मिपा संपादकीय - आरोग्ये वसते लक्ष्मी!

संपादक's picture
संपादक in विशेष
1 Sep 2008 - 1:00 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

[प्रस्तावना - मिसळपावच्या ईस्ट-कोस्ट कट्ट्याच्यावेळी आमची 'अंमळ सुधारलेली तब्बेत' बघून प्रा.डॉ. दिलीप बिरुटे ह्यांनी त्यांच्या प्रेमळ टीकेची डबल बॅरल आमच्या पोटाला टोचली आणि आम्ही खडबडून जागे झालो! काहीतरी करायलाच हवे ह्या तीव्र इच्छेने व्यायाम सुरु केला दीड किलो वजन कमी करुन आरोग्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आणि मग ह्या लेखाला हात घातला. प्रा.डॉं.चा मी आभारी आहे.]

आरोग्ये वसते लक्ष्मी!

आरोग्याच्या बचत खात्यात तुमची नियमितपणे थोडी-थोडी शिल्लक टाकणे चालू आहे की नाही? का सगळा कारभार निसर्गदत्त क्रेडिट कार्डावरच चालू आहे?

पूर्वी सर्वसाधारणपणे पन्नाशी-साठीत, वाकणार्‍या पाठी आणि सुटलेली पोटे असत असे ऐकून आहे, काही वर्षांपूर्वी चाळिशीत आणि आता अगदी अलीकडे पंचविशी-तिशीतच पाठी वाकायला आणि पोटे सुटायला लागलेली पाहून धोक्याची घंटा डोक्यात ठणाणा वाजते किंवा निदान वाजायला हवी! बैठ्या जीवनशैलीमुळे आपण दुखणी ओढवून घेत आहोत हे सत्य आता जागतिक आहे. असे असले तरी ह्या लेखापुरता मी आपल्या भारतीय मातीचा संदर्भ देईन कारण एकतर मला जगातल्या इतर ठिकाणांपेक्षा भारतीय जीवनशैलीबद्दल जराशी जास्त माहिती आहे आणि तिथल्या प्रश्नांशी मी स्वतःला जास्त नीट जोडू शकतो असे वाटते. तसेच पाश्चात्य जग आता ह्या प्रश्नांच्या एका वेगळ्याच टप्प्यावरती आहे. आपल्या लोकांनी त्या मार्गावरुन चालायला सुरुवात केलेली आहे. पुढे जाताजाता खड्ड्यांबाबत सावध होता आले तर ते आपल्याला फायद्याचे ठरेल.

मैदानी खेळ, चालणे, सायकल चालवणे एकंदर शारीरिक हालचाल भरपूर असण्याच्या काळात सर्वसाधारणपणे आरोग्य बरे असे. जसजशी आपली तांत्रिक प्रगती होत गेली तसतशी कामाच्या स्वरुपात, प्रवासाच्या माध्यमात बदल होत गेले. सायकलींची जागा स्वयंचलित दुचाक्या/चारचाक्यांनी घेतली. आता तर टाटांच्या नॅनोमुळे आणि तत्सम छोटेखानी गाड्यांमुळे रस्तोरस्ती गाड्याचगाड्या असतील की काय अशी परिस्थिती येऊ घातली आहे! छोट्याशा अंतराकरताही वेळेच्या अभावाने म्हणा, गाडीची चटक लागल्याने म्हणा किंवा आळसाने म्हणा चालत जाऊन काम करण्याचे लोक टाळू लागले.

हे सर्व बदल १९९० नंतरच्या दशकात फार झपाट्याने होत गेले. सर्वच क्षेत्रातल्या नवीन नोकर्‍यांच्या उपलब्धतेमुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ओळखीमुळे, वापरामुळे लोकांमधे एकप्रकारची संपन्नता आली, सुबत्ता आली. १९६०-७० च्या काळात जे लोक आईवडील झाले त्यांच्यापेक्षा ह्या नवीन पिढीची मानसिकता निराळी घडली. भरपूर पैसा मिळवावा आणि तो आपल्याला हवा तसा खर्च करावा, सुखांचा लाभ घ्यावा असे वाटणे अर्थातच गैर म्हणता येणार नाही कारण आपले आईबाप ज्या प्रकारे काटकसर करुन संसार चालवीत होते आणि अनेक सुविधा ह्या परवडत असून लांब ठेवीत होते त्यासारखे वागणे गरजेचे नाही. आम्ही पैसा मिळवू आणि आमच्या बरोबर आमच्या मुलाबाळांनी आणि जिथे शक्य आहे तिथे आई-बापांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा असा प्रकार दिसतो.

ह्या सगळ्या विस्तारात कामाच्या आणि रहाण्याच्या जागातले अंतर वाढत गेले. विभक्त कुटुंबे तयार होत गेली. खाजगी नोकरीत, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आय्.टी. क्षेत्रात कामाचे तास आणि ताण ह्यात वाढ झाली. सरकारी नोकरीतही काही खाती ही अति कर्मचारी संख्येमुळे सुस्तावलेली आणि पोलिसांसारखी काही अति ताणामुळे हृदयविकाराची शिकार झालेली अशी दुरवस्था दिसते. त्या अनुषंगाने घरी काम नेणे किंवा उशिरापर्यंत कचेरीतच थांबून काम निपटूनच घरी जाणे वाढू लागले. हळूहळू लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि वेळात कचेरीतल्या कामाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. पेजर्स, मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स ह्यामुळे ऑफिस आणि घर ह्यातली दरी कमीकमी होत चालली. रात्रीचे जेवण घेताघेता मुलाबाळांबरोबर न बोलता लोक मोबाईल कानाला लावून मीटिंग करु लागले! आतातर वेबेक्स सारख्या तंत्रामुळे बर्‍याच मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्सही घरबसल्या किंवा ऑफिसबसल्या होऊ शकतात! शिवाय जगभरात ठिकठिकाणी कचेर्‍या असल्याने वेळेचेही काही नियंत्रण नाही अमेरिकेतल्या सकाळच्या १० वाजता (त्यातही पुन्हा पूर्व/पश्चिम किनार्‍यावर तीन तासाचा फरक!) भारतात संध्याकाळचे ७.३०/८.३० आणि कोरियात रात्रीचे ११ किंवा ह्याच्या उलट अशी मीटींग होते. किंवा तुम्ही सगळी कामे संपवून संध्याकाळी ऑफिसमधून निघावे म्हणता तर जगाच्या दुसर्‍या टोकाचे तुमचे दुसरे ऑफिस नुकतेच सुरु होऊन तिकडून ई-मेल्स सुरु झालेल्या असतात! ह्याने तुमच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याउठण्याच्या वेळांवर प्रतिकूल परिणाम झाले. त्याचा परिपाक वजन वाढण्यात आणि एकूण आरोग्यावर होऊ लागला. म्हणजे काय, तर २४ तास काम तुमचा पिच्छा सोडत नाही. तुम्हालाच दिवसभरातल्या तुमच्या सीमारेषा आखून घेणे आणि योग्य वेळी काम थांबवणे अत्यंत जरुरीचे ठरते.

आजच्या कामाच्या जगात वाढलेले ताणतणाव कमी करण्यासाठी काम कमी करणे हाही उपाय होऊ शकत नाही कारण ते तुमच्या एकट्यावर अवलंबून नसते तर एकूण आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला तसे करु देत नाही. तुमच्याकडून सातत्याने आणि एखाद्या यंत्रासारखे काम होत रहावे अशी अपेक्षा करणारी ही परिस्थिती आहे पण उपाय तर काढायलाच हवा, अशा वेळी आपल्या २४ तासातली सरासरी ३० ते ४५मिनिटे आपल्याच आरोग्यासाठी देणे ह्या कल्पनेपर्यंत आपण येतो.
"काय करावे हो वेळच नसतो!" अशी सबब सांगणार्‍या लोकांसाठी आपल्या माहीतीतले एक उदाहरण देण्याचा मोह आवरत नाहीये.
अनिल अंबानी ह्या 'अनिल धिरुभाई अंबानी ग्रुपच्या' सर्वेसर्वाचे वजन कोणे एकेकाळी तब्बल ११५किलो होते! बोर्डरुम मीटिंगमधे वजनावरुन त्याची चेष्टा झाली. ही खिल्ली जिव्हारी लागल्यानंतर त्याने जिद्दीने वजन आटोक्यात तर आणलेच पण तो आज एक फिटनेस एक्सपर्ट गणला जातो! अनिल हा एक मॅरॅथॉन रनर आहे. दीड लाख कोटीच्या कंपनीचे महाकाय जहाज हाकणार्‍या, जगातल्या ६ व्या क्रमांकाची श्रीमंती असलेल्या अनिलचे २४ तास किती कामाचे असतील ह्याची कल्पना करायला ज्योतिषाची गरज नाही! असे असतानाही तो जर वेळ काढू शकतो तर आपल्याला का शक्य नाही?

व्यायाम न केल्याने काय काय होते हे आता सर्वश्रुतच आहे त्यावर जास्त टिप्पणीची गरज नसावी. तरीही काही भयावह आकडेवारी देऊ इच्छितो.
२०२५ पर्यंत भारत ही ऑलिंपिक पदकांची रास ओतणारी महासत्ता असेल की नाही माहीत नाही पण मधुमेही लोकांची सर्वात मोठी फॅक्टरी असणार आहे हे नक्की! आपल्या देशातले ५ कोटीपेक्षा जास्त लोक मधुमेही असतील! म्हणजे दर ५ -६ माणसांमागे एक! शरीराच्या प्रत्येक अवयवावर घातक परिणाम करु शकणारा हा एक सायलेंट किलर आहे! ह्याहूनही वाईट म्हणजे शहरी भागातले ३०% आणि ग्रामीण भारतातले ५०% डायबेटिक लोक हे तपासणीच करुन घेत नाहीत किंवा त्यांना कल्पनाच नसते की त्यांना मधुमेह आहे. म्हणजे प्रत्यक्ष मधुमेहींचे प्रमाण हे दिसते त्यापेक्षा खूपच जास्त असू शकते. बरे यातही अनेक प्रकारचे मधुमेह आहेत टाईप १, टाईप २ इ. आणि ते अतिशय लहान वयात आढळून यायला सुरुवात झाली आहे.
वाढते हृदयविकार, स्पाँडेलायसिस सारखे चिकट आणि बर्‍याचवेळा आयुष्यभरासाठी 'पाठीमागे' लागणारे आजार, आणि तितकेच भयानक मानसिक विकार हे अगदी हळूहळू चोरपावलांनी आपली शिकार करतात. वरचेवर अतिशय तळकट, तेलकट खाणे, अति गोड खाडे, नियमितपणे रात्री उशिरा जेवणे आणि मुख्य म्हणजे व्यायामाचा अभाव अशा चतु:सूत्रीवर आधारलेली दिनचर्या मधुमेहाला आवडते घर प्राप्त करुन देते!

व्यायामाच्या अभावाने फक्त शरीरच कमकुवत होते का? नाही, मनही अधू होते. साचत जाणार्‍या मानसिक ताणाने होणारे परिणाम अनेक आहेत. पर्सिटंटच्या सातव्या आस्मानातून उडी मारुन जीव दिलेला २५ वर्षांचा संदीप शेळके हे अशा प्रकारच्या ताणातून जडलेल्या मनोविकाराचे एक प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. कामाच्या ताणाचे म्हणा, वैयक्तिक आयुष्यातल्या ताणाचे म्हणा किंवा दोन्हीचे म्हणा नीट व्यवस्थापन न करता आल्याने एक बुद्धिमान जीव प्राणास मुकला ही विषण्ण करणारी घटना आहे. ह्या घटनेत ताण कुशलतेने हाताळण्याकरता वेळेचे व्यवस्थापन जितके महत्त्वाचे आहे तितकेच, किंबहुना थोडे जास्तच, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे असे मी म्हणेन.
कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या ह्याकरता काय करु शकतात? एकतर अनुभवी मार्गदर्शकांशी सल्लामसलत घडवून आणणे (मेंटॉरिंग). त्यांच्या अनुभवातून नवोदितांना बरेच शिकता येते. हे बर्‍याच कंपन्या करतातही.
सध्याचा जमाना हा पैशाचा झालेला असल्यामुळे लोकांना पैशाची भाषा जरा जास्त चटकन समजते. त्यामुळे कंपन्यांमधे फिटनेस इंसेंटिव अशी काही नवीन कल्पना राबविता येईल का? असा एक विचार आला. दर महिन्याला कर्मचार्‍यांची फिटनेस टेस्ट घ्यायची. त्यात कशाचा अंतर्भाव व्हावा हे डॉक्टरांशी, फिटनेस एक्सपर्टशी बोलून ठरवता येईल, आणि जे कोणी कर्मचारी त्या फिटनेस टेस्ट मधे उत्तीर्ण होतील त्यांना त्या महिन्याकरिता तो इंसेंटिव द्यायचा. इंसेंटिव हवा असेल तर फिटनेस राखा! म्हणजे निदान मिळणार्‍या पैशाकरता तरी व्यायाम घडेल आणि त्याचा पॉझिटिव साईड इफेक्ट म्हणजे तब्बेत नीट राहील!

आपण भरपूर कष्ट करुन पैसा मिळवतो तो मूलभूत गरजांबरोबरच वेगवेगळ्या सोयी, सुखे मिळावीत म्हणून. अशा वेळी केवळ अनारोग्यामुळे तुम्ही त्या सोयींचा, सुखांचा लाभ घेण्यापासून वंचित रहात असाल आणि उपचारांवर अमाप पैसा खर्च करुन कुठल्याशा हॉस्पिटलची समृद्धी वाढवीत असाल तर ती एक दु:खाची आणि लांछनास्पद गोष्ट आहे असे मी म्हणेन!
"आताच काय गरज आहे? अजून मी फक्त २५ वर्षांचा आहे. चाळीशीत बघू!" हा विचार बरेच जण करतात. पण (गद्धे)पंचविशीत नसलेली व्यायामाची सवय एकाएकी चाळीशीत लागेल हा भ्रम असतो हे 'चाळिशी' लागल्यावरच कळते! "घर शाकारण्याची वेळ ही पावसाळा सुरु झाल्यानंतर नसून उन्हाळ्यातच असते" अशी जी म्हण आहे ती येथे तंतोतंत लागू पडते.
ह्यातला अजून एक फार फार गंभीर परिणाम असलेला धोका म्हणजे मध्यमवयातले मृत्यू. ३५ ते ४५ अशा वयात घरातल्या कर्त्या पुरुषाचा/स्त्रीचा मृत्यू आणि घरात जर छोटी मुले असली तर त्या घराची अवस्था फार बिकट होते. हे आपल्या बाबतीत कशाला होईल अशा गोड गैरसमजाने आपण गाफिल असतो.
'माझा साक्षात्कारी हृदयरोग' ह्या पुस्तकातला अभय बंगांचा एक अनुभव इथे द्यावासा वाटतो. हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतरच्या काळात प्रवास करीत असताना भारतातल्याच कुठल्याशा विमानतळावर त्यांना एक साठीतली व्यक्ती दिसते. त्याची उत्तम प्रकृती आणि मुख्यतः अतिशय सपाट पोट बघून ते इतके भारावून जातात की धावत जाऊन, काही ओळखदेख नसलेल्या, त्या माणसाला मिठी मारतात आणि त्याचे अभिनंदन करतात! त्याच पुस्तकात ते पुढे असेही म्हणतात. माझ्याकडे बघितल्या नंतर जेव्हा माझ्या मित्रांना असे वाटते की ह्याला काही चांगले खायला मिळत नाही की काय? तेव्हा माझी तब्बेत अतिशय उत्तम आहे असे समजा! ह्यातला विनोदाचा आणि अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी मर्म समजणे महत्त्वाचे.

मैदानी खेळ, सायकलिंग, पोहोणे, पळणे, झपाट्याने चालणे ह्यासारखे व्यायाम ज्याच्या त्याच्या शारीरीक कुवतीप्रमाणे आणि सोयींच्या उपलब्धतेप्रमाणे प्रत्येकजण करु शकतो. थोडा मनोनिग्रह, तब्बेतीबाबतची कळकळ आणि नियमितपणा ह्या त्रिसूत्रीवर कोणीही व्यक्ती हे करु शकते नव्हे एवढे करायलाच हवे! शिवाय एवढे करुनही भागत नाही चाळिशीतल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने स्वतःची पूर्ण वैद्यकीय तपासणी दरवर्षी करुन घेतली पाहीजे. 'सकाळ' समूहाच्या प्रतापराव पवारांचा एक उद्बोधक अनुभव. प्रतापराव हे व्यायामाची अतिशय आवड असलेले आहेत हे बर्‍याच जणांना माहीत असेल. नियमित योगासने, प्राणायाम, बॅडमिंटन खेळणे असे करणार्‍या ह्या उंच्यापुर्‍या गृहस्थाला ते अग्नेयआशियात कामाकरिता गेलेले असताना अस्वस्थ वाटू लागले. काम संपवून भारतात परत आले. चारच दिवसांनी पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने सहज म्हणून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी काही जुजबी तपासण्यानंतर ह्यांना थेट ऑपरेशन थिएटर मधे नेले! त्यांना हार्टऍटॅक आलेला होता. आणि दोन रक्तवाहिन्या मोठ्या प्रमाणावर बंद होत आलेल्या होत्या! तातडीच्या शत्रक्रियेनंतर ते सुधारले. त्यांच्यावर अशी शत्रक्रिया झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले आणि काही लोक म्हणाले सुद्धा की मग एवढा नियमित व्यायाम केलास त्याचा काय फायदा! ह्या प्रसंगावर प्रतापरावांची टिप्पणी मोठी मार्मिक आहे. ते म्हणतात "मलाही एक क्षणभर असे वाटले की मग एवढा नियमित व्यायाम करुन काय फायदा झाला? पण नंतर शांतपणे विचार केल्यावर मला असे लक्षात आले की हार्टऍटॅक कोणत्या कारणाने आला ते समजून दूर करता येऊ शकेल पण एवढ्या नियमित व्यायामाने माझ्या शरीराला आणि हृदयाला त्या बिकट परिस्थितीतून तगून जाण्याएवढे सशक्त बनवले होते अन्यथा मी कधीच मृत्यूमुखी पडलो असतो! तेव्हा अपघात हे सांगता येत नाहीत पण व्यायामाला पर्याय नाही!"

आपल्या गरजा नेमक्या काय आहेत? मुक्त अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वतंत्र विचारांची कास धरताना पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण तर होत नाहीये ना? परंपरेने चालत आलेले आपल्या जीवनशैलीतले दोष कोणते आहेत? आरोग्याच्या दृष्टीने आपल्या समाजव्यवस्थेमधे कालानुरुप काय सुधारणा व्यायला हव्या आहेत? वाढत जाणार्‍या सरासरी आयुर्मानाचे आणि वृद्धांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्याचा दृष्टीने आपण कोणत्या प्रकारच्या योजनांवर विचार करतो आहोत? लोकसंख्येच्या नियंत्रणाबाबत आपली धोरणे काय आहेत? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा विचार आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने करायचा आहे.

इथूनपुढच्या काळात उत्तम निरोगी प्रकृती हा पैशापेक्षाही फार मोठा ऍसेट ठरणार आहे! देशाच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग हा गीतेच्या अभ्यासापेक्षाही अधिक फुटबॉलच्या मैदानातून जातो असे सांगणारा योद्धा संन्यासी विवेकानंद आणि आयुष्यभर सूर्यनमस्काराची कास धरुन अकरा मारुतींची स्थापना करणारे शक्तिदेवतेचे उपासक समर्थ रामदास हे दोघे आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. त्यांच्या शिकवणुकीचे अंशतः तरी पालन करणे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुखी आणि संपन्न आयुष्याचा राजरस्ता दाखवणे हे प्रत्येक सुजाण आणि शहाण्या भारतीयाचे कर्तव्य आहे असे मला वाटते!

पाहुणा संपादक : चतुरंग.

प्रतिक्रिया

मानव's picture

1 Sep 2008 - 1:27 am | मानव

बोले तैसा चाले त्याचि वन्दावि पाउले !
व्यायामाचे बरेचसे बेत रात्रि झोपताना ठरतात ज्याचि आठवन दुसर्या दिवशि झोपतानाच येते !
उत्तम आरोग्यासाठि इतर कशाहि पेक्शा चिकाटिचि फार गरज आहे,कारन २ महिन्यात लगेच सलमान खान बनता येत नाहि!
आपलि स्पर्धा इतर कुनाशि करन्यापेक्शा स्वाताशिच करावि,आताचि पिढि आरोग्याबद्दल जागरुक आहे हे चान्गल लक्शन आहे !

बाकि लेख उत्तम जमला आहे लेखकाच अभिनन्दन !

काहि चुकल्यास माफि असावि !

यशोधरा's picture

1 Sep 2008 - 2:08 am | यशोधरा

लेख आवडला.
दैनंदिन आयुष्यात व्यायामासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे खरे, पण नेमके त्याच्याकडेच दुर्लक्ष होते! :( :SS

प्रियाली's picture

2 Sep 2008 - 5:27 am | प्रियाली

दैनंदिन आयुष्यात व्यायामासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे खरे, पण नेमके त्याच्याकडेच दुर्लक्ष होते!

खरे आहे. दुर्लक्षही जाणूनबुजून कंटाळा येतो म्हणून.

असो, लेख उपयुक्त आहे.

रोज रोज तोच व्यायाम करून कंटाळा येणे शक्य आहे त्यामुळे व्यायामही बदलता हवा. त्यात वैविध्य हवे. व्यायाम आवडायला हवा.

माझा यावर्षीचा व्यायाम

१. बागेत खड्डे खोदणे. (झाडांसाठी हो! ;))
२. झाडे लावणे, त्यांना खत घालणे वगैरे
३. गवत कापणे
४. नको असलेली रानटी झाडे उपटणे
५. झाडांची निगा ठेवणे, जुनी फुले कापणे, फांद्या छाटणे.

वेळः रोज अर्धा तास किंवा अधिक.
शनिवार - रविवार : २ तास किंवा अधिक.

घुसखोर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

चतुरंग's picture

2 Sep 2008 - 4:19 pm | चतुरंग

व्यायामात वैविध्य असले की व्यायाम चालू ठेवण्याचा उत्साह टिकून राहतो.
उन्हाळ्यात हवा चांगली असते त्यामुळे बाहेर चालणे, पळणे, सायकल चालवणे, पोहोणे इ., बर्फांच्या दिवसात सूर्य नमस्कार, किंवा जिममधले व्यायाम, स्पिनिंग, बंदिस्त जलतरण अशाने स्वस्थ्य टिकवतो.
ह्यातले प्रकार आलटून पालटून बदलत रहावेत म्हणजे तोचतोचपणा येत नाही. बरोबर कोणी साथीला असेल तर अजूनच चांगले कारण एकाला कंटाळा आला तर दुसरा ढोसून उठवण्याची शक्यता असते!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2008 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उन्हाळ्यात हवा चांगली असते त्यामुळे बाहेर चालणे, पळणे,
कौनसे देश में? ("दिल चाहता है" मधून उचललेला प्रश्न)

(भारतीय उन्हाळ्याने कासावीस झालेली) अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Sep 2009 - 8:55 am | llपुण्याचे पेशवेll

>>कौनसे देश में? ("दिल चाहता है" मधून उचललेला प्रश्न)
छ्या: तुम्हाला 'कौनसे देश में' माहीत नाही ? म्हणजे तुम्ही हिरवी नोट बघितलेलीच नाही. असो.

रंगाशेठ,
मी पण हल्ली व्यायम करतो. वजन वगैरे काही कमी होत नाही. पण शरीर हलकं राहते व्यायामुळे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

मेघना भुस्कुटे's picture

1 Sep 2008 - 6:17 am | मेघना भुस्कुटे

मी व्यायाम करत असल्यामुळे मला प्रतिक्रिया लिहिताना अपराधी वाटत नाहीय! पण एकूण रस्ता निसरडा हे खरं. चांगला जमला आहे लेख.

नंदन's picture

1 Sep 2008 - 9:10 am | नंदन

छान आहे, महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडणारा आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' असे का म्हणतात, हे सोदाहरण उत्तम विशद केले आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

गणा मास्तर's picture

1 Sep 2008 - 9:30 am | गणा मास्तर

सध्या जपानमध्ये वास्तव्यास असल्याने जपानधली काही निरीक्षणे
१. आहारामध्ये तेलाचे अत्यंत कमी प्रमाण
२. बर्‍याच ऑफिसेसमध्ये सकाळी अर्धा तास सर्व जण एकत्र येउन व्यायाम करतात, विषेशकरुन बँकांमध्ये.
३. नियमितप्रमाणे धावणे , पोहणे आणि जिम करणार्‍या लोकांचे प्रमाण ल़क्षणीय आहे. कित्येकजण ऑफीस्मधुन थेट जिममध्ये येतात आणि नंतर घरी जातात.
४. सार्वजनिक वाहतुकीचे साधन रेल्वे आहे, त्यामुळे घरापासुन स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासुन ऑफिसपर्यंत चालावेच लागते. चौकाचौकात रिक्षा नसतात.
५. सायकलचा प्रचंड प्रमाणात होणारा वापर.

सहज's picture

1 Sep 2008 - 9:53 am | सहज

अतिशय महत्वाचा मुद्दा अतिशय चांगला मांडला आहे.

मिपावर काही ठोस कार्यक्रम करता येईल का? जसे व्यायाम, आहार[स्पेशल डाएट] आदी माहीती देवाणघेवाण, दर १५ दिवस , १ महिन्यानी इच्छुक सदस्यांनी आपले वजन लिहावे. इ. म्हणजे एकमेकांकडून स्फूर्ती घेउन.

या क्षणी तरी बसल्याबसल्या स्ट्रेचिंगचे प्रकार सुरु केले आहेत :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजराव,

सहमत! असं काहीतरी सुरू करूयाच!

आणि माझा नातू, टारू बाळ आपल्याला अनेक कंद, मुळं, फळं यांची माहिती देऊ शकतो! :-)

अदिती

टारझन's picture

2 Sep 2008 - 2:40 am | टारझन

आवश्य यम्मी आजी ... चतुरंगांचा लेख फारच भारी विषयावर आहे. थ्यांक्स गोज टू रंगाकाका..
आम्ही आमच्या बर्‍याच मित्रवर्यांना जिमला आणि रनिंग ला ओढून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणाला नविन जिम सुरू करायची असेल किंवा डाएट हवा असेल तर आपण आम्हास खरडावे, आमच्या बुद्धीला पटणारी योग्य प्रामाणिक उत्तरे नक्कीच देऊ. वजनं किती लोक खरी लिहीतील यात जरा शंकाच आहे.
पण प्रेरणा घेऊन जिमच्या पायर्‍या चढणं गरजेचं आहे. नुसत्या बेटकुळ्या आल्या म्हणजे भारी होत नाही,
पण बेटकुळ्या असल्याकी मिरवायला जाम मजा येते. असो ...
सुदृढ शरिर हिच खरी संपत्ती

हौशी बॉडी बिल्डर
टारझन ऊर्फ खवीस (हनुमान जिम, भोसरी / स्पिक जिम, कंपाला )
उंची: ६'२"
छाती :४४ बायसेप्स :१६" थाइज : २४"
पोट: (सांगू की नको सांगू) ३६"
वजन : ९६ किलो
(मिलिट्रीत एका झटक्यात पास :) )

चतुरंग's picture

2 Sep 2008 - 4:31 pm | चतुरंग

तुझ्या जबरदस्त बाडीबद्दल मला आदर आहे! पण तुझ्या विशालतेला न घाबरता मी तुला असं सांगेन की तुझं वजन अंमळ जास्त आहे!! :B
तुझ्या उंचीसाठी आदर्श वजन ८२-८५ किलोच्या आसपास हवे! तुझ्या लहान वयामुळे आणि एकूण ताकदीमुळे तुला आत्ता जाणवत नसेल पण हे जास्तीचे वजन विशेषतः पोटात लपलेली चरबी असते.
वेळीच काळजी घे आणि वजन आटोक्यात ठेव! मांसाहारी असलास तर मांस (रेड मीट्/चिकन्/पोर्क - खात असल्यास) कमी कर आणि मासे जास्त खा! तू टारझन असल्यामुळे फलाहार करत असशीलच! :D शुभेच्छा!!

चतुरंग

टारझन's picture

4 Sep 2008 - 2:05 am | टारझन

रंगाकाका .. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण ते फक्त फिट रहाण्यासाठी काम करणारांसाठी आहे. जिम मधे ३-३ तास घाम गाळून मसल्स बणतात आणि पर्यायाने वजन वाढते. उदाहरणच द्यायचं झालं तर डब्लु.डब्लु.एफ. किंवा हेवी वेट बॉक्सर्स हे लोक्स चरबी मुक्त असून पण बीएमआय च्या वर असतात. हा हि गोष्ट मान्य की ९६ जास्त आहे ,,, अहो पण जिम ला कंटिन्यु जाउनच ९० च्या वर मजल मारली. आता जास्त व्यायामास वेळ नाही. पण अस्मादिक आजही एका दमात सिंहगड चढु शकतात :)
सावधानतेच्या इशार्‍याबद्दल बोलाल तर मी माझ्या शारिराकडे जास्त लक्ष देतो. कॉलेजात असताना हेवीवेट व्यायाम करे त्यावेळी रोज १० अंडी (पिवळा बलक काढून) आणि आठवड्याला ३ दिवस ५०० ग्रॅम चिकन ची उक्कड असे , सफरचंद आणि केळी हा येताजाता असणारा आहार. आता फक्त फरक एवढा आहे की रोज ३ तास देणे अशक्य नाही. आणि स्नायुंना जेवढ्या वर्काउटची सवय लागली त्यामुळे बाकी मेद तयार होण्याचा धोका संभवतो.

बेटकुळ्या दाखवत फिरणारा
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

चतुरंग's picture

4 Sep 2008 - 3:05 am | चतुरंग

रंगाकाका म्हणू नकोस! शिवी दिल्यासारखं वाटतं! ;) (ह.घे.)

आता मुद्याकडे वळूयात.

जिम मधे ३-३ तास घाम गाळून मसल्स बणतात आणि पर्यायाने वजन वाढते. उदाहरणच द्यायचं झालं तर डब्लु.डब्लु.एफ. किंवा हेवी वेट बॉक्सर्स हे लोक्स चरबी मुक्त असून पण बीएमआय च्या वर असतात.

वजने मारणे हे स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आहे. त्याने मसल्स वाढतात आणि वजन वाढते कारण मसल्स हे चरबीच्या १८% जास्त घनतेचे असतात.
चरबी पुरेशा प्रमाणात जळते आहे की नाही ह्याकडे मात्र लक्ष ठेवावे लागते ते आहाराच्या नियंत्रणाने आणि कार्डिओ ट्रेनिंगने, जसे पोहोणे, सायकल चालवणे, पळणे इ.
खाल्लेल्या कॅलरीज - वापरलेल्या कॅलरीज = चरबी हे साधे समीकरण आहे.
त्यामुळे तुझ्या खाण्यातून जास्तीच्या जाणार्‍या कॅलरीज ह्या चरबीत रुपांतरीत होतात जी चरबी तुझ्या मसल्स ना वेढून बसलेली असते.
शिवाय व्यायाम कमी झाला आणि आहार पूर्वीइतकाच राहिला तर सरळ चरबीत रुपांतर होणार.
बी.एम्.आय. हा अगदी अचूक इंडिकेटर नसला तरी साधारण तू कुठल्या बाजूला झुकतो आहेस ते दाखवतो. त्यामुळे मी काळजीचा घेण्याचा सल्ला दिला.

बाकी तू सिंहगड एका दमात चढतोस म्हटल्यावर तुझा दमसास चांगलाच आहे. वजने मारणे थोडे कमी करुन थोडा पळण्याचा सराव कसा राहील? त्याने बॉडी तशीच राहून वजन घटेल का? मला वाटतं घटेल. प्रयोग करुन सांग! मी वाट बघतो.

चतुरंग

चालणे आणि पोहणे हे दुखापतीची शक्यता कमी असणारे आणि अतिशय उत्तम व्यायामप्रकार आहेत, असे म्हणतात. त्याशिवाय धावण्याचा व्यायाम करायचा असेल, तर हे वेळापत्रक नक्कीच उपयोगी आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 5:26 pm | चतुरंग

अहो काय सांगताय? दर महिन्याला सदस्यांनी वजन सांगायचे?
अहो, बायका एकवेळ आपले वय सांगतील पण वजन? अजिबात नाही! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, सर्व बायका ह्या कायम पंचविशीत असतात आणि वजनाच्या काट्याने ५५ किलोपेक्षा जास्त वजन दाखवले तर तो बिघडलेला असतो असं त्यांना का बरं वाटतं? :B )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 8:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वो चतुर रंगराव!

मी उघड सांगते की मी २५ वर्ष १ दिवसाची आहे आणि माझं वजन ५५ किलो १०० ग्रॅम आहे.
आता बोला, जास आवाज केलात तर माजी जिमची पावती दाखवीन आं ... आदुगरच सांगती!

अदिती

खाली भडकमकर मास्तरांना दिलेल्या प्रतिसादात बॉडी मास इंडेक्सचा दुवा दिलाय तिथे तपासून बघ!

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2008 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवो, ते उगाच तुमाला डिवचायला लिवलं व्हतं ...

अवांतर: उगाच मला बर्डेच्या खर्डी नका पाटवू!

विकास's picture

2 Sep 2008 - 2:16 am | विकास

मिपावर काही ठोस कार्यक्रम करता येईल का?

माझ्या पुरते म्हणाल तर सकाळी उठल्या उठल्या चहा घेत मिपा बघण्याऐवजी सूर्यनमस्कार घालणे हा कार्यक्रम होऊ शकतो... थोडक्यात मिपा कमी बघणे, त्या निमित्ताने बोटांची टंकण्याची हालचाल कमी करून शरीराची हालचाल वाढवणे हा उपाय होऊ शकतो. तसे झाले तर तात्यांना "बँडविड्थचा प्रश्न"पण येणार नाही ;)

इच्छुक सदस्यांनी आपले वजन लिहावे

कुठले? शारीरीक, सामाजीक का आर्थिक? कुठेतरी वजन कमी असू शकेल :-)

आणि शारीरीकच हवे असल्यास जन्मापासूनचे सरासरी चालेल का?

यशोधरा's picture

1 Sep 2008 - 9:51 am | यशोधरा

>>१ महिन्यानी इच्छुक सदस्यांनी आपले वजन लिहावे.

ओ सहजराव!! कैच्या कैच हां!! :O

:)

मेघना भुस्कुटे's picture

1 Sep 2008 - 11:52 am | मेघना भुस्कुटे

खि:खि:खि:!
संपूर्ण सहमत!
वजनबिजन काय! अब्रह्मण्यम! कैच्याकाईच!

सहज's picture

1 Sep 2008 - 11:57 am | सहज

पण वजन सांगा म्हणलं की एकदम सिरीयस होतो की नाही माणुस?

बाकी इथल्या सक्सेस स्टोरीज पाहून स्फूर्ती मिळते. बिफोर अफ्टर चित्रे बघायला चांगलं वाटतं

मेघना भुस्कुटे's picture

1 Sep 2008 - 12:00 pm | मेघना भुस्कुटे

त्याला काय हरकत नाही म्हणा! माझ्या आभासी जालप्रतिमेत मी तशी सडसडीतच आहे! तेच वजन लिहिलं की झालं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 12:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघना,

पाच फूटाच्या उंचीला ५० किलो वजन आणि साडेपाच फूट उंचीला ५० किलो वजन यातपण फरक असतोच ना! शिवाय वय, शरीराची ठेवण यामुळेपण फरक पडतोच की!
माझ्यामते, वजनं सांगूया एकमेकांना, "हेल्दी काँपिटीशन"चा फायदा आपल्यालाच होईल. :-)

(अवांतर: मेघना, जास्त बारीक नको होऊस .... लोकांना घाबरवायचंय, विसरलीस का?)

मेघना भुस्कुटे's picture

1 Sep 2008 - 12:12 pm | मेघना भुस्कुटे

असं म्हण्तेस? बरं, राहिलं!

ऋषिकेश's picture

1 Sep 2008 - 10:03 am | ऋषिकेश

चतुरंग,
महत्वाच्या विषयावरचा अग्रलेख. आवडला.
शाहुमहाराजांच्या आरोग्यवर्धनाच्या कळकळीची लेख वाचताना आठवण झाली :)

चीन, जपान आदी आशियायी देशांमधे असणारा सायकलींचा सढळ वापर भारतानेही अंगिकारला तर इंधनबचत, प्रदुषणरोख या बरोबरच आरोग्यवर्धनही होईलसे वाटते.

बर्‍याचशा कॉर्पोरेट कंपन्याही ह्याबाबत सजग होऊ लागल्या आहेतच.. तुम्ही सुचवलेला फिटनेस इंसेंटिव दरमहा राबवण्याच्या दृष्टीने काहिसा अव्यवहार्य वाटला तरी आवडला :). कदाचित त्रैमासिक योजना म्हणून राबवता येईल.

-(मिपाकर) ऋषिकेश

मदनबाण's picture

1 Sep 2008 - 10:12 am | मदनबाण

इथूनपुढच्या काळात उत्तम निरोगी प्रकृती हा पैशापेक्षाही फार मोठा ऍसेट ठरणार आहे!
१००% सहमत..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद चतुरंग! अतिशय चांगला लेख, अगदी पाहिजे त्या विषयावर आणि मर्मावर बोट ठेवणारा.

मेघनानी लिहिलंय त्याचप्रमाणे मलाही अपराधीपणा वाटत नाही कारण गेली दोनेक वर्ष मी नियमितपणानी व्यायाम करत आहे. (काही लोकांनी माझी जिमची पावती पण पाहिली आहे ;-) )

मला असं वाटतं की एक मुद्दा सुटला, व्यायामामुळे दिवसभर उत्साह असतो, धावपळ करण्यासाठी व्यायामामुळे जास्त ऊर्जा मिळते असं वाटत रहातं. तसंच व्यायामामुळे मन एकाग्र करायला खूपच मदत होते, एक प्रकारचं फायटींग स्पिरीट निर्माण होतं, आव्हानं स्वीकारावीशी वाटतात आणि त्यासाठी कष्ट करण्याची मानसिकताही तयार होते. काही कारणामुळे जर चार दिवस सलग व्यायाम नाही झाला तर दिवसभर, विशेषतः संध्याकाळी फारच आळस येतो, कोणतीही गोष्ट करताना आळस येतो. आणि तोच आळस नकोसा होतो म्हणून पाचव्या दिवशी आपोआप डोळे लवकर उघडतात आणि आपोआप धावायला सुरुवात होते.

(१_६ कष्टाळू) अदिती

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 6:12 pm | चतुरंग

अवकाशसंशोधनात मग्न असूनही व्यायाम यथावकाश बघू असं तुझं नाहीये हे बघून मस्त वाटलं! B) :B

मला असं वाटतं की एक मुद्दा सुटला, व्यायामामुळे दिवसभर उत्साह असतो, धावपळ करण्यासाठी व्यायामामुळे जास्त ऊर्जा मिळते असं वाटत रहातं. तसंच व्यायामामुळे मन एकाग्र करायला खूपच मदत होते, एक प्रकारचं फायटींग स्पिरीट निर्माण होतं, आव्हानं स्वीकारावीशी वाटतात आणि त्यासाठी कष्ट करण्याची मानसिकताही तयार होते. काही कारणामुळे जर चार दिवस सलग व्यायाम नाही झाला तर दिवसभर, विशेषतः संध्याकाळी फारच आळस येतो, कोणतीही गोष्ट करताना आळस येतो.

तुझं म्हणणं बरोबर आहे, हा मुद्दा राहून गेला खरा! व्यायामाने येणारा उत्साह, फायटिंग स्पिरिट, धावपळीसाठी एनर्जी हे सगळं दुसर्‍याकशातून मिळत नाही हे खरंच आहे. शरीर आनंदी असलं की मनही आनंदी असतं आणि एकाग्रतेसारखे आनुषंगिक फायदे मिळत जातातच!

तुला व्यायाम चालू रहाण्यासाठी शुभेच्छा! :)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 11:18 am | विसोबा खेचर

देशाच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग हा गीतेच्या अभ्यासापेक्षाही अधिक फुटबॉलच्या मैदानातून जातो असे सांगणारा योद्धा संन्यासी विवेकानंद आणि आयुष्यभर सूर्यनमस्काराची कास धरुन अकरा मारुतींची स्थापना करणारे शक्तिदेवतेचे उपासक समर्थ रामदास हे दोघे आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. त्यांच्या शिकवणुकीचे अंशतः तरी पालन करणे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुखी आणि संपन्न आयुष्याचा राजरस्ता दाखवणे हे प्रत्येक सुजाण आणि शहाण्या भारतीयाचे कर्तव्य आहे असे मला वाटते!

वा! सुरेख अग्रलेख रे रंगा....

वैयक्तिक माझ्यापुरतं बोलायचं झालं तर व्यायाम हा सध्या तरी मी बोलू नये असा विषय आहे! :)

निदान आज तरी सुखासीन, मनाजोगतं आणि अगदी चाहेल त्या यथासांग खादाडीचं आयुष्य व्यायामाशिवाय सुरू आहे. उद्याचं माहिती नाही. कदचित एखादा मोठा आजारही उद्भवू शकतो! असो, तेव्हाचं तेव्हा बघू.

साला, योगापेक्षा भोग मोठे आहेत यावरच आमचा ठाम विश्वास आहे! :)

अर्थात, ही माझी वैयक्तिक मतं. अग्रलेख सुंदरच आहे!

आपला,
(बिलकूल व्यायाम न करणारा आणि काय चाहेल ते यथासांग तीन्ही त्रिकाळ हादडणारा!) तात्या.

रामदास's picture

1 Sep 2008 - 11:25 am | रामदास

ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के माने क्या जानो.
अपमान रचयीता का होगा
रचना को अगर ठुकराओगे.
त्याग=व्यायाम

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 5:34 pm | चतुरंग

चाहेल ती खादाडी जरुर करा त्याचे बंधन नाहीच!
फक्त जास्त खायचं असेल तर कमी खा एवढाच मूलमंत्र आहे!
शिवाय ओठातून गेलेले सर्व पोटावर दिसलेच पाहिजे असा काही नियम नाहीये. खाल्लेल्या कॅलरीजपैकी पुरेशा कॅलरीज जाळा आणि तब्बेत चांगली ठेवून पुन्हा खादाडीला तयार रहा.

आमच्या माहीतीत पुण्यातली एक खादाड मंडळींची टीम आहे. ते सगळेच लोक पंगतीत हादडण्यात वाकबगार. बसल्या पंगतीला प्रत्येकी अर्धा किलो श्रीखंड, चाळीस जिलब्या असले प्रकार. पण एक सूत्र पाळणार. जेवण झाले की थोड्याच वेळात सगळी टीम चालायला निघणार चांगली ५ मैलाची रपेट मारुन पुन्हा संध्याकाळी जेवायला तयार! :D

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 8:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> शिवाय ओठातून गेलेले सर्व पोटावर दिसलेच पाहिजे असा काही नियम नाहीये.

=))

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2008 - 11:50 am | स्वाती दिनेश

अग्रलेखाचा विषय आणि अर्थातच अग्रलेख आवडला. फिटनेस फंडा आवश्यक आहेच.
गुंडोपंतांच्या ' व्यायाम' ह्या लेखाची आठवण झाली.
स्वाती

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 11:59 am | विसोबा खेचर

अवांतर -

एकदा पुलं आणि अत्रे पुण्यातल्या एक रस्त्याने चाललेले असतात. रस्त्यालगतच्याच एका घरात, बाहेरील अंगणात एक मनुष्य आचकटविचकट योगासनं करत बसलेला असतो. दोन्ही पाय गळ्यात, हात भलतीकडेच अश्या काहिश्या चमत्कारीक अवस्थेत तो असतो..

त्याला पाहून पुलं अत्र्यांना म्हणतात -

त्याचा "ळ" झालाय बघा! :)

तशी अत्रे त्यावर पुलंना म्हणतात -

पुढे जरा चांगलं जगायला मिळावं म्हणून आत्ता कसा मरतोय पाहा लेकाचा! :)

तात्या.

मनस्वी's picture

1 Sep 2008 - 1:15 pm | मनस्वी

चतुरंग, लेख मस्त लिहिलाय, आवडला.
व्यायामाला वेळ देणे महत्वाचे. पण आज तेच मुष्कील होउन बसले आहे.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सर्किट's picture

1 Sep 2008 - 1:20 pm | सर्किट (not verified)

असा वेळ घालवून व्यायाम करायचा असेल, तर एवढा वेळच कशाला हवा रे आयुष्यात ?

व्यायामात वाया जाणारा वेळ काढून जेवढे आयुष्य मिळेल तेवढे सर आखोंपर !!!!

काहीतरी चांगले करण्यात तेवढाच वेळ घालवीन, म्हणतो !

-- सर्किट

चतुरंग's picture

2 Sep 2008 - 4:41 pm | चतुरंग

हम्म... खरंच असं आहे का सर्किटशेठ?
२४ तासातली ३० मिनिटं म्हणजे २% वेळ! एवढाही वेळ आपण आपल्यासाठी देऊ शकत नाही असे खरेच आहे का हो? आणि त्या दोन टक्क्याचा परिणाम उरलेल्या ९८% टक्क्यावरती सकारात्मक होतोच!
तुम्हाला जे काही 'चांगलं' करायचं आहे त्यासाठी चांगली तब्बेत असणे हे अधिक उत्साह, अधिक बळ, अधिक मानसिक स्वास्थ्य, अधिक एकाग्रता देऊन जाते. शिवाय मुलांसमोर तुम्ही एक चांगले उदाहरण आपोआप ठेवत असता. एक महिनाभर प्रयत्न करुन तर बघा.
शुभेच्छा!!

चतुरंग

सर्किट's picture

3 Sep 2008 - 7:33 am | सर्किट (not verified)

दोन टक्के वेळ व्यायामावर दिला, तर तुम्हाला मिसळपावावर रंजित ठेवण्याचे काम कोण करेल ?

ह्या दोन टक्क्यांत (महिन्याची सरासरी, रोजची नाही) केवढे मोठे काम करतो आहे ! तो वेळ व्यायामात घालवला, तर मिसळपावावरच आमची पंच्याहत्तरी होईल, आणी मग आमचा होईल प्रोफेसर देसाई. (म्हणजे कुणी वाचणारही नाही.) हे खरेच नको आहे रे रंगा. ज्या दिवशी काम करणे थांबवीन त्याच दिवशी नरकात (किंवा कॅपिटेशन फी भरण्याची क्षमता असल्यास स्वर्गात) जावे, असा प्लॅन आहे. हे व्यायामाने कसे शक्य होईल ?

-- सर्किट

अमेयहसमनीस's picture

3 Sep 2008 - 9:12 am | अमेयहसमनीस

वादा साठी ईथे लिहू नका.

अपण बा़की वेळेला अमेरिकेचे गुण्गाण गाता.

या विषया बद्दल अपले मत अमेरिकन लोकांशी जूलत नाही का?

माझी प्रतिक्रिया वाचा ( शेवटी आहे).

जास्त भांडण नको . शरीरा साठी ते चांगले नाही.

आपण अमेरिकन फिटनेस प्रोटो़कॉल या पूधे फोलो कराल अशी अशा आहे.

अमेय

भडकमकर मास्तर's picture

1 Sep 2008 - 2:54 pm | भडकमकर मास्तर

रंगाकाका,
उत्तम संपादकीय... आवडलेच... :) ( स्वगत : नुसतं आवडलं काय म्हणतोस?त्यानुसार कृती करायला जमते का ते पहा )
रोज रात्री ठरवतोय सध्या ... थोडाथोडा वेळ करतोही व्यायाम पण पुरेसा नाही...

कॉलेजमध्ये असताना मी अगदी बारीक वगैरे होतो, ( उंची ५'११'' आणि वजन ६२ किलो .... दहा वर्षांतच वजनाचा काटा ८२ किलोच्या वर पोचलाय).... पाच वर्षांपूर्वीपर्यंत बर्‍या दर्जाचं क्रिकेट नियमित खेळत असे,दर रविवार सकाळ .... आता ते बंद झाल्यापासून शरीराला हालचाल कमी, चारचाकी गाडीचे आगमन , चालणे बंद, बेल्टच्या आसपास पोटाचा घेर जाणवण्यासारखा

तुमचे हे सारे विवेचन हल्ली फार जाणवायला लागलंय .... ( अनिल अंबानीचे उदाहरण मीही व्यायामाला वेळ नाही म्हणणार्‍या अनेक पेशंट लोकांना देतो...स्वतःच लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे...)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

1 Sep 2008 - 4:19 pm | आनंदयात्री

>>रोज रात्री ठरवतोय सध्या ... थोडाथोडा वेळ करतोही व्यायाम पण पुरेसा नाही...

हॅsss .. त्यात ठरवायचेय काय मास्तर ??
पुरेसा नाही म्हणतायं .. बरं बरं !!

;)

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 5:58 pm | चतुरंग

कॉलेजातले वजन हे सर्वसाधारणपणे आदर्श मानायला हरकत नसावी. ५'११" उंचीला ७० किलो हे आदर्श वजन आहे. त्यामुळे तुम्हाला वजन घटवायला हवे हे नक्की.
वजन अगदी ग्रॅमग्रॅमने वाढत जाते, हलक्या पावलाने, मांड्या, कंबर, पोटाचा घेर वाढतो आणि कमी करायला जाम प्रयत्न करायला लागतात.

आहाराच्या बाबतीत मी करुन बघत असलेला एक उपाय म्हणजे थोडेसेच कमी खाणे. म्हणजे सगळे खायचे पण किंचित कमी. म्हणजे गुलाबजाम आवडतात ना? १० खाणार असलात तर आठ खा आणि एरवीची भात पोळी थोडीशी कमी खा. एकूण कॅलरीचा बॅलन्स ठेवा. म्हणजे खाल्ले नाही असे वाईट वाटत नाही आणि वजनही बेफाम वाढत नाही!
वजन बरेच जास्त असेल तर मात्र रोजच्या जेवणातच थोडे रेशनिंग करावे. दोन पोळ्यांऐवजी दीड पोळी, अर्ध्या पोळीची जागा सॅलड्/कोशिंबीर अशी भरुन काढावी, रात्री भात कमी असं.

'बॉडी मास इंडेक्स' साठी हा दुवा पहा!

चतुरंग

अनिल हटेला's picture

1 Sep 2008 - 2:55 pm | अनिल हटेला

पुढे जरा चांगलं जगायला मिळावं म्हणून आत्ता कसा मरतोय पाहा लेकाचा!

हे हे हे !!!

पण यंदा सुरुच करावा म्हणतो व्यायाम !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पद्मश्री चित्रे's picture

1 Sep 2008 - 3:31 pm | पद्मश्री चित्रे

आणि विषय दोन्ही छान.
असं वाचलं की- मी मनात घोकते-"छे, व्यायाम करायला हवा हं"..
करते ही २/४ दिवस आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या..'
आता करतेच परत सुरुवात...
(गणपतीत मोदक मनसोक्त खावुन झाले की लग्गेच..)

लिखाळ's picture

1 Sep 2008 - 4:02 pm | लिखाळ

चतुरंग,
सुंदर लेख.

व्यायामाचे महत्त्व लहानपणीच पटले आहे. शरीर कार्यक्षम राहिले पाहिजे हा व्यायामाच मुख्य हेतू अनेक लोक दुर्लक्षिताना दिसतात. खासकरुन तरुण लोक. व्यायाम म्हणजे जीम मध्ये जाउन मसल्स तयार करणे आणि त्याला वेळ नसेल तर काहिच न करणे अशी वृत्ती अनेक आसपासच्या तरुण मुलांमध्ये पाहिली आहे. पण मैदानी खेळ खेळणे, सूर्यनमस्कार, पळणे, घरात ताणाचे व्यायाम करणे, आडवे पडुन हवेत सायकल चालवणे अश्या व्यायामांनी शरीर चपळ कार्यक्षम राहते आणि तेच गरजेचे आहे असे वाटते.

अगदी रोज नसले तरी मी वरचेवर घराच्या छताची पाहणी करत असतो :)

जो मनुष्य सहजी उड्या मरु शकतो त्याचे शरीर बर्‍यापैकी योग्य स्थितीमध्ये आहे असे मी मानतो :)
--(सूर्यनमस्कार प्रेमी) लिखाळ.

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 6:01 pm | चतुरंग

आपण तब्बेतीबाबत जागरुक आहात हे पाहून आनंद झाला!
तुमचे म्हणणे बरोबर आहे, लंगडी घालणे, दोरीच्या उड्या असे तुम्ही करु शकत असाल तर सर्वसाधारणपणे तुम्ही शेपमधे आहात असे मानायला हरकत नाही.
अधूनमधून छताची पहाणी केलेली चांगलीच! ;)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2008 - 4:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अधूनमधून छताची पहाणी केलेली चांगलीच!
म्हणजे योगसाधना आणि शवासनाबद्दल बोलताय का तुम्ही लोक?

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 8:27 pm | लिखाळ

"घर शाकारण्याची वेळ ही पावसाळा सुरु झाल्यानंतर नसून उन्हाळ्यातच असते"
ही म्हण वरील लेखात चतुरंगांनी वापरली आहे. तो संदंर्भ घेउन मी छताची पाहणी करतो असे लिहिले आहे.
--लिखाळ.

प्राजु's picture

2 Sep 2008 - 7:12 pm | प्राजु

खूपच छान लेख आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रहाट गाडगं थांबवून विचार करायला लावणारा लेख आहे.
चालणे हा उत्तम व्यायाम आहे असे कोठे तरी कोणीतरी म्हंटल्याचे आठवते.
लेकाला जेव्हा प्रिस्कूल ला सोडायला चालत जात होते तेव्हा वजन बरंच कमी झालं होतं. पण भारताच्या दौर्‍यामध्ये अंमळ वजन वाढलचं.
आता पुन्हा चालण्याचा व्यायाम सुरू करायचा विचार आहे.
हे मात्र नक्की की, वजन कमी झाल्यावर एक प्रकारच्या वेगळाच उत्साह वाटू लागतो आणि स्त्रेंथ ही वाढते.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

1 Sep 2008 - 5:48 pm | शितल

चतुरंगजी,
सुदृढ लेख.
मी पुण्यात असताना जीम ला जात होते येथे मात्र नियमीत होत नाही. पण चालण्याचा व्यायाम करतेच.
:)

विश्वजीत's picture

1 Sep 2008 - 6:09 pm | विश्वजीत

एक सुविचार वाचला होता - 'लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी बरी'. तेव्हा हा बाळबोध सुविचार वाचून पोट धरधरून हसलो होतो. पण अलीकडे लक्षात आले की ती वस्तुस्थिती आहे.

माझ्या नातेवाईकांपैकी आणि परिचितांपैकी जे अजूनही नेमस्तपणे जीवन कंठत आहेत ते ठणठणीत आहेत. त्यांच्याकडे महागड्या रेस्तराँमधे जाऊन उडवण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे ते घरी केलेले साधे आणि सकस अन्न जेवतात, चालत जाण्यासारखी कामे चालत जाऊनच करतात कारण रिक्षा आणि टॅक्सीचे दर भरमसाठ वाढले आहेत, इत्यादी. माझ्या मित्रांपैकी कित्येकजण जेव्हा सकाळची ऑफिसची बस चुकवून कारने येतात आणि विकांताला ठराविक मॉल्-मल्टिप्लेक्समधे जाऊन जीव रमवतात ते पहाता मला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते.

सुदैवाने मी उशीरा का होईना जागा झालो आणि नियमित व्यायाम करू लागलो. अजूनही मन वढाय वढाय आळशीपणाकडे झुकत असते पण मी त्याला ताब्यात ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

सुचेल तसं's picture

1 Sep 2008 - 6:49 pm | सुचेल तसं

चतुरंग साहेब,

अप्रतिम अग्रलेख. खुप आवडला कारण लेखातली भाषा सहज आणि सोपी वाटली. भाषाप्रभुत्व दाखवण्याचा मोह टाळून विषयाशी प्रामाणिक राहिलात त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

शेवटच्या परिच्छेदात तुम्ही सुर्यनमस्कारांचा उल्लेख केला. मला वाटतं की हा व्यायामाचा प्रकार सोपा, घरच्या घरी करण्यासारखा आणि बिनखर्चिक आहे. तुम्ही किंवा मिपावर हजर असलेल्या एखाद्या तज्ञ सभासदाने कृपया ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 8:18 pm | चतुरंग

गुगलून पाहिले आणि सूर्यनमस्कार सापडले! :)

अगदी सुरुवातीपासून पायरीपायरीने संपूर्ण कृती दाखवली आहे.
ह्यात घ्यायची काळजी एकच. व्यायामाची सवय नसेल तर एकदम सर्व पोझिशन्स पहिल्याच झटक्यात जमतील/जमाव्यात असा आग्रह धरु नये.
जितपत जमतील तितपत करुन नमस्कार पूर्ण करणे म्हत्त्वाचे सरावातील सातत्य जास्ती मोलाचे.
आधी सांधे मोकळे करुन घ्यावेत मग हळूहळू काही दिवसात जमू लागेल. सुरुवातीला ५ नमस्कारातच फासफूस होते असा स्वानुभव आहे! ;)
एखाद्या आठवड्यात ८-९ पर्यंत आणि साधरण २ आठवड्यात १२ जमतात. पुढे शक्य असल्यास २१ पर्यंत वाढवायला हरकत नाही.
१२ नमस्कारांचा हा व्यायाम १५ मिनिटात होतो आणि सर्वांगसुंदर आहे.

चतुरंग

सुचेल तसं's picture

2 Sep 2008 - 4:41 pm | सुचेल तसं

लिंक बद्दल धन्यवाद चतुरंगराव!!!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

ऋषिकेश's picture

1 Sep 2008 - 9:18 pm | ऋषिकेश

सूर्यनमस्कार यज्ञावरून रोचक चर्चा उपक्रमावरही झाली होती ती इथे वाचता/बघता येईल
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विकास's picture

2 Sep 2008 - 2:12 am | विकास

चतुरंगराव,

लेख मस्त आहे आणि माहीतीपूर्ण आहे.

सूर्यनमस्कारासंदर्भात वर हृषिकेशने दिलेल्या सूर्यनमस्कार यज्ञात भाग घेतला होता. एकेका दिवशी जास्तीत जास्त १०४ (१३ चा एक सेट) सूर्यनमस्कार घातले होते. पंधरा दिवस हा कार्यक्रम चालू होता. नंतर मात्र त्यातील १३ पण नियमित पणे घातले गेले नाहीत. कधीतरी घालतो. कळत पण वळत नाही...सध्या नाही पण, योगासने घातली जातात. तरी देखील पश्चिमोत्तानासन पाहीले की "गुजरा हुआ जमाना" म्हणावे लागते... :-(

समरव्हील मधे टफ्टस युनिव्हर्सिटी आणि शहर सरकार मिळून "शेप अप समरव्हिल" म्हणून कार्यक्रम चालू केला होता. त्यात लहान मुलांचे शाळेतले खाणे बदलण्यापासून ते अनेक गोष्टी बदलल्या गेल्या. "शेप अप.." सर्टीफाईड रेस्टॉरंटस तयार केली जिथे खाण्याचा पोर्शन योग्य पण कमी दिला जातो. समरव्हील मधे संपुर्ण शहराचा "चालणार्‍यांसाठी"नकाशा तयार केला गेला ज्यात कुठल्या रस्त्यावरून कुठपर्यंत चालले की किती मैल/मिनीटे चालणे होऊ शकेल जे आरोग्यदायी असेल हे सांगितले आहे इत्यादी...

सुनील's picture

1 Sep 2008 - 7:40 pm | सुनील

एका वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन!

जर तुम्ही तुमची संपत्ती गमावलीत तर काहीच गमावले नाही, आरोग्य गमावले तर थोडे काही गमावले आणि चारित्र्य गमावलेत तर सर्वस्व गमावलेत. अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. पैकी चारित्र्याचा भाग वगळला तरी आरोग्याचे महत्व संपत्तीपेक्षा जास्त असल्याचे अधोरेखीत केले गेले आहे. जे पटण्यासारखे आहे.

व्यायाम आणि योग्य आहार ह्या दोन्हीचा अवलंब केलात तर उत्तम आरोग्य प्राप्त होते.

चांगल्या लेखाबद्दल पुन्हा एकवार धन्यवाद...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पिवळा डांबिस's picture

1 Sep 2008 - 9:04 pm | पिवळा डांबिस

रंगाबाबू, लेख आवडला!
अगदी पटलाही!

आता उद्यापासून माझ्या आभासी जालप्रतिमेला रोज पहाटे निदान एक तास कडक व्यायाम करायला लावणार आहे.....
कसा करत नाही तो शिंचा 'पिवळा डांबिस' तेच बघतो.....
:)

चतुरंग's picture

1 Sep 2008 - 9:40 pm | चतुरंग

कसला ढेरपोट्या झालाय तो 'येलो नॉटी'! ;) काही म्हणता ऐकत नाहिये! :B

(खुद के साथ बातां : रंगा, आभासी ढेरपोट कसं बरं दिसत असेल? :W :? )

चतुरंग

सर्वसाक्षी's picture

1 Sep 2008 - 10:44 pm | सर्वसाक्षी

आपण लिहिलेत ते सगळे अगदी सत्य आहे आणि स्तुत्यही. कळतय पण वळत नाही हो! चांगले मस्त पैकी दोघे - तिघेजण सकाळी येउर ला चढुन जायचो आणि गावाच्या शिवेवरून परत यायचो, बरे वाटाचे. पण एकदा काही कारणाने खंड पडला की पुन्हा नेटाने सुरू करणे अवघड आहे.

असो आपल्या लेखाने स्फूर्ति दिली आहे आता पुन्हा सुरू केले पाहिजे. तात्या, तू येणार कारे?

विसोबा खेचर's picture

1 Sep 2008 - 11:15 pm | विसोबा खेचर

तात्या, तू येणार कारे?

हो रे! तसा विचार तरी आहे! बघू, जमलं तर येऊ, तू हो पुढे! :)

आपला,
("योगापेक्षा भोग मोठे आहेत!" यावरच ठाम विश्वास असणारा!) तात्या.

रामदास's picture

1 Sep 2008 - 10:57 pm | रामदास

वय वर्षं ८६. रोज सूर्यनमस्कारासहीत २५ बैठका मारतात. छाती आणि पोटाच्या मापात पाच इंचाचा फरक आहे.(पोट पाच इंचानी कमी आहे.)रोज हौसेपोटी शेतावर जातात. मोगरा आणि तुळशीची लागवड सांभाळतात.येताना बर्‍याच वेळा सहा मैल चालत येतात. यांच्या घरात सगळ्यांनाच व्यायामाची आवड आहे.यांची आई वयाच्या १०४व्या वर्षी गेली. शंभरीपर्यंत ठणठणीत होती.

चतुरंग's picture

2 Sep 2008 - 4:46 pm | चतुरंग

आदर्श जीवन म्हणावे असे आहे! निरामय आरोग्य हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र! :)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2008 - 12:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यायामाचे महत्त्व पटवून देणारा पुन्हा एक सुंदर लेख.
बाकी व्यायाम केला पाहिजे यावर अनेकांचे एकमत होते, फक्त त्याची अंमलबजावणीचा प्रश्न उरतोच. व्यायामाची सुरुवात जोरदार होते आणि त्याचा समारोप महिनाभराच्या आत होतो. व्यायामात सातत्य महत्त्वाचे असते, मात्र त्याचाच अभाव बर्‍याचदा दिसतो. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे बैठे काम, आहाराचे नसलेले वेळापत्रक, तळलेले पदार्थ आणि इतर कारणांमुळे मधुमेह आणि इतर अनेक आजार एक वजनदार शरिराची वाट पाहात असतात, तेव्हा त्याला चुकवण्यासाठी शरिरातली साखर जाळण्यासाठी आणि सुखाच्या जीवनासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाहीच.

[प्रस्तावना - मिसळपावच्या ईस्ट-कोस्ट कट्ट्याच्यावेळी आमची 'अंमळ सुधारलेली तब्बेत' बघून प्रा.डॉ. दिलीप बिरुटे ह्यांनी त्यांच्या प्रेमळ टीकेची डबल बॅरल आमच्या पोटाला टोचली आणि आम्ही खडबडून जागे झालो! काहीतरी करायलाच हवे ह्या तीव्र इच्छेने व्यायाम सुरु केला दीड किलो वजन कमी करुन आरोग्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आणि मग ह्या लेखाला हात घातला. प्रा.डॉं.चा मी आभारी आहे.]

आमची डबल बॅरल आपल्याला टोचल्यामुळे एक चांगल्या लेखाची निर्मिती झाली हे काय कमी आहे. :)खरं म्हणजे आपल्या लेखाबद्दल आम्हीच आपले आभारी आहोत. कारण आम्हाला खरच व्यायामाची गरज आहे. आम्ही दर सोमवारी फ्रेश माइंडने सुरुवात करु म्हणतो. पण काही किलोमिटर फिरायला घेऊन जाणारा सोमवार अजून उजाडलाच नाही. :(

चतुरंग's picture

3 Sep 2008 - 5:54 pm | चतुरंग

आपल्या व्यायामासाठी गणेशचतुर्थीच्या शुभदिनी शुभेच्छा!
थोडाथोडा सुरु करा रोज ३० मिनिटे चालणे. मुख्य म्हणजे अतिशय उत्साही वाटत असेल त्या दिवशी व्यायामाला सुरुवात करा.
महिनाभर तसेच ठेवा. चालायचा रस्ता बदलता ठेवा, बरोबर उत्साही कंपनी असल्यास फारच उत्तम.
व्यायामाचा प्रकार बदलता असूदे. घराभोवती बाग असेल तर अधून मधून तिथे काम करा.
कामाचे ठिकाण सायकलवरुन जाण्याजोगे असल्यास आठवड्यातून काही दिवस सायकलही वापरु शकता. म्हणजे व्यायामही झाला आणि वेगळा वेळ काढायला नको. (कोण काय म्हणेल ह्या भीतीपोटी आपण कित्येकदा चांगल्या गोष्टी टाळतो).

चतुरंग

चित्रा's picture

4 Sep 2008 - 12:48 am | चित्रा

अग्रलेख खूपच गरजेच्या विषयाबद्दल आणि खूपच चांगला सल्ला दिलात..

केशवसुमार's picture

2 Sep 2008 - 2:04 am | केशवसुमार

रंगाशेठ,
उत्तम लेख.. आवडला
(सुधरूड ) केशवसुमार
स्वगतः
रंग्या काय सगळे ठिक ना? लेका व्यायम करतोस आणि डबल बॅरलला घाबरतोस?
बाकी काही ही म्हण रंग्या तुझा फोटो बघता हा कल्पना विलास उत्तम !!
(शवासनप्रेमी)केशवसुमार

चतुरंग's picture

2 Sep 2008 - 4:52 pm | चतुरंग

हो बरोबर आहे माझा कट्ट्यावरचा फोटू बघता हा कल्पनाविलास वाटणे अगदी खरे आहे! त्यामुळेच प्रस्तावना दिली!
आणि व्यायाम केला तरी ड्बल बॅरलसमोर कोणी वाचत नाहीच!

(खुद के साथ बातां : ह्या केशूशेठला जळवण्याकरता माझा सपाट पोटाचा फोटू त्याला किटी दिवसांनी बरं पाठवता येईल? :W :? )

चतुरंग

एकलव्य's picture

3 Sep 2008 - 4:18 am | एकलव्य

संपादकीयात मोठमोठ्या समस्यांचाच समाचार घ्यायचा हा अलिखित नियम बाजूला सारून एका कळीच्या विषयावर चतुरंगांनी छानच लिहिले आहे. खुमासदार लिखाण आणि सरळसोट विचार दोन्ही आवडले.

धन्यवाद!

(क्रेडिट कार्डचा बॅलन्स कॅरि फॉरवर्ड न करणारा) एकलव्य

बेसनलाडू's picture

3 Sep 2008 - 4:25 am | बेसनलाडू

संपादकीय. छान. आवडले.
(धडधाकट)बेसनलाडू

अमेयहसमनीस's picture

3 Sep 2008 - 6:22 am | अमेयहसमनीस

लेख आवडला.

सधारण पणे रोज तास भर व्यायाम करणे गरजेचे आहे.

३० मि कारडियो ( पळणे , पोहणे )

३० मि योगा

अमेय

अमेयहसमनीस's picture

3 Sep 2008 - 8:59 am | अमेयहसमनीस

http://circ.ahajournals.org/cgi/reprint/CIRCULATIONAHA.107.185649

लेटेस्ट गाईड लाईसन जरुर वाचा.

डॉ. अमेय

धनंजय's picture

3 Sep 2008 - 9:32 am | धनंजय

कळते पण वळत नाही.

उद्या धावायला जाणार आहे. साथीला एक मित्र येणार आहे (एकटा मी नेहमी टंगळमंगळ करतो). शिवाय एक ध्येय आहे - ऑक्टोबरमध्ये एक १० किमिची शर्यत धावायची - आणि शेवटच्या रेषेपर्यंत पोचायचे (ते जिंकायचे वगैरे ध्येय वेगळ्या लोकांकरिता).

अशा काही युक्त्या करून व्यायामाची गोडी, आणि सवय लागू शकेल, असे वाटते.

चतुरंग's picture

3 Sep 2008 - 3:37 pm | चतुरंग

ह्याही उपक्रमाला शुभेच्छा!

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2008 - 1:03 pm | प्रकाश घाटपांडे

मी स्वतः हृदयविकाराच्या अनुभवातुन गेलो आहे. अगदी अभय बंगांसारख नाही. पण लग्न व हृदयविकार एकाच वर्षी.
डॉक्टरांनाच समजल नाही. मायोकार्डिय इन्फार्क्षन.

प्रकाश घाटपांडे

चतुरंग's picture

3 Sep 2008 - 3:45 pm | चतुरंग

एम्.सी.आय. म्हणजे तुम्ही 'वर' हात लावून आलेले आहात एकदा! नशीबवान आहात.
महाराष्ट्र पोलीस खात्यात हृदयविकार हा सगळ्यात जास्त असलेला विकार आहे असे मध्यंतरी ई-सकाळ ला वाचले होते.
रिटायर झालात चांगले आहे! चालण्याचा व्यायाम करा, काळजी घ्या, तब्बेतीत रहा! शुभेच्छा!

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2008 - 5:36 pm | प्रकाश घाटपांडे

पोलिस खात्यात हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे हे तपासणीतच समजले. ई सकाळच्या वृत्तात त्याचा उल्लेख असला तरी कारणांबाबत मतभिन्नता आहे. माझे मते
१) सहन ही होत नाही व सांगता ही येत नाही अशी परिस्थिती
२) आरोग्य जागरुकतेचा अभाव
३) स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसणे
४) व्यसनांचा अतिरेक
समूहात वावरताना तुम्ही स्बतःचे राहत नाही.
आरोग्या बाबत समाजात अनेक अंधश्रद्धा, गैरसमजुती आढळतात. तज्ञातील मतभिन्नता याला अधिक खतपाणी घालते. हार्ट अटॅक बाबत तर भय व अज्ञान फिल्मी दुनियेमुळे देखील आलेले आहे. माझ्या (त्यांच्या मते) अतिचिकित्सकपणा मुळे डॉक्टर कधी कधी वैतागायचे.
प्रकाश घाटपांडे

कलंत्री's picture

3 Sep 2008 - 7:50 pm | कलंत्री

वजन कमी करण्याचा आणि खात्रीचा उपाय मी स्वानुभवाने सांगत आहे. कृपया मिपाकरांनी याचा लाभ घ्यावा.

रोज सकाळी अनाशी पोटी एक चमचा ( ४/५ ग्रॅम) साजूक तुप घ्यावे आणि त्यावर एक भांडे/ प्यालाभर साधे कोमट पाणी प्यावे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक कप साधे गाईचे कढत दुध आणि चमचाभर तुप एकत्र घ्यावे.

मी हे २/३ महिने केल्यानंतर माझे वजन ३ किलोने कमी झाले. ( ५'६" आणि पूर्वीचे वजन ६९ किलो होते ते आता ६६ किलो आहे.)

व्यायाम आणि आहार नियंत्रण हे उपाय आहेतच पण ते योग्यालाच शक्य आहे हे मी मान्य करतो. आजच्या काळात साजूक तुपाचा वापर करूनही वजन कमी होऊ शकते.

आपल्या अनूभवाची वाट पाहत आहे.

देवदत्त's picture

3 Sep 2008 - 10:56 pm | देवदत्त

सुंदर लेख. एकदम माहितीपूर्ण व प्रेरणादायी.

४ वर्षांपुर्वी व्यायामशाळेत जायला सुरूवात केली होती. पण नंतर काम वाढले तेव्हा जाणे कमी झाले. मग जॉब बदलला, शहर बदलले. तरीही प्रयत्न चालू ठेवला. पण नंतर कामाचा व्याप खूप वाढला तर फक्त पैसे भरणे झाले पण जिम मध्ये जाणेही जमले नाही. बाकी तसा चालण्याचा आधीपासूनच कंटाळा.
तरीही पुन्हा सुरू करेन.

एक मार्मिक वाक्य आठवले:
लोक तरूणपणी पैसा कमावण्याकरीता शरीर खर्च करतात, नंतरच्या आयुष्यात शरीर कमावण्याकरीता पैसा खर्च करतात.

चालायचा कंटाळा असेल पण सायकल चालवता येत असेल तरी चालेल. मस्तपैकी टांग टाकून बसावे आणि साताठ किलोमिटर भटकून यावे झक्कास व्यायाम होतो!

चतुरंग

भाग्यश्री's picture

4 Sep 2008 - 12:39 am | भाग्यश्री

ह्म्म.. हा विषय म्हणजे माझी सद्ध्याची डोकेदुखी आहे. नेहेमीच पाप्याचं पितर म्हणतात तशी बारकुडी असल्याने, बॅडमिंटन, पोहणे वगैरे व्यायाम इनफ असायचे.. पण युएसला आल्यापासून वजन वाढलं.. व ते कसं कमी करावं कळत नाहीए.. आय मिन, नक्की आहार कसा असावा? शेवटी उत्तम आरोग्यासाठी आहारही महत्वाचा.. व्यायाम थोडाफार होतो, जिम, अधुन मधुन ३-४ मैल चालणं वगैरे.. पण नियमित नाही.. तो नियमित कसा करावा व आहार कसा असावा हे कुणीतरी सांगा ! :)

बाकी अग्रलेख उत्तम आहे ! हा विषयच मुळात इतका महत्वाचा आहे.. नियमित व्यायाम केल्याने मन प्रसन्न होतं वगैरे वाक्यं क्लीशे असलं तरी खरं आहे.. पण ते जमत मात्र नाही!

संदीप चित्रे's picture

3 Sep 2009 - 1:59 am | संदीप चित्रे

लेख एकदम तळमळीने लिहिला आहेस रे रंग्या...
व्यायामाची सगळ्यात मोठी भानगड म्हणजे तो नियमितपणे करावा लागतो !!

या लेखाचा दुवा दिल्याबद्दल विकासला खास धन्स.

अवांतरः खालेल्या कॅलरीजचा आणि व्यायाम करून खर्च केलेल्या कॅलरीजचा वगैरे हिशोब ठेवायचा असेल तर खाली दिलेल्यांपैकी कुठलीही वेबसाईट उत्तम आहे.

www.livestrong.com
www.sparkpeople.com

फारएन्ड's picture

3 Sep 2009 - 2:19 am | फारएन्ड

अतिशय चांगला लेख आहे. एकदम आवडला.

सुनील's picture

3 Sep 2009 - 6:50 am | सुनील

लेख आणि अनेकांनी सांगितलेले उपाय चांगले आहेत. फक्त ते अमलात कसे आणायचे तेवढाच एक छोटासा प्रश्न आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती२'s picture

3 Sep 2009 - 6:07 pm | स्वाती२

महत्वाच्या विषयावरचा अतिशय सुरेख अग्रलेख.
वेळेअभावी जर सलग अर्धा तास व्यायाम करता येत नसेल तर १०-१० मिनिटांत उड्या मारणे, धावणे वगैरे नक्किच करता येते. मी पूर्वी सलग वेळ मिळत नाही म्हणून काहिच करायची नाही. मात्र आईने वेळीच कान उपटले. तेव्हा पासून १०-१५ मिनिटे जमेल तसे हात पाय हलवायला लागले. आता सकाळी १५ मिनिटं, दुपारी १० मिनिटं असं करत ४०-५० मिनिटांचा व्यायाम सहज होतो. खाण्याच्या बाबतीतही थोडेसे कमी खाणे, जंक फूड, सोडा, ज्युस या गोष्टी विकत न घेणे, ब्रेकफास्ट करणे याचा खूप फायदा झाला.

Meghana's picture

14 Sep 2009 - 4:12 pm | Meghana

वाचायचा राहिला होता.

नरेंद्र गोळे's picture

15 Sep 2009 - 4:19 pm | नरेंद्र गोळे

एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधणारा अभ्यासपूर्ण लेख.

चतुरंग महोदय, याखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन.

चित्रगुप्त's picture

29 Jan 2023 - 3:57 pm | चित्रगुप्त

२००८ सालचा हा धागा. त्याकाळी 'संपादक' चतुरंग हे होते असे दिसते. परंतु २०१७ नंतर त्यांनी इथे काही लिहीलेले दिसत नाही.