दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती; 'शेअर टॅक्सी मधे पुढची पॅसेंजर सीट महिलांसाठी आरक्षित.' त्यावर अनेक प्रतिक्रिया होत्या. सामाजिक संस्था, प्रवासी संघटना, इत्यादींनी अगदी स्वागतार्ह निर्णय वगैरे संबोधून या गोष्टीचं कौतुक केलं होतं. ट्रेनचे डबे झाले, बसच्या सीट झाल्या आता टॅक्सीच्याहि सीट महिलांसाठी आरक्षित; किंवा राखीव.
यामागचं कारण असं की मागच्या सीट वर इतर दोन पुरुष प्रवाशांबरोबर (अर्थातच अनोळखी) प्रवास करताना त्यांना जो त्रास होतो तो होऊ नये. सद्ध्याच्या एकंदरित सामाजिक मानसिकतेकडे आणि घडणा-या घटनांकडे बघता हे अगदी योग्य आणि रास्त वाटतं. पण अशा प्रत्येक संकल्पनेतून देशातील स्त्रीवर्गाचं रक्षण करण्याकडे पाऊल उचललं जातंय असं जरी भासलं, तरी यातून बाह्य जगाला चुकीचा संदेश जातो आहे.
एकीकडे एकविसाव्या शतकात अनेक सामाजिक बंधनं, भेद नष्ट झालेले आहेत. आपला देश जगभरातील लोकांना आमंत्रणं देत आहे. आणि दुसरीकडे आपण अजूनही स्त्री-पुरुष भेद ओलांडू शकलेलो नाही. या मुद्द्याचा दोन अंगांनी विचार करावासा वाटतो.
एक म्हणजे लक्षणं. आज महिलांवर ईव्ह टीजिंग पासून ते बलात्कारापर्यंत अत्याचार समाजात घडत आहेत. अशात महिलांना एकटी दुकटीने वावरणं सुरक्षित वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे कदाचित सरसकटीकरण होत असेल पण it is hard to disagree. या परिस्थितीमुळे अशी आरक्षणं हा पर्याय डोळ्यासमोर येणं हे सहाजिक आहे. आणि हाच पर्याय अमलात आणायच्या दृष्टीने सोपा वाटणंही सहाजिक आहे. अर्थात याची दुसरी बाजू अशी की महिलांचे हक्क जपणारे कायदे आपल्या देशात आहेत ज्यांची अंमलबजावणी, ज्यांचं पालन होत नाही. आणि सरकार 'ते' करणं सोडून आरक्षणाची यादी वाढवतं.
असंच चालायचं असेल, तर मग महिला रिक्षाने जातात, रस्त्यावर चालतात, वाहन चालवतात, कार्यालयात, बागेत, सिनेमागृहात जातात; प्रत्येक जागाच अशा रितीने आरक्षित करावी लागेल. हे म्हणजे असं की आम्ही गुन्हेगाराला शिक्षा करू शकत नाही, आम्ही त्यापेक्षा तुझ्यासाठी आरक्षण देतो. म्हणजे एका भावाने दुस-या भावाचं चॉकलेट घेतलं, की आई चॉकलेट घेणा-या भावाला ओरडायचं सोडून दुस-याला 'जाऊदे मी तुला नवीन चॉकलेट देईन' म्हणते तसं आहे. Reservations are like pain-killers; they will reduce the effects but not address the cause. The cause here is the mentality.
हे शासनाला ठरवयाचंय की असं किती चालणार. भारतापासून फार लांब नसलेल्या देशांमध्ये एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाविरुद्ध तक्रार केल्यास त्या पुरुषाला स्पष्टीकरण द्यायची संधीही न देता शिक्षा होण्याइतपत कडक कायदे आहेत. त्या दिशेने जायचं सोडून आपण हे भ्याड पर्याय काढतो आहोत.
दुसरं अंग म्हणजे कारण. समानतेचे गुण गाणा-या आपल्या समाजात भिन्नतेची बीजं लहानपणापासून पेरली जातात. शाळेत मुलं मुली शिशुवर्गापासून वेगळे बसतात, इथपासून त्याची सुरुवात करता येईल. पुढे पदोपदी आपण वेगळ्या रांगा, वेगळ्या सवलती, वेगळे निकष, वेगळे नियम... सगळं वेगळंच बघत असतो. आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध माझं काहीच म्हणणं नाही. परंतु हा विचार नक्की येतो की कदाचित याच भिन्न वागणुकीचं रुपांतर वयानुसार, कुतुहल, आकर्षण, डेस्परेशन, मधे होतं आणि पर्यवसान गुन्ह्यात होतं. अर्थात, संस्कार हा मोठा 'फॅक्टर' तिथे नसेल तरच.
तरीही या दोन गोष्टींना सकारात्मक वळण लावता येऊ शकतं. कायद्यांची कडक अंमलबजावणी, शीघ्र शासन झाल्यास महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे कमी होतील. तसंच मुलांच्या मनातील (इथे मुलांच्या म्हणतो कारण गुन्हे हे बहुतांश वेळा मुलांकडून/पुरुषांकडून च घडतात) कुतुहलास वेळीच योग्य वळण दिल्यास त्याचं रुपांतर डेस्परेशन आणि क्राईम मधे होणं टळू शकेल.
असं झाल्यास आपणही एका मुक्त आणि सुरक्षित समाजाचा भाग होऊ शकू; त्याचे गोडवे गाऊ शकू.
==========
ब्लॉगवर प्रकाशित : http://www.apurvaoka.com/2015/02/problem-reservation-women.html
==========
प्रतिक्रिया
11 Feb 2015 - 4:42 pm | ऋषिकेश
!!!
आपण त्या दिशेने जायला हवं असं खरंच तुम्हाला वाटतं? पुरूषाला (किंवा कोणालाही - अगदी कोणालाही) स्पष्टीकरण द्यायची संधीही न देता शिक्ष करणे पाशवी आहे.
11 Feb 2015 - 5:11 pm | वेल्लाभट
नंबर १ मी त्या दिशेने जायला हवं म्हटलं; तिथे पोचायला हवं असं म्हटलं नाही :)
नंबर २ नक्कीच ते पाशवी आहे आणि त्याचं समर्थन नाही. परंतु कायद्याची अंमलबजावणी हा माझ्या म्हणण्याचा मतितार्थ आहे. ते तर नक्कीच व्हायला हवं. नाही का?
अवांतरः सिंगापूर मधे केनिंग ची शिक्षा आहे असं ऐकलंय. त्यासंबंधी कुणी माहिती दिली तर आवडेल.
12 Feb 2015 - 8:57 am | स्पंदना
सिंगापोर मध्ये सगळीकडे सी सी टीव्ही आहेत. त्यावरुन पोलीस लगेच माणूस आणि गुन्ह्याचा खरेपणा शोधून काढतात. केनींग आणि कारावास तर आहेच स्त्रीयांच्या विरुद्ध गुन्ह्यांना पण जर सिंगापोरियन नसाल तर कारावास संपला की सरळ एअरपोर्टवर सोडतात, विमानात बसवतात आणि मस्त पैकी ***** लाथ घालून हाकलुन देतात.
पण भारतिय खंडातील माणसांची मानसिकता हा एक मोठ्या संशोधनाचा विषय ठरावा. एकदा एमारटीत आत जाण्यासाठी उभे होतो. ट्रेन आली अन दार उघडल. एरवी कितीही गर्दी असली तरी तेथे ट्रेनच्या दारात कुणी उभे रहात नाही. येथे भारतिय उपखंडातली ( आता आपण सगळे एकसारखे दिसतो, मग तो पाकिस्तानी असेल, बांगलादेशी असेल वा श्रीलंकन असेल) दोनचार माणस दारात गर्दी करुन उभी. मी आत जायला पाऊल टाकल तर त्यातल्या एकाचा हात त्याच्या पाठीमागुन बाहेर आणुन तो उभा. हेतू हा की आत घुसणार्या स्त्रीला स्पर्श करता यावा छातीला. मी योग्य अंतर राखून आत गेलेच पण मग हिंदीत बापजादे काढायला सुरवात केली. इकडे येउन देशाच नाव नासवतात, भिकेला लागलेले म्हनुन नुसत्या कचरा साफ करायच्या लायकीची माणस येउन बायकांना हात लावायला बघतात. शिव्यावर शिव्या दिल्या हींदीतून. उभा होता निर्लज्ज त्या गावचाच नाही असा थोबडा करुन. आता ही अस्ली मानसिकता असलेल्या देशात आरक्षण आणायच नाहीतर काय करायच? जर कायदे कडक केले तर तोंडात बोटे घालाल अशी माणस तुरुंगात भरतील. अगदी ती देश स्वतंत्र करायच्या वेळी होती ना तुरुंगभरु आंदोलनाची तशी अवस्था होइल.
12 Feb 2015 - 9:55 am | काळा पहाड
तेच ते. अशांना तिथंच डोक्यात गोळी घालून संपवायचे अधिकार पोलिसांना दिले पाहिजेत.
12 Feb 2015 - 11:16 am | वेल्लाभट
येस. त्याहीपेक्षा काही भयानक असेल तर तेही.
12 Feb 2015 - 11:14 am | वेल्लाभट
भरूच देत मी म्हणतो. दिसूदेत पांढरपेशा राहणीमागचं काळं व्यक्तिमत्व.
13 Feb 2015 - 8:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमतं. अश्यांना पोलिसबिलिसांची वाट न पहाता थेट "गंगाजल" प्रयोग करावा एवढ्या मतापर्यंत मी गेलोय.
बाकी बहुतेक मी मिपावर हा किस्सा टाकला होता पण परत टाकतो.
एकदा पी.एम.पी.एम.एल. नी प्रवास करत होतो. गर्दी नेहेमीप्रमाणेचं बरीचं होती. एक लहान मुलगा जेमतेम ८ वर्षांचा असेल. अंगावर महानगरपालिकेच्या शाळेचा गणवेश होता. तो उभं राहुन पाणी प्यायला आणि तेवढ्यात बस स्पीड ब्रेकरवरुन गेली. त्या धक्क्यानी त्याच्या हातामधली वॉटरबॅग/ बाटली खाली पडली. तो उचलायला म्हणुन वाकला तेवढ्यात ड्रायव्हरनी अचानक ब्रेक दाबला. तो मुलगा थेट तोल जाउन समोर असलेल्या एका मुलीला थेट जाउन धडकला. त्या मुलीनी पुढचा मागचा काहीही विचार नं करता सटासट २ कानाखाली मारल्या त्या मुलाच्या. माझं डोकचं फिरलं तिथेचं आवाज चढवला तिच्यावर. त्या लहान मुलाच्या सुदैवानी त्याच्या मागे एक बाई आणि त्यांची सुन असावी. त्या पण म्हणाल्या तोल जाउन पडला तो म्हणुन. तरी त्या मुलीचा हेका काय? म्हणे पोलिसात तक्रार करीन म्हणे अंगाला नको तिथे हात लावला म्हणुन.
त्या ७-८ वर्षाच्या कोवळ्या जीवाला काय वाटलं असेल? असेही प्रसंग घडत असतात.
12 Feb 2015 - 11:50 pm | नगरीनिरंजन
सिंगापुरात? नक्की?
13 Feb 2015 - 3:22 am | स्पंदना
हो नगरी। मी तरी दारातून कायमच निवांत आत जायचे। मुंबईच्या लोकल नंतर mrt म्हणजे एक स्वप्न होत
13 Feb 2015 - 4:22 am | नगरीनिरंजन
हां मुंबईच्या मानाने बरंच म्हणायचं पण इथले लोकही काही कमी नाहीत. अजून आठ-दहा लोकांना (भारतीय स्टँडर्डने २०) उभं राहायची जागा असली आतमध्ये तरी दारात गर्दी करुन उभे राहतात. अज्याबात ढिम्म हालत नाहीत. ट्रेन सोडून द्यावी लागते चढणार्या लोकांना बर्याचदा.
11 Feb 2015 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
@अर्थात याची दुसरी बाजू अशी की महिलांचे हक्क जपणारे कायदे आपल्या देशात आहेत ज्यांची अंमलबजावणी, ज्यांचं पालन होत नाही. आणि सरकार 'ते' करणं सोडून आरक्षणाची यादी वाढवतं. >>> नुसतच यादी वाढविणारं जे असेल..ते नको करायला..पण जे उपयुक्त आहे..त्यालाच हे बोल लाऊन (इथे लिहिताना तरी..आणि नंतरंही) का नाकारायचं???.. कायदे तेव्हढ्या पळवाटा..किंवा जुनेच नीट वापरत नाहीत..म्हणून नवे नको!.., हि एक आपली विचित्र मानंसिकता आहे. जी मला अत्यंत चुकिची वाटते :)
@असंच चालायचं असेल, तर मग महिला रिक्षाने जातात, रस्त्यावर चालतात, वाहन चालवतात, कार्यालयात, बागेत, सिनेमागृहात जातात; प्रत्येक जागाच अशा रितीने आरक्षित करावी लागेल.>> मग त्यात काय एव्हढं? जिथे जिथे धोका आहे,तिथे तिथे संरक्षण उभं करावच लागतं. :) जे निरर्थक असेल्,ते नाकारता अथवा रद्द करता येतच कि नंतर! मग हा सारखा नको..नको.. चा धोशा कशाला लावायचा???
@समानतेचे गुण गाणा-या आपल्या समाजात भिन्नतेची बीजं लहानपणापासून पेरली जातात. शाळेत मुलं मुली शिशुवर्गापासून वेगळे बसतात, इथपासून त्याची सुरुवात करता येईल. पुढे पदोपदी आपण वेगळ्या रांगा, वेगळ्या सवलती, वेगळे निकष, वेगळे नियम... सगळं वेगळंच बघत असतो. >>> मिशट्येक..मिशट्येक...मिशट्येक..झालि साह्येब तुमची! भिन्नतेच्या बीजांचं मूळ बीज धर्म-सामाजिक विषमता.. हे आहे.. आणि आपण खर्या नैसर्गिक वेगळेपणामुळे पाळायला लागणार्या आचारातून दिसणार्या वर्तनांची उदाहरणं -भिन्न्त्व..म्हणून देत आहात. जे बेसिकमधेच चूक आहे. त्यामुळे,तूलनाच चुकली हो तुमची. :)
@आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध माझं काहीच म्हणणं नाही. >> असायला हवं. :) तिथच गेम हाय..भाऊ! आपली संस्कृती ,स्त्रिला पोथिमधे दलित ,(अजुन पुढचे शब्द मी इथे लिहित नाही. :) ) मानते. आणि फक्त पोथितच मानत नाहि..तर व्यवहारातंहि अनेकांकडून तसं वागून घेते.आणि आपल्या पुरुषांमधल्या नैसर्गिक आक्रमकतेची सोय पहाते.. आणि अनुकूल काळात आपल्या पुरुषप्रधान संस्कृतिनी भरपूर हैदोस घालुन घेते/घातलेला आहे.. अशी (भरपूर अवांतर आणि शिव्याशापांचा धोका पत्करून..) इतिहासाच्या पानांवरून आपणास आठवण करून देऊ इच्छितो. :) [अजुन एक नोंदः- पोथ्यांमधे ज्यांनी ही सामाजिक (विषम..)आचारांची प्रकरणं(अध्याय..) लिहिली...ती समाजातल्या अत्याचारांनाच स्वाभाविक-सदाचार मानणार्या नरपशूंच्या आज्ञेनी आणि त्यांच्याबरोबर आर्थिक्/सामाजिक स्वार्थापोटी हातमिळवणी करून लिहिलेली आहेत...]
@परंतु हा विचार नक्की येतो की कदाचित याच भिन्न वागणुकीचं रुपांतर वयानुसार, कुतुहल, आकर्षण, डेस्परेशन, मधे होतं आणि पर्यवसान गुन्ह्यात होतं. अर्थात, संस्कार हा मोठा 'फॅक्टर' तिथे नसेल तरच. >> ह्ये तुम्हि मानसशास्त्रच बोल्लात जवळ जवळ! त्यामुळे ह्ये येकदम मान्य!
@तरीही या दोन गोष्टींना सकारात्मक वळण लावता येऊ शकतं. कायद्यांची कडक अंमलबजावणी, शीघ्र शासन झाल्यास महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे कमी होतील. तसंच मुलांच्या मनातील (इथे मुलांच्या म्हणतो कारण गुन्हे हे बहुतांश वेळा मुलांकडून/पुरुषांकडून च घडतात) कुतुहलास वेळीच योग्य वळण दिल्यास त्याचं रुपांतर डेस्परेशन आणि क्राईम मधे होणं टळू शकेल. >>> हे कुतुहलास वेळीच योग्य वळण दिल्यास... द्यायचं म्हणजे नक्की काय द्यायचं??? मला ते सेक्सविषयी (शाळांमधुन) द्यावं लागणारं शिक्षण! ..असं वाटंत.. पण यालाहि पुन्हा संस्कृतीवाल्यांचा विरोधच असतो. म्हणजे अनैतिक मार्गांनी मजा लुटायला आवडते,आणि त्या विकृत मजेला योग्य मार्गावर आणायला अवडतच नाही..! याला काय म्हणावे??? विरोधाभास की लबाडी? :)
11 Feb 2015 - 5:43 pm | स्पा
चान चान
11 Feb 2015 - 5:47 pm | वेल्लाभट
@१ जुनेही राबवा नवेही करा वाटल्यास. पण अंमलबजावणी झाल्याशी मतलब
@२ नको नको ऐवजी तुम्ही 'हवं ! अरे पण किती आणि कुठे कुठे?' असं वाचा ते पटत असेल तर
@४ संस्कृतीविषयी बोलणं फार धारिष्ट्याचं काम बाकी. मला एवढंच माहिती आहे; की संस्कृतीला हात घालण्यापेक्षा संस्कारांवर विचार केला तर बरं.
@६ दोन्ही; बहुदा.
11 Feb 2015 - 5:50 pm | वेल्लाभट
वरचा प्रतिसाद तुम्हाला होता
11 Feb 2015 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा
:)
11 Feb 2015 - 5:48 pm | सर्वसाक्षी
स्त्रीला कळत नकळत होणार वा अनिच्छेने सहन करावा लागणारा स्पर्श टाळण्यासाठी पुढील आसन स्त्रीली देउ करणे योग्य आहे. किंबहुना जेव्हा एका गाडीतुन ५ जणांना जायची वेळ येते, म्हणजे पुढे चालक + १ व मागे ३ तेव्हा साहजिकच मुलीला पुढे बसायला सांगतात व तिघे पुरूष दाटीवाटीने मागे बसतात.कुणी सहेतुक स्पर्श करेलच असे नाही पण तरीही परपुरुषाचा अवांछित स्पर्श स्त्रीला नकोसा वाटणे स्वाभाविक आहे. जिथे शक्य असेल तिथे पर्याय स्विकारायला हरकत नसावी.
मात्र असा नियम केल्यास स्त्रीला पुढेच बसणे सक्तिचे असावे. अनेकदा बस मध्ये महिलांसाठी आरक्षित आसने रिक्त असतानाही स्त्रीया अन्य सामाईक जागांवर बसतात आणि नंतर येणार्या उतारुंना उभे राहावे लागते.
मात्र केवळ स्त्रीच्या तक्रारीवरुन पुरुषांना विनाचौकशी शिक्षा करणे हे भायानक आहे. ४९८ अ च्या कृपेने अनेक निरपराध व मानाने आयुष्य जगलेल्या वयोवृद्धांना अखेरच्या दिवसात तुरुंगाची हवा खावी लागल्याची उदाहरणे आहेत.
सिंगापूरात फटक्यांची शिक्षा आहे पण केवळ कुणाच्या तरी तक्रारीवरुन कुणालाही पकडुन विनाचौकशी विनापुरावे फटकावल्याचे ऐकिवात नाही. तिथे सगळ्याच गुन्ह्यांना कडक शिक्षा आहेत.
अवांतर - बहुतेक वेळा तुम्ही उल्लेखलेल्या देशात स्थानिक स्त्रीने परदेशी पुरुषाची तक्रार केली तर हात तोडणे तात्काळ आमलात आणले जाते पण परदेशी स्त्रीने स्थानिक व्यक्तिविरुद्ध तक्रार केल्यास अशीच कारवाई अशाच तत्परतेने होते का? मी स्थानिकांच्या बाजूने झुकते माप दिले जात असल्याचे ऐकुन आहे.
11 Feb 2015 - 5:52 pm | वेल्लाभट
आणि त्या दिल्या जातात. एवढं जरी झालं तरी बास.
11 Feb 2015 - 6:40 pm | काळा पहाड
हे दोन्ही बाजूनी हवं. म्हणजे ४९८ अ खाली शिक्षा करा पण जर तक्रार खोटी निघाली तर स्त्री ला व तिच्या माहेरच्यांना फक्त आणि फक्त मृत्यूदंड दिला जावा. फ्रॉड वगैरे शिक्षा नाही चालणार.
11 Feb 2015 - 6:46 pm | काळा पहाड
या प्रश्नावर एकच उपाय आहे. ईव्ह टीजिंग पासून ते बलात्कारापर्यंत सर्व गुन्ह्यांना जर ते सिद्ध झाले तर अघोरी शिक्षा हव्यात. उदाहरणार्थ बलात्कार करणार्याला उघड फाशी देणे आणि त्याच्या घरच्यांना त्यांची संपत्ती जप्त करून भिकेला लावणे. ईव्ह टीजिंग करणार्याचे डोळे काढणे इत्यादी. त्यासाठी या शिक्षांवर ऑब्जेक्षन घेणार्या ह्यूमन राईट अॅक्टीव्हिस्ट्स ना पहिल्यांदा गायब करायला हवं.
11 Feb 2015 - 7:15 pm | बॅटमॅन
चान चान
11 Feb 2015 - 7:32 pm | हाडक्या
@काप
आमचेपण चान चान.
( आमचा महान भारत असाच प्रगती करत राहो आणि एक दिवस तुमच्या स्वप्नातले प्रत्यक्षात येवो.!!)
11 Feb 2015 - 7:28 pm | गणेशा
वेल्लाभट तुम्ही मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याशी मी सहमत आहे. खरेच योग्य कडक शासन असणे हीच खरी काळाची गरज आहे.
पुराव्याशिवाय शासन असे नाही तर पुरावे सिद्ध झाल्यास जरी कडक अआणि तत्काळ शासन झाले तरी खुप गुन्हे कमी होतील.
बलात्कार करणार्यास फाशी आणि ती देता येत नसेल तर निदान त्याचे हात तरी तोडले पाहिजेत त्यामुळे बलात्कार करणारा भामटा ही विचार करुन पाउल टाकेन.
फक्त स्त्रीविरोधीच अपराधास कडक शासन नाही तर चोरी आणि इतर तत्सम गुन्ह्यांना ही कडक शासन व्हायला हवे.
--
बाकी अवांतर: लोकसंख्या वाढीमुळे बर्याच गोष्टी प्रलंबीत आणि सर्वांपर्यंत पोहचत नाहीत आणि बर्याच सोयी सुद्धा अपुर्या पडतात त्यामुळे त्यावर पण लक्ष दिले पाहिजेत
12 Feb 2015 - 2:04 pm | मनो
कोणे एके काळी पँरिसमध्ये खिसेकापुंचा सुळसुळाट झाला. इतका की अगदी पोलिसांचेही खिसे कापले जाऊ लगले. मग जनतेच्या मागणीवरून पार्लमेंटने या समस्येचा कायमचा बंदोबस्त करण्याचा एक खात्रीशीर उपाय म्हणजे एक नवीन कायदा पास केला. खिसेकापुना सरळ फाशी द्यायचे, तेही जाहीर फाशी - भर चौकात सर्वांसमक्ष गिलोटिनखाली मन कापायची, मग कुणाची हिम्मत होईल पुन्हा खिसे कापायची? तर मग एकामागून एक खिसेकापू पकडले गेले आणि फाशीही चढले. फाशीचा समारंभ म्हणजे एक जत्राच भरू लागली आणि शेकडो लोक फाशी पाहण्यासाठी चौकात जमू लागले. त्या जमलेल्या गर्दीचा फायदा घेउन गर्दीतल्याच लोकांचे खिसे कापले जात होते.
तात्पर्य मनुष्यस्वभाव शिक्षेच्या भीतीने बदलत नाही.
बाकी चालू द्या - फाशीच्या मागणीला आपलापण पाठींबा.
12 Feb 2015 - 3:17 pm | काळा पहाड
हो पण त्या गोष्टीचे फायदे पण पहा ना.
१. लोकसंख्या कमी होते. भारतात ती कधी तरी कमी करावीच लागणार आहे. निदान कचरा जनता तरी संपेल. हे लोक तसेही फुकटेच असतात.
२. खटला चालवायचा खर्च कमी, तेवढे खटले ही कमी, या कचर्याला जेल मधे पोसायचा खर्च नाही.
३. जनतेला धास्ती बसेल. जनता गुन्हे करत नाही ते धास्ती मुळे, नीतीमत्तेशी संबंधीत दडपणामुळे नव्हे.
४. पोलीस अधिकार्यांना लाईव्ह शूटींग टार्गेट मिळतील. त्यांच्या प्रॅक्टीसचाही प्रश्न सुटेल.
५. तत्काळ न्याय मिळेल.
13 Feb 2015 - 3:41 pm | हाडक्या
तुमच्यासारख्या लोकांना इसिस मध्ये जबरा स्कोप आहे बघा. नायतर असं करा नं, आपल्या प्रिय देशात तुमच्या सारख्या सम विचारी लोकांना घेऊन तुम्हीच भारतीय इसिस काढा.
तुमचे कालचे आणि हा आजचा प्रतिसाद फार डोक्यात जाणारा आहे साहेब.
माणसांना संधी नाकारणारा, अगदी जगण्याची संधी नाकारणारादेखील समाज तुम्हाला हवाय, ही तर विकृतीच झाली.
अशा विचारांचा निषेध .. :(
16 Feb 2015 - 9:05 am | काळा पहाड
त्याचं कसं आहे ना साहेब, की बायकांची छेड काढणं, विनयभंग आणि बलात्कार करणं ही माझी 'संधी'ची आणि 'जगण्या'ची कल्पना नाही. बाकी रांझ्याच्या पाटलाला महाराजांनी जी भयंकर पद्धतीनं जी शिक्षा केली गेली होती ती पहाता तुम्हाला महाराजांनी पण इसीस मध्ये असायला हवं होतं असं वाटतं का? अर्थातच तुम्ही त्यावेळची परिस्थिती आणि आजची वेगळी आहे वगैरे सांगालच, पण नाही, गुन्हेगारांना जगण्याची संधी असावी असं मला वाटत नाही आणि ती विकृती आहे असंही वाटत नाही. निर्भया झाल्यावर मेणबत्या पेटवत बसणं ही मला विकृती वाटते. अशा लोकांचे डोळे आणि सालटी काढून त्यांना मिठाच्या पाण्यात बुडवणं मला प्रकृती वाटते. सॉरी.
16 Feb 2015 - 9:11 am | काळा पहाड
बाकी तुमच्या ह्युमन राईट्स वाल्या मनाला धक्का बसेल अशी घटना. अशा कचरा लोकांना महाराज कशी शिक्षा करीत याचा नमुना:
This is how Chhatrapati Shivaji Maharaj punishes a rapist.This punishment is more painful than a capital punishment.
The culprit is the Patil,the village head of a village named Ranjha.He had raped a woman before her husband and small kid.The punishment given by Shivaji is as follows- Shivaji says that there should be a permanent strip on his eyes so that he can't see a woman again.But his family should be taken care of.Keep him in Pune.He should be kept at Ganesh temple ,Kasba.Keep him in such a way that everybodywhile going or coming can spit on his face. Cut his hands and legs.
16 Feb 2015 - 11:08 am | वेल्लाभट
का.प.
सहमत !
+१
एखाद्याला फिजिकल टॉर्चर करणा-याला स्वतःला फिजिकल टॉर्चर म्हणजे काय असतं ते कळलं 'च' पाहिजे. जसा गुन्हा तसं शासन.
12 Feb 2015 - 6:46 pm | बॅटमॅन
दरवेळेस असे होईलच असे आजिबात नाही. सतीप्रथादेखील बलपूर्वकच बंद करण्यात आलेली आहे.
13 Feb 2015 - 8:30 am | ज्योति अळवणी
लेखातील काही विचार पटले
14 Feb 2015 - 1:36 pm | विशाखा पाटील
आधुनिक कायद्यांमध्ये सार्वजनिक व्यवस्था आणि व्यक्तीचे हक्क या दोन्हींना लक्षात घेतलं जातं. आपण म्हणताय त्या व्यवस्थेत फक्त सार्वजनिक व्यवस्था लक्षात घेतली जाते, व्यक्तीच्या हक्कांना महत्व उरत नाही. हे लेखातच आहे -
भारतापासून फार लांब नसलेल्या देशांमध्ये एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाविरुद्ध तक्रार केल्यास त्या पुरुषाला स्पष्टीकरण द्यायची संधीही न देता शिक्षा होण्याइतपत कडक कायदे आहेत.त्या दिशेने जायचं सोडून आपण हे भ्याड पर्याय काढतो आहोत.
'त्या दिशेने' म्हणजे नेमके काय ?
कायदे कडक आहेत, तात्काळ शिक्षा होते म्हणून गुन्हे घडतच नाही, असं या भारतापासून फार लांब नसलेल्या देशातलं चित्र नाही. अशा घटना चार भिंतीच्या आत घडतात आणि त्याविरुद्ध व्यवस्थेकडे दाद मागण्याची अनेकदा संधीही मिळत नाही. दुर्बल घटकांवर - कामासाठी आलेले परदेशी स्त्रिया आणि पुरुष, स्थानिक स्त्रिया ह्यांच्यावर अन्याय होतोच. त्यामुळे केवळ कायदे आणि शिक्षा कडक असून भागत नाही.
15 Feb 2015 - 10:37 pm | पारा
खर थोडं विषयांतर आहे,पण नुकतीच वाचनात आलेली एक लिंक.
मूळ हेतू वेगळा असला तरी काही आकडे आहेत.
http://www.niticentral.com/2014/12/23/rape-india-becomes-worldwide-story...
17 Mar 2015 - 11:38 am | खबो जाप
ह्या सगळ्या भयंकर शिक्षा सुचवताना, लोकांना हे का सुचत नाही कि आपल्या पाल्यांना आपल्या वागण्या बोलण्यातून लहानपणापासून दुसर्याचा(स्त्री असो व पुरुष) आदर करणे का शिकवले जावू नये.
आम्हाला आमच्या वडिलधार्यांनी एवढेच सागितलं होत कि तुला तुझ्या घरच्यांना जी शिवी दिली जावू नये असे वाटते ती तू देवू नको.
तुझ्या बहिणीशी कोणी काही वागल्यावर तुला राग येयील तसे तू दुसर्याशी वागू नको.
बाकी नाडणे नाही आणि कुणी नडला तर सोडणे नहि.
आपणच आपल्या मुलांना आदर करायला शिकवला पाहिजे, काही गोष्टींवर बंधनं आलीच पाहिजेत.