पावसाळा आणि कास!

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in भटकंती
14 Jul 2015 - 1:22 am

पावसाळा आणि सातारा हे एक सुंदर समिकरण आहे! तसं पाहिलं तर पावसाळ्यात सगळ्याच जागा सुंदर हिरव्यागार होऊन जातात पण सातार्याशी लहानपणापासून नाते असल्यामुळे तो मला जवळचा वाटतो.

सातार्‍याच्या आजूबाजूला बरीच पर्यटनस्थळे उदयाला येत आहेत त्यापैकी फारच प्रसिध्द झालेलं एक म्हणजे कास पठार! हिवाळ्यात इथे उमलणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांमुळे याला बरीच प्रसिद्धी मिळाली तसेच वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणूनही घोषित करण्यात आले. हि प्रसिद्धी तारक कि मारक हा वेगळा विषय होईल त्यामुळे जाऊदे!

तर वीक एंडची गर्दी टाळण्यासाठी आम्ही मंगळवारी ७ जुलैला कासला जायचा प्लान केला. हा म्हणजे सुट्टी टाकली होती, सातार्यातच होतो आणि गाडी सुद्धा होती त्यामुळे चला फिरून येऊया अशा प्रकारचा हा प्लान होता! आता पावसाळ्यात कासला पाहण्यासारखे काय असते हा प्रश्न पडू शकतो आणि लांबून खास काहीतरी पाहण्यासाठी इथे येणार्यांसाठी तो रास्तही आहे. मला तरी मित्रांसोबत कासला जाणे एकदम मस्त वाटते. आता येणाऱ्या वर्णनावरून तुम्हाला काय वाटतंय ते ठरवा!

सातार्यातून कासकडे जाताना डोंगरावर रस्त्याला लागून दोन हॉटेल आहेत, "निवांत" आणि "बकुळा". बकुळामध्ये मांसाहारी पद्धतीचे जेवण चांगले मिळते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे दुपारचे जेवण तिथेच करू हे ठरवून साधारण १२ वाजता घरातून संकेत आणि मी निघालो. हॉटेलमधून अजिंक्यतारा आणि त्याच्या कुशीत असलेला सातारा यांचे छान दृश्य दिसते. रात्री इथून सातार्याच्या रस्त्यांवरील दिव्यांमुळे होणारा '17' हा आकडाही दिसतो. आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर चिकन थाळी मागवली. मस्तपैकी तांबडा रस्सा, खिमा, ड्राय चिकन, चपाती असे जेवण आले! बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि चवही मस्तच होती. येथेच्छ खादाडी झाल्यावर तिथून कासच्या दिशेने निघालो.

अजिंक्यतारा
ajinkyatara

जेवण
jewan

आता हळूहळू धुके जाणवू लागले होते. एक क्षण पुढचा रस्ता व्यवस्थित दिसायचा तर दुसर्याच क्षणी धुक्यात हरवून जायचा! अधून मधून एखादी सर येउन जायची, धो धो पाउस नसल्यामुळे आम्ही पठारावर गाडी थांबवून काही वेळ निवांत तिथेच चालत राहिलो. पण माणसांपासून पठाराचे रक्षण करायला घातलेले कुंपण पाहून थोडे वाईट वाटले. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या प्राण्याला निसर्गाचा आस्वाद त्याची नासधूस न करता का घेता येत नसावा? हे कुंपण, कास प्रसिध्द झाल्यावरच घालावे लागले. येणारे पर्यटक अक्षरशः आलेल्या फुलांवर गडगडा लोळून फोटो काढताना पाहिलेत, काही हुशार आपली गाडी सरळ फुलांपर्यंत घेऊन जायचे. या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी हा उपाय करण्यात आला. पण यामुळे म्हशींच्याद्वारे चरताना होणारे परागकणांचे वहन कमी होऊन फुलांच्या संख्येवर आणि विविधतेवर परिणाम होण्याची शक्यताही काही जणांनी वर्तवली आहे.

बाप्पा!
bappa

धुक्यात हरवली वाट!
rasta

पण अचानक आलेल्या एका सरीने विचारांची साखळी तुटली आणि आम्ही कास तलावाच्या दिशेने निघालो. तलाव काठोकाठ भरला होता. वाऱ्याची प्रत्येक झुळूक तलावावर लहान लहान लाटा तयार करत होती आणि बंधार्यावरून थोडे थोडे पाणी बाहेर पडत होते. एव्हाना आम्ही थोडेफार भिजलो होतो आणि थंड वाऱ्यामुळे अंगावर सरसरून काटा येत होता! पण त्यात तर खरी मजा होती! आणि सुदैवाने तलावाजवळ काहीच गर्दी नव्हती त्यामुळे आजिबात गोंधळ नव्हता. वाऱ्याचा आणि त्यामुळे होणारा झाडांच्या पानांचा आवाज आणि तलावातले पाणी दगडांवर पुन्हा पुन्हा धडकून तयार होणारा आवाज ऐकताना एकदम शांत वाटत होते. आजूबाजूला संपूर्ण धुकं साचले होते त्यामुळे फोटो सुद्धा धूसरच येत होते. इथे आम्हाला खंड्याचे दर्शन झाले पण त्याचा फोटोही धुरकटच आला. थोडेफार फिरल्यानंतर जवळच असलेल्या टपरीवर गरम गरम भजी आणि चहा घ्यायला आम्ही निघालो.
थंड वातावरण, थोडासा पाउस, भरपूर धुके, हातात गरम चहाचा कप आणि सोबतीला भजी!! खुश होण्यासाठी अजून काय लागतंय!

तलाव
talaw

talaaw1

talaaw2

talaaw3

talaaw4

talaaw5

खंड्या
khandya

आता फिरून समाधान झालं होत आणि ५ वाजून गेले होते त्यामुळे थोडा पुढे असलेला वजराई धबधबा पाहण्याचा प्लान रद्द केला. असाही पाऊस फारसा झाला नसल्याने धबधब्याला पाणी किती असेल हि शंका होती. पण पाणी असल्यावर मात्र हा धबधबा खूपच छान दिसतो. ठोसेघरच्या धबधब्यापेक्षा मला तरी वजराई जास्त आवडतो. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचायला थोडं चालावं लागतं, आता रस्ता झाला असला तर माहित नाही.

परतीच्या वाटेत एका बाजूला दिसणाऱ्या कण्हेर धरण तर दुसऱ्याबाजूला दिसणाऱ्या उरमोडी धरण यांच्या जलाशयांचे काही फोटो काढले आणि संध्याकाळी साताऱ्यामध्ये परत आलो. तर मग आता तुम्ही ठरवा पावसाळ्यातला कास तुम्हाला कसा वाटतो ते, पण भेट दिल्यावर त्याला स्वच्छ ठेवण्याचाही नक्की प्रयत्न करा! :)

कण्हेर धरण
kanher

उरमोडी
uramodi

प्रतिक्रिया

कंजूस's picture

14 Jul 2015 - 9:09 am | कंजूस

वा मस्त फोटो.

प्रचेतस's picture

14 Jul 2015 - 9:13 am | प्रचेतस

सुंदर फोटो.
निसर्ग भटकंतीमध्ये खादाडीचे फोटो नेहमीच रसभंग करतात असे माझे मत.

जडभरत's picture

14 Jul 2015 - 9:34 am | जडभरत

मस्त रे भावा मस्तच! एकदम नाॅस्टॅल्जिक केलंस.

वेल्लाभट's picture

14 Jul 2015 - 3:08 pm | वेल्लाभट

खलास....
क्लायमेट फील करता येतंय बर का :)

मॅक's picture

14 Jul 2015 - 3:49 pm | मॅक

मस्तच...........अप्रतिम........
खूप दिवसांची इच्छा आहे कधी जाण होतय काय माहीत.............

उगा काहितरीच's picture

14 Jul 2015 - 4:24 pm | उगा काहितरीच

थंड वातावरण, थोडासा पाउस, भरपूर धुके, हातात गरम चहाचा कप आणि सोबतीला भजी!! खुश होण्यासाठी अजून काय लागतंय!

बस्स ! संपलाच की विषय !!

गम्पत पाटील's picture

14 Jul 2015 - 9:09 pm | गम्पत पाटील

पावसाळा आणि सातारा हे एक सुंदर समिकरण आहे!

आम्ही मंगळवारी ६जुलैला कास ला जायचा प्लान केला.

यावर्षी मात्र ६ जुलैला सोमवार होता :)

बाकी फोटू सगळेच झ 'कास'

शब्दबम्बाळ's picture

14 Jul 2015 - 11:03 pm | शब्दबम्बाळ

बारीक निरीक्षण! :)
धन्यवाद! दुरुस्ती केली आहे!

अस्वस्थामा's picture

14 Jul 2015 - 9:49 pm | अस्वस्थामा

जळवा लेको..

(लहानपणी आणि अगदी कॉलेज संपेपर्यंत सातार्‍यात हुंदडलेला एक सातारकर.. :) )

शब्दबम्बाळ's picture

14 Jul 2015 - 11:07 pm | शब्दबम्बाळ

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे खूप आभार! :)

सातार्‍यात काही वर्ष राहिल्यामुळे हा परिसर आवडतो.

दिपक.कुवेत's picture

15 Jul 2015 - 12:50 pm | दिपक.कुवेत

आणि वर्णन देखील. त्यात धुक्यात हरवलेल्या वाटेचा खूप आवडलाय.

तलाव काठोकाठ भरला होता. वाऱ्याची प्रत्येक झुळूक तलावावर लहान लहान लाटा तयार करत होती आणि बंधार्यावरून थोडे थोडे पाणी बाहेर पडत होते. एव्हाना आम्ही थोडेफार भिजलो होतो आणि थंड वाऱ्यामुळे अंगावर सरसरून काटा येत होता! पण त्यात तर खरी मजा होती!

....फारच छान लिहिलय.

शब्दबम्बाळ's picture

22 Jul 2015 - 7:40 pm | शब्दबम्बाळ

खूप आभार! :)

बहुगुणी's picture

18 Jul 2015 - 6:26 pm | बहुगुणी

दिल ढूंढता है फिर वही फ़ुर्सत के रात दिन....

नूतन सावंत's picture

22 Jul 2015 - 7:52 pm | नूतन सावंत

सुंदर वर्णन.फोटोही झकासच.कासला शनिवार,रविवार सोडून जायचा विचार होता,आता अजून पक्का झाला.

नूतन सावंत's picture

22 Jul 2015 - 7:52 pm | नूतन सावंत

सुंदर वर्णन.फोटोही झकासच.कासला शनिवार,रविवार सोडून जायचा विचार होता,आता अजून पक्का झाला.