गाभा:
मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.
"स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे.
मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती.
वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३०
वार : शुक्रवार.
दि. १६ नोव्हें. ०७
स्थळ : www.eprasaran.com
हाच कार्यक्रम पुन्हा शनिवारी आणि रवीवारी रिपिट होतो.
अधिकमाहीतीसाठी इप्रसारणच्या साईट ला भेट ध्यावी.
- प्राजु.
प्रतिक्रिया
14 Nov 2007 - 11:42 pm | सर्किट (not verified)
अरुण कशाळकर हे पं उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधु. त्यांचे संगीतविषयक विचार ऐकायला नक्कीच आवडतील.
(पण एवढ्या सकाळी झोपमोड करावी लागेल. त्यापेक्ष्हा अतुल वैद्य आणि मिलिंद गोखलेंकडे त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग मिळेल, ते ऐकीन ;-)
- सर्किट
14 Nov 2007 - 11:57 pm | प्राजु
पुन्हा ११.०० वाजता ऐकु शकाल आपण.... दिवसभर तोच प्रोग्रॅम असतो...
- प्राजु.
15 Nov 2007 - 12:01 am | विसोबा खेचर
अरूण कशाळकर आणि माझा अतिशय चांगला परिचय आहे. मी साधारण १९९२-९३ च्या सुमारास त्यांच्याकडे जात असे. मी त्यांचा शिष्य नव्हे पण एखाददोनदा त्यांच्याकडून मुलतानीतल्या 'कवन देस गई' (झुमरा) आणि 'मानत नाही जियरा मोरा' (त्रिताल) याची तालीम घेतली आहे! :)
कशाळकरबुवा तेव्हा बँकेत नोकरी करत असत. मला अजूनही आठवतंय, ते हापिसातून आल्यावर आम्हा मंडळींना गरमागरम ब्रेड स्लाईस लोणी वगैरे लावून भाजून द्यायचे आणि स्वत:ही आमच्यासोबत खायचे. त्यानंतर रियाजाला, शिकवणीला सुरवात. मस्त तालीम चालायची, खूप मजा यायची. मी त्यांच्याकडे शिकत नसे परंतु बर्याचदा त्यांच्या घरच्या तालमींना हजर राहिलो आहे, वेळप्रसंगी तंबोराही धरला आहे. कळतनकळत गाण्यातल्या, घराणेदार गायकीतल्या पुष्कळ गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
अतिशय विद्वान माणूस. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या जुन्या गायक मंडळींबाबत बुवांचा अतिशय डोळस अभ्यास आहे. स्वत: बुवांना गजाननबुवांची, रामभाऊ मराठ्यांची उत्तम तालीम मिळालेली आहे. बुवांनी काही काळ पं बबनराव हळदणकरांकडेही तालीम घेतली आहे अशी माझी माहिती आहे. स्वत: बबनराव हे मोगुबाई कुर्डिकर, आणि खादीमहुसेन खा साहेबांचे शागीर्द. त्यामुळे बबनरावांचा जयपूर आणि आग्रा गायकीवरचा अधिकार वादातीत आहे!
असो, रामभाऊ मराठे, गजाननबुवा जोशी यांच्याबद्दल जितकं लिहीन तेवढं थोडं आहे इतकी ही मंडळी मोठी आहेत!
विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य या विषयावर कशाळकरबुवांना डॉक्टरेटही मिळालेली आहे. विलायत हुसेन खान हे आग्रा गायकीचे एक थोर गवई!
असो,
आपला,
(गाण्यातला) तात्या.