कळते रे!

रातराणी's picture
रातराणी in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 11:30 pm

.
.
वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनार्‍यावर बसून शंखशिंपले असं काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो. ती शांतपणे गोळा केलेल्या शंखशिंपल्यांच्या दोन वाटण्या करते. एक हिस्सा मला देते आणि म्हणते, "हे घे. हे तुझ्यासाठी." "मला कशाला, मला नको हे मुलींचे खेळ. ठेव तुलाच." असं मी म्हणतो आणि स्वप्नातून जागा होतो. नाही म्हणणं किती सोपं होतं ना माझ्यासाठी, की ती वेणू होती म्हणून इतक्या सहज मी नाही म्हणू शकलो? अगदी तिच्या प्रेमालाही?

वेणू माझ्या आयुष्यातलं पहिलवहिलं प्रेम. माझ्या की तिच्या? आता काय फरक पडतो म्हणा. खूप लांब आलो दोघं, निदान मी तरी. ती कदाचित असेल अजून तशीच. काळाच्या ओघात तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं असेल का? याचं हो हे उत्तर बरोबर असलं, तरी मला ते नको आहे. तिचं प्रेम तसंच असावं.. अगदी निर्व्याज, निरपेक्ष आजही! काहीही झालं तरी! स्वार्थी वाटतं न ऐकायला? पण जे गमावलं ते किती अनमोल होतं, हे कळल्यावर असंच वाटतं ना मनाला?

***

"वेणू, वेणू.. अगं ऐक, डबा तरी घेऊन जा..."

आई मागून हाक मारत होती आणि मी फाटकाच्या बाहेर सुसाट धावत निघाले होते. काल सुमी म्हणाली होती वाड्यातल्या देसाईकाकू परत आल्यात म्हणून. काकांची बदली झाली परत आपल्याच गावात. म्हणजे अनंता आला असणार. आता आज शाळेत आपल्याच वर्गात येईल ना तो. ओळखेल का मला? न ओळखायला काय झालं, वर्षभरच तर गेला होता परगावी. इतक्यात कसा विसरेल?

हे काय, अनंता कसा नाही आला आज वर्गात? दमला आहे की काय प्रवासाने? की अजून त्याचा प्रवेश नाही झाला या शाळेत? पण मास्तर चांगले ओळखतात देसाईकाकांना, त्यांनी बसून दिले असते अनंताला तसेच वर्गात. आज शाळा सुटली की वाड्यावर जाऊन मगच घरी जाऊ परत.

"कोण? अगं बाई, वेणू का? ये ना अगं अशी बाहेर का उभी तू?"

"..."

"अजून तशीच आहेस ग. शांत. ये. हा घे खाऊ. आम्ही कालच आलो. तुझ्या काकांची बदली झाली पुन्हा. मीही म्हटलं, आपल्या गावाजवळ आहे, माणसं चांगली आहेत इथली, जाऊ या परत. अजून आवरतेच आहे बघ."

"मी मदत करू काकू?"

"ए वेडाबाई, तू घरी जाऊन अभ्यास पूर्ण कर. हे काय नंतर करायचंच आहे. अनंता आला असता तर आतापर्यंत ऐकत बसली असतीस होय माझ्या गप्पा. केव्हाच पळाला असता दोघे नदीवर."

"म्हणजे अनंता...?"

"अगं हो, हेच म्हणाले सारख्या सारख्या शाळा नको बदलायला. आता तोही रमलाय तिथे. त्याच्या मामाच्या घरी राहिलाय शाळेला. सुट्टीला येत राहील अधूनमधून. माझा काही जीव राहात नव्हता बाई. कधी मला सोडून राहिला नाही. कसा राहतोय देव जाणे. तू येत जा गं वेणू. आता हेच बघ, तू यायच्या आधी अनंताच्या आठवणीन जीव कासावीस झाला होता. तू आलीस आणि असं वाटलं अनंताच आलाय. बर वाटलं बघ. आईलाही सांग एकदा येऊन जायला."

अगदी काल घडल्यासारखं दिसतं सर्व समोर. ते वय नव्हतं माझं प्रेमात पडायचं, पण तेव्हा ते प्रेम आहे हेही कळलं नव्हतं. निखळ मैत्री दोघांची. अगदी लहानपणापासून इतके एकमेकांसोबत राहिलो होतो की वर्षभरापूर्वी तो दुसर्‍या गावी गेला, तेव्हा नदीकिनारी असलेल्या मंदिराच्या पायर्‍यांवर बसून दोघं अगदी काळोख होईपर्यंत रडत बसलो होतो. दुसर्‍या दिवशी मी तापाने फणफणलेली. त्याला जाताना भेटलेसुद्धा नाही. म्हणूनच रागवला का अनंता? आता सुट्टीत आला की विचारू.

त्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आला होता अनंता. आणि असा भेटला जणू काही कधी दूर गेलाच नव्हता. अगदी तसाच होता. मग तो पुन्हा पुन्हा येत राहिला. आमची मैत्री तशीच होती. फक्त खेळ बदलले होते. आता तो येताना त्याच्या शाळेच्या वाचनालयातून कवितांची पुस्तकं घेऊन येई आणि आम्ही नदीकिनारी बसून ती तासन तास वाचत राहू. एखादी ओळ आवडली, कळली की एकमेकांना सांगत असू. तो वाचायला लागला कविता की ऐकताना भान हरपायचं माझं. आजही त्याचा आवाज घुमतो माझ्या कानात. असं वाटतं - पुन्हा नदीकिनारी जावं आणि त्याची वाट पाहावी.

***

"ए, परत एकदा वाच ना.."

"अगं किती वेळा, आता दुसरी वाचू या ना."

"नको, हीच."

"बरं. पण आता ही शेवटची वेळ बरं का."

"हं"

"कळते मज सारे कळते रे!
मन माझे तरीही चळते रे!

राखत आले सखया अजवर
विचारले नसण्याचे अंतर
शब्द तुला भेटतील नंतर
आयुष्य न मागे वळते रे!"

"अरे... अनंता विसरलेच, आज आईनी लवकर घरी बोलवलंय. उद्या पूर्ण करू या. मला जायला हवं आता"

"वेणू, वेणू, मी उद्या पुन्हा नाही वाचणार हीच कविता. कंटाळा आला मला."

किती दुष्टपणा केला मी. एक कविता तिला ऐकायची होती माझ्या आवाजात, मी तेवढंही नाही करू शकलो तिच्यासाठी. पण जे मी तिच्यासोबत वागलो त्यापुढे हा गुन्हा खूपच छोटा होता. किती सहज जीव गुंतला होता तिचा. माझाही गुंतला होताच. तिला भेटायची ओढ असायची गावी येताना. माझ्या कॉलेजमधल्या मुलींसारखी नसली, तरी वेणू किती सुरेख होती. सावळ्या रंगाची, बोलके डोळे आणि कमरेपासून खाली लोळणारा वेणीचा गोंडा.

हनुवटीच्या मधोमध एक खड्डा. खळखळून हसली की काय गोड दिसायची. पावसाळ्यात नदीत भोवरे दिसायचे. ते भोवरे पाहिले की मला वेणूची हमखास आठवण यायची. तिच्या वेणीचा गोंडा किती वेळा ओढला होता मी. अगदी कळवळून ओरडायची तेव्हा सोडायचो. तिच्या वेदना मी कधीच नाही समजू शकलो.

त्या दिवशी घरी गेलो तेव्हा आईनं सांगितलं, "अनंता, वेणूच्या लग्नाचं पाहणार आहेत आता."

"अरे वा!"

"अरे वा काय? हे बघ, ती मनात भरलीये माझ्या. अगदी लहान होती तेव्हापासून. आपल्या घरातलीच एक वाटते रे. तुझ्यावर जीव आहे तिचा. मी काय म्हणते, मीच विचारू का वेणूच्या आईला."

"काहीतरीच काय आई. अगं चांगले मित्र आहे आम्ही. बस अजून काही नाही. तसं काही असतं, तर मला बोलली नसती वेणू."

"शहाणाच आहेस. या गोष्टी काय मुली बोलून दाखवतात? आणि त्यातून वेणू? स्वप्नातसुद्धा ती बोलून दाखवणार नाही..पण तिचे डोळे बोलतात बरं का. तू आला नाहीस की व्याकूळ होते. मला जाणवतं ते."

"आई, तू काहीही विचार करतेस. आणि तसंही माझा काही आत्ता लग्न करायचा विचार नाही."

"अरे नको करूस ना. पण आपण ठरवून तर ठेवू. तुझं शिक्षण झालं आणि नोकरीत स्थिर झालास की मग करू."

"अगं आई, इतक पुढचं काही कसं ठरवून ठेवायचं. आणि तसंही इथल जग आणि तिकडे शहरातलं जग फार वेगळ आहे. वेणू नाही रमायची तिथे."

"नाही रमली तर राहील माझ्याजवळ थोडे दिवस. आणि काही नाही, एक मूल झालं की बाई स्वतःला विसरून जाते. त्याची काळजी तू नको करूस. पण लवकर निर्णय घे. वेणूचं लग्न ठरायला काही वेळ नाही लागणार."

"हे बघ आई, मला घाईघाईत निर्णय नाही घ्यायचाय."

तो विषय माझ्यासाठी तिथेच संपला होता. पण वेणू आणि इतर सर्वांसाठी तो कधीही न संपणारा होता. दुसर्‍या दिवशी सकाळीच वेणूचे बाबा आले होते घरी. आईला बहुधा कल्पना आली असणार त्यांच्या येण्याच्या कारणाची. पण मला आश्चर्य वाटलं. वेणू कधी तिच्या भावना घरी बोलून दाखवेल असं वाटलं नव्हतं मला.

तिच्या बाबांनी फारसे आढेवेढे न घेता मुद्द्यालाच हात घातला.

"अनंताची आई, वेणू तुमच्या घरी आली सून म्हणून, तर आम्ही निश्चिंत होऊ. मुलं मोठी झाली एकमेकांबरोबर. काहीतरी पूर्व पुण्य असेल पोरीचं, म्हणून तिचा जीव तुमच्यासारख्या देवमाणसात गुंतलाय. अनंता आणि वेणूचं लग्न जर झालं, तर..."

"मीही तेच म्हणतेय दादा. आता वयात आली आहे पोर. काहीतरी ठरवलेलं असलं की कुणाला बोलायला तोंड राहणार नाही. वेणूसारखी गोड पोरच पाहिजे आमच्या या रुद्रावताराला समजून घ्यायला. तिचंच ऐकतो तो. पण अनंता म्हणता होता त्याला अजून शिक्षण पूर्ण करायचंय... परत नोकरी, ते सगळ जमेपर्यंत... "

"अहो, घाई काहीच नाही. आपण फक्त ठरवून ठेवू या. गुर्जीनी सांगितलंय, लग्न ठरलं तर या वर्षी ठरेल, नाहीतर पुन्हा तीन वर्षं योग नाही म्हणून. म्हणून आपलं मनाला वाटतंय. उगीच विषाची परीक्षा नको. अनंता तयार असेल तर... "

"काका, मी खरच आत्ता तुम्हाला शब्द नाही देऊ शकत. मला असं बंधनात नका अडकवू. वेणूलाही आत्ता माझ्याबद्दल काही वाटत असेल तर ते अजून तीन वर्षांनी वाटेलच कशावरून? काळ बदलला की माणसं बदलतात."

"अनंता, काय बोलतोयस तू? अरे, लहानाचा मोठा झालास तेव्हाही बदलतच होता काळ. पण वेणूची माया नाही बदलली." आईचा आवाज आता चढला होता.

"हे बघा अनंताची आई, काल एक पाहुणे बघून गेले वेणूला. ते २-३ दिवसात कळवतो म्हणाले पसंती. त्याआधी तुम्ही जर आमच्या वेणूला स्वीकारायचा शब्द दिलात, तर आम्ही डोळे झाकून त्या पाहुण्यांना नकार कळवू. मुलीच्या आनंदापेक्षा आम्हाला काही मोठं नाही" हात जोडून वेणूचे बाबा बोलले.

"तुम्ही काळजी करू नका दादा. मी समजावते त्याला."

***

'कळते मज तू अवख़ळ वारा
कळते मज तू रिमझिम धारा
...कधी दूरचा पहाटवारा
तव रूप कसेही छळते रे!'

असाच होता का अनंता? सगळेच म्हणायचे भारी तापट आहे तो. पण मला नाही जाणवला कधी तसा. मला दिसायचा तो भारावून जाऊन कविता समजावणारा अनंता. मला दिसायचा मला चिडवणारा आणि पुन्हा हसवणारा खोडकर अनंता. मला दिसायचा माझा आवडता सोनचाफा देवाला न वाहता माझ्या ओंजळीत देणारा अनंता. मला जे त्याचं रूप हवं होतं, मी तेच माझ्या डोळ्यांनी शोधत राहिले. चुकलं का माझं? असेल कदाचित. काका गेले आणि अनंता बदलला खरा. अगदी लहान वयात पचवला त्याने तो आघात. स्वतः सावरला, काकूंना सावरलं आणि शहरात जमेल तशी कामं करत शिक्षण चालू ठेवलं.

त्या दिवशी बाबा घरी आले आणि म्हणाले, "बालिश आहे अनंता अजून." छे! अनंता बालिश कसा असू शकतो? इतक्या लहान वयात त्याने स्वत:चं स्थान तयार केलं होतं. कॉलेजमध्ये म्हणे तोच असतो सगळ्यात पुढे. तो कसा बालिश असेल? आपलंच चुकलं असेल काहीतरी. पण काय? मलाही वाटलं जे माझ्या मनात आहे, तेच त्याच्याही मनात असणार. बाबांनीच घाई केली असणार. नाही ठरलं लग्न तरी काय फरक पडतो? अनंता काही तीन वर्षांनी मला नाही म्हणायचा नाही.

आज संध्याकाळी त्याच्याजवळ बोलू या.

"वेणू हा काय प्रकार आहे?"

"कसला?"

"तुझं म्हणे लग्न ठरवणार आहेत."

"हो"

" तुला मी आवडतो? लग्न करायचंय?"

"..."

"आणि हे तू मला आत्ता सांगतियेस?"

"अरे पण... "

"अरे पण काय? आईला सांगितलस, तुझ्या घरी सांगितलंस, पण मला नाही सांगू शकलीस?"

"अनंता... मी काही नाही सांगितलं रे कुणाला, त्यांनीच समजून घेतलं सगळं."

"म्हणजे मीच समजू शकत नाही तर.."

"तुझ्याशिवाय मला कोण समजून घेणार अनंता? अरे आणि मला सांगितलं बाबांनी की तुला नाही आताच करायचं लग्न. पण मी थांबेन तुझ्यासाठी."

"तेच मला नकोय. मला तुला असं अडकवून नाही ठेवायचं."

"असं का म्हणतोस अनंता. काही वर्षांनी आपलं प्रेम काय कमी होणार आहे का?"

"..."

"बोल ना "

"हे बघ वेणू. माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही मला माहीत नाही आणि ते समजेपर्यंत तुला थांबवून ठेवणं मला योग्य वाटत नाही."

"अनंता...अरे "

"मला तुझ वागणं कळत नाही वेणू. कुणी एखाद्याला एवढं कसं आवडू शकतं?"

पुढचं काही बोलताच आलं नाही. काय बोलणार होते मी? झोळी तर आधीच पसरली होती त्याच्यापुढे. पण त्याच्या प्रेमाचं दानसुद्धा त्याला मला द्यायचं नव्हतं.

***

वेणूला नाही म्हणून आलो खरा, पण माझंच मला कळेना मी जे केलं ते चूक होतं की बरोबर. नकार द्यावा असं काय होतं वेणूत? पण मग होकार देण्याचं कारणही मला स्पष्ट दिसत नव्हतं. केवळ एकत्र वाढलो, एकमेकांचा सहवास आवडतो म्हणून लग्न करायचं? या सर्वांपलीकडेही ज्या व्यक्तीशी लग्न करायचं, त्या व्यक्तीबद्दल एक सुप्त आकर्षण असलं पाहिजे असं मला वाटायचं. आपल्या जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाचंही आकर्षण असलं पाहिजे अशी माझी काही मतं त्या वेळी होती. मी ज्या वातावरणात राहात होतो, त्या वातावरणाचा तो फरक असेल कदाचित. मला माझ्या कॉलेजमध्ये दिसणार्‍या मुली जरी स्वयंपूर्ण नसल्या, तरी एक वेगळीच तडफ असायची त्यांच्या वागण्याबोलण्यात, जर ठरवलं तर काहीही करू शकतो हा आत्मविश्वास दिसायचा त्यांच्यात. त्यांच्या अगदी विरुद्ध वेणू. त्यांच्यापुढे वेणू मला भोळी वाटायची, निरागस वाटायची. मुळात तिचं हे 'तुम चंदन हम पाणी' असं वागणं मला समजतच नव्हतं.

वेणूचं लग्न ठरल्यावर काही दिवसांनी आई खूप आजारी पडली होती. आई आजारी असल्याचं वेणूनेच तार करून कळवलेलं. माझे तेव्हा पेपर चालू होते. तातडीने निघणं काही शक्य नव्हतं. शेवटचा पेपर झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीने गावी गेलो. पोहोचेपर्यंत खूप रात्र झालेली. दार वाजवलं ,तर आतून वेणूचा "कोण आहे?" आवाज आला. ही कशी काय इथे असा विचार डोक्यात आला. "मी अनंता" असं म्हणल्यावर तिने दार उघडलं. तिच्याशी फार काही न बोलता मी सरळ आत गेलो. आईची झोप लागलेली. तिच्याजवळ बसून राहिलो बराच वेळ. मागून वेणूचा आवाज आला, "आता बरं वाटतंय काकूंना. औषधांची ग्लानी आहे म्हणून उठल्या नाहीत, नाहीतर संध्याकाळी बराच वेळ बोलत होत्या माझ्याशी. अनंता कसा आला नाही अजून विचारत होत्या."

तिच्या त्या आपुलकीच्या शब्दांनी मला वेगळंच अपराधीपण वाटू लागलं.

"माझी परीक्षा चालू होती गं. आजच झाला शेवटचा पेपर आणि लगेच आलो." मी म्हणालो.

"हो, माझ्या लक्षात आलं ते. बरं मी गरम पाणी काढलंय. तू हात पाय धुवून ये. मी ताट करते." अगदी सहज वेणू म्हणाली. जणू काही आमच्यामध्ये काही झालंच नव्हतं.

मी खाली मान घालून तिने सांगितलं ते केलं. वेणूच्या आईला माहीत नसावं की मी आज येणार आहे म्हणून, नाहीतर त्यांनी कधीच वेणूला आईजवळ थांबू दिलं नसतं. किती सहज वावरत होती वेणू घरात. जेवताना मी शांतच होतो. वेणू मात्र खूप बोलत होती. ती सगळं सांगत होती, आईला कशी चक्कर आली मग सगळ्यांनी त्यांना तालुक्याच्या दवाखान्यात नेलं, तिथे दोन दिवस उपचार झाल्यावर मग घरी आणलं. वेणू सगळं अगदी वेळच्या वेळी करत होती आईचं. तिला काळजी होती, पण म्हणून गळून जाऊन ती रडत बसली नव्हती. मोठ्या हिमतीने तिने सर्व गोष्टी केल्या होत्या. आता मी आल्यावर साहजिकच तिला थोडसं का होईना मोकळं वाटलं असणार. इतकी सहज ती सर्व सांगत होती, पण त्यात कुठेही मीपणा नव्हता, केवळ आणि केवळ आईच्या प्रेमापोटी तिने हे सर्व केलं, हे अगदी स्पष्ट होतं.

जेवण झाल्यावर मी अंगणात येऊन डोळे मिटून पडलो होतो. आतलं आवरून वेणूही आली. हलक्याच पावलांनी. तिला वाटलं माझी झोप लागली असेल. म्हणून शांत बसून राहिली. थोड्या वेळाने मीच म्हणालो, "आत जाऊन झोप वेणू. दमली असशील."

"मी आता जाणार होते रे घरी, तू आलायस आता."

"आता कुठे जातेस एवढ्या रात्रीची? सकाळी जा."

"त्यात काय एवढं अनंता, जन्म गेला माझा त्या वाटेवर चालून. कुणी खाणार आहे का मला?" असं म्हणून खळखळून हसली वेणू.

किती दिवसांनी ऐकलं वेणूच ते हसणं. त्याक्षणी मला काय झालं होतं काय माहीत.. मी तिच्या जवळ जाऊन तिचे हात हातात घेतले आणि म्हणालो.

"वेणूम का करतेस एवढ प्रेम? माझी पात्रता नाहीये तेवढी."

"असं तुला वाटतं अनंता. कधीतरी दुसर्‍याला काय वाटत असेल याचा विचार करून बघ, मग सगळं समजेल."

विषय बदलायचा म्हणून मीच मग जुन्या गोष्टी बोलत राहिलो. हातात हात तसेच ठेवून. बोलता बोलता माझं लक्ष वेणूकडे गेलं. डोळ्यांत आलेलं पाणी कसंबसं अडवलं होतं तिने. मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. तिने एकदाच माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तिच्या गालांवर ओघळलेले थेंब मी पुसले आणि भावनेच्या भरात मी चक्क तिच्या ओठांवर ओठ ठेवू लागलो. पण मोठ्या आवेगाने वेणून मला दूर ढकललं. "हे चूक आहे अनंता. असं करू नकोस. लग्न ठरलंय माझं!" क्षणभरापूर्वी हळव्या झालेल्या वेणूच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. तिचं हे रूप मी पहिल्यांदा पाहात होतो. माझी चूक मला मान्य होतीच. वेणूच्या नजरेतून मी उतरलो की काय अशी भीती मला वाटू लागली.

"हे नको करून घेऊ अनंता माझ्याकडून. खूप विश्वास आहे काकूंचा, आईबाबांचा आपल्यावर."

वेणू नंतर आत गेली. मी मात्र रात्रभर विचार करत राहिलो. वेणूला समजून घेण्यात मी चुकलो होतो आणि आजच्या वागण्याने मी माझ्याच नजरेतून इतका उतरलो होतो की आता वेणूशी कधीही नजर वर करून बोलू शकणार नव्हतो.

***

त्या दिवसानंतर मी अनंता नसेल तेव्हा येऊन काकूंना भेटून जायचे. माझा राग गेला होता त्याच्यावरचा. भावनेच्या भरात झाली त्याच्याकडून चूक. पण त्याच्या मनात वाईट हेतू नक्कीच नसणार. असता, तर त्याने त्या प्रसंगानंतर मला टाळलं नसतं. त्याचं मन त्याला खातंय हे स्पष्टच दिसत होतं. स्पर्श काही आम्ही पहिल्यांदा करत नव्हतो एकमेकांना. मोठे होत एकत्र खेळताना अनेकदा खोड्या काढल्या. पण त्या सगळ्यामध्ये निरागसता होती. हा स्पर्श वेगळा होता. त्यात एक वेगळीच धुंदी होती. तो क्षण तसाच राहावा असं एक मन म्हणत होतं आणि दुसरं मन ओरडून ओरडून सांगत होतं, हे चूक आहे. हव्याहव्याशा वाटणार्‍या त्या क्षणी माझ्यातल्या मर्यादेने मला सावरलं. अनंता जरी हवा असला, तरी आधी त्याचं मन मला हवं होतं. ते जोपर्यंत एकरूप होत नाही, तोपर्यंत सगळं व्यर्थ.

झाल्या प्रसंगाचा दोष स्वत:वर घेत अनंताने माझ्याशी बोलणं तोडलं. आता तरी त्याला माझ्याविषयी काय वाटतं हे त्याला कळलं असेल आणि तो बाबांची मनधरणी करायचा प्रयत्न करेल अशी एक वेडी आशा होती मनाला. पण एवढं सगळं होऊनही अनंता त्याच्या निर्णयावरून ढळला नाही. त्याच्या वागण्याचा विचार करताना वाटायचं - एका दृष्टीने बरंच झालं त्याच्याशी लग्न होत नाहीये ते. पण मनाला कोण समजावणार? या सगळ्या गुणदोषांसहित मी प्रेम केलं होतं त्याच्यावर. ते विसरणं मला कसं शक्य होतं? अनंताच्या वागण्याचं कोडं मला काही केल्या सुटेना. माझ्या लग्नालाही नाही आला तो. मी मात्र मनाने प्रत्येक क्षणी त्याच्याजवळ होते. आता हे मला माहीत होतं आणि त्यालाही..

***

मला माहिती नसेल या कल्पनेने तिचं लग्न ठरल्याचं आईने मला सांगितलं. मुलगा चांगला आहे. स्वतःचा व्यवसाय करतो आणि लगेच लग्न करायलाही तयार आहे. तुळशीच्या लग्नानंतर मुहूर्त काढणार आहेत. आईने सांगितलं आणि मी जेवता जेवता ताटावरून उठून गेलो. काय झालं होतं मला? सगळ्या जगाला कळतंय आमच एकमेकांवर प्रेम आहे, मग मला का नाही? मला समजूनच नाही घ्यायचं? मी दु:ख कधी पाहिलं नव्हतं आयुष्यात. पण बाबा गेले त्या दिवशी आत हललं. असं वाटलं, धावत जाऊन नदीत उडी मारावी, फक्त पोहतच राहावं. परत येऊच नये. पण सारा आक्रोश आत कोंडून ठेवला. आईची अवस्था केवढी बिकट. मी शिकायला बाहेर, त्यामुळे आईला बाबा आणि बाबांना आई. तिच्या त्या ओक्या ओक्या कपाळाकडे बघून काटा यायचा अंगावर. पण विसरलो लहानपण. बाबांचं कार्य करून आलो आणि एकदम मोठा, प्रौढ झाल्यासारखं वाटलं. सगळी जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर पेलली. आईला माझ्याबरोबर चल म्हटलं, तर "इथल्या आठवणी सोडून आता नाही कुठे जाणार" म्हणाली. आजही ती हसते, तेव्हा असं वाटत तिचे डोळे अजूनही बाबांना शोधत आहेत. वेणूने किती आधार दिला तिला. ती इथे होती म्हणून मी निर्धास्त जाऊ शकलो का?

वेणू.. हळवी वेडी वेणू. तिला जपणं जमलं असतं मला? मी हा असा, माझा अहं कुरवाळणारा.. आणि वेणू? तिने सगळं सहन केलं असतं, शांतपणे. आमचं लग्न म्हणजे अन्यायच झाला असता तिच्यावर.

वेणूच्या लग्नाला मी गेलो नाही. माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या. आवरून परत जायच्या आधी एकदा नदीवर जाऊन यावं, म्हणून तिथे गेलो ते किती वेळ बसलो होतो कळलंच नाही. आई आदल्या दिवशीच गेली होती वेणूकडे. लग्न झाल्यावर नवरा-नवरी मंदिरात दर्शनाला आले होते. लोकांची गजबज कानावर आली, तसा मी उठून दूर उभा राहिलो. तिला दिसणार नाही असा. एवढी सुंदर आहे माझी वेणू? अबोली रंगाचा शालू नेसलेला तिने आणि त्याच्यावर जरीच्या काठाची हिरवी शाल पांघरली होती. केसात किती गजरे माळलेले. मेंदीचा लालचुटुक रंग खुलला होता हातांवर. खरोखर लक्ष्मी असेल तर ती वेणूसारखीच दिसत असावी बहुधा.

हळुवार पावलं टाकीत ती येत होती. एकदाच तिने नजर वर उचलून इकडेतिकडे पाहिलं. मी तिथेच आहे हे कळलं होतं का तिला? मंदिरात आत जाताना धाकट्या बहिणीच्या कानात काही कुजबुजली. तिने मग धावत जाऊन सोनचाफ्याची फ़ुलं वेणूला आणून दिली होती! काही तिने तिच्या नवर्‍याच्या हातात ठेवली. त्याच्या डोळ्यात मिश्कील हसू होतं आणि वेणूच्या डोळ्यात? तिच्या डोळ्यात मी दाटलो होतो? निदान मला तरी तसंच वाटलं होतं. दोघं मंदिरात नमस्कार करून गेले आणि मी धावत जाऊन मंदिरातली सगळी फुलं वेचू लागलो. पण काही क्षणातच त्यातला फोलपणा जाणवला. तसाच बाहेर आलो आणि शर्ट काढून नदीत उतरलो. किती वेळ पोहलो काय माहीत. अंधार पडू लागला, तसं आई वाट पाहत उभी दिसली किनार्‍यावर. बाहेर आलो आणि आईच्या कुशीत शिरून रडलो खुप. काही न बोलता आई थोपटत राहिली. दुसर्‍या दिवशी आईला वेणू परत आल्यावर यातलं काही तिला सांगू नको असं सांगून घराबाहेर पडलो. त्यानंतर मी पुन्हा कधी मंदिरात, नदीवर गेलो नाही.

वेणूचं लग्न झालं आणि मी अजून एकटा झालो. हीच कविता वाच म्हणून आता वेणू हट्ट करायला नव्हती. आईकडून तिची खुशाली कळायचीच वरचेवर. तुझ्याविषयी विचारत असते म्हणायची. मी कधीच स्वत:हून आईला विचारल नाही वेणूबद्द्ल. माझ्यापुरतं मी वेणूला तिथेच ठेवलं होतं नदीकिनारी शंखशिंपल्यात खेळणारी, सोनचाफ्याची फ़ुलं वेचणारी, मला कविता वाचायला सांगून स्वत: निळ्या आकाशात रमलेली. ती वेणू माझीच होती फक्त. माझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही तिला. मीसुद्धा नाही!

शेवटचं वेणूला पाहिलं ते तिच्या कवितांच्या कार्यक्रमात. खूप लांब होतो मी. तिने नसेलच पाहिलं मला. खूप आनंदात होती. तिचे २-३ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले होते. ते सगळे मी वाचून काढलेले. पण त्याच कविता तिच्या तोंडून ऐकणं हा एक सुखद अनुभव होता. अधूनमधून ती तिच्या कवितेचा प्रवास सांगत होती. गावाविषयी, मंदिराविषयी खूप समरस होऊन बोलत होती. तिच्या कविता सहज त्या वातावरणात घेऊन गेल्या. एका कर्मठ घरात लग्न झाल्यावरही आपली कवितांची आवड जपत तिने संसार केला. वेळप्रसंगी घरच्यांचा वाईटपणा घेऊन तिच्या नवर्‍याने तिला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. एक वेगळीच चमक, आवाजात एक वेगळीच नरमाई होती तिच्या आवाजात त्याच्याविषयी बोलताना. काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी असायची तशीच अगदी!

केवळ तिच्यातल्या प्रतिभेच्या बळावर तिने स्वत:चं एक वेगळं अस्तित्व तयार केलं होतं कविताप्रेमींच्या जगात. माझी कविता मात्र या ना त्या कारणाने अपूर्णच राहिली.

***

वेळ कुणासाठी थांबलीय? मी माझ्या संसारात आणि अनंता त्याच्या संसारात रमलो दोघं. कमीतकमी सगळ्यांना तसं वाटलं तरी. माझ्या लग्नानंतर पुन्हा अनंता नाहीच भेटला. मीही कधी त्याच्या समोर गेले नाही. जेवढ शक्य होतं तेवढं ते प्रेम तसंच जपून ठेवलं. यांनीही समजून घेतलं ते. एकदा मला सोडायला आले होते, तेव्हा म्हणाले "आपण लग्नानंतर गेलो होतो ते मंदिर किती छान आहे. संध्याकाळी जाऊ या पुन्हा." माझ्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. त्यांच्या नजरेने टिपलं सारं. तिथे गेल्यावर त्यांनी स्वतः आठवणीने सोनचाफा मला आणून दिला, म्हणाले, "कधीकधी एखादी गोष्ट सहज मिळत नाही, तेव्हाच तिचं महत्त्व आपल्याला कळतं. आता हेच बघ, तुला सोनचाफा इतका आवडतो म्हणून मी स्वतः लावला आपल्या अंगणात, पण तो नाही फुलला. आणि इथे हा बघ कसा फुललाय. पण म्हणून माझं छोटसं रोप मी जपणार नाही असं नाही. हा सुगंध मी नेईन माझ्यासोबत. जे मला मिळालं थोडफार, ते मी आता त्या रोपट्याला देईन. बघ, एक दिवस तोही बहरेल."

अनंताची वेणू त्याक्षणी तिथेच राहिली. त्या पायरीवर. त्यांच्यासोबत परतीच्या वाटेवर पिसासारखी हलकी होऊन गेले. चार दिवसांनी पुन्हा घरी गेले, तर खरच तिथल्या सोनचाफ्याला कळी आलेली. प्रेम खरंच कसं असतं, हे मी माझ्या नवर्‍याकडून शिकले. माझी प्रत्येक आवडनावड जपली त्यांनी. माझं कवितांचं वेड कळल्यावर मला पुस्तकं आणून देऊ लागले. बायकोचे असे लाड करणं कुठे आवडणार त्या काळात? पण त्यांनी नाही लक्ष दिलं. वाचण्याबरोबरच लिहिणंही आवडतंय हे लक्षात आल्यावर त्यांनीच पुढाकार घेऊन मला लिहितं केलं. मीही रमत गेले त्यात. भूतकाळाशी कुठलाही संबंध न जोडता त्यांनी माझ्या कविता वाचल्या. त्यातल्या काही खरोखर अनंतासाठी होत्या. त्याची आठवण आल्यावर त्या लिहिल्या होत्या, पण यांनी कधीच त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यांच्याकडे पाहिलं की कधीकधी अनंताने मलाच विचारलेला प्रश्न माझ्या कानात घुमतो, "कुणी एखाद्याला एवढं कसं आवडू शकतं?" पुढे अनेक प्रसंगाममधून यांच्या मनाचं मोठेपण कळत गेलं. कधी मन चुकून तुलना करायचं अनंताशी यांची, पण जर इतक्या वर्षांनीदेखील मी अनंताच्या प्रेमाचा एक कोपरा मनात जपून ठेवला होता, तर यांच प्रेम तर त्याहूनही निरपेक्ष होतं! ते मी न जपलं, तर माझ्यात आणि अनंतामध्ये काय फरक उरणार होता? अनंता आणि मी पुन्हा कधी भेटू की नाही.. माहीत नाही. भेटलो तर कसे व्यक्त होऊ याचीही कल्पनाही नाही.

अनंताला माहीत नाही. मागच्या वेळी तो आला होता कुटुंबासोबत, तेव्हा त्याची मुलगी भेटली होती नदीकिनारी. त्याच्यासारखीच आहे. तिला सोनचाफ्याची फ़ुलं दिली होती. अगदी मनभरून वास घेतला तिने. मला म्हणाली, "आमच्या घरी नक्की या. माझ्या बाबांनाही खूप आवडतात ही फुलं"

मी काय म्हणणार?

माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अनंता उभा होता, माझी आवडती कविता पूर्ण करत होता.

'कळते रे हे तुझेच अंगण
जिथे फुलांची नाजूक पखरण
थकले रे, आले तरीही पण
का दार तुझे अडखळते रे!'
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

25 May 2016 - 11:48 am | वपाडाव

सागर बोरकर ह्यांना ओळखता का?

सुबोध खरे's picture

25 May 2016 - 7:03 pm | सुबोध खरे

असेच म्हणावेसे वाटते.
आमची शब्द संपदा तोकडी पडते म्हणून दुसर्याच्या प्रतिसादाला असे "मम" म्हणावे लागते.
लिहित्या रहा. सुंदर.अप्रतिम

भिंगरी's picture

27 Nov 2015 - 4:24 pm | भिंगरी

सुंदर कथा.
आणि गा.मां चा प्रतिसादही खुप आवडला.

मदनबाण's picture

27 Nov 2015 - 4:41 pm | मदनबाण

वाह्ह ! केवळ अप्रतिम ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

पिलीयन रायडर's picture

27 Nov 2015 - 4:46 pm | पिलीयन रायडर

सुंदरच!!!

ही कविताही फार आवडते..

नाखु's picture

27 Nov 2015 - 4:53 pm | नाखु

शांत नदी किनारी (अगदी थेट सांगायचं झालं तर "डॉ.प्रकाश आमटे" सिनेमात नाना व सोनाली तै बसतात रेडीओ घेऊन) तसं खळाळणारं पाणी,सर्वत्र चैतन्य पसरलेलं आणि आपल माणूस शेजारी मनातल्या गुजगोष्टी करतेयं हीच भाव्ना या कथेबाबत कल्पना. तो पाण्याच्या नादमय प्रवाह्,नितळता,अवखळपणा,नैसर्गीक अकृत्रीमता या कथेत आहे.
तेच बलस्थान आहे आणि कुठलाही संदेश ,ऊपदेश न देता आहे तसे मांडले आहे.. खरचं इतकं सुंदर लिहिणारी व्यक्ती नक्कीच चांगली वाचक्+श्रवणभक्ती असलेली असेल याबब्त मला संदेह नाही.

अतिशय सुंदर "सोनचाफा" फुलासारखी टवटवीत कथा...

शतशः धन्यवाद.

नतमस्तक नाखु

रातराणी's picture

28 Nov 2015 - 4:50 am | रातराणी

_/\_ काका खूप लहान आहे अजून मी. मला अजून लहान नका करू. :) नतमस्तक तर मी व्हायला हवंय. इतके सुंदर प्रतिसाद देणार्या सर्वच वाचकांची मी ऋणी आहे कायमची!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Nov 2015 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार

लहानपणी भेटलेली एक वेणू परत एकदा डोळ्यासमोर उभी राहिली.
फारच सुरेख लिहिले आहे.

पैजारबुवा,

अभिजीत अवलिया's picture

29 Nov 2015 - 1:08 pm | अभिजीत अवलिया

एकच शब्द सुचतो 'अप्रतिम'... खुपच ताकदीची कथा. सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. इतकी सुन्दर कथा गेल्या बर्याच दिवसात वाचली न्हवती. जितकी सुन्दर कथा आहे तितकाच गामा पैलवान ह्यान्चा प्रतिसाद देखील. कथेचे सार ज्याला म्हणतात ते म्हणजे गामा पैलवान ह्यांचा प्रतिसाद.

जेपी's picture

29 Nov 2015 - 1:16 pm | जेपी

कथा आवडली.

जातवेद's picture

3 Dec 2015 - 4:00 pm | जातवेद

फारच सुंदर आहे कथा. ह.ना. आपटेंच्या यमुची आठवण करून दिलीत. कथेतली सर्व पात्रे, प्रसंग, जागा अगदी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
खूपच छान!

पैसा's picture

3 Dec 2015 - 11:45 pm | पैसा

कथा आवडली.

मराठी कथालेखक's picture

24 May 2016 - 1:40 pm | मराठी कथालेखक

फार छान , दर्जेदार लेखन , भावूक वेणू खूप आवडली.
अनंताचं प्रेमाचा शोध घेणं, स्वतःच्या मनाचा थांग न लागणंही मनाला भिडलं.
अनंताची आई , वेणूचा नवरा यांचा समंजसपणाही छान रेखाटलाय ...
असं प्रेम पुर्णत्वास नाही गेलं तरी कसं म्हणणार.. ते प्रेम आयुष्यात मिळणं हेच आयुष्याचं पुर्णत्व,,,

ही कथा वाचताना क्षणोक्षणी असे वाटू लागले की ,जावं आणि त्या अनंताला चांगलाच दम भरून सांगावे ''मुकाट्याने वेणुशी लग्न कर , नाहीतर मग आमच्याशी गाठ आहे'' एकाद्या प्रामाणिक माणसाच्या भावनेशी कीती खेळायचे ते''.!! <<<<<<<<<माझ्या 'अनंता' ला पण दम देईल का कोणी?

ही कथा वाचताना क्षणोक्षणी असे वाटू लागले की ,जावं आणि त्या अनंताला चांगलाच दम भरून सांगावे ''मुकाट्याने वेणुशी लग्न कर , नाहीतर मग आमच्याशी गाठ आहे'' एकाद्या प्रामाणिक माणसाच्या भावनेशी कीती खेळायचे ते''.!!

माझ्या 'अनंता'ला पण दम देईल का कोणी?

मराठी कथालेखक's picture

24 May 2016 - 1:52 pm | मराठी कथालेखक

माझ्या 'अनंता'ला पण दम देईल का कोणी?

फक्त ही कथा वाचायला द्या त्याला. त्याच्या डोळ्यात पाणी नाही आलं तर दुर्दवानं तो या 'वेणू'च्या प्रेमास पात्र नाही असंच म्हणावं लागेल.
असो, पण चीडचीड नाही, आदळाआपट नाही, हट्टंही नाही ..अशी वेणू ..वा खरच किती गोड आहे ही वेणू,,,
अनंताला दम देणं वेणूला नाही आवडणार ना ? :)

Sanjay Uwach's picture

24 May 2016 - 7:49 pm | Sanjay Uwach

क्षणोक्षणी असे
Sanjay Uwach - Fri, 13/11/2015 - 17:55
आनंताला प्रेमाने समजून सांगू,पण गेल्या सहा महिन्यांत कुठे गायब झाला कुणास ठावूक ?

विटेकर's picture

24 May 2016 - 3:17 pm | विटेकर

फारच सकस आणि दर्जेदार कथा ! गोनीदांच्या "शितु "ची आठवण आली, तुमची शैली ही आप्पांच्या वळणावर जाते

ब़जरबट्टू's picture

24 May 2016 - 3:48 pm | ब़जरबट्टू

रातराणी,
तुमच्या कथा अप्रतिम आहेत.. मस्तच...

अनंताला दम देणं वेणूला नाही आवडणार ना ? :) <<<< हो खरंय हे.

गौतमी's picture

24 May 2016 - 3:53 pm | गौतमी

खरच नाही आवडनार.

अन्नू's picture

24 May 2016 - 8:05 pm | अन्नू

आज बरेच जुने धागे वर आणलेत वाटतं. :)

स्पा's picture

24 May 2016 - 8:14 pm | स्पा

केवळ हायक्लास! !!!!

मृत्युन्जय's picture

24 May 2016 - 8:20 pm | मृत्युन्जय

अप्रतिम कथा. लेखणीत तुफान दम आहे तुमच्या.

स्वीट टॉकर's picture

24 May 2016 - 9:08 pm | स्वीट टॉकर

फारच सुरेख!!

दोघांचेही विचार first person मध्ये लिहिल्यामुळे एक वेगळीच छटा आली आहे.

आता अशी वेणू कधी कुणाला भेटेल कि नाही सांगता येत नाही.. आजकालच्या मुलींकडून कोणत्याच आणि कसल्याच अपेक्षा ठेवता येत नाहीत...कविता करणे किंवा केलेली ऐकुन तरी घेणे...लांब केस...गजरा आणि सोनचाफ्याच्या काय किंवा इतर फुलांची आवड...यातली एकही गोष्ट हल्लीच्या मुलींमेध्ये नाही सापडणार...नियमाला अपवाद असतील पण फार कमी..खरंच अनंता किती कमनशीबी होता...देव देऊनही पाहतो आणि घेऊनही पाहतो हेच सत्य... लेख अत्यंत सुरेख लिहिलाय...मस्त...खूप दिवसांनी काहीतरी सुंदर वाचलंय...धन्यवाद..

मराठी कथालेखक's picture

26 May 2016 - 11:56 am | मराठी कथालेखक

आजकालच्या मुलींकडून कोणत्याच आणि कसल्याच अपेक्षा ठेवता येत नाहीत..

छोटा चेतन-२०१५'s picture

26 May 2016 - 1:44 am | छोटा चेतन-२०१५

अप्रतिम!

मेघना मन्दार's picture

26 May 2016 - 3:22 pm | मेघना मन्दार

खूप सुंदर कथा !!

विदिश सोमण's picture

20 Jun 2016 - 4:31 pm | विदिश सोमण

खूपच छान, हळवी कथा आहे. हापिसात बसून वाचली. भावना आवरणे अवघड जात होते. कसाबसा हुंदका आवरला पण डोळ्याच्या कडा कितीतरी वेळ पुसत होतो. घरी एकता असतो तर काही खर नव्हत.....
वा खु साठवली आहे. परत नक्की वाचेन....

रुपी's picture

14 Jun 2017 - 6:07 am | रुपी

अप्रतिम कथा!
अतिशय सुरेख लेखन आहे. कवितेचा खूप छान मेळ घातलाय कथेमध्ये.

रातराणी's picture

14 Jun 2017 - 12:05 pm | रातराणी

धन्यवाद :)

मराठी कथालेखक's picture

11 May 2020 - 7:18 pm | मराठी कथालेखक

आज पुन्हा एकदा वाचली..
मस्त..अतिशय भावूक ..या कथेवर एक शॉर्टफिल्म निघायला हवी..

मन्या ऽ's picture

11 May 2020 - 7:42 pm | मन्या ऽ

अतिशय तरल, सुंदर कथा!
मन वाचनात अगदी शेवटच्या शब्दापर्यत खिळवुन ठेवलं.

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2020 - 5:12 pm | चौथा कोनाडा

... अ ... प्र ... ति ... म ...!

diggi12's picture

22 Aug 2024 - 6:04 pm | diggi12

अप्रतिम