खाणं...चरणं...हादडणं...

मन's picture
मन in काथ्याकूट
20 Sep 2015 - 10:27 pm
गाभा: 

पुन्हा एकदा डोक्यात खाण्याबद्दल जे काही येतय ते लिहून काढावं म्हणतोय.
.
.
"तुझा आहार चांगलाय हां" अशी कमेंट/तारिफ(की टॉण्ट/टोमणा?) अजून एकदा ऐकायला मिळाला. कुणासोबत पंगतीला/बुफेला वगैरे बसणं झालं की अधूनमधून अशा कमेंटा मिळतातच. तरी मागील आठेक वर्षे बी एम आय बावीसेकच्या घरात आहे. वेगळा असा व्यायाम/पोहणं/जॉगिंग असंही काही करणं जमत नाही. जवळजवळ पूर्ण बंद. दिसायला जरी असं दिसत असलं की एकूणात मी बरच हादडतोय; तरी माझे खाण्याचे तसे बर्रेच नखरे आहेत. पण एकूणात काहीतरी बरोबर(किंवा निदान ठीकठाक) सुरु असणार. म्हटलं आठवून पहावं.
.
.
मला ताजं,ओलं नारळ आवडतं. दोन तीन आठवड्यात जाता येता नारळ फोडायचा आणि मस्तपैकी ताजा नारळ तसाच खायचा. किंवा चटणी वगैरे किंवा पोहे वगैरे इतर कशावरही भुरभुरुन.अर्ध्या दिवसात एक नारळ ह्या स्पीडनं मी नारळ कैकदा संपवलाय इतकं मला नारळ आवडतं. फोडल्यावरचं ते गोडसर पाणी तृप्त करुन जातं. एकावेळी अनेक धान्यं पोटात ढकलणं जमत नाही. म्हणजे भात आवडत नाही असं नाही; पण पोळी भाजी वरण असेल खाण्यात तर वेगळा भात खावासा वाटत नाही. भात खाल्ला तर त्या दिवशी मी फुल्ल सौथ इंडियन स्टाइल नुसताच भात हाणतो. म्हणजे ताक भात, वरण भात, ओली चटणी आणि भात, कोरडी चटणी-भात , भाजी-भात. चांगला पोटभर खातो.मुख्य आहार भाकरी आहे. बहुतांश वेळेस ज्वारीची भाकरी असते. थंडीच्या दिवसात वगैरे बाजरीही असते. का कुणास ठाउक मिरची-तिखट अजिबातच सोसवत नाही. फार फार कमी तिखट खातो.कित्येकदा अदरवाइज सपक म्हटलं जाइल असं खाणं असतं. माझ्या घरचं वरण हे सैलसर, वाहत जाणारं नसतं. घट्ट वरण असतं. ते एकावेळी वाट्या-दोन वाट्या खायला मजा येते. इतरांसारखच तुरीच्या डाळीचं वरण असलं, तरी लंचला पिठलं भाकरी खूपदा होते. बेसन(म्हंजे चणा डाळ) पोटात जाते. उडीद वडे आवडतात. नुसतीच तुपाच्या वाटीभर उडीद रात्रभर भिजवत ठेवून खायलाही आवडते अधून मधून. खरं तर भिजवत ठेवून खाणं हा प्रकारच प्रच्चंड आवडतो; कारण मुळात खायची आवड असली तरी स्वयंपाकाची आवड नाहिये. दरवेळी आपल्या नखर्‍यांसाठी दुसर्‍यास ताप देणेही नको वाटते. स्वतःच काहीतरी भिजायला टाकायचं आणि नंतर गट्टम करायचं हे आवडतं. मग ते तुपाच्या वाटीभर उडीद असोत, वाटीभर हिरवे मूग नैतर मटकी असोत किंवा नखभर मेथ्या असोत.
आहारातून हल्ल्ली दूध ऑल्मोस्ट हद्दपार झालेलं असलं तरी आत्ताआत्तापर्यंत दुग्धजन्य पदार्थ प्रच्चंड खायचो. घरी दूधवाले मामा येणं फार पूर्वीच बंद झालं असलं तरी बाजारातून दूध आणून पित असे. अर्ध्या लिटारची पिशवी आणायची; तापवायची आणि तसच आख्खं पिशवीभर दूध साखर वगैरे काहीच न घालता पिउन टाकायचं. घसा वगैरे बरा रहावा म्हणून पावसाळ्यात गरम दूध आणि हळद रात्री पित असे. जाता येता हाताला जी जुडी लागेल ती चरत बसणे ही अजून एक आवड. कोथिंबिर असू दे नैतर पुदिना, किंवा अगदि कडिपत्ता आणि तुळसही. जाता येता हे समोर दिसत राहतात तेव्हा दोन-चार पानं ,दोन-चार पानं असं चरणं सुरुच असतं; कैकदा स्वतःच्याही नकळत. विशेषतः कोथिंबिरीची आख्खी जुडी कैकदा नुसतीच संपवली आहे. फळं खाण्यासाठी आणी त्यांचं खासम खास मार्केट वगैरे शोधण्यासाठी विशेष कष्ट घ्यावेसे वाटत नाहित. जाता येता डाळिंब केळी संत्रं मोसंबी सफरचंद पेरु पपई वगैरे किंवा सीझन नुसार टरबूज आंबा जांभूळ करवंद द्राक्षं खाणं होतच. लिंबू विशेष प्रिय. दिवसभरात एखादं आख्खं लिंबू पिळलेलं.... पोटात जात असावच. वरणावर वगैरे टाकून घेतो किंवा क्वचित जेवण झाल्यावर लिंबू पेल्यात पिळून घेतो. त्यावर त्या लिंबाच्या रसाइतकच...म्हणजे अगदि थोडं पाणी टाकायचं आणि ते आंबट्ट प्रकरण तसच साकह्र मीठ वगैरे न घालता पिउन टाकायचं. ग्लासाला लागलेला उरलेला लिंबाचा रस संपावा म्हणून अजून दोन-तीन वेळेस ओ़ंजळभर पाणी त्यात टाकत पेला हलवत हलवत पाणी पिउन टाकायचं; मजा येते. एरव्हीही उन्हाळ्यात वगैरे आख्खं लिंबू लहान गडू भरुन पाण्यात टाकतो आणि किंचित मीठ टाकून तसच पितो--साखरेशिवाय.
.
.
हलवाई-मिठाईची दुकानं विशेष प्रिय होती. लै हादडत असे पूर्वी. पण नंतर नंतर रस वाटेनासा झाला. त्यात पुन्हा दुधासाठी जे काही केलं जातं ते ऐकून वाचून दूध व दुग्धजन्य पदार्थ नकोसे वाटू लागले. हळूहळू सुटत गेले. मिठाईही त्यातलीच. मात्र त्यापूर्वी काका हलवाई, चितळे, प्रदीप वगैरेंपैकी कोणाकडे काय काय चांगलं मिळतं त्याचा तुलनात्मक अभ्यास वगैरे करायला मजा यायची. एकच पदार्थ ह्या सगळ्यांकडून थोडा थोडा आणून खाउन पहायचा. अशी बर्‍र्याच पदार्थांची तुलना केली. मिल्क केक, कलाकंद, अंजीर बर्फी हे त्यातल्या त्यात विशेष आवडत. रसगुल्ला, गुलाबजाम ह्यातल्या कोणत्याही प्रकारात काही रस वाटला नाही.(कुणी पानात वाढला तर आवर्जून संपवत असे; पण स्वतःहून खाण्यात रस नसायचा.) श्रीखंड आम्रखंड जीव की प्राण. ढोकळे आवडत नसत. अगदि क्वचित कचोरी समोसे खाइ. पण अगदि क्वचितच. वर्षभरात एखादा वगैरे. त्यातही गोल चेंडूसारखी गरगरीत बंदिस्त कचोरी विशेष प्रिय.सुरळीच्या वड्या आवडतात; बाखरवडीही आवडते. काका हलवाईची बाखरवडी चितळ्यांहून अधिक आवडते. लहान बकरवड्यांपेक्षा मोठ्या वड्या आवडतात. जाता येता भाजलेले शेंगदाणे खायला मजा वाटते. फुटाणे आवडतात. पिवळे फुटाणे व काळे फुटाणे--दोन्ही आवडतात. सालीसकट खातो फुटाणे. आंबे आणि कैर्‍याही सालीसकट खातो. प्रवासात असेन तर बस ज्या ठिकाणी थांबते तिथे बटाटा वडा, मिसळ वगैरे पदार्थच तेवढे काय ते मिळतात. ते आवडत नाहित. प्रवासात जाताना सोबत राजगिरा लाडूचा एखादा पुडा आणि सोबत केळी पेरु वगैरे घेउन जातो. प्रवासात तेवढच खातो. कुठे इडली वगैरे मिळाली तर तीही खातो. उडीद वडे कधीच सोडत नाही. ताजा, गरम प्लेन दोसा, किंवा प्लेन उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत स्वर्गीय आनंद देतो.
.
.
दारु सिगारेटचे सेवन करत नाही.पान खायला आवडते. नेहमीचे टपरीवरचे कलकत्ता मीठा मसाला , मघई वगैरे गोग्गोड पाने ठीकच; पण सणासुदीला घरी जो "विडा" लावतात -तो साधासाच असला तरी आवडतो. किम्वा नुसतीच विड्याची हिरवी पाने जातायेता चावून खायला आवडतात.(कोथिंबीरीसारखच). मी चटण्या जरा जास्तच खातो असा आरोप माझ्यावर आहे. म्हणजे साधारणतः अर्धी किंवा एक वाटी चटणी हादडणं होतच. त्यात आवड-निवड फारशी नाही. जे हाताला लागेल ते; हाताला लागेल तितकं ; जमेल तितक्या आनंदानं खातो. पानात अन्न टाकत नाही. कुटलेली शेंगदाणा चटणी, पुदिना, नारळ वगैरे ओल्या चटण्या, जवस कारळ, डांगर वगैरे स्टाइल कोरड्या चटण्या, किंवा पाण्यात कालवलेलं मेतकूट हे नुसतं चमचा-चमचाभर का खायचं ते कळत नाही. वाटीभरुन बचकाभर खाल्ल्याशिवाय मजा वाटत नाही. सुकामेवा हाताला लागला तर तोही अस्साच एकदम होलसेलमध्ये भरभरुन हादडतो पण किमतीकडे बघून मग जरा आवरतं घ्यावं वाटतं. सुका मेव्यात ठराविक पाचसात जिन्नसच आवडीचे. बदाम, अक्रोड, जर्दाळू, मनुका, खारिक्,खजूर हे विशेष आवडतात. पिस्ता - काजू हे लै आवडत पण ते खाउन उष्णता वाढायचा त्रास व्हायला लागल्यानं शक्यतो टाळतो. तोंड वगैरे यायचं. मला चहा विशेष आवडत नाही. पण भरपूर पिणं होतं. कारण सारखं कुणाला तरी सोबत द्यायची म्हणून चहाच्या टपरीवर चहा घ्यावा लागतो.
.
.
हल्ली लेमन टी, ग्रीन टी, आवळा चहा वगैरे प्रकार ऐकण्यात आले. जेवढ्या वेळेस पिउन पाहिले; ते आवडले. पण नियमित पिणं वगैरे होत नाही. संधी मिळते तेव्हा भरपूर पिउन घेतो. पण साखर घालूनच पितो त्याचा कडवटपणा सोसवत नाही. पण कारलं, मेथ्याचे दाणे ह्याचा कडवटपणा का कुणास ठाउक सोसवतो. आरामात खातो. मेथ्या भिजवलेल्या रुपात; मेथीची ताजी हिरवी जुडी असेल तर बहुतांशी न शिजवताच खातो. तशीच ती हिरवी पानं त्यावर अगदि किंचित तेल, किंचित मीठ आणी इलुशी काळ्या मिर्‍याची पूड टाकून खायला आवडतं. सिझन असेल तेव्हा भाकरी सोबत कांद्याची हिरवीगार पात तशीच खायला आवडते. पात आणायची. कापायची, लहान तुकडे करायचे.थोडस्सं तेल; किंचित मीठ(कधी कधी बदल म्हणून काळं मीठ) भुरभुरून घ्यायचं तसच खायचं भाकरीसोबत. मजाय. त्याला कांद्याच्या पातीचा घोळाणा म्हणतो. तसाच मेथीच्या पानांचाही घोळाणा चवदार.
पालक, लाल माठ, हिरवा माठ्,चुका ...बर्‍याशचा गोष्टी क्वचित कच्च्या व बहुतांश वेळेस भरडा भाजी म्हणून किंवा डाळीच्या पिठासोबत केलेल्या पातळ भाजीसोबत खायला आवडतं. वांग्याचं भरीत, कद्दूची भाजी विशेष प्रिय. लाल भोपळाही चालतो; पण विशेष रस नाही. त्याची कोशिंबीर का काहीतरी खिसून करतात; ते आवडतं.
जाता येता काकडी, गाजर , बीटरुट, कधीमधी टोमॅटो खाणं पोटाला स्थिर ठेवतं प्रत्यक्ष ताट हातात पडेपर्यंत. गाजर,काकडी,खोबरं, फुटाणे,शेंगदाणे वगैरे निर्माण करुन देवाने माणसावर अनंत उपकार केलेले आहेत.
.
.
तंदुर रोटी अजिबातच आवडत नाही. आपल्याकडाच्या धपाट्यासारखी दिसणारी व तशीच चवीला लागणारी खास 'पंजाबी मिस्सी रोटी' आवडते. खर्‍याखुर्‍या अस्सल पंजाबी ठिकाणी मिळतेही. पण अशी एकूण ठिकाणं कमीच. छोले भटुरे आवडतात. पण अगदि थोडेसे खातो. वर्षभरात एखादवेळेस्,तेही एखादा भटुरा वगैरे अशी फ्रिक्वेन्सी आहे. कढी चावल, राजमा चावल आवडतात. दे दणादण हाणतो. व्हेज बिर्याणी हा ओव्हररेटेड प्रकार आहे असं मत आहे. अगदि दिल्लीतल्या सुप्रसिद्ध 'करिम्स' नामक फूड चेनमधली पेश्शल बिर्याणीही खाउन झाली. पुण्यातल्या आंध्रा मेस , हैद्राबादी हाउस वगैरे ठिकाणच्याही खाउन झाल्या. पण ठीकठाक वाटल्या. म्हणजे चांगल्या आहेत; नाही असं नाही; पण इतका लौकिक का; ते मात्र समजलं नाही. म्हणजे कुणी पानात वाढला तर खातोच अवश्य; पण त्याचं इतकं का स्तोम आहे; ते ठिकठिकाणच्या बिर्याणी खाउनही समजलेलं नाही. त्यापेक्षा व्हेज पुलाव, किम्वा अगदि साधीसरळ दालखिचडी शिम्पल जीरा राइस सुद्धा जास्त आवडतो. कालपरवा कुणीतरी (बहुतेक गवि )म्हणाले तसं आंबेमोहराचा भात, त्यावर साधं वरण (किम्वा काळ्या मसाल्याचं वरण) आणि तूप लिंबू-- अहाहा. व्हेज पुलाव सर्वोत्तम.
.
.
आल्या-लसणाची पेस्ट हल्ली सगळीकडेच वापरली जाते म्हणे. पण मला त्याच्या वासानं कससच होतं. गंमत म्हण्जे कच्चं ताजं खरोखरीचं लसूण फोडणीत असेल किंवा ताजं लसूण आणि किसलेलं आलं कुणी वापरलं स्वयंपाकात तर मात्र त्याचं काही वाटत नाही. उलट कैकदा मीच वरणात आलं किसून घालून चवीनं खातो. थाई फूड मध्ये "तोम खा" नावाचं सूप असतं. भन्नाट प्रकार. नारळाच्या दुधात बनवलेला. त्यातही इतर चविष्ट झणझणीत घटकांसोबतच कच्चं ताजं आलं घातलेल असतं. तेही आवडिनं,चवीचवीनं खातो. त्यातल्या अद्रकचा ,आल्याचा वैताग वाटत नाही. घशाचा वगैरे त्रास होत असेल तर एखादेवेळेस भाजलेला लसूणही खातो थोडाफार न कुरकुरता. लसणाची फोडणीही खूपदा खाणं होतं.

.
.
भेळ, रगडा पॅटिस, पाणीपुरी ,दहीपुरी,शेवपुरी ,आवडतात पण ठराविक ठिकाणचेच. कल्याण , देल्ही चाट वगैरे इकडे प्रसिद्ध ब्रांड्स आहेत. तेवढेच काय ते खातो. घरी केलेली पाणीपुरी जीव की प्राण. शिवाय ती पात्तळ शेव असते ना ती नुसतीच चिमुट चिमुट खायची. व्वॉव!
.
.
आता काही कॉमन आणि लोकप्रिय पदार्थांबद्दल. हे खूपशा लोकांना न पटण्यासारखं आहे; पण लिहायचच आहे म्हटलं तर सगळच लिहून काढावं.
बेकरीतल्या बहुतांश वस्तू आवडत नाहित. पाव-ब्रेड-बन तर अजिबातच नाहित. त्यातल्या त्यात कराची बेकरी, न्यू पून बेकरी वगैरे मध्ये जे जाड चविष्ट बिस्किटं मिळतात; ते थोडेफार खाउ शकतो. चहासोबत पारले जी पासून ते इतर कोणतेही गोड बिस्किट खायला नको वाटतात. चहाची सगळी चव चाल्ली जाते. चहासोबत बिस्किट खाल्लेच तर मोनॅको वगैरे खारट बिस्किटं भारी वाटतात. बाहेरच्या देशात केक-रस्क म्हणतात तो जिन्नस किंवा आपल्याकडे बंद पाकिटात मिळतो तो "टोस्ट" नावाचा प्रकार त्यातल्या त्यात सुसह्य वाटतो. पाव-ब्रेड खाल्ल्यावर पोटात जड-जड असं कैतरी विचित्र आणि नकोसं वाटतं. पोटाला झेपत नाहित. मिसळ पाव तसाही विशेष प्रिय नाही. कधी खायची वेळ आलीच; तर नुसतीच मिसळ खातो. पाव घेत नाही. खाताना अर्थातच भरपूर लिंबू पिळून घेतो. वडा पाव बद्दल तेच. वडा पाव आवडत नाही. कधी खावा लागलच तर नुसताच बटाटा वडा खातो. पावभाजीमधली भाजी चविष्ट लागते. ती भाकरी किंवा पोळीसोबत खायला आवडतं. पाव तिथेही नाहिच.
समोसा कचोरीमध्ये रस वाटत नाही. क्वचित खायची वेळ आली तर कसाबसा खातो. शक्यतो टाळायचं पाहतो.
पावभाजी ,वडापाव, मिसळपाव ह्यांचं इतकं कौतुक का आहे ते समजत नाही. मुळात "मराठी" पदार्थ म्हणून ह्यांचा लौकिक का असावा ? हे कैकदा "मराठी पारंपरिक पदार्थ" किंवा "मराठी सांस्कृतिक प्रतीकं" म्हणून का मिरवले जात असावेत. आपले वाडवडील काही शेकडो हजारो वर्ष हेच पदार्थ खात होते का ? ह्या हवेत हे सहज उगवून येणारं सर्वोत्तम अन्न आहे का ? पारंपरिक पदार्थ म्हटल्यावर त्या मातीत रुजलेला प्रकार निवडायला हवा ना ? जसं पंजाबात पराठे , रोटी वगैरे. किंवा आपल्याकडे पिठलं भाकरी, पुरणपोळी, किंवा अगदि श्रीखंड, बाकरवडी , अळूची भाजी वगैरे. माझं अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. त्यामुळं ही यादी चौफेर वावर असणारे अजूनच वाढवू शकतात नक्कीच. म्हणजे तांबडा पांढरा रस्सा वगैरे. किंवा खान्देशातला कळणा, मिरज -सांगली का इस्लामपूर जवळचे मळीचे वांगे व त्याचं पेश्शल मसाल्यांसोबतचं भरीत वगैरे.
.
.
भाकरीसोबत कच्चा कांदा... बुक्की मारुन फोडायचा आणि सोबतीला भाजलेले शेंगदाणे.उन्हाळ्यात एकवेळच जेवण हे आणी इतकच. हिवाळ्यात बचकाभर सुकामेव्याचा बोकाणा कोंबायचा तोंडात. तोच नाष्टा. कधी मधी जाता येता कडुनिंबाचं झाड दिसलं तर दोन चार पानं तोडून धुवून खायची.तेच कडिपत्त्याचं. बरं वाटतं.
.
.
खाणं... माझं आवडतं.

--मनोबा

प्रतिक्रिया

लेख पूर्ण वाचून काढत चवीचवीने संपवला. रच्याकने, पूर्वप्रकाशित आहे काय? आधी वाचल्यासारखा वाटला.

चाणक्य's picture

21 Sep 2015 - 7:45 am | चाणक्य

आहार चांगलाय हा तुझा

पद्मावति's picture

21 Sep 2015 - 10:53 am | पद्मावति

मस्त!
छान अगदी मनापासून लिहिलंय. आवडलं.

मृत्युन्जय's picture

21 Sep 2015 - 11:09 am | मृत्युन्जय

आहार चांगला आहे हा तुमचा मनोबा :)

सस्नेह's picture

21 Sep 2015 - 11:23 am | सस्नेह

चविष्ट लेख !

नाखु's picture

21 Sep 2015 - 11:39 am | नाखु

साठवली आहे चवी चवीने खात वाचण्यासाठी !!!

नुसता चौरस नाहीतर चतुरस्त्र आहार आहे हा!

तंदुर रोटी अजिबातच आवडत नाही. +१

जाता येता काकडी, गाजर , बीटरुट, कधीमधी टोमॅटो खाणं पोटाला स्थिर ठेवतं प्रत्यक्ष ताट हातात पडेपर्यंत. गाजर,काकडी,खोबरं, फुटाणे,शेंगदाणे वगैरे निर्माण करुन देवाने माणसावर अनंत उपकार केलेले आहेत.+१११ वस्तीगृहात राहिलेल्यांना याचे अनन्य्साधारण महत्व कळेल.

सिझन असेल तेव्हा भाकरी सोबत कांद्याची हिरवीगार पात तशीच खायला आवडते. पात आणायची. कापायची, लहान तुकडे करायचे.थोडस्सं तेल; किंचित मीठ(कधी कधी बदल म्हणून काळं मीठ) भुरभुरून घ्यायचं तसच खायचं भाकरीसोबत. मजाय. त्याला कांद्याच्या पातीचा घोळाणा म्हणतो. तसाच मेथीच्या पानांचाही घोळाणा चवदार.+११

ही सवय लागली, जी पुढच्या पीढीला द्यायचा प्रयत्न चालू आहे.

चांदणे संदीप's picture

21 Sep 2015 - 12:42 pm | चांदणे संदीप

तंदुर रोटी अजिबातच आवडत नाही. +१

माझाही +१

पीके's picture

21 Sep 2015 - 12:24 pm | पीके

चांगलच आहे की !!!

चांदणे संदीप's picture

21 Sep 2015 - 12:49 pm | चांदणे संदीप

या आणि लेखात आलेल्या इतर, मनोबांच्या आवडीनिवडीनुसार अस दिसतंय की माझा आहार आणि आवडी कम्प्लीट विरूद्ध आहेत.

उदा.

मिसळपाव ह्यांचं इतकं कौतुक का आहे ते समजत नाही.

झणझणीत मिसळपाव म्हणजे तर एकदमच फेवरेट आयटम… :)

उदा.

का कुणास ठाउक मिरची-तिखट अजिबातच सोसवत नाही. फार फार कमी तिखट खातो.कित्येकदा अदरवाइज सपक म्हटलं जाइल असं खाणं असतं.

मी भयानक तिखट खायचो आधी. आता थोड कमी केल असल तरी माझ्या आजूबाजूचे तिखट खाण्यात माझ्या आजूबाजूलाही नाहीत!

परत, तिखट खात नाही म्हणता आणि हे कस्काय?

मी चटण्या जरा जास्तच खातो असा आरोप माझ्यावर आहे. म्हणजे साधारणतः अर्धी किंवा एक वाटी चटणी हादडणं होतच.

म्हणजे, गोड वगैरे चटण्या असतात का त्या?

बोका-ए-आझम's picture

22 Sep 2015 - 10:09 pm | बोका-ए-आझम

बर्फीची चटणी (लेखक: बाळकराम उर्फ राम गणेश गडकरी).
छानशी बर्फी घ्यावी. थाळीत मांडावी आणि येता-जाता कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवावी. दोन मिनिटांत बर्फीची चटणी होते.
बाकी लेख छान आहे. वाखुसाआ.

नीलमोहर's picture

23 Sep 2015 - 1:08 pm | नीलमोहर

@ मन,
लेख खरंच छान जमलाय,

मला येता-जाता तुळ्शीची पानं खायची सवय आहे.
बाकी बाहेरचं खाणं विशेष आवडत नाही, साधं सात्विक अन्न जास्त आवडतं.

आनंदराव's picture

21 Sep 2015 - 1:51 pm | आनंदराव

चांगलाच आहार आहे की तुमचा
ह. घ्या

मला ताजं,ओलं नारळ आवडतं.

नारळ तो, खोबरं ते!!

पैसा's picture

22 Sep 2015 - 11:36 pm | पैसा

एवढं बारीक निरीक्षण आपल्या खाण्याबद्दल! लै भारी.

लेखन आवडले. मलाही मिसळ भयंकर आवडत नाही. घरी केलेली आवडते पण ती बाकी कोणाला आवडेल असे नाही. बिर्याणीही थोडीफार आवडते. कोणताही पदार्थ खूप दिवसांनी खाल्ला की जास्त आवडतो. आपल्या हातचा स्वयंपाक पाहूनही कधीकधी नको वाटते. तुमचे तुमच्या खाण्याबद्दल निरिक्षण चांगले आहे.

सुरेख प्रोफाइल माहिती लिहलीय. आवडली.

सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.
@स्वॅप्स :-
यप्स. दुसर्या एका संकेतस्थळावर इथे प्रकाशित करायच्या काही तास आधीच प्रकाशित केलेला आहे.
.
.
.
@chandanesandeep
तिखट म्हणजे ते खणखणीत स्टायलित जे काही असतं ते. म्हणज ठेठे,भुर्का/भुर्की , तळलेली तिखट मिरची ...हे सोसवत नाही. साधारणपणे ज्याला झणझणीत मिसळ म्हणतात; तीही सोसवत नाही. चटण्यांतलें तिखट चालतं. त्या ठेच्याइतक्या तिखट आमच्याकडे बनत नाहित. (शेंगदणा,कारळ, जवस, डांगर, मेतकूट, पूड चटणी,चिंचेची चटणी, आणि बकुळी का कोणत्यातरी फुलाची करतात ती चटणी, कडुनिंबाची उन्हाळी चटणी वगैरे हे कुठे इतके तिखट असतात ?)
.
.
बाकी , सर्वांचे पुन्हा एकदा आभार.