शंभर ते दीडशे रुपयांची तिकिटे काढून नाटक पहायला आलेल्या प्रेक्षकाची किमान अपेक्षा असते की हे नाटक विनाव्यत्यय पहायला मिळावं...
पण तसं फ़ारसं नशिबात नसतं हल्ली...
नाटकातल्या व्यत्ययाचे विविध प्रकार :
१.खाईखाई सुटलेले प्रेक्षक :
पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येत नाही...
कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना.. वेफ़र्सच्या पिशव्या, त्यांचा आवाज, वेफ़र्स चावताना होणारा कुरूमकुरूम आवाज अगदी लांबवर ऐकू जातो. याने रंगमंचावरचे कलाकार वैतागून जातात , पण बरेच जण चालायचंच असं समजून दुर्लक्ष करतात.
२.मोबाईल
वाजणारे मोबाईल आणि तिथेच बोलत राहणारे महान प्रेक्षक यांना चुकीची जाणीवच नसते.
कारणं अनेक... बेफ़िकीरी हे मुख्य, काहींना आपण किती महत्त्वाचे आहोत हे जनतेपुढे दाखवायला आवडते, काहींचा भारी मोबाईल / भारी रिंगटोन संपूर्ण जनतेला दाखवावा असे त्यांना वाटते, काहींचे अद्न्यान असते... उदा. एखाद्या काकूंना किंवा आजोबांना ( नातवाने किंवा पुतण्याने प्रेमाने मोबाईल घेऊन दिलेला असतो ) पण हेच लक्षात नसते की आपण मोबाईल आणलेला आहे. मग ते लक्षात आणून द्यायचं शेजार्याने. मग काकू पिशवी / पर्स काढणार शोधणार मग मोबाईल मिळाला की शेजार्याने तो बंद करून द्यायचा... असे ऐकले की चेतन दातार त्याच्या प्रयोगांच्या आधी मोबाईल कसे बंद करावेत याचेही प्रात्य्क्षिक करून दाखवत असे . पण तरी मोबाईल वाजणे शून्यावर येत नाही. काही महाभाग तर तिथे फोन घेतात सुद्धा. मग कोणत्या नाटकाला आलोय त्याचे वर्णन करूनच ठेवतात फोन.
३. बालगोपाळ : काही मंडळी लहान लहान बाळ घेऊन प्रयोगाला येतात.... कोंदट आणि अंशत: एसी चालू असलेल्या प्रेक्षागृहात ते बाळ रडायला लागते. मग थोडा वेळ आई आणि बाबांपैकी एक जण दुसरा घेऊन जाईल म्हणून वाट पाहतात... आवाज वाढल्यावर इतर प्रेक्षकांच्या दबावाचा अंदाज घेऊन दोघांपैकी एकजण पोराला घेऊन उठतो . तोपर्यंत सर्वांची १० मिनिटे खलास होतात....
काही कंत्राटी प्रयोगांत लहान मुले दंगा करताना, धावण्याच्या शर्यती लावतानासुद्धा पाहिले आहे.
अवांतर : तेंडुलकरांच्या वैर्याची रात्र या एकांकिकेत स्वत:च्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला चित्रविचित्र प्रेक्षकांनी त्रस्त झालेला लेखक अफ़लातून दाखवलेला आहे....त्या एकांकिकेचा परेश मोकाशीने बसवलेला प्रयोग तेंमहोत्सवाच्या डीव्हीडीमध्ये पाहिला..मस्त मजा आली होती...
४. कॉमेंट मारणारे प्रेक्षक : " आता तोच तिला मारणार, ही बाई आता गळा काढणार " अशी मोठ्याने कॉमेंट्री करणारे अनेक प्रेक्षक पाहिले आहेत... आजूबाजूच्या ३० - ४० प्रेक्षकांपर्यंत हे आधुनिक बॉबी तल्यारखान ही माहिती पोचवतात.
उपाय :
प्रबोधन आणि शासन :
नाट्यप्रयोग सुरु होण्यापूर्वी केवळ "मोबाईल बंद ठेवावेत " असली सूचना देणे पुरेसे नसतेच.... त्यासाठी प्रेक्षकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.... मोबाईल बंद का ठेवावेत? कसे ठेवावेत? कोणासाठी ठेवावेत? वगैरे ...
किंवा नाटक सुरू होण्यापूर्वीपासूनच संस्थेचे मंचव्यवस्था सहाय्यक आणि नाट्यगृहाचे कर्मचारी प्रेक्षकांच्यात उभे राहून दबावगट तयार करतात असेही क्वचित पाहिले आहे.
५ वर्षांखालील मुलांना प्रवेश बंद वगैरे उपायही काही संस्था करतात.
व्यत्यय आणणार्या प्रेक्षकांना ( कितीही इच्छा असूनही) शिक्षा करणे शक्य नाही.... पण काही अभिनेते थोडासा व्यत्यय आला तरी लगेच नाटक थांबवून त्या प्रेक्षकांना शरम वाटते का ते तपासून पाहतात.( यात इतर प्रेक्षकांवर अन्याय होतो हे मान्य आहे पण तरीही सध्या हा उपाय मला जाणीव निर्माण करण्यासाठी रास्त वाटतो).
विक्रम गोखले प्रयोग चालू असताना मोबाईल वाजला की नेहमीच थांबतात. त्यांनी प्रयोग सुरू होण्यापूर्वी नम्र परंतु ठाम शब्दांत धमकी देऊनही काही फ़रक पडत नाही. मोबाईल चालूच राहतात, त्यांचं वाजणं चालूच राहतं.... प्रेक्षक म्हणून मला हे शरमेचं वाटतं पण त्यावेळी फ़ारसं काही करण्यासारखं नसतं...
मी पाहिलेल्या फ़ायनल ड्राफ़्टच्या व्यावसायिकच्या प्रयोगात चार लोक मागे वेफर्स खात होते, प्लॅस्टिक पिशवीचा आवाज , आणि खातानाच्या कुरुमकुरुम आवाजाने व्यत्यय आला आणि गिरिश थांबला...म्हणाला ,"तिकडे मागे कोणीतरी वेफर्स खातंय, मगाशी इतक्या वेळा मराठीत सांगूनही त्यांना समजलेलं नाही वाटतं... एक पूर्ण प्रवेश मी वाट पाहिली ,अजून चालूच आहे ...मग त्यांचं खाऊन होईपर्यंत आपण थांबूया"...आवाज लगेच थांबला मग त्याने नाटक सुरू केलं...
अवांतर :
गिरीशचा तो प्रयोग पाहिल्यानंतर मी आमच्या ग्रुपच्या दिग्दर्शकाला म्हटले, " पुढल्या प्रयोगापासून मीही असेच करणार" तो घाबरला, म्हणाला, " एवढा माज बरा नाही दिसत राव आपल्याला ... इतर प्रेक्षकांचा असा रसभंग करण्याचा काय हक्क आहे आपल्याला? "... मी काही त्याला पटवून देऊ शकलो नाही. मी भले व्यावसायिक नसेन, मी गिरीश किंवा विक्रम नसेन, मी रोज दोन प्रयोग करत नसेन , मी महिन्या दीड महिन्यांतून एखादाच प्रयोग करत असेन पण म्हणून माझी इन्व्होल्व्हमेंट किंवा डेडिकेशन कमी आहे का ?....
प्रेक्षकांना आम्ही समजावून सांगत नाही म्हणून ते परत परत चुका करत राहतात.. त्यांना जाणीवच नाही तर सुधारणार काय?
प्रतिक्रिया
8 Aug 2008 - 9:40 am | पिवळा डांबिस
मी भले व्यावसायिक नसेन, मी गिरीश किंवा विक्रम नसेन, मी रोज दोन प्रयोग करत नसेन , मी महिन्या दीड महिन्यांतून एखादाच प्रयोग करत असेन पण म्हणून माझी इन्व्होल्व्हमेंट किंवा डेडिकेशन कमी आहे का ?....
मुळीच नाही! तुमची डेडिकेशन मुळीच कमी नाही....
पुढल्या वेळी त्या प्रेक्षकाला ललकारा, " भडव्यो! तुम्हाला काय बाहेर वेफर्स खायला मिळत नाहीत का, की इथे येऊन मी जी हे नाटक बसवण्यासाठी मेहेनत घेतलीय तिच्यावर येऊन हगताय!!!!!"
भें**! सॉरी जनरल डायर! पण अशा प्रेक्षकांना अशीच भाषा कळतेय!!!
खरे नाट्यप्रेमी असे प्रकार कधीच करणार नाहीत. जसे खरे संगीतप्रेमी मैफिलीच्या मध्ये कधीच काही वेडेवाकडे चाळे करत नाहीत!!!
8 Aug 2008 - 9:42 am | मेघना भुस्कुटे
खरंच. समोर प्रयोग चालू असताना आपण त्याचा काहीएक मान राखायचा असतो याचीच मुळात जाण नसते लोकांना. 'पैसे देऊन आलोय' हाच एक माज. प्रेक्षक म्हणून आपल्याकडूनही काही किमान अपेक्षा असते, हे त्यांना कळेल तो सुदिन. तोवर हे असेच...
8 Aug 2008 - 9:46 am | प्रकाश घाटपांडे
मास्तर बरेच दिवस असा विषय काढावा हे आमच्या मनात होतेच. तुम्हीच हात घातलात ते बरे झाले.
प्रबोधनावरच प्रथम भर द्यावा ! शेवटी मायबाप प्रेक्षक महत्वाचे आहेतच. त्यांना कमी दुखावुन हे ऑपरेशन करता येईल.
प्रेक्षक असे का करतात हे जाणुन घेणे ही महत्वाचे.
(प्रेक्षागृहात पाउल टाकल्यावर मोबाईल सायलेंट मोडवर टाकणारा परंतु बाहेर आल्यावर नॉर्मल करायचे विसरणारा)
प्रकाश घाटपांडे
8 Aug 2008 - 9:52 am | सर्किट (not verified)
हे भारतातच नाही, तर अमेरिकेत देखील दिसते.
तरी आम्ही दर वेळी सांगतो, बाबा रे बंद करा तो मोबाईल !
नाटकाचे प्रेक्षक बहिरे असतात का हो ?
(यावर एकच उपाय, सेलफोन ब्लॉकर्स लावावे थेटरांत.)
- सर्किट
8 Aug 2008 - 10:06 am | धनंजय
येथे मी बघितलेल्या कित्येक व्यावसायिक नाटकांत एकदाही सेलफोन वाजलेला आठवत नाही. लहन मुलांना प्रवेश नसतो, आणि खाद्य-पेय आत आणू देत नाही. (खास लहान मुलांसाठी प्रवेश असलेला असाही एक प्रयोग महिन्यातून करतात.) अर्थात सुरुवातीला "सेलफोन बंद करा" "पेपरमिटच्या गोळ्यांचे कागद आताच सोला" वगैरे घोषणा होतातच.
पण हौशी (भारतीय) कार्यक्रमात असे काही प्रकार बघितले आहेत खरे. हम्म्म.
8 Aug 2008 - 10:04 am | एक
नाटक सुरू झाल्यावर येणारे लेट कमर्स..
एकदम सताड दरवाजा उघडून येतात (आणि बराच काळ उघडापण ठेवतात).. दुपारच नाटक असलं तर एकदम ग्लेअर येतो आणि लक्ष विचलीत होतं.
हा अनुभव इथे बराच वेळा येतो.. :(
8 Aug 2008 - 10:23 am | भडकमकर मास्तर
सताड दरवाजा_
हो की..हे राहिलंच...
ग्लेअरबरोबरच ..... सर्वांच्या पायावर पाय देत रांगेत शिरणं...
दार धडामदिशी आपटणं....
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
8 Aug 2008 - 10:32 am | एक
पण जो पर्यंत कोणी किंकाळी फोडत नाही तो पर्यंत देवू देत पाय.. फक्त तो दरवाजा जरा शांतपणे आणि लवकर लावायला हवा :)
8 Aug 2008 - 10:33 am | मेघना भुस्कुटे
चित्रपट महोत्सवामधे मात्र बहुतांश प्रेक्षक साक्षर असल्यासारखे वागतात हा माझा अनुभव. मोबाइलवर बोलणं तर दूरच, पण मेसेज टाईप करायला पेटवलेल्या आपल्या मोबाईलच्या प्रकाशाचा इतरांना त्रास होऊ शकतो याचंही भान बाळगून लोक वावरतात. तिथे एकूणच चित्रपटाची ठरवलेली वेळ पाळणे, मोबाइल-सभ्यता बाळगणे, कलाकारांबद्दल एक आब बाळगणे... अशा गोष्टी पाहायला मिळतात. अर्थात यालाही अपवाद आहेतच. पण शिकण्यासारखं बरंच. कुणी एखादा अडाणी माणूस आपल्या आचरट वागण्यानं रसभंग करायला लागलाच, तर इतर प्रेक्षक परस्पर त्याला झापतात. अशा ठिकाणी आयोजक-स्वयंसेवकांचाही जागरूक वावर असतो. काहीतरी असंस्कृत गडबड झाली आणि वेळेवर आयोजक अवतरून त्यांनी शांतता प्रस्थापित केली नाही, असं अगदी क्वचित घडतं. (मामि चित्रपट महोत्सव आणि आशियाई चित्रपट महोत्सवातल्या आयोजकांबद्दल बोलते आहे मी. इतर ठिकाणी काय असतं माहीत नाही.)
8 Aug 2008 - 10:37 am | विजुभाऊ
तुम्ही मुम्बै ला भाइदास मधे कधी नाटक केलय?
विषेशतः गुजराती नाटक.
उशीरा येणे ( ९ च्या प्रयोगास १० वाजता), नाटक बघताना घरुन खाउचे डबे घेउन येणे व खाणे
नाटक चालु असताना सिंगापुर ट्रीप , रीलायन्स ,
पटोला साडी वगैरे महत्वपूर्ण चर्चा करणे.
कर्णाला जन्मजात कवच कुंडले होती तसा मोबाईल हा जन्मतानाच कानाला जडला आहे असा ठाम विष्वास बाळगणारे.
गुटख्याच्या पुड्यांचा चुरचुराटआणि थुंकणे वगैरे किरकोळ व्यत्ययातुन जे ऐकु येईल ते नाटक समजावे.
बहुतेक मराठी नाट्यकर्मी या नाटकांत कामे करतात.
या किरकोळ अग्निदिव्यातुन टिकेल तो नट पुढे बेस्ट बस किंवा ६:५५ च्या विरार लोकल मध्ये मध्ये ही नाटकाचा प्रयोग करायाला सहज पुढे येईल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
9 Aug 2008 - 12:10 am | भडकमकर मास्तर
निगडी, पुणे येथील फेम मल्टिप्लेक्समध्ये अनुभवले....
... पुढच्या रांगेतला माणूस दर दोन मिनिटांना त्याच्याच पुढ्यात थुंकत होता... नशेतही असावा. डोअरकीपरला तिकडे लक्ष द्यायला वेळ नसावा.... मग त्याने बाहेर जाऊन आईस्क्रीम खायला आणले... मी म्हटले , चला आता थुंकणे संपले... पण नाही, त्याने छान बिस्लरी बॉटलमधल्या पाण्याने तिथेच चूळ भरली... माझी सगळी चिडचिड तिथेच संपली, पिक्चर संपेपर्यंत याला साबण आणून दिला तर हा तिथे आंघोळही करून दाखवेल या कल्पनेने जाम हसलो
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
9 Aug 2008 - 12:11 am | विसोबा खेचर
पिक्चर संपेपर्यंत याला साबण आणून दिला तर हा तिथे आंघोळही करून दाखवेल या कल्पनेने जाम हसलो
हा हा हा! हे बाकी लै भारी! :)
8 Aug 2008 - 10:57 am | धनंजय
मागच्या महिन्यात मी एकदा नाटकाला उशीरा पोचलो तेव्हा अशी सोय होती :
थेटरात बाहेरच्या व्हरांड्यात एक टीव्ही होता - त्यावर स्टेजवरचे प्रक्षेपण होत होते. (स्वस्तातला व्हिडियोकॅम, स्वस्तातला टीव्ही - फार खर्चाचे काम नाही.)
दहा मिनिटांपर्यंत आणखी चार उशीरा-येणारे लोक पोचले होते. बाल्कनीत मागच्या दाराजवळ काही रिकाम्या खुर्च्या "उशीरा येणार्यांसाठी" आरक्षित केल्या होत्या, थेटरातल्या तिकिट घेणार्याने गुपचूप चौघांना त्या खुर्च्यांपर्यंत पोचवले. दार उघडण्यापूर्वी काळा पडदा सारणे, दार हळू उघडणे, बंद करणे हे सर्व तिकीट घेणार्यानेच पार पाडले.
नेहमीच्या समोरच्या सीटऐवजी मागे बसावे लागले. उशीरा येण्याची काही तर शिक्षा झाली म्हणा... पण सोय बघून बरे वाटले. वेळेवर आलेल्या प्रेक्षकांना, नटांना आमचा त्रासही झाला नाही, आणि आम्हाला नाटक बघताही आले - उद्धटपणे "उशीरा आलात, जा उडत" असेही थेटरवाल्यांनी म्हटले नाही.
13 Aug 2008 - 9:13 pm | प्रकाश घाटपांडे
अशी नाट्य गृहे पुण्यात आली तर मजा वाटेल.
प्रकाश घाटपांडे
8 Aug 2008 - 11:00 am | मराठी_माणूस
हा त्रास अन्य ठीकाणि पण होत असतो जसे ट्रेन मधे मोठ मोठ्याने बोलणे , मोठ्याने संगीत लावणे , गेम खेळणे , त्यात कॅमेरा असेल तर त्याचा दुरुपयोग करणे ई.
ह्याचे प्रबोधन घरातुन व्हायला पाहिजे . जेंव्हा आपण मुलाना मोबाइल घेउन देतो तेंव्हाच त्याचा उपयोग केंव्हा आणि कशासाठी करायचा त्याचि जाणिव द्यायला पाहिजे. विषेश म्हणजे सार्वजनिक ठिकाणी प्राम्युख्याने कसा करावा ते सांगितले पाहिजे.
(अवांतरः आई वडिलच जर नीट उपयोग करत नसतील तर त्यांचे प्रबोधन कोणी करायचे)
8 Aug 2008 - 11:53 am | गुंडोपंत
"संस्कृती रक्षक" इथे आणून सोडले तर कसे राहील? ;)
आपला
गुंडोपंत
8 Aug 2008 - 11:55 am | सहज
बास का? मग संस्कृती रक्षकांचे भ्रमणध्वनी कोण बंद करणार?
8 Aug 2008 - 11:58 am | गुंडोपंत
अरे हो!! याला त्याला मोबाईल लावल्या शिवाय त्यांची वट तरी ते कुठे दाखवणार नाही का?
आपला
गुंडोपंत
8 Aug 2008 - 12:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
संस्कृतीरक्षक उपद्रव देतात. भले त्यांचा मोबाईल वाजला, किंवा त्यांनी वेफर्स खाल्ले किंवा मधेच बोलायला/ओरडायला सुरूवात केली तर त्याचा व्यत्यय येतो. बळी तो कान पिळी! नाटकं करायची असतील आणि "प्रोटेक्शन" हवं असेल तर "प्रोटेक्शन चार्ज" नाही द्यायला लागणार?
8 Aug 2008 - 12:05 pm | गुंडोपंत
बळी तो कान पिळी! इथेच तर लोच्या आहे ना यमी ताई!
त्यामुळे कधी कधी रक्षकांचेच कान पिळायची पाळी येते.
पण नाटक लावणारा माणूस 'कडक' असेल तर'तर नाटक बरोबर चालते असा माझा अनुभव आहे.
आपला
गुंडोपंत
8 Aug 2008 - 12:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> इथेच तर लोच्या आहे ना यमी ताई!
१००% सहमत!
मलाही या मोबाईलवाल्यांचा, कुर्रम-कर्रम करणाय्रांचा, लहान पोरांना छळण्यासाठी मोठ्यांच्या नाटकांना घेऊन येणाय्रांचा राग येतो! आता बय्राच वर्षात नाटक नाही पाहिलं, पण तुमचा अनुभव पाहता असे "कडक" नाटकवाले सगळीकडे असू देत!
8 Aug 2008 - 12:38 pm | मनिष
मी बर्याच अंशी मास्तरांशी सहमत आहे पण मोबाईल 'बंद' ठेवण्याचे आवाहन मला नाही पटत, तो सयलेंट वर ठेवायला हवच, पण बंद नाही. जर तुमच्या निकटवर्तीयाला अपघात झाला आणि तुम्हाला मोबाईल वर कळवता आले नाही तर?
रंगकर्मींनी एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवावा, तुमच्यासाठी नाटक हे काम (इन्व्होल्व्हमेंट किंवा डेडिकेशन सकट), पॅशन असले तरी प्रेक्षकांसाठी ते विरुंगळा/करमणूक असते!
8 Aug 2008 - 1:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मोबाईल येण्यापूर्वीच्या जमान्यात गेलो आहोत असं २-३ तास समजायला काय हरकत आहे?
8 Aug 2008 - 8:41 pm | लंबूटांग
हे म्हणजे सरकार ने लोडशेडिंग सुरू आहे तेव्हा वीज नसण्याच्या काळात गेलो आहोत असे समजा म्हटल्यासारखे वाटते. इथल्या (अमेरिकेत ल्या) युनिवर्सिटीत सुद्धा मोबाईल वायब्रेट वर ठेवण्याला परवानगी असते. बर्याच जणांच्या घरी लहान बाळ असते, वृद्ध असतात. फक्त फोन आला तर उठून (दुसर्यांच्या पायावर पाय वगैरे न देता- लोकांना कमीत कमी व्यत्यय येईल अशा रितीने) बाहेर जावे एवढीच माफक अपेक्षा. आपल्या सुविधेचा दुसर्यांना त्रास होऊ नये ह्याची काळजी घेतली म्हणजे पुरे. पण आपल्या इथे ही भावनाच नसते ह्याचाच खेद वाटतो.
(हे ही लक्षात ठेवले पाहिजे की फक्त अशी काही situation गरजेचे असेल तरच फोन उचलावा.)
11 Aug 2008 - 3:06 pm | मनिष
ह्याच्याशी १०१% सहमत!
9 Aug 2008 - 12:31 am | भडकमकर मास्तर
मोबाईल बंद ठेवा म्हणजे त्याचा आवाज बंद ठेवा हो... सायलेंटवर ठेवा नाहीतर स्विचऑफ करा...
मी स्विचऑफ करतो नाटक पहायला गेलो की...ज्याला पाहिजे त्याने सायलेंटवर ठेवावा...
रंगकर्मींनी एक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवावा, तुमच्यासाठी नाटक हे काम (इन्व्होल्व्हमेंट किंवा डेडिकेशन सकट), पॅशन असले तरी प्रेक्षकांसाठी ते विरुंगळा/करमणूक असते!
बा प्रेक्षका, तू माझ्याइतकाच पॅशनेट अस अशी सक्ती नाही ना करत आहे रंगकर्मी त्याच्यावर.......विरंगुळा आहेच पण कोणत्या प्रकारचा? आपण करमणुकीचा कोणता प्रकार अनुभवतो आहोत ते समजून घ्यायला हवे की नको ? घरातल्या टीव्हीपुढे जसे वागाल तसेच जर सिनेमागृहात वागाल आणि तसेच नाट्यगृहात वागाल का ? मी टीव्हीपुढे बसून जेवतो, सिनेमात कधी कधे पॉपकॉर्न खातो पण नाटकात नाही करत असं...आणि इथे फक्त रंगकर्मींचाच कुठे संबंध?? बाजूचा प्रेक्षकसुद्धा विरंगुळा शोधायच्या त्याच्या हक्कावर गदा आणलेली सहन करणार नाही.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Aug 2008 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे
मी सायलेंट मोड मध्ये ठेवतो. कॉल आला तर घेत नाही. महत्वाचा वाटला तर मी सभागृहात आहे असा टॅम्प्लेट मधे ठेवलेला एसेमेस टाकतो. कधी रिसीव्ह करतो पण बोलत नाही मोबाईल मध्ये पिक अप झालेल्या आवाजावरुन ती व्यक्ती समजुन जाते की मी प्रेक्षागृहात आहे. बाहेर आल्यावर त्याला फोन करतो. ज्यांचा घेतला नाही वा एसेमेसही केला नाही त्यांना परत फोन करुन संपर्क करतो.
काही लोक खुर्चीतून खाली वाकून फुस्फुस करत थोडक्यात बोलतात त्यापेक्षा हे बरे वाटते.
प्रकाश घाटपांडे
14 Aug 2008 - 8:52 am | विसोबा खेचर
मीदेखील बर्याचदा घाटपांड्यांसारखेच करतो...
तात्या.
8 Aug 2008 - 1:13 pm | स्वाती दिनेश
बर्याच महिन्यात नाटक नाही पाहिलं पण हे सारे रसभंगी,व्यत्ययी अनुभव गाठीशी बाळगून आहे.
(व्यत्ययांना वैतागलेली)स्वाती
8 Aug 2008 - 2:17 pm | प्रकाश घाटपांडे
मोबाईल हे तंत्रज्ञान जेव्हा जीवनाचे अंग बनले तेव्हा अवसरच उरला नव्हता इतक्या झटकन वेगाने ते मिसळले. लोकशाही म्हणजे काय हे समजण्याच्या आतच आपण ती स्वीकारली. तेवढा सूज्ञपणा प्रत्येक नागरिकात येण्याची वाट पहाणे हे व्यावहारिक दृष्ट्या अशक्यच. प्रबोधन हाच उपाय.
शहाण्याला शब्दाचा मार व मुर्खाला जोड्याचा मार हे प्रबोधन कि शिक्षा? असो
मी अनुभवलेले प्रसंग-
प्रसंग १- सामाजिक विषयावर चाललेल्या सभागृहात एका ज्येष्ठ बाईंचा मोबाईल बोंबलु लागला.वक्त्यासकट सगळ्यांचे चेहरे त्रासिक झाले. ती बाई जणु काही आपला वाजतच नाही असे भाव. सगळ्याचे लक्ष आवाजाच्या दिशेने गेल्यावर पर्स मधे हात घातला व बंद करण्या साठी कुठली तरी बटने दाबली. आवाज बंद झाला. थोड्या वेळाने परत तेच. नंतर लोकांच्या कपाळाच्या आठया पाहुन ती गोंधळून गेली तिला काय करावे समजेना. मी तिचा मोबाईल घेउन बंद केला. तिला बंद कसा करायचा हे माहित नव्हते. तिच्या वेषभुषा व केशभुषा यावरुन मला तसे वाटले नव्हते.
प्रसंग २- स्थळ तसेच. परंतु एक ज्येष्ठ नागरिक माझ्या शेजारी बसले व्याख्यान चालु होणार होते.मी मोबाईल सायलेट वर टाकत होतो. त्यांनी ते पाहिले. मला पण जरा करुन द्या असे सांगुन त्यांचा मोबाईल दिला. मी त्यांना सायलेंट व स्विच ऑफ करायला शिकवले. ते म्हणाले त्याच काय मुलाने घेउन दिला पण बोलायच असेल तर हे बटन दाबा आणि संपल्यावर हे दाबा एवढेच माहिती. तुमच ते बाकी भानगड काही समजत नव्हती बुवा.
वरकरणी सुसंस्कृत दिसणारी माणसं ही सुसंस्कृत असतील ही पण मोबाईल वापराबाबत अडाणी असतात.
मोबाईल कसा वापरावा हे प्रशिक्षण मोबाईल कंपन्यांनीच वा विक्रेत्याने दिले तर ते सोईचे होईल.
प्रकाश घाटपांडे
8 Aug 2008 - 3:37 pm | विदुषक
मोबाइल च्या आवाजाचा त्रास नाटक/सिनेमा इथे तर होतोच पण कार्यालया (मराठीत ऑफिस ....) मधे पण फार होतो ......
त्यामुले मी आमच्या इथे असा नियम केला कि ज्याचा मोबइल वाजेल त्याने सगल्या ऑफिस साठी चहा मागवायचा
हि मात्रा चान्गलीच लागू पड्ली ... आता सगले जण मोबाइल आठवणीने साय्लेन्ट वर ठेवतात
तरी पन कधी कधी आमची चहाची सोय होतेच ;)
मजेदार विदुषक
8 Aug 2008 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त ऑफिस? जी.एम.आर.टी., जिथे मोबाईल वापरायला बंदी आहे तिथेही नोटीसा काढायला लागतात दर दोन महिन्यांनी मोबाईल बंद ठेवा म्हणून!
8 Aug 2008 - 4:49 pm | विसोबा खेचर
मास्तर, आपला प्रत्येक मुद्दा पटला. कुठल्याही कलेला व्यत्यय आला तर ती सादर करणार्यांचा सगळा उत्साहच निघून जातो. असं कधीही होऊ नये!
तात्या.
8 Aug 2008 - 6:08 pm | मनस्वी
नाट्यगृह / सिनेमागृहात मोबाईल सक्तीने सायलेंट मोडवरच हवा. जर अति-महत्वाचा कॉल आला तर कंपलसरी बाहेर जाउनच रिसिव्ह करावा. आत रिसिव्ह केल्यास दंड करावा.
एकदा प्रयोग चालू असताना सततच्या वाजणार्या प्रेक्षकाच्या मोबाईलच्या व्यत्ययामुळे एका दिग्गज कलाकाराने स्वतःच्याच कानाखाली मारून घेतली. ही बातमी खरी आहे की अफवा?
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *