नारळी अंडा करी
फार ललित लिहिता येत नाही, थेट मुद्द्याचे लिहितो.
यातला मसाला फ़ळभाजी साठी सुद्धा वापरता येइल. विशेषत: बटाटा.
साहित्य:
०१. १ मध्यम बारिक चिरलेला कान्दा
०२. १ टोमॅटोचे चौकोनी आकारात कापलेले तुकडे
०३. १/२ वाटी मटार
०४. २ वाटी नारळाचे दूध
०५. १ टे.स्पून किसलेला लसुण (५-७ पाकळ्या पुरतात)
०६. १ टे.स्पून किसलेले आले
०७. १ टे.स्पून धणे पावडर
०८. १ टे.स्पून जिरे पावडर
०९. १ टे.स्पून तिखट
१०. १ टे.स्पून हळद
११. १-२ बारिक कापलेल्या मिरच्या
१२. सोयीनुसार तेल (मी १/२ वाटी तेल वापरले होते)
१३. १ टे.स्पून मीठ
१४. १/२ टे. स्पून हिंग
१५. १ टे.स्पून मोहरी
१६. १ टे.स्पून गरम मसाला
१७. ४ उकडलेली अंडी
१८. १ कच्चे अंडे
हवे असल्यास...
१ टे.स्पून दालचिनी पावडर
१ टे.स्पून वेलची पावडर
कॄती:
१. अंडी उकडुन घ्या.
फ़ोडणी:
२. एका पसरट भांड्यात तेल तापवायला ठेवा.
३. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका
४. मोहरी तडतडायला लागल्यावर आच थोडी कमी करुन त्यात हिंग घाला.
मसाला:
५. गरम तेलात कांदा टाकुन सोनेरी रंगावर परता.
६. कांदा होत आला असता त्यात मिरची, लसुण, आले टाका.
७. एखाद मिनीट हे सगळे मिश्रण परतुन घ्या.
८. आता त्यात हळद, तिखट, धणे पावडर,जिरे पावडर (हवे असल्यास...दालचिनी पावडर आणि वेलची पावडर) टाकुन एखाद मिनीट परता.
९. १ कच्चे अंडे ह्या मसाल्यात टाकुन परता.
करी:
१०. उकडलेली अंडी मसाल्यात टाका
११. सर्व बाजुंनी मसाला लागेल इतपत अंडी परता .
१२. नारळाचे दूध टाकुन उकळि येउ द्यात.
१३. उकळि आल्यावर गरम मसाला घालुन ५ मिनीटे मंद आचेवर वाफ़वा.
नारळाचे दूध:
१. बाजारात विकत मिळते.
अथवा
१. २ वाटी पाणी कोमट (गार आणि गरम याच्या मधली पायरी) करा.
२. त्यात ४ चमचे ओल्या खोबऱ्याचा किस टाका.
३. हे मिश्रण मिक्सर मधुन ३-४ मिनीटे फ़िरवुन घ्या
४. मिक्सर मधुन काढुन मिश्रण गाळुन घ्या.
अंडी उकडणे:
१. अंडी बुडतील इतके पाणी एका भांड्यात घ्या.
२. त्यात अंडी टाका. आणि मध्यम आचेवर अंडी उकडा. (एकदम गरम आचेवर भांडे ठेवले तर पाणी लवकर उकळुन अंडी फ़ुटु शकतात)
३. पाणी उकळले की गॅस बंद करुन लगेच झाकण घाला.
४. पाणी गार झाल्यावर अंडी सोलुन घ्या.
(टिप: अंडी उकडताना पाण्यात जर चिमुटभर मीठ घातले तर अंडी सोलणे सोपे होते.)
पर्याय:
१. अंडा करी करताना त्यात कच्चे अंडे फेटुन घालता येते
२. याच मसाल्यात बटाटयाची भाजी करता येते.
प्रतिक्रिया
15 Apr 2015 - 12:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
15 Apr 2015 - 12:47 pm | हरकाम्या
अतिशय उत्तम पण आपण फोटो टाकलेले नाहीत
15 Apr 2015 - 2:12 pm | कपिलमुनी
15 Apr 2015 - 2:52 pm | खंडेराव
कच्चे अंडे टाकायची पध्द्द्त आवडली. आज संध्याकाळची सोय झाली :-)
17 Apr 2015 - 1:35 am | अनन्त अवधुत
फोटो टाकल्याबद्दल
15 Apr 2015 - 2:24 pm | पलाश
करी छान दिसते आहे. माहिती पण अगदी व्यवस्थित मुद्देसूद दिली आहे. पाककृती आवडली.
15 Apr 2015 - 2:39 pm | दिपक.कुवेत
नारळाच्या दुधातील कोणताहि पदार्थ आवडतो.
अवांतरः अंडि उकडायची अजून एक पद्धतः अंडि पुरेश्या पाण्यात घालून कुकरला एक शीटी काढणे. वेळ आणि गॅस दोन्हि वाचतात. घाबरु नका.....अजिबात ब्लास्ट होत नाहि आणि कुकरहि खराब होत नाहि.
वरील पद्धतीत फार वेळ जातो आणि पाणी सारखं मॉनीटर करावं लागतं.
15 Apr 2015 - 5:02 pm | कपिलमुनी
ओव्हनमधला ब्लास्ट जबर्या होता .. त्या धसक्याने अजून दुसरी पद्धत वापरली नाही
15 Apr 2015 - 5:07 pm | असंका
:-))
याला काही मिपावर संदर्भ वगैरे आहे का? अथवा इस्कटून सांगावे ही विनंती...
15 Apr 2015 - 5:12 pm | सूड
+१
15 Apr 2015 - 5:14 pm | कपिलमुनी
या व्हिडिओ मधे दाखवल्याप्रमाणे ब्लास्ट होतो .
५-६ अंडी एकदम असतील तर झाकण उघडून घरभर अंडी स्प्रे फवारला जातो
15 Apr 2015 - 6:37 pm | दिपक.कुवेत
मी नेहमी कुकर मधेच अंडि उकडतो. काळजी करु नका. एका शीटीत (कुकरच्या) मस्त अंडि उकडतात शीवाय ती फुटुन बाहेर येत नाहित. बाहेर जास्त उकळली तर हमखास बल्क बाहेर येतो.
19 Apr 2015 - 4:31 pm | सुहास झेले
यप्प.. मी पण हीच पद्धत वापरतो :)
19 Apr 2015 - 7:31 pm | आनंदी गोपाळ
पुरेसे म्हणजे किती?
३ अंडी उकडायला ठेवली. कुकर उघडल्यावर तिन्ही अंडी फुटलेली होती. सकाळीसकाळी कपालबडवती योग झाला ;)
20 Apr 2015 - 2:48 pm | सतीश कुडतरकर
तीन तिघाडा.
पुढच्या वेळेस चार अंडी घ्या :-)
12 Jun 2015 - 2:17 am | अनन्त अवधुत
मी भांड्यामध्ये अंडी उकडताना ज्या प्रमाणात पाणी घेतो , त्याच प्रमाणात कुकर मध्ये पाणी टाकतो.अंडी पाण्यात पूर्ण बुडून वर थोडे पाणी असेल इतके.
17 Apr 2015 - 1:36 am | अनन्त अवधुत
प्रयत्न करून पाहतो
12 Jun 2015 - 2:10 am | अनन्त अवधुत
या पद्धतीने अंडी उकडल्या जातात. सोपी पद्धत आहे.
15 Apr 2015 - 5:30 pm | स्पंदना
वेगळी पद्धत करी करायची.
15 Apr 2015 - 9:35 pm | सानिकास्वप्निल
पाककृती आवडली.
16 Apr 2015 - 6:48 pm | स्वाती२
वेगळी पाकृ आवडली.
17 Apr 2015 - 1:34 am | अनन्त अवधुत
फोटो टाकण्याचे मी बरेच प्रयत्न केलेत पण काही जमले नाही.
19 Apr 2015 - 11:32 am | आनंदी गोपाळ
टमाटे अन मटारचे काय व कसे करायचे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
19 Apr 2015 - 4:31 pm | सुहास झेले
मस्तच :)
19 Apr 2015 - 5:21 pm | पैसा
वेगळी पद्धत आवडली. मी कधी कधी सगळीच अंडी कच्ची फोडून अलगद उकळत आलेल्या मसाल्यात टाकते. अंडी जराशी पसरतात. पण शिजल्यावर मगच रस्सा ढवळायचा. असा रस्सा जास्त दाट होतो. शिवाय अंडे बॉम्ब होण्याचा प्रश्नच नाही.
20 Apr 2015 - 4:08 pm | सस्नेह
>>??
बाबौ ! इतकी तर खिरीत घालावी लागते !
बाकी, फोटो एकदम टेम्प्टिंग आहे !
20 Apr 2015 - 6:45 pm | नगरीनिरंजन
टी स्पून म्हणायचं असेल भौतेक.
बाकी:
पाकृ चांगली आहे.
अंडी न घालता कशी करायची?
टोमॅटो-मटारचं सॅलड करायचं का?
12 Jun 2015 - 2:20 am | अनन्त अवधुत
तुम्ही सगळे सुगरण आहात मला एक टीस्पून म्हणायचे होते. स्नेहांकिता, चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद
2 Jun 2015 - 6:56 pm | सागर सुभाष राणे
मोठ्या आचेवर जोपर्यंत पाण्याला उकळी येते नाही तो पर्यंत अंड उकाडायचे. उकळी आली कि गॅस बंद करा.
त्यानंतर घड्याळ लावून ६ मिनटांनी अंड फोडून बघा.