तर...अचानक दिल्लीत काम निघाल्याने शुक्रवार २४ जुलै ला दिल्लीत जायचे आहे. १-२ तासाचे काम आहे. ते झाल्यावर बॉस परत जाणार आहे. आता जातिवंत भटक्याला वीकांत मिळाल्याने पानिपतची मोहीम ठरवून टाकली. आधीच तिथे जायची फार इच्छा होती त्यात सारथी, बिपीन कार्यकर्ते आणि जयंत कुलकर्णी यांनी जोरात लेख लिहून आगीत तेल ओतले आहे. तेव्हा २४ च्या संध्याकाळ पासून २५ च्या संध्याकाळ पर्यंत मुक्काम पोस्ट पानिपत.
कोणी दिल्लीकर बरोबर येणार असल्यास स्वागत आहे. तसेही एकट्याने जाणे आणि शोध घेणे भलतेच काम आहे. कोणी चांगला मार्ग, ठिकाण, ऐतिहासिक जागा, किल्ले सुचवू शकत असेल तर जरूर सुचवा. सारथी, बिपीन कार्यकर्ते आणि जयंत कुलकर्णी यांच्या लेखात काही जागांचे उल्लेख मिळतात पण त्या जागा कोणत्या क्रमाने पहाव्यात किंवा गाडी नसताना लोकल कोणती वाहने त्या जागे पर्यंत जातात हि माहिती मिळाल्यास रिसर्च चा वेळ वाचेल. बाकी २६ ला फोटो टाकेनच.
सम्पर्क: ९८८६०४४४३१
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 12:31 pm | पैसा
जाऊन आलात की जरूर लिहा अन फोटोही येऊ द्यात!
22 Jul 2015 - 1:07 pm | जयंत कुलकर्णी
अजून एक जागा आहे तेथे पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे लोक उत्खनन करत आहेत... त्याचे नाव आत्ता विसरलो आहे... मला वाटते दिल्लीवरुन टॅक्सी करणे ठीक राहील... किंवा पानिपतला उतरुन टॅक्सी.. कारण काला आम तसे आत अडनिड्या जागी आहे... अर्थात माझ्यापेक्षा बिका जास्त अचूक माहिती देऊ शकतील....
22 Jul 2015 - 2:05 pm | बॅटमॅन
तुम्ही म्हणताय ती जागा राखीगढी होय.
22 Jul 2015 - 2:04 pm | बॅटमॅन
आम्ही पानिपतास गेलो होतो १२ जानेवारी २०१३ रोजी...
काय काय बघितले याची यादी:
१. इब्राहिम लोदीचे थडगे. इंग्रजांनी रिस्टोअर केलेले.
२. नवग्रह मंदिर आणि त्याला लागून असलेल्या तळ्याचे विस्तीर्ण आवार. आम्ही गेलो होतो तेव्हा तळे शिल्लक नव्हते, त्या जागी पब्लिक पार्क बांधायचे काम सुरू होते. पानिपत कादंबरीत उल्लेखिलेले तळे ते हेच.
३. बूआली कलंदर दर्गा. याला पानिपत गावात कलंदर पीर असे म्हणतात. चिंचोळ्या गल्ल्यांतून तिकडे पोहोचलात की छोटासा परंतु छान दर्गा आपले स्वागत करतो. एण्ट्री केल्यावर पटांगण लागते, तिथून रफली उजवीकडे गेल्यास मुख्य जागा अर्थात समाधी लागते. त्या इमारतीत जाताना समोर ८ खांब आहेत ते नीट बघावेत, काळ्या रंगाचे आहेत. एका लायनीत २ असे प्यारलल ४ लायनीत ४ दुणे ८ आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सोनाराकडे कसोटीचा जो दगड असतो त्या दगडापासून बनलेले हे खांब आहेत. असे अन्यत्र कुठेही नाहीत असे सांगतात. हे सोडून बाकी दर्गाही प्रेक्षणीय आहे. कलाकुसर, स्थापत्य, इ. छान आहे.
३. काला आम. या झाडाच्या नावाखेरीज आजमितीस काही उरलेले नाही. त्या झाडाच्या ठिकाणी एक आंब्याचे झाड लावलेय सिंबॉलिक म्हणून. तिथेच १९७३ साली हरियाणाचे राज्यपाल असलेले तपासे म्हणून मराठी गृहस्थ होते त्यांच्या पुढाकाराने एक छोटासा चबुतरा उभारलाय, तिथे उर्दू व हिंदी व इंग्लिश भाषांत पानिपतबद्दल लिहिले आहे. काला आमच्या लाकडापासून एक कमान बनलेली आहे असे 'सॉल्स्टिस अॅट पानिपत' नामक पुस्तकात लिहिलेले आहे. बहुधा दर्ग्यातलीच असावी, हे आम्ही गेलो त्यावेळेस माहिती नव्हते.
हा सर्व पानिपत मेमोरियलचा भाग आहे. प्रत्यक्ष मेमोरियल म्हणजे एक मोठे बांधून काढलेले पार्क आहे. मेन गावापासून ५ किमी अंतर आहे, आणि मेन रोड पासून अजून दीड किमी आत जावे लागते. मेमोरियलमध्ये तीनही लढायांची माहिती वगैरे दिलेली आहे. एक म्युझियमसदृश खोली आहे पण तिथे खास काही नाही. २०११ साली पानिपतच्या संग्रामाची २५० वी अॅनिव्हर्सरी झाली त्यानिमित्तची कोनशिला मेनरोडला एण्ट्रन्सला आहे. तिथे तत्कालीन आय ए एस अजित जोशी, तसेच पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम, इ. ची नावे आहेत.
तिथून जवळच रोडमराठा उत्सव वगैरे होत असतो दर १४ जानेवारीस अशी माहिती कळाली. आम्हांला कमान तेवढी बघावयास मिळाली, शिवाजीमहाराज आणि जिजाऊ यांची चित्रे होती आणि 'रोडमराठा उत्सव' असे काहीसे टायटल होते. रोड म्हणजे तेव्हापासून तिथे राहिलेल्या मराठ्यांचे वंशजांचे सध्याचे नाव हे माहिती असेलच.
एकुणात, पानिपत गावात बघण्यासारखे फार काही खास नाही- पण त्या स्मॄती मनात ठेवून गेलो तर असे आजिबात वाटणार नाही. काला आमच्या अगोदर रस्त्यात उगरा खेडी वगैरे बोर्ड दिसतात, एकदम कादंबरीचीच आठवण येते. तिथे गेलो असताना काला आमच्या ठिकाणी बसूनच गडकर्यांच्या 'पानिपतचा फटका' चे अभिवाचन केले होते. लय मजा आलेली. शेजवलकरांचे पानिपत १७६१ घेऊनच गेलो होतो. तिथे नकाशे काढले आणि जरा इम्याजिन केले की त्या दिवशी काय काय झाले असेल वगैरे वगैरे.....
बाकी अजूनही बरेच काही असेल तिथे, आम्ही शोध फार कै घेतला नाही. दिल्लीहून ९०-१०० किमी आहे, बसने २ तास लागतात. करोलबागेकडच्या स्टँडपासून गेलो. बहुधा कश्मीरी गेट नामक मेट्रो स्टेशनहून ते जवळच आहे. नाष्टा सेण्टर्स चांगलीयेत त्याच्या जवळ. सकाळी सकाळी छोलेभटूरे किंवा पराठे वगैरे खाऊन बसलो की टेन्शन नाय.
बाकी पानिपत गावात तरी विचारत विचारत आणि रस्त्यांवरच्या कमानी-बोर्ड पहात पायीच हिंडलो, फक्त काला आमपर्यंत तेवढी शेअर रिक्षा केली. तुमच्या सोयीप्रमाणे पहा कसे काय आहे ते.
22 Jul 2015 - 2:42 pm | इरसाल
"कुरुक्शेत्तर" च्या बाजुला असणार्या " हवेली" मधे जेवल्याशिवाय येवु नका म्हणजे झालं
22 Jul 2015 - 3:26 pm | वाचन प्रेमी
पानिपत मध्ये ४ महिने मुक्काम केलेला आहे.
फिरण्यासारख अस काहीही राहिलेलं नाहीये.
पचरंगा आचार प्रसिद्ध आहे, ते नक्कीच घरी घेऊन जावे. मित्तल मौल जवळ मोमोस अप्रतिम मिळतात.
Highway वर सुखदेव ढाबा जेवणासाठी प्रसिद्ध आहे फक्त सुखदेव कुठे आहे कुणालाही विचारा सांगतील.
पानिपत फिरण्यापेक्षा दिल्ली मध्येच शांतपणे फिराल तर फार उत्तम होईल.
23 Jul 2015 - 1:44 pm | पुतळाचैतन्याचा
प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद. यातून आपली पानिपत बद्दल आजही असणारी कळकळ दिसते.