९ नोव्हेंबर १९८९ जगाच्या नजरेत ऐतिहासिक दिवस. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९६१ साली पूर्व जर्मनीच्या साम्यवादी सरकारने बांधलेली बर्लीन वॉल ही त्या दिवशी कोसळली. नव्हे जनतेने पाडली. हाताची पाचही बोटांची उंची सारखी असावी असा हट्ट करणार्या खुळचट साम्यवादाची जाहीरपणे अखेर होण्याची ती सुरवात होती. जाहीरपणे म्हणायचे कारण इतकेच की त्या आधीच १९७८ साली (म्हणजे माओच्या मरणानंतर दोन वर्षाच्या आत) चायनीज प्रेसिडंट डेंग झिआओपेंग यांनी मुक्तअर्थव्यवस्था चायनिज स्टाईल, हळूहळू चालू केली. कम्युनिझमला आणि माओच्या तथाकथीत समतेच्या तत्वांना वरकरणी तिलांजली न देता ते म्हणाले होते, "मांजर काळी आहे का पांढरी याने काही फरक पडत नाही, मांजर उंदराला मारते का हा मुद्दा आहे." अर्थात हिंदीत, त्यांचा मतलब हा "आम खानेसे था!" असे म्हणावे लागेल. पण हे झाले उर्वरीत जगात...
भारतात, त्याच सुमारास (१९७७ साली), स्वातंत्र्यापासून काँग्रेसी समाजवाद हा जनता पक्षामुळे मोठे झालेल्या पुर्वाश्रमीच्या काँग्रेसी समाजवादी आणि त्यात मिळालेल्या कम्युनिस्टांमुळे अधिकच बळकट झालेला होता. भारतीय घटनेत इंदीरा गांधींनी सेक्यूलॅरिझम हा शब्द वापरून अजून भारतीय स्टाईल समाजवादाला आधीच गोंजारले होते. आधीपासूनच सुरू असलेला स्युडोसेक्यूलॅरिजम हा त्याच काळात वाढू लागला होता. राजीव गांधींच्या काळातील शहाबानो प्रकरणाने धार्मिक दुही अधिकच दृढ होऊ लागली होती. दुर्दैवाने जे स्वत:स अधुनिक आणि सुधारक (progressive) समजतात अशा समाजवादी धुरीणांनी या धार्मिक दुहीकडे दुर्लक्ष केले.
अर्थात या तत्कालीन घटनांच्या विरुद्ध बहुसंख्य जनतेस एकत्र करण्याच्या उद्देशाने एक निद्रीस्त चळवळ परत जागृत झाली. रामजन्मभूमी शिलान्यास समितीच्या रुपाने, रामजन्मभूमी च्या मागणीने राजीव गांधींच्या काळात जोर धरला. १९८९ च्या निवडणुकीच्या आधी राजीव गांधींनी (आणि त्यांच्या सल्लागारांनी) एक राजकीय खेळी म्हणून विश्व हिंदू परीषद आणि शिलान्यास समितीस अयोध्येच्या याच वादग्रस्त स्थानावर रामजन्मभूमी मंदीराची कोनशीला स्थापन करण्यास परवानगी दिली.
९ नोव्हेंबर १९८९ ह्या दिवशी कामेश्वर चौपाल या दलीत समाजातील व्यक्तीकडून पहीली वीट रचली गेली. नंतर सुप्रिम कोर्टाचा निकाल येई पर्यंत या संदर्भात काय काय घडत गेले हा एक वेगळा इतिहास आहे. एकंदरीतच रामजन्मभूमी विषयावर बरेच चर्विचर्वण झाले आहे. तेंव्हा येथे तो मूळ विषय नाही...
गेल्या पंचविस वर्षात या समाजवादी आणि विशेष करून त्यातील डाव्या विचारवंतांनी सर्व प्रकाराने आकांडतांडव केले. कितीतरी खोट्या गोष्टी रचून आपल्या ताब्यात असलेल्या माध्यमांकरवी जनतेच्या मनात भरवल्या. त्यांच्या दुर्दैवाने आधी जालीय माध्यम आणि त्यातही नंतर सोशल मेडीया नावाचे अजून वैशिष्ठ्यपूर्ण सामाजीक माध्यम अस्तित्वात आले आणि फासे उलटले. अर्थात यात एक लक्षात घेतले पाहीजे की यातील एक बाजू केवळ नकारात्मक प्रचारावर भर देत होती तर दुसरी त्याला उत्तर देताना ध्येयाचा विसर पाडून न देता जनतेमधे तळागाळात (ग्रासरूटवर) कामे करत होती. आजही सत्ता मिळाली तरी ती कामे चालूच आहेत.
पण या समाजवाद्यांचे काय झाले आहे? आज अशी अवस्था आहे की केवळ मोदी, मोदी भक्त, शिवसेना यांची पोरकट खिल्ली उडवणे इतकेच या विचारवंतांच्या हाती राहीले आहे. बाकी विकासावरून वगैरे बोलणे दूरच राहीले पण समाजवाद कुठे गेला, ह्यावर चर्चा नाही की आत्मपरीक्षण नाही...
सत्तेसाठी परत नक्कीच तेच ते समाजवादी गणंग प्रयत्न करतील, एकत्र येतील आणि स्वत:स विचारवंत समजणारे समाजवादी अशा प्रयत्नांचे, अगदी फोल आहेत हे समजले तरी टाळ्या वाजवून स्वागत करतील. पण येथे केवळ सत्तांतर अथवा त्याचा प्रयत्न हा मुद्दा नाही. तो प्रयत्न करणे हा कुठल्याही व्यक्तीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हक्कच आहे. पण त्याव्यतिरीक्त जर समाजाच्या / देशाच्या भल्यासाठी आपल्याकडे देण्यासारखे काही आहे, असे वाटत असेल तर त्याचा जोमाने वापर करणे महत्वाचे नाही का? तसे जर होत नसेल तर हा उरलासुरला समाजवाद पण गेल्या पंचविस वर्षात लयास गेला असे म्हणावे लागेल.
म्हणूनच, एका अर्थाने शिलान्यासाच्या निमित्ताने, पंचविस वर्षांपूर्वी या डाव्या समाजवादाच्या घराची पहीली वीट ढासळली असे आज म्हणता येईल.
प्रतिक्रिया
10 Nov 2014 - 11:29 pm | बोका-ए-आझम
अजूनही डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत आणि ' इकाॅनाॅमिक अँड पोलिटिकल वीकली' सारखी त्यांची मुखपत्रं पण आहेत.
10 Nov 2014 - 11:52 pm | अर्धवटराव
काँग्रेसेतर राजकारणाचं अवकाश समाजवाद्यांना/डाव्यांना व्यापणं शक्य होतं, किंबहुना समाजवाद हा त्याकाळी सर्वात सशक्त आणि स्वाभावीक पर्याय बनु शकला असता हे खरं आहे. पण पोथिनीष्ठा, मग ति धार्मीक असो वा राजकीय, नेहमीच घातक असते हे डाव्यांच्या लक्षातच आलं नाहि. मार्क्स म्हणजे गांधी/आंबेडकर नव्हे आणि व्होल्गा गंगेपेक्षा भिन्न आहे हे डाव्यांना ओळखताच आलं नाहि. युरोपात, रशीयात नेहमी रक्ताने सत्तांतरे घडली पण भारतात अहिंसक चळवळीने प्रचंड प्रभाव पाडला. अशा भारतात समाजवाद रूजवायचा तर त्याचे प्रथम भारतीयकरण व्हायला हवं होतं. विचारवंतांची संत-महात्म्यांची मोठी परंपरा लाभलेल्या बंगालला देखील हे जमलं कसं नाहि याचं आश्चर्य वाटतं. हि मुळात समाजवादाचीच मर्यादा होती/आहे काय न कळे.
पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं (पाकिस्तानात हे होऊ शकलं नाहि). नुकतच वाचण्यात आलं कि मुलायमसिंग पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांना एकत्र आणायच्या प्रयत्नात आहेत. अर्थात, हि केवळ राजकीय सोय म्हणुन. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं बघायचं.
11 Nov 2014 - 9:32 am | स्पा
नक्की काय म्हणायचेय ते समजलेच नाही. मुद्द्यावर येइस्तोवर लेख संपला
11 Nov 2014 - 12:57 pm | गणेशा
मुद्दे व्यव्स्थीत आहेत, पण सगळे मुद्दे आपण मुद्देसुद मांडल्याने चर्चा काय करावी हेच कळत नाही.
तुर्तास पास
11 Nov 2014 - 4:29 pm | ऋषिकेश
लेखाच्या मथळ्यावरून आणि पहिल्या परिच्छेदावरून वेगळ्याच लेव्हलचा नी स्कोपचा लेख असेल असे वाटले होते.
त्यामुळे सरसावून बसलो - लेख वाचायला वेगळाअ वेळ काढून बसलो. नी काय हे! :(
एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत.
माझ्या या लेखाकडून असलेल्या अपेक्षेमुळे, हा लेख आवडला नाही.
भारतीय समाजात पुर्वजर्मनीत असणार्या साम्यवादाने किंवा लेनिनवादाने किंवा अगदी माओवादाने कधीच म्हणावे असे मूळ धरलेले नाही. त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला.
मात्र समाजवादाच्या खुणा बर्याच खोलवर उमटलेल्या आहेत. कोणत्याही पक्षाने अगदी भाजपानेही "अंत्योदय" वगैरेंच्या माध्यमांतून त्या विचारधारेला अव्हेरलेले नाही. भारतीय घटना आणि भारतातील अनेक (किंबहुना बहुतांश) कायदे अजूनही समाजवादाच्याच अंगाने जातात.
असो.
11 Nov 2014 - 5:19 pm | पिंपातला उंदीर
@विकास राव - लेख अपेक्षांवर नाही उतरला . समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे . कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून गुणात्मक रित्या त्यांच्यात काहीच फरक नाही अस वाटणारा पण वर्ग मोठ्या प्रमाणावर उदयाला येत आहे याची पण नोंद घ्यावी लागेल . त्यामुळे चर्चा व्यापक होण्यासाठी हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे . बाकी डावी विचारसरणी भारतात तितकी प्रबळ नव्हती हे लक्षात घ्यायला हवे . आणि हा जर समाजवादी विचारसरणीचा शेवटाची सुरुवात होती तर २५ पैकी १५ वर्ष कॉंग्रेस सत्तेवर कशी होती ? याला सोनिया गांधी यांच्यावर असणारया स्वयंसेवी संस्थेच्या प्रभावाचा संदर्भ आहे . आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही
13 Nov 2014 - 1:28 am | विकास
मिपावर हवे तसे गेल्या दोन दिवसात येऊ न शकल्याने उत्तर देण्यास वेळ लागत आहे त्याबद्दल क्षमस्व! वर प्रतिसादांमध्ये आलेल्या मुद्यांना खाली उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो:
एक समान मुद्दा: त्रोटकपणा...
आक्षेप मान्यच. पण ते जाणून बुजून होते. कदाचीत म्हणूनच गणेशांना आणि अर्धवटरावांना काय म्हणायचे आहे ते समजले असावे असे वाटते... (नेहमीप्रमाणे) स्वतःच सगळे लिहून चर्चा करण्याऐवजी नवीन मुद्दे चर्चेत यावेत अशी अपेक्षा होती. त्या व्यतिरीक्त समाजवाद्यांना (शाब्दीक) निव्वळ झोडपणे हा उद्देश नव्हता (जरी ते एक बायप्रॉडक्ट असणार असले तरी. ;) ).
@ऋषिकेश: एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत.
लेखाचा उद्देश सरळ होता... ९ नोव्हेंबर १९८९ ही जागतीक स्तरावर कम्युनिजम / साम्यवादाच्या शेवटाची सुरवात होती हे कायम म्हणले जाते. पण एका अर्थाने भारतापुरते बोलायचे झाले तर, रामजन्मभूमी शिलान्यासाच्या निमित्ताने ती समाजवादी विचारसरणीची आणि त्यातून निघालेल्या स्युडोसेक्यूलर नामक भुताच्या शेवटाची सुरवात होती. मात्र, याकडे एकंदरीतच माध्यमांनी आणि विचारवंतांनी विशेष करून या वेळच्या (देश आणि राज्य) निवडणुकांच्या निकालांनंतर दुर्लक्ष केले असे वाटते. थोडक्यात भारतीय घटनांपुरते बोलताना साम्यवाद हा मुद्दा नव्हता तर साम्यवादाचे आकर्षण असलेला समाजवादी हा मुद्दा होता. काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेले अनेक आदर्श समाजवादी होऊन गेले. पण दुर्दैवाने त्यांच्या काळात त्यांना सत्तेवर येता आले नाही. नंतरच्या काळातल्या समाजवाद्यांना सत्ता आणि त्याही पेक्षा अनेकदा विविध पद्धतीच्या दुही पसरवण्याच्या सवयीने ग्रासले. त्यातून स्वतः काम करायचे लांब राहीले आणि परीणामी पतन झाले... अर्थात हा मुद्दा न समजल्यामुळे (अथवा दुर्लक्ष केल्यामुळे), "त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला. " असे म्हणले असावे. असो.
@पिंपातला उंदीरः समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे .
अगदी सहमत. पण हे म्हणजे फक्त हिंदूंनाच का नावे ठेवली जातात, असे म्हणण्यासारखे. ;) तसे बघाल तर अगदी मिपावर देखील भाजपा, संघ, हिंदू धर्म आदींवर टिका करणारे भरपूर लिहून आलेले आहे. ज्या लेखाचा/चर्चेचा जो विषय आहे त्यावर चर्चा करायची असते. हा चर्चा विषय समाजवाद्यांचे नामोनिषाण राहत नाही आणि तरी देखील काळजीने देखील चर्चा होत नाही यामुळे काढला गेला आहे. वास्तवीक (वर ऋषिकेश यांना वाटले तसे) समाजवाद नसावाच असे मी म्हणलेलेच नाही. किंबहूना लोकशाहीत सशक्त सरकार आणि तितकाच सशक्त विरोधी पक्ष असणे जसे गरजेचे असते तसेच भिन्न, प्रसंगी विरुद्ध विचारसरणी असणे देखील महत्वाचे ठरू शकते. आज समाजवाद्यांनी केलेल्या समाजवादाच्या अस्तामुळे प्रबळ (म्हणजे जे सक्रीय, बुद्धीवादी, जबाबदार आहेत अशा अर्थाने) विरोधकच नाहीत असे वाटू लागले आहे. ती भुमिका काँग्रेस आणि तत्सम पार पाडू शकतील असे वाटत नाही. पण ती भुमिका पार पाडायला समाजवादी पण नाहीत ही त्या विचारांची दैन्यावस्था आहे असे वाटते. असो.
आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही
अगदी खरे आहे. किंबहुना मी ती संपू नये असेच म्हणेन. पण आज दुर्दैवाने ती अस्तंगत झालेल्यात जमा आहे असे चित्र आहे. आणि हो काँग्रेस हा केवळ सत्तावादी पक्ष आहे, समाजवादी वगैरे काही नाही असे मला वाटते. माझा लेख/मुळ मुद्दा हा केवळ राजकीय पक्षांपुरताच मर्यादीत नाही...
@अर्धवटरावः पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं
अगदी सहमत!
@बोका-ए-आझम: डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत
आहेत हे खरे आहे पण कुठेतरी वाटते की आता ते गोंधळलेल्या अवस्थेत भरकटत चालले आहेत.