आवाज आणि संवाद

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 8:57 pm

.
.
“डोळे फुटले का तुमचे? तिथे बोर्ड लावला आहे तो दिसत नाही? तोच तोच प्रश्न विचारता.. साठ रुपये राइस प्लेट, ऐंशी रुपये फुल थाळी.”
“काय गुरुजी, आंधळे असल्यासारखे काय चालताय? रांगोळी मिटली ना तुमच्या पायाने.”
“तुमची भाषा कशी - करून राहिला आहे.. एका वाक्यात तीन क्रियापदे? व्याकरणाची पार वाट लावली तुम्ही.”
“ए, ऐकू येत नाही का तुला? त्यांना पोळी हवी, पाणी नाही.”
“आधी माझे ऐकून घ्या. सार्‍या समस्येचे मूळ आहे लोकशाही. या देशातल्या लोकांना सरळ करायला एखादा हिटलरच हवा.”
“मी बेट लावून सांगतो, आजची म्यॅच भारतच जिंकनार, तेंडल्या खेळनार आज.”
“नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विधानसभेत गदारोळ. आजही कामकाज ठप्प.”
...
आवाज, आवाज आणि आवाज. संध्याकाळी साडेसातपासून ते रात्री दहापर्यंत कुलकर्णींच्या वाड्यात फक्त आवाज आणि आवाज. अडीच तासात शंभराच्या वर माणसे जेवून जायची. सारे गेले की मग कसे शांत. वाड्यात फक्त दोघीच - कुलकर्णी आत्याबाई आणि ती. आत्याबाईने नाही म्हटले तरी तिला मेस आवडायची. मेसवर नजर ठेवणे, मेसमधली सारी कामे करणे आणि तिथे काम करणार्‍या मावशींची खोड काढणे हा तिचा उद्योग. आत्याबाईचे मात्र नेहमीचेच. ‘ही अशी तरणीताठी पोर कशाला येते मेसमध्ये? इथे किती प्रकारची माणसे येतात. कुणाची नजर कशी तर कुणाची कशी.’ ती सुंदर नसली, तरी नाकीडोळी नीट होती, सुडौल बांधा होता, सावळा वर्ण होता. तिने बी.कॉम. पूर्ण केले होते, पण तिला आवड मात्र चित्रकलेची. रंग तिला वेडे करीत होते. एकाच रंगाची गोष्ट तिला निरस वाटत होती. थोड्या करपलेल्या पोळ्यादेखील ती त्यात पांढर्‍या आणि काळ्या रंगाच्या छटा म्हणून आवडीने खायची. अंगावरचा ड्रेस असो की अंगणात काढलेली रांगोळी, त्यात रंगांची मुक्त उधळण हवीच. डोक्यात फुले जरी माळली, तरी ती वेगवेगळ्या रंगाची असत. वाड्यातल्या अंगणात तिने फुलांची बाग लावली होती. रंगारंगांची फुले होती. पांढरा मोगरा होता, पिवळी शेवंती होती, झेंडू होता. तिचा आवडता गुलाब होता. पांढरा गुलाब, लाल गुलाब, गुलाबी गुलाब, पिवळा गुलाब.. सारेच गुलाब तिला आवडत होते.

तो मेसवर यायचा. गेल्या महिन्याभरापासून तो रोज तिथे येत होता. रोज राइस प्लेट घेऊन जेवत होता. पांढराशुभ्र किंवा पांढर्‍यावर निळ्या रेषा असलेला शर्ट आणि निळी किंवा काळी पँट हाच त्याचा रोजचा पेहराव होता. अंग झाकायला कपडा यापलीकडे त्याला त्या कपड्यात रस नव्हता. त्याला संगीत आवडायचे. रॅप, रॉक, मेटल त्याला फार आवडायचे. कानाला हेडफोन लावून कधी ब्रायन ऍडम्स, कधी मेटॅलिका, तर कधी बीटल्स ऐकण्याचा त्याला छंद होता. तो स्वतः ड्रम वाजवत होता. आज प्राध्यापक असला तरीही त्याच्या कॉलेजच्या कार्यक्रमात तो ड्रम वाजवत होता. इथे मात्र तो कानाला काही न लावताच बसत होता. त्याला इथला गोंधळ, गोंगाट आवडत होता. इथे सतत कानावर पडणारे विविध आवाज त्याला आवडत होते. आवाजाच्या गोंगाटातून एकेक आवाज वेगळा करणे हा त्याचा छंद होता. हा गॅसच्या शेगडीचा आवाज, हा सिंकमध्ये भांडे टाकल्याचा आवाज, हा भांडे धुण्याचा आवाज, हा ताटावर वाटी घासल्याचा आवाज, हा आमटी ओतून वाटी ठेवल्याचा आवाज, हा कुणाच्या पावलांचा आवाज, हा पैसे पडल्याचा आवाज, हा ट्रकच्या हॉर्नचा आवाज, तर हा गल्लीतून चाललेल्या सायकलच्या घंटीचा आवाज. पलंगावर आपला नंबर यायची वाट बघत बसताना मनातल्या मनात असे आवाज वेगवेगळे करणे हाच त्याचा खेळ होता, विरंगुळा होता.

“तुमच्या पोळ्या झाल्या का?”
“हो.”
त्याचा पहिलाच दिवस होता. गेल्या पंधरावीस मिनिटात त्याने हा संवाद तीन-चार वेळा ऐकला होता. हा संवाद झाल्यानंतर ज्याचा नंबर असेल तो जेवायला जाऊन बसतो, हेही त्याच्या लक्षात आले होते. जेवणाचे टेबल वर लावले होते, टीव्हीसुद्धा वर होता. टीव्हीच्या बाजूला किचनचा दरवाजा होता. आत्याबाई खुर्ची टाकून दाराजवळच बसायच्या, म्हणजे दोन्हीकडे लक्ष ठेवता येत होते. ती मात्र दोन्हीकडे फिरायची. खाली एक पलंग टाकून त्यावर नंबर येईपर्यंत वाट बघावी लागायची. सरकत पलंगाच्या टोकावर यायचे आणि आपला नंबर आला की उठायचे. त्यालाही पंधरावीस मिनिटात या सार्‍या पद्धतीचा अंदाज आला. एकेक नंबर उठत होता, तसा तोही पलंगावर सरकत होता. तो सरकत पलंगाच्या काठापर्यंत आला.
“कोणाचा नंबर आहे?” हे वाक्य ऐकताच तो उठला आणि टेबलच्या दिशेने चालायला लागला.
“ओ, तुम्ही थांबा जरा” आत्याबाई बसल्याबसल्याच त्याच्याकडे हात दाखवत ओरडल्या. तरी तो चालत होता.
“ए, जा बरं, त्याला थांबव. साहेब आलेत, आधी साहेबांचे जेवण आटपून घे.” आत्याबाईंनी वाढणार्‍या मावशींना सांगितले. सरकारी कचेरीत मोठ्या पदावर कामाला असलेला साहेब अधूनमधून आत्याबाईंच्या मेसवर जेवायला यायचा. सरकारी साहेबांसाठी नंबर नसायचा. ते आले की जेवून निघून जायचे. तो दुसर्‍या पायरीवर होता. त्याने ऐकले. कुणीतरी पोळ्यांचे भांडे टेबलवर ठेवले. झपाझप चालणार्‍या पावलांचा आवाज त्याने ऐकला. ती पावले त्याच्याच दिशेने येत होती. ती पावले आपल्या दिशेने का येताहेत हेच त्याला कळत नव्हते. तो शांतपणे चालला होता. कुणीतरी त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. तो गोंधळला.
“ओ, तुम्हाला थांबायला सांगितले ना? साहेबांना घाई आहे.” मावशी जवळ येताच ओरडली. तो गडबडला. त्याची काठी सटकली, डोळ्यावरचा गॉगल खाली पडला. पायर्‍यांवरून त्याचा पाय घसरला. त्याने सावरण्याचा प्रयत्न केला. जेवायला चाललेले साहेब मागेच होते. त्यांनीच त्याला पकडले. पडण्यापासून वाचवले. त्या साहेबांनीच मग त्याला त्याची काठी, खाली पडलेला त्याचा गॉगल उचलून दिला.
“Thank you”
“आत्याबाई, ह्यांचा नंबर असेल तर यांचे जेवण आटपून घ्या. मी थांबतो दोन मिनिटं.”
“नको साहेब, तुम्हाला घाई आहे, तुम्ही जेवून घ्या. मी बसतो.”

ती किचनमध्ये होती. तिथूनच सारे बघत होती. तिला राग आला होता. तिला तर सार्‍यांचाच राग येत असतो. जिने वाढवले, लहानाचे मोठे केले, त्या सख्ख्या आत्याचासुद्धा. तरी तिचा आत्यावर आणि आत्याचा तिच्यावर अतिशय जीव होता. रात्र झाली की आत्याला दिवसभरात काढलेले चित्र दाखवणे, आत्या ते चित्र बघत असताना आत्याच्या मांडीत डोके ठेवून हातात मोबाइल घेऊन तिला वेगवगेळ्या गमती सांगणे हा तिचा रोजचा नियम होता. अडीच तास ओरडून ओरडून थकल्यावर आत्याबाई शांत व्हायच्या. तिचे चित्र मन लावून बघायच्या. तिने काय काढले हे फारसे समजले नाही, तरीही चित्राचे तोंड भरून कौतुक करायच्या. तिच्या केसातून हात फिरवायच्या. कधी तिच्या डोक्यावर तेल चोळायच्या. तिचे मायबाप एका अपघातात गेल्यावर आत्यांनीच तिला वाढवले होते. दिवसभर वसावसा ओरडणारी आत्याबाई रात्री या पोरीकडे बघून हळवी व्हायची, खचायची. ‘माझ्यामागे कसे होणार हिचे? विघ्नेश्वरा, कसा निभाव लागेल हिचा या आवाजाच्या आणि गोंगाटाच्या दुनियेत?"

उधाणलेला समुद्र, वेगात धावणार्‍या लाटा
दूर असणारी, तरी काहीसी अस्पष्ट आकृती
एक चिमुरडी, परकर-पोलके, दोन छोट्या वेण्या
एक नाव सोडतेय त्या लाटांबरोबर,
चित्र बघून आत्या गालातच हसली. ती घाबरली. आजचे चित्र आत्याला कळले की काय? आत्या दरवाजातच बसून ओरडत असली, तरी तिचे मेसमध्ये बारीक लक्ष होते. महिनाभरात तिच्या नजरेतून काहीच सुटले नव्हते.

“ए, दोन राइस प्लेट लाव तिकडे.”
आत्याबाईंनी मावशीला सांगितले. त्या दिवशी मेसमध्ये बराच गोंधळ होता. टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालली होती. क्रिकेट आणि त्यावरील चर्चा यांना उधाण आले होते. रोज कुठल्या ना कुठल्या विषयावर चर्चा होतच होत्या. तो चर्चांमध्ये कधीच रमत नव्हता. या चर्चांमध्ये कुणीच कुणाचे ऐकत नाही. फक्त आवाज मोठा करतात. कुणी वेळ घालवायला चर्चा करतात, तर कुणी आपले पांडित्य दाखवायला चर्चा करतात. पण मेसमधला गोंधळ त्याला आवडायचा. टीव्हीवर रंगणार्‍या सामन्यासोबत कोहली की धोनी या विषयावर वाद रंगला होता. कुणीच कुणाचे ऐकत नव्हते. विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर, तर भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ज्यांचे जेवण झाले होते, तेही आज थांबले होते, मॅच बघत होते. अध्येमध्ये ओरडत होते. कधी चौकार गेला म्हणून, तर कधी डॉट बॉल म्हणून. तो शांत होता. सारे ऐकत होता. मनातल्या मनात सारे आवाज वेगळे करीत होता. खाली मान घालून जेवत होता.
“माझ्या पोळ्या झाल्या.” तो सांगत होता.
“माझी राइस प्लेट आहे, माझ्या तीन पोळ्या झाल्या.” त्याने परत सांगितले, हात मध्ये केला, तरीही कुणीतरी तिथेच उभे आहे आणि त्याला वाढत आहे असे त्याला वाटले. माझ्या राइस प्लेटमधल्या पोळ्या झाल्या असतानाही कुणी मला पोळी का वाढत आहे? मी असा आंधळा म्हणून कुणीतरी तरस खातोय.. त्याला राग आला.
“मी तुम्हाला दोनदा सांगितलेय माझ्या पोळ्या झाल्या म्हणून. तुम्हाला ऐकू येत नाही की कळत नाही?” त्याचा आवाज वाढला होता. त्याच्या आवाजासरशी मेसमध्ये चाललेला गोधळ थांबला. काही क्षण सारेच शांत होते. त्यालाही ती शांतता जाणवली. त्याने रागाने आपटत भराभर पावले आत जाण्याचा आवाज ऐकला. आत पोळ्यांचे भांडे जोरात आदळल्याचेही त्याच्या कानावर आले आणि मग कोहलीने चौकार हाणला. परत गोंधळ सुरू झाला.

“तिला रागावलेलं मी आजच पाहीलं. नेहमी ती आनंदात असते.” घरी परतायच्या वेळेला तो आणि मित्र बोलत होते.
“I hate sympathy.”
“सिम्पथीच कशावरून?”
“दुसरं काय?”
“चुकला असेल हिशेब, ती जाणारच होती, तेवढ्यात तू ओरडलास.”
“हिशेब चुकला तर मी सांगत होतो ते कळत नव्हतं का?”
“तुला एक सांगू? हा आवाज, हा गोंगाट, ते तुझं संगीत, ते तुझं ओरडणं यातलं काहीसुद्धा तिच्यापर्यंत पोहोचत नाही.” मित्र थांबला आणि पुन्हा बोलायला लागला.
“एक मात्र नक्की, तू काय बोललास हे तिच्यापर्यंत बरोबर पोहोचलं.”
तो शांत झाला. कोहलीच्या विकेटनंतर जेवढी शांतता त्याला जाणवली होती, त्याहीपेक्षा जास्त शांतता त्याला आता जाणवत होती. रस्त्यावर दोन दारुडे भांडत होते, जोरजोरात बडबड करत होते. पण त्याच्या कानापर्यंत काहीच पोहोचत नव्हते. तो स्तब्ध उभा होता. शॉकमधून बाहेर पडल्यावर तो मिश्कील हसला.
“This is interesting, I never imagined this. आता तू मला शिकव.”
“काय?”
“How to flirt with a girl?”
“ओय, काही का?”
“का तूही यात अनपढ आहेस? सांग मला तिच्या क्लासचा पत्ता, कॉलेजचा पत्ता, तिचा मोबाइल नंबर. I want to follow her everywhere.”
मग मित्रासोबत तो ‘सॉरी’ असे ग्रीटिंग कार्ड शोधायला गेला. मनासारखे कार्ड सापडले नाही. चित्र याला कळत नव्हते आणि त्यावर लिहिलेले शब्द त्याला पोकळ वाटत होते. परत कार्ड द्यायचे कसे हा प्रश्न होताच. मोबाइलवर मॅसेज पाठवावा, तर नंबर माहीत नाही. मित्राने मग युक्ती सांगितली. मित्राने सांगितल्याप्रमाणे त्याने दिवसभर प्रॅक्टिस केली. मेसमध्ये जेवताना तो तिच्या येण्याचीच वाट बघत होता. कुणाची तरी पावले त्याच्याकडे येत होती. नक्कीच स्त्रीची होती. तो पावलाच्या आवाजाने ती व्यक्ती किती दूर आहे याचा अंदाज घेत होता. त्याला भाजीचा सुगंध आला. ती स्त्री आता आपल्या पुढ्यात उभी आहे अशी त्याची खातरी पटली. त्याने खाली बघतच आपल्या दोन्ही हाताने कान धरले. ती स्त्री निघून गेली. त्याने ताटातून हात फिरवला. त्यात भाजी नव्हती.
“भाजी” त्याने विचारले. बाजूला बसलेला मित्र हसला. मग मित्रानेच जोरात आवाज दिला.
“ओ मावशी, त्यांना भाजी वाढा.”
“भाजी हवी होय? त्यांनी कानावर हात ठेवले, तर मला वाटलं भाजी नको की काय.” मग तोही हसला.
खिडकीतून हा प्रकार बघून तीही हसली. तिच्या मनाने केव्हाच माफ केले होते. त्या दिवशी मावशींचा पोळ्यांचा हिशेब चुकला होता, पण तिचे लक्ष होते. तिचा हिशेब चुकत नाही. तेच सांगायला ती तिथे आली होती. आणि तो चिडला.

एक पोपट आणि त्याची लांब लाल चोच..
आत्याबाई चित्र बघत होत्या. रोज मोबाइल वापरून दोघी एकमेकींशी भरपूर गप्पा मारायच्या. आज खेळाचा दिवस होता. म्हणजे मोबाइल न वापरता बोलायचे. जे बोलायचे, विचारायचे ते खुणेनेच.
“हा पोपट तुला कुठे दिसला आज?” आत्याबाईंनी खुणेने विचारले. हे तसे सोपे होते.
ती हसली. तिने हाताचे तळवे छातीजवळ उभे धरले. दोन तळव्यात काही अंतर होते. मग दोन्ही तळवे वर मानेपर्यंत नेऊन ते दोन विरुद्ध बाजूला नेले. सुरुवातीला आत्याबाईला कळले नाही. तिने परत तसेच केले, पण आता थोडे हळू केले.
“झाडावर.” तिने लगेच थम्सअप केले.
“पोपटाची चोच एवढी लांब?” आत्याबाई हळूच पुटपुटल्या.
तिने चोचीकडे बोट दाखवले. मग दोन बोटे कैचीसारखी केली.
“अच्छा! मोठी चोच कापली” आत्याबाईंनी चोचीकडे बोट दाखवले, मिशीची खूण करीत विचारले.
“चोच माणसाची की पोपटाची?” दोघीही हसल्या.

आता तोही चार शब्द शिकला होता. आल्याआल्याच कपाळाजवळ हात नेऊन ‘हाय’ करीत होता. ती वाढायला आली की मानेजजवळ हात नेऊन, तो हात परत वर करीत न उच्चारता ‘थँक यू’ म्हणत होता. तर कधी अंगठा आणि तर्जनी जोडून जेवण छान झाले हे सांगत होता. त्याचे चुकले तरी ते तिला कळत होते. त्याने तिची रीतसर माफी मागितली, कान धरून तिला सॉरी म्हटले. तिचे लक्ष होते ती जवळ येताच त्याच्या मित्राने चिमटा काढला ते. मित्र जवळ नसला की त्याची पंचाईत व्हायची.
तो सार्‍यांनाच खुणेनेच ‘थँक यू’ म्हणायचा. कधी कधी आपण चुकीच्या माणसाला ‘थँक यू’ म्हणतोय, हे त्याला कळले तरीही तो ‘थँक यू’ म्हणायचा. तिला मात्र मजा येत होती. पण तिला त्याच्याशी बोलायचे होते. त्याला तिची ओळख पटल्याशिवाय ते शक्य नव्हते. ती त्याच्या टेबलवर बोटाने टिकटिक करत होती. त्याला कधी कळायचे, कधी कळत नव्हते. ओळख पटायला म्हणून तिने गुलाबाचे फूलही डोक्यात माळले. काही फायदा झाला नाही, कारण गुलाबाला वासच नाही. मग तिने मोगर्‍याची वेणी डोक्यात माळली. हा उपाय कामी आला. मोगर्‍याच्या वासाची आणि मित्राने घेतलेल्या चिमट्याची त्याला सांगड घालता आली. आता तो मित्राच्या मदतीशिवाय तिला ओळखू शकत होता. तिची ओळख पटताच तो तिला ‘हाय’, ‘थँक यू’, ‘छान’ करत होता. एक दिवस तो एकटाच होता. मित्र सोबत नव्हता. तिने मुद्दामच मेसमधल्या मावशींना मोगर्‍याची वेणी माळायला दिली. तो आला. मावशींनी प्लेट लावली. त्याने नेहमीप्रमाणे सॅल्यूटसारखा हात करून ‘हाय’ केले.
“बरं बरं, जय हिंद, जय हिंद” मावशी भांबावून काहीतरी बोलल्या.
“त्याच काय चुकलं मावशी, तू चालतेच तशी मिलिट्रीच्या हापिसरसारखी. कोणीबी सॅल्युट ठोकंल.” आत सार्‍या बाया हसल्या. तीही हसण्यात सामील झाली. हळूहळू ओळख पटली. मित्राने केलेला इशारा, मोगरा, तिने टेबलवर बोटाने केलेली टिकटिक, पायातल्या चाळांचा आवाज या सार्‍यांमुळे तो आता तिच्या पावलांचा आवाज ओळखू शकत होता. तिला ओळखण्यात आता त्याची अजिबात गल्लत होत नव्हती. कधी त्याच्या पोळीवर तूप जास्त असायचे, तर कधी एक वाटी ताक जास्त मिळायचे. तो फक्त हात मानेजवळ नेऊन वर नेत न उच्चारता ‘थँक यू’ म्हणत होता. तीही ब्रेल शिकत होती.
ती चमचा घेऊन पोळीवर काही कोरायला लागली की मेसमधल्या मावशी हसायच्या. तिने वाढलेल्या पोळीवरून तो हात फिरवायचा, हलकेच स्मित करायचा. खरे तर त्याला काहीच अर्थ लागत नव्हता.

आज गणपतीची मिरवणूक होती. बाहेर ढोल-ताशे वाजत होते. बँड वाजत होते. फटाके फुटत होते. हातात भगवा झेंडा घेऊन नाच चालला होता. पांढराशुभ्र कुर्ता-पायजामा आणि त्यावर भगव्या रंगाचा फेटा किंवा ओढणी घेऊन लेझीमचे तालबद्ध नृत्य चालले होते. आभाळात रंगांची उधळण होत होती. आज आवाज आणि रंग एकमेकात मिसळले होते. तो आज एकटाच आला होता.

ती आली, तेव्हा वाड्यात कुणीच नव्हते, गणपतीची मिरवणूक म्हणून आत्याबाईंनी सुट्टी दिली होती. काहींचे डबे आत्याबाईंनी पाठवले होते. त्याचाही डबा पाठवला होता, पण तो घरी न जाताच सरळ इकडे आला होता. आज आतला आवाज कसा नाही? ताटांचा आवाज नाही की वाट्यांचा नाही. तो आत आला. आपली जागा चुकली तर नाही? अंगणातला तो पलंग तसाच होता. तो आणखीन काही पावले चालला. पायर्‍या लागल्या. नाही, जागा तर बरोबर आहे. तो पायर्‍या चढून जेवणाच्या टेबलवर बसला. आज नेहमीचा आवाज, गोंगाट का नाही? भांड्याचा आवाज नाही, की आत्याबाईचा आवाज नाही की टीव्हीचा आवाज नाही. आज फक्त ऐकू येतोय तो तिच्या पावलांचा आवाज आणि बाहेरील मिरवणुकीचा आवाज. त्याचे ताट आले. त्याने कपाळाजवळ हात नेऊन हाय केले. तिचे लक्षच नव्हते. आज मेस बंद आहे, तर मग हा कसा आला? कसे बोलू मी याच्याशी? रोज मेसमधला गोंधळ होता, मावशी होत्या, त्याचा मित्र होता. त्या गर्दीचा, गोंगाटाचा कुठेतरी आधार होता. आज तर दोघेच.
“आज फुल थाळी..” तो म्हणाला. तिने राइस प्लेट लावली. भराभर तीन पोळ्या वाढल्या. त्याने रोजच्यासारखा आजही प्रत्येक पोळीवरून हात फिरविला. हलके स्मित केले. न बोलता थँक्यू म्हटले.
“अजून एक पोळी.” तो बोलला. पण पोळी संपायच्या आतच तिने भात वाढला.
“आजही राइस प्लेटच तर..”
तो पायर्‍या उतरून हात धुवायला बेसिनकडे गेला. रोजच जातो एकटा, सवयच झाली होती. आज अचानक तोल गेला. पाणी साचल्यामुळे की पावसामुळे जमीन ओलसर होती, त्याच्यावरून त्याचा पाय घसरला. सावरण्यासाठी त्याने गुलाबाची फांदी धरली. एका हातात काठी, तर दुसर्‍या हातात गुलाबाच्या झाडाची फांदी पकडून उभा राहिला. ती धावतच आली. त्याच्या हाताला आधार दिला. गुलाबाचे काटे हातात रुतले होते.
“थँक यू ... ओह, सॉरी” असे म्हणत त्याने खुणेने थँक यू म्हटले. त्याने हात धुतला. पलंगावर येऊन बसला. फार रक्त वगैरे नव्हते, तरी ती डेटॉल घेऊन आली. जिथे खरचटले होते, तिथे डेटॉल लावले. त्याने एक हात कानाजवळ नेत सॉरी म्हटले.
“Why?” तिने डेटॉलच्या कापसानेच त्याच्या हातावर लिहिले.
“गुलाब तुटला.” त्याने गुलाबाच्या झाडाच्या दिशेने बोट दाखवून दोन्ही हात एकमेकावर चोळून ते सांगण्याचा प्रयत्न केला. आता याला कसे सांगू? याला कसे काही विचारू? याच्याशी कसे बोलू? ती आत्याशी रोज कशी बोलते, तसेच बोलायचे. ती टाइप करीत होती आणि मोबाइल बोलत होता.. ती मोबाइल घेऊन आली. मग तिने टाइप केले आणि मोबाइलने बोलून दाखवले.
“तुम्हाला साइन लॅग्वेज येते का?”
“नाही, थोडीशीच.” त्याने बोटाने 'थोडीशीच' सांगण्याचा प्रयत्न केला. ती हसली.
“तुम्ही सगळं चुकवता, गडबड करता.” तिने मग ‘थँक यू’ टाइप करून हात मानेजवळ नाही, तर ओठ आणि हनुवटीच्या मध्ये न्यायचा असतो, हे त्याला शिकवले.
‘हे फूल’
‘हा झाला गुलाब’
‘हा लाल गुलाब’
‘हे असे केले की झाले पांढरा गुलाब’
‘हा आता पिवळा गुलाब’
“मला सारे गुलाब सारखेच..” तो हळूच पुटपुटला. तिचे लक्ष नव्हते. ती उत्साहात वेगवेळ्या गुलाबांची नावे मोबाइलवर लिहून त्याचे हात हातात घेऊन प्रत्येक रंगाचा गुलाब कसा वेगळा दाखवायचा, हे त्याला शिकवत होती.
“ब्रेल, पोळीवर लिहीत होती, जमली? तुम्ही रोज हसत होता?”
“ते ब्रेलमध्ये होते?” तिला कळले नाही. तिने त्याच्या तोंडाजवळ फोन धरला.
“ते ब्रेलमध्ये होते? मी असाच हसत होतो.” तिला आता फोनमधले वाचायची गरज नव्हती. तिने त्याचे ओठ वाचले होते. ती जोरात हसली, तोही हसला. दोघेही हसत होते. हसता हसता सहज तिने एक हात त्याच्या हातावर ठेवला. मग त्याने आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. हा स्पर्श वेगळा होता. तिच्या अंगावर शहारा आला. ती त्याचे ओठ वाचत होती. पण ते बोलत नव्हते, डोळे काही सांगत नव्हते, पण स्पर्श बोलका होता. बाहेर अजूनही ढोल-ताशे वाजत होते, बँड वाजत होते, फटाके फुटत होते. तो फोन अजूनही होता. आता त्या फोनची, ब्रेलची, खुणेच्या भाषेची.. कशाचीही गरज नव्हती.
या आवाजात, या गोंधळात कुठेतरी संवाद रुजला होता, संवाद फुलला होता.

Image
(चित्रः प्रतिमा खडके)
.
.
*********
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

10 Nov 2015 - 2:50 pm | जगप्रवासी

छान लिहिलंय

मित्रहो's picture

10 Nov 2015 - 6:18 pm | मित्रहो

धन्यवाद

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 6:39 pm | बोका-ए-आझम

छान आहे कथा!

असंका's picture

10 Nov 2015 - 6:50 pm | असंका

फारच सुरेख!

धन्यवाद

दोन जीवांची ही कथा आवडली. वार्‍याची सुखद झुळूक आल्यासारखे वाटले. तरल आणि सुंदर!

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:39 pm | पैसा

अप्रतिम!

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2015 - 2:47 pm | मधुरा देशपांडे

सुरेख लिहिलंय. आवडली कथा.

मितान's picture

11 Nov 2015 - 3:46 pm | मितान

खूपच छान कथा !

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 4:14 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 8:20 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर कथानक.

ह्या संवेदना, त्यांचे वेगळे जग की आपल्याच जगाचे त्यांना जाणवणारे वेगळेपण? 'दृष्टी' आणि 'श्रवणशक्ती' ह्या दोन नैसर्गिक देणग्यांमुळे कित्येक गोष्टी आपण गृहीत धरतो. त्यांच्या अनुपस्थितीने आपलं जग शून्यावर येतं. सगळे संदर्भ बदलतात आणि ऩकळत आपण स्पर्श, गंध वगैरे संवेदनांमधून जग 'ऐकतो' - 'पाहतो' आणि अचानक 'त्याला' आणि 'तिला' जाणवतं की जग किती 'सुंदर' आहे.

मित्रहो's picture

11 Nov 2015 - 11:03 pm | मित्रहो

आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो आणि त्याचा योग्य वापरसुद्धा करीत नाही. बऱ्याचदा आपले संभाषण, चर्चा ह्या फक्त आवाजच असतात संवाद नाही. त्याचमुळे कथेला आवाजाची पार्श्वभूमी आहे बाहेरच्या जगात आवाजच आहे संवाद फार कमी. स्पर्श, गंध ह्या संवेदना देखील तितक्याच ताकतीच्या असतात.

एस's picture

12 Nov 2015 - 3:33 pm | एस

फारच छान लिहिलंय आपण! कथा आवडली आणि भावली!

अनुप ढेरे's picture

12 Nov 2015 - 3:25 pm | अनुप ढेरे

मस्तं लिहिलय!

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 5:42 pm | मुक्त विहारि

आवडली...

प्रदीप's picture

13 Nov 2015 - 6:12 pm | प्रदीप

कथानक तसेच लिखणाची शैली, दोन्ही आवडले.

यशोधरा's picture

13 Nov 2015 - 6:27 pm | यशोधरा

सु रे ख.

मोगा's picture

13 Nov 2015 - 6:51 pm | मोगा

गुलजारचा कोशिश सिनेमा आठवला.

अत्यंत अप्रतिम कथा. असोशीने प्रत्येक गंध आवाक्यात घेऊ पाहणारा 'परफ्युम द स्टोरी ऑव्ह मर्डरर' मधला ज्याँ बाप्टिस्ट आठवला.

पद्मावति's picture

13 Nov 2015 - 10:22 pm | पद्मावति

फारच सुरेख कथा. खूप आवडली.

सस्नेह's picture

14 Nov 2015 - 8:11 pm | सस्नेह

सुरेख भावदर्शी कथा !
वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेत.

मित्रहो's picture

14 Nov 2015 - 8:26 pm | मित्रहो

धन्यवाद स्नेहांकिता

मित्रहो's picture

14 Nov 2015 - 8:25 pm | मित्रहो

धन्यवाद जगप्रवासी, बोका-ए-आझम, कंफ्युज्ड अकौंटंट, एस, पैतै, मधुरा देशपांडे, मितान, टका, पेठकरकाका, अनुप ढेरे, मुवि, प्रदीप, यशोधरा, मोगा, अभ्या, पद्मावती. प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दृष्टी आणि आवाज नसनारे कसा संवाद साधू शकतील. फार दिवसांपासून हा विषय मनात घोळत होता. हे करीत असताना बाहेरच्या जगातील गोंधळ, गोंगाटाची पार्श्वभूमी हवी कारण बाहेर बऱ्याचदा गोंधळच असतो संवाद नाही. रुची, गंध आणि स्पर्श या संवेदना आणि गोंधळ अशा जागा म्हणजे गर्दीची रेस्टॉरेंट, मेस. रेस्टॉरेंट मधे रोज कुणी मुलगी का येइल म्हणून मेस हे स्थान निवडले. मी बॅचलर असताना नगरला एका वाड्यातल्या मेसमधे जेवायला जायचो, कथेतल्या बऱ्याच गोष्टी तिथल्याच. कथेत उगाचच कारुण्य वगेरे नको तर तुम्हा आम्हा सारखेच सारे त्यांच्या समस्या त्यांच्या पद्धीतीने सोडवतात यावरच भर द्यायचा प्रयत्न केला. गंध, रुची, स्पर्श या संवेदनांनी संवाद साधता येतो. कथेची लांबी जास्त होत होती म्हणून रुची विषयीचा भाग कमी केला.
मिपाच्या संपादक मंडळाने कथेत काही सूक्ष्म बदल करुन कथेला सुरेख सादर केले. मिपा संपादक मंडळाचे आभार. एस यांनी उत्तम सुलेखन तर प्रतिमा खडके यांचे चित्र म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का होता. एस, प्रतिमा खडके मनःपूर्वक आभार.

आतिवास's picture

14 Nov 2015 - 9:23 pm | आतिवास

वेगळ्या विषयावरची वाचनीय कथा. आवडली.

बॅटमॅन's picture

14 Nov 2015 - 9:28 pm | बॅटमॅन

सुर्रेख!!!!

रातराणी's picture

14 Nov 2015 - 9:54 pm | रातराणी

खूप सुरेख कथा! आवडली!

नूतन सावंत's picture

15 Nov 2015 - 2:14 pm | नूतन सावंत

दोन जीव,ज्यांच्याकडे एकेका इंडियाची उणीव कसे दूर करू शकतात,याचा प्रत्यय देणारी कथा.आवडली.

नूतन सावंत's picture

15 Nov 2015 - 2:14 pm | नूतन सावंत

कृपया इंद्रियाची असे वाचावे.

नाखु's picture

21 Nov 2015 - 4:18 pm | नाखु

आणि संजीवकुमारचा कोशीश आठवला !!!

अत्यंत ओघवती आणि चित्रदर्शी शैली बद्दल +१११

स्वाती दिनेश's picture

22 Nov 2015 - 6:32 pm | स्वाती दिनेश

गोष्ट आवडली,
स्वाती

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 11:09 am | नीलमोहर

खूप सुंदर कथा..
कथा आधीच वाचली होती मात्र प्रतिसाद द्यायचे राहून गेले.

भिंगरी's picture

23 Nov 2015 - 12:05 pm | भिंगरी

सुंदर तरल कथा.