मित्रहो,
मिसळपाव हे संकेतस्थळ व इथले सदस्य यांचा मी बराच ऋणी आहे. एका विशेष अडचणीच्या काळात काहीही ओळखपाळख नसतांना मिपाकरांनी जमेल ती मदत केली. त्याचा मला खूप फायदा झाला. त्याचे परिणाम पुर्ण व्हायला अजून ३-४ महिने लागणार आहेत. त्यामुळे त्याबद्दलचा सविस्तर धन्यवादाचा लेख मी अजून लिहिला नाही. माझ्या मते कार्यक्रम संपल्यावर आभारप्रदर्शन बरं असतं.
आज मला एका वेगळ्या बाबतीत मदत हवी आहे. मिपाकर योग्य त्या प्रकारे मदत करतील अशी खात्री आहे.
भरपूर विचारविनिमय, अभ्यासांती आम्ही (मी+बायको) एक नवीन व्यवसाय सुरु करायचे ठरवले आहे. तयार मसाल्यांचा उद्योग. यात नविन काहीच नाही पण अभ्यासांती असे लक्षात आले की बाजारात मिळणार्या तयार मसाल्यांमधे दर्जा नाही. त्यात बरेच फीलर्स असतात. चव येत नाही. अगदी मिरची, हळद, धणे यांच्या पावडरींमधे फीलर्स वापरून वजन व आकारमान वाढवले जाते. त्यामुळे कदाचित आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. यावर उपाय म्हणजे घरीच मसाले तयार करणे. आजकालच्या जीवनशैलीमुळे बहुसंख्य गृहिणींना हे घरी शक्य होत नाही. बरेचदा मसाल्याची योग्य पाककृतीही मिळत नाही. मिळाली तरी त्याच्यावर प्रभुत्व यायला वेळ जातो.
या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आम्ही घरगुती रोजच्या जेवणासाठी लागणारा मसाला तयार करून विकण्याचे ठरवले आहे. त्याचे नाव 'मसाला सुप्रीम' असे ठेवायचे ठरले आहे. याच 'मसाला सुप्रीम'च्या उपभोक्ता परिक्षणासाठी स्वयंसेवक हवे आहेत. ज्या सदस्यास या उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी मला व्य नि करून कळवावे. त्यांच्यासाठी २० ग्रॅम मसाला उपयोग व परिक्षणासाठी कुरीअरने पाठवला जाईल. यासोबत मसाला वापरण्यासंबंधी सूचना व फीडबॅक-प्रश्नतालिका देण्यात येइल. सहभागी सदस्यांनी रोजच्या जेवणात तसेच विविध व्यंजनांमधे वापरून या मसाल्याची उपयुक्तता, दर्जा, चव, सुगंध इत्यादी मानकांवर परिक्षण करावे अशी अपेक्षा आहे. हे परिक्षण, फीडबॅक व काही विशेष सूचना असतील तर जो ईमेल-आयडी देण्यात येइल त्यावर पाठवावे.
बर्याच शेजारी-ओळखीतल्या लोकांना हा मसाला आवडला आहे. व्यावसायिक पातळीवर उत्पादन व विक्री केल्यास चांगला प्रतिसाद लाभण्याचे चिन्ह दिसत आहे. तरी पुढचे पाऊल टाकण्यापुर्वी या उत्पादनावर तटस्थ व्यक्ती म्हणून मिपाकर सदस्यांचे मत मला आवश्यक वाटत आहे. त्यामुळे मदतीचे आवाहन करत आहे.
मसाला सुप्रीम बद्दल थोडे:
१. एकविस उच्चप्रतीच्या मसाल्यांचे योग्य मिश्रण. दर्जाच्या बाबतीत कुठेच तडजोड नाही.
२. प्रत्येक भाजी, डाळी, फळे यांची स्वतःची विशेष चव कायम ठेवतो.
३. रोजच्या स्वयंपाकात कोणत्याही भाजीत, आमटीत, भाताच्या प्रकारात वापरू शकता.
४. बाजारात मिळणार्या इतर मसाल्यांच्या तुलनेत उत्तम चव व सुगंध.
५. नेहमीच्या मसाल्यांपेक्षा कमी लागतो. जेवण जास्त मसालेदार होत नाही जे आरोग्यास चांगले आहे.
६. पावभाजी, छोले, बिर्यानी, राजमा, पुलाव यांच्यासाठीच्या मसाल्यांसोबत १ चमच्यास पाव चमचा प्रमाण वापरल्यास चव व सुगंधात चांगलाच फरक पडतो.
७. चव, रंग, सुगंध आणि दर्जा कायम ठेवत किमान चार वर्षे शेल्फ-लाईफ. फ्रीजमधे ठेवायची गरज नाही. हवाबंद डबा आवश्यक.
वरील पॉईंट्स जाहिरातीसारखे वाटत असले तरी मी त्यांचा रोज अनुभव घेतो. याच मसाल्यात घरी रोज केली जाणारी वेगवेगळ्या पदार्थांची भाजी वेगवेगळी चव देते. तसेच प्रत्येकाच्या हाताची चव कायम ठेवत व्यंजन मस्तच होते हा नेहमीचा अनुभव.
आता दुसरा भागः
या व्यवसायावर मी बरेच संशोधन केले आहे. बाजाराची स्थिती, सरकारी योजना, नियम व कायदे वैगेरे. पण एकट्याने मिळवलेले ज्ञान/माहिती कधीही कमीच असते किंवा घातक असू शकते. कल्पना सुचल्याच्या आनंदात महत्त्वपूर्ण अशा काही बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकते असे मला वाटते. तेव्हा निर्मिती, वितरण, मार्केटींग बद्दल कुणालाही काही माहिती, अनुभव असल्यास जरुर मार्गदर्शन करा. निदान एक उपभोक्ता म्हणून अशा एखाद्या उत्पादनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि अशा उत्पादनास तुम्ही कसा प्रतिसाद द्याल ते जरी सांगितले तरी भरपूर मदत होईल. तसेच बाजारात मिळणारे खुले मसाले, ब्रँडेड मसाले यांचे काही चांगले-वाईट अनुभव असतील तर तेही सांगावे.
धन्यवाद!
संपादकांस नम्र विनंती: मिपाधोरणानुसार हा धागा जाहिरात वाटत असल्यास व तसा काही आक्षेप असल्यास उडवावा.
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी
या निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!!
भारतात राहत नसल्याने या परिक्षणात सहभागी होऊ शकत नाही. पण काही कल्पना सुचल्यास अवश्य कळवीन.
14 Apr 2015 - 8:44 pm | एस
अभिनंदन आणि शुभेच्छा!
15 Apr 2015 - 10:48 am | जेपी
+1
अभिनंदन आणी शुभेच्छा..
14 Apr 2015 - 8:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करा. माझा नंबर व्यनि करतोय. उद्या बोलीन तुमच्याशी.
डांगे गृहोद्योगाला शुभेच्छा!!!
14 Apr 2015 - 9:58 pm | संदीप डांगे
धन्यवाद कप्तानसाहेब, उद्या बोलु.
14 Apr 2015 - 9:09 pm | आदूबाळ
फीडबॅक प्रश्नतालिकेतून मिळणार्या उत्तरांचं परीक्षण तुम्ही नीट करालच, पण माझे आपले चार आणे.
एकाद्या पदार्थाची चव हा अत्यंत वैयक्तिक प्रकार आहे. तरी लिंग, वय, वसतीस्थान, इ. वर विशिष्ट चव अॅप्रिशिएट होणं अवलंबून असतं. उदा. कांदा लसूण मसाला कशी चव देतो आहे हे स्पंदनाताई जास्त विचक्षणपणे सांगू शकतील. वाटण/हिरव्या मसाल्यासाठी पैसाताई. पावभाजी मसाल्यासाठी आयुष्यभर एकाच दुकानातली/शहरातली पावभाजी खाल्लेल्या माणसापेक्षा दहा ठिकाणी तोंडं मारून आलेला माणूस योग्य. वगैरे.
तर मुद्दा असा आहे, की फीडबॅकमध्ये आलेली उत्तरं आणि फीडबॅक देणार्या व्यक्तीचं लिंग, वय, वसतीस्थान यामध्ये संबंध (कोरिलेशन) असेल. तो लक्षात घेऊनच फीडबॅकचा अर्थ लावणं योग्य.
14 Apr 2015 - 9:59 pm | संदीप डांगे
तुमच्या चार आण्यांसाठी धन्यवाद. मुद्दे खरंच विचार करण्यासारखे आहेत.
थोडा खुलासा करतो.
रोजच्या घरगुती स्वयंपाकासाठी हा मसाला असल्याने परिक्षणाचा उद्देश 'वैयक्तिक निकषांवर हे उत्पादन काय परिणाम देतं' हा आहे. म्हणजे रोज नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत असतांना फक्त नेहमीच्या मसाल्याऐवजी हा मसाला वापरून काय परिणाम व्यक्तिगत स्तरावर अनुभवास येतात. त्याचेच संकलन करायचे आहे. परिक्षक हा स्वयंपाकतज्ञच असावा असा उद्देश नसून सर्वसामान्यपणे कुणीही ह्या उपक्रमात भाग घ्यावा अशी संकल्पना आहे. तसे नसते तर मी निवडून मिपाकर मास्टर-शेफ्सनाच आमंत्रण धाडले असते. त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे.
14 Apr 2015 - 10:07 pm | आदूबाळ
छेछे. परीक्षक स्वयंपाकतज्ञ हवा असं मी कुठे म्हणतोय. मी म्हणतोय परीक्षक "चवतज्ञ" हवा. आणि देशकालपरिस्थितीप्रमाणे ते बदलतं.
14 Apr 2015 - 10:17 pm | संदीप डांगे
ओके. गॉट इट. :-)
14 Apr 2015 - 10:25 pm | खंडेराव
आणि आता इतर ( Customer Insights :-) )
1) बाजारातील एकाही मसाले/ मिक्स विषयी फार खुश नाही.
२) शक्यतो घरुन मसाले आणतो ( तिथे ते सर्व आख्खे विकत घेउन दळलेले असतात )
३) जेव्हा केव्हा कुर्ग, केरळला जाणे होते तिथुन आख्खे मसाले आणतो. गेली ३ वर्षे असेच चालवले आहे. हळद अशीच वाइ सांगली हुन.
४) सर्व प्रमुख ब्रॅन्ड चे मसाले ( एवरेस्ट, एमडीएच, रामदेव वगैरे ) जवळजवळ एकाच किमतीला असतात.
५) तुम्ही म्हणाले तसे, फिलर्स फारच वापरतात. हिन्ग वगैरे फारच.
चांगल्या दर्जाचा मसाला बाजारात नक्की जागा तयार करेल. जळगावचा वासु मसाला आम्ही कसाही मागवायचो.
कस्ट्मर सर्वेचा उद्योग भरपुर केला आहे. त्याब्द्दल थोडेसे -
१) कोणताही प्रॉडक्ट आणताना ३ प्रकारच्या गरजांचा विचार करा. बेसिक, परफोर्मन्स आणि डिलाइट.
http://en.wikipedia.org/wiki/Kano_model
२) कस्टमर फिडबॅक साठी ( कुरियर वाले ) एक मस्त गुगल फॉर्म तयार करा. अनालिसिसचे काम झटक्यात होइल. काही मदत लागल्यास सांगा.
हॉटेल्स हा एक ग्राहक होउ शकेल का?
15 Apr 2015 - 10:08 am | संदीप डांगे
अतिशय उत्तम प्रतिसाद, धन्यवाद!
तुम्ही व्यक्त केलेले कस्टमर इन्साईट्स अतिशय आवश्यक होते. किंमतीवर आमचे संशोधन अजून सुरू आहे. ब्रँडेड मसाल्यांबद्दल तुमचं मत अगदी खरं आहे.
सर्वे आणि फीडबॅक फॉर्म च्या माहितीसाठी मदत लागेलच. तुम्ही दिलेली लिंकही झकास आहे. बरीच नवीन माहिती मिळाली.
हॉटेल्सना संपर्क करायचा अजून विचार केला नाही. पण तीही चौकशी करायची आहेच.
14 Apr 2015 - 11:02 pm | निशदे
मनापासून अभिनंदन..... लवकरच तुमचे मसाले आम्हाला इथेही खायला मिळोत अशाच शुभेच्छा देतो.
14 Apr 2015 - 11:16 pm | कपिलमुनी
जागू यांना सुद्धा विचारा . त्या एक्सपर्ट आहेत.
14 Apr 2015 - 11:39 pm | सौन्दर्य
नवीन व्यवसायासाठी अनेकोत्तम शुभेच्छा. तुमच्या परीक्षणात भाग घ्यायला आवडेल पण भारतात राहत नसल्यामुळे भाग घेऊ शकत नाही. ग्राहक ह्या दृष्टीने लवकरच प्रतिसाद देईन.
14 Apr 2015 - 11:50 pm | आजानुकर्ण
शुभेच्छा डांगेसाहेब
15 Apr 2015 - 12:17 am | जुइ
नवीन उपक्रमास खुप शुभेच्छा!! इथे विकतचा तयार गोडा मसाला खावा लागत आहे :-(
15 Apr 2015 - 3:11 am | बहुगुणी
इथल्या पाककला-निपुणांबरोबरच, पेठकर साहेबही वेळ मिळाला की सल्ला देतीलच असं वाटतं, एका यशस्वी व्यावसायिकाचा तो अनुभवी सल्ला नक्कीच उपयोगाचा असेल.
15 Apr 2015 - 3:48 am | खटपट्या
उपक्रमास शुभेच्छा. पण २० ग्रॅम मसाला थोडा कमी वाटतोय.
थोडा जास्त दील्यास, भाजी, चिकन, मटण, मासे यात टाकून, चव पाहून अभिप्राय दिला जाईल..
15 Apr 2015 - 5:18 am | hitesh
आम्हाला पाठवा.
15 Apr 2015 - 10:17 am | क्रेझी
सर्वप्रथम शुभेच्छा आणि ऑल दी बेस्ट! मला तुमची होम-वर्क करण्याची पध्दत आवडली.
मी तर म्हणेन तुम्ही तुमचे जे कोणी ग्राहक ठरविले असतील त्यात सगळ्यात पहिला नं. मिपाकरांचा लावा, जर सहज शक्य असेल तर तुम्ही आम्हाला कुरियर ने पाठवा म्हणजे भारतातल्या काना-कोप-यात तर तुमच्या मसाल्याची जाहिरात होईलच पण परदेशामधे सुध्दा बोलबाला होईल :)
16 Apr 2015 - 12:18 pm | संदीप डांगे
धन्यवाद क्रेझी,
कुरीअरने मसाला पाठवण्याची व्यवस्था करता येइल. तत्पूर्वी उत्पादनाची उपयुक्तता आणि त्यात खरंच काही दम आहे का जेणे करून मासेस ला अपील होईल म्हणून हा उपक्रम.
तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर व्य नि करा. तुम्हाला सँपल पाठवतो.
15 Apr 2015 - 10:39 am | संदीप डांगे
@निशदे, धन्यवाद. सर्व निकष पुर्ण करून निर्यात परवाना मिळायला कदाचित १ वर्षापेक्षा जास्त वेळ जाईल. तोवर परदेशात राहणार्या बांधवांना मसाला पोचेल याची दुसरी काही व्यवस्था होते का ते शोधत आहे. म्हणजे इथून घरची मंडळी पापड-लोणची पाठवतात तसं काही करता येइल का यावर विचार करतोय. कुणाला याबद्दल काही करता येत असेल तर जरूर सांगा.
@कपिलमुनि, धन्यवाद. जागूताईंना नक्कीच विचारेन.
@सौन्दर्य, लवकरच आमचे मसाले तुमच्या किचनमधे पोचतील अशी अपेक्ष करतो. एकदा तुम्ही वापरले की प्रेमात पडाल याची खात्री आहेच.
@आजानुकर्ण, धन्यवाद.
@जुइ, धन्यवाद. विकतच्या तयार गोड्या मसाल्याबद्दल तुमच्या अपेक्षा आणि अनुभव सांगितले तर मदत होइल. परदेशात राहणार्यांना मसाल्याच्या बाबतीत खूप तडजोड करावी लागते याबद्दल मी आंतरजालावर बरेच वाचले आहे. विशेषत: गोड्या मसाल्याच्या बाबतीत. ती अडचण दूर करण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचा मसाला मिळेल याची मी खात्री देतो.
@बहुगुणी, पेठकरकाकांच्या मौल्यवान सल्ल्याच्या प्रतिक्षेत आहेच. ते व्यवस्थित आणि योग्य ती माहिती देतील याबद्दल शंकाच नाही. शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
@खटपट्या, बाजारातल्या नेहमीच्या मसाल्यांपेक्षा हा मसाला अर्धाच लागतो. पण पदार्थ बनवतांना कोण किती वापरतं हे वैयक्तिक आहेच. २० ग्रॅम हे प्रमाण २ जणांच्या ४ ते ६ वेळच्या भाजीसाठी ठरवले आहे. तेवढं पुरेसं आहे असं वाटतं. पुढे जसे सल्ले येतील तसा बदल करता येइल. तुमचा पत्ता व्य नि करा. लगेच पाठवण्याची व्यवस्था करतो. शुभेच्छांसाठी धन्यवाद!
@हितेश, पत्ता व्य नि करा. कुरिअर करतो.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद.
15 Apr 2015 - 2:46 pm | नाखु
भरमार जाहीरात करतात टिव्हीवर त्यांचे मसाले फारसे चवदार आणि किफायती वाटत नाहीत.
दुसरे असे की जास्तीत जास्त गृहपयोगी प्रदर्शने शकत्यो संस्थांची असतील (किसान प्रदर्शन)अश्या ठिकाणी आपली उप्त्पादने (अभिप्राय वहीसोबत ठेवाच)
आणि आपल्या मसाल्याची चव आणि ओढ साता समुद्रापार पोहचो ही श्री चरणी शुभेच्छा !
16 Apr 2015 - 2:39 pm | कपिलमुनी
आता तुम्हाला बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल
लोणची, तयार मसाले, ब्रेड, पापड ते मेणबत्त्या अशा २० प्रकारच्या वस्तूंची निर्मिती ही केवळ सूक्ष्म व लघुउद्योगांमधूनच केली जावी, असा १९६७ सालापासून चालत आलेला धोरणात्मक निर्णय आहे. या सूचीतील वस्तूंचे उत्पादन आता सर्व कंपन्यांसाठी अगदी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीही खुले झाले आहे.
दुवा
16 Apr 2015 - 3:53 pm | संदीप डांगे
मुनिवर, बातमी आणि दुव्याबद्दल धन्यवाद!
तयार मसाल्यांबाबत माझा जो काही अभ्यास झाला त्यानुसार ब्रँडेड मसाल्यांना आतापावेतो बाजारात फक्त १५-२० टक्क्यांपर्यंत मजल मारता आली आहे. ७० टक्के बाजार अजूनही मोकळा असून त्याला पुरे पडण्याची क्षमता छोट्या उद्योगांमधेही नाही. हमखास यश देणारं हे क्षेत्र असूनही जास्त कुणी यात शिरू शकले नाहीत कारण एकूण 'मसाल्यांचं मूलभूत ज्ञान' हे एक परिमाण फारच आवश्यक आहे असं दिसून आले. दुसरं प्रत्येक प्रांताची आपली खास अशी गरज आहे. त्यामुळे बरेच ब्रँड्स एक विशेष भौगोलिक क्षेत्रातच यशस्वी झालेले दिसून येतात. जसे उत्तरेत एमडीएच आणि इतर स्थानिक ब्रँड्स आहेत ज्यांची क्षमता देशभर विस्ताराची आहे. पण ते दक्षिणेत प्रभावी ठरत नाहीत. तिथे दक्षिणेतही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे ब्रँड्स टॉपवर आहेत. काही ब्रँड्स तर अक्षरशः दोन-तीन जिल्ह्यात, दोन-तीन राज्यात फार प्रसिद्ध असूनही त्याच्या बाहेर त्यांना मजल मारता आलेली नाही. तिथले ब्रँड्स उत्तरेत टिकाव धरू शकत नाहीत. बहुराष्ट्रीय कंपन्या कितपत आव्हानात्मक असतील याबद्दल शंका आहे. मसाल्याचा बाजार हा ब्रँड्ससाठी क्लोज-रेंज-काँबॅट असतं. कारण दर्जा आणि किंमत याबाबतीत सगळे एकाच पातळीवर आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यात तर खरी मजा येइल असे वाटते. अशा कंपन्यांना आपला नफा कमवण्याचा पारंपारिक फॉर्म्युला कायम ठेवत प्रत्येक प्रांताची वेगवेगळी गरज भागवणारी वेगवेगळी आणि ऑथेंटीक उत्पादने काढणे कसे शक्य होईल तेही बघणे मजेदार असेल. त्यांच्या येण्याने मसाल्यांच्या हंगामी खरेदीवर (उत्पादक-शेतकरी यांच्यातला व्यवहार) परिणाम संभवतो. प्रचंड पैसा व होल्डींग क्षमता याद्वारे ते इतर कंपन्यांचे कंबरडे मोडू शकतात. पण पुढे काही खास निभाव लागेल असे वाटत नाही. याला कारण भारतीय ग्राहक. जे दर्जा आणि किंमत याबाबतीत फारच संवेदनशील आहेत. पुढे बाजारावर एकाधिकार बळकावुन ब.रा.कं.नी दर्जा आणि किंमतीत काही गडबड केली तर घरगुती उत्पादकांस चांगलाच वाव मिळेल.
घावूक मसाल्याच्या बाजारात भयंकर उतारचढाव असतात. शेतीवर अवलंबून असलेला उद्योग असल्याने बेभरवशाचा आहे. त्यात पिढ्यांपिढ्या व्यवसाय करणारे आहेत. ब.रा.कं.ना हे सगले समजण्यात बराच वेळ जाईल.
याच पार्श्वभुमीवर एक पाकिस्तानी ब्रँड (हो हो. पाकिस्तानीच) भारतात घुसून चांगलाच धंदा मिळवत आहे. 'शान' नावाचा हा मसाला ब्रँड मांसाहारी लोकांनी डोक्यावर घेतला आहे. हो, आपलेच भारतीय मुर्ख लोक आहेत. पण बाजारात या मांसाहारी लोकांची मागणी पुर्ण करणारा कुठलाही मसाला शानएवढा दर्जेदार व टार्गेट-ओरीएंटेड नसल्याने शान प्रचंड फोफावत जात आहे. माझ्या या उद्योगात उतरण्याच्या निर्णयामागे शान हे एक कारण आहे हे इथे मी नमूद करतो.
माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मसाला बाजारपेठेची परिस्थिती थोडीशी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
16 Apr 2015 - 2:45 pm | कविता१९७८
अभिनंदन आणि शुभेच्छा.
16 Apr 2015 - 4:53 pm | माम्लेदारचा पन्खा
"मसाला" सिनेमाने भलतेच प्रभावित झालेले दिसताय !!
अवांतरः मसाला शेंगदाण्यांचा व्यवसाय उघडला असतात तर आतापर्यंत परदेशातून पण मागणी आली असती.... ( मिपाकर रसिक हो :-)) !!)...... ह घ्या.......
17 Apr 2015 - 6:54 am | संदीप डांगे
बाजारपेठ योग्य आहे हे तुमचे निरीक्षण बरोबर.. :-)
सिनेमाचा प्रभाव? माहित नाही.
मसाला शेंगदाणा....? येइल, तो ही येइल.
17 Apr 2015 - 7:48 am | जयन्त बा शिम्पि
आम्ही आमच्या गावी , धुळे येथुन मसाला तयार करुन आणतो. लाल मिरची तेल टाकून भाजून घेतो. त्यानंतर सर्व कच्चा मसाला , एकत्रीत करुन चक्कीवर दळून घेतो. त्यातील जीन्नस कोणकोणते हे प्रमाण मजकडे लिहिलेले आहे.आपणास हवे असल्यास , पाठवू शकतो.
17 Apr 2015 - 7:57 am | संदीप डांगे
धन्यवाद! तुमची रेसीपी पाठवल्यास फारच चांगले. मी ईमेल व्यनि करतो.
तुमच्या या मसाल्याला काही नाव आहे का? जसे बर्याच मसाल्यांना विशिष्ट नाव असते तसे. काळा मसाला, गोडा मसाला, सिकेपी मसाला वैगेरे.
17 Apr 2015 - 8:48 am | जयन्त बा शिम्पि
आम्ही त्याला " काळा मसाला " असे म्हणतो. फक्त घरगुती वापरासाठी तयार करतो.
माझा व्यनि संकेत jayant.shimpi@gmail.com असा आहे.
आपण आपला कळवावा.
17 Apr 2015 - 1:38 pm | कपिलमुनी
इथेच प्रमाण टाका की .
3 Jun 2015 - 3:52 am | प्रभाकर पेठकर
'चव' ही व्यक्तीसापेक्ष असते आणि मसाल्याचा दर्जा ही चव ठरवत असते.
मला घरासाठी लागणारे बहुतेक मसाले मी स्वतः घरीच किंवा चक्कीवर दळून घेतो. पावभाजीसाठी एव्हरेस्ट, बादशाह, मंगल वगैरे मसाले वापरून झाले. एव्हरेस्ट मसाल्याच्या पुरवठ्यात सातत्य नसल्यामुळे 'मंगल' चा पावभाजी मसाला वापरून पाहिला. त्याची चव जुळेजुळे पर्यंत तो मसालाच बाजारातून गायब झाला. बादशाह पावभाजी मसाला पुरवठ्यात आणि चवीत चांगले सातत्य आहे आणि इथल्या माझ्या गिर्हाईकांनी तो मनापासून स्विकारल्यामुळे मी तो बदलत नाही. तर, उपहारगृहवाल्यांचे असे असते की मसाला चविष्ट असावा, पोटाला त्रासदायक नसावा (अॅसिडीटीच्या तक्रारी येऊ नयेत), पुरवठा नियमित असावा, मसाल्यामुळे मुळ पदार्थाचा रंग बदलू नये. हे निकष मी पाळतो. (अनुभवातून आलेले ज्ञान).
उपहारगृह व्यवसायात जाणकार मालकवर्ग कमी असतो. सरसकट स्वयपाक्यावर अवलंबून (स्वतःला स्वयंपाक येत नसेल तर, बहुसंख्य मालक) आणि स्वस्तातला माल खरेदी करून उत्पादन किंमत न्यूनतम ठेवण्याचा आणि त्यायोगे जास्तीत जास्त नफा कमविण्याचे उद्दीष्ट ठेवणारे अधिक असतात. पण उत्कृष्ट चव सांभाळल्यास जास्त आणि नियमित गिर्हाईके येऊन उपहारगृहाचे नांव होणे आणि पर्यायाने नियमीत नफा मिळविणे ह्यावर कमी लोकांचा भर असतो. पण तो ज्यांचा असतो ते मसाल्यांबाबत चोखंदळ असतात. किंमत पहात नाहीत.
उपहारगृहांना मसाले विकायचे असतील तर किलोची, पाच किलोची पाकिटे बनवून कमी दरात द्यावी. सेल जास्त होत असल्याने परवडते सुद्धा. आमच्याकडून ही किरकोळ विक्रीपेक्षा घाऊक विक्रीत जसे ऑफिसला लागणारा नाश्ता जो २००-३०० नग समोसा, बटाटावडा असा जात असतो. त्यांना आम्ही किरकोळ विक्रिकिमतीपेक्षा कमी किमतीत देत असतो.
विक्री कौशल्याबाबत सांगायचे झाल्यास उपहारगृह मालकांना १५० ते २०० ग्रॅमचे पाकीट 'सँपल' म्हणून फुकटात द्यावे. त्याच बरोबर तो मसाला बनविताना त्याच्या चवीच्या दृष्टीने तुम्ही काय काळजी घेतली आहे (घटक जीनसांची प्रत) वगैरे वगैरे बाबी न कंटाळता उपहारगृहमालकास समजवाव्यात. बाजारातील इतर मसाल्यांपेक्षा तुमचा मसाला उजवा का आहे हे विशद करून सांगावे. तो मसाला वापरल्याने त्या उपहारगृहाची गिर्हाईके अशी चव इतरत्र मिळत नसल्याने कशी नियमीत येतील वगैरे पटवून द्यावे. आणि तो मसाला वापरला जाई पर्यंत त्या उपहारगृहाला भेट देऊन 'फिड बॅक' घेत राहावा.
दुकानदारांना किरकोळ गिर्हाईकांना मसाले वि़कण्यासाठी द्यायच्या पॅकेटसमधे एखाद्या व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थाची छापील पाककृती (म्हणजे तो मसाला कसला असेल त्या नुसार. जसे, पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, भाज्यांचा मसाला, काळा मसाला, कच्चा मसाला वगैरे वगैरे बरोबर पावभाजीची, बिर्याणीची , भाजीची, उसळीची वगैरे द्यावी) किरकोळ गिर्हाईकाला त्या पदार्थाशी असलेलं त्या मसाल्याचं नातं ती पाककृती करून पडताळून पाहता येतं.
महिला मंडळाच्या कार्यक्रमात २५ ते ५० ग्रॅमची पाकीटे वाटावीत. त्याच वेळी त्या कार्यक्रमात तुमच्या मसाल्याच्या ब्रँडचे बॅनर्स असावेत. शक्य झाल्यास बँकांमध्ये, सरकारी खात्यात, शाळांमधून जिथे महिलावर्ग बहुसंख्येने असतो तिथे 'सँपल' वाटप करावे.
ह्या सर्व प्रकरणात प्रथम आपले उत्पादन आपल्या शहरात मुळ धरेपर्यंत सतत सर्वांशी संवाद साधणं (Blowing your own trumpet) फार महत्वाचं असतं. माल ज्या वेगाने संपेल त्या वेगाने उत्पादन वाढवावं. बाजारातला माल आधी संपला आणि तुमचे स्टॉक्स कमी पडू लागले तर ब्रँड मार खातो.
सुरुवातीला फायदा कमी झाला तरी चालेल पण किमत मार्केट मधील प्रस्थापित ब्रँड पेक्षा जास्त ठेऊ नये. थोडी जास्त चालेल पण अति जास्त नसावी. पुढे जसजसा जम बसेल तसतशी किंमत वाढविता येईलच.
शुभेच्छा...!
3 Jun 2015 - 9:40 am | संदीप डांगे
एवढ्या सुंदर आणि माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी लाख लाख धन्यवाद!
साधारण अशाच मार्गाने काम चालू आहे. पण तुमच्या प्रतिसादातून खूप महत्त्वाच्या गोष्टी समजल्या.
पुनश्च एकदा धन्यवाद!