श्रीरंग देशमुख (भरत जाधव) एक साधासुधा, वय वाढलेला पण अविवाहीत असलेला. आपण एखाद्या हीरोसारखी साहसी कृत्ये करून काहीतरी भन्नाट मोहीम यशस्वी केली आहे अशी सारखी स्वप्ने रंगविणारा. तो एका शिपिंग कंपनीत काम करतो.
कंपनीचा एक कंटेनर एक दिवस अचानक नाहीसा होतो. कंपनीचा बॉस संतापून श्रीरंगला दोन दिवसात कंटेनर शोधायला सांगतो. दोन दिवसात कंटेनर नाही मिळाला तर पोलिसात तक्रार करून तुला तुरूंगात धाडीन अशीही धमकी बॉस देतो.
घाबरलेला श्रीरंग रात्री घरी विचार करीत असताना अचानक देवयानी नावाची एक तरूणी त्याच्या घरात घाबर्याघुबर्या अवस्थेत शिरते. तिला बघून श्रीरंग दचकतो. कंटेनर नाहीसा होण्यामागे मोठे कारस्थान असून त्यामागे मोठी टोळी असल्याचे ती सांगते व त्याच्या घरात रात्री आश्रय मागते. गोव्यातला कोणीतरी डी कास्टो नामक माणूस यामागे असून त्याला कंटेनरची पूर्ण माहिती आहे हेसुद्धा ती त्याला सांगते. तिच्या आणि त्याच्या पाठलागावर दोघे जण असून ते आपल्या दोघांनाही मारणार आहेत अशी तिची माहिती असते. खात्री करून घेण्यासाठी ती श्रीरंगला खिडकीतून खाली उभे राहून त्याच्या घरावर लक्ष ठेवणार्या दोघांना बघायला सांगते. तिच्या सांगण्याप्रमाणे श्रीरंग खिडकीतून खाली बघतो तेव्हा दोघेजण खरोखरच त्याच्या घरावर लक्ष ठेवताना दिसतात.
आपल्याला उद्या सकाळी तातडीने गोव्याला जाऊन डी कास्टोला भेटायला पाहिजे असे तिचे सांगणे असते. घाबरलेला श्रीरंग तिला रात्री घरात आश्रय देतो. परंतु रात्रीच अचानक पाठीत सुरा खुपसलेल्या अवस्थेत तिचा खून होतो व खुनाच्या आरोपावरून पोलिस श्रीरंगला पकडायला त्याच्या घरी येतात. श्रीरंग त्यांना चुकविण्यासाठी घरातून पळतो व गोव्याच्या मार्गावर लागतो. पोलिस त्याच्या पाठलागावरच असतात.
गोव्यात पोहोचून डी कास्टोला भेटेपर्यंत बर्याच गंमतीजमती घडतात. त्या प्रत्यक्ष रंगमंचावरच बघणे योग्य. डी कास्टोला भेटल्यावर अजून बरीच रहस्ये श्रीरंगच्या लक्षात येतात व अजून काही खुनांचा आरोप त्याच्यावर येऊन त्याला सतत पळावे लागते.
शेवटी हे रहस्य कसे उलगडते ते रंगमंचावरच बघण्यात मजा आहे.
केदार शिंदे व भरत जाधव जोडगोळीचे हे नवीन विनोदी कम रहस्यपूर्ण नाटक त्यांच्या पूर्वीच्या नाटकांच्या तुलनेत फारसे आवडले नाही. रहस्यकथा या दृष्टीकोनातून पाहिले तर या नाटकातील रहस्यकथा ही एक अत्यंत सामान्य रहस्यकथा आहे. कलाकार व अभिनय या दृष्टीकोनातून पाहिले तर भरत जाधव वजा केला तर बाकी नाटकात फारसा दम नाही.
या नाटकात भरत जाधव व्यतिरिक्त अजून ५ कलाकार आहेत. भरत जाधव वगळता इतरांनी प्रत्येकी ४-५ वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. भरत जाधवने मात्र नेहमीच्या सफाईदार शैलीत धमाल केली आहे. रेल्वेतून जाण्याच्या दृश्यात, रेल्वेतून उडी मारताना आणि नंतर कारमधून जाण्याच्या दृश्यात त्याने व दिग्दर्शकाने कमाल केली आहे. त्याने एकट्यानेच संपूर्ण नाटक तोलले आहे. या नाटकात काही दृश्यात मात्र भरत जाधवच्या शैलीत तोचतोचपणा आढळतो.
मी पाहिलेले भरत जाधवचे हे चौथे नाटक. यापूर्वी 'बापाचा बाप' (याचेच नाव नंतर श्रीमंत दामोरदपंत असे झाले), 'सही रे सही' आणि 'मोरूची मावशी' ही तीन नाटके यापूर्वी पाहिली होती. 'सही रे सही' तर आतापर्यंत ३ वेळा पाहिले आहे.
दोन घटका करमणूक हवी असेल तर हे नवीन नाटक बघायला हरकत नाही. परंतु 'सही रे सही' ची अपेक्षा ठेवून गेलात तर नक्कीच निराशा होईल.
प्रतिक्रिया
30 Dec 2014 - 3:29 pm | मुक्त विहारि
तसे पण बरेच दिवस सतत काम करून कंटाळलो आहे,
एखादे हलके-फुलके नाटक बघणे अत्यावश्यक आहे.
30 Dec 2014 - 4:26 pm | मदनबाण
वा... पहावयास हवे !
"पुन्हा एकदा सही रे सही' पाहुन इतका हसलो होतो की...मोकळेपणानी हसणे बराच काळ विसरलोच होतो याची जाणिव झाली होती...
परत कधी वेळ मिळाला तर पुन्हा एकदा सही रे सही" पाहणारच ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09
The U.S. Debt Continues To Climb
30 Dec 2014 - 5:12 pm | धर्मराजमुटके
नाटकाची जाहिरात बघीतली होती. पण केवळ भरत जाधव आहे म्हणूनच बघायचे टाळले. भरत जाधव आणि रहस्यमय नाटक ये बात कुछ हजम नही हुई !
4 Jan 2015 - 11:25 am | hitesh
छान
4 Jan 2015 - 1:12 pm | ग्रेटथिंकर
छान परिक्षण. धन्यवाद.
5 Jan 2015 - 2:04 pm | सौंदाळा
बघायचे आहे.
पण एकंदर लेख बघता ही नाटकापेक्षा चित्रपटाची कथा म्हणुन जास्त योग्य वाटली असती का काय असे वाटले.
चिंचवडात रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रयोग लागेल तेव्हाच बघण्यात येईल.
5 Jan 2015 - 2:33 pm | नाखु
चिंचवडात रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रयोग लागेल तेव्हाच बघण्यात येईल.
पुण्यात जायला यायला फार नाटकं (वेळ्)करावी लागतात हे खरयं !!