सामान्य गोवेकर तसा उत्सवप्रिय. गोव्यातली हिंदू जनता आपल्या एका आगळ्यावेगळ्या 'गोंयकारपणाने' वर्षभर अनेक सण साजरे करते. ह्या सणवारांमध्ये स्थानिक जत्रा, पालखी उत्सवसुद्धा समाविष्ट आहेत, जे शतकानुशतकं साजरे केले जातात. देवाचे उत्सव साजरे करणं आणि त्यात सहपरिवार भाग घेणं हे इथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. बर्याचदा देवाच्या/देवीच्या जत्रांना (किंवा अगदी घरातल्या पूजा वगैरेचं आमंत्रण दिल्यावर) ख्रिश्चन जनताही भक्तिभावाने देवाचे आशीर्वाद घ्यायला जाते. फातर्प्याच्या शांतादुर्गेच्या देवळात किंवा शिरगावच्या लईराईच्या जत्रेला किंवा म्हापश्याच्या मिलाग्रीच्या फेस्ताला हिंदू आणि ख्रिश्चन तीच श्रद्धा घेऊन जाताना दिसतात.
गणेशचतुर्थी, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, होळी, रामनवमी, रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे अनेक सण इथे साजरे होतात. अर्थात गणेशचतुर्थीचा म्हणजे चवथीचा नंबर अगदी वरचा असतो. सगळ्यांचं सगळ्यात आवडतं दैवत आणि सण. अगदी देश-विदेशात असलेला गोवेकर चवथीला घरी पोहोचायचं बघतो आणि मग घरांना घरपण आणि गावांना गावपण येतं. चवथ-माटोळी, करंज्या-मोदक वगैरे धम्माल असते. मग येते दिवाळी.
दिवाळी - प्रकाशाचा उत्सव!!! 'अंधाराकडून उजेडाकडे जा' असं सांगणारा. वाइटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असणारा हा सण. श्रीकॄष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना राक्षसी राजवटीतून मुक्त केलं, म्हणून हा सण साजरा करतात. हाही सण एका वेगळ्याच प्रकारे इथे साजरा होतो. दसरा झाल्यावर दिवाळीचे वेध लागू लागतात, कारण वेगवेगळा फराळ बनवणं ह्याच सुमाराला सुरू होतं. चकल्या, लाडू, चवडे, चिरोटे, चिवडा, कोहळ्याच्या, बिटाच्या, गाजराच्या, डाळीच्या अशा वेगवेगळ्या (गोड) वड्या असा जंगी फराळ बनवणं सुरू असतं, तिथे पोरं-सोरं दुसरीकडे नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात मग्न असतात. दिवाळीच्या आदल्या रात्री ह्या प्रतिमेची आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावात मिरवणूक असते आणि पहाटे आम्ही त्याचं दहन करतो. ठिकठिकाणी नरकासुर आणि श्रीकृष्ण प्रतिमांच्या स्पर्धासुद्धा असतात, त्याही बघायला मज्जा येते. लहानपणी आईबाबा मला नेहमी घेऊन जात या स्पर्धा पाहायला. ते एक असो. दिवाळीच्या आदल्या दिवशी न्हाणीघर खास धुतलं-पुसलं जातं. *'थाळी'वरच्या **'भाणा'ला उतरवून त्याची काळोखी घासली जाते. त्याच्या गळ्यात झेंडू अन कारीटांची माळ घातली जाते. त्यावर चंदनाचे पट्टे ओढून त्याला पुन्हा न्हाणीवर ठेवून सभोवती माती लिंपली जाते. न्हाणीघराला आंब्याच्या पानांचं तोरण चढतं.
* जालावरून साभार (narkasur goa असं गुगलून पाहिल्यास असंख्य फोटो दिसतील, ज्यात नरकासुर बनण्याच्या प्रत्येक स्टेप्सचे फोटे असतील) फोटो लिंक : http://t2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQ9EdGbqa62FHWO69icTU8nvwLl_LE3k...
नरकासुर दहन करून घरी आल्यावर आम्ही आकाशदिवे लावतो आणि पणत्यांनी घर-अंगण-तुळस उजळवतो. थोडं उजाडल्यावर घरच्या पुरुषांना आणि लहानांना त्यांच्या आया आणि बायका तेल-उटण्याचं मालिश करतात आणि मग सगळे आंघोळ करतात. घरच्या बायका जरा लवकरच आंघोळ करून तयार होतात. मग आरती होते आणि बायकांना नवरे छानशी ओवाळणी देतात. यानंतर घरचा प्रत्येक सदस्य कारीट पायाच्या अंगठ्याने फोडतो अन दोन बिया स्वतःच्या पोटात घालतो. इथे दिवाळीला कृष्णाचे आवडते पोहे खायची आणि खिलवायची पद्धत आहे. पोह्यांचे किमान पाचतरी प्रकार हवेतच. बाकी तुम्ही काहीही केलंत तरी चालेल. आपल्या घरी पोहे खायचे आणि दुसर्या घरी खायला जायचे. माझ्या माहेरी आमची दोन आवळीजावळी गावं आहेत. आपसात ठरवून एका गावात एका दिवशी, तर दुसर्या गावात दुसर्या दिवशी पोहे असतात. दोन्ही गावचे लोक दोन्ही गावच्या प्रत्येक घरात पोहे खातात. आमच्या गावात आमच्या घरापासून पोहे खायची सुरुवात होते. आम्ही ताट-पान, पाणी, रांगोळी, सुपारी सगळं करून तयार असतो. ग्रामदेवी भूमिकामायेचा कळस कौल देऊन जातो अन मग पोहे सुरू. वाढल्यावर लोक पानावर बसतात. मग सगळ्या पंगतीची आरती होते. पोहे खाल्ले जातात आणि सगळे दुसर्या घरी पोहे खायला जातात. दिवसभर नुसते पोहे!!!!
फोटो: माझ्या सासरचं गेल्या वर्षीच्या दिवाळीचं पान. (हे दु:खाच्या दिवाळीतलं असल्याने फक्त १५-१६ प्रकार असतील.) फोटो लिंक https://lh3.googleusercontent.com/-k7nzsTBGmEQ/ViFFOawIbWI/AAAAAAAAJfk/V...
माझ्या सासरी थोडंसं वेगळं आहे. आमच्या वाड्यावर इन मीन सात घरं. मग आम्ही सगळे दसर्यानंतर ठरवतो की यंदा दिवाळी कुठे वाढायची. घर फायनल झालं की प्रत्येक जण आपापला जिन्नस फायनल करतो. दोन वर्षांपूर्वी माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी होती, तर पानात तब्बल ३५ वेगवेगळे पदार्थ होते!!! या पदार्थांमध्ये थोडे पारंपरिक, थोडे स्वतःच एक्स्पीरिमेंटिंग करून बनवलेले असे भ आणि र आणि पू आणि र पदार्थ असतात. काहीच पदार्थ सांगते हं - म्हणजे गोडाचे फोव, तिखशे फोव, ताकाचे फोव, कडीचे फोव, फोण्णे फोव, पाकातले फोव, फोंवा खीर, रोसा फोव, फोवा चिवडो, काकडीचा कायरस (कोशिंबीर), कच्च्या केळ्याचं पंचामृत, झालंच तर इतर गोड फराळ - जिलबी, गुलाबजाम वगैरे. आणि वाटला अंबाडा नाही हं विसरायचा. हां हां, ही अंबाड्याची पालेभाजी नाहीये बरं का, अंबाडा हे एक आंबट फळ आहे. आणि मग सरतेशेवटी जिरवणीला लसणाशिवायची सोलकढी.
हे असं सगळं दिवसभर तब्येतीने खाल्ल्यावर असली झोप येते म्हणून सांगू महाराजा! मग 'जरा' पडणं होतं आणि मग आहेच लक्ष्मीपूजन आणि इतर दिवाळी. पण मुख्य आकर्षण पोहेच!!!!.
*थाळी - न्हाणीघरातली आंघोळीचं पाणी तापवण्याची मोठी चूल. **भाणा - थाळीवर पाणी तापवण्यासाठी वापरायचा भलामोठा हंडा. ***फोव = पोहे
बरं, रेसिप्या हव्यात का? घ्या बरं लिहून..
गोडा फोव साहित्य :
लाल गावठी पोहे १ वाटी तूप १/४ वाटी गूळ १/४ वाटी ओलं खोबरं बचकभर चवीपुरतं मीठ
कृती सर्वात आधी गुळाचा पाक करून घ्यावा. पाक साधारण होत आला की पोहे धुऊन निथळून घ्यावेत. पाक झाल्यावर हे धुतलेले पोहे त्या पाकात घालावे आणि परतून घ्यावे. ओलं खोबरं, तूप घालावं आणि पुन्हा परतून घ्यावं. सरतेशेवटी चवीपुरतं मीठ घालून नीट ढवळून घेऊन पाकृ गॅसवरून उतरावी.
ताकाचे फोव
साहित्य : लाल/ पांढरे गावठी पोहे १ वाटी ओलं खोबरं १ वाटी ओल्या मिरच्या २ आलं अर्धा इंच जिरे १/४ चहाचा चमचा हिरवी मिरी ४-५ दही २ वाट्या मीठ चवीपुरतं साखर चवीपुरती
फोटो लिंकः https://lh3.googleusercontent.com/--2gaU-REHY4/ViFKvnVxKOI/AAAAAAAAJgM/l... कृती : पोहे धुऊन घ्यावे. ओलं खोबरं, मिरच्या, आलं, जिरं, मिरी मिक्सरमधून बारीक आणि दाटसर वाटून घ्यावं. हे वाटण पोह्यात घालावं. चवीपुरती मीठ-साखर घालावी आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्यावं आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यात दही घालावं. मला ह्या रेसिपीत खूप दही आवडतं.
फोटो लिंकः https://lh3.googleusercontent.com/-Z675T1AnEyE/ViFKukHcrqI/AAAAAAAAJgE/G...
रोसातले फॉव
साहित्यः
पांढरे पोहे १ वाटी गूळ १ वाटी वेलची दाणे ६-७ ओलं खोबरं१ वाटी मीठ चवीपुरतं
कृती : पोहे धुऊन घ्यावे व थोडा वेळ निथळत ठेवावे. ओल्या खोबर्यात वाटीभर पाणी घालून त्याचं दाट नारळाचं दूध काढून घ्यावं. आता ह्या दुधात गूळ विरघळवून घ्यावा आणि वेलदोड्यांची पूड करून त्यात घालावी (ताजी असल्यास जास्त छान वास येतो). आता पोह्यात थोडं पाणी घालून ते मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत. ह्यात गूळमिश्रित नारळाचं दूध घालावं व दोन मिनिटं शिजू द्यावं. चवीपुरतं मीठ घालून पोहे गॅसवरून उतरवावे आणि सर्व्ह करावे. रसातले पोहे :) ** नारळाचा रस असलेले पदार्थ जास्त वेळ शिजवू नये. दूध फाटण्याची शक्यता असते.
वाटला अंबाडा अंबाडे १० ओलं खोबरं १ वाटी हिरव्या मिरच्या २-३ हिंग १/४ चहाचा चमचा गूळ सुपारीएवढा मीठ चवीपुरतं.
अंबाडे फोटो लिंक : https://lh3.googleusercontent.com/-cDEpurvemFM/ViFHvk4SipI/AAAAAAAAJfw/Q...
कृती : अंबाडे शिजवून घ्यावे. ते शिजत असताना एकीकडे ओलं खोबरं, मिरच्या, हिंग, गूळ यांचं दाट पण बारीक वाटण करून घ्यावं. शिजवलेल्या अंबाड्यांत हे वाटण आणि मीठ खालून आंबाडे थोडेसे मुरडून घ्यावे आणि थोडा वेळ ठेवून मग सर्व्ह करावं. अंबाडे मुरडताना : अंबाड्याला काथा असतो, त्यामुळे सांभाळून.. फक्त वरची साल असते, ती एडिबल असते आणि ती थोडी थोडी साल वाटणात मिक्स व्हावी अशा पद्धतीने मुरडावं.
फोटो लिंकः https://lh3.googleusercontent.com/-qk6lpzxXuKM/ViFJGiZSY-I/AAAAAAAAJf4/p...
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 9:19 am | नूतन सावंत
गोयांक दिवाळीच्या शुभेच्छा.
रोसातले फोव नक्की करून पाहीन.
10 Nov 2015 - 10:33 am | अजया
सुरेख लेख.
10 Nov 2015 - 2:41 pm | विशाल कुलकर्णी
चोक्कस !
10 Nov 2015 - 3:22 pm | सूड
सांमके बरें बरयलें गो तुवें!!
पोह्यांचे हे एवढे प्रकार करायचे म्हटल्यावर तयारी किती करावी लागत असेल त्याचा विचार करतोय.
10 Nov 2015 - 4:22 pm | कविता१९७८
वाह मस्त लेख.
10 Nov 2015 - 4:36 pm | पद्मावति
वाह, मस्तं लेख. खूप आवडला.
सगळया पाककृती सुद्धा छानच आहेत.
10 Nov 2015 - 5:28 pm | हाहा
लेखही छान आहे
10 Nov 2015 - 6:55 pm | मधुरा देशपांडे
खूप आवडला लेख.
10 Nov 2015 - 7:58 pm | बोका-ए-आझम
पुढच्या दिवाळीत गोवा गाठावे काय याचा विचार करतोय. पण हे शहरात पण असंच असतं?
11 Nov 2015 - 10:22 am | प्रीत-मोहर
शहरातला गोवेकरही दिवाळीत आपले गाव गाठतो बोकेराव.
केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचा पीए आमच्या माहेरच्या गावचा आहे.आला तोही पोहे खायला. आणि आजच्या फ्लाईट ने जाईल. हे एक अवांतर. गोवेकर फॉव आणि चवथ शक्यतो मिसत नाहीत.
11 Nov 2015 - 10:23 am | प्रीत-मोहर
तुम्ही माझ्या घरी या बर. पुढल्या दिवाळीत. मस्तपैकी पंगतीला बसुन पोहे खाउन दिवाळी एन्जोय करा
11 Nov 2015 - 11:17 am | बोका-ए-आझम
पोहे तयार ठेवा!
10 Nov 2015 - 11:40 pm | पैसा
बरें बरयलां! दिवाळेक यो गो!
12 Nov 2015 - 7:01 pm | सानिकास्वप्निल
मस्तं लेख, आवडला :)
12 Nov 2015 - 10:34 pm | परिकथेतील राजकुमार
फारच मोठा लेख आहे.
पुढच्या दिवाळीपर्यंत वाचून प्रतिक्रीया देतो.
12 Nov 2015 - 10:37 pm | प्रीत-मोहर
नाही दिलिस प्रतिक्रिया तरी चालेल हो मला श्याम!!!
12 Nov 2015 - 10:42 pm | परिकथेतील राजकुमार
"पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच लेखकांचे मनही जप हो शाम." असे आईने सांगितले आहे.
12 Nov 2015 - 10:42 pm | पैसा
हे कधीपासून?
12 Nov 2015 - 10:49 pm | परिकथेतील राजकुमार
तुझ्या बसवाल्या धाग्यापासून लांब राहीलोय का नाही?
12 Nov 2015 - 10:53 pm | पैसा
आईचे ऐकत जा हो!!
12 Nov 2015 - 10:50 pm | प्रीत-मोहर
पुणेकर मनुश्या!!!!
12 Nov 2015 - 11:00 pm | परिकथेतील राजकुमार
गाववाले कसे गाववालीच्या मदतीला धावतात बघा.
आणि आम्हाला पुणेकर म्हणून हिणवा.
12 Nov 2015 - 11:02 pm | पैसा
पुणे म्हटले की येतील धावत सगळे.
12 Nov 2015 - 11:20 pm | प्रीत-मोहर
पुणेकराला पुणेकर म्हटले तर हिणवल्यासारखे वाटते का?
(आता शंभर झालेच धाग्याचे)
12 Nov 2015 - 11:34 pm | एस
मस्त!
13 Nov 2015 - 12:58 am | स्वाती दिनेश
गोव्याची दिवाळी (पोह्यांसकट) आवडली.
स्वाती
13 Nov 2015 - 1:04 am | नंदन
मस्त लेख, दिवाळीची हुनहुनीत परबी!
('रोसातले फॉव'ची सचित्र पाकृ देऊन भावना दुखावल्याबद्दल मात्र निषेध!)
13 Nov 2015 - 8:59 am | मितान
लई भारी गोव्याची दिवाळी !
सहजसोपी शैली आवडली.
रेसिप्यांनी मजा आली :)
13 Nov 2015 - 9:18 am | मोदक
रोचक प्रथा.
आता एक दिवाळी गोव्याला भेट देणे आले.
13 Nov 2015 - 8:02 pm | सोनू
कृतीदेखील दिल्याबद्दल धन्यवाद. छान वाटलं वाचून. अंबाडे तर खूप दिवसांनी पाहीले आणि लगेच तोंडात चव आठवून लाळ यायला लागली :) शाळेच्या रस्त्यावर होतं अंबाड्याचं झाड पण कधी अशी पाकृ कोणी केलेली पाहीलं नाही. नुसतेच ओरपायचो.
13 Nov 2015 - 8:30 pm | प्रदीप
लेख आवडला.
13 Nov 2015 - 9:06 pm | पियुशा
मस्त लिवलस ग प्रिमोडे :)
13 Nov 2015 - 11:18 pm | बिपिन कार्यकर्ते
उसासा.... दीर्घ उसासा!!!
14 Nov 2015 - 8:22 pm | Sanjay Uwach
सुंदर लेख आणि पोह्यांचा रेसिपी देखील,गोव्यात दिवाळी प्रमाणे तुळशीचे लग्न देखील खुप जोरात असते.
17 Nov 2015 - 7:20 am | प्रीत-मोहर
हो संजयजी. गोव्यात दिवाळी तुळशीच्या लग्नाने म्हणजे "व्हडली(मोठी) दिवाळी " ने सांगता होते.
14 Nov 2015 - 10:06 pm | मुक्त विहारि
गोव्यातल्या दिवाळीचा फराळ, प्रत्यक्षात अनुभवायला पाहिजे.
14 Nov 2015 - 10:27 pm | सस्नेह
फारच रुचकर अन लडिवाळ दिवाळी +)
2 Dec 2015 - 1:35 pm | ओहो
मि आताच गोव्यला गेले होते. योगायोग असा कि कर्तिकि एकदशिला आम्हि तेथे होतो. सर्व हिन्दु गोवेकरन्च्या घरसमोर सुबक तुलाशि व्रुन्दावन होते. छान रन्ग रन्गोति केलेलि, हार घातले होते, आम्ब्याचि छोति फान्दि रोवलि होति, आनि दिव्यानि व्रुन्दावन सजवले होते. खुप सुन्दर होते सर्व. असे मि आमच्या खानदेशात पाहिले नव्हते. हा हि गोव्याच्या दिवालि चाच एक भाग आहे, नाहि का ?
2 Dec 2015 - 1:46 pm | सुनील
तुमि पाह्यल ते तुल्सिच लग्न होत.