सिद्धगडाची ११५० फुटी कातळभिंत

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
8 May 2015 - 3:56 pm

सिद्धगडाची ११५० फुटी कातळभिंत-

दिवाळीची चाहूल लागली की सगळेजण नव-नवीन खरेदीचे बेत आखत असतात. पण आम्हा गिरीविराजकरांचा बेत काही वेगळाच असतो. आमचे पाय डोंगरमाथ्याकडे धाव घेण्यासाठी आसुसलेले असतात. आमचा लाडका सखा सह्याद्रीसुद्धा आमच्या आगमनाची वाट पाहत असतो.

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मुंब्रा नर्सरी येथे झालेल्या दसरा स्नेहमेळाव्यात आम्ही ०९-१७ नोव्हेंबर,२०१३ या कालावधीत आमचा प्रस्तारोहाणाचा कार्यक्रम ठरविला होता.

गिरीविराज ची १४० वि मोहीम - सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याची ११५० फुटी कातळभिंत चढाई.

From Siddhagad Wall

या चढाईसाठी संस्थेचे संस्थापक सदस्य किरण अडफडकर यांनी नवीन चढाईपटूना संधी देऊन त्यांची क्षमता पडताळून पाहण्याचा बेत आखला होता, जेणेकरून पुढे यापेक्षाही मोठ्या मोहिमांचा बेत आखण्याची संधी मिळू शकेल.

जवळपास ८ दिवसांचा कार्यक्रम आखण्यात आला आणि त्याप्रमाणे त्याची तयारी सुद्धा चालू झाली. सर्व प्रथम अशा मोहिमा आखणे म्हणजे खर्चीक काम आणि मनुष्यबळसुद्धा अधिक लागत. एकतर सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात २ दिवसांची सुट्टी काढायला गेल म्हणजे साहेबाच्या कपाळावर आठ्या पडतात आणि त्यात सगळ्यांनाच सुट्ट्या मिळतील याची शाश्वती नाही. संजय आणि प्रदीपने तर निघायच्या आधी संपूर्ण आठवडा सामानाच्या जमवा-जमवी आणि आमच्या अनुपस्थितीमुळे आमच्या नावाने बोंबा ठोकण्यात घालवला होता. बाकीचे सगळे आदल्या दिवशी हातभार लावणार होते. संपूर्ण सामानाची बांधाबांध झाल्यावर कळल की माणस कमी आहेत. परत एकदा जास्तीच्या पाठ्पिशव्या रिकाम्या केल्या आणि त्यातील अतिरिक्त सामान आधीच वजनदार झालेल्या इतर पिशव्यामध्ये कोंबले.

सिद्धगड किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या सीमेवर नारीवली गावापासून ४-५ किलोमीटरवर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा पण अगदी खेटून उभा आहे. याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या मुख्य रांगेत दमदम्याचा डोंगर आणि भीमाशंकर डोंगररांग पसरली आहे. याच्या उत्तरपूर्व दिशेस आहे गोरखगड आणि मछिन्द्र सुळका, अहुपे घाट आणि दक्षिणेला दूरवर दिसतो तो भीमाशंकरचा पहारेकरी पदरगड. समुद्रसपाटी पासून याची उंची जवळपास सव्वातीन हजार फुट आहे. आम्ही चढाईसाठी याच्या बालेकिल्ल्याची दमदम्या डोंगराकडील देवीच्या मंदिरासमोरील नैसर्गिक ११५० फुटी सरळसोट भिंतीची निवड केली होती.

या आधी याच भिंतीवर गिरीविराज हायकर्स, डोंबिवली ने १९८३ मध्ये प्रथम चढाई केली होती आणि त्यावेळेस किरण अडफडकर, सुभाष पाण्डीयन, संजय लोकरे, नरेंद्र माळी आदी मंडळी सहभागी होती. त्यानंतरच्या ३० वर्षांच्या कालावधीत कोणीही तसा प्रयत्न केला नाही. तस म्हणायला गेल्यास सुळकेगिरी बरीच मंडळी करतात पण कातळभिंतीच आव्हान सगळ्यांनाच पेलवेल अस नाही. किरणकाकांच्या काळामध्ये म्हणजेच ८०- ९० च्या दशकात जशी स्पर्धा या क्षेत्रामध्ये होती तशी आता राहिलेली नाही. म्हणून आता आम्हीच म्हणजे गिरीविराजच्या तरुण मंडळीनी हे आव्हान स्वीकारण्याच ठरवलं.

८ नोव्हेंबरला डोंबिवलीहून रात्री १ वाजता १४ जणांनी टेम्पोमधून प्रयाण केलं. विमान सोडून सर्व वाहने चालवणारा आमचा सारथी संजय गवळी याने यावेळीही टेम्पोचा ताबा घेतला आणि मूरबाडच्या दिशेने सुसाट निघालो. किल्ल्याच्या पायथ्याशी नारीवली गावात पोहोचायला सकाळचे ३.४५ वाजले. आता इथून पुढे आम्हाला ट्रेक करत सिद्धगड माचीवर पोहोचायचे होते. सिद्धगडावर जाण्यासाठी बोरवाडी या गावातून जवळची वाट आहे पण ती संपूर्ण वाट अंगावर येणारी आहे आणि आम्हा प्रत्येकाजवळ जवळपास २५ किलोच वजन असल्यामुळे आम्ही नारीवली गावातली वाट पकडली. अर्ध्या तासाची विश्रांती घेऊन पहाटेच ४.१५ वाजता सिद्धगडावर जाण्यास निघालो.

(अवांतर- स्वतःची गाडी असल्यास आणि वजन नसल्यास बोरवाडीची वाट अगदी जवळची- पण वाहन उपलब्ध नसल्यास जांभूर्डे ते बोरवाडी गावापर्यंत ५-६ किलोमीटरची पायपीट करावी लागते)

नारीवली गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाट शेतातूनच जाते, जवळपास ४-५ किलोमीटर अंतर असावं. मध्येच लागलेल्या ओढ्यावर जिथे एक पूल आहे तिथे अर्धा तास विश्रांती घेऊन काकुंनी बनवुन दिलेल्या अंडाभुर्जीवर ताव मारल्यानंतर परत पुढची वाटचाल सुरु केली.

२. फोटो सौजन्य :- योगेश उनावणे
From Siddhagad Wall

३.थकले भागलेले जीव- वेळ पहाटे ४.४५
From Siddhagad Wall

४.हि वाट दूर जाते. उजवीकडे सिद्धगड, मध्ये राजा सुळका आणि शेजारी दमदम्याचा डोंगर
From Siddhagad Wall

वाट जरी सरळ असली तरी मध्ये मध्ये अनेक वाटा फुटलेल्या आहेत, त्यामुळे या वाटेवर खूप लोक चुकतात. त्यामुळे वेगवेगळे टप्पे लक्षात ठेवावेत. नारीवली गावातून निघाल्यावर प्रथम ओढ्यावरचा पूल, त्यानंतर सिद्धगड पाडा (सिद्धगडावरील काही लोकांनी गडावर घरे सोडून आता खाली घरे बांधली आहेत), त्यानंतर एक गुरांचा गोठा, या गोठ्यापुढे वाट चुकण्याचा संभव नाही. या संपूर्ण मार्गावर चालताना सिद्धगड तुमच्या उजव्या बाजूस असतो.

आम्ही सुद्धा मजल दरमजल करत एकदाचे सिद्धगडाच्या पायथ्याशी तांबड फुटायच्या वेळेस पोहोचलो. आमचा चालण्याचा वेग चांगला होता पण थोड्याच वेळात तो मंद होणार होता कारण आता चढणीची वाट सुरु होणार होती. शेवटी धापा टाकत एकदाचे सकाळी ९ वाजता सिद्धगड माचीवरील देवीच्या मंदिरात पोहोचलो. संजय, राधेश आणि प्रदीप ने आधीच येऊन जागेची रेकी केलेली असल्याने आणि किरणकाका बरोबर असल्यामुळे आम्ही राहण्याची जागा आधीच ठरवून ठेवली होती. मंदिराच्या बाजूला उजवीकडे खालच्या अंगाला असलेल्या वाटेवरून गेल्यास १०-१५ मिनिटात सिद्धगडमाचीवरील दुसऱ्या टोकाला असलेल्या गावात पोहोचता येते. पण आम्हाला गावात मुक्काम करायचा नसल्यामुळे आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूला वरच्या अंगाने गावच्याच दिशेने जाणाऱ्या वाटेला लागलो. मंदिरापासून फक्त पाचच मिनिटावर आमची मुक्कामाची जागा होती. संपूर्ण गर्द झाडीमध्ये इथेच थोडीशी मोकळी जागा होती, पण आमच्या तंबूसाठी पुरेशी होती. जागेची एकदा साफ सफाई करून घेतली आणि १९८३ साली किरण काका आणि मंडळीनी ज्या ठिकाणी तंबू ठोकले होते अगदी त्याच जागेवर तंबू ठोकून दिले.

५.
From Siddhagad Wall

५आ
From Siddhagad Wall

तेव्हढ्या वेळात किरणकाका चढाईमार्गाची पाहणी करून आले. चढाईचा मार्ग आमच्या मुक्कामाच्या जागेपासून वरच्या अंगाला अगदी हाकेच्या अंतरावर होता. त्यांना त्यांचा ३० वर्षांपूर्वीचा चढाईमार्ग काही सापडला नाही, कारण एकतर ३० वर्षामध्ये कित्येक वेळा दरड कोसळून भरपूर बदल घडलेले होते. चढाई करणारी टीम नवीन असल्याने त्यांनी एक नवाच चढाईमार्ग सुचवला. पहिला दिवस सामान-सुमान व्यवस्थित करण्यात आणि आराम करण्यात संपला. ऐन वेळेस मदतीसाठी धावत आलेला मंगेश लोड फेरी करून आज परत घरी निघाला.

पहिल्या दिवशी जेवणाची 'जोखीम' संजय आणि हेमंतने घेतली. मस्तपैकी तिखटजाळ मसाले भात खायला दिला आणि सगळ्यांकडून 'कोडकौतुक' करून घेतलं.

[अवांतर: या संपूर्ण मोहिमेदरम्यान ८ दिवसांमध्ये आम्ही एकदाही भाताचे एकही शीत न करपवता आणि तो हि अगदी सुटसुटीत बनवून एक नवीन जागतिक विक्रम आमच्या नावावर करून घेतला. अर्थात त्याच संपूर्ण श्रेय मला आणि माझ्या मदतनिसांना आहे. भांडी घासणाऱ्या टीमने सुद्धा त्यांचे श्रम वाचविल्याबद्दल माझ विशेष कौतुक केल]

कार्यक्रमाचा कालावधी मोठा असल्याने आमच स्वयंपाकघर सुद्धा ओसंडून वाहत होत.
पहिली पसंती अर्थात 'मुलभूत अन्नगरज' सुके बोंबील, जवला, करदी, कोंबडी, पापड़, लोणच अशा 'उदकसिंचनादि' प्रकारांना होती आणि त्यानंतर भात, भाजी, तुरडाळ, छोले, वाटाणे, पोहे हे पूरक अन्न होत.

ट्रेक दरम्यान तुम्ही कधी चपात्या स्वतः करून खाल्ल्या नसतील, आम्ही मात्र साग्रसंगीत चपाती निर्माण कार्यक्रम आखला होता. सुरुवातीला आकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले पण नंतर हळूहळू चपात्या आकारात होऊ लागल्या. प्रदीप आणि मोरेश्वरचा 'चपाती आकार-उकार कला' या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याबद्दल तांदळाचे पीठ देऊन सत्कार करण्यात आला आणि मला त्या शेकवण्यासाठी विशेष कौशल्यासाठी गौरविण्यात आले.

६.
From Siddhagad Wall

७.
From Siddhagad Wall

आता थोडं ज्याच्यासाठी आलो त्याविषयी:

या वेळेस चढाईसाठी एक नव-प्रशिक्षित मुख्य चढाईपटू आणि त्याला मार्गदर्शन करायला सेकंड मेंन म्हणून एक अनुभवी चढाईपटू, त्या मागे लागल्यास थर्ड मेंन अशी रचना केली. या वेळेस हितेश, वासुदेव, मोरेश्वर आणि झालच तर मलासुद्धा चढाईसाठी पाठवणार होते. अनुभवी प्रदीप, मनीष, किशोर आणि गुरुजी किरणकाका मार्गदर्शन करायला तयारच होते.

पहिल्या दिवशी हितेशला आणि सेकंड मेंन म्हणून अनुभवी प्रदीपला पाठवण्यात आले. पहिल्या दिवशीची चढाई तुलनेने सोपी असल्याने जवळपास ५०० फुट उंची गाठ्ण्यात यश मिळाल. त्याला एक पावसाळी धबधबा वाटेत 'आडवा' नाही पण 'उभा' आला, त्यामुळे चाल सोपी झाली झाली.
[चढाईचा एकूण कालावधी: ७ तास ४० मी., वापरलेली साधने: २ पिटोंन आणि ५ बोल्ट्स]

८.
From Siddhagad Wall

९.
From Siddhagad Wall

दुसऱ्या दिवशी मोरेश्वरची निवड करण्यात आली. पण दुर्दैवाने दुसरा बोल्ट ठोकत असताना एक दगड नेमका त्याच्या पायावर पडला आणि दुखापत झाल्याने त्याला परत खाली पाठवण्यात आले, त्याची जागा अनुभवी मनीषने घेतली आणि त्याला सेकंड मेंन म्हणून किशोरला पाठवण्यात आले आणि थर्ड मेंन म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. मी पहिल्यांदाच जवळपास ६०० फुट जुमारिंग केल, हात पाय तर अक्षरशः गळ्यात आले होते, पण मजाही तेव्हढीच आली आणि मुख्य म्हणजे उंचीची भीती नाहीशी झाली.
[चढाईचा एकूण कालावधी: ६ तास , वापरलेली साधने: ५ बोल्ट्स, दिवसभरात गाठलेली उंची: सुमारे १५० फुट ]

१०.
From Siddhagad Wall

११.
From Siddhagad Wall

दरम्यान वासुदेवला तातडीने घरी परत जावे लागल्याने तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हितेशला संधी देण्यात आली. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदीप आणि इतर मदतीकरिता मोरेश्वरला पाठविण्यात आले.
{ चढाईचा एकूण कालावधी: ५.३० तास , वापरलेली साधने: ५ बोल्ट्स, ४ पिटोंन
दिवसभरात गाठलेली उंची: सुमारे १२५ फुट}

१२.
From Siddhagad Wall

चौथ्या दिवशी किरणकाका, किशोर आणि राधेश निघाले. किशोरला चढाईची सूत्रे देण्यात आली. आजच लक्ष शेवटची लेज होती जी माथ्यापासून जवळपास २००-२५० फुट खाली आणि पायथ्यापासून जवळपास ८०० फुट उंचीवर होती आणि माथ्याला समांतर रेषेत आडवी पार लांब पर्यंत, कड्याला बिलगून बालेकिल्ल्याच्या वाटेला जाऊन मिळत होती. त्यामुळे असं ठरविण्यात आलं की आज याच वाटेवरून खाली उतरायचं. त्यामुळे संपूर्ण दोर वर खेचून घेण्यात आला. ती वाट शोधत मी आणि प्रदीप बालेकिल्ल्याच्या वाटेने त्यांच्यापर्यंत पोहोचलो जेणेकरून संध्याकाळी परत खाली उतरताना त्यांना वाट शोधावी लागणार नाही.

१३. जमिनीपासून जवळपास ८०० फुटांवर:
From Siddhagad Wall

१४.
From Siddhagad Wall

१५.
From Siddhagad Wall

(अवांतर: क्षेत्राबाहेरील लोंकाच्या माहितीसाठी- ज्या दिवशी संध्याकाळी तुम्ही चढाई थांबवता त्या ठिकाणी एखादा बोल्ट किंवा पेग (टोकदार सळई) ठोकून अथवा मजबूत खोड असलेल झाड अथवा झुडूप/निवडुंग बघून त्याला दोर बांधण्यात येतो आणि त्याच्या सहाय्याने चढाईपटू आणि त्याचे सहकारी परत पायथ्याला येतात. दुसऱ्या दिवशी चढाईसाठी जाताना आदल्या दिवशी जिथे चढाई थांबविण्यात आली तिथे जाण्यासाठी या दोराचा उपयोग करण्यात येतो. तिथे पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे चढाई सुरु करतो. अस रोजच कराव लागत. जस-जशी उंची वाढत जाते त्याप्रमाणे जुमारिंग करून वर जाण्यासाठी पण खूप वेळ वाया जातो.]

{चढाईचा एकूण कालावधी : फक्त २ तास - कारण आज दोर वर खेचून घेण्यात आणि जुमारिंग करण्यातच सगळा वेळ वाया गेला होता. वापरलेली साधने: २ बोल्ट्स, १ पिटोंन, १ पेग, दिवसभरात गाठलेली उंची: सुमारे १५० फुट}

पाचव्या दिवशी प्रदीपच्या नेतृत्वाखाली किशोर, मी, हितेश, तुषार, सुदर्शन काल शोधलेल्या गडाच्या वाटेने सर्व सामानासहित निघालो आणि सकाळी ११.५० वाजता काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचलो. आजचा दिवस खूपच महत्वाचा होता कारण शिखर माथा आता आवाक्यात आला होता. आज अनुभवी प्रदीपने चढाईची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. आता प्रदीपच्या मार्गात फक्त १५ फुटांची कपार होती आणि ती पार केल्यावर शिखर माथा दिसू शकणार होता. पटापट मुक्त चढाई करत त्याने ठीक १.३० वाजता माथा गाठण्यात यश मिळवले आणि गिरीविराज ची १४० वि मोहीम यशस्वी केली. वरची शेवटची चढाई ठिसूळ आणि घरंगळणाऱ्या खडकातून असल्याने प्रदीप नंतर फक्त किशोर माथ्यावर पोहोचला. दोघेही आता गडाच्या वाटेने खाली उतरणार होते, त्यामुळे चढाईचा मुख्य दोर वर खेचून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान बेसकॅम्प, चढाईपटू आणि सहाय्यक यांच्यामध्ये समन्वय रहावा म्हणून बिनतारी यंत्रणा सुद्धा सोबत होती.

१६.
From Siddhagad Wall

१७.
From Siddhagad Wall

१८.
From Siddhagad Wall

पुरवणी (supply) दोर खाली लेज वर उभ्या असलेल्या मंडळीना खाली खेचण्यास सांगण्यात आले. पण पुरवणी दोर वर एका बोल्टला बांधलेला असल्यामुळे कोणीतरी जाऊन त्याला मोकळ करण्याची गरज होती. हितेशच्या अंगावर हार्नेस असल्यामुळे वाइंड अप करायला त्यालाच पाठवले. हितेश जुमारिंग करत त्या बोल्टपर्यंत पोहोचला पण त्या पुढील बोल्टला अडकवलेल्या २ कॅराबिनर्स पर्यंत त्याचे हात काही पोहोचत नव्हते. त्याची हि कसरत आम्ही लेजवरून पाहत होतो आणि आमच्या कसरतीच धावत समालोचन मी बेसकॅम्प आणि प्रदीप/किशोर पर्यंत पोहोचवत होतो. कारण हि सगळी सर्कस जवळपास ८०० फुट उंचीवर चालली होती, त्यामुळे त्यांचा सुद्धा जीव टांगणीला लागला होता. आता हितेशने बोल्टपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला आणि दोराला जुमार लावून वर जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या या प्रयत्नात त्याची पकड ढिली होवून त्याला स्विंग आला आणि तो बोल्ट पासून खूप दूर निघून गेला. जाता जाता त्याचा दोर ही असा विचित्र प्रकारे दगडाला अडकला कि त्याला धड वर ही जाता येईना आणि धड खाली यायला जमत नव्हत. खाली लेजवर तुषार आणि सुदर्शन या दोघांपेक्षा मीच काय तो लंगडी गाय. मग मीच कंबरेला हार्नेस बांधला आणि पहिल्या बोल्टवर जुमारिंग करत पोहोचलो. स्वतःला बोल्ट मध्ये अडकवून घेतलं आणि अडकलेला दोर मोकळा केला आणि हितेशला कॅराबिनर्स अडकवलेल्या बोल्टवर येण्यास सांगितले. हितेश त्या बोल्टवर आल्यावर मी पण मागे फिरून वाइंड अप करत परत लेजवर पोहोचलो. मागोमाग हितेशसुद्धा खाली आला आणि आम्ही दोर कुठेही न अडकवता खाली खेचला. तोपर्यंत खाली बेसकॅम्प आणि माथ्यावर आमच्या नावाने शिमगा चालू झाला होता.

मग सगळी आवाराअवर केली आणि गडाच्या वाटेला लागलो कारण माथ्यावर गेलेले प्रदीप आणि किशोर सुद्धा आम्हाला खाली येऊन मध्येच खिंडीत भेटणार होते.
{ चढाईचा एकूण कालावधी: १ तास ४० मी. , वापरलेली साधने: २ पिटोंन, दिवसभरात उंची: सुमारे २२५ फुट}

आम्ही या कातळभिंसोबतच सिद्धगड आणि दमदम्याचा डोंगर यांच्या बेचक्यामध्ये आणि देवीच्या मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राजा सुळका, तसेच सिद्धगडावर येताना डाव्या हाताला दिसणाऱ्या लिंगी सुळक्यावर सुद्धा चढाई केली. जवळपास १५० फुटी राजा सुळक्यावर चढाईसाठी माझी निवड करण्यात आली, शेवटच्या टप्प्यात शिखरमाथा फक्त १० फुट असताना पाय दोन वेळेस घसरल्याने माझा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि पुढची चढाई वासुदेवकडे सोपविण्यात आली. प्रदीपने तर हा सुळका कंबरेला दोर न बांधताच सर केला. (आधीही गिरीविराजच्या टीमने हा सुळका दोर न बांधताच सर केला होता) इथे सगळ्यांनाच संधी देण्यात आली, सुदर्शन, संजय, दर्शन, एकमेव महिला सदस्य निकिता या सर्वानीच दोराच्या सहाय्याने शिखर माथा गाठला.

१९.
From Siddhagad Wall

२०.
From Siddhagad Wall

या संपूर्ण मोहिमेमध्ये मार्गदर्शन करायला किरणकाका स्वतः तर होतेच सोबत अनुभवी आणि तज्ञ मंडळी प्रदीप, मनीष आणि किशोर यांनी प्रत्यक्षात मोहिमे दरम्यान दुय्यम भूमिका घेऊन मदतनिसाच काम केल. यालाच म्हणतात संघ!

मंडळ आपले आभारी आहे:
किरण अडफडकर, प्रदीप म्हात्रे, किशोर मोरे, सुदर्शन माळगावकर. राधेश तोरणेकर, संजय गवळी, हितेश साठवणे, निकिता अडफडकर, तुषार परब, मनीष पिंपळे, हेमंत तांबे, मंगेश सद्रे, वासुदेव दळवी, दर्शन एडेकर, मोरेश्वर कदम आणि मी सतीश कुडतरकर.

टीप:
सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षेसाठी उपाय:- संपूर्ण मोहिमे दरम्यान अजिबात अंघोळ करू नये. नाईलाजाने मी १० दिवसात एकदाच केली. घामाच्या चिकटपणामुळे मातीचा असा काही थर अंगावर साचतो कि त्याच्यापुढे सगळ्या क्रीम्स आणि लोशन एकदम फिके पडतील.

हि संपूर्ण तांत्रिक चढाई आहे, कारण प्रस्तरभिंत चढाई हे कौशल्याचे काम आहे जे तुम्हाला भरपूर सराव केल्यानंतर प्राप्त होते. तसेच यासाठी भरपूर साधन सामुग्री आणि उपकरणे सुद्धा लागतात जी हाताळण्यासाठी तुम्हाला त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

नवीन चढाईपटूना अनुभव देण्यासाठी सर्वात उत्तम जागा कारण इथे मुक्त चढाईसाठी भरपूर वाव आहे. उंचीसुद्धा खूप असल्याने त्याचाही अनुभवासाठी चांगलाच फायदा होतो. जर कोणाला या कातळभिंतीची माहिती हवी असल्यास मंडळ सदैव तयार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी आणि निवारा. दोन्हीहि मुबलक प्रमाणात मिळते. सिद्धगडवाडीत चार विहिरी अगदी तुडुंब भरलेल्या आहेत. शिवाय आता या वेळेस नैसर्गिक ओढेसुद्धा आहेत.

From Siddhagad Wall

From Siddhagad Wall

दिवसभराचा आढावा
From Siddhagad Wall

प्रतिक्रिया

गणेशा's picture

8 May 2015 - 5:21 pm | गणेशा

नेहमीप्रमाणेच खतरनाक

वेल्लाभट's picture

8 May 2015 - 5:25 pm | वेल्लाभट

एका पेक्षा एक भिंती
धागा वाचून खूप भीती (त्या टायटल स्वांगच्या चालीत बरं का)

काय भनाट लोक हो तुम्ही.....

वाह! नेहमीप्रमाणेच छान वर्णन. आहुप्याचा कडा, मध्येच त्या कड्याच्या पोटात एका टप्प्यावर वसलेली साखरमाची, दमदम्याच्या डोंगराला वळसा घेत वर चढणारा बैलघाट, समोर दिसणारा गोरखगड, त्यामागील मच्छिंद्र सुळका, भोवतालचं जंगल... हा साराच परिसर अविस्मरणीय आहे. सिद्धगडावर दरड कोसळल्याने पूर्वीची महादरवाजाची वाट आता अस्तित्त्वात नाही. पण सध्या वापरात असणारी पाऊलवाट देखील थरारक आहे (अर्थात आमच्यासारख्यांसाठी)! वर बाजीप्रभू देशपांड्यांची समाधी आहे असं डेहरीतील एकानं सांगितलं होतं. पण आम्हांस शोधूनही सापडली नाही.

यावेळचे फोटो भारी दिसताहेत. विशेषतः त्या बांबू पिट व्हायपरचा फारच देखणा फोटो आलाय! :-)

सतीश कुडतरकर's picture

9 May 2015 - 10:44 am | सतीश कुडतरकर

देहरी गावात काय एकेक कथा सांगतील ना त्याची सोय नाही. खूप पुढे आहेत. बाजींची समाधी हे त्यापैकीच एक. काहीही अनैतिहासिक कथा पसरवण्यात तिथलं एक मुसलमान कुटुंब खूपच पुढे आहे.

जमिनीला भेगा पडल्यामुळे सध्या सिद्धगडमाचीवरील संपूर्ण गाव उठवण्यात आल आहे, अस ऐकण्यात आलेलं आहे. या सिद्धगड गावातील बहुतेक कुटुंबातील एकतरी माणूस शिक्षक आहे.

सिद्धगडावर जाण्यासाठी बोरवाडी या गावातून जवळची वाट आहे पण ती संपूर्ण वाट अंगावर येणारी आहे, काही ठिकाणी exposure आहे. (भाई कोतवाल यांची समाधी याच रस्त्यावर आहे)

स्वतःची गाडी असल्यास आणि वजन नसल्यास बोरवाडीची वाट अगदी जवळची- पण वाहन उपलब्ध नसल्यास जांभूर्डे ते बोरवाडी गावापर्यंत ५-६ किलोमीटरची पायपीट करावी लागते.

जमिनीला भेगा पडल्यामुळे सध्या सिद्धगडमाचीवरील संपूर्ण गाव उठवण्यात आल आहे, अस ऐकण्यात आलेलं आहे. या सिद्धगड गावातील बहुतेक कुटुंबातील एकतरी माणूस शिक्षक आहे.

हम्म.. आम्ही पंधराएक वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हाच या चर्चा चालल्या होत्या गावात. वर चढतानाच एक कुटुंब हाताला येईल तेवढे सामान - अगदी घराच्या वाश्यांसकट खाली उतरताना भेटले. तेव्हा फार वाईट वाटले होते. पण दरड कोसळण्याच्या भीतीत सतत दिवस काढण्यापेक्षा ते बरे असेच म्हणावे लागेल.

तिथे घरटी एकतरी शिक्षक आहेच. आणि आमच्यापैकी दोघे शिक्षक असल्याने आमचा चांगला पाहूणचार झाला होता असे स्मरणात आहे.

आता बहुतेक साखरमाचीही उठवली आहे, सिद्धगडमाचीसोबतच.

अभिजित - १'s picture

8 May 2015 - 8:14 pm | अभिजित - १

मस्त !!

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2015 - 10:35 pm | अत्रुप्त आत्मा

पुन्ना येक नमस्कार!

पिवळा डांबिस's picture

9 May 2015 - 11:21 am | पिवळा डांबिस

कसं करता हो हे तुम्ही सगळं? कमाल आहे!!!!
(आम्ही फक्त वसई- चाकण इत्यादि जलदुर्ग/भुईकोटवाले!!!!)
:)

एक एकटा एकटाच's picture

9 May 2015 - 11:45 am | एक एकटा एकटाच

पुन्हा एकदा आम्हाला थरारक अनुभव संगितल्याबद्दल

आभार

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2015 - 4:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी समजा माझ्या घरी तुम्हाला बोलावले. (सातव्या मजल्यावर)
तर तुम्ही जीन्यानी / लिफ्टने येणार का असे भिंतीला खिळे ठोकत?

पैजारबुवा,

एक एकटा एकटाच's picture

9 May 2015 - 5:21 pm | एक एकटा एकटाच

हा हा हा !!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2015 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच थरारक !

पाचव्या प्रकाशचित्रात दाखवलेली सुके बोंबील (आणि बहुतेक इतर सर्वच सुकी मासळी) ठेवण्याची जागा नक्कीच विचारपूर्वक ठरवलेली आहे ! ;) :)

जयंत कुलकर्णी's picture

10 May 2015 - 7:10 am | जयंत कुलकर्णी

ग्रेट....

प्रचेतस's picture

11 May 2015 - 11:04 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

नि३सोलपुरकर's picture

11 May 2015 - 4:11 pm | नि३सोलपुरकर

सायबानु___ /\___.
थरारक एकदम ...

अवांतर : हेवा वाटतो राव तुम्हालोकांचा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 May 2015 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम थरारक मोहीम, __/\__

पैसा's picture

11 May 2015 - 7:43 pm | पैसा

पुन्हा एकदातीच प्रतिक्रिया, सगळे फोटो आ वासून बघितले! माणसं आहात का कोण!!

सूड's picture

11 May 2015 - 8:47 pm | सूड

__/\__

अनुप७१८१'s picture

14 May 2015 - 3:41 pm | अनुप७१८१

जबर्दस्त्..................पुधिल मोहिम अस्ल्यास सान्गा !

शशिका॑त गराडे's picture

15 May 2015 - 2:52 pm | शशिका॑त गराडे

हिरवा साप कोणता आहे ?

https://picasaweb.google.com/lh/photo/1sG4cmVmC2JSz2u4i9WgxiUf57qOB0ohwv...

सतीश कुडतरकर's picture

15 May 2015 - 5:54 pm | सतीश कुडतरकर

bamboo pit viper

थरारक आणि खतरनाक मोहीम. आत्ता नुसतं वाचतानाही भीती वाटली मला..आणि सगळे फोटोज सुंदर!!

अजया's picture

16 May 2015 - 7:20 pm | अजया

भिती नाही वाटत का तुम्हाला? तुमचे घरचे कटकट नाही करत का सणासूदीला घरी राहायचं सोडुन कुठे मळायला चालले,जीव धोक्यात घालायला!!

सतीश कुडतरकर's picture

18 May 2015 - 3:12 pm | सतीश कुडतरकर

तेच तेच करून नजर मरते. सुरुवातीला घरून विरोध होताच. खेळच तसा असल्यामुळे नाही म्हणायला अपघाताची शक्यता असतेच पण आम्हीही सुरक्षेची तजवीज करूनच सर्व गोष्टी करतो.