श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान मुंबई विभाग यांच्यावतीने किल्ले वसई दर्शन आणि अभ्यास मोहीम हाती घेण्यात आली. इतिहासाबद्दल अभ्यासू वृत्ती व्हावी व दिन शिवस्मरणात जावा यासाठी मुंबईजवळच आसलेल्या किल्ले वसई या जलदुर्गाची निवड करण्यात आली. चिमाजी आप्पा आणि त्यांचा अद्वितीय पराक्रम, शौर्याची गाथा आपल्याला माहित आहेच. पण त्यांची खुबी. आणि लढाई कौशल्य फारच कमी लोकांना माहित आहे.
या किल्ल्याचा अभ्यास आणि ओळख नुसत्या भटकंतीतून होणे श्यक्य नाही. हे आम्हाला माहित होते म्हणूनच या किल्ल्यावर प्रचंड अभ्यास आणि संशोधन करणारे इतिहास संशोधक श्री. दत्त राऊत यांना आम्हाला मार्गदर्शक आणि किल्ल्याची माहिती करून द्या अस सांगताच. त्यांनी लगेच हो हे उत्तर दिले. त्यांना यायला वेळ होता तोपर्यंत आम्ही नरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाला भेट दिली.
चिमाजी आप्पांना मानवंदना देवून या मोहिमेत प्रत्येकाने शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीवर आपले विचार व्याख्यानातून द्यायचे आणि याची सुरवात आम्ही चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाजवळ केली. रोहित तांबे, शिरीष देसाई, मी आणि संदीप भिंगुर्डे यांनी आपल्या व्याख्यानातून आम्हाला शिवयुद्धनीतीचे धडे आम्हापुढे ठेवले. विशेष म्हणजे भारतीय सैन्यात कार्यरत असणारे आमचे मित्र संदीप भिंगुर्डे त्यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय आणि परकीय म्हणजे अमेरिका, युरोप, नेपाळ व श्रीलंका या देशांत शिवरायांची युध्दनीती सैन्यामध्ये वापरली जाते, शिकवली जाते याची जाणीव करून दिली. शिवरायांच हेरगिरी खाते, त्यांनी वापरलेलं गनिमी काव्याचं तंत्र आजही सैन्यात वापरलं जात यातून शिवराय किती महान योद्धे होते याचे दर्शन झाले. आणि आम्हातून एक वक्ता तयार व्हाया यासाठी श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान मुंबई विभागाकडून पाहिलं पावूल उचलल गेले.
त्यानंतर इतिहास संशोधक श्री. दत्त राऊत हे आल्याची माहिती आम्हाला मिळाली मग आम्ही निघालो ते थेट रणमैदानच्या दिशेने. श्री. दत्त राउत हे नुसते इतिहास संशोधक नसून ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपणारे. त्यांवर लेकारांसारखे प्रेम करणारे आणि इतिहास जिवंत ठेवून तो लोकांपर्यंत पोहचवणारे आपल्या अभ्यासातून आणि लेखणीतून धरणीकंप करणारे इतिहास संशोधक आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले यासारखे भाग्य ते अजून कोणते.
सुरवातीला आम्ही आमची ओळख करून दिली नंतर अनंत करमुसे यांनी इतिहास संशोधक श्री. दत्त राउत यांची ओळख करून दिली. वयाच्या १५ वर्षापासून त्यांनी ठरवल कि इतिहासासाठी झटायचं, लोकांना माहित नसलेल्या इतिहासाला समोर आणायचं, त्यांच्या डोळ्यात मराठ्यांच्या शौर्याच अंजन घालायचं काम त्यांनी हाती घेतलं, अनेक पुरस्कार आणि आपल्या लेखणीतून गड किल्ल्यांवर संशोधन करून खरा इतिहास सर्वांसमोर आणला, लोकांना माहित नसलेले गड किल्ले त्यांनी समोर आणले. मोडी, संस्कृत अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे अशी ओळख झाल्यावर, श्री. दत्त राउत आम्हा पुढे उभे आहेत याचा आम्हालाच गर्व वाटू लागला.
वसई हा किल्ला २ ते ३ तासांत पाहणे श्यक्य नाही त्यासाठी ३ दिवसांचे ३३ तास लागतात पण जमेल तेवढी माहिती मी तुम्हाला देतो अस सांगत त्यांनी सोबत आणलेला किल्ले वसईचा नकाशा आम्हापुढे ठेवला आणि किल्ले वसई हा भुईकोट किल्ला नसून तो जलदुर्ग होता. याचा पुरावा व संदर्भ देताना त्यांनी एक जुना नकाशा दाखवला ज्यात किल्ल्याचा तिन्ही बाजूंना पाणी होत हा किल्ला जलदुर्ग आहे हे सर्वप्रथम दाखवून दिले. वसईचा किल्ला हे स्थान हिंदूंचे मोठे तीर्थस्थान म्हणून ” नागेश तीर्थ ” या नावाने प्रसिद्ध होते . हिंदू असलेल्या भोंगळे राजांनी सर्वप्रथम येथे राज्य केले हा किल्ला त्यांच्या राजाच्या ताब्यात होता. मग त्यांनी नकाशावरील मूळ किल्ल्याची माहिती करून दिली. नंतर हा किल्ला बहादूरशहाने जिंकून घेतला. आणि नंतर एका वर्षानंतर तो पोर्तुगीजांनी बळकावला. या परिसरात श्री शंकरांची २१९ मंदिरे होती ती पोर्तुजीगांनी उध्वस्त केली असे श्री दत्त राऊत यांनी सांगितले. वसई किल्ला जिंकल्यानंतर पोर्तुगीजांनी हिंदूंची निशाणी मिटवून त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने या किल्ल्याची बांधणी केली. त्यावेळी एक शहर म्हणून त्यांनी या किल्ल्याचा आराखडा तयार केला. ती बांधणी करताना क्षत्रू हा किल्ला स्वप्नातही जिंकू शकणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली. हिंदुत्वाचा पुरावा त्यांनी किल्ल्यातून नष्ट करण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण अजूनही बरयाच ठिकाणी हिंदुत्वाचे निशाण या किल्ल्यात दिसते. आणि यातून खरा इतिहास समोर येतोय हे श्री दत्त राऊत यांनी दाखवून दिले. आम्ही आता रणमैदानाच्या वरच्या बाजूला उभे होतो तिथे बाजूलाच चिमाजी आप्पा यांनी किल्ला जिंकल्यावर विजयाचे प्रतिक म्हणून दगडात दोन हत्ती कोरलेले आहेत. हे हत्ती म्हणजे किल्ला जिंकताना महत्वाची जबाबदारी पार पाडणारे हत्ती होते. गजलक्ष्मीचे प्रतिक म्हणून त्यांनी ते दोन हत्ती त्या पाषाणी दगडात कोरलेले आहेत
आता आम्ही रणमैदानाच्या व किल्ल्याच्या दरवाजापाशी आलो. हा दरवाजा कसा बनवला आणि याचा लढण्यासाठी कसा वापर केला गेला याचा अभ्यास श्री दत्त राऊत यांनी केला तो जसाच्या तसा आम्हाला सांगितला. किल्ल्यात प्रवेश करताना दरवाजाचे वैशिट्य आम्हापुढे ठेवले कि हा दरवाजा एक दगड काढताच संपूर्ण पाने पडू शकतो. तो फ़सवलेल दगड दाखवला. आणि त्याच्या बाजूलाच तोफांसाठी ठेवलेले जागा. जवळ जवळ १० ते १२ फुटांचे अंतर दोन बुरुजांमधील यात फक्त ३ ते ४ मावलेच एका वेळी शत्रूची लढी शकतात हे त्यांनी दाखवून दिले. या बुरुजाला वळसा देवून आणखीन एक दरवाजा आहे. ती आता नष्ट झाला आहे पण त्या दरवाजाला बाहेरून लोखंडी सुळके होते त्यामुळे हा दरवाजा हत्तीच्या धक्याने पाडणे हा चिमाजी आप्पा यांच्यापुढे एक आव्हान होते आणि ते त्यांनी युक्तीने कसे पेलले. उंट त्यात चिणून त्यावर हत्तीने धक्के देवून तो दरवाजा कसा पाडला आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी मराठ्यांवर गरम तेल, काचा, अश्रूधूर, गरम पाणी, विंचवाचे विष लावलेले बाण यांचा मारा कसा केला आणि कुठून केला याची माहिती आणि जागा त्यांनी आम्हाला दाखवली.
इतिहास संशोधक श्री. दत्त राउत यांनी जो इतिहास आम्हापुढे मांडला, चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्याला वेढा घालून तो किल्ला ताब्यात घेतला . पण तो कसा घेतला ?? त्या आधी किती वर्षे मराठे पोर्तुगीजांच्या पारिपत्यासाठी प्रयत्न करत करत होते . वसई पट्ट्यातील अजून किती किल्ले मराठ्यांना वसईची मोहीम फत्ते करण्यासाठी जिंकावे लागले. चिमाजी आप्पा यांच शौर्य त्यांचा पराक्रम म्हणजे पृथ्वीवरच्या राजहंसाने चंद्र सूर्याला घातलेली गवसणी असेच म्हणावे लागेल. पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे तब्बल २०५ वर्षे उत्तर कोकणातील हिंदू जनतेवर मोठ्या प्रमाणात धार्मिक , आर्थिक , सांस्कृतिक मूल्यांच्या पतनाचे संकट उभे राहिले . धार्मिक बाटवाबाट्वी, देवळांची नासधूस, हिंदू जनतेवर जाचक अटी, धर्मांतरासाठी छळ यासर्व बाबींवर विजय मिळवने हिंदवी स्वराज्यात पडलेल्या या खिंडाराची पोकळी भरून काढणं हे काम खूप जोखमीचे होते. साक्षात मृत्युच्या जभड्यात हात घालण्यासारखे होते. जवळ जवळ २०५ वर्ष पोर्तुगीजांच्या अन्यायाविरुध्द लढण्याचे आणि वसई किल्ला जिंकण्याचे कुणाचे धाडस झाले नाही . चिमाजी आप्पांचे एकच लक्ष होते ते म्हणजे हा वसईचा किल्ला जिंकायचा आणि पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून द्यायची. तब्बल १९ वर्षे या किल्ल्यावर अभ्यास करून किल्ल्याची संपूर्ण माहित काढून मोठ्या तयारीने चिमाजी आप्पा वसई किल्ल्यावर चालून आले हे श्री दत्त राऊत यांच्या तोंडून ऐकताना आमचे कान आतुरलेले होते कि पुढे आजून काय सांगणार कसा हा किल्ला आप्पांनी जिंकला. किती मेहनत त्यांनी घेतली. या किल्यांच्या तटबंदीला कस खिंडार पाडलं जाणून घेण्यास आम्ही अधिकच उत्सूक होतो.
जेंव्हा पहिल्या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर जेंव्हा वसई किल्ला आणि आजूबाजूच्या जनतेवर होणारे अत्याचार रोखण्याची जबाबदारी येवून पडली ती त्यांनी पेलण्याची तयारी दाखवली. तेंव्हा त्यांनी त्यांना हा किल्ला कसा जिंकावा यासाठीची बांधणी कसी करावी याचा आराखडा तयार करताना वसई आणि परिसरातील किल्ले जिंकण्याची आवश्यकता होती. मग त्यांनी या परिसरातील किल्ले पहिले जिंकून घेतले. आणि मग त्यांनी वसई किल्ल्याला वेध घेतला. तब्बल १९ वर्षाचं नियोजन करून एक दिवस तोफांचा बडीमार करत आणि पोर्तुगीजांच्या तोफांचा मारा सहन करत असामान्य चिकाटीने आणि जिद्दीने २२ मार्च, १७३९ रोजी चिमाजी आप्पांनी वसई मोहीम फत्ते करून मराठ्यांच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला. पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली, तुम्ही परकीय आहात तर परकीय म्हणूनच रहा असे खडसावून सांगितले आणि या परकीय सत्तेला वसईतून हद्दपार केले.
त्यानंतर श्री दत्त ते आम्हाला एका चर्चकडे घेवून दिले जिथे बरयाच पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे थडगे बांधलेले होते. त्यावरील कोरलेल्या इंग्रजी शब्दांचे अर्थ आणि ते कोण होते यांची ओळख त्यांनी करून दिली. आजूबाजूला पडलेल्या भिंती आणि त्यांची रचना यावर माहिती देताना. या भिंती त्यांनी कशा बांधल्या त्यात सिमेंट म्हणून कसले मिश्रण केले याची माहिती दिली. थोडे पुढे गेल्यावर आम्ही सभेच्या ठिकाणी गेलो. तिथे आता पुरातत्व खात्याने नवीन बांधकाम करून जुनी ओळख कशी मिठवली हे त्यांनी सांगितले. तिथे चार गोलाकृती चौथरे दिसले ते चौथरे नसून एका ठिकाणी विहीर होती.
एका ठिकाणी रांजण होत पण आता ते बंद करून त्याठिकाणी चौथरे उभारले खाली सिमेंट कातून लाल ज्या लाल मातीत चिमाजी आप्पांची आणि शूर सरदारांची पावले उमटली ती सिमेंट टाकून मिटवली हा इतिहास का जिवंत ठेवला जात नाही याचे कारण त्यांनी सांगितले. आणि आम्हाला इतिहास जिवंत कसा ठेवावा या संदर्भात मार्गदर्शन त्यांनी दिले. मराठ्यांचा इतिहास हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहचवण किती महत्वाच आहे. अजूनही परकीय आक्रमण थांबलेलं नसून ते हा इतिहास मिटवण्याच्या दिशेने पाउल टाकतेय याची जाणीव त्यांनी आम्हाला करून दिली. त्यांनी स्वतः इतिहास कसा जपला. का जपला. कसा सर्वांसमोर आणला याचे अनुभव आम्हाला सांगितला. तो सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरच तेज, त्यांची मेहनत आम्हाला दिसून आली. शिवरायांचा जयजयकार करणारी गारद त्यांनी दिली आणि आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
तेथूनच मागच्या बाजूने पुढे येताच एक चर्च त्यांनी आम्हाल दाखवली त्यावरील चिन्हांची माहिती देताना मराठ्यांनी आपली विजय पताका फडकवल्यावर त्या चर्चच्या दर्शनी भिंतीवर चंद्र आणि सूर्य हि हिंदवी विजयाची निशाणे तिथे लावली होती पण ती काढून टाकण्यात आली होती. श्री दत्त राऊत यांनी स्वतः उपोषण करून ते निदर्शनात आणून दिले प मराठ्यांची विजयपताका पुन्हा तिथे लावण्यात आली हे दाखवून दिले. आत चर्च मध्ये प्रवेश करून चर्चच्या गाभाऱ्यात वरती घुमटाकडे बोट दाखवून जे नक्षीकाम केलेय आणि अवजड पाषाणी दगड कसे लावलेत याची माहिती दिली आणि आम्ही आता परतीचा विचार केला कारण संपूर्ण किल्ला श्री दत्त यांच्या नजरेतून पाहण्यासाठी तीन दिवस लागतील पण ३ तासात जमेल तेवढी माहिती त्यांनी आम्हाला दिली
नागेश्वराच्या मंदिरात आम्ही आलो तिथे बसून प्रश्नांची देवाण घेवाण केली. आणि श्री दत्त राउत यांना आम्ही निरीप दिला त्यांनी सांगितलेली सर्व माहिती आम्ही आमच्या मनात गोठवली होती. दुर्ग संवर्धनाचे महत्व त्यांनी आम्हाला सांगितले आणि पुन्हा हा उर्वरित किल्ला आम्ही लवकरच पाहायला येवू असा त्यांना शब्द दिला आणि त्यांचा निरोप घेतला. एका इतिहास प्रेमी संशोधकाला आम्ही जवळून पाहिला त्यांच्या सोबत आम्ही इतिहास जगलो असा भास मनाला झाला. त्यांचे शब्द कानात गुंजत राहिले.
त्यांना निरोप देवून आम्ही मंदिरातच सहभोजन केले. एकमेकांच्या डब्यातील भाज्यांचा आस्वाद घेतला आणि आम्ही आमच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला सुरवात केली, शांतनू लब्दे. ओमकार, अनंत करमुसे. आणि बळवंतराव दळवी यांनी शिवयुद्ध नीती आम्हापुढे ठेवली. अनंतजी करमुसे यांनी शिवराय म्हणजे काय? जीजाऊनी शिवरायांना कसे घडवले. कसे युद्ध शिक्षण दिले याचे दाखले देताना शिवकार्य म्हणजे काय याची ओळख करून दिली. बळवंतराव दळवी यांनी अफजल वधाचे बारकावे आम्हापुढे ठेवले त्यानंतर ध्येयमंत्र घेवून आम्ही मोहिमेची सांगता केली. परतीच पाऊल टाकताना मनात चिमाजी आप्पा भरून वाहत होते. वसई किल्ल्याला आम्ही सांगत होतो की तुला जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तुझ्या कुशीत येवू आशी जणू शपथच घेतली.
आजचा दिवस नरवीर चिमाजी आप्पा, वसई किल्ला, आणि इतिहास संशोधक श्री. दत्त राउत यांच्या संगतीत सार्थकी झाल्याचे समाधान आमच्या चेहऱ्यावर दिसत होते.
चिमाजी आप्पांचा हा पराक्रम, त्याचं असामान्य शौर्य पाहून नकळत काही ओळी माझ्या कवीमनात आल्या त्या अशा.
जन, धर्म, देश रक्षिण्या, व्याघ्रझेप घेई रणा
नाश करण्या म्लेंछ बाधा, शिवराया पूजितो मना
पोर्तुगीज डरे काळ आला, शूर मराठा आप्पा
तोफेचा बडीमार केला, शत्रू घालीतो थापा
अश्यक जे शक्य करी, हर हर महादेव गर्जुनि
भिडे पोर्तुगीजां आप्पा, बुरुज स्वतः होवुनी
फडकवी भगवा किल्ल्यावरी, अभिमाने भरे उर
अमर झाला युगे युगे, चिमाजी आप्पा नरवीर
धन्य झाले कृतार्थ झाले, हिंदराष्ट्रा वाचविले
धन्य झाले कृतार्थ झाले, हिंदराष्ट्रा वाचविले ।।२ ।।
प्रवास वर्णन
© लेखक – गणेश पावले (मुंबई)
काही क्षणचित्रे –
प्रवास वर्णन
© लेखक – गणेश पावले (मुंबई)
प्रतिक्रिया
19 May 2015 - 1:29 pm | वेल्लाभट
क्या बात है ! क्या बात है !
खरंच खूप छान माहिती. डिट्टेलवार.
पण इथे वाचून भागणार नाही. जायला हवे.
19 May 2015 - 1:37 pm | गणेशा
प्रवास वर्णन आन फोटो आवडले.. मस्त माहिती..
फक्त काही ठिकाणी तुम्ही त्यांनी तुम्हाला अश्याप्रकारे माहीती दिली असे लिहिले आहे तेथेही त्यांनी सांगितलेले सर्व लिहिले तर आनखिन आवडेल
19 May 2015 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर वर्णन आणि फोटो !
19 May 2015 - 2:43 pm | कंजूस
वावावा. फोटोही अप्रतिम.
19 May 2015 - 11:03 pm | पैसा
सविस्तर माहिती आणि छान फोटो. एक छोटीशी दुरुस्ती. मोडी ही लिपी आहे. भाषा नव्हे.
19 May 2015 - 11:40 pm | सुहास झेले
श्रीदत्त दादाच्या तोंडून चिमाजी अप्पा आणि वसई किल्ल्याबद्दल कितीही ऐकावे तितके कमीच... जाऊ सर्व मिपाकर एकत्र. दादाशी मी बोलतो :)
20 May 2015 - 2:35 pm | मुक्त विहारि
हम आयेंगा....
21 May 2015 - 1:23 am | सुहास झेले
करा प्लान... बाकी काम माझ्याकडे :)
21 May 2015 - 1:43 pm | विनोद१८
........साधारणपणे जुनचा पहिला आठवडा ठरल्यास उत्तम.
20 May 2015 - 9:31 am | प्रचेतस
सुंदर लिहिलंय.
श्रीदत्तच्या तोंडून वसई किल्ल्याबद्दल ऐकणे म्हणजे नक्कीच अनोखा अनुभव आहे.
20 May 2015 - 11:17 am | पॉइंट ब्लँक
मस्त माहिती दिली आहे. आपल्याकडे असल्या विषयावर चांगले चित्रपट बनत नाहीत हे दुर्दैव.
21 May 2015 - 10:51 am | सौंदाळा
सुंदर लेख
काय योगायोग आहे बिकांचा पानिपत आणि तुमचा वसई किल्ला लेख एकत्रच आले.
चिमाजीअप्पा आणि सदाशिवराव भाऊ पितापुत्राला मनःपुर्वक वंदन
21 May 2015 - 1:51 pm | विनोद१८
मराठी पराक्रमाचे पारायण पुन्हा एकदा घडले, अगदी 'सौंदाळा' यांनी म्हटल्याप्रमाणे, उत्तम लेख.