पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ३

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
14 Jul 2015 - 2:11 am

भाग १, भाग २

शामोनित भटकून, फ्रेंच पदार्थ खाउन आता दुसऱ्या दिवशी काय करायचे हा प्रश्न होता. म्हणजे खरं तर मों ब्लां हे आल्प्सचे सर्वोच्च शिखर बघायचे हे नक्की होते. तिथे वर जाण्यासाठी शामोनिहून एक रोपे वे जातो, मधल्या एका ठिकाणी थांबून पुन्हा वर गेलो की आपण पोहोचतो ३७७७ मीटर उंचीवरील Aiguille du Midi ला, जिथून स्विस इटालियन आल्प्स चा Panaroma व्ह्यू दिसतो. इथून पुन्हा अजून वर जाण्यासाठी एक लिफ्ट आहे, जिने ३८४२ मीटर उंचीवरून मों ब्लां (Mont Blanc) हे शिखर जवळून बघता येते. शिवाय Aiguille du Midi पासून एक केबल कार आहे, जी इटलीतील Pointe Helbronner या पर्वताशी जोडलेली आहे. दोन पर्वतांना जोडणारी ही केबल कार आहे, ज्यात बसून मों ब्लां आणि चारही बाजूंच्या सुंदर दृश्याचा आस्वाद घेत येतो. ३०-३५ मिनिटात ही केबल कार ५ किमीचा प्रवास करते. ही केबल कार बांधणे हे तांत्रिक दृष्ट्या अवघड आणि आव्हानात्मक काम होते. याबद्दल अधिक इथे वाचता येईल.

हे एक चित्र आंतरजालावरून साभार.

.

हे शामोनितले रोपवे चे स्थानक

.

पण ही लिफ्ट काही तांत्रिक कारणाने तेव्हा बंद होती आणि केबल कार देखील बंद होती. म्हणजेच आम्ही फक्त Aiguille du Midi पर्यंत जाऊ शकता होतो, आणि तिथे थोडा वेळ थांबून परत आलो असतो. आणि आमच्या हातात अक्खा दिवस होता. अशा रोपवेचा अनुभव बरेचदा घेतला आहे, हवामानही ठीकठाक होते, सुर्यदेवांची सुट्टी दिसत होती. हे सगळे बघता मग हा पर्याय डळमळीत झाला आणि अजून काय करता येईल याचा विचार सुरु झाला. जवळपासचे इतर पर्याय पाहिले, पण अजूनही दोन तीन रोपवे बंद होते. आता काय? आणि तेवढ्यात एक ठिकाण दिसले - Lac d'Emosson अर्थात एमोसोन नावाचे धरण. याबद्दल माहिती कमी दिसत होती. गुगल इमेजेस बघून या ठिकाणहून मों ब्लां दिसेल असे वाटले. अशीच थोडीफार माहिती बघून शेवटी आता बघू, जे दिसेल ते दिसेल असे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच निघालो.

इथेच वर धरणाच्या जवळच डायनासोरच्या फूटप्रिंट्स दिसल्या आहेत. त्याची खूण म्हणून रस्त्यात जातानाच एका ठिकाणी हे दिसले.

.

संपूर्ण घाटाचा रस्ता आणि जसजसे आपण वर जाऊ लागतो, तसे प्रत्येक वळणांवर आणि उंचीवर उंच शिखरे जवळ दिसू लागतात आणि सुंदर दिसू लागतात. त्यामुळे हा प्रवास तेवढाच अविस्मरणीय होता. कित्त्येक लोक सायकलने चढत होते. यात लहान मोठे, स्त्री पुरुष सगळे जण होते. त्यांच्याकडे बघून कौतुक करायला शब्द कमी पडतात. त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी सायकलिंगची एक स्पर्धा होणार होती, त्याच्या तयारीसाठीही काही जण आले होते, असे एकाशी बोलताना समजले.

.

फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमे जवळच स्वित्झर्लंड मध्ये हे धरण आहे. नियोजित स्थळी पोहोचलो तेव्हा तिथे एक रेस्टॉरंट दिसले आणि तिथेच गाड्यांची पार्किंगची सोय होती.

.

तेथील निसर्ग आणि तो अनुभवायला पूर्ण वाव देणारी ती शांतता याने निशःब्द झालो. फोटोंचाच काय तो आवाज सुरु झाला. मों ब्लां साहजिकच उठून दिसत होते.

.

पर्वतांमधील झरे आणि बर्फ वितळून होणारे पाणी साठवून त्यापासून जलविद्युत निर्मिती करण्यासाठी १९२५ साली इथे एक धरण बांधले गेले. त्यानंतर १९७३ साली या दुसऱ्या मोठ्या धरणाचे काम पूर्ण झाले जे या फोटोत दिसते आहे. १८० मीटर उंच असलेली ही भिंत आहे. Swiss Federal Railways साठी लागणारी उर्जा मिळवण्यासाठी म्हणून बांधलेले हे धारण आता पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित केले आहे. इथवर येण्यासाठी या धरणाच्या बांधणीच्या वेळी जी ट्रेन वापरली गेली, त्याच मार्गाने आता पर्यटकांसाठी एक रेल्वे आहे. या ट्रेनने येउन मग अजून एका Funicular Railway (87 % Slope - world’s steepest two-carriage funicular) ने वरपर्यंत पोहोचता येते. या ट्रेनने येताना सोबतीला आल्प्स आणि तेवढाच साहसी वाटणारा हा प्रवास आहे. पण या दोन्ही ट्रेन्स सध्या बंद आहेत.

.

.

.

आधी इथल्या रेस्टॉरंटमध्ये बसून एक कॉफी घेतली, काय खायला मिळू शकेल याचा अंदाज घेऊन ठेवला आणि मग पुढे धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी निघालो. डायनासोरचे ठसे कुठे बघता येतील म्हणून त्याचीही माहिती शोधत होतो. एक दोन लोकांना विचारले तर त्यांना कुणालाच इंग्लिश येत नव्हते. तिथल्याच एका बोर्डची मदत घेऊन परत एकाला विचारले आणि तिथे जाण्यासाठी असलेली वाट सध्या बर्फामुळे बंद आहे असे समजले. शिवाय एरवीही तिथे ट्रेक करत २-३ तास लागतात अशी माहिती मिळाली, तेवढा वेळ आमच्याकडे नव्हताच.

.

या खालच्या फोटोत ट्रेनचा रस्ता दिसतो आहे, ज्याचा उपयोग धारण बांधताना करण्यात आला. Funicular Railway चा धडकी भरवणारा उताराचा रस्ता मात्र फोटोत आला नाही.

.

.

बरेचसे लोक हे स्की करण्यासाठी आले होते, जे या भिंतीवरून पुढे जाऊन पुढच्या एका डोंगरावर स्कीचा आनंद घेत होते.

.

परत आलो आणि भूक लागली म्हणून रेस्टॉरंट मध्ये जाऊन ऑर्डर दिली. अगदी कितीही निर्जन स्थळी गेलो तरीही बहुधा स्विस मध्ये खाण्यापिण्याची काहीतरी सोय होतेच. पुढच्या दहा मिनिटात व्हेज सूप आणि ब्रेड आले. त्यासोबत आपल्याकडे एका ताटलीत कांदा लिंबू आणून ठेवले जाते तसे इथे एका डिशमध्ये चीज आणून दिले होते. चविष्ट सूप पिउन मग आता परत कॉफी किंवा हॉट चॉकलेट घ्यायलाच हवे म्हणून तेही झाले.

.

३ वाजून गेले होते आणि ज्या उद्देशाने आम्ही ही सहल ठरवली, त्या नातलगांना भेटायचे होते. आता निघणे आवश्यक होते. आधी माहिती असते तर एक छोटासा ट्रेक करता आला असता असे वाटले, पण अशा अनोळखी ठिकाणी सगळेच मनासारखे जुळून येईल असे होत नाही. सगळे दृश्य मनात आणि फोटोंच्या रुपात साठवत परत निघालो.

.

.

.

शामोनितले वास्तव्य संपले होते. पण परतीच्या वाटेवर स्विस मधली काही नियोजित स्थळे तर काही सुखद धक्के या सगळ्यांनी सहलीचा शेवट तेवढाच विशेष ठरला. त्याबद्दल आता पुढच्या आणि अंतिम भागात.

क्रमशः

पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ (अंतिम)

प्रतिक्रिया

खेडूत's picture

14 Jul 2015 - 8:15 am | खेडूत

मस्तच!

वाचतोय..

सविता००१'s picture

14 Jul 2015 - 8:57 am | सविता००१

हा पण भाग छानच.
लिही गं पटापट
सुरेख फोटो

वेल्लाभट's picture

14 Jul 2015 - 12:09 pm | वेल्लाभट

सुपर फोटो. वर्णन तर खासच. येऊद्यात.

मस्त झालाय हा भाग पण... फोटो सुद्धा खुप छान आहेत. :)

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2015 - 2:33 pm | स्वाती दिनेश

मस्त.. फोटोही क्लास!
स्वाती

प्रचेतस's picture

14 Jul 2015 - 4:27 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर फोटो.

ते धरणावरसुद्धा बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण झालेय.

मधुरा देशपांडे's picture

14 Jul 2015 - 6:05 pm | मधुरा देशपांडे

धन्यवाद.
कुठल्या चित्रपटांचे चित्रीकरण झालेय? मी शोधले पण काही सापडले नाही.

दोन तर चटकन आठवले होते. जेम्स बॉण्डचा कॅसिनो रॉयाल आणि ट्रान्सफॉर्मर्स. पण खाली चौराकाका म्हणतात त्याप्रमाणे तो व्हुवर डॅम असावा. दोन्ही अगदी सारखेच दिसताहेत.

मधुरा देशपांडे's picture

15 Jul 2015 - 1:16 pm | मधुरा देशपांडे

हो बहुतेक तो व्हुवर डॅम असावा. कारण ही जागा तशी फारशी माहिती नाही अजुन पर्यटन स्थळ म्हणुन. आणि स्विस पर्यटन विभागाने इथे जर चित्रीकरण झाले असते, तर नक्कीच एव्हाना त्याचे जोरदार मार्केटिंग केले असते. राइशेनबाख फॉल्स हा अगदी लहानसा धबधबा केवळ शेरलॉक होम्स साठी प्रसिद्ध आहे, आणि तिथे उपलब्ध असलेल्या एका खोलीच्या जागेत त्यांनी संग्रहालय उभे केले आहे. दिलवाले दुल्हनिया सारखे हिंदी आणि जेम्स बॉण्डच्या चित्रपटांसाठी वापरलेल्या इतर ठिकाणी तर अक्खे रेस्टॉरंट त्यांच्या फोटोंनी आणि माहितीने भरलेले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2015 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

अतिशय सुंदर !!

पर्वत, बर्फ, हिरवाई, रज्जुमार्ग, पहाडी रेल्वे, इ धागे सगळीकडे समान असले तरी स्वित्झर्लंडच्या कोपर्‍याकोपर्‍यात सुखद आश्चर्याचा धक्का बसेल असे नैसर्गिक आणि / अथवा मानवनिर्मित वेगळे काहीतरी असणारच हा जणू नियमच आहे !

चौकटराजा's picture

14 Jul 2015 - 7:09 pm | चौकटराजा

हा भाग ही उतम झालाय.प्रचेतस याना म्हणायचे आहे ते हे धरण नसावे. अमेरिकेतील व्हुव्हर धरण असावे. या धरणा वरून
फोर्स टेन फ्रॉम नॅव्हरॉन या चित्रपटाची आठवण आली.त्याचे शुटी़ंग व्हुवर डॅम वर केलेय. दोन्हीत साम्य म्हणजे उभी भित
प्लान मधे वक्राकार. बाकी मधुरा आणि डॉ म्हात्रे यांच्यात जणु शर्यतच लागलीय आल्प्सला पादाक्रांत करायची. त्यामुळे आम्हा मिपावाल्यांची मात्र चंगळ आहे. ती लाल तर्रीवाली चीज मिसळ आहे काय ?

मधुरा देशपांडे's picture

15 Jul 2015 - 1:01 pm | मधुरा देशपांडे

ती लाल तर्रीवाली चीज मिसळ आहे काय ?

हाहा. आपल्या झणझणीत मिसळीची सर इकडच्या या पदार्थांना येणे कदापि शक्य नाही. जरी ते सुप छान होतं तरीही मिसळ ती मिसळ. ;)

सानिकास्वप्निल's picture

15 Jul 2015 - 3:55 am | सानिकास्वप्निल

छान लिहिलाय हा भाग.
फोटो पण मस्तं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jul 2015 - 4:02 am | निनाद मुक्काम प...

फोटो मस्त आले आहेत

श्रीरंग_जोशी's picture

15 Jul 2015 - 5:46 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच उत्तम वर्णन अन फोटोज.

लेखातले धरण व अमेरिकेतले हूवर डॅम यांच्यात साम्य आहे.

युरोपला निर्मात्याने सढळ हस्ताने निसर्ग सौंदर्य दिलं आहे अन ते सर्व जपण्याची तिथल्या लोकांची प्रवृत्ती अनुकरणीय आहे.

मस्त झालाय हाही भाग.फोटो तर क्लासच!

मधुरा देशपांडे's picture

15 Jul 2015 - 1:17 pm | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार. :)

इरसाल's picture

15 Jul 2015 - 2:15 pm | इरसाल

मला वाटतं की लुगानो ते झुरिख प्रवासात हा डॅम दिसतो विमानातुन.

पद्मावति's picture

15 Jul 2015 - 3:08 pm | पद्मावति

फार छान झालाय हा भागसुद्धा. लेखनशैली फारच सुरेख त्यामुळे लेख वाचतांना मस्तं मनातल्या मनात माझी पण आल्प्स ची सफर होतेय. घरबसल्या मेंटल वेकेशन.

जुइ's picture

16 Jul 2015 - 7:39 am | जुइ

अप्रतिम फोटो आणि वर्णन!