मांसाहारी लोकांसाठी कॅल्शियमचा निसर्ग स्त्रोत म्हणजे कवचमासे (शेलफिश);कोलंबी,शेवंडी,खेकडे किंवा कुर्ल्या,कालवे,खुबे,शिनाण्या,तिसऱ्या,एक ना दोन.तिसऱ्यानाच,शिंपल्या,शिवल्या,मुळे असे म्हणतात. यांचे प्रकारही बरेच वाट्ये,तसरे,म्हारय,शिनाण्या,इ.इ.
वाट्ये म्हणजे थोडे फुगीर,गोलाकार;या जास्त करून सफेद चॉकलेटी;तसरे म्हणजे तसराळ्यासारखे पसरट,काळसर;म्हारयचा आकार मोठा असतो.अडीच ते तीन फूट आकाराच्या असतात.त्याच्या शिंपा ऑफ व्हाईट रंगाच्या असून शिंपल्यावर चौकटीची उठावदार नक्षी असते.यातले मांस काढल्यावर त्यात एक धागा असतो रक्तासारख्या लाल रंगाचा,तो काढून टाकावा लागतो.भरपूर कोथिंबीर घेऊन भाजलेले वाटप घालून याची कढी अप्रतिम होते.पण म्हारय मुळे, हा प्रकार दुर्मिळ असल्याने सहसा बाजारात विकत मिळत नाही.मीसुद्धा एकदाच खाल्ला आहे हा प्रकार,तोही रत्नागिरीला. शिवल्या,शिंपल्या,तिसऱ्या यांना गावाला मुळे म्हटले जाते.शिनाण्या बाहेरून जितक्या ओबड धोबड तितकाच आतून सुरेख शिंपला,अगदी मोत्याची झाक.निळसर गुलाबी झाक असलेला पांढरा रंग आतल्या कवचाला असतो.
तिसऱ्या जरी बारा महिने मिळत असल्या तरी त्यांचाही हंगाम असतो. एप्रिल-मे महिन्यात किंवाऑक्टोबर महिन्यात उन्हाळ्यात एखाद्या वर्षी इतक्या पडतात की घरोघरी याच शिजणार. मी गावाला पाहिलंय जेव्हा, असे अमाप मुळे पडतात तेव्हा पोत्यांनी आणून,उकडून, सुकवून पावसाळ्याची बेगमी करून, वापरले जातात.जेव्हा हवे तेव्हा पाण्यात भिजवून घ्यायचं कडधान्याप्रमाणे,यावेळी शाळांनाही सुट्टी असते त्यामुळे घातले लहान थोर हेच एक काम करत असतात.शिवाय हे उकडलेले पाणी, पिठल्याच्या पातळीपर्यंत आटवून, त्यात कैरीच्या फोडी आणि तिखट घालून त्याचे काट बनवले जाते. यात मीठ घालण्याची गरज नसते. वर्षभर टिकते.ते भाकरीशी,भाताशी हे अप्रतिम लागते.त्याच्या बाटल्या भरून भेट म्हणून नातेवाईकाना दिल्या जातात.कारण हे अप्रूप दरवर्षी नसते.
सुकलेली ‘माष्टं,’म्हणजे उकडलेल्या शिंपल्यातले सुकवलेले गर, मार्केटमध्ये विकतही मिळतात. वाट्यावर,वजनावर दोन्ही प्रकारे.शिंपल्या मात्र वजनावर मिळत नाहीत,मिळाल्यातरी घ्यायच्या नाहीत.कारण शिंपल्यांचे वजन केले तर त्याच्या कवचाचेच वजन भरेल.तेव्हा त्या वाट्यावरच घ्यायच्या.या चिखलातूनच वेचून काढत असल्याने थोडा वेळ पाण्यात भिजत ठेऊन चोळून धुवायच्या. दोन-तीन पाण्यातून काढून धुवायच्या.नंतर. हवी असतील तर उकडून माष्टं काढा आणि आमटी,सुकं,बटाटा,वांगी, शेवग्याच्या शेंगा,टोमॅटो एकत्र घालून किंवा वेगवेगळे घालून आमटी,भाजी, डांगर काहीही करा.डांगर म्हणजे बेसन,जोडीला तांदळाचे पीठ,तिखट,गरमसालापूडघालून केलेल्या थोड्या तेलावर तळलेल्या वड्या.
उकडताना वरचे पाणी घालायचे नाही.नुसत्या तिसऱ्या पातेल्यात ठेऊन झाकण ठेऊन शिजवायच्या.वाफेवर लक्ष ठेऊन राहायचे नाहीतर सुटलेले पाणी उतू जाईल.उकडून आतला गर काढला तर सुटलेले पाणी गळून घेऊन आमटीत वारायचे.
दुसरी पद्धत म्हणजे विळीवर उघडून करलायची.करलायची म्हणजे उघडणारी बाजू विळीच्या पात्यावर धरून, उघडून, एका बाजूचे कवच पिरगळायाचे व तोडायचे.ज्या बाजूला जास्त मांस असेल त्याने दुसरे कवच खरवडून घ्यायचे आणि खरवडून घेतेलेले कवच टाकून द्यायचे.त्याचे पाणी निघेल तेही ठेवायचे. निघालेले पाणी गळून घ्यायचे आणि आमटीत वापरायचे. आता मांस असलेल्या तिसऱ्या त्यातले पाणी निथळून पुन्हा स्वच्छ पाण्यातून धुऊन घ्यायच्या.आता या तिसऱ्या पुढच्या कृतीसाठी तयार झाल्या.यांना एकशिपी म्हणतात.माझी आवड एकशिपीच.चला,आता आमटीला लागणाऱ्या बाकीच्या सामानाला एकत्र करूयात.
साहित्य :-
१. दोन वाट्या साफ केलेत्या एकशिपी तिसऱ्या.
२.दोन चहाचे चमचे आले लसूण पेस्ट.
३.एक वाटी बारीक चिरलेला कांदा.
४.एक वाटी उभा जाड कापलेला कापलेला कांदा.
५. एक वाटी सुके किंवा ओले खोबरे.माझी आवड ओले खोबरे.
६. वाटीभर किंवा आवडीप्रमाणे थोडी जास्त कोथिंबीर.
७. दोन हिरव्या मिरच्या.
८. एक ते दीड चहाचा चमचा भरून मिरची पूड.
९. निम्मी धणेपूड ; तितकीच हळदपूड.
१०. अर्धा ते पाउण चहाचा चमचा गरम मसालापूड.
११. अर्धा चहाचा चमचा चिंचेचा घट्ट कोळ.
१२. दोन मध्यम बटाटे,सोलून,लांबत फोडी करून.
१३.दोन/तीन शेवग्याच्या शेंगा,सोलून बोतेवढे तुकडे करुन
१४. मीठ.
१५. तेल अर्धी वाटी.
कृती:-
१. एकशिपिला अर्धे आले लसूण वाटण चोळून अर्धा तास ठेवावी.
२. जाड कापलेला कांदा,खोबरे चमचाभर तेलावर भाजून उतरताना त्यात हिरव्या मिरच्या कोथिंबीर घालून ढवळावे.लगेच उतरावे. मिरच्या व कोथिंबीर कांदा खोबऱ्याखाली दडपून टाकावे,थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावे.
३. कढईत तेल तापवून कांदा घालावा.
४. कांदा पारदर्शक झाला की,त्यात उरलेले आले लसूण वाटण घालून परतावे.
५. वाटणाचा कच्चा वास गेला की, अनुक्रमाने हळदपूड,मिरचीपूड ,धणेपूड टाकून परतावे.
६. आता एकशिपी घालून परतावे.सगळ्यांना मसाला लागेपर्यंत परतावे.बटाटे व शेंगा घालून परतावे.
७. एखाद दुसरे मिनिट झाकणी ठेवावी.आता त्यांचे निघालेले पाणी घालून शिजू द्यावे.लागल्यास वरून तिसऱ्या बुडेपर्यंत गरम पाणी घालावे.
८. चांगली उकळी आली की, ढवळून वाटण घालावे.आमटीसाठी लागणारे जास्तीचे गरम पाणी घालून
९.बटाटा व शेंगा शिजेपर्यंत उकळून त्यात चिंचेचा कोळ,मीठ घावे.
१०. सर्वात शेवटी गरम मसालापूड घालून एक उकळी घेऊन उतरावे.
गरमागरम भाताशी याची मस्त जोडी जमते.
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 2:22 pm | जडभरत
फोटो फार कातिल टाकलात. श्रावण सुरू होण्यापूरवी करणार!!!
10 Aug 2015 - 2:25 pm | जडभरत
पूर्वी मी याचा रस्सा करण्याचा प्रयत्न केला होता. पण ती रेसिपी फ्लाॅप झाली होती. आता या पद्धतीने करणार.
10 Aug 2015 - 2:30 pm | अदि
माझं अतिशय आवडता पदार्थ... तोंडाला चळचळून पाणी सुटलं ना....
10 Aug 2015 - 4:41 pm | अदि
माझा*
10 Aug 2015 - 2:32 pm | अद्द्या
__/\__
इथे सी फूड धड मिळत नाय .
आता कोकणात जायला हवं या साठी . .
मस्तय . फोटू बघूनच भूक वाढले
10 Aug 2015 - 2:48 pm | सत्याचे प्रयोग
गोव्यात खाल्ली होते हे कालवण पण काय आवडलं नाही बुवा
10 Aug 2015 - 3:36 pm | सस्नेह
फोटोपण अप्रतिम ! माशांची चव चाखायला त्यातले दर्दीच हवे.
...बाकी, खाणेबल समुद्री जीवांमध्ये इतके नमुने असतात हे माहिती नव्हते.
10 Aug 2015 - 4:31 pm | अजया
पाकृ बघून गेले गं! कधी कधी आपण न खाणारे असल्याने या सर्व चवींना मुकतो असं वाटतं अशा पाकृ पाहिल्यावर!!
10 Aug 2015 - 5:33 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
10 Aug 2015 - 7:29 pm | संदीप चित्रे
आणि रोमातून बाहेर येऊन प्रतिसाद दिलाय :)
11 Aug 2015 - 2:30 am | विशाखा राऊत
ताई मस्त.. रत्नागिरीची आठवण आली.. माष्ट मुळे आहाहा. ह्यासम हेच. होमसिक :(
11 Aug 2015 - 5:29 am | स्पंदना
फ्रोजन मिळतात, नुसत्या असतात, म्हणजे त्यांना शिंपले नसतात. धाडस होत नाही ग वाचून सुद्ध आणायच< त्याला पाहिजे जातीचे, पट्टीचे मासे खाणारे!
11 Aug 2015 - 6:14 pm | सुहास झेले
झक्कास !!!
11 Aug 2015 - 7:03 pm | स्नेहानिकेत
सुरन्गि तै , लै भारी !!!! जीभ खवळली ना फोटो बघून. आता गोव्यात गेल्यागेल्या करणार
11 Aug 2015 - 7:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
खल्लास रेसिपी!!. हे सगळे प्रकार खायचे आहेत राव!!
11 Aug 2015 - 8:07 pm | पैसा
छान पाकृ! हा प्रकार करायला सोपा आणि काटे नसल्याने नवीन खायला शिकणार्यांनाही खायला सोपा. मात्र यात कॅल्शियम खूप असल्याने काही जणांना भयंकर अॅलर्जी येऊ शकते. कितीही साफ धुवून नीट शिजवून घेतले तरी. माझ्या मुलाला काही वेळा अगदी फूड पॉयझनिंग सारखा त्रास झाला. तेव्हा त्याचे कारण तिसर्या हे लक्षात येऊन घरी शिंपल्यांचा कोणताही प्रकार आणणे बंद केले.
14 Aug 2015 - 10:12 pm | झंप्या सावंत
श्रावणाच्या शेवट च्या दिवशी हा फोटू बगीतला आणि श्रावण मोडण्या चा निश्चय केला ....
17 Aug 2015 - 6:36 pm | Mrunalini
काय मस्त दिसतायत तिसर्या. मला तरी ह्याच्या सोबत गरम गरम तांदुळाची भाकरीच पाहिजे.
17 Aug 2015 - 7:20 pm | नूतन सावंत
आलीस की करु ना बेत.
17 Aug 2015 - 10:40 pm | सानिकास्वप्निल
हाय हाय मार डाला !! जबराट पाककृती :)
21 Aug 2015 - 2:38 pm | तुडतुडी
शीर्षक वाचून वाटलं होतं , दहाव्याचं , तेराव्याचं जेवण असतं तसं तिसऱ्याचं काहीतरी असेल ;-)
22 Aug 2015 - 8:03 pm | सत्याचे प्रयोग
ही तिसर्याची आमटी आहे मग पहिल्या आणि दुसर्याला का नाही वाढायची. का पहील्या आणि दुसर्याने तिसऱ्यांच्या ताटात खायचे. तिसऱ्या ने खाऊ नाही दिले तर पहील्या व दुसऱ्याने काय करायचे.