झाडाच्या आडोशाला ती नेहमी सारखीच उभी होती.
आजुबाजुचा आसमंत पावसाच्या वर्षावाने भारावलेला. नेहमीसारखेच सारेजण आनंदाने बेभान! पावसाची चाहुलच मुळी त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी ठरायची. त्या सुटलेल्या गार वार्याच्या झुळकीन अगदी चिमुकली गवताची पाती देखील डोलु लागायची. आनंदान त्या पाउसधारात निथळण्यासाठी सज्ज व्हायची. ती मात्र अशीच; असुन नसलेली. कधी कुठल्या क्षणी वार्याच्या लहरीवर सवार होउन हे बीज इथवर पोहोचलेलं! त्याच्या येण्याची अशी फारशी दखल कुणी घेतली नसावी. असतात चारजण; तसच हे ही! एक बीज!! मग त्याचं तिथेच रुजणं अन तीचं जमिनीत कोवळी मुळ रोवत दोन चिमुकल्या पानांसह उभ रहाणं.
अवखळ,चिमणं हसु लेउन तिने पहिल्यांदा आजुबाजुला पाहिलं. बाजुन उडणार्या माशीने तीच्या अंगावर क्षणभर रुंजी घातली अन मग तीही निर्विकारपणे दूर उडुन गेली. त्या बिभस्त दिसणार्या केसाळ पायांनी तिच्या अंगावर शहाराच आला. पण मग त्यानंतर तिच्या उभं रहाण्याची अशी फारशी दखल नाही घेतली कुणी. पानांच्या नाजुक टाळ्या वाजवीत तिने आपणही या सृष्टीचा भाग असल्याचा आनंद साजरा केला. तिचा तो कोवळा आवाज कुणापर्यंतच नाही पोहोचला. नाही म्हणायला, बाजुच्या गवत पात्यानं; थोडस नाराज होत तिच्याकडे एक नजर टाकली. उगा गोंधळ माजवायला ती का कुणी फुलवेल होती, की आंब्यासारख डेरेदार व्हायच होत जगणं तीच? एक क्षुल्लक वेल ती. उद्या कुणाच्या नजरेत आली तर झर्रदिशी उपटुन टाकतील तिला. उगा जन्माला आल्याचा सोहळा करतेय. त्या नजरेन गोंधळुन जाउन ती जराशी खट्टु झाली.
सुर्याचे एक दोन चुकार कवडसे वरच्या वृक्षाच्या डेरेदार घेर्यातुन खाली उतरले. तिच्या पानांना अलवार स्पर्शत त्यांनी तिला जिवनसत्वाचा पहिला वहिला घोट पाजला. तेव्हढ्यान ताजतवानं होत ती तिच्यापुरतीच प्रफुल्लीत झाली. मनातला आनंद आतल्या आत साजरा करत तीने एका नव्या कोंबरीला हळुवार जन्म दिला. जन्मवेळच्या दोन जाडसर पानांसारखी नव्हती ही नवी कोंबरी. नाजुक तारे सारख्या लवचिक देठाच्या आत त्याहुनही नाजुक अस काहीसं उमलत होतं. कुणाला दाखवावं हे नवपणं? कोण होइल सहभागी या नवनिर्मितीच्या आनंदात? जन्मत:च मिळालेल्या थंडगार कडु घोटानं नाहीतरी तिला शहाणं केल होतं. आजुबाजुला नजर टाकत तिने आपण कोठुन आलो याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. कुणासारखे असु आपण? कुणी मिरवलं असेल आपल्याला फुलांच्या पाळण्यात? काय चव असेल आपल्याला जोजवणार्या फळाची? कुणाचा ठसा आहोत आपण? तिच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नव्हतं. झाडाखालुन तीला वरच्या डेरेदार पानांची सळसळ ऐकु येत होती. गर्भश्रीमंत असा तो डेरेदार वृक्ष आजुबाजुच्या आसमंतात एखाद्या राजासारखा शोभत होता. तीच्या असण्यानसण्याचं त्याला काहीही सोयरसुतक नव्हत. जमिनीत आता तीची मुळ तशी बरीच खोलवर गेलेली. मोठ्या झाडाच्या मुळांनी त्यांना जरास दटावलेलं. वरवरच मिळतय तेव्हढच घ्या, फार खोलवर उतरायची गरज नाही. अंग चोरत तिच्या मुळांनी तिला घोटभर पाणी पुरवल. तेव्हढ्या घोटानही तिला तरतरी आली अन जगण्याची आसक्ती वाढीस लागली. आज किती वर्ष लोटली त्याला देवजाणे. काळ असा दिवसरात्रीत मोजणं जमल नसत तिला. पण तेंव्हाच्या दोन पानांची आज हजारावर गणती झाली होती. एका नव्या कोंबरीला जन्म देणार्या तीचे, आज दहाएक फाटे आजुबाजुला पसरले होते. नाजुक बदामी आकाराची तिची पानं निदान तिच्या नजरेच्या टप्प्याततरी आणि कुणीच मिरवत नव्हत. त्या पानांनवरच्या नाजुक खोल रेषा, खालील बाजुस असणारी तशीच नाजुक लव, या सार्याच तिला एकटीलाच कौतुक होत. समोरच एका दगडाच्या आधारे उमलणारी जुई, तिच्या नाजुक पांढर्या फुलांनी न्हाउन निघायची. अगदी ती ज्या झाडाखाली रुजली होती, तो वृक्षराजही जाईच्या सुगंधाच्या उधळणीच कौतुक करायचा. तिच्या गर्द हिरव्या जाड पानांच कौतुक करायचा. तिच्या जाडसर वेडवाकड्या खोडाच दगडात रुतणं त्याला जणु दिसतच नव्हत. त्या पाषाणाला जात असलेले तडे जणु कुणालाच दिसत नव्हते. दिसत होती ती त्या सुगंधाच्या उधळणीची मजा. त्या मायावी सुगंधाच्या नशेत, पुढच काहीही दिसत नव्हत कोणालाच. कधी कधी भरदुपारी उन्हाच्या काहीलीन जाई सुकायची. अगदी निष्प्राण होउन तीच्या फांद्या दगडावर पडुन रहायच्या. अन मग आजुबाजुचे सारे हळहळायचे. तिच्या नाजुकपणाचा वारंवार उल्लेल्ख व्हायचा. अगदी झाडाखालची गवताची पातीही हो ला हो मिळवत त्या संभाषणात सामिल व्हायची. पण तिचं नाजुकपणं कुणालाच नाही जाणवल कधी. कुणीच तिच्या रेखीव मऊसर पानांची दखल नाही घेतली. अगदी त्या झाडाच्या घेर्यातून तिला कधी पूरा सुर्यप्रकाशही नाही लाभला. तो रविकर तिच्या नशिबी होता तोच मुळी कवडश्याकवडश्याने. त्याच पुर्ण रुप ती नुसती ऐकुन होती. तिची ऋजुता, तीच मुकपण, तिचा नाजुक पोपटी रंग हे सार तिच्यापुरतच राहिल होत. तिच्या मुळांनाही खोलवर जाण्याचा हक्क नव्हता. तिच्या असण्यानसण्याचा कुणालाही गंध नव्हता. आजही नेहमी सारखीचं, ती तो पावसाचा उत्सव नुसताच पहात होती. आपणही खळखळुन हसाव, पाऊसधारांना झेलाव. समोरच्या जाईसारख त्याच्या घुसळण्यान सुखावावं, लटकं लटकं नाराज व्हावं. कौतुकाच्या नजरेन चिंब भिजाव हे सार तिलाही वाटत होत, पण तिच्यापुरता पाऊस; वरच्या डेरेदार पानातुन ओघळायचा होता. आजुबाजुला पाऊसधारा कोसळताना तिने त्या ओघळणार्या थेंबांची भीक झेलायची होती. वरवरच्या मुळांना आसुसुन ते थेंब पिताना पहायचं होत. अन कुणी चुकुन नजर फिरवलीच तर आपणही या जल्लोश्यात सामिल आहोत अस दाखवायचं होत. शेवटी एक रानवेल होती ती!
(फोटो सौजन्य http://www.misalpav.com/node/22375 हा धागा. सौरभ उप्स यांच्या कॅमेरातून.)
प्रतिक्रिया
16 Feb 2015 - 5:47 am | रेवती
नवा दृष्टीकोन आवडला.
16 Feb 2015 - 7:57 am | कौशी
लेखन आवड्ले
16 Feb 2015 - 8:30 am | अजया
बर्याच रानवेली आठवल्या..
16 Feb 2015 - 9:32 am | स्पा
मस्तच कथा
रिडींग बिटविन द लाईन आहे, परत वाचावी लागणार
17 Feb 2015 - 7:04 pm | सखी
मस्तच कथा
रिडींग बिटविन द लाईन आहे, परत वाचावी लागणार - हेच म्ह्णणार होते.
17 Feb 2015 - 7:19 pm | सूड
+१
16 Feb 2015 - 10:05 am | पारा
आवडली. अगदी वर्णनाबरहुकूम दृश्य समोर उभं राहिलं.
16 Feb 2015 - 10:14 am | विनिता००२
शेवट थोडा वेगळा असता तर जास्त भावले असते.
---तो राजहंस एक...टाईप
पण लेखन छान :)
16 Feb 2015 - 12:13 pm | आदूबाळ
रूपक कथा?
आवडली
16 Feb 2015 - 12:31 pm | जागु
वर्णन फार फार आवडल.
16 Feb 2015 - 1:02 pm | सानिकास्वप्निल
वर्णन आवडले :)
17 Feb 2015 - 8:20 am | स्वाती२
कथा आवडली.
17 Feb 2015 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान रुपक आहे ! मस्त खुलवलंय !!
17 Feb 2015 - 4:41 pm | एस
चांगली आहे. अजून जास्त तरल करता आली असती असे वाटले.
17 Feb 2015 - 6:41 pm | मुक्त विहारि
मस्त
18 Feb 2015 - 1:34 pm | मनीषा
छान लिहिले आहे. आणि छायाचित्रंही सुरेख.
18 Feb 2015 - 2:48 pm | सस्नेह
तरल भावपूर्ण लेखन !
18 Feb 2015 - 3:04 pm | इशा१२३
सुरेख कथा.आवडली.
18 Feb 2015 - 3:34 pm | गिरकी
सुरेख..
24 Feb 2015 - 8:36 pm | पैसा
खूप छान!
25 Feb 2015 - 9:21 pm | अर्धवटराव
वेगळ्या अंगाने अगदी पु.ल. जातकुळीची कथा. रानवेलींना इतक्या अलगदपणे साहित्यात नायिका बनवणं फार फार आवडलं.
2 Mar 2015 - 10:00 am | अत्रुप्त आत्मा
ऐसाइच बोल्ता हय! :HAPPY:
1 Mar 2015 - 2:57 pm | नगरीनिरंजन
कथा आवडली!
2 Mar 2015 - 9:17 am | नाखु
सृष्टी बरोबरच ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा पारायण करावेच लागेल वाचनाचे.