मिपावर ह्याआधी यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरावर असंख्य लेख तसेच छायाचित्रे येऊन गेलीत. पण इथल्या पौराणिक शिल्पपटांचे फारसे वर्णन आल्याचे मात्र अजिबात दिसले नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे मी मंदिराचे इतर वर्णन न देता येथील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा मात्र अल्पसा प्रयत्न करतोय. रामायण, महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पपटांबरोबरच येथील काही आगळीवेगळी शिल्पेही आपण विचारात घेऊयात.
भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे.
चला तर एकेक शिल्पपट पाहूयात. रामायणपटापासून सुरुवात करुयात.
इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
१. राम, लक्ष्मण आणि सीता
यानंतर आपल्याला दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो तो आपण पुढे पाहूच.
२. रामायण अखंड शिल्पपट
आता यातील एक एक प्रसंग आपण विस्ताराने पाहूयात.
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. माझ्या मते हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा. नक्की कुठला ते मात्र सांगता येत नाही.
उजवे बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. ही बहुधा कौसल्या असावी जी अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी शक्यताच मला अधिक योग्य वाटते.
याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट (डावी बाजू)
यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. पैकी त्यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे. काही मिपाकरांनी आमच्या सोबत ह्या दोन्ही पटांचे दर्शन घेतलेले आहे.
त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारीचवध.
पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
५. मारिचवध
ह्याच्या समोरील पट मात्र मी भुलेश्वरच्या असंख्य वार्या करूनही अजूनही संपूर्णपणे बघू शकलो नाही किंवा ओळखू शकलो नाही. ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे मात्र ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
६. हाच तो अगम्य शिल्पपट
इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात.
आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे.
महाभारतातील शिल्पपट मात्र संपूर्ण आणि सलगपणे आजही बर्यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत.
रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
आधी आपण द्रौपदी स्वयंवर शिल्पपट पाहूयात.
ह्यातही रामायणातील अखंड पटाप्रमाणेच पाच प्रसंग कोरलेले असून मध्यभागी अर्जुनहस्ते मत्स्यभंग असून दोन्ही बाजूला खालीवर असे दोन दोन पट कोरलेले आहेत.
७. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट
यातील आता उजवीकडचे दोन पट आता आपण पाहूयात.
यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे.
द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
८. द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू)
यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
९. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू)
डाव्या बाजूच्या शिल्पपटामध्ये द्रौपदीस्वयंवरानंतर अर्जुन हा द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आलेला असून भिक्षा आणलीय असे म्हणून द्रौपदीची ओळख कुंतीला करून देत आहेत. तर त्याच्या बाजूला डावीकडे व्यास मुनी हे द्रौपदीचा पाच पतींशी विवाह कसा समर्थनीय आहे हे कुंतीला पटवून देत आहेत असे वाटते.
ह्याच्याच खालच्या बाजूला कृष्ण आणि कुंतीसह इतर पांडवांची भेट दाखवलेली आहे.
१०. द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू)
याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे जो आपण नंतर पाहू. सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु होतो.
हा शिल्पपट सुरु होतो अर्जुन भीष्म यांच्या युद्धापासून. ह्या शिल्पपटांछ्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते योद्धे अगदी सहजी ओळखू येतात.
ह्या पटात अर्जुन भीष्माशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चततुर्भुज विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे. तर त्याच्या समोर भीष्म तालध्वजासह रथावर आरूढ आहे.
११. अर्जुन -भीष्म युद्ध
ह्याच्या पुढचा पट आहे तो भीष्म वधाचा.
कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मि युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
१२. भीष्मवध
यांनंतर ह्याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा.
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
१३. भीष्म शरशय्या
यानंतरचा शिल्पपट आहे द्रोणपर्वातील. जो भीष्मपर्व आणि द्रौपदी स्वयंवर यामधील भागात आहे.
१४. द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट)
यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित जे त्यांच्या सुवर्णमय कमंडलू च्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी युद्ध करणारा पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा.
१५. द्रोण व पांचालवीराचे युद्ध
ह्यानंतर कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. ह्याच्या पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच.
एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
१६. अर्जुन- कौरववीर युद्ध
१७. भीम-गजयुद्ध
ह्याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला.
ह्यात एक पांडवयोद्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही योद्धा मला माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या असा महाभारतात उल्लेख आहे पण तो ह्या आकृतीशी जुळत नाही.
शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
१८. शल्ययुद्ध
इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात.
ह्याव्यतिरिक्त भुलेश्वर मंदिरातील काही आगळीवेगळी शिल्पे आहेत. यापैकी येथील छतांवर असलेली मातृकांची शिल्पे सर्वपरिचित असल्याने मी येथे त्याची पुनरुक्ती टाळत आहे. मात्र मंदिराच्या मागच्या डाव्या बाजूचे भिंतीवर चामुंडेचे एक भग्नावस्थेतील अप्रतिम शिल्प आहे.
प्रेतवाहिनी चामुंडा अस्थिपंजर देहासह उभ्या स्थितीत असून तिचा चेहरा भयानक आहे. ओठांतून दाढा बाहेर आल्या असून तिच्या पोटात विंचू आहे जो तिच्या राक्षसी भुकेचे प्रतिक आहे. पायांतळी प्रेत आहे.
इथल्या माझ्या सर्वाधिक आवडीच्या शिल्पांपैकी हे एक.
१९. चामुंडा
ह्या शिवाय भुलेश्वर मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणाजे इथे इतके स्तंभ असूनही फक्त स्तंभाच्या मधल्या चौकटीवर शिल्प आहे. इतर सर्व स्तंभचौकटी ह्या शिल्पविरहीत आहेत.
ह्या चौकटीवर नर्तिक नृत्य करत असून दोन्ही बाजूंना वादक वादन करत आहेत.
२०. स्तंभचौकटीवरील एकमेव शिल्प
भुलेश्वर मंदिरातील अजून रोचक शिल्प म्हणजे एक आभासी शिल्प.
ह्यात तीन पुरुष असून ते एकमेकांना जोडलेले आहेत. आणि पाय मात्र चारच आहेत. म्हणाजे प्रत्यक्षात एकाच वेळी दोन पुरुष उभे असून ते पाय एकमेकांना जोडले असल्याने तिघा जणांचा आभास निर्माण करीत आहेत. हे अतिशय भग्न शिल्प असले तरी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्वपरिचय असल्याने हे शिल्प ओळखू येतेय. चांगल्या अवस्थेत असताना हे शिल्प अतिशय देखणॅ असणार यात काहीच शंका नाही.
अशीच शिल्पे मी पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि पिंपरी दुमाला येथील सोमेश्चर येथील यादवकालीन मंदिरांत पाहिली आहेत.
२१. आभास निर्माण करणारे शिल्प
तुलनेकरीता अनुक्रमे ह्या पेडगाव आणि ह्या पिंपरी दुमाला येथील ह्या प्रतिमा बघा
२२.
२३.
आणि जाता जाता माझ्या सर्वाधिक लाडक्या हिच्याशिवाय भुलेश्वर वारी कशी काय पूर्ण होईल.
२४. हीच ती जगप्रसिद्ध दर्पणसुंदरी
प्रतिक्रिया
22 Jan 2015 - 10:36 pm | मुक्त विहारि
वाखूसा आहे.
आता आधी पहिला प्रतिसाद नोंदवून मग शांतपणे लेखाचा आस्वाद घेतो.
22 Jan 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळे फोटो अतिशय आवडले.
22 Jan 2015 - 10:44 pm | सूड
जगप्रसिद्ध??
22 Jan 2015 - 10:45 pm | एस
मलातर दहा टक्केच ओळखू आलं!
22 Jan 2015 - 10:49 pm | नांदेडीअन
वा वा वा
भुलेश्वरोपिडियाच !
23 Jan 2015 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा
ह्येच म्हन्तो! आगुबाबा..मंजी भुलेश्वरोपिडियाच हाय! आता ह्ये बी वेरुळा सारखं येक दिस ह्या आगुबाबाला न्येऊन लैव व्हिडो चित्रनात क्याच-केलं पायजेन! त्या शिवाय समादान व्हायचं न्हाई आमचं.
आगं बाबो... ! ह्ये असं पन हुत असतय का? मंग ह्ये परत जागच्या जागी लावायचा उपाय काय व्हो??? का आता ह्ये असच र्हायचं आपल्या(च) मायबाप सर्कार कृपेनी?
23 Jan 2015 - 9:51 am | खटपट्या
मागचा वेरूळचा व्हीडो अजुन टाकताय :)
22 Jan 2015 - 10:53 pm | प्रसाद गोडबोले
सुरेख !!
23 Jan 2015 - 12:41 am | कंजूस
रामायण, महाभारत पटांना मध्यवर्ती विषय ठेवून भुलेश्वर लेख लिहिल्यामुळे फार आवडला. कर्नाटक तामिळनाडूइतका शैव- वैष्णव वाद मऱ्हाठिचिये नगरीत बहुतेक नसावा तरीही अशी संमिश्र शैलीची देवालये इकडे विरळाच. शिवाय वेगळी रचना असलेले हे देऊळ विशेष लक्षात राहाते.
मागच्या महिन्यात इथे केवळ हे देऊळ कुठे आहे आणि तिथे कसे जायचे यासाठी माझी एक धावती भेट झाली होती. आता अजून दोन फेऱ्या कराव्या लागणार. वल्लीच्या या लेखाचा फार उपयोग होणार आहे. स्थापत्य आराखडा आणि शिल्पांसाठी आणलेला काळा दगड यातही भुलेश्वर आगळेवेगळे आहे. पुणे सोलापूर भागातल्या जेजूरी, पंढरपूराकडे भाविकांचा ओढा राहून इकडे थोडे दुर्लक्ष झाले ते शिल्पप्रेमींच्या पथ्यावर पडले आहे. अगदी शांतपणे शिल्पे पाहता येतात.
23 Jan 2015 - 9:08 am | यशोधरा
अतिशय सुरेख! भुलेश्वरातली शिल्पे अतिशय देखणी आहेत आणि ह्या मंदिराची कितीदा तरी फेरी केली तरी समाधान होत नाही हेच खरे. तुमची लाडकी दर्पण सुंदरी तर खरेच सौंदर्यवती आहे! :)
23 Jan 2015 - 9:26 am | अजया
वल्लीलेख घेऊन भुलेश्वर वारी करणे आले!
23 Jan 2015 - 10:06 am | विशाल कुलकर्णी
वाह सुंदर !
एखादी शिल्पकृती या नजरेनेसुद्धा पाहता येते हे लक्षातच आले नव्हते. यापुढे लक्षात ठेवीन.
लेख आवडलाच :)
23 Jan 2015 - 10:28 am | कंजूस
इकडे जाताना एक बारा व्होल्टचा किसान टॉर्च अवश्य नेणे.
23 Jan 2015 - 10:32 am | यसवायजी
कसलं लिहिता हो तुम्ही.. भारीच!!
कस्काय जंम्त राव?
23 Jan 2015 - 2:49 pm | सूड
असेच म्हणतो.
24 Jan 2015 - 10:38 am | लॉरी टांगटूंगकर
+१
23 Jan 2015 - 10:39 am | अनुप ढेरे
मस्तं!
23 Jan 2015 - 2:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
हे ठीकाण पहायचे राहुन जातेय बघा ...आता नक्की जाणार
23 Jan 2015 - 2:51 pm | मदनबाण
शांतपणे बसुन वाचीन...तुर्तास ही पोच...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
24 Jan 2015 - 2:49 pm | गणेशा
वल्ली दा ... मध्ये बरेच दिवस नसल्याने शांतपण ए सगळॅ लेख वाचावे असे मनात आनले होते .. तोच हा नविन लेख पाहिला. भुलेश्वर म्हंटले की माझा जिव्हाळ्याचा विषय ( माहीती असल्यामुळे नाही तर जवळच राहत होतो या कारणाने आपलासा वाटणारा). लहान पणा पासुन या मंदिरात जातो . तरीही तु दिलेली माहीती आणि ह्या नजरेने कधीही मी हे मंदिर बघितले नव्हते.
सासवडच्या माझ्या फ्रेंड ने नुकतेच सांगितले आहे आपण एक दिवस जावु या फिरायला जवळपास, त्याला भुलेश्वरच सांगण्यात आले आहे. बघु जेंव्हा जाईन तेंव्हा या लेखाची प्रींट घेवुन जाईन.
तरीही तु सांगितलेली माहीती असुनही, वरिल काही शिल्पात मला माणसे ओळखता आली नाही. मारीच वध एकदम आवडले.
24 Jan 2015 - 3:53 pm | प्रचेतस
लेखाची प्रिंट घेउन कशाला जातोस?
मलाच घेउन जा ना. :)
24 Jan 2015 - 4:08 pm | गणेशा
नक्कीच.
25 Jan 2015 - 7:30 am | मुक्त विहारि
सगा आणि अ.आ.ला पण घेवून जा.
अ.आ.नी मुहुर्त काढला तर आणि तरच वल्ली येतात.
(१४-१५ फेब्रुवारीला, वल्ली येणार नाहीत, हे समजल्याने)नाखूष मुवि.
(वड्याचे तेल वांग्यावर काढत आहे, असे समजलात तरी हरकत नाही.)
30 Jan 2015 - 10:33 am | नांदेडीअन
लेखाची प्रिंट घेऊन जाणेच चांगले.
काल भिगवनहून परत येतांना सोबतच्यांना या मंदिराबद्दल सांगितले.
थोडा भाव खाण्यासाठी त्यांना म्हणालो की तुम्हाला सगळ्या शिल्पांची माहितीसुद्धा देतो.
असे म्हटल्यावर सगळे जण भुलेश्वरला चलण्यासाठी तयार झाले.
मंदिरात जाऊन मोबाईलमध्ये हा धागा उघडण्याचा प्रयत्न केला, पण इंटरनेट चालतच नव्हते.
मंदिराबाहेर येऊन प्रयत्न केला तरी इंटरनेट चालले नाही.
अशा प्रकारे शो ऑफ करायचा चांगला चान्स घालवला मी. :(
24 Jan 2015 - 5:23 pm | चाणक्य
दगडात जान आणतोस यार वल्ली तू
25 Jan 2015 - 5:48 am | चौकटराजा
दगडात जान आणतोस यार वल्ली तू असे असेल तर वल्ली बुवा, पयले त्या दर्पणसुंदरीत जान आणा !
मग तुमच्या सवे दगडशत्रू 'सगा' जटील विषयावरचे पुस्तक न घेता येतात की नाही ते पहा !
आता टॉर्च विकत घेणे आले.
वल्ली, आता वेळ न दवडता बेलूर पाहून या तिथे सुंदरींची स्पर्धाच लागलेली दिसेल.
25 Jan 2015 - 8:51 am | एस
फक्त त्या दर्पणसुंदरीचा फोटो काढायला एकदा भुलेश्वरास जाणार आहे. :-)
3 Dec 2015 - 2:13 am | एस
काढले तिचे फोटो एकदम मनसोक्त. इथे टाकेन नंतर. :-)
3 Dec 2015 - 9:11 am | प्रचेतस
सहीच.
तुम्ही काढलेल्या छायाचित्रांची वाट पाहात आहे.
3 Dec 2015 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
+१ टू आगोबा
27 Jan 2015 - 2:12 pm | स्पा
वल्लीचा अजून एक माहितीपूर्ण लेख, मजा आली
27 Jan 2015 - 3:34 pm | सूड
+१ असेच म्हणतो.
28 Jan 2015 - 3:54 pm | पैसा
सगळ्या शिल्पांचा अगदी बारकाईने अभ्यास करून लिहिलंय!
28 Jan 2015 - 4:04 pm | बॅटमॅन
एकच नंबर रे. लय मज्या आली वाचताना.
तदुपरि महाभारतवाल्या शिल्पांमधले बाण अगदी बी आर चोप्राच्या महाभारतातल्यासारखे दिसताहेत.
28 Jan 2015 - 4:41 pm | सस्नेह
हे सगळं घडवणारे ग्रेट आणि अब्यास करून लिवणारा त्याहून ग्रेट !
..आणि लिवणाऱ्याची दांडी उडवणारी ती दर्पणा म्हणजे क्या केहने !!
30 Jan 2015 - 10:18 am | जेपी
वाखु साठवेतो.
पुणे भेटीत आणखीन एक ठिकाण पाहायला पाहिजे.
30 Jan 2015 - 11:44 am | जागु
सुंदर.
2 Dec 2015 - 7:56 am | विशाल कुलकर्णी
मागच्या आठवड्यात भुलेश्वरला भेट देवून आलो. या लेखाची प्रिन्ट बरोबर घेवुनच गेलो होतो, त्यामुळे भुलेश्वर व्यवस्थित अनुभवता आला. धन्यवाद.
2 Dec 2015 - 9:29 am | प्रचेतस
मस्तच देवा.
तुमच्या शैलीत एक खास वृत्तांत येऊ द्यात.
2 Dec 2015 - 11:27 am | विशाल कुलकर्णी
मस्करी करता का राव गरीबाची. तुम्ही ताजमहाल चितारलाय. आता आम्ही काहीही लिहीले तरी त्याला बीबीच्या मकबऱ्याची तरी सर येईल का?
2 Dec 2015 - 11:10 am | योगेश आलेकरी
पलंगतोड परफॉर्मंस
2 Dec 2015 - 11:15 am | योगेश आलेकरी
कॉप्पी करुन घेऊ का...
शिल्पांचे फोटो भरपुर काढून आणलेत पण अर्थ लागत नव्हता.. आत्ता बरंच उमगलय...
2 Dec 2015 - 11:46 am | मालोजीराव
मस्त रे नक्की कोणकोणती शिल्प आहेत लक्षात येत नव्हतं, फोटूसकट माहिती टाकल्याने उमगलं .
बाकी हा ब्रम्हेन्द्रस्वामी म्हणजे लैच डेंजर माणूस पेशवे, शाहू छत्रपति, आंग्रे, जंजिरेकर सिद्दी सिद्दी एव्हड्या सगळ्यांचे हे गुरु. भुलेश्वर च्या जीर्णोद्धारासाठी पण त्या काळात लाख - सव्वा लाख खर्च केला यांनी. अध्यात्मिक गुरु असण्याबरोबरच मोठे सावकार हि होते स्वामी.
2 Dec 2015 - 1:49 pm | कविता१९७८
मस्त लेख
2 Dec 2015 - 2:51 pm | पद्मावति
केवळ अप्रतिम!
इतक्या सुरेख माहितीपूर्ण लेखाबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.
2 Dec 2015 - 3:03 pm | सत्य धर्म
हि शिल्पे कोणी फोडली ?????????
आपण खूपच असहिष्णू आहोत ?
2 Dec 2015 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा
इस्लामी आक्रमकांनी
2 Dec 2015 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले
श्यॅ !
आम्हाला वाटले की मनुवादी बाम्हण्यवाद्यांनी
2 Dec 2015 - 4:04 pm | राही
केवळ सुंदर अहवा छान म्हणून थांबणे जिवावर आलेय. पण आणखी काही लिहायचे म्हणजे अभ्यास आणि कुवत पाहिजे ती नाही. त्यामुळे लेख अतिशय आवडला एव्हढ्यावरच थांबलेले बरे,
2 Dec 2015 - 4:05 pm | राही
ते सुंदर अथवा छान असे पाहिजे.
2 Dec 2015 - 4:22 pm | भानिम
लेख आवडला. आता जाऊन पाहणे आले. अॅडेड टू बकेट लिस्ट!
2 Dec 2015 - 6:57 pm | गौरी लेले
अप्रतिम फोटो प्रचेतस अण्णा !
काय ती माहीती काय तो व्यासंग . वाह मज्जा आली :)
25 Feb 2021 - 1:37 pm | चौथा कोनाडा
वाह, नितांत सुंदर माहिती आणि अप्रतिंम प्रचि !
जाधवगड या लेखामुळे हा धागा आठवला
प्रचेतस +१
27 Feb 2021 - 5:14 pm | Bhakti
सुंदर धागा!