आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३
http://www.misalpav.com/node/31021 - भाग १
http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम
तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप २ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.......................
या दरम्यान दिवसभरात बेसकॅंपवर भरपूर घडामोडी घडत होत्या. दुपारी कुर्ल्याहून दत्ताचे दोन मित्र तातडीचा निरोप घेऊन आले होते. किरण व नरेंद्रच्या मदतीस खाली कॅंप-१ वर असलेले दिनेश व आनंद किरणच्या सल्ल्यानुसार संध्याकाळी पाच वाजता परत बेसकॅंपवर निघून गेले होते, कारण सुभाष, दत्ता व पुंडलिक आज रात्री कॅंप-१ वर मुक्कामाला येणार होते. सोबत किरण व नरेंद्रला जेवणपाणी व झोपण्यासाठी चादरी आणणार होते. पण रात्री त्यांच्यापैकी पुंडलिक व दत्ताच कॅंप-१ वर आले होते. किरणने कॅंप-२ वरूनच सुभाषबद्दल विचारताच त्याच्या कंपनीत काहीतरी तातडीच काम निघाल्यामुळे तो उद्या सकाळीच डोंबिवलीला परत जाणार होता. किरण खूपच उद्विग्न झाला, कारण किरण पाठोपाठ दत्ता आणि सुभाषकडे मोहिमेच नेतृत्व होत. पण किरण कॅंप-२ वर अडकला होता आणि खाली येण्यासाठी पुरेसा दोरही नव्हता. रोज होत असलेल्या अतिरिक्त परिश्रमामुळे मानसिक आणि शारीरिक ताण पडत होता. बेसकॅंपपासून चढाईच ठिकाण अर्थात कॅंप-१ जवळपास २ तासावर होता, त्यातच कॅंप-१ जवळ पाण्याची कुठलीही सोय नव्हती, त्यामुळे बेसकॅंपवरूनच पाणी वाहून न्यावे लागत होते. या सर्व परिश्रमामुळे सगळ्यांचेच हाल झाले होते.
खाली दत्ता आणि पुंडलिकने किरण व नरेंद्र साठी जेवणपाणी आणि झोपण्यासाठी चादरी आणल्या होत्या. पण आज सर्व काही असूनही किरण व नरेंद्रला त्यांचा काहीच उपयोग नव्हता.
कॅंप-२ वरून खाली कॅंप-१ वर उतरण्यास त्यांच्याकडे पुरेसा दोर नसल्याने हे सर्व साहित्य वर खेचून घेऊ शकत नव्हते. टप्प्या-टप्प्याने ते उतरू शकले असते कारण मार्गात मध्ये बोल्ट ठोकलेले होतेच पण काळोख झालेला असल्याने तो धोका पत्करण्यात आला नाही.
किरण व नरेंद्रकडे सुकामेव्याची १०० ग्रामची दोन पाकीट होती व पाण्याची एक बाटली होती. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर पोट जाळण्यासाठी फक्त सुकामेवा, त्याच्यावरच थंडीमध्ये कुडकुडत उघड्यावरच संपूर्ण रात्र काढावी लागणार होती. हा मोहिमेतला दुसरा उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता. दिवसभर उपाशीपोटी चढाई केल्यामुळे भूक तर प्रचंड लागली होती. प्रथम सुकामेवा खाऊन त्यावर पाणी पिऊन ‘जेवण’ संपवले. पाणी पिऊन पोट भरावे तर पुरेस पाणी सुद्धा जवळ नव्हत. कारण अवघे दीड लिटर पाणी त्याच्यावर पूर्ण रात्र व कदाचित उद्याचा दिवसही काढावा लागणार होता. थंडी असल्यामुळे जास्त तहान लागत नव्हती हेच त्यातल्या त्यात समाधान. कारण कॅंप-१ वरून दत्ता व पुंडलिक जोवर कॅंप-२ वर येत नाहीत तोवर आम्हाला काहीच मिळणार नव्हते.
हळूहळू रात्र वाढू लागली. सोबत थंडीही कारण आम्ही उंच कड्यावर उघड्यावर होतो. तिन्ही बाजूंनी गार वारा सुटला होता त्यामुळे थंडी आणखीनच वाढली. उब निर्माण करण्यासाठी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हत. किरणच्या अंगावर फुल बाह्याचे दोन शर्ट होते, तर नरेन्द्रकडे दोन हाफ शर्ट होते. किरणने एक फुल बाह्यांचा शर्ट नरेंद्रला दिला व त्याच्याकडील एक हाफ बाह्यांचा शर्ट स्वतःसाठी घेतला. थोडावेळ बर वाटलं पण तेव्हढ्यापुरतंच. बराच वेळ दोघेही एकमेकांशी बोलत बसूनच होतो. आम्ही बूट न घालता अनवाणीच चढाई करीत असल्याने हातांपायांची उघडी बोट गारठून बधीर झाली होती. पण रात्र वाढू लागल्यावर दातही कडकडू लागले, त्यामुळे गप्पाही बंद झाल्या. हातावर हात घासून तात्पुरती उष्णता निर्माण केली. इतक्यात किरणला काहीतरी आठवले, त्याने कॅमेऱ्याची बॅग उघडून कॅमेरा बांधायचे दोन पिवळे डस्टर्स काढले. एक नरेंद्रने आणि दुसरा किरणने आपल्या डोक्याला बांधला. दोन प्लास्टिकच्या पिशव्या काढून डोक्यात घालून खालपर्यंत ओढून घेतल्या. जास्त लांब नसल्यामुळे त्या मानेपर्यंत पोचल्या पण घट्ट असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे थोड थांबून पिशवी वर उचलून मोकळा श्वास घ्यावा लागे. काडीचा आधार मिळाला होता. एकमेकांच्या अंगावर पाय टाकून व शर्टच्या आत हात घालून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप कसली येतेय, नुसतेच वेळ संपण्याची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला अस वाटून घड्याळ पाहिलं तर रात्रीचे आठच वाजत होते. बापरे! अजून तब्बल १०-१२ तास घालवायचे होते. या कल्पनेनेच अंग शहारून निघाल. मध्येच नरेंद्रने आजुबाजूच गवत उपटून जमा केल व ते पेटवून दोघेही हातापायांना शेक देऊ लागलो.
पण शेकोटी संपताच थंडी जास्तच जाणवू लागे. म्हणून तोही प्रयत्न सोडून दिला. पुन्हा कड्यावर बसून सभोवतालचा परिसर पाहू लागलो. नुकतीच अमावस्या होऊन गेली होती. आकाशात सर्वत्र चांदण्यांचा मंद प्रकाश पसरला होता. बहुतेक घाटघर-साम्रद परीसर असावा. डावीकडे मात्र दिव्यांचे बरेच पुंजके दिसत होते, त्याही डावीकडे मोठा हॅलोजनचा प्रकाश पडला होता, कदाचित एखादा कारखाना असावा. त्या उजेडाकडे पाहताना उगीचच अंगात उब आल्यासारखी वाटली. खाली आश्रमाजवळ आमच्या बेसकॅंपमध्ये पेट्रोमॅक्सचे दोन्ही दिवे पेटल्याने बराच भाग प्रकाशित झाला होता. परत घड्याळाकडे पाहिले तर नऊच वाजत होते. सुर्योदयासाठी अद्याप दहा तास वाट पहायची होती. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. टाईमपास म्हणून पुन्हा गवत पेटवून शेकवून घेण्याचा प्रयत्न केला. मध्येच कधीतरी ओबडधोबड दगडावर आडवे झालो आणी डोळा लागला न लागला तोच वरून लहान लहान दगड खाली पडायला लागले. झोप ती काही लागली नाहीच. अक्षरशः तास/मिनिटे/सेकंद अशा अंतराने घड्याळ पाहत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटायला लागलं आणि जिवात जिव आला. एखाद्या गोष्टीची वाट पाहण म्हणजे काय ते त्या कालच्या रात्रीने आम्हाला शिकवलं होत.
सकाळी ६ वाजताच दोघांनी हालचाल केली. थोड गवत जमा करून प्रथम अंग शेकून घेतलं व दत्ता व पुंडलिक कॅंप-१ वरून कॅंप-२ वर येण्याची वाट न पाहताच सकाळी ठीक ७ वाजता उपाशीपोटीच चढाईला सुरुवात केली. काल शेवटचा बोल्ट मारला तेथपर्यंत दोर पकडून पोहोचणे आवश्यक होते. हातही गारठून गेले होते. तरीही किरण अनामिक उत्साहाने ‘झुमार’ नसल्याने कमांडो पद्धतीने दोर नुसताच धरून त्या ओव्हरहॅन्गच्यावर काल मारलेल्या शेवटच्या बोल्टपर्यंत जाण्यात सफल झाला. फ्री-मूव्ह करण्यास संधी नसल्याने किरणने एक बोल्ट ठोकला व त्यात दोर पास करून त्याने पुढे चाळीस फुटांची उंची गाठली. त्याचा मदतनीस नरेंद्र खाली कॅम्प-२ वरच्या लेजवरूनच किरणला बिले देत होता. उंची वाढल्याने किरणने सुरक्षेसाठी आणखी एका बोल्टची भर घालून त्याच्यापुढे फ्री-मूव्ह करीत परत चाळीसेक फुटांची उंची गाठली. उंची आणखी वाढल्याने आता त्याला मदतनीस त्याच्याजवळ हवा होता. लागलीच त्याने नरेंद्रला वर येण्यास सांगितले. कमांडो पद्धतीने दोर नुसताच पकडून त्या ओव्हरहॅन्गच्या वर येताना नरेंद्रचा हात चांगलाच खरचटून रक्तबंबाळ झाला. त्याला खालून बिले देण्यासाठी कॅम्प-२ च्या लेजवर कोणीच नव्हते. जखमी झाल्यामुळे नरेंद्र बिलेच्या सुरक्षेशिवाय किरण पर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्यातच किरणने दोर वर खेचून घेतला होता. स्वतःवरच चरफडत किरणने नरेंद्रला उगीचच बोल लावले. मुंब्य्रात सराव करायला नको वगॆरे…… खरतर चूक किरणचीच होती, फ्री-मूव्ह करण्याच्या नादात दोर खूपच वर खेचून घेतला होता.
शेवटी किरणने दोलायमान स्थितीतच बोल्टिंग करण्याचा निर्णय घेतला, पर्यायही नव्हता. अक्षरशः जिवावर उदार होऊन किरणने सावधपणे पायांच्या आधारावरच पालीप्रमाणे कड्याला चिकटून दोन्ही हात सोडून हातोडीचे घाव घालायला सुरुवात केली. बरे, हात जास्त बाहेर काढून हॅमरींग करणे शक्य नव्हते, अन्यथा तोल जाऊन जवळपास १२५ फुटांचा फॉल निश्चित होता तो हि थेट नरेंद्रपाशीच कॅंप २ वर. फक्त कोपरात उरलेली सगळी ताकद एकवटून २५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर किरण बोल्ट ठोकण्यात यशस्वी झाला. सर्प्रथम त्या बोल्ट मधून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले.
From Aajoba 1991
एव्हाना ९ वाजले होते. कॅंप-१ वर दत्ता व पुंडलिक कुंभकर्णी झोपेतून उठले होते. तेंव्हा किरणने त्या बोल्टला दोर बांधून त्या दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत नरेंद्रपाशी कॅंप-२ वर उतरला. कॅंप-१ वर असलेल्या दत्ता आणि पुंडलिकला आता सामानासहित कॅंप-२ वर घेणे आवश्यक होते. किरण खाली पोहोचताच नरेंद्रची चौकशी केली, त्याचा हात चांगलाच खरचटला होता, किरणने मघाशी त्याच्यावर भडकल्याबद्दल माफी मागितली. वास्तविक नरेंद्रच्या जागी दुसरा कुणीही असता तरी वर येऊ शकला नसता कारण पूर्ण एक दिवसाचा उपास, रात्री धडपणे झोप नाही, प्यायला पुरेसे पाणी नाही अशा परिस्थितीत जवळपास ३६ तास काढले होते. आणि तशातच थंडीने हात गारठून दोर हाताच्या पकडीत येत नव्हता हे विशेष!
तसही जखम होण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती, अशा अनुभवांना या आधीहि सामोरे गेलो होतो, त्यामुळे ती जखम कुरवाळत न बसता नरेंद्र परत जोमाने कामाला लागला. नरेंद्रला कॅंप-२ वरच ठेवून किरण उपलब्ध दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत जवळपास १०० फुट खाली एका बोल्टवर लटकत थांबला. दरम्यान पुंडलिक खालून नवीन दोर सोबत घेऊन आधी मारलेल्या बोल्टच्या साहाय्याने किरणच्या दिशेने निघाला. पुंडलिक जवळ पोहोचताच, किरण त्याच्याकडून नवीन दोर घेऊन परत वर कॅंप-२ च्या दिशेने निघाला. कॅंप-२ वर पोहोचताच किरण व नरेंद्रने दोराच्या साहाय्याने सर्व सामान वर खेचून घेण्यास सुरुवात केली. जवळपास दीडेकशे किलो साहित्य व खाण्याचे सामान कॅंप-२ वर खेचून घेण्यात आले.
या सर्व उपद्द्व्यापात दुपारचे तीन वाजले. सर्वात शेवटी दत्ता व पुंडलिक कॅम्प-१ सोडून कॅंप-२ वर आले. क्षणभर विश्रांती घेतानाच खाली शैलेश व कुट्टी बेसकॅंपवरून आमच्यासाठी जेवण घेऊन येताना दिसले. परत जेवण घेण्यासाठी खाली उतरावे लागले. दोन दिवसांच्या उपाशीपोटी परिश्रमानंतर शरीर व मन दोन्ही थकली होती. नरेंद्र व किरण तर जवळपास ३६ तासांनंतर जेवत होते.
शरीराला थोडावेळ कुठे आराम मिळत होताच तो आलेल्या बातम्यांनी मनाचा आराम पार उडून गेला. दत्ता व पुंडलिक व शैलेश/कुट्टी यांनी बेसकॅंपवरून आणलेल्या ताज्या बातम्या ऐकून मन सुन्न झाल. पण जे समोर आल होत ते स्विकारण अपरिहार्य होत. त्यात आता काहीच बदल घडू शकत नव्हता. या विषयावर रात्री सविस्तर विचार करू अस म्हणून आम्ही परत चढाई करण्यासाठी सज्ज झालो. किरण त्याने शेवटी मारलेल्या बोल्टवर परत पोहोचला. यावेळेस दत्ताला बिलेसाठी सोबत घेतलं. किरणने दत्ता त्याच्या जवळ पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ६० फुटांची उंची गाठली. सुरक्षेसाठी तेथेच एक बोल्ट मारून दत्ताला तिथे बोलवून घेतले. दत्ता तिथे पोहोचताच परत किरणने फ्री-मूव्ह करत आणखी १०० फुटाची उंची गाठली. आता तो आजोबाच्या मुख्य कड्याच्या पायथ्याशी पोहोचला होता. वर नजर फिरवताच त्या कड्याच्या भव्यतेने त्याचे डोळेच दिपले. दोन्ही बाजूना दूरवर पसरत गेलेल्या आजोबाच्या लांबलचक कडा पाहताना डोळ्यांमध्ये काय साठवू आणि काय नको असे झाले होते. जवळ जवळ हजार फुटांचा ताशीव कडा उभा होता. व सर्वात आश्चर्य व आव्हानात्मक गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यात ५००-६०० फुट उंचीवर मुख्य कड्यापासून ९० अंशाच्या कोनात बाहेर आलेलं एक अभेद्य दगडी छत आमची वाट पाहत होत. ते छत आता दिसायचं कारण कि तो वरचा भाग कायम धुक्यात असायचा. शिवाय आमच्या चढाईच्या मार्गापासून दूर उजवीकडे होता म्हणून आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल होत. आता ते दिसल्यामुळे आमच्या तावडीतून सुटण शक्य नव्हत. या आधी आम्ही १९९० मध्ये पांडवकडा धबधबा येथील ३५ फुटी दगडी छत लीलया पादाक्रांत केल होत. पण ते जमिनीपासून खूपच जवळ होत. इथे मात्र त्याच्या अगदी उलट चित्र होत. हे दगडी छत जमिनीपासून सुमारे ३५०० फुट उंचीवर होत. त्यासाठी किरण आणि दत्ताने तिथेच बसून त्याचा निट अभ्यास केला व दोघांमध्ये चर्चा करून आमच्या आतापर्यंतच्या चढाईच्या मार्गापासून उजवीकडे सुमारे १०० फुट लांब आमचा चढाई मार्ग बदलला.
From Aajoba 1991
संध्याकाळचे ६ वाजले होते. दरम्यान किरण व दत्ताने पाण्याच्या शोधात कड्यावरील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. एके ठिकाणी खडकावर थोडासा ओलसर भाग दिसला म्हणून फ्री मूव्ह करत ७० फुट उंच त्या खडकापर्यंत पोचले. तेथील ओलसर खडक हातोडीच्या साहाय्याने फोडून काढला पण त्यातून पाण्याचा एक थेंबही ठिबकेना. पाण्याचा एक थेंब जरी ठिबकत असता तरी दिवसभर चार ते पाच लिटर पाणी सहज जमल असत. आजोबाच्या कड्याने जणू आमची परीक्षा घ्यायचीच ठरवलं होत. अतिशय कष्टी मनाने परतायचा निर्णय घेतला. उद्या डावीकडचा परिसर पाहू तिथे पाणी नक्कीच मिळेल हि मनाशी आशा बाळगून ते दोघेही रॅपलिंग करत रात्रीच्या मुक्कामा साठी कॅंप-२ वर दाखल झाले. त्यांचे दोघांचेही चिंताग्रस्त चेहरे पाहून पुंडलिक व नरेंद्र बरेच काही जाणून गेले.
संध्याकाळी ७ वाजताच जेवायला बसलो. अंधार पडल्यावर जेवण शक्य नव्हत कारण बेसकॅंपसारखी इथे दिव्यांची सोय नव्हती. सोबत असलेली मेणबत्ती/काडेपेटी आणीबाणीच्या प्रसंगात जपून ठेवणे आवश्यक होत. जेवताना कुणीच एकमेकांशी बोलत नव्हत. पण प्रत्येकाच्या मनात पाण्याचा प्रश्न थैमान घालत होता. आता जवळ असलेल दोन ते अडीज लिटर पाणी उद्या संध्याकाळपर्यंत पुरवायच होत. जेवण करून प्रथम जमिनीवरचे दगडगोटे साफ करून बऱ्यापैकी जागा समान करून घेतली. काल उघड्यावर काढलेल्या रात्रीच्या आठवणीवर आज मात्र घोंगडीच्या उबदार स्पर्शाने मात केली होती. रात्री झोपताना दिवसभराचा आढावा घेण जरुरी होत.
समजलेल्या बातमीनुसार सुभाष कंपनीतून तातडीचे बोलावणे आल्यामुळे परत घरी जाणार होता. पण अजून किती जण घरी जाणार आहेत हे मात्र माहित नव्हत. दुपारी शैलेश व कुट्टी जेवण घेऊन आले तेंव्हा सर्व स्पष्ट झाले. सुभाष, महेंद्र, दिनेश, मिलिंद, पटेल, अशोक शिबे असे एकूण सहाजण झटकन कमी झाले होते. बेसकॅंपवर आता फक्त नंदू, कुट्टी, शैलेश व बालाजी असे चौघेजणच शिल्लक होते. वास्तविक पाहता प्रत्येकजण बेसकॅंप ते कॅंप १ अशी वर-खाली ये-जा करून कंटाळला (चार तास) होता, आणि महत्वाचे म्हणजे सर्व मनातून घाबरले होते. अर्थात ती वाट पण भयानक होती. महेंद्रची रजा संपली होती. पटेलला कंपनीच्या कुठल्यातरी ट्रेकला जायचे होते. दिनेशचा धंदा होता, त्यामुळे तो बुडवण शक्य नव्हत. मिलींदची १५ दिवसांची सुट्टी होती, पण तोही थकला होता. अशोक तर आमचा सारथी त्याचाही स्वतःचा धंदा होता, तसाही तो मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत नसे. पण आमच्यासाठी त्याची गाडी कायमच उपलब्ध असे.
आनंदला गावी जाणे आवश्यक होते. याच्या विरुद्ध परिस्थिती होती दत्ता आणि शैलेशची. शैलेशच्या बहिणीचे लग्न ठरले होते व त्याची सर्व तयारी त्यालाच करायची होती. त्याही पेक्षा वाईट परिस्थितीत दत्ता अडकला होता. या क्षेत्राशी निगडीत नसलेले त्याचे दोन मित्र खास निरोप घेऊन कुर्ल्याहून आले होते. त्याची आई आजारी पडली होती व घरी तिला पाहायला दत्ताशिवाय दुसर कोणीही नव्हत. खरतर असा निरोप मिळाल्यावर एखादा सरळ घरी पळत सुटला असता. पण तो किरणला भेटून परिस्थिती कथन करण्यासाठी २ दिवस थांबला होता. दुसऱ्या दिवशी काळजावर दगड ठेवून सामान वर चढवण्याच्या कामास लागला पण किरणला काहीच कळू दिले नाही. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर रात्री त्याने किरणकडे विषय काढला. म्हणजे आता किरणचे दोन खंदे वीर सुभाष आणि दत्ता मोहिमेत नसणार होते. शेवटी प्रत्येकाचे हातावर पोट असल्याने कोणाला थांबवूही शकत नव्हतो.
कॅंप-१ वर दत्ता आणि पुंडलिक उद्या हि बातमी किरणला कशी सांगायची या काळजीने त्यांना ग्रासले होते. खरेच एका रात्रीत संपूर्ण परिस्थिती कशी बदलली होती! बेसकॅंपवर उरलेल्या शैलेश, नंदू व कुट्टी व बालाजीला काय करावे तो प्रश्न पडलेला. शेवटी आम्ही चर्चा करून करून कंटाळलो. काय व्हायचे असेल ते होवो उद्या आपण सकाळी आपला दिनक्रम सुरूच ठेवायचा. किरण व पुंडलिक ने उद्या पाणी शोधायला निघायचे तर दत्ता व नरेंद्रने कॅंप २ वरून सामान अजून वर चढवून आज चढाई थांबवलेल्या कड्याच्या पायथ्याशी नेउन ठेवायचे. जर त्यांना जवळपास पाणी मिळाले तर त्याच्या आधारे उरलेली चढाई किरण, पुंडलिक व नरेंद्रने पूर्ण करायची. जेवणासाठी आमच्याकडे कॅंप २ वर असलेले खजूर, सुका मेवा, ग्लुकॉन डी ई. वापरायचे. त्यामुळे आता बेस कॅंप वर अवलंबून राहावे लागणार नव्हते. अशी मनाची तयारी करून आम्ही रात्री कड्यावरच झोपी गेलो. हा कड्यावरील उघड्यावरचा ४ था मुक्काम (Bivouac) होता.
From Aajoba 1991
From Aajoba 1991
सकाळी उठून पाण्याची १ बाटली व सुका मेवा घेऊन किरण व पुंडलिक काल ठरवल्याप्रमाणे पाण्याच्या शोधात निघून गेले. तर नरेंद्र व दत्ता कॅंप-२ वरून सामान वर आणण्याच्या कामाला लागले. किरण व पुंडलिक डाव्या हाताला फ्री-मूव्ह करत वर वर सरकत कड्याच्या पायथ्याशी पोचले व तेथून डावीकडे नेढ्याच्या दिशेने निघाले. वाटेत सापाने नुकत्याच टाकलेल्या ३ काती मिळाल्या. म्हणजे एव्हढ्या उंचावरसुद्धा साप आमची पाठ सोडणार नव्हते. सावधपणे सरकत दोघेही मिलिंदने सांगितल्याप्रमाणे नेढ्यापाशी पोचले. तेथील परिसर हिरवागार दिसत होता. तो पाहताना १००% पाणी मिळेल हि खात्री पटली. पण तो आनंद थोडाच वेळ टिकला कारण जंग-जंग पछाडूनही पाण्याचा कुठेही मागमूस नव्हता. निराश मनाने नेढ्यावरून डावीकडे सरकलो. डावीकडे आजोबाचा सुमारे ३ हजार फुटी विस्तारीत कडा दिसत होता, त्यापलीकडे तसाच कात्राबाईचा कडा होता व दोघांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून कुमशेत गाव सुमारे १५/२० मिनिटाच्या अंतरावर आहे, असे मिलिंदनेच आम्हाला सांगितले होते. त्यामुळे कड्याच्या पायथ्याशी खिंडीपर्यंत जाऊन वाटेत पाणी नाही मिळाले तर खिंडीत वरच्या बाजूस पाणी १००% मिळणारच होते, पण ते ठिकाण आमच्या चढाईच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल ते महत्वाचे होते व हा एकच मार्ग सध्या आमच्या समोर होता. दोघेही नेढ्यावरून जवळपास ५० फुटी रॉकपॅच उतरून जंगलात पोचले. डावीकडे कारवीची दाट झाडी तर उजवीकडे उंच कडा यांच्या मधून वाट काढत दोघेही चालले होते. प्रत्येक पावलागणिक वाट तयार करावी लागत होती. इतक्यात पुंडलिकच्या पायाखालून एक पिवळा जर्द सर्प सळसळत खाली जाऊन दिसेनासा झाला. आता दोघांनीही कड्याच्या पायथ्यापासून वरच्या बाजूला चढण्यास सुरुवात केली. कारण शुक्रवारी नरेंद्र, किरण व कुट्टी खालच्या भागातूनच पाण्याच्या शोधात खिंडीत पोचले होते व तेथे कुठेच पाणी सापडले नव्हते. कड्याच्या माथ्यावर पोहोचून सभोवार नजर फिरवली तर समोर साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर काळ्या दगडांच्या मध्ये खड्डया खड्ड्यातून साचलेले पाणी नजरेस पडले. पण संपूर्ण मार्ग कारवीच्या दाट झाडीने गच्च झाला होता. पण त्यातूनच जाणे योग्य होते. पुन्हा चढलेल्या वाटेनेच खाली उतरलो व कारवीच्या रानात घुसलो. दोन्ही हातानी कारवी बाजूला सारत अक्षरशः रांगतच आम्ही पुढे सरकत होतो. तब्बल अर्धा तास या पद्धतीनेच पुढे सरकल्यावर आम्ही मोकळ्या जागी पोचलो. नंतर जरा उजवीकडे सरकून खाली उतरणारा एक रिकामा ओढा पकडला व त्यातून पुढे सरकून सुमारे १५ मिनिटात दोघेही वरून पाहिलेल्या पाण्याच्या जागी पोहोचलो. तब्बल ४ दिवसानंतर पाण्याचा एव्हढा साठा पाहून उड्याच मारायला लागलो.
From Aajoba 1991
From Aajoba 1991
हावरटासारखे घटाघटा पाणी पिउन घेतले. दमल्याने अर्धा तास तिथेच आराम केला. इतके पाणी पाहिल्यानंतर पुन्हा आलेल्या मार्गानेच माघारी फिरलो. सकाळी नेढ्यातून इथे येतांना नेढ्याच्या आतमध्ये जायचे राहिले होते, तेंव्हा आता नेढ्यात प्रत्यक्ष शिरून तिथेही पाणी आहे का याचा मागोवा घेतला. तेथे पाणी नसल्याची खातरजमा केल्यावर साधारणपणे ३ वाजता किरण व पुंडलिक दोघेही आमच्या चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप २ च्या वर पोचले होते. एक कॅन पाणी आणण्यासाठी पाच तास लागले होते. म्हणजे पाण्याच्या या मार्गाचा अवलंब पुढील काळात शक्यच नव्हता. कारण सहकाऱ्यांची अनुपस्थिती! दरम्यान किरण व पुंडलिक पाण्याच्या शोधत गेल्यावर इथे नरेंद्र व दत्ताने सर्व सामान कॅंप २ पासून वर चढवून कड्याच्या पायथ्याशी व्यवस्थित रचून ठेवले होते.
दुपारी जेवण घेऊन शैलेश, शेखर, नंदू आले होते. आज नशिबाने २ सहकारी वाढले होते. चढाई टीमचा शेखर फाटक व बेसकॅंपवरील अनिल इमारते. पण दोन दिवसांनंतर दत्ता, शैलेश व बालाजी परत जाणार होते. शेवटी हिशोब एकच होणार होता. उलट एक माणूस कमीच होणार होता. बेसकॅंप पासून चढाई करत सुमारे १८०० ते २००० फुट उंचीवर पोहोचलो होतो. अद्याप जवळपास १००० फुटी चढाई शिल्लक होती. बेसकॅंप पासून कॅंप-१ चे अंतर सुमारे ८००-१००० फुट. कॅंप-१ पासून कॅंप-२ मधील अंतर सुमारे ३०० फुट. आणि आता जिथे आम्ही होतो त्या कड्याचा पायथा ते कॅंप-२ चे अंतर ७०० फुट होते. पुढील चढाई सुरु ठेवण्यासाठी बेसकॅंपवर कमीत कमी चार सहकारी, कॅंप-१ वर दोन सहकारी, कॅंप २ वर दोन सहकारी व त्याच्यावर दोन सहकारी असे एकूण दहा सहकारी आवश्यक होते. शिवाय चढाई टीममध्ये ४ सदस्य आवश्यक होते. इथे तर बेरीज वजाबाकी केल्यावर आम्ही फक्त सातच जण उरलो होतो. या परिस्थितीत पुढील चढाई थांबवणे हा एकाच पर्याय डोळ्यासमोर दिसत होता. अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
प्रस्तरारोहण सुरु केल्यापासून गेल्या ७-८ वर्षांच्या कालावधीत हि पहिलीच मोहीम अर्धवट राहण्याची चिन्ह दिसत होती. पुढे काहीच मार्ग दिसत नसल्यामुळे सल्लामसलत करून दुःखी अंतकरणाने शैलेश, नरेंद्र, शेखर यांना परत बेसकॅंपवर पाठवून दिले. आम्ही चढाई स्थगित करतोय या जाणिवेनेच मेल्याहून मेल्यासारखे झाले.
चढाई स्थगित करण्याचे मुख्य कारण पाणी. पाणी आणण्यासाठी व जेवण पुरवण्यासाठी माणसांची गरज होती. कड्यावर चढवलेले सामान उद्या परत जवळपास १००० फुट खाली कॅंप-१ वर उतरावयाचे होते व तेथून चढ उतारावर २ तासांची पायपीट करून बेसकॅंपला पोहोचवायचे होते. सोबत कड्यावर आतापर्यंत ठोकलेल्या ६३ बोल्टमधून जागोजागी अडकवलेले साहित्य काढणे हे एक काम होतच. रात्री जेवताना कोणाचच चित्त थाऱ्यावर नव्हत, ते कधीच कडयावर वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यासोबत अस्पष्ट दिसणाऱ्या क्षितिजापलीकडे उत्तरं शोधण्यास निघून गेल होत. अजूनही चढाई स्थगित करण्यास मन धजावत नव्हत. असंख्य प्रश्नांची उत्तर सापडत नव्हती.
रात्रीच्या आसमंतात विखुरलेल्या चांदण्या पाहतांना किरणच्या मनात एक आशेचा किरण चमकून गेला. परवा पुंडलिक व किरण पाणी आणण्यासाठी गेले होते तेंव्हा त्यांना पाणी मिळाले होते तेथून आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आणखी एक तास लागला असता. शिवाय गड असल्याने माथ्यावर पाणी मिळण्याची शक्यता होती. फक्त त्यासाठी आश्रमाजवळील बेसकॅंपचा गाशा गुंडाळून तो थेट आजोबाच्या माथ्यावर हलवावा लागणार होता. किरणने हा विचार नरेंद्र व पुंडलिकला सांगितला. तर त्यांच्याही मनात नेमके तसेच विचार चालू होते. त्यामुळे त्वरित होकार आला. आशेचा किरण दिसल्यावर झोपही चांगली आली.
सकाळी उठल्याबरोबर किरण व नरेंद्रने खाली कड्यावर ठोकलेल्या बोल्टला लटकत असलेले सामान काढण्यास सुरुवात केली. तर पुंडलिक व दत्ताने सामान खाली कॅंप-१ वर उतरावयास सुरुवात केली. त्यांचे काम सुरु असतानाच शैलेश, नंदू व कुट्टी कॅंप-१ वर आले होते. अवघड जागी स्वतःला अडकवून हळूहळू सर्व सामान कॅंप-१ वर आणले. उपस्थित ८ जणांनी प्रत्येकाला जास्तीत जास्त जमेल तेव्हढे सामान उचलून बेसकॅंपच्या दिशेने कूच केली. बेसकॅंपवर रामेश्वरबाबा गावचे कोतवाल श्री. सुकऱ्या यांच्या बरोबर आमची वाटच पाहत होते. सलग तीन रात्री आम्ही कड्यावरच असल्याने रामेश्वरबाबांनी काळजी वाटून कोतवालांना पाचारण केले होते. कडाक्याची थंडी, बोचरे वारे व रानातील जिवजंतू यातून सुटून परत सुखरूप आलेले पाहून त्यांनाही समाधान वाटले.
हिच संधी साधून किरणने त्यांच्याशी पाण्याचा विषय काढला. रामेश्वरबाबा आणि कोतवालांनी माथ्यावर पाणी असल्याचे सांगितले. बेसकॅंपवर उरलेल्या इतर सहकाऱ्यांना सर्व योजना समजावताच सर्वांचा एकसाथ होकार आला. मोहीम अर्धवट सोडून नंतर पुढे म्हणजेच मार्चमध्ये पुन्हा येउन पूर्ण करण्यापेक्षा आजोबाच्या माथ्यावर बेसकॅंप स्थापून तिथूनच त्याचे नियंत्रण करायचे. सगळ्यांनाच हुरूप आला, काही झाले तरी आता मोहीम अर्धवट न सोडण्याचा संकल्प केला.
आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आम्ही योजना तयार केली. दहा दिवसांच्या धावपळीमुळे सर्व सहकारी अतिशय थकलेले होते. म्हणून सर्व सामान टेंपोमध्ये घालून आजोबाच्या माथ्यापासून जवळचे गाव कुमशेत येथे न्यायचे. (आजोबा पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे). गाडी सोबत दोन सहकारी जातील तर उरलेले सहकारी कात्राबाई व आजोबा यांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून चालत कुमशेत गावी पोहोचतील. तेथून सर्व सामान पाठीवर वाहून आजोबाच्या माथ्यावर स्थापन करणार असलेल्या नियोजीत बेसकॅंपवर न्यायचे. सध्याचा बेसकॅंप आजोबाच्या पायथ्याला होता, तर नियोजित बेसकॅंप थेट त्याच्या माथ्यावर होणार होता. पण रस्त्यावरून जावयाचे म्हटले तर अंतर १५० किमी होत. त्यापैकी राजूर ते कुमशेत खडीचा कच्चा रस्ता होता. परत यासाठी टेंपो मिळवणे हि अवघड होणार होत. आता हे सर्व करण्यासाठी आमच्यासमोर एकच व्यक्ती उभी राहिली. अशोक शिबे! कारण कित्येकदा अडी-अडचणीच्या वेळी ओबडधोबड कच्च्या घाट रस्त्याने स्वतःची जीप नेऊन त्याने आमचे सामान पोचवले होते, तेही विनामूल्य! केवळ त्याच्याच भरवशावर आम्ही हा निर्णय घेतला, पण त्यासाठी परत डोंबिवलीला जाणे क्रमप्राप्त होत.
सगळ्यांची जेवण झाल्यावर रात्री ११ वाजता किरण डोंबिवलीला जाण्यास निघाला तर सोबत दत्ता व बालाजी परत घरी जाण्यास निघाले. अशा रीतीने सुभाष पाठोपाठ मोहिमेचा दुसरा नेताही घरी निघाला. किरण व सहकारी १२ वाजता डेहणे गावात पोचले. तेथे रात्री मुक्कामाची बस हजर होतीच, तिच्यातच जाउन झोपलो मनात अनेक शंका-कुशंकाचे जाळे घेऊनच.
सकाळी बसने शहापूर-आसनगाव असा प्रवास करून किरण दहा वाजता डोंबिवलीला पोचला. प्रथम अशोकला फोन करून तो ओफिसमध्ये असल्याच पक्क केल आणि त्याला कुठेही जाऊ नकोस असा निरोप दिला. आंघोळ करून फ्रेश होताच दारात अशोक आणि अनिल दगडे दोघेही उभे! मित्राचे लग्न आटोपून अनिल परत आल्यावर तब्येत बिघडल्यामुळे परत मोहिमेमध्ये सामील होऊ शकला नव्हता. त्यातच अशोकला मी फोन करून बोलावल्याचे त्याला कळल्यावर काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाल्याने अनिलसुद्धा तातडीने अशोकबरोबर किरणला भेटायला आला. किरणकडून सर्व हकीकत कळल्यावर अशोक मदतीस लगेच तयार झाला. अशोकने महेंद्र साटमला हि घरी निरोप पाठवला होता. दरम्यान किरण परत घरी आल्याचे कळल्यावर सुभाष त्याला भेटायला आला आणि परत मोहिमेवर निघण्याच्या तयारीला लागला.
जुमार कशाला हवा
From Aajoba 1991
From Aajoba 1991
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Apr 2015 - 9:38 pm | यशोधरा
किती अडचणी..
18 Apr 2015 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा
हुश्श!