बाजाराचा समतोल

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
19 Nov 2007 - 12:49 am
गाभा: 

काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.
एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते.
एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे (रुपांतर :) )मिळतील. मग का नको आपण ही थोडा खर्च करूया. म्हणुन तो घराचे सामान विकणाऱ्याच्या दुकानात जातो आणि स्वत:च्या घराकरीता चांगले सामान घेतो. आता पुढे हा दुसरा विक्रेता स्वत:करीता काही गोष्टी खरेदी करतो. अशा प्रकारे त्या शहराच्या बाजारात एक प्रकारचे नवचैतन्य येते. प्रत्येक जण सणाकरिता काही ना काही खरेदी करतो. शहरातील मंदीचे वातावरण निवळून निघते.
काही दिवसांनी कळते की जो माणूस ती कार खरेदी करण्याकरीता गेला तो वेडा/मंद असतो. तो काही ती कार घेऊ शकत नाही.

ही गोष्ट लिहिण्याचे प्रयोजन:
मला त्या चित्रपटाचे नाव पाहिजे जेणेकरून तो मी पाहू शकेन.
बाजार कसा चालतो हे थोडेफार ह्या कथेवरून कळते. परंतु पूर्णत: माहिती मिळू शकेल का?

भरपूर ठिकाणी ओरड चालली आहे की आय टी मुळे सगळ्या गोष्टी महागत चालल्या आहेत. हो, हे मी मानतो. सुरुवातीच्या काळात आय़टी ला तुलनेने खूप जास्त पगार मिळत होता. त्यावेळी बहुधा लोकांनी जो भाव मागितला तो दिला असेल. त्यामुळे भाव वाढले. परंतु, एकट्या आयटी ने घोडे नाही मारले. परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यानंतर भरपूर विदेशी कंपन्यांनी भारतात बस्तान मांडले. लोकांना विविध मार्ग मिळाले आपला पैसा वापरायला. इतर क्षेत्रांतही पगाराचा आलेख चांगला वधारला आहे. मित्रासोबत ह्या गोष्टी बोलत असताना ह्या सर्व गोष्टी पुन्हा विचारात आल्या. सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजेच, उदा. लोकांचा पगार वाढला. त्यांनी तो आपल्या राहणीमान आणि इतर गोष्टींवर वापरल्या. वेगवेगळे परदेशी कंपन्यांचे कपडे, बूट आणि इतर गोष्टी खरेदीच्या आवाक्यात आल्या (की नंतर त्यांचा भाव वाढला?). त्याने ही इतर उलाढाल बदलली.

मला आठवते आहे. नोकरी लागायच्या आधी मी एक पँट खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा एका मॉल मध्ये ५०० रू.ची पँट खरेदी करणे मला जमले नाही. तेच आता मी १२००/१५०० ची पँट घेऊ शकतो. हो, पण त्यात फक्त पैशाचा मामला नाही. ते महागडे कपडे/बूट नको एवढे टिकतात. :)

असेही म्हणतात, आपण लोक पैसे घरी जमा करून ठेवतो. तो पैसा बाहेर बाजारात आल्यास इतर वेगवेगळ्य़ा ठिकाणी वापरता येतो. थोडक्यात वर लिहिलेल्या कथेप्रमाणे. म्हणून आपण पैसा बाजारात आणला पाहिजे. म्हणजे फक्त गुंतवणूकीत नव्हे. ह्यावरूनच एक लेख आठवला. तो इथे वाचता येईल. त्यात हेच म्हटले आहे. अमेरीकेतील लोक पैसा साठवत नाहीत किंवा खूप कमी साठवतात. नुसता बाहेर वापरतात. एवढे की उधार घेऊनही वापरतात(क्रेडीट कार्ड). ते आपणही केले पाहिजे. हे मला पूर्णपणे पटत नाही. पैसा थोडाफार(की भरपूर?) जमा असला पाहिजे. मगच इतर गोष्टी कराव्यात. गुंतवणूक सल्लागारही हेच सांगतात की आपल्या ६ महिन्याच्या पगाराएवढी रक्कम आपल्याकडे जमा असावी. मगच इतर पैसा वापरा.

आणखी एक कथा वाचली होती. कुठे ते आठवत नाही. श्रीकृष्णाच्या सहकाऱ्यांनी (कुंभार, सोनार, वाणी वगैरे सगळे) त्याला सांगितले की तू काही नाही करत. आम्हीच सर्व काही करतो. तेव्हा आम्ही ही काही न करू असे कर. कॄष्ण म्हणाला, ठिक आहे. तेव्हा सर्वांनी स्वत:चे काम करणे बंद केले. थोड्याच दिवसात तिथे अराजक मांडले. गोंधळ झाला. तेव्हा कृष्णाने त्यांना पटवून दिले की आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत.

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

4 Dec 2007 - 9:46 pm | देवदत्त

कोणाला माहित आहे का त्या सिनेमाचे नाव?

अजुनही कोणाला माहीती आहे का त्या पिच्चरचे नाव? मलाही बघायला आवडेल.

मध्यंतरी मंदीच्या काळात जेव्हा लोकांच्या नोकर्या गेल्या होत्या त्यामुळे मालाला बाजारात उठाव नव्हता कारण लोकांनी अनावश्यक खरेदी बंद केली होती आणि त्यामुळे बाजारात खेळता पैसा कमी झाला होता. तेव्हा बाजारात पैसा वाढवण्यासाठी म्हणजेच लोकांना खरेदीला उद्युक्त करण्यासाठी तैवान सरकारने दोन वष्रांपूर्वी प्रत्येक नागरिकाला चीनी नववर्षानिमित्त ३००० $(तैवान डोलर) भेट दिले होते.

योगी९००'s picture

6 Dec 2010 - 4:18 pm | योगी९००

माझ्या आठवणीनुसार त्या गोष्टीचे नाव "man who saved pumpelsdrop" असे होते.

गूगल सर्च ने कदाचित चित्रपटाचे नाव पण मिळेल. आत्ता जरा ऑफिसमध्ये असल्याने गुगलून पाहिले नाही. नंतर पहातो.

नितिन थत्ते's picture

6 Dec 2010 - 4:26 pm | नितिन थत्ते

मला पम्पसेलडॉर्फ आठवत आहे पण गूगलवर मिळत नाही. आणि मला ती इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील एक धडा म्हणून आठवत आहे.

देवदत्त's picture

8 Dec 2010 - 7:06 pm | देवदत्त

३ वर्षांनी खोदकाम? धन्यवाद :)

कथेच्या नावाबद्दलही धन्यवाद. त्या कथेवर चित्रपट होताच का असेही वाटायला लागलेय आता. बहुधा मीच ती कथा चित्रपटाची म्हणून ऐकली असेल ;)

असो.
निदान गुगलवर ते कथापुस्तक तरी मिळाले ह्या निमित्ताने. ह्यातील पहिलीच कथा आहे ती.