुखरी मान हलवून ढिली करताना तिच्यातून निषेधाची आणखी एक कळ आली. माझ्या चेहर्‍यावरची वेदना अधिकच गडद झाली असावी. ती उठली आणि माझ्या दिशेने आली.

"ठीक आहात ना? काही समस्या? तुमची प्रकृती बरी नाही असं दिसतंय. चेहरा किती पांढरा पडलाय." ती म्हणाली.

माझा चेहरा पांढरा पडलाय तो मानेतल्या वेदनेमुळे की तिला निरखत असताना पकडले गेल्यामुळे? मी स्वतःशीच विचार करून अजूनच कसासा झालो.

"नाही, काही फारसं नाही. अवघडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठीला आणि मानेला जराशी रग लागलीय. इतकंच." मी अजून मानसिक आणि शारीरिकरीत्या अवघडलेलाच होतो!

माझा दंड पकडून वर ओढत तिने मला सरळ बसायला मदत केली आणि ती समोरच्या आसनावर बसली. काय बोलावे हे न सुचल्याने काही वेळ आम्ही तसेच चुळबुळत आणि उगाचच खिडकीबाहेर पाहतं बसलो. एकाएकी मला आठवले - अरे, मी तिचे साधे आभारही मानले नव्हते. किती हा वेंधळेपणा... की मूर्खपणा?! आणि मी तोंड उघडले.

मी काही म्हणण्याच्या आधी हाताने मला थांबवत तीच म्हणाली, "आभार वगैरे मानायची काही गरज नाही. असं काही खास नाही केलंय मी. आता बरी आहे का पाठ तुमची?"

आता तिच्या मनकवड्या स्वभावाने आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी होती. "मी आभारच मानणार होतो हे कशावरून? मी इतर काही बोलू शकलो असतो, नाही का?" हार न मानणारा माझा स्वभाव तिथेही उफाळून बाहेर आलाच!

"एक उपचार म्हणून का होईना, पण आभार मानणे सभ्यतेचे लक्षण आहे. आणि मला तर तुम्ही चांगले सभ्य दिसत आहात. चेहर्‍यावरून तरी तुम्ही विसरभोळे प्रोफेसर दिसत नाही. पण, गडबडीत एक उपचार मात्र विसरलात." असे म्हणून ती एखाद्या लहान मुलीसारखी खळखळून हसली. मला अजूनच अवघडल्यासारखे झाले. पण तिच्या निरागस हास्याने वातावरणातला तणाव बर्‍याच अंशी दूर केला होता.

"तसा मी माझी पहिली नोकरी सोडली नसती, तर आतापर्यंत नक्कीच विद्यापीठातला प्रोफेसर झालो असतो आणि तुझ्यासारख्या तरुणींचे कान पकडून त्यांना सरळ करत असतो." मीही बोलण्यात हार मानणार्‍यांपैकी नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागलो.

"नाय हो. मी कधीकधी जरा जास्तच बडबडते. सॉरी! पण तुमची पाठ खरंच बरी आहे ना आता? माझ्याकडे ब्रुफेन आहे. घेणार का?" ती.

"नाही, नाही. औषधाची काही गरज नाही. जरा वेळाने ठीक होईल सगळं." मी.

"ठीक आहे मग. माझं स्थानक आलं आहे. मला निघायला हवं. विश यू स्पीडी रिकव्हरी." तिचे बोलणे सुरू असतानाच गाडी स्थानकात शिरली. पर्स उचलून ती उठली. परत एकदा काळजीभरल्या चेहर्‍यावर स्मित आणून निरोप घेतल्यासारखी मान हलवली आणि ती दरवाजाच्या दिशेने चालू लागली. गाडीतून खाली उतरून ती खिडकीसमोर आली आणि म्हणाली, "काळजी घ्या."

गाडी स्थानक सोडून निघाली, तशी ती मागे वळून स्थानकाच्या दरवाजाच्या दिशेने चालू लागली. दूर होत अदृश्य होणार्‍या तिच्या आकृतीकडे मी विमनस्कपणे पाहत राहिलो.

ती डोळ्याआड झाली, गाडीने स्थानक सोडले आणि मी भानावर आलो. खिडकीत वाकून मी तिच्याकडे इतका वेळ टक लावून पाहत होतो, हे दुसरे कोणी पाहत तर नव्हते ना? या कल्पनेने अस्वस्थ होऊन मी डब्यात सगळीकडे नजर फिरवली. मी एकटाच डब्यात होतो. हायसे वाटले. गाडीचा डबा रिकामा असताना आनंद वाटण्याऐवजी माझ्या मनात वैषम्य दाटून येत असल्याचे आज प्रथमच मला जाणवले... आणि माझे मलाच आश्चर्य वाटले! अचानक मला जाणीव झाली की आज इतका वेळ एकांतभंग झाला, तरी मी चिडलो नव्हतो. का बरे? त्या जोडगोळीला पाहून मला माझे कॉलेजचे दिवस आठवले होते म्हणून? की त्या मुलीच्या विचारपूस करणार्‍या डोळ्यात माझ्यापासून ६००० किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मुलीच्या डोळ्यातील काळजी मला दिसली म्हणून? नक्की उत्तर कठीण होते. एखाद्या गोष्टीचे उत्तर शोधताना गोंधळल्यासारखे झाले की माझी चिडचिड होते. का कोण जाणे, आज नाही झाली... किंबहुना नक्की उत्तर कोणते हे जाणण्याची निकडच आज मला वाटत नव्हती. गाडीचा डबा रिकामा असला, तरी मन भरलेले होते. रिकाम्या डब्यात मी एकटा नाही असे उगाचच वाटत होते. मनातल्या गोंधळावर मला नकळत हसू आले. हात ताणून मी एक मनमोकळा आळस दिला. आसनावर सावरून बसत पुस्तक उघडले... पान १५.

==================================================================

(या लेखातील सर्व चित्रे आंतरजालावरून साभार घेतलेली आहेत.)
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Nov 2015 - 4:19 am | कंजूस

आवडली कथा.

आतिवास's picture

10 Nov 2015 - 10:06 am | आतिवास

कथा वाचली, आवडली.
आता परत पान १५ उघडते - मी वाचत असलेल्या दिवाळी अंकाचं ;-)

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 10:14 am | कविता१९७८

छान कथा

अजया's picture

10 Nov 2015 - 11:08 am | अजया

कथा आवडली.

मितान's picture

10 Nov 2015 - 1:44 pm | मितान

चांगली कथा ! आवडली ..

बाबा योगिराज's picture

10 Nov 2015 - 2:02 pm | बाबा योगिराज

वा वा.
आवड्यास.

जगप्रवासी's picture

10 Nov 2015 - 2:07 pm | जगप्रवासी

छान लिहिलंय

पैसा's picture

10 Nov 2015 - 5:50 pm | पैसा

सुरेख कथा!

एस's picture

10 Nov 2015 - 7:31 pm | एस

कथा आवडली. सहजसुंदर, तरीही बारकाईनं पाहिल्यास बांधेसूद व निर्दोष तंत्र असं लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे हे जाणवतेय.

पद्मावति's picture

11 Nov 2015 - 11:58 am | पद्मावति

कथा फारच आवडली.

सहजसुंदर, तरीही बारकाईनं पाहिल्यास बांधेसूद व निर्दोष तंत्र असं लिहिण्यात तुमचा हातखंडा आहे हे जाणवतेय.

..अगदी खरंय.

मनिमौ's picture

10 Nov 2015 - 7:56 pm | मनिमौ

अतिशय आवडली.

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 8:21 pm | टवाळ कार्टा

मस्तय

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 10:26 pm | नूतन सावंत

कथा आवडली.

मुक्त विहारि's picture

10 Nov 2015 - 11:03 pm | मुक्त विहारि

मस्त...

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 4:50 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर कथानक. आवडले.

एक एकटा एकटाच's picture

11 Nov 2015 - 9:52 pm | एक एकटा एकटाच

दाद
तुमच्या लिखाणाला आणि तुमच्या निरिक्षणालाही

दिवाकर कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 10:48 pm | दिवाकर कुलकर्णी

सुंदर शैली, सुंदर अभिव्यक्ति,सुंदर शेवट

अभ्या..'s picture

11 Nov 2015 - 10:59 pm | अभ्या..

मस्त जमलीय कथा एक्काकाका.
अगदी बांधेसूद अन खिळवून ठेवणारी.
.
एस मास्टर च्या कॅलिग्राफीला अर्थात सॅल्युट

आयला डॉक तुम्ही हे असंसुद्धा लिहिता तर!!!!

मान गये बॉस. कसबी काम आहे हे एकदम. _/\_

हेच म्हणतो.. अष्टपैलू व्यक्तिमत्व.

नाखु's picture

14 Nov 2015 - 9:12 am | नाखु

पानी रे,पानी तेरा रंग कैसा जीसमे मिलादो लगे उस जैसा !!!

कथा जाम आवडली.

इशा१२३'s picture

12 Nov 2015 - 12:07 pm | इशा१२३

छान कथा!आवडली.

शिव कन्या's picture

12 Nov 2015 - 1:22 pm | शिव कन्या

यातल्या detailing ला तोड नाही.
पूर्ण कथा वाचताना रेल्वेचा आवाज कानात रेंगाळत होता.
मनाचे इतके बारकावे टिपणारी कथा इतक्या ओघवत्या शैलीत लिहिलीत.... सुंदर!

सर्व वाचकांसाठी व प्रतिसादकांसाठी अनेक धन्यवाद !

तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !

विशाखा पाटील's picture

13 Nov 2015 - 9:19 am | विशाखा पाटील

वा! बाहेरच्या जगाचे आणि मनातल्या विचारांचे उत्तम चित्रण, अचूक शब्द आणि सहज संवाद...

मधुरा देशपांडे's picture

13 Nov 2015 - 3:06 pm | मधुरा देशपांडे

आवडली. खूप छान लिहिलंय.

मित्रहो's picture

13 Nov 2015 - 11:05 pm | मित्रहो

कथा आवडली

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2015 - 9:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्तं.

अतिशय जिवंत भावस्पर्शी चित्रण.

अरुण मनोहर's picture

15 Nov 2015 - 1:58 pm | अरुण मनोहर

कथा आवडली!

प्रचेतस's picture

16 Nov 2015 - 9:09 am | प्रचेतस

भन्नाट कथा.

चिगो's picture

16 Nov 2015 - 2:17 pm | चिगो

तरल.. हळुवार.. कथा आवडली, डॉक्टरसाहेब..

मनीषा's picture

16 Nov 2015 - 8:06 pm | मनीषा

अतिशय सुंदर कथा.

दिपक.कुवेत's picture

17 Nov 2015 - 2:06 pm | दिपक.कुवेत

आवडली कथा.

पियुशा's picture

24 Nov 2015 - 4:24 pm | पियुशा

मस्त कथा न त्याला साजेशी चित्र, खुप मस्त वाटल रीफ्रेशिन्ग :)

अभिजीत अवलिया's picture

24 Nov 2015 - 7:22 pm | अभिजीत अवलिया

आवडली ...

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2015 - 8:18 pm | चौथा कोनाडा

खुपच सुंदर कथा !
रोमॅ न्टिसिझम ते फादरलीlलव्ह यात गुंतवत प्रवास घडवणारी.
प्रचि अतिशय चपखल. कथेच्या मुडमध्ये ओढत नेणारी.

एस, अभ्या, शिवकन्या आणि इतर सर्वांशी सहमत.
मजा आली वाचताना.

स्वाती दिनेश's picture

26 Nov 2015 - 8:23 pm | स्वाती दिनेश

गोष्ट आवडली,
स्वाती

सौन्दर्य's picture

27 Nov 2015 - 8:02 am | सौन्दर्य

कथा छान लिहिली आहे. एकदम भावस्पर्शी, आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2015 - 1:57 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांना आणि वाचकांना धन्यवाद !

माझा कथालेखनाचा पहिलावहिला प्रयत्न मिपाकरांना आवडला हे पाहून आनंद वाटला.

रुपी's picture

17 Aug 2017 - 1:33 am | रुपी

मस्त कथा!
लेखनशैली, बारकावे, चित्रे सर्वच छान जमून आलंय.

भित्रा ससा's picture

17 Aug 2017 - 4:34 pm | भित्रा ससा

आवडली बुवा आपल्याला

रेवती's picture

17 Aug 2017 - 4:56 pm | रेवती

कथा आवडली.