मागीलवेळी आम्ही थायलंडचा परदेशातला प्रवास केला. ह्यावेळी मॉरिशियसच्या प्रवासाला जायचं ठरविलं.
आता फिरायला जायचे म्हणजे मी आणि कुसुम असे दोघेचजण जात असतो. मुलं आता मोठी झालीत. कामोकामी लागलेत. सर्वांचे लग्न झालीत. पाखरासारखे दूर उडून गेलेत. आता त्यांची सोबत नसते. मग आम्ही दोघेच फिरत असतो.
पूर्वी मी नोकरीत असतांना मुलं लहान होते, त्यावेळी १९८६ साली आम्ही सर्वजण नेपाळ येथे काठमांडू पर्यंत गेलो होतो. त्यावेळी मोठा प्रज्ञाशील १० वर्षाचा, संघशील ८ वर्षाचा व करूणा ६ वर्षाची होती.
मी अकोला येथेच केसरी टूरच्या ब्रांच ऑफिसला मॉरिशियसचं बुकिंग केलं. मुंबईहून विमानाने मॉरिशियसला जायचे असल्याने आम्ही करुणाकडे ठाण्याला जाऊन थांबलो. ठाणेच्या केसरी टूरच्या ऑफिसने व्हिसा काढून दिला. बाकी पैसे भरले. जाण्यापूर्वी भारताचे काही चलन बदलवून डॉलरचे चलन घेतले. आमचा हा टूर पाच दिवस आणि चार रात्रीचा म्हणजे दिनांक १४.०५.२०१४ ते १८.०५.२०१४ पर्यंतचा होता.
खरं म्हणजे मॉरिशियसला जाणारं फ्लाईट १४.०५.२०१४ला सकाळी ६.४५ वाजताचं होतं. त्यापूर्वी तीन तास आधी आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी टर्मिनल-दोन या विमानतळावर पोहचण्याच्या आम्हाला सुचना देण्यात आल्याने आम्ही घरून रात्री १.०० वाजताच्या दरम्यान निघालो.
विमानतळावरील मायग्रेशन व सिक्युरिटी प्रोसिजर आटोपून आम्ही आतमध्ये गेलो. आमचं एमके ७४९ मॉरिशियस कंपनीचे विमान उशिरा म्हणजे सकाळी ७.३० वाजता सुटले. मॉरिशियसला पोहचल्यावर डॉलर मोडून मॉरिशियसचे रुपये घेतले. त्यावेळी भारताच्या एका रुपयाला मॉरिशियसचे ४० पैसे असा दर होता. त्याशिवाय आम्ही सोबत भारताचे १५००० रुपये घेतले होते. मॉरिशियसच्या चलनाला पण रुपयेच म्हणतात. एकूण प्रवास ६६५८ किलोमीटरचा होता. विमान इंडियन ओसियनच्या समुद्रावरून जात होतं. आम्हाला नास्ता व जेवण विमानातच दिल्या गेले. आम्ही मॉरिशियसच्या पोर्ट लुईसच्या ‘सर शिवसागर रामगुलाम एयरपोर्ट’ विमानतळावर पोहचलो. त्यावेळी भारतीय वेळेनुसार माझ्या घड्याळात ११.३५ वाजले होते. तेथील मॉरिशियसच्या वेळेनुसार दुपारी १.१५ वाजले होते. म्हणजे भारतापेक्षा तेथील घड्याळ हे जवळपास २ तास मागे होतं. आम्ही त्याप्रमाणे घड्याळ लाऊन घेतले. आम्ही पोहचल्याचा निरोप विमानतळावरून मोबाईलने फोन करून मुलीला कळविला. तेव्हा १०० रुपये कटले. म्हणजे एका मिनिटाला १०० रुपये लागतात. हे धक्कादायकच नाही का ?
विमानतळावरून आम्हाला बसने व्होल्मार या ठिकाणी पर्ल बीच या हॉटेलवर नेण्यात आले. जातांना गुळगुळीत (खड्डे नसलेले), स्वच्छ रोड, नारळाचे झाडं, स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, मोहित करणारं निसर्गसौंदर्य असा तो नजारा दिसला.
आमच्या बसमध्ये जी गाईड होती ती मूलतः भारतीय वंशाची होती. तिला इग्रजीशिवाय हिंदी पण बोलता येत होते. त्यामुळे ती जेव्हा इंग्रजीत सांगायची, त्याचवेळेस आम्ही तिला त्याचे स्पष्टीकरण हिंदीत करायला सांगत होतो. उद्देश हा की ज्यांना इंग्रजी समजत नाही, त्यांना हिंदीत कळू शकेल. हॉटेलवर पोहोचेपर्यंत तिने आजूबाजूचा परिसर व मॉरिशियस बद्दलचा इतिहास सांगितला. तिच्या बोलण्यावरून व काही हॉटेलचे चौकीदार व बसचे ड्रायव्हर ज्यांचे पूर्वज भारतीय वंशाचे होते, त्यांचे कडून जी माहिती घेतली ती अशी-
हॉलंडचा राजपुत्र मॉरीटूज याच्या नावाने या बेटाचं मॉरिशियस हे नाव पडले असे सांगण्यात आले. मोरपिंगी रंगाच्या समुद्राने वेढलेले हे सुंदर बेट आहे. समुद्र किनाऱ्यावरील वाळू पांढऱ्या रंगाची असल्याने मोठी मोहक दिसते. या ठिकाणी जायचे म्हणजे एकतर जहाजाने अथवा विमानाने. भारतातून मात्र फक्त विमानानेच जाण्याचा मार्ग आहे.
मॉरिशियसचा शोध सुरुवातीला १६ व्या शतकात युरोपियन लोकांनी लावला. पोर्तुगीज इसवी सन १५०७ ते १५१३च्या दरम्यान आलेत. त्यांनी कायमस्वरूपी वसाहती केल्या नाहीत, त्यानंतर डच आलेत. त्यांनी इसवी सन १६३८ ते १७१०च्या दरम्यान वसाहती केल्यात. परंतु तुफान, चक्रीवादळ, दुष्काळ, रोगराई, अन्नाचा तुटवडा यामुळे ते १७१० मध्ये मॉरिशियस सोडून गेलेत. त्यानंतर १७१० ते १८१० च्या दरम्यान फ्रेंच आले. १८१० नंतर ब्रिटीश आलेत. १९६१ पासून स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरु झाले. शिवसागर रामगुलाम हे वैद्यकीय व्यवसाय करणारे गृहस्थ, ज्यांनी गरिबांना खूप मदत केली, ते स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. १२ मार्च १९६८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पहिले प्रधानमंत्री झाले. ते मॉरिशियसच्या प्रगतीसाठी खूप झटले. म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते. त्यांच्या निधनानंतर सध्या त्यांचा मुलगा डो.नवीन रामगुलाम हे प्रधानमंत्री आहेत.
हा देश आफ्रिका खंडात येते. या देशाचे क्षेत्रफळ २०४० कि.मी. एवढे आहे. उत्तर-दक्षिण लांबी ६५ कि.मी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४५ कि.मी. असलेलं हे अगदी छोटसं बेट आहे असे म्हणता येईल. पांढऱ्या रंगाच्या रेतीच्या १५० कि.मी समुद्र किनाऱ्याने हा बेट वेढला आहे. एक मात्र खरं की ह्या समुद्राचे पाणी अगदी स्वच्छ व नितळ असलेले दिसले. तसेच किनार्या जवळचा समुद्र खोल असल्याचे वाटले नाही. ह्या बेटावर फक्त दोन ऋतू म्हणजे उन्हाळा नोव्हेंबर ते एप्रिल व हिवाळा जून ते सप्टेंबर असा असतो. वर्षभर कमी जास्त पाउस पडत असतो. त्यामुळे पावसाळयाचा निश्चित असा कालावधी नसल्याने पावसाळा हा ऋतू येथे नाही. येथील हवामान मात्र सुखावह वाटला.
येथे कारखाने नसल्याने प्रदुर्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठेकुठे किरकोळ असे लहान-लहान नाले दिसले पण मोठी अशी एकही नदी दिसली नाही.
प्रशासनाच्या दृष्टीने या देशात ९ जिल्हे आहेत. येथे दोन मोठे शहरे व ४ लहान शहरे आहेत. बाकी जवळपास १३२ खेडे आहेत. या देशाची लोकसंख्या केवळ बारा लाख एकसष्ट हजार एवढी आहे. या देशात मुख्यत: इंग्रजी आणि फ्रेंच ह्या सरकारी भाषा आहेत. तेथील लोक फ्रेंचचीच बोलीभाषा असल्यासारखी क्रियोल भाषा बोलत असतात.
येथे सर्व स्तरावरचे शिक्षण फुकट दिल्या जाते. रेल्वे व ऑटो दिसल्या नाहीत. पण सामान्य लोक सरकारी बसने प्रवास करतात. सर्व विद्यार्थ्यांना, अपंग व ज्येष्ठ नागरीकांना मोफत जाण्या-येण्याची सुविधा आहे. ५८ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना पेन्शन आणि मोफत वैद्यकीय सुविधा मिळते. ७० वर्षानंतर वाढते पेन्शन मिळते. शिवाय त्यांना सांभाळायला एक केअरटेकर ज्याचा पगार सरकार देत असल्याचे कळले. येथील अर्थव्यवस्था शेतीशिवाय मुख्यत: पर्यटनावर अवलंबून आहे.
पोर्ट लुईस हे देशातले सर्वात मोठे शहर असून देशाची राजधानी आहे. ती ब्रिटीशांनी वसवलेली आहे. ही राजधानी म्हणजे या देशाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. सर्व जहाजे येथेच येतात. बँकां, विमा कंपन्याही येथेच आहेत.
या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य दिसले ते म्हणजे येथे आपल्या देशासारखी मिल्ट्री नाही. मी या बाबतीत एका पोलिसाला विचारले; तेव्हा त्यांनी संगितले की सामुद्रिक बेट असल्याने भौगीलिक सीमा नाहीत. त्यामुळे मिल्ट्रीची गरज नाही. त्याऐवजी पॅरामिल्ट्री पद्धतीने म्हणजे पोलीस कमिशनरच्या अधिपत्याखाली दहा हजार पोलीस मार्फत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाव्यवस्था पहिली जाते. मी म्हटले, ‘चांगले आहे.’ त्यामुळे तुम्हाला सैन्यावर फारसा खर्च करावा लागत नाही. आमच्या देशात तर इतर योजेनेपेक्षा सैन्यावरच जास्त खर्च करावा लागतो.
मॉरिशियसमध्ये भारतीय वंशाचे लोक जास्त आहेत. त्यामुळे इंडो-मॉरिशियस असेही म्हटल्या जाते. सध्याच्या काळात भारतीय वंशाची लोकसंख्या ६८ टक्के आहेत. त्यात मुस्लीम १७.३, ख्रिचन ३२.७, व हिंदू ४८.७ टक्के आहेत. बौध्द अगदी नगण्य असल्यासारखे म्हणजे ०.४ टक्के आहेत.
भारतीय लोक जास्त असण्यामागे एक कहाणी सांगितल्या जाते. जेव्हा मॉरिशियस मध्ये ब्रिटीश राज्यकर्ते होते. तेव्हा येथे उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होते. आताही जिकडे तिकडे शेतात रोडच्या दोन्हीही बाजूला हिरवेगार व तुरुंबे आलेले उसच उस उभे असलेले दिसतात. हे उस खायला गोड नाहीत; पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त आहेत. उसापासून येथे रम नावाची दारू बनविल्या जाते असेही कळले. बनविलेली व्हाईट व ब्राऊन साखर येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. या उसाच्या शेतीला स्प्रिंकल पद्धतीने पाणी दिल्या जात होते. त्यामुळे बसमधून शेताकडे पाहिले की पाण्याचे कारंजे उडलेले दिसत होते. तेव्हा या शेतीला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ आवश्यक होते. त्याचवेळी भारतात पण ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांनी भारतीय लोकांना मॉरिशियसमध्ये दगड उचलला की सोनं सापडते असे सांगून जहाजाने घेऊन गेलेत. तेथे गेल्यावर त्यांना वेठबिगार व गुलाम म्हणून वागवू लागले. त्यांना परत जाणे शक्य नव्हते. शिवाय येणाऱ्या लोकांना रोखू शकत नव्हते. कारण तशा बातम्या ते भारतीयांना देऊ शकत नव्हते. येथे आल्यावर त्यांना पुरती फसवणूक झाल्याचे कळले. ज्यांनी गुलामगिरी विरोधात बंड केले, त्यांचे आंदोलन अत्यंत निर्दयतेने चिरडून टाकण्यात आले. ऐवढे की अशा लोकांच्या शरीराचे अवयव कापून त्यांना उघड्यावर ठेवत. त्यामुळे इतर लोकांना दहशत बसावी हा त्यामागे उद्देश होता. नंतरच्या काळात गुलामगिरीची प्रथा हळूहळू कमी झाली. म्हणून तेथे भारतीयांचे प्रमाण जास्त आहे.
या देशातील जास्वंदाचं फुल हे राष्टीय फुल असून डोडो हा राष्ट्रीय पक्षी आहे. म्हणूनच की काय जास्वंदाचे झाडे मोठ्या प्रमाणात दिसत होते. डोडो बद्दल तर एक गमतीदार माहिती मिळाली ती अशी की पूर्वी त्या परिसरात डोडो नावाचा पक्षी मोठ्या प्रमाणात होता. तो काळ्या करड्या रंगाचा, जाड चोचीचा आणि मजबूत पायाचा बदकासारखा दिसणारा होता. पण हा पक्षी अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथून नामशेष झाला. त्यामुळेच एखादी वस्तू नष्ट होते तेव्हा ‘As dead as Dodo’ असे म्हणतात. या बेटावर भरपूर पाउस पडत असल्याने ‘कलवारीया’ या झाडांचे भरपूर जंगले वाढत. या झाडाला लागणारे फळे हे या पक्षाचे आवडते खाद्य होते. अधिक श्रम करण्याची त्याला सवय नसल्याने त्याची उडण्याची व प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली होती. जेव्हा सतराव्या शतकाच्या सुरुवातीला डच लोकांची जहाजे येत; तेव्हा जहाजावरील खलाशी या पक्षांना व त्यांची अंडी खाऊन जगत. त्यांनी खाण्याचा इतका सपाटा वाढविला की नंतरच्या चाळीस-पन्नास वर्षात साऱ्याच डोडोंना फस्त करून टाकले. एकेकाळी मोठ्या प्रमाणात आढळणारा हा पक्षी पूर्णतः नामशेष झाला. नंतरच्या काळात या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. त्यामुळेच तेथील दुकानात त्याची प्रतिकृती विकायला ठेवतात.
रोडच्या बाजूला उसाच्या शेतीची हिरवळ तर होतीच, पण रोड अगदी स्वच्छ दिसत होते. आपल्या भारतासारखे कुठेही काडीकचरा, प्लास्टिकचे किंवा कागदाचे तुकडे पडलेले दिसत नव्हते. मध्येमध्ये काही किलोमीटर अंतरावर टॉयलेट्स पण दिसत होते.
कुठेकुठे दूरवर दिसणाऱ्या टेकड्या ह्या एकतर हिरवळीने आच्छादिलेले, सुळके असलेले किंवा बोडके असलेले दिसत होते. पण ते खूप सुंदर वाटत होते. काहीकाही टेकड्यांना विशिष्ट आकार दिसत होते. त्याला काहीतरी नावे दिलेले होते. एका टेकडीवर तरंगत असलेला एक मोठा दगड दिसत होता. जमिनीतून मोठमोठे दगडे काढून त्यांनी शेतीयोग्य जमीन बनविलेली दिसली. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत गाईडला विचारले असतांना, नैसर्गिक सरोवरात जमा होणारे पाणी मॉरिशियसच्या लोकांना पिण्यासाठी पुरेसे असल्याचे तिने सांगितले. रोडच्या बाजूला आपल्यासारखे विक्रेते बसलेले दिसले नाहीत. त्यांच्यासाठी वेगळे झोन ठेवलेले दिसत. तसेच रस्तोरस्ती आपल्या देशासारखे भिक मागणारे भिकारी पण कुठेही दिसले नाहीत.
या देशातील आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यात आले ते म्हणजे येथे साप नाहीत व कोणतेही वाघ, सिह, हत्ती सारखे जंगली प्राणी नाहीत. गुरं-ढोरं रस्त्यावर किंवा आजूबाजूच्या शेतावर कुठेही दिसले नाहीत. पण ते आतमध्ये तबेल्यात असतात असे गाईड सांगत होती. उसाची शेती यांत्रिक पद्धतीने होत असल्याने बैलाचे काम पडत नसावे.
असं सारं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र खटकली. ती येथे नमूद केल्याशिवाय राहवत नाही. ती म्हणजे हॉटेल किंवा बाहेरच्या ठिकाणच्या शौचालयात पाण्याची व्यवस्था कुठेही दिसली नाही. त्याऐवजी टिस्यु पेपरचे रोल तेथे ठेवलेले दिसायचे. त्यामुळे फार अवघडल्यासारखे व्हायचे. पण उपाय नव्हता. काय करणार? ‘देश तसा वेश’ करावाच लागतो. विमानात पण अशीच व्यवस्था होती. याचं कारण काय त्याचा काही उलगडा झाला नाही. अशीच एक गोष्ट माझ्या वाचण्यात आली. आपल्या इकडे हागणदारीत पालात राहणारे भटक्या जमातीचे मुलं बाहेर शौचालयाला जातांना पाणी नेत नव्हते. त्यांचे कारण विचारले; तेव्हा त्यांनी सांगितले की पाणी ही पवित्र गोष्ट असून देव त्याला आभाळातून पाठवतो. आम्ही त्या पाण्याने देवाची आंघोळ करतो. मग आम्ही हे पाणी कसं वापरू ? देवाचा कोप होईल ना ! काय ही अंधश्रद्धा...! एवढे खरं की मॉरिशियससारख्या प्रगत देशात हे कारण असण्याची मुळीच शक्यताच नाही. भारतात मात्र अंधश्रद्धा खोलवर रुजली आहे.
आम्ही हॉटेलला पोहोचलो तेव्हा मन अगदी प्रसन्न करणारे वातावरण दिसले. कारण तेथील मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी आम्हा सर्वांना गुलाबाचे फुलं व सोबत नॅपकीन देऊन हसतमुखाने स्वागत केले.
हे हॉटेल फोरस्टार स्तरावरचे असल्याचे कळले. त्यामुळे तेथील रूम खूप छान व प्रशस्त होते. हे हॉटेल अगदी समुद्राच्या काठावर होतं. आमच्या रूममधून बाहेर समुद्राचे विलोभनीय दृश्य दिसत होते. विदेशी पर्यटक समुद्राच्या पाण्यात मौजमजा करून काठावरच्या छत्रीखाली येऊन आराम करीत. तेथे पाण्यात वाटरपोलोचा खेळ खेळत. आणखी एक वैशिट्य आढळले ते म्हणजे समुद्राच्या लाटा काठापर्यंत येत नव्हते, तर ते ५०० मीटरच्या आत थोपवण्यात आले होते.
तेथे पोहचल्यावर जवळच्या दुकानातून मॉरिशियसचे सिमकार्ड विकत आणले. त्यामुळे मुलांसोबत भरपूर वेळपर्यंत बोलता आले. हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडून वायफाय जोडून घेतला. त्यामुळे कितीही वेळपर्यंत फुकटात बोलण्याची सुविधा झाली. त्या दिवशी आम्ही बाहेर न जाता हॉटेलवरच थांबलो. हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणाची व्यवस्था होती. जेवणात व्हेज, नॉनव्हेज आणि स्वीट असा प्रकार होता. त्या हॉटेलमध्ये विदेशी पर्यटक असल्याने भारतीय आणि वेस्टर्न अशा दोन्हीही पद्धतीचे जेवण होते. रात्रीला नाच-गाण्याचा कार्यक्रम राहत होता. जेवता-जेवता बाहेर दिसणारे समुद्राचे दृश मनाला मोहित करणारे वाटत होते. खरेच खूप चांगल वातावरण होतं. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम टीम मॅनेजर गार्गी मॅडम यांनी सांगितला. टूरमध्ये साधारणत: बीच टूर, शॉपिंग टूर आणि साईट सिइंग टूर असा अंतर्भाव होता.
दुसऱ्या दिवशी १५ तारखेला सकाळी सात वाजता हॉटेलमध्येच आम्हाला नास्ता देण्यात आला. मग बसने आमच्या सहली सुरु झाल्या. त्यादिवशी आम्हाला धबधबा पाहायला जायचे होते. त्याआधी हॉटेलपासून जाणाऱ्या अलीकडील समुद्राच्या बीचवर गेलो. तेथे दूरवर आतमध्ये पॅरासेलिंग होत असल्याचे दिसले. ज्यांना पॅरासेलिंग करायचे त्यांनी बोटीने तेथे जावे, बाकीच्यांनी बीचवर थांबावे असे सांगण्यात आले. आम्ही दोघांनीही आधीच थायलंडला पट्टाया येथे पॅरासेलिंग केले असल्याने परत करण्याची इच्छा झाली नाही. आमच्या ग्रुपमधील काही लोक तेथे गेले होते. परंतु येथील पेक्षा पट्टायाची व्यवस्था चांगली होती असे आम्हाला वाटले. येथे स्पीड बोटने फिरण्याची सोय पण होती. आम्ही समुद्राच्या तीरावर थांबलो होतो. मध्येमध्ये पाण्यात फिरण्याची मजा घेत होतो. येथील समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. आम्हाला केसरी तर्फे नारळाचे पाणी दिले. मी त्या नारळाचा भाव सहज विचारला; तेव्हा समजले की त्याची लहान आकाराला १०० रुपये व मोठ्या आकाराला १५० रुपये अशी किंमत होती. म्हणजे आपल्याकडे याच्या दुप्पट २००/३०० रुपये... बापरे...! काय ही किंमत जे आपल्याकडे २५/३० रुपयाला मिळते.
आमची बस Trou d`Eau Douce येथपर्यंत जाऊन तेथे आम्हाला सोडून देण्यात आले. मग आम्ही स्पीड बोटने समुद्रातून waterfall “Grand River South कडे जायला निघालो. हा प्रवास अप्रतिम असा होता. धबधब्याच्या जवळ जात असतांना दोन्ही बाजूला तीर असलेला व झाडाझुडपांनी गच्च भरलेला अगदी नदीसारखा प्रवाह दिसत होता. तिथे जेमतेम एक बोट मावेल एवढी जागा असल्याने आधीची बोट जाईपर्यंत थांबावे लागत असे. मग धबधब्यापर्यंत बोट गेली. धबधबा खूप सुंदर होता. अगदी जवळ जाऊन बोटीवरच आम्ही थोडावेळ थांबलो. मग आमची बोट फिरून Aux Cerfs Island येथील बंदरावर आली. हा एक समुद्र किनाऱ्यापासून दूर असलेलं बेट आहे. मस्त पोहता पण येत होते. वर एका मोठ्या झाडावर वरती रोप वे दिसले. तेथून काही प्रवासी रोप वे ने जात होते. बहुदा ते धबधब्याच्या वरच्या बाजूला जात असावे. तेथे आकाशी निळसर रंगाचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि पांढऱ्या रंगाची वाळू आणि हिरव्या रंगाचे सुंदर असे पामचे झाडे होते. थोडावेळ थांबून आम्ही दुसऱ्या बोटीने Trou d`Eau Douce येथे परत आलो.
तिसऱ्या दिवशी १६ तारखेला आम्ही साऊथचा टूर केला. याच दिवशी भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. तेथील काही दुकानात टी.व्ही. होते. त्यात हे निकाल झळकत होते. भारतीय जनता पार्टी विजयाकडे कूच करीत असल्याचे चित्र त्यात दिसत होते. या टूरमध्ये सुरुवातीला डायमंड शॉप पाहिले. नंतर मॉडेल शिप फॅक्टरी पाहायला गेलो. जहाज कसे बनवितात, त्याचे लहान लहान आकारात निरनिराळ्या प्रकारचे नमुने व प्रतिकृती येथे ठेवलेले होते. त्याची विक्री पण करीत होते. आम्ही शिप फॅक्टरी म्हणजे जहाजे कसे बनवितात ते पाहिले. त्याच्या लहान आकाराच्या प्रतिकृती विकायला ठेवल्या होत्या.
नंतर आम्ही Trou aux Cerf ज्वालामुखी पाहायला गेलो. हे ठिकाण डोंगरावर असल्याने चढावाने जावे लागते. तेथेपर्यंत गाड्या जातात. हा परिसर अतिशय सुंदर आहे. फोटो काढण्यासाठी खूप चांगला स्पॉट आहे. हा ज्वालामुखी ६०० वर्षापूर्वी जिवंत होता असे म्हणतात. आता तो निद्रिस्त अवस्थेत आहे. कधीही तो पुन्हा जिवंत होऊ शकते. ह्या ज्वालाग्राहीचे मुख अगदी मॉरिशियस देशाच्या Curepipe या शहराच्या मधोमध आहे. वरून वाकून पाहिले तर त्या विवरात खोल खड्डा दिसतो. त्यात माती-चिखल व पाणी असल्याचे सांगतात. आजूबाजूला झाडाझुडपांनी झाकलेलं दिसते. लोणारचा नैसर्गिक सरोवर वरून पाहिल्यावर जसा गोलगोल दिसतो तसाच हा दिसत होता. हा ज्वालामुखी ३०० मीटर रुंद व ६५० मीटर खोल आहे असल्याचे सांगत होते.
नंतर आम्ही Grand Bassin पहायला गेलो. हे पण एक ज्वालामुखीपासून तयार झालेलं सरोवर आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. याला आता हिंदूलोकांचे एक पवित्र ठिकाण मानल्या जात आहे. म्हणूनच या सरोवराला ‘गंगा तलाव’ असेही म्हणतात. या सरोवरात भरपूर आणि खोल पाणी आहे. या पाण्यात लहान-मोठ्या खूप प्रमाणात मासोळ्या दिसल्या. त्या अगदी काठावर येत होत्या. लोक त्यांना काही खायला टाकत होते. म्हणून ते काठापर्यंत जमा होत होत्या. येथे भगवान शिवाचं मंदिर असून त्यात हनुमान, लक्ष्मी यांच्या मुर्त्या आहेत. शिवरात्रीला हिंदू लोक घरून अनवाणी पायाने या ठिकाणी येत असल्याचे सांगण्यात आले. येथे या सरोवराच्या सुरुवातीला मंगल महादेव या देवाचा ३३ मीटर उंचीचा पुतळा आहे.
नंतर आम्ही Black River National Park पाहायला गेलो. हे ठिकाण मॉरिशियसच्या पर्वतीय दक्षिण-पश्चिम भागात आहे. हा पार्क ६७.५४ किलोमीटर क्षेत्रफळ इतका पसरलेला असून घनदाट जंगल आहे. येथे एक सुंदर असा अलेक्झांडर नावाचा धबधबा आहे. ह्या धबधब्याचं पाणी १२७ मीटर उंचीवरून पडते. मॉरिशियस मध्ये हा सर्वात उंचीचा धबधबा आहे.
नंतर Camarel येथे गेलो. हे एक खेडे गावाचे नाव आहे. येथे सात रंगाची माती आहे. हे वेगवेगळे सात रंगाचे होते. ते १५ मीटर जाडीचे एका जवळ एक असे वाळूचे थर नैसर्गिकरित्या पसरलेले होते. यात लाल, तपकिरी, निळसर जांभळा, हिरवा, निळा, पर्पल असे रंग दिसत होते. हे आणि धबधबा ज्वालामुखीच्या हजारो वर्षाच्या प्रक्रियेमुळे नैसर्गिकरीत्या तयार झाले होते असे तेथे लिहिले होते.
येथे आणखी एक नवलाईची गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे महाकाय आकाराचे कासव ! हे कासव एक मीटर लांबीचे, १५० वर्षे वय असलेले होते. हे कासव २५० वर्षेपर्यंत जगू शकतात व ते ९ ते २५ अंडे देतात असे तेथे माहिती लिहिली होती.
रोडने जातांना बाजूला उसाची शेती, अननस व कॉफीचे मळे दिसत होते. प्रामुख्याने शेतात उतार-चढावावर पामचे झाडे मोठ्या प्रमाणात लावलेले दिसत होते. हे झाडे नारळाच्या झाडासारखे पण कमी उंचीचे दिसत होते. सात वर्षानंतर या झाडाची कापणी करतात. त्याचा गाभा खाण्यामध्ये सलाद व लोणच्यासाठी वापरतात. याचा उपयोग फ्रांस या देशात होत असतो. त्याला किंमत पण चांगली येत असते. म्हणून या शेतीला ‘मिलेनियर गार्डन’ असे म्हणत असल्याचे गाईड सांगत होती.
येतांना रोडला लागून असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही लंचला थांबलो. आश्चर्य असे की त्याच्या बाजूला एका मोठ्या उंच झाडावर लटकलेल्या अवस्थेत चिमण्या पक्षांचे खूप खोपे पाहायला मिळाले. हवेच्या झोताने ते मस्त झोके घेत होते. असं हेही सुंदर दृश्य आम्हाला त्यावेळी पाहायला मिळाले.
चौथ्या दिवशी १७ तारखेला आम्ही बोटॅनिकल गार्डन पाहायला गेलो. आम्ही याआधी उटी येथील बोटॅनिकल गार्डन पाहिले. तेथील फुले आणि झाडे खरोखरच सुंदर होते. तसेच याही गार्डन मधील झाडे व फुले पाहून देहभान विसरल्यासारखे होते. इतके ते सुंदर दिसले. या गार्डन चे मूळ नाव ‘Pamplemousses Botanical Garden’ असे असून त्याला सरकारने ‘Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden.’ असे नाव दिले. हे पोर्ट लुईस जवळ आहे. हे जगपसिद्ध उद्यान ३०० वर्षापूर्वीचं खूप जुने असल्याचं कळलं. ते ३७ हेक्टरवर पसरलेले आहे. पर्यटकांचे खासच आकर्षण आहे. तेथे सुंदर सुंदर झाडे, फुले, वनस्पती जे कधीही न पाहिलेले असे पाहण्यात आले. मोठ्या आकाराचे जवळपास अर्ध्या मीटर व्यासाचे चहाच्या ट्रे सारखे व हुबेहूब हृदयाच्या आकाराचे दिसणारे कमळाच्या पानाने आमचे लक्ष वेधून घेतले. याचं पान इतके मोठे की त्यात छोटासा बाळ सहज झोपू शकतो. ही एक कमळाची वेगळी जात आहे. ती फक्त मॉरिशियसलाच आहे असे म्हणतात. पहिल्या दिवशी पांढऱ्या व दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे असे रोज सरड्यासारखे रंग बदलणारे फुले आहेत. या फुलांशिवाय, मसाल्याचे व औषधीगुण असलेले वेली, झाडे, व ८५ प्रकारचे निरनिराळे पाम झाडं जे बाहेरच्या देशातून आणलेले आहेत; ते सुध्दा आपले लक्ष वेधून घेतात. मोठ्या बुंध्याचे झाडं येथे पण दिसतात. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापली जवळील जंगलात (नक्षलवादी भागात) असेच मोठ्या सागाचे झाड पाहिलेत. कुंकवाचे झाड ( बिक्सा अनोटा) या बियांपासून खाद्यरंग तयार करतात असे सांगण्यात आले. प्रत्येक झाडाचे नाव व माहिती झाडासमोरच्या चौथऱ्यावर लिहिण्यात आले होते. एका झाडाला इतके मोठे फळ होते की त्या फळाचे म्युझिकल इन्स्ट्रुमेन्ट्स बनवितात असे गाईड सांगत होती. एका काळ्या रंगाच्या खोडातून रक्तासारखा चिक निघत होता. तेथे असं एक पामचं झाड होतं की ज्याला ८० वर्षानंतर फुल लागते. काही पामच्या झाडाच्या भोवती दुसऱ्या जातीच्या बांडगुळ वनस्पतीने अक्षरशः वेढून घेतले होते. येथे रबराचे, बदामाचे झाडं होते. एका लोटस पॉंडमध्ये चीलापोया नावाचे मासे होते. ज्या रम पितांना खात असल्याची माहिती गाईड देत होती. एका झाडाच्या ज्याला ब्राऊनिया ग्रँडीसेप्स नाव होते त्याला सुंदर शेंग आली होती. या देशाचे राष्ट्रपिता मानल्या गेलेले सर शिवसागर रामगुलाम यांची तेथे समाधी आहे. या उद्यानातील प्रसिध्द असे देशोदेशाचे नेत्यांनी वृक्षारोपण केले आहे. त्यात नेल्सन मंडेला व इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.
नंतर आम्ही Citadel Fort (सिटाडेल किल्ला) पाहायला गेलो. या किल्ल्यावरून पोर्ट लुईस या शहराचा व समुद्राचा संपूर्ण नजारा पाहायला मिळते. तेथे दूरवरचे पाहण्यासाठी दुर्बीण ठेवले आहेत. हा किल्ला ब्रिटीशांनी एकोणीसाव्या शतकात बांधले असून १०० मीटर उंचीवर आहे. त्यानंतर रोडने जातांना बसमधूनच आम्हाला कॅथालीक चर्च, मस्जिद, हायकोर्ट इमारत, पोर्ट लुईस थियटर, फ्रेंच वसाहती इमारती इत्यादी दाखविण्यात आले. त्यानंतर आम्ही काउदान वाटर फ्रंट (Caudan Water Front) येथे गेलो. हे एक मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल आहे. येथे प्रवेश केल्या केल्या येथे वरती एका जवळ एक असे अनेक रंगीबेरंगी छत्र्या लटकवून त्याचे छत उभारल्याचे पाहून आम्ही थक्क झालो. छान कल्पना वाटली ! एकतर उन्हापासून संरक्षण व दुसरे सजावट. आहे कि नाही गंमत...!
येथेच एका हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर आम्ही खरेदीचा आनंद लुटण्यासाठी लागून असलेल्या मॉलमध्ये घुसलो. त्याखाली खाण्याचे पदार्थ असणारे दुकाने होते. त्यात हातभर लांबीचे, मोठ्या आकाराचे ब्रेड विकायला ठेवले होते. त्याचा अगडबंब आकार पाहून आम्ही चकित झालो. तो बहुदा फॅमिली पॅक असावा. कसे बनवितात त्याचे प्रात्यक्षिक दाखवता दाखवता त्याचा नमुना पण खायला देत होते. हे ठिकाण बंदर असल्याने बाजूला अनेक जहाजे उभे होते, त्यामुळे फोटो काढण्यासाठी हा स्पॉट खूप चांगला होता. मग आम्ही सायंकाळी हॉटेलवर पोहचलो
पाचव्या आणि शेवटच्या दिवशी १८ तारखेला सकाळी आम्ही सबमरीन डाईव्हसाठी गेलो. हा आमचा शेवटचा दिवस होता. तेथूनच आम्ही परस्पर रात्री ९.२० वाजताची फ्लाईट पकडण्यासाठी जाणार असल्याने सोबतच बॅगा घेतल्या. समुद्राच्या काठावरील ब्लू सफारीच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आमची माहिती लिहून घेतली. नंतर त्यांनी बोटीने आम्हाला सबमरीन जेथून सुटतात, त्या जहाजापर्यंत घेऊन गेले. हे जहाज समुद्र किनाऱ्यापासून दूर आतमध्ये होतं. आम्ही ज्या बोटीने जात होतो, त्या बोटीत बसलेल्या जागेवरून समुद्राची खोली पाहता येत होती. कारण आमच्या पायाजवळ त्यांनी तसा पारदर्शक काच लावला होता. त्यामुळे समुद्रात पोहणारे मासे व समुद्र तळातील शेवाळ, दगडं, वाळू इत्यादी दिसत होते. तेथे पोहचल्यावर सबमरीन आलं. त्यात आम्ही छिद्रातून आतमध्ये शिरून काचेच्या खिडकीजवळ जाऊन बसलो. हे पूर्णपणे झाकलेलं, बंद व एअरकंडीशन असलेली बस होती. यात पाच किवा दहा लोक बसू शकतील इतकी त्याची क्षमता असते. काचेतून आम्हाला समुद्रातील आतील दृश्य दिसत होतं. त्यातून व्हिडीओ आणि फोटो काढता येत होतं. हे सबमरीन ३५ मीटर खोल समुद्रात जात असल्याचे सांगण्यात आले. सबमरीनचा ड्रायव्हर आम्हाला माहिती देत होता. रंगीबेरंगी मासे व बुडलेल्या जहाजाचे अवशेष पाहायला मिळाले. अगदी समुद्राच्या तळाला जावून थोडावेळ हे सबमरीन थांबविण्यात आले. मग आम्ही पोहणारे लहान-मोठे रंगीबेरंगी मासे, रेती, खडक, वनस्पती व जपान व मॉरिशियसचे बुडालेल्या जहाजाचे अवशेष अगदी जवळून पाहिले. सबमरीन ४५ मिनिटे आतमध्ये होतं. येथे सबस्कूटर डाईव्हची पण व्यवस्था होती. यात दोघेजण बसतात. समुद्राच्या आतमध्ये स्वतःच चालवायची असते. तरुण जोडप्यांनी ही सबस्कूटर डाईव्हची मजा घ्यायला काही हरकत नाही. परत जहाजावर आल्यावर आम्हाला ‘डाईव्हिंग सर्टिफिकेट’ देण्यात आले. मॉरिशियसच्या प्रवासातला हा सबमरीन डाईव्हचा मस्त, रोमांचकारी आणि अदभूत असा आगळावेगळा अनुभव होता.
पाच वाजताच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये आम्हाला पिझ्झा खायला दिला. डिनर आम्हाला फ्लाईट मध्ये मिळणार होते; त्यामुळे पिझ्झा...! परंतु फ्लाईट अचानक रद्द होवून त्याऐवजी ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजता असल्याचे आमच्या टीम लीडरने सांगितले. त्यामुळे आमचा रात्रीचा का होईना एक दिवस आणखी मुक्काम वाढला. काही लोकांची मुंबईहून त्या फ्लाईटला लागून दुसरीकडे जाणारी फ्लाईट असल्याने त्यांची मात्र पंचाईत झाली. असेही काही प्रसंग फ्लाईट अचानक रद्द झाल्याने उद्भवत असतील, नाही का? आम्ही मग परत त्याच हॉटेलमध्ये आलो. येतांना एका भारतीय वंशाच्या हॉटेलमधून गार्गी मॅडमने आम्हाला सकाळी खाण्यासाठी पुरी-भाजीचे पुडे दिले. ते रुमच्या फ्रीज मध्ये ठेवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ३.०० वाजता उठून तयारी करायची होती.
१९ तारखेला आमचा सकाळी ४.०० वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी रोडवर काहीच रहदारी नव्हती. तरीही चौकावरील लाल-हिरवे सिग्नल मात्र लागत होते. लाल सिग्नल पाहून आमचा बस ड्रायव्हर थांबत होता. आमच्या देशातील ड्रायव्हरने असे कधीही केले नसते. रहदारी नाही ना... मग काढ गाडी... लाल सिग्नल असला तरीही...? शेवटी विमानतळावर आलो. सकाळी आठ वाजता विमान सुटलं अन आम्ही मॉरिशियसचा निरोप घेऊन थेट मुंबईला आलो.
खरंच मॉरिशियसची सुदरता, नैसर्गिक सौंदर्याचा खजिना पाहून आम्ही खूप प्रसन्न झालो.
प्रतिक्रिया
6 Dec 2014 - 5:54 pm | तुषार काळभोर
मला नाही वाटत हे साहेब इथे परत लिहितील...
6 Dec 2014 - 5:55 pm | तुषार काळभोर
पुलेशु!
6 Dec 2014 - 6:20 pm | जेपी
केसरी v/s वीणा वर्ल्ड अशी स्पर्धा चालु आहे का ?
*biggrin*
6 Dec 2014 - 6:30 pm | टवाळ कार्टा
=))
7 Dec 2014 - 3:04 am | मुक्त विहारि
मराठी रक्त आहे बाबा...
आधी, राजा-राणी, मग केसरी आणि मग वीणा.
आणि मूळची शिवसेना मग बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मग मनसे.
मराठी माणसांची दूफळी नेहमीच असणार....
6 Dec 2014 - 6:38 pm | अजया
फोटो?
चांगलं लिहिताय.फक्त जरा दोन भागात चाललं असतं.एकदम मोठ्ठठा भाग वाचताना दम लागतो ना!
6 Dec 2014 - 10:23 pm | हाडक्या
मिपावर मुपी म्हणून एक नवीन दालन सुरु करायला हरकत नाही असं वाटतंय.. ;)
8 Dec 2014 - 1:25 pm | स्पा
चुकून "मू.वी" असे वाचले
8 Dec 2014 - 1:41 pm | प्यारे१
ऑलरेडी (अलिखित) आहे की! ;)
(मुवि हलकं घ्या.)
8 Dec 2014 - 2:48 pm | लॉरी टांगटूंगकर
=))
7 Dec 2014 - 1:53 am | मुक्त विहारि
छान लिहीले आहे.
7 Dec 2014 - 2:33 am | खटपट्या
वाचतोय !! फोटो असते तर अजुन वाचनीय झाला असता !!
7 Dec 2014 - 2:03 pm | दिपक.कुवेत
पण हॉटेल वाल्यांनी गुलाबांच्या फुलासोबत नॅपकीन का दिलं? गुलाबाचे काटे टोचू नये म्हणून?
7 Dec 2014 - 5:02 pm | मदनबाण
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }
8 Dec 2014 - 1:08 pm | विजुभाऊ
अरे बापरे इतके रटाळ आणि कंटाळवाणे प्रवास वर्णन....
अवांतरः तुम्ही प्राथमिक शाळेत शिक्षक होतात काय?
प्रवास वर्णनात रंजकता आणायची असेल तर ते वर्ण्न वाचणाराच्या डोळ्यासमोर उभे रहायला हवे असे लिहाना. पुलं देशपांडे , मिना प्रभू यांचे प्रवासवर्णने खरोखर माईल स्टॉन मानावी लागतील. असो
पहिल्या प्रयत्नाबद्दल अभिनन्दन
8 Dec 2014 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर
विजुभाऊ,
बेंचोssssssर उभा करीन हं.
8 Dec 2014 - 4:36 pm | बॅटमॅन
"बेंचोर" वाचून "शाळे"तल्या "कारेक्रमा"ची आठवण झाली. =))
8 Dec 2014 - 2:35 pm | मॅक
वर्णन छान पण फोटो का नाहीत????
8 Dec 2014 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्णन आवडलं. थोडंसं पाल्हाळीक पण चालायचचं लिहित राहा.
एकदा मोरिससला जायचंय कधी ते माहिती नै !
-दिलीप बिरुटे
12 Dec 2014 - 12:38 pm | निलीमा
वर्णन छान पण फोटो का नाहीत?
+++ अगदी हेच म्हणते मी पण *ok*