मराठी विकिपीडियावरील काही छायाचित्रांचे परवाने अद्ययावत करावयाचे आहेत म्हणून छायाचित्रे चाळताना योगा योगाने श्रीधर बळवंत टिळक (सुमारे १८९६ - मे २५, १९२८) यांच्या वरच्या छायाचित्रावर आणि तेथून त्यांच्या संबंधीच्या लेखावर गेलो.
"श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते." अशी नोंद होती. आज ९ एप्रील आहे थोडा उशीर झालातरीही मिपात माहिती टाकावयास हरकत नाही आणि या निमीत्ताने त्यांच्या बाबत एक दोन माहिती हवी होती ती मिळाल्यास पहावे हा मनोदय.
* माझ्या वाचण्यात आल्या प्रमाणे (चुभू.दे.घे.) लोकमान्यांनी परदेशगमनाच्या वारीनंतर पंचगव्य प्राशन केले असावे. मराठी विकिपीडियावर "ब्राम्हणांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला. 'माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणे, तर ते लग्नच न झालेले बरे." असा उल्लेख आहे. यात श्रीधरपंतांच्या विवाहाचा आणि पंचगव्यप्राशनाचा संबंध काय ते लक्षात येत नाही. या बद्दल अधिक माहिती असल्यास हवी आहे.
* श्रीधरपंत टिळकांचा त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात काही कोर्टकेस चालू होती, ते नेमके काय प्रकरण होते ? ( मला वाटते जयंत टिळकांनी या बाबत त्यांच्या ग्रंथातून नंतरच्या काळात लेखन केले आहे, कुणाच्या वाचनात असल्यास त्यावर प्रकाश पडावा जेणेकरून श्रीधरपंत टिळकांबद्दलची आंतरजालावर उपलब्ध माहिती पुर्ण होऊ शकेल असे वाटते)
* श्रीधरपंतांच्या वरील छायाचित्राचे छायाचित्रकार कोण ( अशी माहिती मिळणे अवघड असेल पण छायाचित्रकाराचा उल्लेख करणे प्रताधिकार कायद्यानुसार सयुक्तीक ठरते, म्हणून माहिती उपलब्ध जेव्हा केव्हा झाल्यास हवी आहे.)
* श्रीधर बळवंत टिळक यांची जन्मतारीख निश्चीत मिळत नाही असे उल्लेख आंतरजालावर दिसतात. लोकमान्य टिळकांच्या जीवनातील घटना सहसा नीटशा नोंदवलेल्या आहेत श्रीधर बळवंत टिळकांच्या जन्म तारखेचा शोध काही कागद पत्रातून पुढे मागे लागल्यास (लागलेला असल्यास) विकिपीडियातील नोंद अद्ययावत करता येईल.