लेकी सुनांच्या संसारात आईवडील मायेपोटी गुंतलेले असतात. एकमेकांना असलेल्या व्यावहारिक गरजांचे धागे जरी ह्या गुंतण्यात असले तरीही, आपल्या माणसांविषयीच्या प्रेमाचे रेशमी धागेच ह्या भावनिक गुंतण्यांत अधिक असतात. बरेचदा असे दिसते की नात्यांचे रेशमी बंध व्यवहार, व्यवसायांच्या काट्यांमधे अडकून दुखावले जातात. मग तयार होतो एक विचित्र गाठींचा गुंता......
माझ्या गप्पा ह्या लघुकथेमधे मला असेच काहिसे दाखवायचे होते. पण ते इतक्या सगळ्या शब्दांच्या गुंत्यामधे न अडकता. एखाद्या कवितेसारखे... फ़क्त काहीतरी जाणीव देत देत, पण अबोल.
ह्या कथेवर आलेले प्रतिसाद वाचून असे वाटले, की सगळे पैलू पूर्णपणे व्यक्त न करता एखादा मुद्दा मांडला तर खूप काही चर्चा करण्यायोग्य विषय झाकले जातात. केवळ जेवढे लिहिले आहे त्यावरून निश्कर्ष काढले नात्यांच्या दोन्ही बाजुंवर अन्याय होऊ शकतो. जीवन म्हणजे एखादी कविता नाही, तर मानवी संबंधांमधून निर्माण झालेली एक अत्यंत गुंतागुंतीची रचना असते. ही रचना समजाऊन घेण्याचा प्रयत्न साहित्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध मंचांवर सतत होत असतो. पण अजूनही ही जीवनाची रचना पूर्णपणे उलगडली गेलेली नाहीये.
नमनाला घडाभर तेल झाले. आता थोडक्यांत ह्या काथ्याकुटाचा उद्देश सांगतो. मुलाबाळांच्या संसारात वयस्कर आईवडिलांची भुमिका काय? व्यावहारिक आणि व्यावसायीक गरजांच्या रेट्यांत माणसांची मने सांभाळली जातात काय? आईवडिल लेकीसुनांबरोबर रहातात, त्याचे कारण एकमेकांच्या गरजा हे असेल किंवा नसेल. एकत्र रहाणे नेहमीसाठी अथवा अल्पकाळ असेल. पण ह्या एकत्र रहाण्यात मायेची भूक सगळ्यांनाच असते की नाही? की केवळ वयाने लहान असलेल्यांनाच ती असते?
माझ्या गोष्टीतली सिमा ही अशीच मायेच्या भुकेने व्याकूळ झाली आहे. आपले इथे असणे हे मुलांसाठी एक केवळ सोय म्हणून आहे? एक माणूस म्हणून आपल्या काय गरजा आहेत हे समोरच्याला जाणवते तरी की नाही? अगदी सिनेमातल्या सारखे मोलकरीण म्हणून वागवले नाही, तरी एक साधा संवाद जर घरातल्या माणसांबरोबर होत नसेल, तर फ़र्निचर आणि माणूस ह्यांत फ़रक काय राहिला? पैसा ह्यांनी खूप मार्मिक प्रतिसाद अशाच अंगाने दिला आहे.
वयस्क आईवडिलांनी लेकीसुनांच्या संसारात कसे वावरावे / वावरू नये?
सगळ्यांनाच असे काय करता येईल की जेणेकरून मने दुभंगली न जाता रेशीमबंध मजबूत होतील?
ह्रदय किती खोल गुंतू द्यावे की घुसमट न होता प्रेमळ रस चाखता येईल?
“छाप” “काटा” ह्या दोन्ही बाजू काय म्हणतांत?
विषय विशाल आणि बहुचर्चित आहे. पण अजूनही नेमके काय करायला हवे ह्याचे निदान भल्याभल्यांनाही होत नसते. अर्थात “One size fits all” असे सर्वसमावेशक उत्तर अपेक्षितही नाही आणि ते तसे नसते देखील. पण तरीही ह्या निमित्याने ह्याचा (भलेही पुन्हा एकदा) उहापोह होऊन काही मार्गदर्शक खुणा जरी (पुन्हा) बाहेर आल्या तरीही नसे थोडके.
प्रतिक्रिया
25 Jan 2015 - 5:50 am | मुक्त विहारि
तसे असेल तर मग माझे विचार मांडतो...
25 Jan 2015 - 7:18 am | अरुण मनोहर
Old age problem हे जरा सरसकट झाले. एकत्र रहातांना आईवडिलांनी आणि मुलांनी नक्की कसे वागायचे, रीएक्ट व्हायचे ह्व्हायचे नाही, एकमेकांच्या मानसिक स्वास्थ्या साठी कोणते अधिक ठिक, वाईट इत्यादी इत्यादी..
25 Jan 2015 - 6:10 am | चौकटराजा
मायेच्या प्रेमाच्या धाग्यांपेक्षा स्वार्थाचे धागे अधिक घट्ट असतात. गरजा माणसांना एकत्र ठेवतात. पण ऐहिक सोय झाल्यानंतर देखील सहवासाची, संवादाची भूक माणसामध्ये शिल्लक असते. अशी भूक फार कमी लोकांमध्येय असते कारण संदेवनशक्ती. शतेषु जायते शूरः प्रमाणे संवेदनाक्षम माणूस हा देखील जन्मालाच यावा लागतो. दोन पिढ्यांची सांगड ही व्यवहार, वास्तवता व भावना यांच्या संगमानेच घातली गेली पाहिजे. आपण मुलांच्या सदैव, त्रिकालाबाधित हितासाठीच आहोत अशा समजूतीने आई वडीलांनी वसा घेतल्याप्रमाणे वागूच नये. काही गोष्टी त्यांच्या नशीबावर व कर्मावर सोडणे ही गरजेचे आहे.
25 Jan 2015 - 7:21 am | अरुण मनोहर
भारतीय संस्कृती ने आपल्याला नशिबावर सोडणे ही अप्रतिम अफुची गोळी दिली आहे.
पण तर्क निष्ठ विज्ञानाने ते कसे मानावे?
25 Jan 2015 - 12:41 pm | चौकटराजा
कोणत्याही संस्कृतीचा, काळाचा , देशाचा , नशीबाशी संबंध असतोच. देवाचे अस्तित्व न मानणारा देखील नशीबाचे अस्तित्व मान्य करतो. उदा. मीच. आपण परफेक्टली अष्टावधानी नसतोच सबब नशीब आलेच. कित्येक वर्षात न आलेल्या गारठ्याने
हिटलरचे सर्व मनसुबे उधळून लावले हे नशीब नाहीतर काय ? नेपोलियन म्हणत असे " योद्धा नुसता शूर, कल्पक असून
उपयोगी नाही तो नशीबवान देखील असावा लागतो.
25 Jan 2015 - 8:48 am | स्पंदना
माझा जो प्रतिसाद होता तो माझ्या सिंगापुरातल्या अनुभवावर होता.
तुमच्या कथेतली सीमा तर नवर्याकडुन सुद्धा दुर्लक्षीत वाटते.
मी जे पाह्यले ते असे होते की बाळ लहाण आहे म्हणुन सहा महिने आई आणि सहा महिने सासू अश्या फेर्या चालायच्या. अन मग स्वतः कामावरुन आल्यावर आयत पानावर बसायला मिळावं अशी अपेक्षा असायची.
मुलांच्या संसारात आईवडिलांचा रोल काय यापेक्षा आपल्या संसारात आपली जबाबदारी काय याचा उहापोह होण्याची जास्त गरज वाटते.
25 Jan 2015 - 10:52 am | मुक्त विहारि
पालकांसाठी....
१. मुलाचे किंवा मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलांनी बोलावल्याशिवाय त्यांच्याकडे जावू नये.
२. मुलांना स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवू देत, ह्या जगात माणसाला सोडवता येणार नाही, असा एक पण प्रॉब्लेम नाही.
३. मालिकांपासून दूर राहणे हे कुठल्याही वयात योग्यच.१९७०-१९८०च्या काळांत माझ्या ८५वर्षांच्या आज्जीला कधी मालिकांची गरज भासली नाही, मग आत्ताच कशाला.ती कादंबर्या वगैरे वाचायची.
४. मुलांनी मागीतल्या शिवाय मदतीला जावू नये.आपला मान राहतो.त्यांनी बोलावले तर आपल्या अटींवर जावे.अटी समंजस पणे सांगाव्यात आणि त्या पण आपल्याच पाल्याला.आमच्या आजीच्या भाषेत सांगायचे तर, मातीचे कुल्ले पावूस पडला तर विरघळतात आणि चिखल हातात उरतो.
पाल्यांसाठी...
१. आई-वडील सर्वश्रेष्ठ.
२. स्वतःची मीठ-भाकरी आणि झोपडी म्हणजे स्वर्गसूख.
३. म्हातार्या माणसांना विश्रांतीची गरज असते, त्यामुळे श्रावण बना.
४. पालकांचे आपल्या सगळ्याच मुलांवर सारखेच प्रेम असते.पण त्यातही जो/जी कमी असेल तिथे थोडे जास्तच.त्यामुळे आपल्याच भावंडांचा द्वेष करू नका.
थोडक्यात काय तर घरातील प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळली आणि दुसर्या व्यक्तीचे मन जाणून घेतले तर, एकत्र कुटुंब पद्धत सगळ्यात मस्त.
एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे पुरेपूर उपभोगणारा
मुवि.
25 Jan 2015 - 11:43 am | सोत्रि
मुवि,
_/\_ _/\_ _/\_
दंडवत स्विकारा!
- (विभक्त कुटुंबपद्धतीचे फायदे पुरेपूर उपभोगणारा) सोकाजी
25 Jan 2015 - 4:05 pm | अजया
एकत्रित कुटुंब पध्दतीला विरोध नाही परंतु प्रत्येकाला स्पेस न मिळणे,कोणीही कोणालाही गृहित धरणे ,अपेक्षाभंगामुळे होणार्या कटकटी या सर्व गोष्टींचा विचार करता स्वतंत्र पण फटकून नाही,सणासुदीला आजारपणाला गरजेला एकत्र अशी कुटुंबपध्दती बरी वाटते.
दुसरे कारण म्हणजे आपल्याला आपले पालक जरी अगदी मनमिळाऊ जुळवून घेणारे इ इ वाटले तरी घरात लग्न करुन अाणलेल्या व्यक्तीशी ते असुरक्षित वाटून वेगळे अनप्रेडिक्टेबल वागू शकतात.अशावेळी भांडणे करुन विभक्त राहाण्यापेक्षा सुरुवातीपासूनच विभक्त राहाणे पण रोजची विचारपूस,गरजेला आजारपणाला धावून जाणे हा उत्तम उपाय वाटतो.
अर्थात हा अतीच पर्यायही वाटू शकतो परंतु ती हळूहळू काळाची गरज होत जाते.सुखद अपवाद अर्थातच असणार!
25 Jan 2015 - 4:30 pm | सस्नेह
एकत्र कुटुंबापेक्षा जवळपास राहून वेळा जपणे छान.
रक्ताची नाती नाकारून तुटत नाहीत. थोडी सहनशीलता, समंजसपणा, नदुखावता स्पष्टवक्तेपणा यांनी हे नक्कीच साध्य होईल.
29 Jan 2015 - 8:00 pm | पैसा
उत्तर देणं इतकं सोपं नाही. एकच एक उत्तर सगळ्या परिस्थितींमधे लागू होणार नाही. मात्र दोन्ही पिढ्यांनी "सुरक्षित अंतर" ठेवून रहावे हे उत्तम. म्हणजे दोघांनाही जेव्हा गरज पडेल तेव्हा धावून जाऊन अडचण दूर करण्याची तयारी असली पाहिजे. तोही जुलमाचा रामराम म्हणून नव्हे किंवा कोरडं कर्तव्य म्हणून नव्हे. त्याचवेळी वृद्ध हे अडगळ वाटता नयेत, किंवा जास्त लुडबुड करतात असेही वाटता कामा नये. तरूण पिढीनेही मदत मागताना संकोचू नये, कारण इतर जगापेक्षा तेच सगळ्यात जवळचे असतात. मात्र कोणत्याही नात्यात अपेक्षा किंवा परतफेड होईल अशी आशा ठेवली बहुधा निराशाच पदरी येते. आसक्ती न ठेवता मदत करायची आणि वेळ ओळखून बाजूला व्हायचं हे फार कठीण आहे. विशेषतः बायकांना. कारण स्वयंपाकघराचा ताबा दुसरीला दिला की त्यांना बरेचदा आपलं जग बुडल्यासारखं वाटायला लागतं. वडिलांनीही मुलांना विचारलं तर मार्गदर्शन करावं, पण मी म्हणतो तसंच झालं पाहिजे असा आविर्भाव असू नये.
मुळात मुलांना वाढवताना चांगलं वाईट काय याची समज आणि विचार जर देता आले तर फार प्रश्न उभे राहू नयेत. पण ही आदर्श परिस्थिती झाली. बरेचदा सत्य याच्या डावी-उजवीकडे कुठेतरी असतं. ज्याला सगळ्याचा समतोल साधता आला तो जिंकला!
30 Jan 2015 - 3:38 am | अरुण मनोहर
खरंतर आपण व्यवस्थित विचार केला, तर आपले आपल्याही कळू शकते. पण आपण आपल्याकडे त्रयस्थपणे पाहू शकत नाही नां! आपण गुंतलेले असतो. गुंत्यामधे आपणच आपली घुसमट करून घेतो!
सगळ्याच प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद. ह्या चर्चेमधे बरेच विचार मनाला भावले. त्यांतले आंदोलने मागे सोडणारे काही इथे देत आहे......
चौकटराजा -
आपण मुलांच्या सदैव, त्रिकालाबाधित हितासाठीच आहोत अशा समजूतीने आई वडीलांनी वसा घेतल्याप्रमाणे वागूच नये.
मुक्त विहारि -
मुलांनी मागीतल्या शिवाय मदतीला जावू नये.आपला मान राहतो.त्यांनी बोलावले तर आपल्या अटींवर जावे.अटी समंजस पणे सांगाव्यात आणि त्या पण आपल्याच पाल्याला.
पैसा - “Bull’s eye” comments! एकेक वाक्य लक्षात ठेवण्यायोग्य! पण त्यामधेही हे खास!---->
आसक्ती न ठेवता मदत करायची आणि वेळ ओळखून बाजूला व्हायचं हे फार कठीण आहे.विशेषतः बायकांना. कारण स्वयंपाकघराचा ताबा दुसरीला दिला की त्यांना बरेचदा आपलं जग बुडल्यासारखं वाटायला लागतं. वडिलांनीही मुलांना विचारलं तर मार्गदर्शन करावं, पण मी म्हणतो तसंच झालं पाहिजे असा आविर्भाव असू नये.