गोव्याची साद - भाग २

किणकिनाट's picture
किणकिनाट in भटकंती
16 Apr 2015 - 10:39 pm

आणि गोव्याची साद आली- भाग १

नमस्कार मि.पा. मंडळी,

भाग ४ जवळ जवळ तयार आहे पण या भागातली प्रकाशचित्र अजिबात चांगली दिसत नव्हती. आपल्यातल्या बर्याच जणांनी तसे सांगीतले आणि काही बहुमोल सूचनासुद्धा केल्या. त्याप्रमाणे आज तशी दुरुस्ती करून हा अपडेटेड धागा टाकतो आहे. आवडेल अशी आशा. भाग ४ लवकरच टाकेन.

भाग ३ या धग्याची लिंकही येथेच देऊन ठेवतो.
गोव्याची साद - भाग ३

गोव्याची साद - भाग २
(या भागात या ट्रीपची तसेच मागील काही ट्रीप्समधे घेतलेली प्रकाशचित्रे टाकली आहेत)

तर सकाळी सकाळी अंजुनाहून पाळोळेकडे प्रयाण केले आणि साधारण ११.०० च्या सुमारास पाळोळे गावात प्रवेश केला. मार्ग - अंजुना - पणजी - मडगाव - नवेली - कुंकळ्ळी - करमळघाट – चाररस्ता (काणकोण) -पाळोळे .

पाळोळे गावातून डावी उजवीकडे पाहताना मागच्या सर्वच ट्रीप्स आठवत होत्या आणि बीच रोड्कडे डावीकडे वळल्यावर तर मन उल्हासित झाले / भरून आले (Excitement) .

आता पाळोळेविषयी थोडेसे - १० एक वर्षांपूर्वी एक सदग्रुहस्थ आम्हाला बागाला भेटले होते. तेंव्हा आमच्यासाठी गोवा म्हणजे कळंगुट, बागा, पणजी, मडगाव, फारफार तर कोलवा आणि बाणवली पलिकडे नव्हते. या महाभागाने थोडी अतिशयोक्ती करतच सांगितले की - पाळोळे समुद्रकिनारा हाच गोव्यातला सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे. अतिशय संथ, स्थिर पाणी आणि लाटा जवळ जवळ नाहितच. खूप आत जाईपर्यंत सपाट तळ आणि कुठेही खोली वाढत नसल्याने तुम्ही नाकाशी पाणी येईपर्यंत एखाद्या तलावात असल्याप्रमाणे आत चालत जाऊ शकता. अतिशयोक्ती तर होतीच पण वर्णन वेडावणारे होते. लगेचच्या आमच्या पुढच्या ट्रीपला आम्ही पाळोळे समुद्रकिनारा गाठला आणि याच्या प्रेमातच पडलो. असे म्हणतात की फेब्रुवारीनंतर समुद्र थोडा थोडा अशांत होऊ लागतो आणि पाउस संपेपर्यंत खवळलेलाच असतो. तरीही ह्या मार्च अखेरिस दोन मोठ्या लाटांच्यामधे मी मनात ३०-३२ आकडे मोजले. पाण्याचे फुगवटे, अतिशय अशक्त लाट जी किनार्यापर्यंत पोचू पण शकत नव्हती हे येत होते पण लाट नाही. विचार करा की ऑक्टोबर नोव्हें डिसेंबर मधे समुद्र काय रुपडे दाखवत असेल| समुद्राची गाझ ज्याला म्हणतात ती पण थांबली आहे का असा कधीकधी भास होतो.

तर तेव्हा आम्ही इथे असताना एखादे भारतीय कुटुंब दिसले की खूष व्हायचो. एक्मेकांना सांगायचो - ती बघ हिंदुस्थानी लोक्स . संपुर्ण बीचवर परदेशी मंडळी विखुरलेली असायची. समुद्रस्नान, बीच शॅक्सवर एखादा ज्यूस्/बियर/कॉकटेल घेऊन दिवसभर सूर्यस्नान्/पुस्तक वाचन करताना दिसायची. दक्षिणेकडून आपली हिंदुस्थानी मंडळी कर्नाटक, ता.ना., केरळाकडून कारवारमार्गे यायचे आणि एक चांगला बीच आहे अशा ऐकीव माहितीवर २ कि.मि. आत शिरून बीचला पाय लाऊन जायचे कारण बहुतेकांची बुकिंग्ज कळंगुट, बागा, कोलवा , बाणवली इकडेच असायची.

आता परिस्थिती बदलली आहे. अनेक हिंदुस्थानी मंडळी मुद्दाम येथेच येतात, राहतात, आनंद करून जातात. पुस्तके वाचणारी परदेशी टूरिस्ट मंडळी ह्या वेळी तर दिसलीच नाही. अर्थात या कंपनीचा गोवा सिझन म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. तर असो.

हा आपला समुद्रकिनार्यांचा राजा पाळोळे समुद्रकिनारा

palolem 1

palolem 2

palolem 3

साधारण ३-३.५ कि.मी. पसारा असलेला हा समुद्रकिनारा. याच्या खाली (दक्षिणेकडे) आणि वर (उत्तरेकडे) लागून लागून काही समुदकिनारे आहेत. पण किनारा ते किनारा असे जाता येत नाही. डोंगररांगा, सामुद्रीखडकरांगा यांमुळे संपर्क तुटतो. काही बहाद्दर असेही जायचा प्रयत्न करतात. तर पाळोळेच्या दक्षिणेकडे लागून आहे कोळंब किनारा (साधारण अर्धाच कि.मी.) त्यानंतर पाटणे किनारा (साधारण १.५ कि.मी.). मग राजबाग बीच (१.५ ते २.० कि.मी. चा पसारा) हा राजबाग बीच द ललीत - गोल्फ क्लब आणि रिसॉर्ट्सला लगत आहे. असा समज आहे की हा त्यांचा प्रायव्हेट बीच आहे. पण यावर कोणालाही जाता येते. माझ्या माहितीप्रमाणे गोव्यामधे प्रायव्हेट बीच नाहीत. हे रिसोर्टवालेच तसा समज करून देतात. उगाच सेक्युरीटी वगैरे ठेऊन तसा आभास निर्माण करतात. आम्हि राजबाग, माजोर्डा, सिंकेरी (ताज अग्वादचा) किनार्यांवर तेथे रहात नसताही गेलो आहोत.
तर राजबाग बीचच्या खाली (दक्षिणेकडे) ताल्पोना, गालजीबाग आणि शेवटचा पोळेम किनारा. हे सर्व छोटे छोटे, अत्यंत कमी गर्दी असलेले किनारे आहेत. एखाद दोनच बीच शॅक्स / रेस्टॉरंट्स असतील. यापै़की पाटणे किनार्याचे वर्णन मि.पा.च्या सोत्रि नी दोन एक वर्षांपूर्वी इथेच केले आहे. आणि सोत्रि, तुम्ही रेकमेंड केलेल्या "सी व्ह्यू रेसॉर्ट" मधे आम्ही २ दिवस राहीलो बरं का | चांगले हॉटेल आणि किनारा आहे. पण चिरंजीवांच्या मते पाळोळे पेक्क्षा कमी हॅपनिंग असल्याने तिसर्या दिवशी पाळोळेला "सी गल" मधे शिफ्ट झालो होतो. अगोंडा किनार्याबद्दलही चिरंजीवांचे हेच मत पडले होते. असो.

पोळेम किनारा नंतर बहुतेक गोवा हद्द संपते आणि कर्नाटकची हद्द चालू होते. लगेचच कारवार येते. आणि महाराजा काय ते द्रुष्य.... अपार स्रुष्टीसौदर्य..... दक्षिणेकडून येताना कारवारमधे शिरले की पब्लीक बीच, नेव्हल बीच, नंतर काली नदीवरील पूल, तो संपता संपता एक चढाव, त्यानंतर छोटीशी खिड, त्यानंतर सुरू होणार्या डोंगररांगा आणि हिरवाई; डावीकडे लपलेल्या तरी डोंगररांगातून डोकावणार्या एका रिसॉर्ट्च्या छोट्या इमारती (हे एकच रिसॉर्ट आहे), आणि पुढे वळणावळणांचा हिरवाईत हरवणारा काळा डांबरी रस्ता; तो ही गोव्यात शिरणारा... अहा हा | विहंगम महाराजा........१०-१५ मिनीटांच्या प्रवासात भान हरपतेच. एन. एच. १७ वर असे अनेक डोळ्यांना सुखावणारे तुकडे आहेत. थोडे अजून खाली एका बाजूला नदी आणि दुसर्या बाजूला समुद्र घेऊन जाणारा २-३ कि.मी. चा पल्ला तर स्वप्नातीत आहे. तर चला आपण परत पाळोळेला जाऊ..

आपला पाळोळे बीच

palolem 4

या पाळोळेच्या उत्तर टोकला जवळच एक बेट आहे. ओहोटी असते तेव्हा याच्यावर चालत जाता येते. (अलिबागच्या कुलाबा किल्ल्यासारखेच - पण हे अंतर कुलाबा किल्ल्यापेक्षा फार कमी आहे)

बेट -

Bet

किनार्याच्या वर (उत्तरेकडे) आहे एक लपलेला, हरपलेला किनारा - बटरफ्लाय बीच. ईथे जायचा रस्ता पण शोधायलाच लागतो. अगदी अर्ध्या कि.मी. पेक्षा लहान गोलाकार किनारा. त्यानंतर सुप्रसिद्ध अगोंडा बीच. हा २ एक कि.मी. किंवा जास्तच पसरला आहे आणि नव्यानेच पाळोळे इतकाच प्रसिद्ध होऊ लागला आहे. सध्या विदेशी पर्यटकांनी उचललेला आहे. ह्याच्या आजूबाजूला खाण्याची मात्र चंगळ आहे. गोवन स्पेशल आणि जगभरातील सर्व प्रकार. ("पिण्याची चंगळ" शब्द मुद्दामच वापरला नाही कारण ती पूर्ण गोव्यातच आहे). अगोंडाच्या उत्तरेला खोला (कोला) नावाचा छोटासा आणि परत एकदा जवळ जवळ निर्जन किनारा. ईथे जायचा रस्ता पण शोधायलाच लागतो. या वेळेस एक दोन पाट्या दिसल्या खोला बीच कडे म्हणून. चांगले आहे.

या किनार्यानंतर बरेच अंतर समुद्रकिनारे नाहीत. एकदम लागतो एक किल्ला. समुद्राला खेटून असलेला. काबो डी रामा किल्ला. त्याच्या पलिकडे काबो डी रामा नावाचा छोटासा किनारा. यानंतर मात्र काही अंतर अथांग सागर आहे. त्यच्या पलिकडचे जमिनीचे टोक म्हणजे मोबोर किनारा. ईथे येण्यासाठी मडगाववरून कोलवा - बाणवली - व्हार्का - केवलोसीम - मोबोर असा दूसरा रस्ता घ्यावा लागतो. (वास्को ते बोगमलो) - (मोबोर) - (आगोंडा.पाळोळे.पाटणे) ही दक्षिण गोव्याची तिरप्या त्रिशूळाची तीन टोकेच जणू. ह्याच मोबोर किनार्यानजिक आहेत द लीला पॅलेस, हॉलिडे ईन, हाथी महल सारखी नावाजलेली पंचतारांकित रेसॉर्ट्स. ईथेच आहे नामांकित "द फिशरमन्स व्हार्फ" साल नदी जिथे समुद्राला भेटते त्या ठिकाणी आहे हे व्हार्फ. आमच्या २ एक वर्षांपूर्वीच्या ट्रीपच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या वेळची प्रकाशचित्रे आहेतच. ही घ्या.

साल नदीकिनारी वसलेले द फिशरमन्स व्हार्फ

Wharf

wharf 5

wharf 2

ड्राय मार्टीनी - स्टॉबेरी आणि लाँग आयलंड टी

wharf 3

किंगफीश करी आणि किंगफिश कॅफ्रिअल मसाला

wharf 5

wharf 6

श्रिंप कॉकटेल

wharf 7

हां बास आता. चला परत आपल्या बीचवर.

rocket

palolem 7

पाळोळेच्या उत्तरेकडचा फेरफटका प्रकाशचित्रांसह पुढच्या भागात देतो.

तर पाळोळेला आलो आणि आपल्या घरचेच पार्किंग असल्यागत गाडी सी गल च्या पार्किंगमधे लावली. पहिल्या ट्रीपपासून आम्ही राहतो ते सीगल गेस्ट हाऊस. अतिशय स्वच्छ, अॅटॅच्ड बाथ, ए सी.-नॉन ए.सी रूम्स, महाग नसलेले हॉटेल, खुल्या दिलाचा मालक, सहकार्यशील स्टाफ , किनार्याच्या मेन एंट्रि पासुन ५० मी. च्या आत, ३ कारसाठी पार्किंगची सोय , पहिल्या मजल्यावरच्या रूम्ससाठी एक सलग व्हरांडा . त्यात टाकलेल्या खुर्च्या, टि-पॉय, बाजूला रॅक्समधे असंख्य पुस्तके - अनेक प्रकार आणि वाचण्यासाठी सर्वांना खुली. और क्या चाहिये ?

Sea gull

हॉटेलात चेक इन करून सरळ समुद्रकिनारा. २ तास मनसोक्त समुद्रस्नान आणि पोहोणे केले. गेल्या ट्रीपमधे आम्ही हे पण केले होते.

कयाकिंग

kayak

हे नव्हते केले करण परवानगीच नहिये. पन उत्तरेकडच्या किनार्यांवर कैकदा केलेय.
पॅराग्लाईडींग / पॅरासेलींग

para g

आता पोटात आग पडली होती. तरिही स्वच्छ आंघोळी आवश्यक होत्या. भराभरा चिकटलेल्या रेतीपासून सुटका करून घेऊन आवरले आणि जेवायला निघालो. बीच शॅक्सचा पर्याय होताच , पण तो रात्री जास्त योग्य वाटतो, दिवसा थोडे ड्राइव करायला हरकत नाही म्हणून परत चार रस्ता पर्यंत येऊन उलटे मडगावच्या दिशेने ३ एक कि.मी. गेलो आणि करमळघाट रेस्टॉरंटला विसावलो. ह्या रेस्टॉरंटचा शोध आम्ही सर्वात पहिल्यांदा कारने आलो होतो तेव्हा लावला होता. बीचवर पूर्ण जेवण, व्हेज-नॉनव्हेज-फिश थाळी बहुतेक ठिकाणी मिळत नाहित. त्यासाठी हा जवळचा पर्याय आहे. अजून एक मँगलोर रेस्टॉरंट म्हणून चार रस्त्यालाच आहे. (बीचपासून २.५ कि.मी.) ते पण चांगलेच आहे.

तर करमळघाट रेस्टॉरंटचे जेवण

विसण (सुरमई) थाळी

fish thali

व्हेज थाळी

veg thali

प्रॉन्स रवा फ्राय

prawns

संपवलेला लेपो फ्राय

lepo

(बहुतेक) माशांवरच पोसलेले मांजराचे पिल्लू

cat

पोटभर गोवा स्पेशल जेवण करून हॉटेलात येऊन आराम केला. संध्याकाळ परत बीचवर.

eve

eve 2

eve 3

eve 5

रात्रीचे जेवण मँगलोर रेस्टॉरंट चार रस्ता
सूप्स, बांगडा रशाड मसाला, विसण (किंगफिश) फ्राय, सुंगठं मसाला फ्राय, व्हेज गोबी मांचुरियन, दाल फ्राय, फिश करी आणि पोळ्या, भात, सर्व प्रकारातील पेयं. नंतर येथे वर्ल्डफेमस असलेले हंग्या आईस्क्रीमचे गडबडचे कप्स. वा..... मजा आ गया.
फोटो मात्र घेतले नाहीत, खूप भुकावलो होतो का काय पण राहुनच गेलं

रात्री समुद्रकिनार्यावर दीड एक तास बसलो, चाललो, वाळूचे किल्ले केले. आज येथे दारूकाम खूप होताना दिसत होते. आकाशात - शोभेची दारू सुद्धा. काहिही विषेश नव्हते, खास दिवस पण नसावा. चायनीज कंदीलपण आकाशात सोडले जात होते. मजा आली.

night 1

night 2

अगदी जांभया यायला लागल्या आणि मग दिवस संपवला (रात्री १२.००)

क्रमशः

गोव्याची साद - भाग ३

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2015 - 4:41 am | श्रीरंग_जोशी

दोन्ही भाग वाचून काढले.

लेखनशैली आवडली.

शक्य असल्यास गोव्याच्या नकाशावर तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांच्या खुणा करून तो इथे डकवा.

एस's picture

26 Apr 2015 - 2:42 pm | एस

असेच म्हणतो.

किणकिनाट's picture

27 Apr 2015 - 9:37 pm | किणकिनाट

नकाशा डकवला. तो स्पष्ट दिसत नाहिये. माझ्या फोटोंचे पण असेच होतेय. खरे फोटो खूप स्पष्ट आणि चांगले आहेत. पण येथे ब्लर / अस्पष्ट दिसतात. कोणी कारण सांगू शकेल का? दुरुस्त करता येतील का?

सध्या नकाशाच्या फोटोची ही लिंक घ्या.

https://c2.staticflickr.com/8/7682/17290634535_eed158975b_m.jpg

नकाशा

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 9:44 pm | श्रीरंग_जोशी

खूपच लहान आहे चित्राचे क्षेत्रफळ. तसेच अर्थ मोड ऐवजी मॅप मोड वापरल्यास उत्तम.

इथे तेच चित्र ताणून प्रकाशित करतोय.
Goa Trip

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2015 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

+२

तुमच्या सहलीच्या मार्गासकट मोठा नकाशा नक्की टाका, म्हणजे तुमचा माहितीपूर्ण लेख इतरांना खूपच उपयोगी होईल.

तुम्ही सद्या टाकलेली चित्रे छोटी आणि लो रिझॉल्युशनमध्ये आहेत. बहुतेक ही मूळ चित्रे नसून त्यांची थंबनेल्स आहेत.

चित्रे साठवलेल्या वेबसाईट्वरून लिंक्स कॉपी करताना चित्र पूर्ण आकाराचे असताना करावे म्हणजे ते पूर्ण रिझोल्युशनसह येते.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

नेत्रसुखद धूम धूम धम्माल !

हममममममम एवढेच म्हणू शकतो.ट्रिपचे वर्णन करावे तर यांनीच.

खंडेराव's picture

17 Apr 2015 - 9:50 am | खंडेराव

कधी गेलो नाही पाळोलेला ( हेच पालोलीम ना ) ..या वेळेस नक्की, सीगलही छान दिसतेय..

किणकिनाट's picture

17 Apr 2015 - 12:42 pm | किणकिनाट

रंगाशेठ, अत्रुप्त, श्री. कंजूस प्रतिसादांसाठी धन्यवाद.

ट्रिपचे वर्णन करावे तर यांनीच. श्री. कंजूस, लाजवताय. अहो पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न केलाय.

खंडेरावजी जरूर जा. हो. हेच पालोलीम/ पालोलेम (Palolem).

नूतन सावंत's picture

25 Apr 2015 - 10:35 pm | नूतन सावंत

पाळोळे बीचबद्दल पहिल्यांदाच माहिती मिळाली.आता गेलो कि त्याच्यासाठी २/३दिवस नक्की ठेवणार.वर्णानातून राहण्याची आणि जेवणाची माहिती छान.पुभाप्र.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Apr 2015 - 1:10 am | निनाद मुक्काम प...

येत्या डिसेंबरला गोव्यात दोन आठवडे जाण्याचा बेत आहे.
पिक सिझन आहे पण आम्हास सुट्टी ह्याच महिन्यात मिळत आहे , दर वेळच्या भारत भेटीत आम्ही एका राज्यास भेट देऊन मी न पाहिलेला भारत पाहून घेतो .मात्र सध्या आमची कन्या आधीच वर्षाची असल्याने जास्त धावपळ करून धावता दौरा करून गोवा भ्रमंती सोयीस्कर ठरणार नाही व भटकंतीचा लुफत घेता येणार नाही म्हणून समुद्र किनार्यालगत
एखादे हॉटेल अथवा अन्य कोणताही स्वस्त व मस्त पर्याय शोधून बीच वर वेळ घालवणे व रुचकर देशी व परदेशी खानपान सेवेचा लाभ घ्यायचा मनसुबा आहे.
सल्ला हवा आहे. एखादे ओळखीचे हॉटेल व पिक सिझन मधील रेट्स व ह्य ह्या सिझन मध्ये कराव्यात आणि करू नयेत अश्या गोष्टी जरूर सुचवाव्यात.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2015 - 2:17 pm | कानडाऊ योगेशु

मी ही मागच्या महिन्यात दोन दिवसांच्या गोवा ट्रीपवर गेलो होतो. जाण्यापूर्वी मिपाकरांकडुन जमेल तितकी माहीती मिळवली होती.
खालील लिंक तुम्हाला उपयुक्त ठरु शकेल.
http://www.misalpav.com/node/30598

निनाद, सावकाशीने लिहितो. अजून बराच वेळ आहे तुम्हाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2015 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता कधीतरी पाळोळे जाणं आलं. फोटो स्पष्ट का दिसत नै ये... ?
नकाशा टाका जरा सर्वांना शोधायला सोपं जाईल.
-दिलीप बिरुटे

दा विन्ची's picture

27 Apr 2015 - 10:55 pm | दा विन्ची

अतिशय सुरेख आणि सार्थ वर्णन आहे. मी नोकरी निमित्ताने १९९८ ते २००२ अशी ४ वर्षे गोव्यात होतो. मी तर म्हणेन कि ज्याने पालोलम बीच पहिला नाही त्याने गोवाच पहिला नाही . राहता राहिला मार्ग नकश. खरतर फारच सोप आहे . मी अस समजून चालतो कि हि सगळी हौशी मंडळी एकतर मुंबई , पुणे किंवा कोल्हापूर किंवा बेळगाव मार्गे येणार अस्तिल.
१) मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर मार्गे येणाऱ्यानी आधी म्हापसा , पणजी मार्गे मडगाव पर्यंत यावे . मडगाव रेल्वे स्टेशन पासून कारवार रस्ता पकडावा . साधारण पाने तीस km वर काणकोण लागेल. तिथेच पालोलम आहे.
२)जर आपण बेळगाव मार्गे येणार असाल तर रामनगर क्रॉस (खानापूरच्या) पुढे सरळ गोव्याकडे न जाता कारवार रस्ता पकडावा .

अजून हौशी लोक थोडेसे पुढे जाऊन गोकर्ण महाबळेश्वर लाही एक दिवस भेट देवू शकतात .

सोबत मेहबूबा, दोन तास मनसोक्त पाण्यात डुंबणे आणि गार गार बिअर यासारखे सुख नाही . (स्वानुभव)

हे हि सांगून टाकतो कि फर्लांगभर पाण्यात गेलात (हातात बिअर घेवून) तरी फक्त कंबरभर आणि तेही शांत पांनी असते .

बाल गोपालासाठी सुद्धा अतिशय सेफ किनारा .

आता वाट काय बगताय थेट palnning करा आणि नंतर फोटू डकवा

दा विन्ची's picture

27 Apr 2015 - 10:59 pm | दा विन्ची

आन हेच्याबी म्होर सांगतु, पालोलम बीच रेझोर्ट वर ताडीचे झाड बुक करता येत होते. तुमच्या झाडाची जेवढी निघेल तेवढी तुमाला . दोन दिवस पाणी सुद्धा न पिता मस्त मजा करता येते.

अतिशय सुंदर वर्णन .. आवडले..
फोटो ब्लर का येतायेत ते पाहुन पुन्हा नव्याने फोटो येवुद्या

गोव्याला मागच्याव्र्षीच पहिली भेट दिली ती ही नॉर्थ ला..वाचन खुण साठवलेली आहे, लवकरच जाईन इकडे.. धन्यवाद.

किणकिनाट's picture

30 Jun 2015 - 11:25 pm | किणकिनाट

फोटो चांगले दिसतील अशा दुरुस्त्या करून अपडेटेड धागा टाकला आहे. आपणा सर्वांना आवडेल अशी आशा. भाग ४ ही लवकरच टाकतो.