ही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट....तेंव्हा मी
कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर भराव्या लागणा-या आयकराचे
हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. सहाजिकच, भरावा लागणारा टॅक्स वाचविणेकरिता करावयाच्या गुंतवणुकीकरिता असे अधिकारी नेहमीच माझा सल्ला विचारीत असत.
तो 1999 सालचा मार्च महिना होता. मी आमच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे
कर्मचा-यांच्या गुंतवणुकीचे अंतिम तपशील घ्यायला सुरवात केली होती. आजही ‘टॅक्स वाचवणे म्हणजे NSC, PPF आणि LIC मघ्ये गुंतवणुक करणे’ या पलिकडे काही पर्याय असतात याची जाणिवही बहुतेकांना नसते, तेव्हा तर ती नव्हतीच नव्हती. माझ्या मते या अशा करबचती करिता असलेला त्यावेळचा (व आजचाही) सर्वोत्तम पर्याय निःसंशयपणे ELSS हा आहे, मात्र त्यात गुंतवणुक करणारा अक्षरशः एकही अधिकारी मला सापडला नव्हता….काही नवख्या वाचकांसाठी येथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही की ELSS म्हणजे ‘Equity Linked Savings Scheme’ होय, टॅक्स वाचविण्यासाठीच्या या प्रकारांत केलेली सर्वच्या सर्व, म्हणजे 100% गुंतवणुक ही या योजनेच्या नावात सुचविल्याप्रमाणेच शेअर्स मधे वर्ग करण्यात येते… तेंव्हा 'कोठारी पायोनियर' ह्या भारतातील पहिल्या खासगी म्युच्यअल फडाने (आजचा फ्रॅकलीन टेंम्पल्ट्न म्युचुअल फंड) आपल्या ‘टॅक्सशिल्ड-99' या ELSS योजनेअंतर्गत नव्याने युनिटस विकायला काढले होते. या नव्या ELSS च्या बरोबरीनेच याच फंडाची 'कोठारी पायोनियर पेंन्शन फंड' नावाची एक दुसरी करबचत योजनाही आधीपासुन बाजारात होती. ही त्याकाळची कर वाचविण्याकरिता उपलब्ध असलेली एकमेव ‘संतुलीत (Balanced) योजना होती, ज्यातील जमा रक्कमेचा थोडासा भाग (ELSS मधे गुंतविला जातो तसा) शेअर्स मध्ये, व उर्वरित सर्व भाग शेअर बाजाराशी निगडित नसलेल्या रोख्यांमधे गुंतविला जाणार होता.
माझा एक जवळचा सहकारी देवेंद्र याला टॅक्स वाचविणेकरिता रु.10,000 गुंतवावे लागणार होते. मी त्याच्याशी या बाबत चर्चा करताना 'कुठ्ल्याही परिस्थितीत त्याने NSC, PPF, LIC अशा 'पारंपारिक' योजनांत पैसे गुंतवु नये' असा मित्रत्वाचा आग्रह केला. मग उरल्या वर सांगितलेल्या दोन योजना... मी त्या दोन्ही योजना त्याला समजावुन सांगितल्या. नेमाने व्याजदर व परताव्याची हमी देणा-या सरकारी योजनांत निष्ठेने पैसे गुंतविणारा हा माझा मध्यमवर्गीय मित्र या दोन्ही योजना शेअर बाजाराशी निगडित आहेत आणि व्याजाचीच काय पण मुद्दलाची ही हमी त्यात दिली जात नाही हे ऐकुन भलताच नाराज झाला होता. शेवटी हजार शंका कुशंका काढुन देवेंद्र साहेबांनी 'त्यातल्या त्यात कमी धोका असलेली' योजना पेंन्शन फंड' मध्ये पैसे 'टाकायचे' असे ठरवुन माझ्याकडुन त्या योजनेचा फोर्म घेतला. झाले..मी तेथुन उठलो आणि याच कामासाठी शेजारीच असलेल्या त्याच्या बॉसच्या केबिनमधे डोकावलो. आमचे व्ही. पी., श्री. क्षीरसागर साहेब कामात बीझी दिसत होते..."सर, आपल्या टॅक्सचे काय करुया??" मी दबकतच विचारले. "सांग तुच,… काय करतोस??" -साहेब .."सर आपल्या P.F/LIC मधेच संपते लिमीट, जेमतेम 8/9 हजार गुंतवले की झाले' -मी. " बर, मग करुन टाक,.. चेक देतो” – माझ्याकडे बघण्याचेही कष्ट न घेता, साहेब….. माझे म्युचुअल फंडाचे घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत मी साहेबांनासुद्धा 'टॅक्सशिल्ड वि. पेंन्शन फंड' ही कथा सांगावयास सुरवात केलीच होती तोच, "ए बाबा... मला नको सांगु रे ह्या टेक्नीकल गोष्टी.. मी जरा कामात आहे...तुला जे हवंय ते कर , फक्त टेक्स वाचतोय ना ते बघ. हा घे चेक... आणखी सह्या कुठे ते सांग " असे एका 'दमात' म्हणुन साहेबांनी घाईघाईत फॉर्मवर सही केली आणि ताबड्तोब चेक देउन मला जवळजवळ केबीन मधुन हाकललेच..मी मात्र जणु मलाच मिळालेला तो कोरा धनादेश असावा ईतक्या आनंदाने तो ELSS म्हणजेच ‘टॅक्सशिल्ड 99’ मध्ये गुंतवला.
कालांतराने मी कंपनीतुन राजिनामा दिला, श्री. क्षीरसागर साहेबांनीही स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे, मात्र दुर्दैवाने माझा मित्र देवेंद्र एका अपघातात हे जग सोडुन निघुन गेला आहे. अगदी अलिकडे जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट लावताना माझ्या ह्या आठवणींना उजाळा देणारी काही कागदपत्रे सापडली, आणि ती पहाता क्षणीच ठरवले, की ही गोष्ट आपणा वाचकांबरोबर शेअर केलीच पहिजे…. सांगावयाची महत्वाची बाब म्हणजे माझ्या ह्या दोन्ही गुंतवणुकदारांचे फोलियोज अगदी आजमितीसही चालु आहेत. दरम्यानच्य काळांत योजनांची नावे काय ती फक्त बदलली आहेत
तुलनेने अधिक सुरक्षित अशा 'फ्रॅकलीन ईंडिया पेंन्शन फंड' (ग्रोथ प्लॅन)
मध्ये गुंतविलेल्या रु.10,000 च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य रु61,944.23
आहे. (खरेदी दि 19/03/99, खरेदीच्या वेळी NAV रु.13.27, दि 04 /07/14 रोजीची NAV
रु. 82.20)…त्याचवेळी सर्वस्वी शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबुन असणा-या,
आणि म्हणुनच सर्वसामान्यपणे धोकादायक समजल्या जाणा-या फ्रॅकलीन ईंडिया
टॅक्सशिल्ड’ (ग्रोथ प्लॅन) मध्ये गुंतविलेल्या रु. 10,000 च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य तब्बल रु 3,32,394.70 एवढे आहे.!! (खरेदी दि.31/03/99, योजनेच्या सुरवातीची NAV
रु.10.00, दि.04/07/2014 रोजीची NAV रु.332.3947)... होय, ही आकडेवारी अधिकृत आणि
बिनचुक आहे.
नोकरी आणि बाकीच्या व्यावसयिक अनुभवांतुन उच्चशिक्षित आणि उच्चऊत्पन्न गटांतील किमान काही शेकडा गुंतवणुकदारांचे अनुभव गाठीशी बांधल्यानंतर माझी अशी बालंबाल खात्री झालेली आहे, की विक्रम व वेताळ या आपल्या सुप्रसिद्ध कथांतील राजा विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसणा-या त्या वेताळा एवढेच जुनाट, असे एक 'धोका न पत्करण्याचे भुत’ तुमच्या माझ्या , बहुतेकांच्या मानगुटीवर पीढीजात बसलेले आहे.
मी अशा 'पापभीरु' गुंतवणुकदारांबरोबर नेहमी करीत असलेले एक प्रात्यक्षिक आपल्याबरोबर शेअर करतो. मी त्यांना सागतो की कागदाच्या एका बाजुला आपल्या आयुष्यातील असे प्रसंग लिहा, की ज्यात आपण धोका पत्करलात. त्या प्रसंगासमोरच अशा धोकादायक निर्णयामुळॅ झालेला फायदा/तोटाही तेथेच समोर लिहा. आता त्याच कागदावर दुस-या बाजुस असे प्रसंग लिहा, ज्यात आपण धोका पत्करायचे टाळलेत. पुन्हा फायदा/तोटा आलाच,.. तोही लिहा. आणि शेवटी, अगदी ढोबळ मानाने का होईना, ताळेबंद मांडा.....माझा अनुभव सांगतो की ‘बहुतेकदा आपल्या धोका पत्करल्यामुळे झालेल्या नुकसानापेक्षा धोका न पत्करल्यामुळे झालेले नुकसान जास्त असते’ असे दिसुन येते.
माझ्या दृढ परिचयातील एक सदगृह्स्थ 25 वर्षांपुर्वी त्यांना “एका मल्टीनॅशनल कंपनीत मिळालेली नोकरीची संधी केवळ पुण्याबाहेर जावे लागेल या भीतीपोटी नाकारली, नाहीतर आजच्या सदाशिवपेठी नोकरीपेक्षा किमान 15/20 पट पगार मिळाला असता” अशी खंत कायम व्यक्त करतात. दुसरीकडे 'अरे, अमक्या तमक्या मोक्याच्या जागी मिळत होता प्लॉट 1967 साली... जरा आणखी जोर लावुन 500 रु. उभे करतो ना ...तर आज नुसत्या भाड्यावर जगतो रे..." ही चित्तरकथा आपण एकापेक्षा जास्त वेळा ऐकलेली नाही काय ?? मी 'धोका न पत्करण्याचीही किंमत चुकवावी लागते’ असे जे म्हणतो ते म्हणजे हेच ते.
खरे तर धोका ही जीवनातील एक अपरिहार्यता आहे ही वस्तुस्थिती मान्य न करता उलट सदैव धोका टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःची आत्मवंचनाच करुन घेणे आहे. कारण ते वर संगितल्या प्रमाणे नुकसानकारक असतेच आणि याही पेक्षा असा बचावात्मक पवित्रा घेणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन शेवटी 'धोका न पत्करण्याचा धोका पत्करणे' हेच होय.
अनेकदा 'धोका' म्हणजे काय’ याविषयीच्या आपल्या कल्पनाच अस्पष्ट आणि विपर्यस्त असतात. ब्लूमबर्ग चे प्रख्यात स्तंभलेखक बॅरी रिथॉल्ट्झ यांनी या बाबत सुरेख विवेचन केले आहे. त्यांच्या मते एखाद्या घटने वा प्रक्रिये मागील धोका निश्चित करताना नेहमीच वस्तुस्थितीपेक्षा अशा प्रसंगातील नाट्यमयता, ग्लॅमर अशा गोष्टींना महत्व असते. रिथॉल्ट्झ यांनी विचारलेल्या 'मानवी मृत्युस सर्वाधिक कारणीभुत ठरणारा जीव कोणता??' या प्रश्नाचे उत्तर देतांना बहुतकांनी शार्क, सिंह, वाघ... अशी उत्तरे दिली पण या प्रश्नाचे खरे उत्तर असलेला 'डास' कोणालाही आठवला नाही. अगदी अलिकडील गायब झालेल्या फ्लाईट MH 370 बाबत उठलेला गदारोळ बॅरी साहेबांच्या युक्तीवादाचीच पुष्टी करतो.त्यांनी या सार्यााचा संबंध गुंतवणुकीशी अतिशय सहजपणाने लावला आहे. ते म्हणतात 'We fear the things that happen relatively rare .. market crash is such a thing !!!
अनेक वर्षापुर्वी एका क्रिडा समालोचकाने अॅvलन बॉर्डर आणि सर व्हीव्ह रिचर्ड्स यांची तुलना करताना संगितले होते की खरेतर दोघेही तितकेच धोकादायक आहेत, फक्त व्हीव्ह अधिक घोकादायक वाटतो, कारण तो प्रतिस्पर्ध्यावर वीजेसारखा कोसळतो, उलट बॉर्डर समोरची गोलंदाजी वाळवीने एखादे झाड कणाकणाने पोखरावे तशी पोखरतो…..गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरवताना आपलेही असेच होत असते, कधीतरी क्वचित होणारा 'क्रॅश' आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी 'उगीच भानगड नको...धोका न घेतलेलाच बरा' या भावनेने आपण अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्या , अधिक परतावा देणार्याे पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्यान गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते. बॅरी साहेब यांचा उल्लेख 'गुंतवणुकीतील कोलेस्ट्रॉल' असा करतात, ज्याचा सततच्या धोक्यामुळे झालेले सर्वसामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान हे प्रत्यक्ष बाजाराने दिलेल्या धोक्यामुळे झालेल्या हानीपेक्षा जास्त असते.
घराच्या बाहेर आणि घरांत कोठेही, कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने, कोणा मानवाकडुनही आणि पशूकडुनही, दिवसा वा रात्रीपैकी कधीही मृत्यु येणार नाही असा ’फुलप्रुफ’ वर मिळवुन मृत्युवर सकृतदर्शनी विजय मिळविलेला राजा हिरण्यकश्यपू असो, किंवा तक्षक दंशाच्या भीतीने सातमजली एकखांबी महालात रहाणारा राजा परिक्षित, शेवटी मारले गेलेच, या गोष्टीच ऐनवेळी आपल्या सुरक्षिततेच्या कल्पना कशा तकलादु ठरतात याचे द्योतक आहेत. गुंतवणुक विश्वातही धोका न पत्करण्याचीही किंमत, आणि अनेकदा अवास्तव किंमत मोजावी लागते. धोका कमी-जास्त प्रमाणांत का होईना, पण स्विकारण्यास पर्याय नाही, हेच खरे तर सत्य आहे. .आणि एकदा हे वास्तव मान्य करुन 'शुन्य धोका' विचारसरणीला तिलांजली दिली की मग 'थोडासा धोका-अधिक लाभ' या ट्प्यावर आपण येवुन पोहोचतो...... जो आर्थिक समृद्धीचा खर्यार अर्थाने राजमार्ग आहे.
अर्थातच प्रत्येक लेखाप्रमाणेच येथेही मी स्पष्ट करतो की या विवेचनाचा उद्देश बाजारातील सहभागाविषयी सामान्यांच्या मनांतील भीती, गैरसमज दुर करणे हाच आहे, आणि मी कोठेही सट्टेबाजी वा अतिरकी ट्रेडिंगचा पुरस्कार करत नाही. कधीही धोका न पत्करणे हे अयोग्य आहे याचा अर्थ उठसुठ धोकेदायक हालचाली करणे असा अजिबात नव्हे. असा 'खतरोंसे खेलनेका शौक...' वगैरे फक्त चित्रपटांत छान असते हे ध्यानांत ठेवावयास हवे.
अलिकडच्याच 'झिरो डार्क थर्टी' या ओसामा बिन लादेन वरील गाजलेल्या हॉलिवुड्पटात एक दृष्य आहे, गुप्तहेर संघटना CIA चे वरिष्ठ अधिकारी ओसामाला मारण्याची योजना बनवत असतात. एका विशिष्ट ठिकाणी 'तो' लपला आहे अशी त्यांची अटकळ असते, मात्र तेथील नागरी वस्ती लक्षांत घेता खात्री झाल्याशिवाय अंतिम हल्ला करण्याचा धोका नको अशी CIA प्रमुखांची इच्छा असते. ते अधिकार्यांतना या बाबत खोदुन खोदुन, पुन्हा पुन्हा विचारतात तेंव्हा शेवटी त्यांचे डेप्युटी उद्गारतात "We don’t deal in certainty, we deal in probability”.....
खरे आहे…… मी ही माझ्या प्रत्येक नवीन क्लायंट्ला आवर्जुन सांगतो तेच आपणास ही सांगेन की, 'रिस्क' नकोच ही मानसिकता बदलुन 'रिस्क' कधी आणि किती घ्यायची यावर साकल्याने विचार करणेच शेवटी अधिक श्रेयस्कर ठरते. धन्यवाद.
प्रतिक्रिया
14 Jan 2015 - 8:51 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
14 Jan 2015 - 8:57 pm | काळा पहाड
तुमच्याकडून वेगवेगळ्या आर्थिक आणि करविषयक उपकरणांविषयी तुलनात्मक लिखाण होण्याची अपेक्षा व्यक्त करतो.
14 Jan 2015 - 9:15 pm | सुबोध खरे
प्रसाद साहेब
सध्या बाजार "वर" आहे आणी येथे असलेल्या एका धाग्यातील "जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण" दुव्यांप्रमाणे जागतिक मंदी येण्याची ९९ टक्के शक्यता आहे. एक मत प्रवाह( यात माझा सल्लागारहि येतो) असा आहे कि आत्ता ज्यांच्याकडे समभाग आहेत ते त्यांनी विकून पैसा हातात ठेवावा आणी मांडीत बाजार पडला कि परत तेच समभाग स्वस्तात खरेदी करावे. "यावर आपले मत काय?"
हा महत्त्वाचा प्रश्न अशासाठी आहे कि आपण लोकांना समभाग घ्यायला सांगत आहात आणी तेच समभाग बाजार पडला तर जमिनीवर येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोक आपल्या नावाने शंख करण्याची शक्यता आहे.
15 Jan 2015 - 12:21 pm | प्रसाद भागवत
डॉक्टर साहेब, आपल्या अभ्यासु व्यक्तीने विचारेल्या प्रश्नाला थोडेसे विस्तारा ने उत्तर द्यावे असे मनांत आहे.
शेअर बाजार हा आशा निराशेचा लपंडाव आहे, भीती(fear) आणि लोभ(greed) यांचा लपंडाव आहे हे सर्वज्ञात आहे. पण भावभावनांचा हा लंबक दीर्घकालांत नकीच स्थिर होतो आणि हा स्थिर होण्याचा क्षण म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणुकीवरील मिळालेला परतावा मोजण्याची वेळ होय. गुंतवणुकशास्त्रामधील ब्रॅडमन श्री. बेंजमिन ग्रॅहम यांचे 'In the short run, the market is a voting machine but in the long run, it is a weighing machine.' हे वाक्य ब्रम्हवाक्य म्हणुन समजले जाते. .
बाजारातील दैनंदीन उधळमाधळीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या कंपनीने दीर्घकाळांत आपल्या कामगिरीने मिळवलेल्या नफ्याचे( आणि त्यातील वाढीचे) प्रमाण हे सर्वसाधारणतः भावांत प्रतिबिंबित होते. (एखादे उत्तम टॉनिक त्याचा प्रभाव लगेच दुसर्या दिवशी नव्हे पण कालांतराने दाखवत तसेच) यालाच तांत्रिक भाषेंत CAGR- Compounded Annual Growth Rate असे म्हणतात. जो पर्यंत आपण निवडलेल्या नफा मिळविण्याची, त्याचे वाढीचे प्रमाण कायम ठेवण्याची ही अंगभुत क्षमता कायम आहे तोपर्यंत निकट भविष्यांत काय होईल याचा विचार आणि काळजी करण्याचे कारण नाही.
ज्याप्रमाणे बाजार आता खाली येण्याची काही कारणे सांगितली जातात तशीच तो वर जाण्याची अनेक सबळ कारणे ही देता येतातच की. बाजारांत अचुक वेळ साधणे भल्याभल्यांना जमलेले नाही. सर्वसामान्य माणसाने तसा प्रयत्न न केलेलाच बरा.
भारतातील काही प्रमुख कंपन्यांची प्रतिशेअर नफ्याची आकडेवारी मी दिली आहेच. आता CAGR बद्दलची माहिती देतो. फ्रॅन्क्लीन ईंडिया ब्ल्यु चीप या कंपनीचे उदाहरण घेतो. ही भारतातील खाजगी फंडाने चालविलेली पहिली, 1993 सालापासुन अस्तित्वात असलेली, योजना आहे जी मी लेखांत सुचविल्याप्रमाणे काही 'ब्ल्यु चीप' कंपन्यांत गुंतवणुक दारांचे पैसे गुंतवते. या योजनेचा सुरवातीपासुनचा, म्हणजे गेल्या 20/21 वर्षांतील CAGR 23%,15 वर्षांसाठी 20.5 व 10 वर्षांसाठी 19.+ असा आहे.
अन्य काही ईतक्याच यशस्वी योजनाही नक्कीच आहेत ज्या सर्वच योजनांचा मी हिरीहिरीने प्रचार करतो येथे सहजी उपलब्ध आकडेवारी, सर्वात मोठा कालावधी आणि योजनेचे स्वरुप लक्षआंत घेवुन या योजनेस प्राधान्य दिले आहे..
मला [पुढे जावुन सांगावयाचे हे की गेल्या ज्या सलग दोन दशकाहुन अधिक काळाचा संदर्भ आपण हा CAGR मोजताना लावला आहे त्यात विपरित असे काय म्हणुन घडायचे राहिले होते ?? सामाजिक, राजकिय , आर्थिक , नैसर्गिक अशा प्रत्येक प्रकारच्या एकापेक्षा एक अकल्पित घटना मी सांगु शकेन.स्कॅम्स कारगिल,अणुस्फोटामुळे जागतिक प्रतिबंध, राजकिय अस्थिरता, सुनामी, दुष्काळ असे देशपातळीवर तर व्हिएत्नाम युद्ध, 26/11,युरोपियन संकट, सबप्राईम, देशच्या देश दिवाळ्खोर होणे( अर्जेंटिना)....यादी मोठी आहे.
आपण बाजार खाली येण्याची जी भीती व्यक्त केली आहे त्यात नवे असे काहीच नाही. अशा प्रत्येक आपत्तीच्या वेळी ती खरी ठरली होतीच की..... आपल्या बाजाराने याच काळांत शिखरापासुन 40% घसरण एकदा नव्हे तर 03 वेळा अनुभवली आहे. आणि आजचे हे CAGR चे आकडे हे सगळे हलाहल पचविल्यानंतरचे आहेत हे मी आवर्जुन सांगेन
माझा आणखी एक लेख 'अतिविचारे कार्य नासते'... यात माझी भुमिका अधिक स्पष्ट केली आहे. तो ही येथे टाकण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद
14 Jan 2015 - 9:15 pm | सुबोध खरे
चूक दुरुस्ती -- मंदीत
15 Jan 2015 - 2:04 am | पिवळा डांबिस
टायपो सुधारल्याबद्दल धन्यवाद, डॉक्टरसाहेब!
नायतर तुमचा अभिप्राय वाचून यांना सडनली एक्दम काय झालं असा विचार मनात आला होता!!!
:)
14 Jan 2015 - 9:24 pm | संदीप डांगे
मस्त आहे... पुभाप्र...
14 Jan 2015 - 9:47 pm | सुधीर जी
खुप मस्त लेख
14 Jan 2015 - 9:53 pm | लंबूटांग
फायनान्समधले ओ की ठो कळत नाही पण शेअर मार्केट मधे पैसा न गुंतवणे धोकादायक कसे असू शकते? समजा मी तो धोका नाही पत्करला तर मला ROI कमी मिळेल पण त्यात धोका नक्कीच नाही.
इन-जनरल धोका न पत्करणे जास्ती धोकादायक कसे असू शकते?
बाकी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे हा जर लेखाचा मतितार्थ असेल तर अगदी सहमत.
14 Jan 2015 - 9:54 pm | आदूबाळ
अगदी हाच प्रश्न पडला आहे.
14 Jan 2015 - 10:40 pm | अनुप ढेरे
महागाईच्या दरापेक्षा कमी व्याज म्हणजे तुमचा पैसा इऱोड होत असतो. तुम्ही काहीही न करता आपोआप त्याची वॅल्यु कमी होत असते.
14 Jan 2015 - 11:30 pm | आदूबाळ
हो, पण शेअर बाजारातली गुंतवणूक महागाई-दरापेक्षा जास्त रिटर्न्स कसे काय देईल? (रिस्क हा भाग बाजूला ठेवू क्षणभर)
14 Jan 2015 - 11:44 pm | अमेरिकन त्रिशंकू
हा चार्ट अमेरिकन शेअरबाजाराचा आहे पण भारतीय बाजारालापण लागू आहे.
http://www.begintoinvest.com/chart-week-investors-favorite-investment-wo...
15 Jan 2015 - 12:12 pm | अनुप ढेरे
खुद्द इंडेक्स त्या दराला बीट करेलच असं नाही. पण अनेक फंड १२-१५% वार्षिक परतावा देतात. (ऑफ्कोर्स > ५ वर्षांहून अधिक काळ ठेवल्यास)
15 Jan 2015 - 12:26 pm | प्रसाद भागवत
'कशी देइल??' या चा काथ्थ्याकुट करण्यापेक्षा 'दिली आहे' हे वास्तव आहे. उत्तर सोपे आहे,... जर टाटा, अंबानी, बिर्ला (आणि आता अदानी सुध्दा) त्यांचा वस्तु महागाई दराचा विचार न करता विकु लागले तर ते रस्त्यावर येणार नाहीत का ?? आणि जर ते तसे करणार नाहीत आणि त्यांच्या कंपन्या बक्कळ नफा मिलवत आहेत तर तुम्हाला तो फायदा का नाही मिळणार ??...डॉ. खरे यांना दिलेले माझे उत्तर वाचावे ही विनंती.
15 Jan 2015 - 1:19 pm | आदूबाळ
डॉ खरे यांना दिलेल्या उत्तरात inflationary risk वर उहापोह दिसत नाही. की मी चुकीच्या जागी बघतोय?
प्रसिद्ध होणारे महागाईचे आकडे year-on-year असतात. म्हणजे गेल्या वरषाच्या तुलनेत किती महागाई आहे हे सांगणारे. एक बेस इयर घेऊन काढलेले महागाईचे आकडे कुठे प्रसिद्ध होतात का?
15 Jan 2015 - 5:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यासाठी दीर्घकालीन मुदतीसाठी मालकी असलेल्या मालमत्तेच्या विक्रिवर (लॉग टर्म कॅपिटल गेन) आयकर लावताना वापरात येणारा इंन्डेक्स पहा.
15 Jan 2015 - 6:07 pm | आदूबाळ
चांगली ऐड्या आहे. धन्यवाद.
14 Jan 2015 - 10:34 pm | अमेरिकन त्रिशंकू
इन्फ्लेशन रिस्क
14 Jan 2015 - 10:38 pm | आजानुकर्ण
सहमत. शेअर बाजारात पैसे न गुंतवणे अत्यंत धोकादायक आहे.
15 Jan 2015 - 12:31 pm | प्रसाद भागवत
Opportunity cost अशी एक संकल्पना आहे. बाजारांत गुंतवणुक केल्याने होणारे संभाव्य आर्थिक नुकसान पहाता जर आपण बाजाराला धोकादायक ठरवित असु, तर आकडेवारी सिद्ध करते की खरे नुकसान तेथे योग्य गुंतवणुक न केल्याने झालेले आहे. मग त्याच अर्थाने ते 'अधिक धोकादायक' नाही काय??
14 Jan 2015 - 10:16 pm | संदीप डांगे
त्यांना कदाचित होणारे "संभाव्य नुकसान" म्हणायचे आहे.
"जास्त धोकादायक" पेक्षा "जास्त नुकसानकारक" असे असले पाहिजे
14 Jan 2015 - 10:21 pm | लंबूटांग
थोडे कमी फायद्याचे असे म्हणणे जास्ती सयुक्तिक ठरेल असो.
मला स्वतःला धाग्याचे नाव थोडे दिशाभूल करणारे वाटले म्हणून लिहीले. लेख छान आहे हेवेसांनल.
14 Jan 2015 - 10:19 pm | hitesh
छान
14 Jan 2015 - 10:46 pm | आजानुकर्ण
लेख आवडला.
14 Jan 2015 - 11:21 pm | सिरुसेरि
म्युचुअल फंडाबद्दल काही मते - कोणत्याही चांगल्या म्युचुअल फंड योजनेचा विचार केला तर लक्षात येते की त्याच्या पोर्ट्फोलिओद्वारे आपणास एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतविता येतात . जसे कि - बँकींग , आयटी , वाहनसमुह , तेल , करमणुक इत्यादी. मग भविष्यात मार्केट जरी डाउन झाले , तरी ही सर्वच क्षेत्रे एकाच वेळी डाउन होणार नाहीत . कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रांतील कंपन्या या तेव्हा अपच राहणार . त्यामुळे गुंतवणुकीची मार्केट व्हॅल्यू ही अपच राहणार .
14 Jan 2015 - 11:47 pm | सुबोध खरे
सिरुसेरी साहेब
२००८ च्या मंदीत सर्वच्या सर्व क्षेत्रे तळाला गेली होती. माझे स्वतःचे समभाग २८ % किमतीला आले होते. म्हणजे परतावा सोडाच पण मूळ मुदलात ७२ % खोट होती. (आणि मी माझे समभाग रोज एकदा तरी पाहतो तरीही मी शांत होतो. ज्यांची अशी मानसिक तयारी नाही त्यांनी यात प[अडू नये असे माझे अनुभवांती झालेले मत आहे.) अर्थात माझी धीर धरण्याची पूर्ण तयारी होती म्हणून पुढच्या दोन वर्षात सर्व नुकसान भरून १५% परतावा मिळाला. माझी अपेक्षा एवढीच असते कि १५ % करमुक्त परतावा मिळावा आणि त्याप्रमाणे मी गुंतवणूक करतो.
सर्व जणांची एवढी धीर धरण्याची तयारी असेलच असे नाही
15 Jan 2015 - 12:05 am | प्रसाद गोडबोले
७
14 Jan 2015 - 11:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
गुंतवणिकीची सुंदर प्रस्तावना !
आता असेच सोप्या शब्दांत क्रमशः सर्व गुंतवणूक पर्यांयांचे (इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटस्) असेच तुलनात्मक आणि व्यवहारात उपयोगी पडेल असे विश्लेषण येऊद्या.
15 Jan 2015 - 6:57 am | देशपांडे विनायक
पाच सहा वर्षापूर्वी माझ्या मुलाने मला SHARE MARKET चा COURSE करा
असे सुचविले होते
मी त्याला ५०००० रुपये दिले आणि सांगितले मला १५% इंटरेस्ट ने हे पैसे कधी
परत करता येतील ते बघ .
किती मुदतीत हे शक्य होईल याची खात्री कोण देतो का ?
माझे ५०००० रुपये तरी ठराविक मुदतीत परत मिळावे हि माझी अट आहे
15 Jan 2015 - 12:37 pm | प्रसाद भागवत
श्री, विनायकराव एकदा वेळ काढुन भेटा अर्धा एक तास..चहा पीत पीत थोड्या गप्पा मारु ज्यात बाकीचे खुलासे करेन. तुर्तास एवढेच.
16 Jan 2015 - 1:30 am | काळा पहाड
भागवत साहेब, चहा महागात पडणार नाही ना?
16 Jan 2015 - 5:11 pm | hitesh
बट लंच ईज नेव्हर फ्री
17 Jan 2015 - 10:42 am | प्रसाद भागवत
पहाड साहेब,साहेब,अशा चिंतातुर जंतुसाठी चहा न पाजता गप्पा मारण्याची सोयही आहे आमच्या कडे. आणि चहा पाजणे फायद्याचे/पिणे तोट्याचे असेल त गेलाबाजार तुम्ही पाजा की चहा आम्हाला. नाही कोण म्हणतय??
23 Jan 2015 - 3:17 pm | सुधीर जी
नक्किच मि पन येइन
15 Jan 2015 - 10:06 am | चिनार
लेख आवडला !!!!
शेयर बाजारात गुंतवणुकीची सुरवात करताना जे पैसे बुडाले तरी आपल्याला फारसा फरक पडत नाही एवढेच पैसे गुंतवावे. जम बसल्यावर हळूहळू गुंताव्नुल वाढवावी असं माझं मत आहे.
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ म्हणायचे शेयर बाजार वर जायला आणि खाली यायला १०० नियम आहेत . पण १० पैकी ७ वेळा नियम पाळला जातो आणि ३ वेळा पाळला जात नाही. आणि ह्याविषयी अचूक अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही.
15 Jan 2015 - 10:27 am | जेपी
थेट शेअर मध्ये गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंड चा वापर फायदेशीर ठरतो.
म्युच्युअल फंडात एसाआयपी करणे जास्त फायदेशीर ठरते.
अर्थात हे नविन लोकांसाठी आहे.
वरील मत माझे वेयत्कीक आहे.
15 Jan 2015 - 12:44 pm | गणेशा
चांगला माहितीपुर्ण लेख.
शेअर मार्केट मधले काहीच कळत नाही मला .. कधीच शेअर मार्केट कडे लक्ष दिले नाही.
30 Jan 2015 - 1:48 pm | चिनार
प्रसाद साहेब ,
निश्चित परताव्याची गुंतवणूक (ppf ,fd )आणि अनिश्चित परताव्याची गुंतवणूक (शेअर्स , म्युचुअल फंड ) यांचे प्रमाण (proportion) कसे असावे ?
30 Jan 2015 - 7:40 pm | आदिजोशी
एफ डी मधे पैसे गुंतवून शेअर बाजारात गुंतवणून न केल्याने होणारे नुकसान हे खरं म्हणजे नोशनल लॉस म्हणता येईल. पण ते धोकादायक अजिबातच नाही. आणि कॉस्ट अकाउंटींगच्या हिशोबाने बघितल्यास फार फार तर नुकसान आहे.
व्याज कमी मिळाले तरी मुद्दल सुरक्षीत आहे हे माझ्यासारख्या वेळ नसलेल्या अनेक लोकांसाठी खूप झाले. त्यापेक्षा जास्त अपेक्षाच नाही त्यामुळे ह्या नोशनल नुकसानाची पर्वा नाही.
प्रत्येकानेच हे करावं आणि ते असंच असावं अथवा ते धोकादायक आहे, तुम्ही माठ आहात हा एकंदरीत टोन अत्यंत चुकीचा आहे.
4 Feb 2015 - 9:49 pm | आजानुकर्ण
आदिजोशी, तुमच्या मताशी असहमत आहे.
भारतात काही दशके रिअल इंटरेस्ट रेट हा उणे राहिला आहे. मुद्दल सुरक्षित आहे हा केवळ आभास आहे. शिवाय विशेषतः मध्यमवर्गीयासाठी शिक्षण, आरोग्य व तत्सम सेवाक्षेत्रातील महागाईचा दर कंझ्युमर प्राईस इन्फ्लेशनच्या तुलनेत दुपटीपेक्षाही जास्त आहे. येत्या अनेक वर्षात हा दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. वेळ नसलेल्या लोकांसाठी म्युच्युअल फंड आहेत. साधारण एक टक्क्यापर्यंत फी घेऊन प्रोफेशनल शिक्षण घेतलेली तज्ञ मंडळी तुमचे पैसे गुंतवतात. एक टक्का फी जास्त वाटत असेल तर सरकारची नॅशनल पेन्शन स्कीमसारखी योजना आहे.
एखादी व्यक्ती माठ आहे असे मला म्हणायचे नाही. मात्र भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशात महागाईपेक्षाही कमी असा फिक्स्ड इंटरेस्ट परतावा देणाऱ्या योजना अत्यंत धोकादायक आहेत.
1 Feb 2015 - 8:57 pm | माझीही शॅम्पेन
प्रसाद साहेब ,
तुम्ही व्यवसाइक सल्ला देता काय ? कृपया व्यनि करा .. धन्यवाद
5 Feb 2015 - 10:12 am | सुधीर जी
प्रसाद साहेब ,
तुम्ही व्यवसाइक सल्ला देता काय ? कृपया व्यनि करा .. धन्यवाद >>>>>>मलाहि धन्यवाद
5 Feb 2015 - 9:05 pm | चित्रार्जुन
प्रसाद साहेब ,
तुम्ही व्यवसाइक सल्ला देता काय ? कृपया व्यनि करा .. धन्यवाद
बर व्यनि म्ह्न्जे मेल आय्दि असेल तर माझा खालिल प्रमाणे
6 Feb 2015 - 9:14 am | पाषाणभेद
आता झैरातच चालली आहे तर सांगावेसे वाटते की मी पण वैयक्तीक आर्थिक सल्लागार आहे. कुणाला आर्थिक बाबतीत व्यवसाइक सल्ला हवा असल्यास व्यनि करावा.
6 Feb 2015 - 9:33 am | सुनील
आम्ही विरजणाचा धंदा करतो. कुणाच्या आनंदावर टाकण्यासाठी हवे असल्यास, आनंदाने दिले जाईल!! ;)
(टीप - एका सन्माननीय माजी मिपाकराच्या स्वाक्षरीवरून साभार)