वाई,मेणवली आणि धोम धरण

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
21 Jun 2015 - 12:03 pm

"नेमेची येतो मग पावसाळा" प्रमाणे नेमेची येतो वाला शनिवार उजाडला .नेमेची येतो वाला पाऊस मात्र अजूनही वाकुल्या दाखवता होता. पुढचा वीकांत शाळेची तयारी करण्यात (मुलांच्या) जाणार असल्याने हा वीकांत सत्कारणी लावायचे ठरले होते. तसे आमच्या "कायवर" ग्रुपवर पोस्टले पण होते. पण तिकडे नुसतेच चर्चेचे गुर्हाळ चालू होते.पी.सी.एम.सी सायन्स पार्क किवा पवना धरणात बोटिंग किवा तापोळा-महाबळेश्वर यापैकी काही ठिकाणे लांब म्हणून तर काही फारच जवळ म्हणून रद्द झाली .

मी शेल्फ मधली सहली एका दिवसाच्या -परिसरात पुण्याच्या (प्र.के.घाणेकर),भोर आणि आसपासचे पर्यटन (चंद्रशेखर शेळके ) अशी काही पुस्तके आणि गुगलबाबाच्या मदतीने एका दिवसात काय काय करता येइल याचा शोध घेत असताना अचानक वाई, मेणवलीचा नाना फडणीसांचा वाद आणि धोम धरण डोक्यात चमकले. पुण्याहुन अंतर साधारण १०० कि.मी. आणि न बघितलेला भाग असल्याने मंडळीही लगेच तयार झाली. शिवाय कडक उन्हात धरणात डुंबायची कल्पना फारच सुखद होती.दोन गाड्या आणि तीन कुटुंब अशी सोय करुन रविवारी सकाळी ८ वाजता कात्रज प्राणी संग्रहालयापासून निघालो.उपजत अति शहाणपणा मुळे, नाश्ता करायला कुठे थांबायचे हे नक्की न ठरवताच सर्व जण गाडीत बसले. दुसरी गाडी सतत नजरेच्या टप्प्यात ठेवायचे असे ठरले होते. पण खेड शिवापूर नाक्याला टोल साठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात काहीतरी गोची झाली आणि आमची चुकामुक झाली. नसरापूर फाटा ओलांडला तरी दुसरी गाडी काही मला दिसेना.फोन करुन पाहिला पण लागत नव्हता. नेहेमीची नाश्ता करायची ठिकाणे एकएक करुन मागे पडू लागली.पहिले कामत मग अमृता असे करता करता शिरवलचे श्रीराम आले तेव्हा मात्र आम्ही थांबायचे ठरवले.
कुठे मेला हा जी ? (त्याचे आडनाव गांधी आहे म्हणून "जी " हे त्याचे टोपण नाव. ) वगैरे उद्धार चालू झाले आणि एकीकडे त्याला आणि त्याच्या बायकोला फ़ोन लावायचे प्रयत्न चालू होते. १०-१५ मिनिटात साहेब आलेच ...भरपूर शिव्या वगैरे घालून झाल्यावर समजलेली स्टोरी अशी की गाडीत पेट्रोल कमी असल्याचा साक्षात्कार झाल्याने साहेब एका पेट्रोल पम्पवर थांबले आणि गाडीची टाकी फ़ुल करुन घेतली.पण आम्हाला फ़ोन करुन कळवायला विसरले. असो.
सर्वांना कडकडून भूक लागली असल्याने मिसळ वडापाव पोहे आणि पाठोपाठ चहा लस्सी वगैरे वर ताव मारुन पोट आणि डोके दोन्ही शांत करुन मंडळी पुढे निघाली.
पुणे कात्रज शिरवळ पारगाव खंडाळा वगैरे करून सुरूर लागले. बाई (गुगल वरची ) म्हणाली उजवीकडे वळा.रस्त्याला खाली एका अंडरपास होता त्यात घुसलो आणि दाट झाडीतून वाई ची वाट पकडली. लगेच रस्त्याच्या बाजूने मॅप्रो आणि माला चे फ़लक दिसू लागले .मॅप्रोचे एका आउटलेट सुद्धा दिसले. महाबळेश्वराचे डोंगर डाव्या बाजूला ठेवता गाड्या वाई कडे निघाल्या. साधारण ८-९ कि.मी. वर सरळ वाई गावच सामोरे आले.

a

वाईचे ढोल्या गणपती मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे आहे. गणेशाची मूर्ती सुद्धा पूर्ण दगडातून घडवली आहे. मूर्तीचा प्रचंड आकार बघुन आपण स्तिमित होतो. श्रीमंत गणपतराव भिकाजी रास्ते यांनी हे मंदीर १७६२ साली बांधले अशी नोंद मंदिराच्या भिंतीवर आढळते. सध्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे पण तो जीर्णोद्धार केलेला कळस मूळ दगडी बांधकामाशी पूर्ण विसंगत दिसतो.मंदिराचे दगडी प्राकार आणि बाजूने वाहणारे कृष्णा नदीचे पात्र पाहुणा मन प्रसन्न होते. जाता जाता ...ओमकारा, स्वदेस, गंगाजल आणि दबंगचे शूटिंग इथे झाले आहे.
पावसाळ्यात पुन्हा एकदा इथे यायचेच असे ठरवून तेथुन निघतो तोवर वाईचे सुप्रसिद्ध कंदी पेढे समोर आले आणि पेढ्यांची खरेदी झाली.
b

c
गणेश मंदिराच्या पाठी कृष्णाबाईचे देऊळ आहे. कृष्णाबाईचा उत्सव फेब्रुवारीत असतो अशी माहिती मिळाली. बाजूलाच काशी विश्वेश्वर मंदीर आहे.
d
या मंदिरातील दीपमाला , मंडप आणि भव्य नंदी फारच वैशिष्ट्यपूर्ण आहेत .दर्शन घेऊन आणि मंडपात थोडा वेळ आराम करून आम्ही पुढे निघालो.
e
सकाळी भरपेट नाश्ता झाल्याने कोणालाच भुक नव्हती.शिवाय सटर फटर खाणे दोन्ही गाड्यांमध्ये होते.त्यामुळे तडक मेणवलीला प्रस्थान करायचे असे ठरले.
f

वाई ते मेणवली अंतर सुमारे ५ कि.मी. आहे.शांत आळसावलेली दुपार मेणवली गावावर पसरली होती.मेणवली गावात तसे दुसरे काही पाहण्या सारखे नाही.वाटेत विचारत विचारत नाना फडणीसांच्या वाड्यापर्यंत पोचलो .
c

वाड्याच्या जवळच एका प्रचंड बुंधा असलेला वृक्ष आहे.त्याचे नाव विसरलो पण फोटो काढलेत .वाडा खरोखरच बघण्यासारखा आहे. पण तिकडे राहणाऱ्या वंशजांनी वाड्याचा बराचसा भाग बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे निराशा झाली.
हे तिथेच असलेले गणपतीबाप्पा
g

ही दारावरची गणेशपट्टी
h
बाजूलाच एका दुकान होते तिथल्या बाईला विचारले कि दुपारी वाडा बंद असतो का? तर ती म्हणे नाही..एवढाच बघता येतो.

वाड्याची मागची बाजु
j

ठीक आहे. जेवढे बघितले त्यावर समाधाना मानून वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या नदीच्या घाटाकडे निघालो.घाटाची उतारावरची पायर्यांची रचना फारच सुंदर आहे.
p

l

पावसाळ्यात नदीचे पाणी वर पर्यंत येउन वाड्याच्या पायापर्यंत लागत असेल.कसली रईस जीवनशैली...रोज डायरेक्ट नदीच्या पाण्यातच आंघोळ...वा!!
घाटाला थोडा वळसा घालून पुढे गेले की शंकराचे देऊळ आहे.
o

y
देवळा समोरच्या घुमटी मध्ये एका प्रचंड घंटा टांगली आहे. त्यावर इंग्रजी मुळाक्षरे वापरून पण वाचता न येणारे काही शब्द लिहिले आहेत.१७०७ साल नोंदले आहे.आणि नेहमीप्रमाणेच चिमाजी अप्पांनी वसईला पोर्तुगीजांचा पराभव करून ही घंटा आणल्याची आख्यायिका पण...बाकी लढाईत विजय मिळाल्यावर घंटा लुटण्याचे प्रयोजन काय असावे हा प्रश्न माला नेहमीच पडता आलाय.असो.

g

घाटावर थोडा वेळ घालवल्यावर आता मात्र सर्वांच्या पोटात कावळे कोकलू लागले होते. ट्रिपचा प्रस्ताव मी मांडला असल्याने जेवणाला जास्त उशीर झाला तर सगळे माझ्यावर शेकण्याची शक्यता होती. रस्त्यात एक हॉटेल दिसले होते पण आम्हाला धोम धरणाकडे जायचे होते तर हे हॉटेल उलट्या बाजूला पडणार होते.पण हातात वेळ होता आणि आधी पोटोबा या न्यायाने पहिले जेवण करू असे सर्वानुमते ठरले. गाड्या उलट्या दिशेला फिरवल्या .

v
हॉटेल काही फार लांब नव्हते .पण तिथे कसलातरी कार्यक्रम चालू होता. त्यामुळे जेवायला थोडा उशीर होइल असे सांगितले . आम्हाला आत्ता दुसरे हॉटेल शोधायचे त्राण नव्हते. सुदैवाने १०-१५ मिनिटात सोय झाली आणि सुग्रास जेवण पुढे आले.
मग काय ? मंडळींनी आडवा हात मारला आणि पैसे वसुल केले.

वेटरशी बोलताना असे समजले की आम्ही जिकडून धोम धरण बघायला जाणार होतो ती योग्य जागा नसून वाईमार्गे पसरणी ला गेल्यासा तिकडे बोटींग वगैरे करायला मिळेल.ही नवी माहिती मिळताच आम्ही पुन्हा मेणवलीला न जाता वाईकडे निघालो आणि पुन्हा गणपतीच्या मंदिरा समोरुन पुढे जाऊन पसरणी च्या रस्त्याला लागलो.

आता वातावरण थोडे बदलले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट झाडी होती. विशेष करुन आंब्याची झाडे खुप दिसत होती आणि कैर्याही लगडलेल्या दिसत होत्या.स्थानिक लोक दगड मारुन कैर्या पाडताना दिसत होते. आम्हीही गाड्या थांबवुन काही कैर्या गोळा केल्या आणि पुढे निघालो.साधारण ५-६ कि.मी. अंतरावर धरणाचे पाणी दिसु लागले. रस्त्यात एक पॉवर हाउस लागले आणि त्यानंतर लगेच उजव्या बाजुला पाण्याकडे जायला गाडीरस्ता मिळाला. साधारण ४ वाजले होते आणि या ट्रिपचा शेवटचा हायलाईट म्ह्णजे धरणाच्या पाण्यात डुंबणे बाकी होते.उन्हाळ्यामुळे पाणी बरेच आत गेले होते .गाड्या पाण्यापर्यंत नेउन उभ्या केल्या आणि दिवसभराची तापलेली मंडळी गारवा शोधायला पाण्यात उअतरली. पाणी फार खोल नव्हते.थोड्याच वेळात बच्चा खेले बच्चेका बाबा भी खेले अशी अवस्था झाली.

w
पाण्यात कितीही वेळ घालवला तरी कोणाचे समाधान होइना. पण महाबळेश्वरच्या डोंगरांवर पावसाने आपली हजेरी दाखवायला सुरुवात केली होती. पावसाने गाठायच्या आत आपल्याला पुणे गाठायचे आहे या कल्पनेने सगळे एक एक करुन बाहेर पडले. जवळ असलेले थोडेफार खाउन पुन्हा सगळे परतीच्या मार्गाला लागलो ते आता नवीन ट्रिप कुठे करायची हा विचार डोक्यात घेउनच.

टिपः-फोनच्या कॅमेर्‍याने फोटो काढले असल्याने फार चांगले रिझोल्युशन नाही. कृपया सहकार्य करावे.

प्रतिक्रिया

मे महिन्यातली ट्रिप आहे वाटतं. मेणवलीला भोजपुरी सिनेमांचे/फिल्मचे शुटिंग होते ना?
फोटो ओघळलेल्या मेणासारखे दिसताहेत.width=500 ठेवा आणि height=? इथे मात्र जागा रिकामी ठेवल्यास खूप सुधारतील .भटकंती धाग्यात संपादन आहे त्यामुळे तुम्हालाच दुरूस्ती करता येईल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2015 - 12:22 am | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद कंजुस सर, आता बरेच सुधारलेले दिसताहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jun 2015 - 12:23 am | राजेंद्र मेहेंदळे

"फोटो" लिहायचे राहिले :)

धनावडे's picture

21 Jun 2015 - 4:49 pm | धनावडे

आजुन १५ कि मी पुढे गेला असतातर बलकवडी धरण पण पाहुण झाल असत खुप सुंदर जागा आहे

होय ,फोटो आता बरेच चांगले दिसताहेत राजेंद्र.

छान वृत्तांत. या ठिकाणी भेट दिलेली असल्याने ते आठवत होते. मागे एकदा वाईला काही कारणाने जाण्याचा योग आला असताना ढोल्या गणपतीचे दर्शन घ्यावे असे मनात होते पण नेमके त्याचवेळी कोण्या राजकारणी मनुष्याच्या मनातही तोच विचार आला होता. पोलीस बंदोबस्तामुळे असल्याने दर्शन काही झाले नाही. अशाने त्या राजकारण्याला तरी गणपती बाप्पा पावणारेत का?

जुइ's picture

22 Jun 2015 - 8:22 am | जुइ

वाईचा ढोल्या गणपती पाहिला आहे.

अविनाश पांढरकर's picture

25 Jun 2015 - 12:16 pm | अविनाश पांढरकर

धोम धरणाचे फोटो शोधता शोधता धागा संपला.

पैसा's picture

26 Jun 2015 - 11:53 am | पैसा

छान लिहिलंत. फोटो मोबाईलवर कमी रिझोल्युशनला काढलेत का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2015 - 12:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटोंचा जरा लोचाच झालाय, जास्त ताणले तर ब्लर होताहेत.
आणि तो शेवटचा धोम धरणाचा फोटोच मिळत नाहिये :(

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2015 - 12:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

साईझ ऑटो वर ठेवुन फोटो बरे दिसताहेत. धोम धरणाचा फोटोपण टाकलाय आता.

पद्मावति's picture

27 Jun 2015 - 2:08 pm | पद्मावति

अतिशय सुंदर वर्णन आणि फोटोसुद्धा.
तो वाडा आणि धरणाचे फोटो फारच सुरेख.

त्रिवेणी's picture

27 Jun 2015 - 3:56 pm | त्रिवेणी

तिथून थोड़ पुढे नृशिह(बहुतेक) मंदिर बघितले का? कामळाच्या आकरचे कुंड आहे तिथे ते.
माझ्याकडचे फोटो न चा zabbu दिला तर चालेल का?

चालेल ....

टाका बिंधास्त...

वाईला कधी जाणे झाले नाही, आणि पुढे-मागे होईल ह्याची शास्वती पण नाही.

निदान फोटो वर तरी समाधान मानतो.

विवेकपटाईत's picture

27 Jun 2015 - 7:43 pm | विवेकपटाईत

वृतांत आणि फोटो दोन्ही मस्त.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Jun 2015 - 10:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्रिवेणीतै झब्बु फोटो टाका की .मला नाहि ते मंदीर माहित. पुढच्यावेळी भेट देईन म्हणतो.

हा माझ्या गावावरचा धागा वर आला की गावाची आठवण येते आता गावी लवकरच जाऊन आल पाहिजे

चिगो's picture

29 Jun 2015 - 12:35 pm | चिगो

सातारा सासुरवाडी असल्याने (सगळे जरी मुंबईतच सेटल असले तरी) सातार्‍याला बरेचदा जाणं होतं.. वाई/मेणवली/धोम हा भागपण फिरुन झालाय. वाईचा / मेणवलीचा घाट आणि नाना फडणीसांचा वाडा तर बर्‍याच चित्रपटांच्या चित्रीकरणाकरीता वापरला जातो. पण त्रिवेणीताई बोलल्या तसेच धोमचे नृसिंह मंदीर हे खरंच बघण्यासारखं आहे.. मला वाटतं, कुंडातल्या कमळावर बसलेला नंदी फक्त ह्याच मंदीरात आहे. आम्ही थोडे उशीरा गेल्याने फार फिरायला मिळाले नाही..

अवांतर : सातारा शहरही मला फार आवडतं. तिथं निवांत फेरफटका मारायला मजा येते..

भीमराव's picture

31 Jul 2015 - 10:41 am | भीमराव

जाड बुंध्याचे झाड म्हणुन ज्याचा उल्लेख झाला ते झाड गोरख चिंचेचे आहे. हे औषधी उपयोगाचे झाड आहे, असेच एक झाड NH4 च्या लगत पाचवड गावाच्या थोड्या पुढच्या बाजुला आहे.