"ह्युस्टन, वुई हॅव अ प्रॉब्लेम.." नासाच्या ह्युस्टन येथील नियंत्रण कक्षात मिळालेला हा संदेश पृथ्वीपासून दोन लाख पाच हजार मैल दूर पोहोचलेल्या, मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या नासाच्या तिसर्या मोहिमेतील अपोलो-१३ या चांद्रयानातून आला होता. हे यान केनेडी स्पेस सेंटर लाँच कॉम्प्लेक्सवरून ११ एप्रिल, १९७० या दिवशी स्थानिक वेळेप्रमाणे १३.१३ वाजता चंद्रावर जाण्यासाठी झेपावले होते. आतापर्यंत अंगवळणी पडलेल्या कार्यपद्धतीनुसार सर्व काही सुरळीत चालले होते. नियंत्रण कक्षातील कॅप्टन ज्यो केर्वीनने प्रतिक्रियादेखील दिली होती - "यान अगदी उत्तम स्थितीत आहे, सर्व काही सुरळीत आहे. खरे तर येथे पडद्यावर नुसतेच पाहत बसणे आता कंटाळवाणे वाटू लागले आहे." हे त्याचे उद्गार होते उड्डाणानंतर ४३ तास ४२ मिनिटांचे. या मोहिमेसंबंधी अशा प्रकारचे उद्गार काढणारा तो शेवटचा इसम ठरला, कारण त्यानंतर केवळ १३ मिनिटांनी अशा काही घटना घडल्या की कंटाळा आला असे म्हणण्याची वेळ आज ४५ वर्षे उलटून गेली तरी कोणावरही आली नाही. एवढेच नव्हे, तर या मोहिमेसंबंधित हजारो व्यक्तींना पुढील काही दिवस श्वासही घ्यायला वेळ मिळू नये अशा थरारक आणि प्रचंड तणावाखाली रात्रंदिवस विविध घटनांची एक मालिकाच या संदेशाबरोबरच सुरू झाली होती.
२० जुलै, १९६९ रोजी अपोलो-११मधून चंद्रावर उतरून नील आर्मस्ट्राँगने मानवाचा चांद्रविजय साजरा केला आणि मानवाला चंद्रावर पोहोचवण्याची शर्यंत अमेरिकेने जिंकली. मानवाला चंद्रावर उतरवण्याची नासाची दुसरी मोहीमदेखील नोव्हेंबर, १९६९मध्ये यशस्वी झाली होती. अपोलो-१३, ११ एप्रिल, १९७०ला मानवाला चंद्रावर पोहोचवण्याच्या मोहिमेवर निघाले. केवळ नऊ महिन्यात आलेल्या तिसर्या मोहिमेमुळे सर्वसामान्यांमध्ये फारसा उत्साह उरला नव्हता. दूरचित्रवाणीवरदेखील यानाच्या प्रक्षेपणाचे आधीप्रमाणे थेट प्रक्षेपण केले गेले नव्हते. उड्डाणाच्या वेळी काही किरकोळ समस्या आल्या, पण त्या काही फारशा गंभीर नव्हत्या. प्रत्येक मोहिमेत अशा काही असाधारण बाबी घडतच असतात. इतर यशस्वी मोहिमांच्या तुलनेत अपोलो-१३चा आतापर्यंतचा प्रवास सर्वाधिक सहज आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होता. त्यामुळे नासामध्ये फारसे गंभीर वातावरण नव्हते.
ओपोलो-१३चे दोन भाग होते - ओडिसी आणि अॅक्वेरिअस. ओडिसी मुख्य यान होते. याला कमांड मॉड्युल आणि अॅक्वेरिअसला ल्युनार मॉड्युल अशी त्यांची वापरातली नावे होती. मूळ कार्यक्रमाप्रमाणे अपोलो-१३ चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ल्युनार मॉड्युल मुख्य यानापासून वेगळे होऊन दोन अंतराळयात्रींना घेऊन चंद्राच्या भूमीवर उतरणार होते. त्या वेळी कमांड मोड्युल ओडिसी चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत राहणार होते.
"आम्ही अपोलो-१३च्या ल्युनार मोड्यूल अॅक्वेरिअसचे नियमित निरीक्षण संपवून पुन्हा या मोहिमेच्या मुख्य यानात ओडिसीमध्ये परतत आहोत. आम्हा सर्वांकडून पृथ्वीवासीयांना शुभरजनी." मोहिमेचा कप्तान लॉवेल ४९ मिनिटांच्या दूरचित्रवाणीवरील चांद्रमोहिमेचा थेट कार्यक्रम कार्यक्रम संपवताना म्हणाला. अपोलो-१३चे ४५ तास संपत आले होते. पायलट लॉवेल वजनरहित अवस्थेत सहज वावरत होता. साहजिकच होते, कारण १९६२मध्ये नासाचा अंतराळवीर म्हणून निवड झाल्यापासून तो अंतराळात चौथ्यांदा जात होता. त्याची ही दुसरी चांद्रमोहीम होती. अपोलो-८ या पायलट असणार्या पहिल्या मोहिमेत मुख्य यानाचा पायलट होता. अपोलो मोहिमा या नासाच्या चंद्रावर मानव पाठवण्याच्या मोहिमा होत्या. त्यापूर्वी अंतराळवीरांना आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षातील तंत्रज्ञांना प्रशिक्षित करण्यासाठी 'जेमिनी'च्या मोहिमांची आखणी करण्यात आली होती, त्या वेळीदेखील जिम लॉवेल दोन मोहिमांमध्ये सहभागी होऊन अंतराळाची सफर करून आला होता. त्या काळी चार वेळा अंतराळात जाणारा लॉवेल हा एकमेव माणूस होता. दुसरा होता जॉन स्विंगर्ट. तो खरे तर ओपोलो-१३च्या राखीव सदस्यांपैकी एक होता, परंतु कमांड मॉड्युलचा नियोजित पायलट मेटिंग्ले आरोग्यविषयक तपासणीत अयोग्य ठरल्यामुळे जिम लॉवेल प्रत्यक्ष मोहिमेवर जाणार्या संघात सामील झाला. या संघाचा तिसरा सदस्य होता फ्रेड हैस ल्युनार मोड्यूल पायलट.
उड्डाण होऊन आता ५५ तास ५२ मिनिटे उलटली होती. त्याच वेळी कमांड मोड्यूलच्या एक क्रमांकाच्या ऑक्सिजन टाकीतील दाब अत्यंत कमी झाल्याची सूचना देणारा दिवा प्रज्वलित झाला. हा दोष दूर करण्यासाठी ह्युस्टनने दिलेल्या सूचनांचे पालन करीत असतानाच ५५ तास ५४ मिनिटांनी अपोलो-१३चा विद्युतपुरवठा अचानक बंद झाला. जवळपास त्याच वेळी अंतराळयानातील चारही सदस्यांनी मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला. अंतराळयानावर कदाचित एखादी अशनी येऊन आदळली असावी, अशीच त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. तेव्हा पृथ्वीवर नियंत्रण कक्षात १३ एप्रिलचे २१.०८ वाजले होते. पुढच्याच क्षणी ओपोलो-१३ला विद्युत ऊर्जा पुरवणार्या तीन बॅटर्यांपैकी दोन बंद झाल्याचा धोक्याचा इशारा देणारा दिवा लागला. क्रमांक एकची ऑक्सिजनची टाकी पूर्णपणे रिकामी झाल्याचे, तर दुसरी टाकी वेगाने रिकामी होता असल्याचे वर्तमान दर्शवणारा दिवाही त्यापाठोपाठ प्रज्वलित झाला होता. या स्फोटानंतर १३ मिनिटांनंतर डाव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहताच, घडणार्या विनाशकारी घटनेची चाहूल लागली. "ह्युस्टन.. आमच्या यानातून काहीतरी, बहुधा ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे." दुसरी आणि शेवटची ऑक्सिजनची टाकी वेगाने रिकामी होत होती! एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी, त्याप्रमाणे यानातील सर्वांनीच कमांड मॉड्युल आणि ल्युनार मॉड्युल यांना जोडणारा दरवाजा बंद करायचा प्रयत्न केला. मात्र ताकद लावूनही हा दरवाजा बंद होत नाही, हे पाहून ही वायुगळती यानाच्या आतील भागातून होत नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी दरवाजा बंद करण्याचे प्रयत्न सोडून दिले. या वेळेपर्यंत नक्की काय घडले याचा अंदाज आला नव्हता. काही महिन्यांनंतर झालेल्या तपासणीमध्ये आढळून आले की ऑक्सिजनच्या दुसर्या नंबरच्या टाकीत झालेल्या स्फोटामुळे एक नंबरच्या टाकीला तडे गेले असावेत किंवा तिचा एखादा व्हॉल्व निकामी झाला असावा. ऑक्सिजनची टाकी ज्या वेगाने रिकामी होत होती, त्यावरून लवकरच अपोलो-१३चा ऑक्सिजनचा साठा पूर्णपणे नष्ट होऊन शेवटची उरलेली बॅटरी आणि मिळणारी विद्युत ऊर्जाही बंद होणार, हे स्पष्टच दिसत होते. विद्युत पुरवठा बंद होणर म्हणजे सर्वनाशच. सर्वच जीवनावश्यक आणि तांत्रिक घटना याच उर्जेवर अवलंबून होत्या.
अपोलो-१३ वर काहीतरी विपरीत घडले आहे. अशी बातमी कळतांच त्यावेळी कामावर नसलेले सर्व फ्लाईट कंट्रोलर, यानाशी संबंधीत सर्व कार्यप्रणाली रचना कारणारे तंत्रज्ञ आवश्यकता भासेल म्हणून नियंत्रण कक्षात पोहोचले, नासाचे इतर अधिकारी अहोरात्र कार्यालयात थांबून राहिले, यानासाठी विविध कार्यप्रणाली बनवणारे कंत्राटदार, त्यांचे अधिकारी देशभरातील आपापल्या कार्यालयातून नासाच्या संपर्कात होते. नासाचे अंतराळवीर कमांड मोड्यूल आणि ल्युनार मोड्यूल च्या प्रतिकृती असलेल्या यानात वेगेवेगळ्या योजनांचे प्रात्यक्षिक करीत होते. देशभरात वेगवेगळ्या कारणांनी अपोलोशी संबंधित असणारे हजारो लोक अहोरात्र कार्यरत होते. अंतराळयात्रींना सुखरूप घरी घेऊन येण्याच्या विविध योजना बनवत होते. ओपोलो-१३ प्रकल्पाचे सर्व संचालक ही ऐनवेळी घ्याव्या लागणार्या निर्णयासाठी नियंत्रण कक्षात हजर होते.
स्फोटानंतर १ तास २९ मिनिटांनी अपोलो-१३ प्रकल्पाचे संचालक ग्लेन ल्युनी आणि, ह्युस्टन नियंत्रण कक्षातील अधिकार्यांनी अपोलो-१३शी संपर्क साधून कळवले की लाईफ बोट म्हणून ल्युनार मोड्युलचाच उपयोग करावा, असा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. यावर आम्हीही असाच विचार करीत आहोत असे म्हणून स्विगर्टनेही सहमती दर्शवली.
अंतराळयात्री आता चंद्रावर उतरणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. अपोलो-१३ ही मोहीम अयशस्वी ठरली होती. चांद्रमोहिमेवर असणार्या अंतराळवीरांसाठी आता एक अभूतपूर्व बचाव मोहीम सुरू झाली होती.
ल्युनार मॉड्युलचा लाईफ बोटप्रमाणे उपयोग करण्याचा विचार करणे आणि तो विचार प्रत्यक्षात आणणे ही एक मोठीच आव्हानात्मक कामगिरी होती. अणीबाणीच्या स्थितीत अंतराळयात्रींची अशा प्रकारे सुटका करून त्यांना पृथ्वीवर घेऊन येण्याच्या योजनेचा यापूर्वी कधीच विचार केला नव्हता. एक संपूर्ण नवीन, सुरक्षित योजना बनवून तिच्या यशासंबंधीच्या शक्यता, संगणकामध्ये तशी परिस्थिती निर्माण करून ही योजना तपासून पाहणे, अशा प्रकारे परीक्षणामधून सिद्ध झालेली तपशीलवार योजना लाखो मैल दूर असणार्या अंतराळयात्रींपर्यंत अचूकपणे पोहोचवणे ही १९७० मध्ये तितकी सोपी गोष्ट नव्हती.
सर्वात पहिला प्रश्न होता यानाला योग्य दिशा देण्याचा. ल्युनार मॉड्युल चंद्रापासून पृथ्वीपर्यंतच्या प्रवासासाठी तयार केलेले नव्हते. चंद्राच्या कक्षेत यान पोहोचल्यानंतर मुख्य यानापासून वेगळे होऊन दोन अंतराळयात्रींना चंद्राच्या भूमीपर्यंत पोहोचवून पुन्हा तेथेच फिरत असलेल्या मुख्य यानापर्यंत परत घेऊन येणे, एवढ्याच मर्यादित कामासाठी ल्युनार मॉड्युलचा उपयोग करण्यात येणार होता. त्यामुळे त्यामध्ये दिशादर्शक यंत्रणा नव्हती. तेवढाच मोठा आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे यानाची दिशा बदलल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने यानाला वळवण्यासाठी हा प्रवास सुरू करण्यासाठी ल्युनार मॉड्युलच्या इंजीनाचे प्रज्वलन करणे आवश्यक होते. नक्की कधी, कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे हे प्रज्वलन करावे हा जीवन-मरणाचा प्रश्न होता. 'टाईम'मध्ये त्या वेळच्या बातमीत लिहिल्याप्रमाणे यामध्ये जरादेखील चूक झाली असती, तर अपोलो-१३ पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यापासून २९५१ मैल दूर राहून अंतराळात अनंत काळासाठी भरकटले असते.
जाणार्या प्रत्येक क्षणाला कमांड मॉड्युलमधील परिस्थिती गंभीर बनत चालली होती. शेवटी १५ मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहिला असताना जमिनीवरील नियंत्रण कक्षाने मुख्य यानाचा भाग असलेला कमांड मॉड्युल सोडून सर्वांना ल्युनार मॉड्युलकडे जाण्याचे आदेश दिले. लॉवेल आणि हेस तिकडे जाण्यास निघाले. जेकने कमांड मॉड्युल सोडण्यापूर्वीच्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सुरुवात केली.
ल्युनार मॉड्युलमध्ये प्रवेश करताच आ वासून असणारा आणखी एक प्रश्न वाट पाहत होता. परतीच्या प्रवासासाठी आवश्यक साधनसामग्री कितपत पुरेशी ठरेल? येथील व्यवथा दोन व्यक्तींसाठी ४५ तासांसाठीची होती. आता मात्र किमान ९० तास तीन व्यक्ती राहणार होत्या. सुदैवाने येथे ऑक्सिजनची समस्या नव्हती. ल्युनार मॉड्युलच्या टाकीत आणि राखीव साठा विचारात घेता ऑक्सिजन पुरेसा होता.
विद्युत ऊर्जेबाबत मात्र परिस्थिती तेवढी आशादायक नव्हती. विविध आवश्यक कार्यप्रणाली सुरू राहण्यासाठी, यानाला पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध ऊर्जा योग्य नियोजन करून वापरणे गरजेचे होते. उपलब्ध ऊर्जेचा काटकसरीने वापर करण्यासाठी, अत्यावश्यक असणार्या उपकरणांशिवाय इतर सर्व उपकरणे बंद करण्यात आली. विजेचा अपव्यय या ठिकाणी प्राणघातक ठरणार होता. या काटेकोर नियोजनामुळे एकूण ऊर्जेच्या वापरापैकी २० टक्के ऊर्जा वाचवता आली आणि यान परत पृथ्वीवर येण्यासाठी तेवढी बचत पुरेशी ठरेल असे आकडेवारीने सिद्ध केले.
त्यानंतर प्रश्न पाण्याचा साठा. परतीच्या प्रवासाचे नियोजन चालू होते, त्यानुसार हा सुमारे १५१ तासांचा प्रवास होईल अशी शक्यता होती. विविध यंत्रणा कार्यक्षम राहण्यासाठी, यानातील चौघांना पिण्यासाठी उपलब्ध साठ्याचा विचार करता शेवटचे सात ते आठ पाण्याविना जाणार होते. काही अत्यावश्यक नसल्या, तरी आवश्यक मानल्या गेलेल्या यंत्रणांना त्या काळात पाणी मिळणार नव्हते. एवढे करूनही पाण्याच्या वापरावर २० टक्के कपात करण्यात आली.
कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन हीदेखील मोठी समस्या बनली होती. ल्युनार मॉडुलच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती अनेक तास जास्त वेळेपर्यंत तेथे राहिल्यामुळे या वायूने धोकादायक पातळी ओलांडली. जमिनीवरील नियंत्रण कक्षाने तत्काळ या विषयातील अनुववी व्यक्तींचा सल्ला घेऊन यात उपलब्ध असणार्या प्लास्टिकच्या पिशव्या, पुठ्ठ्यांची खोकी यांचा वापर करून, कार्बन डाय ऑक्साईड बंद केलेल्या कमांड मॉड्युलमध्ये सोडण्यासाठी उपकरण बनवण्याची कृती सांगितली आणि याही अडथळ्यातून पार होण्याचा रस्ता मिळवला.
तरीही महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता - 'घरचा रस्ता धरायचा कसा?' ल्युनार मॉड्युलमध्ये पृथ्वीचे दिशादर्शन करण्याची व्यवस्था नव्हती. अपोलो-१३ने स्फोट होण्यापूर्वी ३० तास ४० मिनिटांपूर्वी इंजीन प्रज्वलित करून चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणारी आणि चंद्रावर इच्छित ठिकाणी उतरवणारी कक्षा धरलेली होती. त्यामुळे कोणत्याही दिशादर्शक उपकरणाच्या मदतीशिवाय पुन्हा पृथ्वीची अचूक दिशा कशी प्राप्त करायची? मूळ संगणकाशी निगडित टेलिस्कोपच्या बाहेरील भागावर स्फोटाच्या वेळी जमा झालेल्या अवशेषांमुळे दिशादर्शक तार्यांद्वारे माग काढताना अडथळे येत होते. त्यामुळे जमिनीवरील नियंत्रण कक्षाने सूर्याला केंद्रभागी धरून दिशा निश्चित करायची सूचना दिली. ह्युस्टन नियंत्रण कक्षातून मिळालेल्या सूचनांचे पालन करीत लॉवेलने यानाची दिशा वळवली, आपल्या टेलिस्कोपमध्ये पाहिले आणि... आणि .. त्याला सूर्य दिसला!
स्फोटानंतर पाच तास झाले होते. ह्युस्टनने मांडलेल्या हिशेबानुसार ३५ सेकंदांसाठी इंजीन प्रज्वलित केले. ओपोलो-१३ आता चंद्राजवळ पोहोचले होते. नियोजित कार्यक्रमानुसार येथून चंद्रावर उतरून त्या वेळी प्रत्येक अंतराळवीर पाहत असलेले स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण ठरला असता. आता मात्र अपोलो-१३ तेथून वळसा घेणार होते. तिघेही जण जण आपल्या स्वप्नपूर्तीपासून दूर जाणार होते.
चंद्राच्या सुदूर टोकाला वळसा घातल्यानंतर पुन्हा एकदा आकडेवारीनुसार ५ मिनिटांसाठी इंजीन प्रज्वलित करण्यात आले. अपोलो-१३चा अनोखा प्रवास आता पृथ्वीच्या दिशेने सुरू झाला होता.
अपोलो-१३चा प्रवास
एक एक करीत महत्त्वाचे अनेक अडथळे पार केल्यानंतर परतीचा प्रवास कधी आणि कसा संपवला जाणार, हाही एक कळीचा मुद्दा होता. मूळ कार्यक्रमानुसार अपोलो-१३ प्रक्षेपणापासून १५५ तासांनंतर पुन्हा जमिनीवर उतरणार होते. परंतु आता परिस्थिती संपूर्णपणे बदलली होती. निर्माण झालेली अणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता परतीच्या प्रवासाचा वेळ कमीत कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मध्य पॅसिफिक महासागरात यान उतरवण्याच्या आणखी तीन पर्यायांचा विचार केला गेला. यामुळे संपूर्ण प्रवासाचा वेळ १५५ तासांवरून ११८ तासांपर्यंत घटणार होता. पाचव्या योजनेप्रमाणे यान दक्षिण अटलांटिकमध्ये उतरवल्यास प्रवास १३३ तासांचा होणार होता. वेगवेगळ्या कारणांनी एक एक पर्याय बंद होत गेला. मूळ योजनेप्रमाणे यान उतरवताना ल्युनार मॉड्युल कशा प्रकारे कार्य करेल याबद्दल साशंकता असल्याने हा पर्याय रद्द झाला. समुद्रातून यान आणि यात्रींना बाहेर घेऊन येणार्या जहाजांना मध्य पॅसिफिक भागात सज्ज ठेवले होते. तेथून त्याना दूरवर पाठवणे अथवा इतर काही बदली योजना तयार करणे यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. ११८ तासांत परत येणार्या पर्यायामध्ये काही तांत्रिक समस्यांमुळे ल्युनार मॉड्युल पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना काही समस्या निर्माण होण्याची भीती तंत्रज्ञ व्यक्त करीत होते. अखेर साडेपाच तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रकल्प संचालकांनी नासाचे अधिकारी आणि विविध संबंधित यांच्यासमोर आपली योजना मांडली. पूर्वनियोजित वेळेच्या १० तास आधी इंजीन प्रज्वलित करून १४३ तासांच्या प्रवासानंतर मध्य पॅसिफिक समुद्रात या नाट्यावर पडदा पडणार होता.
हे सर्व सुरू असताना, तिकडे ल्युनार मॉड्युलमधील परतीचा प्रवास सुखकारक नव्हता. अन्नपाण्याचा तुटवडा होता, विजेच्या बचतीसाठी केलेल्या उपायांमुळे ल्युनार मॉड्युल गरम ठेवणारी उपकरणे बंद ठेवली गेली होती, त्यामुळे अतिशय थंड झालेल्या यानातूनच हा प्रवास पार पडला. याचा अंतराळयात्रींच्या शारीरिक क्षमतांवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती.
परतीची योजना निश्चित झाल्यानंतर संपूर्ण घटनाक्रमाची आखणी केली गेली. इंजीनाचे शेवटचे प्रज्वलन ल्युनार मॉड्युलमधून केले जाणे आवश्यक होते. त्यासाठी कमांड मोड्युल पुन्हा सुरू करून तेथील यंत्रणा ल्युनार मोड्युलला जोडली जाणे आवश्यक होते. ही सर्व तयारी झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत येताना अडथळा ठरू शकणारी कमांड मॉड्युल, ल्युनार मॉड्युलपासून वेगळी करून सोडून द्यायची होती. या सर्व घडामोडीत ल्युनार मॉड्युलच्या बॅटरीपासून मिळणार्या ऊर्जेला असलेली वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ३५ तासांचा संपूर्ण घटनाक्रम तपशीलवार तयार केला गेला. नासाच्या यानाच्या प्रतिकृतीमध्ये त्यांच्या चाचण्या घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्या करून प्रवेशाच्या १५ तास आधी सर्व अंतराळयात्रींना सुधारित कार्यक्रम देण्यात आला. हा कार्यक्रम समजून घेऊन पूर्वतयारी व पूर्वाभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला.
अखेर पृथ्वीवर प्रवेश करण्याच्या चार तास आधी ल्युनार मोड्युलपासून कमांड मोड्युल वेगळे करून त्याला अंतराळयात्रींनी निरोप दिला. "फेअरवेल ओडिसी, वुई थेंक यू" हे शब्द होते पायलट लॉवेलचे.
क्षतिग्रस्त कमांड मोड्युल
१४२ तास ४० मिनिटांचा प्रवास करून यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि ते १४२ तास ५४ मिनिटांनी १३.०७ वाजता मध्य पॅसिफिक समुद्रात नियोजित ठिकाणाहून केवळ ८०० यार्ड दूर उतरले. त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या यू.एस. नौदलाच्या 'इवो जिमा' या जहाजापासून केवळ ४ मैल दूर असलेल्या सैनिकांनी पुढील काही वेळातच त्यांना 'इवो जिमा'वर आणले. यान समुद्रात उतरताच ४५ मिनिटांत त्यांना शोधून यानातून बाहेर काढण्यात आले होते. अमेरिकने तोपर्यंत अंतराळात २३ मोहिमांमध्ये पाठवलेल्या अंतरळवीरांना शोधून बाहेर काढण्यासाठी लागलेला हा सर्वात कमी वेळ होता.
अपोलो-१३चे आगमन
यथावकाश आलेल्या अहवालात, सदोष ऑक्सिजन टाकीच या अपघाताला कारणीभूत होती, असा निष्कर्ष काढण्यात आला.
चंद्रावर अपोलो-१३ पोहोचू शकले नाही म्हणून ही मोहीम 'फेल्युअर' तर ठरलीच, परंतु इतिहासात कधीही न झालेल्या अंतराळातून अंतराळवीरांच्या यशस्वी सुखरूप सुटकेमुळे 'सक्सेसफुल'ही ठरली, हेही तितकेच खरे.
.
.
सुटका करणारे कर्मचारी अपोलो-१३ वर दाखल
.
.
.
अपोलो-१३ ची समुद्रातून सुटका
.
.
(हा लेख कोणत्याही लेखाचे भाषांतर नाही. विविध लेख, अहवाल, टाईम, डेली न्यूज या वर्तमानपत्रांतील लेख यांच्या वाचनातून समजलेल्या घटनेचे वर्णन आहे.)
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 11:16 am | मनिम्याऊ
मस्त. थरारक...
10 Nov 2015 - 11:43 am | तुषार काळभोर
रोमांचक!!
10 Nov 2015 - 11:10 pm | पैसा
थरारक सुटका!
11 Nov 2015 - 11:20 pm | हरीहर
लेख आवडला. याच विषयावरचा चित्रपट पाहिल्याचे आठवते.
12 Nov 2015 - 10:24 pm | लाल टोपी
जिम लॉवेलच्या 'दि लॉस्ट मून' या पुस्तकावर आधारीत 'अपोलो-१३' याच नावाने चित्रपट निघाला आहे.
11 Nov 2015 - 11:49 pm | प्रचेतस
जबरदस्त लेख.
12 Nov 2015 - 1:59 am | फेरफटका
लेखात अनेक ठिकाणी यानातले चार जण असा उल्लेख आला आहे. यानात तीनच अॅस्टोनॉट्स होते. तेव्हढी दुरुस्ती कराल का?
12 Nov 2015 - 10:22 pm | लाल टोपी
तुम्ही म्हणता तशी चूक दोन ठिकाणी राहून गेली आहे. पहातो काही करता येते का? सुचनेबद्दल धन्यवाद.
12 Nov 2015 - 7:29 am | गवि
जबरदस्त..
12 Nov 2015 - 8:34 pm | चाणक्य
थरारक.
12 Nov 2015 - 9:22 pm | मोदक
थरारक लेख. सुंदर वर्णन.
12 Nov 2015 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त !
12 Nov 2015 - 10:04 pm | टवाळ कार्टा
थरारक....
12 Nov 2015 - 10:07 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
12 Nov 2015 - 11:29 pm | एस
तांत्रिकदृष्ट्या हे किती किचकट आणि तणावाचे काम असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो!
13 Nov 2015 - 1:07 am | उगा काहितरीच
सहमत ! लेख अप्रतिम झालाय हेवेसांनलगे .
16 Nov 2015 - 11:16 am | प्रभाकर पेठकर
साध्या विमानप्रवासात देखिल विमानाने जमिन सोडून आकाशात उड्डाण केले की आता आपले भवितव्य नशिबाच्या हवाली असा विचार मनांत येऊन, विमान पुन्हा सुखरूप जमिनीवर उतरेपर्यंत, जीवाला धाकधूक असतेच. इथे तर इतक्या दूरचा प्रवास आणि तोही तकनिकी समस्याग्रस्त यानातून होता. प्राप्त परीस्थितीचे वर्णन करण्यास 'थरार' हा शब्दही तोकडा पडावा अशी भयंकर परीस्थिती. इतक्या दूरच्या यानावर जमिनीवरून संपर्कात राहून घडामोडींना आपल्या नियंत्रणात ठेवणार्या शास्त्रज्ञांना साष्टांग नमस्कार.
(घरच्या रिमोटला टिव्ही दाद देत नाहिये. उद्याच दुरुस्त करून आणला पाहिजे.)
18 Nov 2015 - 3:53 pm | किरण कुमार
लेख आवडला, अंतराळविरांना किती संयमाची गरज असते ते कळते इथे
18 Nov 2015 - 11:24 pm | मुक्त विहारि
मस्त लेख.
अप्रतिम...
19 Nov 2015 - 3:54 am | शब्दबम्बाळ
तुम्ही खूप चांगली माहिती संकलित केली आहे आणि मांडणीही उत्तम!
पण शेवटी एक दोन चुका झाल्या आहेत त्या निदर्शनास आणू इच्छितो.
ओपोलो-१३चे दोन भाग होते - ओडिसी आणि अॅक्वेरिअस. ओडिसी म्हणजे कमांड मॉड्युल आणि अॅक्वेरिअस म्हणजे ल्युनार मॉड्युल.
ओडिसीला हिट शिल्ड होते कारण त्याला पृथ्वीच्या वातावरणामुळे होणारे घर्षण आणि त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता याचा सामना करायचा होता. पण अॅक्वेरिअस मात्र चंद्रावर उतरणार असल्याने त्याला हिट शिल्ड नव्हते.
हिट शिल्ड शिवाय पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश म्हणजे मृत्यू अटळ.
त्यामुळे मोहिमेच्या शेवटच्या भागात ओडिसीला 'जिवंत' करण्यात आले आणि सगळे अंतराळवीर अॅक्वेरिअस सोडून ओडिसी मध्ये आले.
अॅक्वेरिअसने त्यांना ४ दिवस जगवले होते त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात(पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश) त्याला वेगळे करताना त्याचे आभार मानण्यासाठी ज्यो केर्वीनने "फेअरवेल अॅक्वेरिअस, वुई थेंक यू" हे उद्गार काढले.
19 Nov 2015 - 11:15 am | पीके
सहमत..
19 Nov 2015 - 9:38 pm | लाल टोपी
होय परतीचा प्रवास ल्युनार मॉड्यूल मधून केला आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करायला ७० मिनीटे राहीली असता पुन्हा कमांड मॉड्युलमध्ये येवून प्रवासाचा शेवट कमांड मॉड्युल मधून केल्याचे माहीत होते मूळ लेखात ही माहिती समाविष्ट केली नव्हती मात्र ती नावांची आलटा पालट ही त्रुटी राहून गेली. श.ब.जी आभार,
20 Nov 2015 - 1:15 am | शब्दबम्बाळ
विज्ञानावर आधीच कमी लेख येतात, त्यात इतक्या उत्तमपणे मांडणी केलेल्या लेखात काही त्रुटी राहू नये म्हणून सांगावस वाटल! :)
संपादकांना सांगून बदल झाले तर उत्तमच...
त्यात दिवाळी अंक लेखांना वाचनखुण पर्याय देखील नाहीये...
22 Nov 2015 - 5:54 pm | सोत्रि
थरारक आणि उत्तम मांडणी
- (थरारलेला) सोकाजी
25 Nov 2015 - 2:48 pm | पियुशा
जबरदस्त, थरारक !!
25 Nov 2015 - 6:58 pm | बोका-ए-आझम
टाॅम हँक्सचा अपोलो १३ याच शीर्षकाचा मस्त चित्रपट आहे पण त्यातून नीट समजलं नव्हतं की प्रत्यक्षात प्राॅब्लेम काय झाला होता. पण या लेखातून एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण मिळालं.
25 Nov 2015 - 7:01 pm | पद्मावति
थरारक!
लेख खूपच आवडला.
26 Nov 2015 - 3:41 pm | आनंदराव
़
खासच
26 Nov 2015 - 8:43 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला, प्रत्यक्षातला थरार लेखातही उतरला आहे.
स्वाती
27 Nov 2015 - 4:35 pm | मित्रहो
मस्त मांडलाय. छान माहीती संकलीत केली आहे.
माझ्या माहीतीप्रमाणे अपोलो १३ नंतर नासामधे एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टीने बऱ्याच सुधारणा झाल्या. त्याला कारण होते अपोलो १३ चे अपयश त्याचमुळे नासामधे अपोलो १३ हे सर्वात यशस्वी समजले जाते.
अपोलो १३ हा चित्रपट सुद्धा जबरदस्त आहे.
27 Oct 2016 - 8:23 pm | drsunilahirrao
थरारक!