‘The Harvest’ by Vincent van Gogh (1853 - 1890)
Arles, June 1888 oil on canvas, 73.4 cm x 91.8 cm
... काही दिवसांपूर्वी आगगाडीच्या प्रवासात सकाळी खिडकीशी येऊन बसलो आणि आळसवटलेल्या नजरेनं बाहेर बघू लागलो, आणि काय आश्चर्य, खिडकीबाहेरच्या झरझर बदलत जाणाऱ्या प्रत्येक दृष्य-चौकटीतून मला संपूर्ण रंगवलेलं एक एक चित्र दिसू लागलं. अगदी एक एक ब्रशस्ट्रोक, चित्र-घटकांची रचना, ब्रशच्या फटकाऱ्यांतली लयबद्धता … अगदी सगळं सगळं समोर साकार होत होतं …. मी चक्रावलोच, आपल्याला आज हे असं काय होतंय, हेच कळेना, ही अनुभूती इतकी अस्सल आणि उत्कट होती, की अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू येत होते… गंमत म्हणजे ही ‘चित्रानुभूती‘ चांगली दोन-तीन तास टिकून राहिली आणि मग मात्र नेहमीच्या व्यावहारिक, नीरस विश्वात माझी ‘घरवापसी’ झाली.
... मग मला आठवलं, अरे, चाळीस - पंचेचाळीस वर्षांपूर्वी तर आपण अहोरात्र अश्याच चित्रानुभूतीत जगत होतो … पहाटे पहाटे रंगसाहित्य घेऊन सायकल पिटाळत शहराबाहेर पडायचो, आणि जिथे जिथे ही ‘चित्रानुभूती’ जास्त प्रकर्षानं जाणवेल, तिथे तिथे थांबून चित्र रंगवायचो. स्केचबुक तर सततच जवळ असायचं, आणि दिवसभरात कितीतरी चित्रं त्यात रेखाटत असायचो.
पुढे इंदूर सोडून दिल्लीला आल्यावर सुद्धा सुरुवातीची काही वर्षं हे चित्रानुभूतीत जगणं चालू राहिलं. मग मात्र हळुहळू नोकरी- लग्न- कुटुंबकबिला वगैरे भानगडीत गुंतल्यावर ही चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी केंव्हा आणि कशी ओसरत गेली, हे कळलंही नाही.…
…. आता सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर, आणि ‘पाताळेश्वर कट्ट्या’चे वेळी सांगितल्या प्रमाणे पोटातला ‘कालसर्प’ बाहेर काढून पुन्हा तारुण्याकडे वाटचाल करू लागल्यावर एकदा पुन्हा अल्प काळ का होईना, त्या हरवलेल्या चित्रानुभूतीत जगण्याची संधी अवचितपणे लाभली, याचा अतीव आनंद झाला. (खरेतर चित्रानुभूतीच्या त्या काही काळासाठी माझी ‘घरवापसी’ झाली होती, असे म्हणायला हवे).
हे असे कशामुळे घडले असावे, याचे काही तर्कसुसंगत स्पष्टीकरण मला सापडले नाही, आणि खरेतर त्याची गरजही नाही.
या अनुभवातून मला आता पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष निसर्ग चित्रण करण्याची प्रेरणा तर मिळालीच, शिवाय Monet, Van Gogh, Pissarro, Sisley, Constable वगैरे चित्रकारांच्या चित्रांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही मिळाली.
उदाहरणार्थ आंग्ल चित्रकार जॉन कोन्स्टेबल याचे सुप्रसिद्ध चित्र ‘ हे वेन’ बघा:
लंडन मधील आपल्या स्टूडिओत बसून सावकाशीने हे चित्र बनवायला त्याला कित्येक दिवस लागले असतील, तो सर्व काळ उत्कट चित्रानुभूती टिकून राहिली असेल, हे अवघड वाटते (कदाचित असेलही) मात्र हे चित्र रंगवण्यासाठी त्याने केलेले खालील अभ्यास - चित्र हे त्याने प्रत्यक्ष त्या जागी बसून, जिवंत चित्रानुभूतीच्या स्थितीत पटकन रंगवलेले दिसते:
Claude Monet (1840-1926) याची ही चित्रे बघा:
Van Gogh याची बहुतेक सर्व चित्रे चित्रानुभूतीच्या उत्कट अवस्थेत असताना रंगवलेली दिसतात:
खालील फोटो ज्या इमारतीचा आहे, त्याचे Van Gogh ने रंगवलेले चित्र बघा:
.
Van Gogh याला विश्वातले ‘चैतन्य’ सतत जाणवत असायचे, त्यातून त्याची चित्रे अशी विलक्षण झपाटल्यासारखी -- तिरपागडी रंगवली गेली, असे वाचनात आले होते, आता माझ्या ‘चित्रानुभूती’ च्या अनुभवामुळे त्यातील सत्यता जाणवते आहे.
काही चित्रकार मदिरा, भांग वगैरे मादक द्रव्ये घेऊन चित्रकर्म करतात, त्याचा अनुभव मला स्वत:ला नाही, मात्र इंदुरातले प्रसिद्ध चित्रकार देवकृष्ण जोशी (1911 - 1984) हे भांगेच्या अंमलात मोठमोठी चित्रे झपाट्याने लीलया रंगवत, हे मी स्वत: बघितलेले आहे. अंमली द्रव्याच्या परिणामी तात्पुरती चित्रानुभूती (वा संगीतानुभूती, सौंदर्यानुभूती वगैरे) जागृत होत असावी का ?
देवकृष्ण जोशी यांचे एक चित्र:
चला, आता माझी १९७५ - १९७८ या काळातली काही रेखाचित्रे बघूया. ही सर्व मी इंदूरच्या आसपासच्या माळवी खेडेगावांत बसून केलेली आहेत. त्याकाळी ही चित्रे सहजपणे, मिळतील त्या कागदांवर केली, आता ते कागद पिवळे पडलेले आहेत. मुख्य म्हणजे ती खेडी आता शहरांनी गिळक्र्कृत केलेली आहेत, त्याजागी आता मोठमोठ्या आधुनिक वसाहती झालेल्या आहेत. या दृष्टीने ही चित्रे आता एक ऐतिहासिक दस्तावेज आहेत. माझा एक खास मित्र ती बघायला मुद्दाम पुण्याहून येऊन गेला, तेंव्हा मीपण बर्याच वर्षांनंतर ती बघितली. आणखी पुष्कळ आहेत.
माझ्या पश्चात ही चित्रे कोण जपणार, आणि कोण बघणार, हा विचार विषण्ण करणारा आहे.
याविषयी वाचकांच्या सूचनांचे स्वागत आहे.
आणि शेवटी Camille Pissarro (1830 – 1903) याची काही चित्रे:
रसिकहो, आता लवकरच मी काही निसर्गचित्रे रंगवून इथे देऊ शकेन अशी आशा करतो आहे.
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 3:25 am | नंदन
मस्त, लेख आवडला. तुमच्या निसर्गचित्रांची वाट पाहतो आहे.
लेखाची सुरूवात वाचून बोरकरांची 'चित्रवीणा' ही कविता आठवली. त्यांच्या बहुसंख्य कवितांप्रमाणे अगदी चित्रदर्शी म्हणावी अशी. तिच्यातही येणारं वर्णन हे गाडीतल्या प्रवाशाच्या नजरेतून येतं. ("घाटामध्ये शिरली गाडी आणि रात्रीचा पडला पडदा, पण चित्रांची विचित्रवीणा अजून करते दिडदा दिडदा.")
बाकी व्हॅन गॉफच्या 'टर्ब्युलंट' विचारांचं 'स्टारी नाईट'मध्ये पडलेलं प्रतिबिंब शोधणारा हा लेखही वाचनीय.
अवांतर - तुमची माळवी चित्रं आणि पिसारोचे पहिले चित्र दिसत नाही.
27 Apr 2015 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त, लेख आवडला. तुमच्या निसर्गचित्रांची वाट पाहतो आहे.
हेच म्हणतो.
26 Apr 2015 - 5:18 am | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्स्स्स्त!
26 Apr 2015 - 2:42 pm | एस
तुमची माळवीची चित्रे अजिबात दिसत नाहीयेत.
28 Apr 2015 - 1:08 pm | एस
आणि तितकीच अप्रतिम रेखाटने आहेत. प्रत्येक रेखाटनातून एकेक जलरंगचित्र करता येईल इतके त्यांचे पोटेन्शियल मला आत्ताच दिसते आहे. मी एखादे करून पाहतो. (विशेषतः सहाव्या क्रमांकाचे रेखाटन फारच छान आहे.)
26 Apr 2015 - 4:23 pm | आदूबाळ
लेख आवडला.
27 Apr 2015 - 9:04 am | सतिश गावडे
सुंदर !!!
27 Apr 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी
सुंदर आहे लेखन, चित्रांची निवड अन रेखाटने.
27 Apr 2015 - 9:17 am | प्रचेतस
अतिशय सुंदर.
27 Apr 2015 - 9:39 am | किसन शिंदे
सुंदर आहेत सगळी चित्रे. तुम्ही काढलेली रेखाचित्रे पाहून मला व्यंकटेश माडगुळकरांच्या 'बनगरवाडी' पुस्तकातील रेखाचित्रे आठवली.
27 Apr 2015 - 11:19 am | पैसा
उत्तम लिखाण!
27 Apr 2015 - 11:22 am | पॉइंट ब्लँक
मस्त चित्र काढली आहेत :)
27 Apr 2015 - 11:48 am | चौकटराजा
युरोपातील वास्तववादी रंगकला हा एक महान विषय आहे त्यात व्हिंन्सेट व्हॅन गॉग हे प्रकरण तर लई भारी या सदरात.पण मला स्वता:ला निरनिराळे " बाज" स्वीकारून काढलेली रेखाचित्रे तितकीच आकर्षित करतात. साहजिकच मला या लेखातील दोन्ही आवडले. बाकी मदिरा महात्म्य आपल्याकडे अभिनयात ही दिसले आहे. असे म्हणतात की नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक याना दारू द्यायची व कानात फक्त नाटकाचे नाव सांगायचे की प्रयोग रंगलाच म्हणून समजा.
27 Apr 2015 - 2:39 pm | चित्रगुप्त
रेखाचित्रे आता दिसत आहेत ना ?
27 Apr 2015 - 3:35 pm | स्मिता.
सर्व चित्रं आणि तुम्ही केलेली रेखाटनं खूपच छान!
बर्याच वेळा बागेत किंवा निसर्गरम्य ठिकाणी चित्रकारांना असे 'कच्चे' रंगकाम करतांना पाहून विचारात पडायचे की समोर दृष्य आहे काय आणि याने काढलंय काय. त्यामागच्या 'चित्रानुभूती'चं कारण आता कळलं :)
27 Apr 2015 - 10:45 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आपल्या कुंचल्यात, रेषांच्या जाळ्यात कदाचित माळवा खेड्यातील शांत व सुबक जीवनशैलीचे प्रतिबिंब दिसते.काही मंतरलेले क्षण अनुभूतीने भारतात. ते चित्राच्या माध्यमातून साकार करायची हातोटी आपल्या सारख्या सिद्धहस्त कलाकाराला मिळाली आहे.
28 Apr 2015 - 1:16 am | पाषाणभेद
आपण काढलेल्या चित्रांमधून घरांची रचना, लिंपलेला ओटा, छप्पर हे सारे नजाकतीने स्पष्ट होते.
28 Apr 2015 - 1:44 am | काळा पहाड
अहो तुम्हाला निदान ती काढता येतात. आमचा वाघ शेळीसारखा (किंवा कधी कधी हत्तीसारखा) दिसतो त्याचं काय? आम्ही किती विषण्ण व्हायला पाहिजे?
28 Apr 2015 - 12:43 pm | बॅटमॅन
जपण्यासारखं असेल काही तर विषण्ण होण्यात अर्थ आहे
नसेल तसं काही तर हा प्रश्नही व्यर्थ आहे.
28 Apr 2015 - 1:34 pm | चित्रगुप्त
ही चित्रे मी काढलेली आहेत, यापेक्षाही ती ज्या प्रकारच्या घरांची/जागांची आहेत, ती आता कायमची नष्ट झालेली आहेत वा होत आहेत, म्हणून ती जपली गेली पाहिजेत, असे मला वाटते. आता मी ती सर्व (पाचेकशे असतील) निदान स्कॅन करून विविध ठिकाणी जालावर पसरवून ठेवण्याचा विचार करतो आहे.
28 Apr 2015 - 2:10 pm | बॅटमॅन
अगदी सहमत. स्कॅन तरी नक्कीच करा ही विनंती.
28 Apr 2015 - 12:44 pm | बॅटमॅन
अती उच्च धागा. सर्व चित्रे निव्वळ अफलातून आहेत. खूप आवडली. _/\_
बाकी, जुनी चित्रे, कागदपत्रे, इ. संवर्धन करणार्या काही संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा असे सुचवतो.
28 Apr 2015 - 1:23 pm | यशोधरा
सुरेख!
28 Apr 2015 - 1:51 pm | गणेशा
सर्वच्या सर्व चित्र/पेंटीग्स आवडली.. दिल खुलास एकदम.
तुम्ही काढलेले रेखाचित्रे ही खुप सुंदर आहेत. अप्रतिम.. अश्याच प्रकारचे एक चित्र मी मध्ये विकत घेतले होते..
चालायचेच .. हे असे अनेक विचार येतात.. विचारचक्र.. जर ही चित्रे जपायची असतील तर ही कला दुसर्याला आपण शिकवावी.. एका फटक्यात विषण्णता निघुन जाईन .. आणि आपल्या नंतर आपली कला वाढवणारा आपला शिष्य आहे हे खुप समाधान दायक असेन..
बाकी विचारचक्र कीतीही फिरत असली तरी आयुष्यच्या परीघापुढे ती तोकडीच ठरतात...
मागच्याच आठवड्यात विलास पवार या माझ्या मैत्रीणीच्या वडीलांच्या पेंटीग्स चे प्रदर्शन बालगंधर्व, पुणे येतेह लागले होते.. अप्रतिम निसर्ग रेखाटलेले होते ... ४ पेंटींग्स घरी आनलेली आहेत.. मस्त वाटते...
कधीकाळी खुप चित्रे काढुन त्यात रमुन जाणारा
- गणेशा
28 Apr 2015 - 3:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
बालगंधर्वला गेलो नाही त्यामुळे प्रदर्शन हुकले आहे.
मागे कोणीतरी पुणे येथे काय कार्यक्रम चालु आहेत असा काही धागा काढला होता.तो वर आणाता येइल काय?
28 Apr 2015 - 3:18 pm | गणेशा
तुम्ही ज्या चित्रकारांचे पेंटीग्स दिले आहेत त्यांची असंख्य पेंटीग्ज मी आता गुगल वर बघितली.. खुप खुप सुंदर आहेत सर्व.
धन्यवाद
28 Apr 2015 - 4:02 pm | चित्रगुप्त
@ गणेशा:
मी माझ्या लेखांमधे विविध प्रकारची चित्रे देत असतो, त्यात हेतु हा की त्यावरून वाचकांनी आणखी चित्रे गूगलादि वर शोधून बघावीत. माझा हेतु सफल होत असलेला बघून फार समाधान वाटत आहे.
28 Apr 2015 - 4:22 pm | स्पंदना
तुमच्या चित्रसमाधी चे वर्णन अतिशय आवडले.
येउ द्या.
4 May 2015 - 7:43 pm | हर्शरन्ग
लेख छान आहे आणि तुमची रेखाटने सुद्धा सुन्दर आहेत
21 Feb 2023 - 9:17 am | चित्रगुप्त
बरेच वर्षांनी काल जीएंची 'यात्रिक' कथा वाचायला घेतली आणि वाचताना व्हॅन गॉग आठवू लागला. आज पहाटे चार वाजता जाग आली तेव्हा माझ्या या (विस्मरणात गेलेल्या) लेखाची आठवण येऊन तो हुडकला.
जीएंचा 'यात्रिक' आणि व्हॅन गॉग 'असा लेख सुचतो आहे. बघूया लिहीणे जमते का.
22 Feb 2023 - 10:07 am | चौकस२१२
चित्रानुभूती
चित्रानुभूतीच्या उत्कट अवस्थेत
म्हणजे चित्र काढण्याची आलेली उर्मी / इच्छा असेच ना?
तर १ तांत्रिक प्रश्न
आपण उल्लेख केलेलंत कि "लंडन मधील आपल्या स्टूडिओत बसून सावकाशीने हे चित्र बनवायला त्याला कित्येक दिवस लागले असतील, तो सर्व काळ उत्कट चित्रानुभूती टिकून राहिली असेल, हे अवघड वाटते "
त्यावरून एक मनातील विचार : खास करून निसर्ग चित्रांबद्दल मला वाटते कि तीन प्रकारे हि पूर्ण केली असावीत
१) एकाच बैठकीत
२) त्याच ठिकाणी त्याच वेळी जाऊन अनेक बैठकीतून
३) पहिले जलद रेखाटन आणि मनातील त्याची साठवण आणि मग कार्यशाळेत निवांत पणे ते सर्व "आठवून " चित्र पूर्ण करणे
४) छायाचित्र घेणे आणि मग कार्यशाळेत निवांत पणे चित्र पूर्ण करणे
यातील ४) च्या मानाने १,२,३ तिन्ही जास्त अवघड .. बरोबर का?
22 Feb 2023 - 11:52 am | चित्रगुप्त
@चौकस२१२ विचार करण्यासारखे, महत्वाचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले आहेत. या जुन्या लेखातील मुद्द्यांबद्दल चर्चा करण्यात रस घेत असल्याबद्दल अनेक आभार.
१. चित्रानुभूती म्हणजे चित्र काढण्याची आलेली उर्मी / इच्छा असेच ना?
-- या लेखात वर्णिलेला, मला आलेला एकमेवाद्वितीय अनुभव यापेक्षा वेगळा होता, त्याला उद्देशून मी हा शब्द वापरला आहे. याला इंग्रजीत वगैरे काही शब्द आहे का, त्याविषयी कुणी काही लिहीले आहे का, हे मला ठाऊक नाही.
थोडक्यात म्हणजे "चित्र काढण्याची ऊर्मी" या पलिकडला हा अनुभव होता.
याच तोडीचा एक अनुभव मला अनेक वर्षांपूर्वी आला होता, तो असा :
सकाळी निद्रावस्था आणि जागृतावस्था यांच्या सीमारेषेवर असताना अचानक माझ्या पाठीच्या कण्यातून अतिशय प्रबळ असा विद्युतप्रवाह अखंडपणे वहातो आहे आहे अशी ती अनुभूति होती. मी अगदी हादरून गेलेलो होतो आणि ती स्थिती किती वेळ राहिली, हे समजले नाही. "ही कुंडालिनी आहे, काही न करता साक्षीभावाने नुस्ते बघत रहा" असे शब्द जणु कोणी माझ्या कानात येऊन बोलल्याचा भास झाला. काही वेळानंतर ती स्थिती लयाला जाऊन मी 'सामान्य' परिस्थितीत आलो.
-- हा अनुभव तेंव्हा बायकोला सांगितला होता (आणि रोजनिशीत लिहूनही ठेवला असावा, पण आता नेमके वर्ष लक्षात नसल्याने हुडकणे अवघडच आहे)
मलासे वाटते या लेखात बहुतेक माझ्याकडून जरा गल्लत झालेली आहे. वरील परिच्छेदात वर्णिलेली स्थिती ही 'चित्र काढण्याची उर्मी' या जातीची आहे, किंवा त्या दोन्ही अनुभूतींच्या मधली एक उत्कट अवस्था आहे. आता एवढ्या वर्षांनंतर नेमके सांगणे कठीणच आहे. अनिल अवचट यांचा 'चित्रकार' नावाचा एक लेख फार वर्षांपूर्वी वाचला होता, त्या काहीसे असेच होते. आता तो लेख मिळाल्यास वाचायला नकीच आवडेल.
२. यातील ४) च्या मानाने १,२,३ तिन्ही जास्त अवघड .. बरोबर का?
'हुबेहुब' चित्रणाच्या बाबतीत हे काही प्रमाणात बरोबर असले तरी पूर्णपणे नाही, कारण निसर्गचित्र रंगवण्याचा अनुभव हा अनेक पदरी असतो, त्यात समोरचे दृष्य (प्रत्यक्ष वा फोटोतले) आपले सरावाने साध्य केलेले कसब वापरून/पणाला लावून काम करत रहाणे हा अगदी प्राथमिक भाग असतो.
या दृष्टीने विविध चित्रकारांची चित्रे अभ्यासून त्यावर स्वतंत्र लेख लिहीणाचा प्रयत्न करता येईल, परंतु आता माझ्यात इंग्रजीतली पुस्तके (उदा. व्हॅन गॉगची शेकडो पत्रे) वाचण्याची क्षमता राहिलेली नसल्याने त्यात निश्चितच अपूर्णता राहील.
माझ्या अल्पमतिप्रमाणे 'चित्रानुभूतीच्या उत्कट धुंदीत जगणारा' सर्वात प्रसिद्ध चित्रकार म्हणजे व्हॅन गॉग.
22 Feb 2023 - 12:22 pm | विवेकपटाईत
काका,मंडी हाउस जवळच्या आर्ट गॅलरीत तुम्ही चित्र समजावून मला दाखवत होते.ती आठवण जागृत झाली. तुमचे चित्र आणि चित्राची कहाणी पाहायला आणि वाचायला आवडेल.
22 Feb 2023 - 12:23 pm | विवेकपटाईत
काका,मंडी हाउस जवळच्या आर्ट गॅलरीत तुम्ही चित्र समजावून मला दाखवत होते.ती आठवण जागृत झाली. तुमचे चित्र आणि चित्राची कहाणी पाहायला आणि वाचायला आवडेल.
23 Feb 2023 - 2:44 pm | बबन ताम्बे
चित्रानुभुतीची अद्भुत मेजवानी !! हा जुना धागा पाहिला नव्ह्ता.
नामवंत चित्रकार आणि आपली रेखाटने अती सुंदर .
निसर्ग चित्रात कागदाच्या/कॅनव्हासच्या वर पासून ३/४ अंतर सोडुन भूभाग चितारावा आणि त्यावर डोंगर, लांबची झाडे वगैरे चितारावी असा काही नियम आहे का ? इथल्या नामवंत चित्रांत तसे दिसत नाही.