मी माहेरची भंडारी.एरवी आठवड्यातून ५ दिवस तरी मासे हवेतच.पण श्रावण सुरु झाला की,सगळ्या देवांचे सप्ते असतात देवळात. ( सप्ते हे सप्ताचे अनेकवचन.सप्ता=साप्ताह.या सात दिवसात अखंड जागरण असते यासाठी प्रत्येक वाडीचे नंबर लागलेले असतात.वेळ ठरवून दिलेली असते.) श्रावणात येणाऱ्या प्रत्येक देवाच्या पहिल्या वारापासून हे सप्ते सुरु होतात.
भैरी म्हणजे कालभैरव.रत्नागिरीतले जागरूक देवस्थान.भैरी हे त्याचे प्रेमाचे नाव.भैरी, शंकर आणि दत्ताचा सप्ता संपेपर्यंत मात्र आमच्या घरी सगळे शिवराक. मग श्रावणात येणाऱ्या या दिवसांसाठी भाज्यांचे वेगवेगळे प्रकार हवेतच.त्यात वाल,मूग,चवळी या कडधान्याचे बिरडे; अळू,कोथिंबीर, कोबी यांच्या वड्या; सुरण,कच्ची केळी यांचे काप; बटाटे,कांदे,घोसाळी,लाल भोपळ्याची फुले,मिरच्या यांची भजी;भरलेल्या मिरच्या,भरलेली भेंडी;वेगवेगळ्या कोशिबिरी,रायती,चटण्या,आणि लोणची हवीच.त्याशिवाय जेवणे अशक्यच.यातलीच एक विशेष भाजी म्हणजे ओल्या काजूगरांची भाजी.म्हणजे रविवार,बुधवार,शुक्रवार यादिवशी आवर्जून करायची भाजी.
आता तुम्ही म्हणाल की,श्रावणात आणि ओले काजूगर?मासे नाही खायचे तर डोके फिरले बहुतेक या बाईचे.पण सांगतेच तुम्हाला आता श्रावणात ओले काजूगर कसे मिळवायचे ते? ओले काजूगर मिळवण्यासाठी एकतर त्या सीझनला गाव गाठायला पाहिजे नाहीतर कुणी जिवाभावाचे माणूस तिथे असायला हवे.माझी आई दरववर्षी मुंबईच्या उकाडयातून सुटका करून घेऊन होळी झली की, गावी जात असे.त्यावेळी ओल्या काजुगारचे आगमन बाजारात झालेले असे.मला तीन मावशा आणि नऊ मावसबाहिणी.त्यातल्या काही मुलांना सुट्ट्या पडल्या की, नियमित गावाला जात असत.आमच्या घराच्या मागच्या बाजूला समुद्र आणि पुढच्या बाजूला रस्त्यापलिकडे खाडी असल्याने मुलेही खूष असत त्यांची.
सीननंतरही,जास्त करून श्रावण,गणपती आणि नवरात्रापर्यंत गर खायला मिळावेत या भावनेने ओले काजूगर आणून, कोवळेसोवळे काढून अस्सल तयार गराना दोन दिवस कडकडीत उन्हे द्याची आणि सुकले की त्यांची सुती कापडातगाठोडी बांधून आडव्या बांबूवर लटकत ठेवायचे.कारण उरलासुरला ओलेपणा जाऊन ते हवेवर छान सुकतात आणि मुंग्यांचा आवडता खाऊ असल्याने त्यांच्यापासून बाचाव अशी दोन्ही कामे यामुळे साधतात.अशी माझ्यासकट सगळ्या बहिणींसाठी असलेली दहा गाठोडी आणि आलागेल्यासाठी भेट किंवा पाहुणचारासाठी दोन/तीन गाठोडी असत.असे सुकवलेले काजूगर हवाबंद डब्यात ठेवले की वर्षभर टिकतात,अर्थातच त्याआधीच त्यांचा चट्टामट्टा झालेला असतो.
हिरव्या काजू बीवर दोन्ही बाजूनी दाब दिल्यावर असता कडकपणा जाणवला तर तो आतून तयार गर असतो.ओल्या काजू बितून आख्खा गर काढणे हे कौशाल्य्याचे काम आहे आणि साठवणूकीला अख्खे गरच उपयोगी असतात.तर हे ओले काजूगर असे दिसतात.
खडखडीत वाळले की,असे दिसतात.
(इथपर्यंतची प्रकाशचित्रे जालावरून साभार.)
जेव्हा भाजी करायची असते तेव्हा रात्रभर पाण्यात घालून ठेवायचे किंवा लगेच हवे असतील तर पाण्यत घालून एक उकळी द्यायची.सोलून घ्यायचे.पण या दोनही प्रकारात हाताला विशेषतःनखाच्या असपास चीक लागतो ते मला आवडत नाही.म्हणून मी कोरडेच सोलून रात्री पाण्यात टाकते.दोन उन्हे मिळालेले गरांची साल कडक झाल्यामुळे जरासा दाब दिला की साल सुटते.पण जेव्हा हवेत तेव्हा आणि हवेत तितकेच,नाहीतर आयते सोललेले मिळाले की.....................काय करणार?चवही अप्रतिमच असते त्याची.
दुसऱ्या दिवशी भाजी करायला घ्याची.एक वाटी भिजवले तर भिजून दुप्पट होतात.अजिबात फरक पडत नाही चवीत.दोन तीन प्रकारांनी काजूची भाजी केली जाते.त्यापकी हा एक प्रकार.
साहित्य;-
१. दोन वाट्या ओले काजू;
२. दोन कांदे
३. दोन बटाटे
४. दोन टोमॅटो
५. दोन पाळ्या तेल
६.आले+लसूण+मिरची+ कोथिंबीरचे हिरवे वाटण दोन चहाचे चमचे.माझ्याकडे हे वाटण तयार असते.त्यासाठी एक वाटी लसूण+ अर्धी वाटी आलं+दोन मिरच्या+एक वाटी चिरलेली कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरमधून काघावे.
७. अर्धी वाटी ओले किंवा सुके खोबरे+अर्धी वाटी कोथिंबीर +एखादी मिरची +५/६ लसूणपाकळ्या बारीक वाटून.
८. अर्धा चहाचा चमचा जिरे +अर्धा चहाचा चमचामोहरी+६/७ मेथीदाणे+ पाव चहाचा चमचा हिंग फोडणीसाठी.
९.दीड चमचा तिखट+अर्धा चमचा धणेपूड +पाऊण चमचा हळदपूड
१०.मीठ स्वादानुसार.
कृती:-
कांदे बारीक चिरावे . टोमॅटोचे मध्यम तुकडे करावेत. बटाटे ही त्याच आकाराचे कापावेत. पातेले गॅसवर ठेऊन तेल घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा.सोनेरी रंगावर आला की त्यात पुन्हा हिरवे वाटण घालून परतावे.कच्चा वास गेला की, मिरची पूड,धणेपूड, हळदपूड घालून परतावे.काजू, बटाटे घालून परतावे.आता हात थोडा भराभर चालवावा.वाटण परतून होईपर्यंत काजूगर झाकून ठेवावेत नाहीतर दोन वाट्या काजूंपैकी दीड वाटी काजूंचीच भाजी होईल. आणि तिखटामीठाचा अंदाज चुकेल. सगळ्या गरांना आणि बटाट्याच्या तुकड्यांना मसाला चिकटू द्यावा.मग त्यात गरम पाणी अंगासरसे घालावे.एक उकळी आली की,टोमॅटो घालावा.खोबऱ्याचे वाटण ,मीठ, साखर घालून झाकणी ठेवावी.झाकणीवर पाणी ठेऊन मंद आचेवर शिजवावे.सर्वात शेवटी गोडा मसाला घालून ढवळावे.अंगाबरोबर रस ठेऊन गॅस बंद करावा.चपाती,ब्रेड, पुरी किंवा भात कशाहीबोबत खाऊ शकता.
चवीत बदल करायचा असेल तर मिरचीपूड+धणेपूड +गोडामसाला न वापरता आवडीप्रमाणे दीड चमचा संडे मसाला आणि पाव चमचा गरम मसाला आपराला तरी चाले पण अशावेळी एका कांदा वाढवावा.तो कांदा +खोबरे+मिरची +कोथिंबीर +लसूण असे वाटण करावे, कोथिंबीर सोडून सर्व भाजून घ्यावे.कोथम्बीर भाजलेल्या लेल्या वाटणात दडपून ठेवावी. मग थंड झाल्यावर वाटावे.टोमॅटो घालून झाल्यवर हे वाटण घालावे. भाजी शिजत आली की, गरम मसाला घालून दोन मिनिटांनी उतरावी.
दोन्ही प्रकारची भाजी पानात वाढली की. आग्रह करावाच लागत नाही एवढेच अंतिम सत्य.
प्रतिक्रिया
21 Aug 2015 - 2:44 pm | नंदन
फोटो आणि पाकृ कातिल!
21 Aug 2015 - 3:00 pm | मधुरा देशपांडे
तोंपासु पाकृ आणि तेवढेच छान वर्णन.
21 Aug 2015 - 3:09 pm | खटपट्या
तो. पा. सू.
ही भाजी मटणाला मागे टाकते
21 Aug 2015 - 3:30 pm | Mrunalini
सही... मला पण पाहिजे.
21 Aug 2015 - 3:53 pm | सूड
तरीच म्हटलं श्रावणात कुठून आणलेनीत ओले काजू!!
21 Aug 2015 - 6:59 pm | रेवती
मस्त हां सुरंगीताई! साधे बाजारात मिळणारे काजू भिजत घालून ही उसळ केली तर चालेल का? नायतर आम्ही कुठुन आणाव्यात या गोष्टी?
21 Aug 2015 - 7:46 pm | प्रश्नलंका
+१ अगदी हेच!!
बाकी भाजी मस्तचं!!
22 Aug 2015 - 8:53 am | यशोधरा
आज्जे, मागे मी टाकलेल्या अशाच काजूगराच्या पाकृवर तू मला हाच्च प्रश्न विचारला होतास! :P
21 Aug 2015 - 7:26 pm | अजया
काय जबराट पाकृ आहे.हे आमच्या इथल्या बाजारात घेऊन बसलेल्या बाया पाहिल्या आहेत.भाजीची ट्रिक आज समजली.नक्की करुन पहाणार. तुझ्याकडे येऊन खाऊन जाईन ते वायलं!
21 Aug 2015 - 7:33 pm | जडभरत
ताई खूप सुंदर वाटलं वाचताना. तळकोकणात असताना सहज मिळत असे भाजी. पण आता ठाण्यात आल्यापासून नाही मिळाली. कोकणी संस्कृतीचं वर्णनही छान केलंत.
21 Aug 2015 - 7:47 pm | प्रचेतस
भन्नाट प्रकार आहे. पण इथे अप्राप्य.
21 Aug 2015 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खासच...
-दिलीप बिरुटे
21 Aug 2015 - 8:10 pm | कविता१९७८
कधी येउ खायला??? मला आवडते पण एकदाही खाल्ली नाहीये सुगरणबाई, मस्तच
21 Aug 2015 - 8:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
21 Aug 2015 - 8:16 pm | मयुरा गुप्ते
वर्णन वाचुन तर चव तोंडात उतरली असं वाटायला लागले आहे... हिरव्या मसाल्याचे वाटण व तळलेल्या मसल्याचे वाटण हे तर जान आहेत ह्या पाककृतीचे.
सुंदर.
--मयुरा.
21 Aug 2015 - 8:17 pm | स्रुजा
तुझ्या वर्णन शक्ती वर तर मी फिदा आहे ! आणि फायनली तुझी शाकाहारी पाकृ आली म्हणुन हे धत्तड धतड.. आता ओले काजुगर शोधायला हवेत. भारत वारी करावी काय?
21 Aug 2015 - 8:21 pm | पद्मावति
खूपच छान भाजी.
मस्तं यम्मी दिसतेय. फक्त ओल्या काजुगारा शिवाय काही दुसरा ऑप्षन आहे का याला? इथे मला मिळणार नाही म्हणून विचारले. साधे काजू वापरले तर चालतील का?
21 Aug 2015 - 8:23 pm | बहुगुणी
धन्यवाद!
ओले काजूगर तर सोडाच, पण unshelled; unroasted/unsalted काजू देखील परदेशात का मिळत नसतील याचा शोध घेतांना हे कळलं:
काजूचं झाड हे Poison Ivy प्रकारच्या वनस्पतिंच्या Anacardiaceae या family मधलीच वनस्पति. या प्रजातीतील इतर वनस्पतिंप्रमाणेच काजू आणि काजूच्या कवचाच्या मध्ये असलेलं उरुशिऑल (Uroshiol) हे तेल विषारी आणि allergenic असतं (वर लेखात वर्णन केलेला 'चीक'), आणि याचे गंभीर परिणाम ज्ञात आहेत. या विषाचा स्पर्श ग्राहकांना होऊ नये म्हणून परदेशात (आणि भारतातही बरेचदा) दुकानांपर्यंत पोहोचायच्या आधीच काजू कवच काढून आणि उच्च तपमानाला भाजून मग पॅकिंग केलं जातं. हे कवच काढण्याचं कीचकट आणि घातक काम भारतासारख्या ब्राझील, नायजेरिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, व्हिएतनाम वगैरे उत्पादक ( :-( ) देशांमध्ये केलं जातं.
या दुव्यावर आधिक माहिती मिळाली.
21 Aug 2015 - 8:27 pm | स्रुजा
ही नवीन च माहिती. धन्यवाद.
21 Aug 2015 - 8:39 pm | जडभरत
सुंदर माहिती. आपण कधी या दुय्यम दर्जाच्या कामातून बाहेर येऊ तो सुदिन!!!
24 Aug 2015 - 10:25 am | पैसा
तरीच गुरे काजूच्या झाडाला, कोवळ्या पानांना किंवा गळलेल्या मोहराला तोंड लावत नाहीत.
21 Aug 2015 - 10:14 pm | नूतन सावंत
रेवाक्का,पद्मावती, काजू भिजत घालूनही तुम्ही ही भाजी करू शकता.पण चवीत फरक पडतो,कारण जे रॉ काजू मिळतात ते पूर्ण तयार झाल्यावर काढलेले असतात.म्हणजे टरफल ग्रे झाल्यावर काढलेले असतात.आणि हे हिरव्या टरफलातले असतात.पण दुधाची तहान ताकावर भागवायला हरकत नाही.
मयुरा,अजून एका पद्धतीने ही भाजी माझी आई करत असे.आता मीही करते.सत्यनारायण किंवा पाडव्याचा नैवेद्य कांदा,लसून न वापरता करायचा असतो,तेव्हा या भाजीला हिरवे वाटणच लावायचे.पण आले, लसूण न घालता किंवा लसूण न घालता.तीही भाजी एक नंबर होते.
कवी,सृजा स्वागतच आहे.
अजया,येत्या हंगामात तुझ्याकडे मुक्काम ठोकावाच लागेल.आई जाऊन परवाच दोन वर्षे झाली.त्यामुळे तिथून आता कोणी पाठवणारे नाही.पण ही दोन वर्षे माझ्याकडे पूर्वी मदतनीस असलेल्या बाई आता कुडाळमध्ये स्थायिक झाल्या आहेत.त्या ही प्रेमाची भेट पाठवतात.ती खूप पुरवून पुरवून मी वापरते.
बहुगुणी, तो चीक फार त्रासदायक असतो.सुकवलेल्या काजूंचा पक्त चिकट असतो,पण ओल्या बीतून गर काढताना जो ताजा चीक हाताला लागतो त्याने जखमा होतात.
सगळ्यांचे आभार.
22 Aug 2015 - 2:19 am | रेवती
ओक्के.
21 Aug 2015 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
22 Aug 2015 - 12:28 am | उगा काहितरीच
कोकणातील सासूरवाडी पहावी म्हणतोय ;-)
22 Aug 2015 - 12:36 am | आदूबाळ
यांना ब्यान करा..
22 Aug 2015 - 12:44 am | रातराणी
मस्त दिसतेय! आयती करून कोणी देईल काय :(
22 Aug 2015 - 2:16 am | प्यारे१
खरा प्रतिसाद- छळ छावणीत आणखी एका सरदाराचे नाव शामिल करा. लोकांना किती पिडता रे?
दाखवायचे दांत- काजूकरी आवडली.
22 Aug 2015 - 3:12 am | विशाखा राऊत
काजुची उसळ मस्तच... हे काजु घालुन चिकन एक नंबर होते
22 Aug 2015 - 8:42 am | नूतन सावंत
हं,”हे काजू”घालून,चिकनच काय तर मटनपण मस्त लागते.विशाखा तुझे अगदी बरोबर आहे.
22 Aug 2015 - 9:21 am | मदनबाण
काजू... काजू... काजू.... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yasmine - Khodny W Rooh / ياسمين - خدني وروح
22 Aug 2015 - 1:03 pm | सुहास झेले
अफलातून.... :)
23 Aug 2015 - 6:11 pm | अनन्न्या
प्रत्येक सिझनला चार पाचदा तरी होतेच.
23 Aug 2015 - 9:57 pm | भिंगरी
मस्त वर्णन आणि फोटो.
माझ्याकडे वर्षातून एकदा होते मैत्रीण ओले काजूगर पाठवते तेंव्हा.
24 Aug 2015 - 12:09 am | स्नेहानिकेत
मस्त सुरंगी ताई !!!तों.पा.सु..कधी येऊ ग भाजी खायला न काजुगर न्यायला?
24 Aug 2015 - 3:38 am | जुइ
मात्र इथे करता येत नाही हे :-(. वर लिहिल्याप्रमाणे नेहमीच्या काजुची भाजी करून बघु.
24 Aug 2015 - 6:16 am | स्पंदना
अनरोस्टेड काजू आहेत घरात.
करुन पहायला हरकत नसावी!! ;)
बाय द वे, मुरटे दाखवुन छाळ केल्याबद्दल निषेध!!
24 Aug 2015 - 10:24 am | सस्नेह
चविष्ट पाकृ आणि सुरेख सादरीकरण.
काजूची माहिती मला तरी नवीन आहे.
24 Aug 2015 - 10:27 am | पैसा
सध्या वर्षातून ३ महिने काजूच्या साम्राज्यात रहाते. पण कधी ओले काजूगर सोलून बाहेर काढायची हिंमत झालेली नाही. फार काय त्या चिकासाठी खास कपडे तिकडे नेऊन टाकलेत. तेव्हाचा माझा अवतार बघितलात तर रस्त्यावरचे कामगार बरे दिसतात म्हणाल!
26 Aug 2015 - 12:01 am | piu
मस्त लागते ही भाजी.
26 Aug 2015 - 12:22 am | डॉ सुहास म्हात्रे
स्लssssssर्प ! अजून काय ?!
26 Aug 2015 - 12:38 am | पिलीयन रायडर
आवर्जुन दुर्लक्ष करायचा धागा..
आम्हाला काय तुमची वाटणं घाटणं जमत नाहीत. तुम्ही असल्या एक एक पाकॄ "सादर" करा इथे न जळवा आम्हाला.
पण तू त्यातल्या त्यात बरी आहेस.. फार छळलस तर तुझ्या घरिच येऊ शकतो खायला!!
सानिका, मृणालिनी सारख्यांच काय करायचं??
26 Aug 2015 - 8:42 am | प्रीत-मोहर
तरीच म्हणते, बिबे या मोसमात कुठुन मिळायचे!!! सुरंगीतै मस्त रेशिपी. आमच्याकडे बिब्यांच्या मोसमात करतात. आता बिबे साठवायची ट्रीक सांगितलीस तर ते ही करुन वर्षभर खाता येतील. मला माझी आजी हे अस सगळ करत असल्याच थोडस आठवत.
27 Aug 2015 - 2:33 pm | भुमी
फारच छान वर्णन ... करुन बघितली पाहिजे आता....
27 Aug 2015 - 4:56 pm | मनीषा
छान चविष्टं पाककृती
आणि फोटोही सुरेख !
2 Feb 2016 - 2:16 pm | स्नेहश्री
Wow. Mastch.
2 Feb 2016 - 4:43 pm | कविता१९७८
परवाच तुझ्याकडुन मागुन मागुन खाल्ली