गणपती साठी ?

निसर्ग's picture
निसर्ग in काथ्याकूट
28 Aug 2008 - 12:51 pm
गाभा: 

कालचाच अनुभव. शेजारच्या किराणा दुकानात काही वस्तु आणायला गेलो होतो.
...तेवढ्यात तेथे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते आले. दुकानदाराला काही न विचारता त्यानीं रु.१००१/- ची पावती तयार केली आणि त्याच्या हातात ठेवली. दुकानदाराने त्याची कैफीयत मांडली की, येथे चार गणेश मंडळाना पैसे द्यावे लागतात एवढे कसे काय देणार ? तेव्हां गणेश मंडळाचे कार्यकर्त्यानी दुकानदाराला दमदाटी केली आणि एवढेही सुनावले कि, जर गल्ल्यात हात घातला तर नक्कीच यापेक्षा जास्त घेऊ....बिचारा दुकानदार.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेल्यानंतर दुकानदाराने सांगितले की, "येथे जवळपास चार गणेश मंडळाकडुन अशीच वर्गणी घेतली जाते. गणपती गेल्यानंतर ही मंडळे त्याच मांडवात देवीची प्रतिष्ठापणा करतात आणि वर्गणीचे चक्र असेच चालु राहते. "

मिपाकरनो,...... आज कुत्र्याच्या छ्त्र्याप्रमाणे ही मंडळे उगवलेली दिसतात. खरच यापैकी किती गणेश मंड्ळे विधायक कामासाठी हा पैसा वापरत असतील ? यामधे गणेश भक्ति किती? की या मंडळाना हा पैसे गोळा करण्याचा हक्कचा सिझन वाटतो?
मिपाकरनो, मला यातुन कोणत्याही धर्मावर टीका करायची नाही. पण गणेशाच्या नावाखाली दमदाटी करुन पैसे गोळा करणारी मंडळे योग्य निश्चितच नाहीत. मी हे सगळ्या मंडळाबद्द्ल बोलत नाही.
आपल्याला काय वाटत?

प्रतिक्रिया

अमेयहसमनीस's picture

28 Aug 2008 - 1:46 pm | अमेयहसमनीस

मी आपल्या मताशी सहमत आहे.

या मंडळांवर सरकारी व सामाजीक नियम लागू केले पाहीजेत. :T

बाकी या मंडळांवर राग आसण्याचे कारण नाही.

अमेय :S

मराठी_माणूस's picture

28 Aug 2008 - 1:46 pm | मराठी_माणूस

की या मंडळाना हा पैसे गोळा करण्याचा हक्कचा सिझन वाटतो?

हेच खरे आहे , कारण त्याना माहित असते कि त्यांच्यावर काहिहि कार्यवाहि होणार नाहि.

यापैकी किती गणेश मंड्ळे विधायक कामासाठी हा पैसा वापरत असतील ?

विधायाक काम तर दुर त्यातल्या कोणाला जर "विधायक काम" म्हणजे काय हे जर विचारले तर ते एकमेकाकडे "ते काय असते रे भाउ ? ' अशा नजरेने पहातिल.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2008 - 1:49 pm | प्रकाश घाटपांडे

देणगी या नावानी ही खंडणीच असते. गणपती उत्सव या नावाने गुन्हेगार लोकांना प्रतिष्ठा मिळते. कायदा व सुव्यवस्था इथे हताश आहे. पोलिसांच्या उपयुक्तता मुल्यापेक्षा गुन्हेगारांचे उपद्रव मुल्य हे नेहमीच किति तरी अधिक असते.

मला यातुन कोणत्याही धर्मावर टीका करायची नाही.


मुळात हा अधर्म च आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2008 - 1:57 pm | प्रभाकर पेठकर

पूर्वी घरचे गणपती हे खाजगी गणपती आणि गावचा असा एक सार्वजनिक गणपती/गणेशोत्सव असायचा.
पूर्वी उत्सवांमध्ये जेंव्हा आजच्या सारखे अर्थकारण गुंतलेले नव्हते तेंव्हा तत्त्वाच्या जोरावर, मानापनाच्या कारणात्सव गणेश मंडळांचे विभाजन व्हायचे. मग दोन्ही मंडळात स्पर्धा लागायची, जास्त चांगले दर्जेदार कार्यक्रम देऊन कोण अधिक गर्दी खेचतो ह्याची.
पुढे पुढे उत्सवांमध्ये व्यावसायिकता येऊ लागली. 'श्रीमंत' गणपती आणि 'श्रीमंत गणेशमंडळ' अस्तित्वात आले. भ्रष्टाचार बोकाळला. ज्यांना 'शेअर' मिळाले नाहीत त्यानी वेगळी मंडळे स्थापन करायला सुरुवात केली. दुकानदारांना वेठीस धरून जास्तीत जास्त पैसे उकळायला सुरूवात झाली. एक प्रकारची 'प्रोटेक्षन मनी' दुकानदारांकडून मंडळांकडे वाहु लागली. आणि गणपती भक्ती राहीली बाजूला सण/उत्सव हे पैसे कमवायचे/उधळायचे साधन बनले. पण गणेशोत्सव तर वर्षातून एकदाच येतो, आणि चैनीची चटक लागलेल्या रिकामटेकड्यांना नवनविन उत्सवांची गरज भासू लागली. त्यातून नवरात्री महोत्सव आला तसेचे गोविंदा पण आला. शिवजयंती पुर्वापार चालत आली होतीच तिच्या बरोबर आंबेडकर जयंती, दत्त जयंती...अशा उत्सवांना उत येऊ लागला. प्रत्येक समाजाचे एक दैवत असते. इतरांचे बघून तो समाजही त्यांच्या त्यांच्या दैवतांचे 'उत्सव' आणि 'जत्रा' भरवू लागला. ह्या सर्वांना नगरसेवकांचा वरदहस्त असतो. कारण निवडणूका जिंकायला, सभांना गर्दी जमवायला, मोर्चे काढायला त्याला सतत मनुष्यबळ हवे असते. ते दीर्घ काळासाठी फुकटात, तत्त्वांसाठी भांडणारे, काही वैचारीक बैठक असणारे मिळत नसते. त्यांची वर्षभर 'कमाई'ची व्यवस्था करून द्यावी लागते. ती व्यवस्था परस्पर नागरिकांच्या खिशातून सण, उत्सवांच्या माध्यमातून केली जाते. पैसा, दारू आणि अगदी बाईसुद्धा ह्या कार्यकर्त्यांना (?) मिळेल अशी तजवीज केली जाते. पोलीस डोळे झाकून बसतात. त्यांच्यावर नगरसेवकांचा, आमदारांचा दबाव असतो. (पोलीसांची खाजगी कामेही आमदारांकडे पडून असतात).
सर्व मंडळे सरकार दरबारी नोंदविलेली असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यांचे लेखापरिक्षण होणे कायद्याने बंधनकरक आहे. सरकारी नियमांच्या चौकटीतच वागण्याचे बंधन त्यांच्यावरही असते. पण ह्या नियमांचे पालन होते का? तर उत्तर आहे ...अजिबात नाही.
समान्य माणूस दिवसेंदिवस हतबल होत आहे. कुठे तक्रार करायची ठाऊक नाही. तक्रार केल्यास ते सरकारी अधिकारीच तक्रारकर्त्याला उघडे पाडतात. आणि मग सुरू होते दमदाटी, प्रसंगी मारहाण, क्वचीत एखाद दूसरा खूनही.

खणलेले रस्ते, लाऊडस्पीकर्सच्या भिंती, दारू पिऊन नाच गाणी आणि मुलींची छेडछाड ह्या गोष्टी काय पोलीसांना, महापालिकेला दिसत नाहींत. पण कारवाई शून्य. खणलेले रस्ते पुन्हा बुजवून द्यायची हमी ह्या ममंडळांकडून घेतली जाते. पण मी म्हणतो आधी खणायला परवानगीच का दिली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव किंवा इतर उत्सव रस्त्यावर करायला का परवानगी दिली जाते? मैदानांवर करण्याची जबरदस्ती का केली जात नाही? (माझ्या घरा शेजारच्या महापालिकेच्या मैदानावर ८ ते १० गणेशोत्सव आरामात होऊ शकतील). हा सांस्कृतीक (?) वारसा पुढच्या पिढीसमोर ठेवण्यासाठी शाळाकॉलेजांची मैदाने उपलब्ध करून द्या. रेसकोर्स, पोलीस ग्राऊंड उपलब्ध करून द्या. लाऊडस्पीकर्सवर बंदी घाला. स्पॉन्सर्ड गणेशोत्सवांवर बंदी घाला. अल्कॉहॉल टेस्ट घेऊन प्यायलेल्या कार्यकर्त्यांना आणि भक्तांना अटक करून १० दिवस (गणेशोत्सव संपेपर्यंत) लॉकअप मध्ये टाका.

पण हे सर्व होणार नाही. कारण जनतेकडून सरकारवर तसा दबाव येत नाही. आपले बहुतांश NGOs सुद्धा प्रसिद्धी आणि पैसा मिळणार नसेल तर सार्वजनिक कार्य हाती घेत नाहीत. दुर्दैव आपलं.

ऋषिकेश's picture

28 Aug 2008 - 2:21 pm | ऋषिकेश

गणेशमंडळांच्या देणग्या बँकेत जमा कराव्यात व त्यावर काहि कर बसेल असा कायदा कराव असे वाटते. मंडप उभारण्याआधी बँक अकाऊंट नंबर पोलिस दप्तरी देणे गरजेचे आहे.
जर हा व्यापारच आहे तर कररूपाने सरकारला आणि पर्यायाने जनतेला त्याचा फायदा तरी होऊ द्या.

-(गणेशाला "कर" जोडावे असे मानणारा)ऋषिकेश

म्हणजे देणगी ( की खंडणी) + कराचीही वसुली करतील हे कार्यकर्ते ....जनतेकडुनच
कर काय ते खिशातुन थोडीच भरणार आहेत....

ऋषिकेश's picture

28 Aug 2008 - 2:29 pm | ऋषिकेश

हं पटले..
माझा प्रस्ताव मागे घेतो ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

भारतात निदान १० वर्ष तर सर्व प्रकारच्या सार्वजनीक उत्सवान्वर बन्दी घालायला पाहिजे ...
आपाप्ल्या घरात करा काय करायचे ते .......

प्रत्यक्श 'बळवन्तराव' आले तर ते आता ह्या साठीच चळवळ करतील :(
मजेदार विदुषक

विसोबा खेचर's picture

28 Aug 2008 - 11:15 pm | विसोबा खेचर

प्रत्यक्श 'बळवन्तराव' आले तर ते आता ह्या साठीच चळवळ करतील

सहमत आहे.. :)

धनंजय's picture

29 Aug 2008 - 1:13 am | धनंजय

आमच्या भाईकाकांच्या एका "स्नेह्यांच्या" घरी आटोम्याटिक कुत्रा आहे. बाहेर कोणी चंदा गोळा करायला आले की हे एक बटण दाबले की तो त्यांच्या पायाला चावतो. त्यांचा पत्ता "मोठे गणेशभक्त" म्हणून या वर्गणी गोळा करणार्‍यांना द्यायचा भाईकाकांचा मनसुबा आहे.

पण गंभीरपणे बघता - सार्वजनिक कार्यासाठी दमदाटी करून पैसा गोळा करणे बरे नव्हे. जिथे बिनहिशोबी पैसे मिळू शकतात त्या बाजारात हौशी शासनयंत्रणा (म्हणजे साध्या शब्दांत "गुंड") प्रवेश करतील, त्यात नवल नाही. त्यामुळे प्रकाश घाटपांडे यांचे निरीक्षण पटण्यासारखे आहे.

विसोबा खेचर's picture

29 Aug 2008 - 1:09 am | विसोबा खेचर

ही शुद्ध गुंडगिरी आहे. याला कायदेशीर किंवा गांधीगिरीच्या आधारे आळा घातला पाहिजे!

वाद घालायचा नाही, आवाज चढवायचा नाही, वेळप्रसंगी मार पडल्यास तोदेखील खायचा, पण आपण हात उचलायचा नाही. परंतु त्याचसोबत वर्गणी देण्यास नम्र परंतु ठामपणे नकार द्यायचा! गल्ल्यात कुणालाही हात घालू द्यायचा नाही! प्रत्येक दुकानदाराने हे केले तर या प्रकाराला आळा बसेल...

आपला,
महात्मा तात्या.

भडकमकर मास्तर's picture

29 Aug 2008 - 8:29 am | भडकमकर मास्तर

प्रत्येक गणपतीउत्सवाआधी माझ्या दवाखान्यात पाच मंडळे येतात...
... पूर्वी प्रेशर येत असे , वैताग येत असे, नाईलाजाने आपल्याला इतके पैसे द्यावे लागतात असे वाटत असे ...
आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूक सहन करायची...
आता पैसे द्यावेच लागतात पण डोक्याला कटकट करून घेत नाही....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2008 - 2:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक गणपतीउत्सवाआधी माझ्या दवाखान्यात पाच मंडळे येतात...
दवाखाना आणि दुकानं सोडा आमच्या घरी पण पैसे दिले नाही म्हणून दमदाटी करायला सुरूवात केली होती. पण त्यांच्या आवाजाच्या जरा वर मी आणी भावानी आवाज चढवला आणि मग ते लोक निमूट निघून गेले.

बकासुर's picture

29 Aug 2008 - 2:10 pm | बकासुर

सर्व गणेशमन्डळान्च्या कार्यकर्त्यानी आपला गणपती जिथे बसणार आहे तिथेच
आपले पावतीपुस्तक घेऊन बसावे. ज्या लोकान्ना वर्गणी द्यायची असेल ते तिथे देतील.
याला म्हणतात वर्गणी.

आणि किमान १५ च्या सन्ख्येने लोकान्च्या घरासमोर/दुकानात घुसुन अमुक रकमेची पावती केलीच पाहिजे नाहितर.......
याला म्हणतात खन्डणी.

यापैकी पहिला पर्याय कायद्यामध्ये समाविष्ट व्हावा असे तुम्हाला वाटते का?

मराठी_माणूस's picture

1 Sep 2008 - 9:04 am | मराठी_माणूस

आज पहाटे १.३० वाजता सगळे गाढ झोपेत असताना अचानक ढोल, ताशे , फटाके यांचा प्रचंड मोठा अवाज सुरु झाला. किति वेळ काय चालले आहे हे समजत नव्हते , मधेच "मंगल मुर्ति मोरया" ऐकु आले आणि माग लक्षात आले. हे सर्व अर्धा पाउण तास चालले होते.
वर्गणीचा त्यांनि सदुपयोग (?) करुन दाखवला.