पणती

क्रान्ति's picture
क्रान्ति in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:24 pm

एक चिमुरडी पणती दिसली
रस्त्यावर पणत्या विकणारी
पाटी-पुस्तक-शाळेवाचुन
व्यवहारी गणिते शिकणारी

नऊ-दहा वर्षांची इवली
चंद्रकोरशी नाजुक, सुंदर
चतुर, कुशल संभाषण हसरे
व्यवहाराला परखड, कणखर

'ताई, काकू घ्या ना पणत्या
हलक्या, सुंदर, सुबक, टिकाऊ
शोभिवंत रांगोळीसाठी
दीपमाळ ही नवीन देऊ?

या पानांच्या आणि फुलांच्या
शंख-शिंपल्यांच्या, मोरांच्या
सोनेरी, रंगीत मण्यांच्या
वेगवेगळ्या आकारांच्या

खासच निवडुन देते सगळ्या
भाव नका पण पाडू खाली
आम्हां गरिबांच्या कष्टाचा
तुमच्यावाचुन कुठला वाली?

मोल असे माती-पाण्याचे
कलाकुसर अन् कौशल्याचे
स्नेह-वात घालाल तुम्ही तर
जीवन होइल साफल्याचे'

बोलुन गोष्टी चतुर, लाघवी
त्या पणतीने मने जिंकली
बघता बघता लहान-मोठ्या
पणत्यांची ती चळत संपली

पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन्
मनात दीपावली उजळली
धन्य माउली आणि पिता ते
ज्यांनी पणती अशी घडवली!

क्रांति

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

20 Oct 2014 - 10:46 pm | खटपट्या

सुन्दर !!

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 1:36 am | मधुरा देशपांडे

सुंदर!!!

एस's picture

22 Oct 2014 - 11:26 am | एस

कविता आवडली. सकारात्मक!

सुहास झेले's picture

26 Oct 2014 - 11:55 pm | सुहास झेले

पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन्
मनात दीपावली उजळली
धन्य माउली आणि पिता ते
ज्यांनी पणती अशी घडवली!

सहीच !!

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 6:23 am | स्पंदना

पोर डोळ्यासमोर उभी राह्यली ना ताय!!

नऊ-दहा वर्षांची इवली
चंद्रकोरशी नाजुक, सुंदर
चतुर, कुशल संभाषण हसरे
व्यवहाराला परखड, कणखर

मान गये!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Oct 2014 - 4:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह!!

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2014 - 8:12 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! आवडली आणि मनाला थेट भिडली कविता!

psajid's picture

31 Oct 2014 - 12:27 pm | psajid

खूपच छान आणि भावस्पर्शी !

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2014 - 1:32 pm | चौथा कोनाडा

सहज, सुंदर अन लयदार कविता ! खरंच, साध्या साध्या गोष्टीतून कवि/कवयत्रीला किती संवेदना जाणवतात नै ? (नाहीतर, आमी आपले घेतल्या पणत्या की दिवाळीचा फराळ हादडायला मोकळे )

पणतीच्या डोळ्यांत ज्योत अन्
मनात दीपावली उजळली
धन्य माउली आणि पिता ते
ज्यांनी पणती अशी घडवली!

शेवटचे कडवे तर खासच !

पैसा's picture

8 Nov 2014 - 11:01 am | पैसा

थेट सरळ साधी सुरेख अन लयबद्ध कविता!