पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) जॉर्डन

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:18 am

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

पेत्रा दरी हे जॉर्डनमधले सर्वात महत्त्वाचे आणि जगातल्या मुख्य प्राचीन आकर्षणांपैकी एक आहे. खरं तर जेव्हा पेत्राचे फोटो पाहिले तेव्हाच जॉर्डन माझ्या प्रवासांच्या स्थळांच्या यादीत अलगद येऊन बसला होता. त्यामुळे पेत्राच्या दिशेने गाडी धावू लागली आणि उत्सुकतेने परिसीमा गाठली होती.

पेत्रामधली पहिली वसाहत साधारण इ स पूर्व ७००० वर्षाची असावी. इजिप्शियनांच्या उत्तरेकडच्या मोहिमांत आणि बायबल आणि त्याच्याशी संबंधित प्राचीन लेखनात पेत्राचे उल्लेख आहेत.

इ स पूर्व १६८ (काहींच्या मते इ स पूर्व ३१२ पासून येथे नाबातियन लोकांची वस्ती होती) च्या सुमारास आताच्या दक्षिण जॉर्डनमध्ये पेत्रा नावाच्या ठिकाणी नाबातियन साम्राज्याने आपली राजधानी स्थापन केली. रोमन साम्राज्याने नाबातियन्सचा पाडाव करून हे शहर इ स १०६ मध्ये आपल्या कब्ज्यात घेईपर्यंत ती कायम होती. मूळ नाबातियन स्थापत्याबरोबरच येथे रोमन आणि ग्रीक शैलीचा प्रभाव असणारे स्थापत्यही दिसते.


नाबातियन साम्राज्याचा नकाशा (जालावरून साभार)

पेत्रा दरीला आणि त्यातल्या पेत्रा शहराला एकत्रितपणेच पेत्रा किंवा पेत्रा दरी असे संबोधले जाते. हे ठिकाण निवडताना नाबातियन लोकांनी अरुंद आणि उंच नैसर्गिक दरीचा संरक्षक तटबंदीसारखा उपयोग करून जणू एक भूकिल्लाच बनवला होता. खोल दरीत वसलेले असल्याने या शहरावर अचानक येणार्‍या पुराची तलवार सतत टांगलेली होती. त्यापासून वाचण्यासाठी दरीच्या कड्यांना कोरून केलेले येथील स्थापत्य त्या काळातलेच नव्हे तर आजही एक आश्चर्य समजले जाते. त्याचबरोबर पुराचा प्रतिबंध करण्यासाठी धरणे-कालवे आणि पावसाचे पाणी वर्षाच्या इतर काळासाठी व दुष्काळी परिस्थितीसाठी साठवण्यासाठी केलेल्या जलवाहक प्रणाली आजही आश्चर्यकारक व्यवस्था समजली जाते. या प्रकारे ३०,००० लोकसंख्येला वर्षभर पुरे होईल इतके पाणी या दरीतल्या शहरात साठवलेले असे. याशिवाय आजूबाजूच्या प्रदेशातल्या भूमीवरच्या आणि भूमीखालील अनेक झऱ्यांच्या पाण्याचे नियोजन करून राजधानीच्या आजूबाजूला डेरे टाकून बसलेल्या ५ लाख कायम आणि प्रवासी व्यापाऱ्यांसाठी पाण्याची सोय केलेली होती. यामुळेच, नाबातियन साम्राज्याच्या या राजधानीचा निसर्ग आणि मानवाने मिळून बनवलेल्या जगातल्या उच्चतम आश्चर्यांत समावेश होतो. पेत्रा दरीच्या गुलाबी रंगाच्या कातळांमुळे या शहराला "गुलाबी शहर (रोज सिटी)" असेही म्हटले जाते.

रेशीम, मसाल्याचे पदार्थ आणि इतर वस्तूंचे भारत, चीन, इजिप्त, सिरीया, ग्रीस आणि रोम यांना जोडणार्‍या मार्गांवरचे पेत्रा महत्त्वाचे ठाणे होते. थोडक्यात त्या काळचा कोणताही जागतिक व्यापार पेत्राला वगळून होऊच शकत नव्हता ! एखाद्या शहराचे यापेक्षा जास्त महत्त्व ते काय असू शकते ?! पाण्याच्या विक्रीमुळे मिळणारे उत्पन्न आणि व्यापारावरचा कर यामुळे पेत्रा त्या काळाचे मध्यपूर्वेतले सर्वात सधन शहर होते.


नाबातियन साम्राज्याच्या अंकित असलेले व्यापारी मार्ग (जालावरून साभार)

इ स १०६ मध्ये नाबातियन राजघराणे लयाला गेले तरी व्यापारी महत्त्वामुळे पेत्राचे वैभव बराच काळ कायम राहिले. मात्र त्यानंतर इ स १३०-२७० च्या काळात हळू हळू मुख्य व्यापारी मार्ग उत्तरेकडील पामिरा शहराकडे वळले आणि पेत्राच्या वैभवाला उतरती कळा लागली. त्यातच रोमन साम्राज्याच्या समुद्री व्यापारी मार्गांना प्राथमिकता देण्याच्या नीतीमुळे पेत्राच्या समस्येत भरच पडली. महत्व कमी होत चाललेल्या या शहराच्या इमारतींची आणि पाण्याच्या प्रणालींची ५५१ साली झालेल्या भूकंपाने अपरिमित हानी झाली. त्यानंतर सातव्या शतकात दक्षिणेकडून झालेल्या अरबी आक्रमणांनी तर पेत्रा ओस पडले आणि पुढची अनेक शतके त्याचे अस्तित्व वाळूने भरलेले पुरातन अवशेष एवढेच राहिले. प्राचीन खजिन्यांच्या लोभाने कारणाने भेट देणाऱ्या चोरांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला त्याच्यामध्ये फारसा रस राहिला नाही आणि हे शहर लोकांच्या स्मृतीतून जवळ जवळ निघून गेले.

जोआन लुडविग बर्कहार्ड्ट हा १८१२ मध्ये पेत्राला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी होता. १९२९ साली अग्नेस कॉनवे आणि जॉर्ज हॉर्सफिल्ड हे दोन ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ; डॉ तौफिक कन्नान नावाचा एक लेबनानी डॉक्टर आणि लोककथा विशारद, आणि डॉ दितलेफ नील्सन हा डेन्मार्कमधील एक पुरातत्त्व अभ्यासक; या चार सभासदांच्या संघाने पेत्राची शास्त्रीय पाहणी करून तेथे उत्खनन सुरू केले. ते आजतागायत चालू आहे. आधुनिक तंत्राने भूगर्भाची तपासणी केल्यावर आतापर्यंत फक्त ५-१०% टक्के अवशेष वाळूतून वर काढले गेले आहेत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

१९८५ साली पेत्राला UNESCO World Heritage Site म्हणून मान्यता देताना तिचा उल्लेख, "मानवाच्या अत्युत्तम सांस्कृतिक ठेव्यांपैकी एक" असा केला गेला होता. स्मिथसोनियन नियतकालिकाने पेत्राचा "मरण्यापूर्वी बघाव्या अश्या २८ जागा" मध्ये केला आहे.

पेत्राचा उल्लेख अथवा चित्रीकरण अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट इत्यादीमध्ये केला गेलेला आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
* कविता : १८४५ मध्ये जॉन विल्यम बर्गनच्या पेत्रासंबंधीच्या कवितेला Newdigate Prize मिळाले.
* संगीत नाटक : १९७७ मध्ये राहबानी बंधूंनी "पेत्रा" या नावाने लेबेनॉनच्या यादवी युद्धावर एका संगीत नाटक लिहिले.
* कादंबऱ्या : Left Behind Series, Appointment with Death, The Eagle in the Sand, The Red Sea Sharks, The Adventures of Tintin series मधले १९ वे पुस्तक, The Moon Goddess and Son, Last Act in Palmyra, Chasing Vermeer, इत्यादी.
* चित्रपट अथवा टीव्ही मालिका : Indiana Jones and the Last Crusade, Arabian Nights, Passion in the Desert, Mortal Kombat: Annihilation, Sinbad and the Eye of the Tiger, The Mummy Returns, Transformers: Revenge of the Fallen, An Idiot Abroad, इत्यादी.
* व्हिडिओ खेळ : Spy Hunter (2001), King's Quest V, Lego Indiana Jones, Sonic Unleashed, Knights of the Temple: Infernal Crusade and Civilization V.
* संगीत व्हिडिओ : Sisters of Mercy चा Dominion/Mother Russia आणि Urban Species चा Spiritual Love.

पेत्रा आणि लॉरेन्स ऑफ अरेबिया
लॉरेन्स ऑफ अरेबियाची प्रसिद्ध कथा पेत्राच्या परिसरात घडली आहे. पहिल्या महायुद्धात १९१७ च्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश सैन्याला ऑटोमन साम्राज्याचा यशस्वी विरोध होत होता. तेव्हा गाझा पट्टीतील त्याचा विरोध कमी करण्यासाठी टॉमस एडवर्ड लॉरेन्स नावाच्या ब्रिटिश ऑफिसरच्या चिथावणीने पेत्रा परिसरातल्या अरब आणि सिरियन नागरिकांनी ऑटोमन सत्तेविरुद्ध उठाव केला. या उठावातले विशेष म्हणजे, स्थानिक पुढारी शेख खालीली याच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली स्थानिक अरबी स्त्रियांनीही त्यात भाग घेतला होता. या उठावाला ब्रिटिश सैन्यानेही मदत केली आणि ऑटोमन सैन्याचे बरेच नुकसान करण्यात यश मिळवले होते.

इतक्या नावाजलेल्या जागेबाबतचे आकर्षण तिच्या जवळपास पोचल्याने शिगेवर आले होते. पण तेथे पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती आणि दिवसभराच्या दगदगीने सर्वजण थकले होते. त्यामुळे गरमागरम शॉवर घेऊन आधुनिक पेत्रा गावात एक फेरी मारून आणि रात्रीचे जेवण घेऊन झोपणे पसंत केले. या मागे मार्गदर्शकाने दिलेली "उद्या भरपूर चालायची आणि डोंगर चढायची तयारी ठेवा" ही धमकीही कारणीभूत होतीच म्हणा !

===================================================================

ताणलेल्या उत्सुकतेपोटी सकाळ जरा लवकरच उजाडली ! सगळेजण न्याहारीच्या खोलीत जमा झाले. खडतर दिवसाला तोंड देण्याची तयारी म्हणून तवा कबाब-रोटी, ऑम्लेट-ब्रेड, फूल-खुब्ज, फळांचा रस, फळे आणि कॉफी अशी सज्जड न्याहारी करून पेत्रा दरीवर चढाई करायला आम्ही तयार झालो.


पेत्राचा नकाशा (जालावरून साभार)

आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतशी आमच्या फौजेला इतर पर्यटकांची कुमक मिळत गेली. आधुनिक पेत्रा शहरापासून पेत्रा दरीकडे जाणार्‍या रस्त्यावर तेलावर चालणार्‍या गाड्यांना बंदी आहे. केवळ घोड्यांनी ओढलेल्या गाड्यांनी अथवा चालत जावे लागते. हा एक किलोमीटर लांबीचा पायी प्रवासही या भटकंतीतले लक्षात राहणारे आकर्षण होते. शहरापासून डोंगरापर्यंत असलेल्या थोडाश्या सपाट भूभागावरून चालत जाताना बाजूच्या डोंगरउतारावरची कलाकारी आपल्याला पेत्रा काय दाखवणार याची पुसट पूर्वकल्पना देऊ लागली होती...


पेत्राच्या दिशेने पदयात्रा : ०१

.


पेत्राच्या दिशेने पदयात्रा : ०२ : कड्यात कोरलेले आणि इजिप्शियन / ग्रीक ओबेलिस्कने सजवलेले थडगे

थोड्याच वेळात आम्ही खुब्था नावाच्या डोंगराच्या संपूर्ण उंचीला दुभागणार्‍या सीक (Siq) नावाच्या एका अरुंद घळीच्या तोंडाशी पोहोचलो. येथूनच पेत्रा आपला चमत्कार उलगडून दाखवायला सुरुवात करते. या एक किलोमीटर लांब, ८० मीटर उंच आणि काही मीटर (काही ठिकाणी अगदी फक्त ८-१० मीटरच) रुंद घळीतून चालत जाणे हा एक विस्मयकारक आणि सुंदर अनुभव आहे...


सीक घळ : ०१ : तोंड

या घळीचे अरुंद तोंड हीच पेत्राची आक्रमकांविरुद्ध असलेली पहिली संरक्षक फळी होती. जणू काही किल्ल्याचा १०-१५ मीटर रुंद आणि ८० मीटर उंच नैसर्गिक दरवाजा ! या दरवाज्यातून आत गेल्यावर थोड्याच वेळात मध्येच एका ठिकाणी घळ बर्‍यापैकी रुंद होऊन एक छोटेसे पटांगण झालेले दिसले. तेथे रोमन सैनिक आमच्या मनोरंजनासाठी त्यांची पुरातन कवायत करत होते...


सीक घळ : ०२ : रोमन सैनिक

तेथून पुढे घळ परत अरुंद झाली. नैसर्गिक झीजेमुळे दोन्ही बाजूंच्या कड्यांच्या कातळांवर चित्रविचित्र आकार तयार झालेले आहेत. या सौंदर्यपूर्ण नैसर्गिक कलाकृतींकडे पाहत आमची वाटचाल पुढे सुरू होती. त्यातच भर म्हणून वर येऊ लागलेल्या सूर्याची किरणे घळीत प्रवेश करू लागली होती. खनिजांनी समृद्ध कातळांवर सूर्यकिरणे पडली की तेथे रंगांचे खेळ सुरू होत होते. तो रंग आणि आकारांचा खेळ बघत आम्ही पुढे जात होतो...

 ...
सीक घळ : ०३ व ०४

.


सीक घळ : ०५

.


सीक घळ : ०६

.


सीक घळ : ०७

.


सीक घळ : ०८

नाबातियन अनेक देव मानणारे मूर्तिपूजक होते. नाबातियन देवतांच्या कातळात कोरलेल्या मूर्तीचे अवशेष मधून मधून दिसत होते...


सीक घळ : ९ : कड्यात कोरलेल्या मखरातले नाबातियन देवतेच्या मूर्तीचे अवशेष

एका ठिकाणी घळीच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या कातळात मुख्य नाबातियन देवाची व त्याच्या पत्नीची मूर्ती असलेले, अगदी आपल्या गावाच्या वेशीवर असते तसेच, एक देऊळ कोरलेले होते...


सीक घळ : १० : गाववेशीवरचे नाबातियन मंदिर (मखरातील मोठा चौकोन मुख्य देवाच्या आणि त्याच्या शेजारचा छोटा चौकोन त्याच्या पत्नीच्या मूर्तीचे अवशेष आहेत)

.


सीक घळ : ११ : गणेशाच्या आकाराचा नैसर्गिक खडक

.


सीक घळ : १२ : हत्तीच्या डोक्याचा आकार

या निसर्गाच्या कवतिकाने चकीत होत पुढे पुढे जात असतानाच नकळत संपणार्‍या घळीच्या चिरेतून उन्हाच्या तिरिपेत चमकणारा एक भव्य आकार पुढे आला. बराच काळ मनात कोरला गेलेला तो आकार इतक्या नाट्यपूर्ण प्रकारे अचानक समोर आला की मी थोडासा स्तब्ध झालो आणि जवळ जवळ ओरडलोच, "ट्रेझरी... ट्रेझरी (खजिना... खजिना) !!"...


पेत्रा दरी : ०१ : खजिन्याचे पहिले दर्शन

अंदाजे ५० मीटर चालून गेल्यावर घळीतून बाहेर पडून पेत्रा दरीतल्या एका फुटबॉल मैदानाइतक्या मोठ्या मोकळ्या जागेत प्रवेश केल्यावर ती जगप्रसिद्ध वास्तू पूर्णपणे दिसू लागली...


पेत्रा दरी : ०२ : खजिना

अगोदर फोटोत बघितलेले असूनही, घळ संपून पेत्रा दरीत शिरताना अचानक पुढे येणारे हे स्थापत्य मनावर आश्चर्यकारक छाप पाडते. २००० वर्षांपूर्वी शहराला भेट देणार्‍या लोकांच्या मनावर त्याच्या भव्यतेचा आणि कलाकुसरीचा प्रचंड प्रभाव पडत असणार हे निश्चित ! पेत्राला भेट देणार्‍या व्यापार्‍यांसाठी अशी जगावेगळी वास्तू मोठे आकर्षण असणार हे नक्की. त्यांनी केलेले या जागेचे वर्णन पेत्राच्या जाहिरातीचे प्रभावी साधन झाले असल्यास नवल नाही. व्यापाराला चर्चेतून झालेल्या जाहिरातीपेक्षा (माउथ पब्लिसिटी / वर्ड ऑफ माउथ) जास्त उपयोगी जाहिरात ती काय ?!

ट्रेझरीची इमारत म्हणजे पेत्रा दरीच्या उभ्या कड्यातल्या वालुकाश्मात कोरून काढलेला एक मोठा दिवाणखाना आणि त्याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन मोठ्या खोल्या आहेत. तिच्या दर्शनी भागाच्या वर मध्यात असलेल्या कलशासारख्या दगडी आकारात नाबातियन किंवा इजिप्शियन राजांनी खजिना साठवून ठेवला असावा असा लोकांत समज होता. त्यामुळे त्या कलशावर गोळीबार करून तो फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. भरीव दगडाने बनलेला असल्याने तो कलश फुटला नाही पण त्याला बरीच हानी मात्र पोचली.

ही वास्तू नक्की कशासाठी बांधली होती याबाबत पुरातत्त्व शास्त्रज्ञांना बराच काळ मोठे कोडे पडले होते. तिच्या भव्यतेमुळे आणि नगराच्या वेशीजवळच्या स्थानामुळे ही इमारत व्यापारी कर जमा करण्यासाठी आणि साठवण्यासाठी बनवलेली खजिन्याची इमारत (ट्रेझरी) असावी असा सुरुवातीचा समज होता. त्यावरून तिचे नाव ट्रेझरी (खजिन्याची इमारत) असे ठेवले गेले. नंतर आधुनिक उपकरणे वापरून भूगर्भ चाचणी केल्यावर त्या इमारतीखाली अजून काही खोल्या असल्याचे आढळले. उत्खनन केल्यावर तेथे मिळालेल्या अस्थी, त्यांच्याबरोबर पुरलेले इतर सामान आणि शिलालेख यांच्या साहाय्याने ती इमारत म्हणजे नाबातियन राजा अरेतास याचे थडगे असल्याचे समजले. राजघराण्यातल्या इतर व्यक्तींसाठीही हे भव्य थडगे वापरले गेले होते. मात्र तरीही त्या इमारतीला "खजानेह् किंवा ट्रेझरी" हे नाव चिकटले ते आजतागायत कायम राहिले आहे.


पेत्रा दरी : ०३ : खजिन्यासमोरचे पटांगण आणि सीक घळ

मात्र या शोधाने पेत्रा दरीच्या कातळांत कोरून काढलेल्या अनेक कोरीव इमारतींचा अर्थ लागला... ती सगळी थडगी होती ! त्या काळाची उघड्यावर बांधलेली सर्व दगड-माती-लाकडाची घरे अनेक भूकंपांनी आणि निसर्गाच्या मार्‍याने नष्ट झाली आहेत. थोडक्यात, आता उरलेले पेत्रा शहर म्हणजे शेकडो, वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलींच्या थडग्यांची नगरी आहे !! मृत माणसाच्या राजकिय-सामाजिक स्थानाप्रमाणे आणि आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्याचे थडगे किती मोठे आणि किती कलापूर्ण असावे हे ठरत होते.

पेत्रा म्हणजे नाबातियन लोकांच्या स्थापत्यकलेचे, रसिकतेचे आणि सधनतेचे एक विशाल खुले संग्रहालय आहे. त्यातिल काही भाग...


पेत्रा दरी : ०४ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी

.


पेत्रा दरी : ०५ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी

.


पेत्रा दरी : ०६ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी

.


पेत्रा दरी : ०७ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी

.


पेत्रा दरी : ०८ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी

दरीतून चालत पुढे गेल्यावर नाबातियन लोकांनी बांधलेले ३,००० प्रेक्षक बसू शकतील इतके मोठे रोमन शैलीतले थिएटर दिसले...


पेत्रा दरी : ०८ : रोमन शैलीतले थिएटर

पुढे जाताना राजवाडा, मंदिर, ओबेलिस्क, प्राण्याचे बली देण्याच्या वेदी आणि कोलोनेडवाल्या रस्त्यांचे अनेक भग्न अवशेष दिसत होते... ...


पेत्रा दरी : ०९ : भग्नावशेष

.


पेत्रा दरी : १० : जीर्णोद्धार केल्यानंतर आता दिसणारे मंदिर व त्याचा परिसर (जालावरून साभार)

दरीच्या मध्यातच एका स्थानिकाचे दुकान-कम-रेस्तराँ होते तेथे अल्पोपहार घेतला. नंतरचा दरीच्या दुसर्‍या टोकापर्यंतचा प्रवास करण्यासाठी स्वतःचे पाय, खेचर व उंट असे तीन पर्याय होते. पाय आणि वेळ वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पसंतीचा दुसरा किंवा तिसरा पर्याय निवडला. मी उंटाची सफारी निवडली...


पेत्रा दरी : १२ : उंटाची सवारी

दरीच्या शेवटाला असलेल्या डोंगरावर असलेल्या आकर्षणाला, अद् दायर मोनास्टरीला, जायला डोंगराचा उभा चढ आणि ८०० पायर्‍या चढून जावे लागते. त्या चढणीवर उंट चढू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने आतापर्यंत आम्ही प्रेमात पडलेल्या सवारीला सोडून खेचरावर बसावे लागले. या अरुंद रस्त्याचा बराच भाग तुटक्या कड्याच्या बाजूने किंवा खोल दरीच्या बाजूने जातो. खडबडीत रस्त्यावरून आणि तुटलेल्या दगडी पायर्‍यांवरून खेचरांचेही पाय मधूनच घसरत होते. जीव मुठीत घेऊन तोल सांभाळत केलेला हा प्रवास नक्कीच कायम स्मरणात राहील ! ...


पेत्रा दरी : १३ : अद् दायर मोनास्टरीकडे

.


पेत्रा दरी : १४ : अद् दायर मोनास्टरीकडे

पण मोनास्टरीजवळ पोचल्यावर हा सर्व त्रास सुसह्य वाटला. डोंगरावर असलेल्या एका प्रशस्त पटांगणास लागून असलेल्या कड्यात कोरून काढलेल्या या मोनास्टरीचे स्थापत्य खजिन्याच्या स्थापत्याच्या तोडीस तोड असेच आहे...


पेत्रा दरी : १५ : अद् दायर मोनास्टरी

पटांगणाच्या विरुद्ध दिशेला एक रेस्तराँ आहे. तेथे सर्वांनी कोरडे पडलेले घसे शीतपेयांनी ओले करून घेतले. तेथून जवळच असलेल्या सर्वात उंच टेकडीवरच्या एका तंबूवर "द बेस्ट व्ह्यू इन पेत्रा" असा फलक बघितला...


पेत्रा दरी : १६ : "द बेस्ट व्ह्यू इन पेत्रा" टेकडी

आता इतके दूर आल्यानंतर तो संदेश पाहून तेथे जावेच लागले. तेथे जाण्यासाठी पाय हाच एक पर्याय होता. पण टेकडीवर पोचल्यावर थकवा दूर होईल असे मोनास्टरीचे आणि परिसराचे विहंगम दर्शन झाले...


पेत्रा दरी : १७ : टेकडीवरून दिसणारी मोनास्टरी आणि परिसर

टेकडीवरचा तंबू एका स्थानिक बदू (भटका अरब) चा होता. त्या तंबूत त्याने आपले भेटवस्तूंचे दुकान ठाकले होते. "पाणी हवे काय?" असे म्हणत एकदम घरगुती पद्धतीने स्वागत करून त्याने प्रत्येकाची "कोठून आलात?" अशी विचारपूस केली. मी भारतीय आहे असे म्हणताच त्याला एकदम प्रेमाचे भरते येऊन गळाभेट झाली (सर्वसाधारण, आणि विशेषतः बदू लोकांत भारतियांबद्दल आस्था दिसली. शहरात मात्र तसे काही खास जाणवले नाही.)...


पेत्रा दरी : १८ : टेकडीवरच्या तंबूतले स्वागत

त्या तंबूत जणू आंतरराष्टीय सभा भरली होती... तेथे भारत (मी), सौदी अरेबिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, स्पेन आणि चक्क इझ्रेलचे नागरिक होते !! अरब आणि इझ्रेली लोकांना इतक्या सौहार्दपूर्ण वातावरणात उच्चस्तरीय (टेकडीवर हो !) खलबते करतानाच नव्हे तर अरबी बदू संगीतावर एकत्र ठुमका मारताना पाहायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते...


पेत्रा दरी : १९ : टेकडीवरच्या तंबूतले नृत्य

परतीचा पेत्रा दरीतल्या रेस्तराँपर्यंतचा प्रवास पायीच केला. रेस्तराँमध्ये पोटोबा केला आणि थोडा विसावा घेतला. ज्यांच्या पायात अजूनही त्राण आहे त्यांनी दरीच्या टेकड्यांवर चढाई करून तिथले स्थापत्य जवळून पाहायला हरकत नाही, असे मार्गदर्शक म्हणाला. त्याचा फायदा घेऊन माझ्यासारखे काही मावळे हर हर महादेव म्हणत पेत्रा दरीचे कडे सर करायला निघाले. त्या मोहिमेत सापडलेली काही लूट...


पेत्रा दरी : २० : परतीचा फेरफटका : नैसर्गिक कलाकारी

.


पेत्रा दरी : २१ : परतीचा फेरफटका : न्यायगृह (हॉल ऑफ जस्टिस)

.


पेत्रा दरी : २२ : परतीचा फेरफटका : न्यायगृह (हॉल ऑफ जस्टिस)

.


पेत्रा दरी : २३ : परतीचा फेरफटका

.


पेत्रा दरी : २४ : परतीचा फेरफटका

कड्यांमधल्या गुहांतून भटकताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शेवटी मावळतीला जाणार्‍या सूर्यमहाराजांनी त्यांची किरणे आवरत घेत त्यांच्या कामाची वेळ संपली असे जाहीर करायला सुरुवात केली. अजून दरीचा उरलेला एक किलोमीटर आणि सीक घळीचा एक किलोमीटर चालायचे आहे हे ध्यानात येऊन आमची मोहीम आवरती घेणे भाग पडले.

===================================================================

पेत्रामघ्ये घडलेल्या लक्षात राहण्याजोग्या दोन घटना:

पेत्रामधले बॉलीवूड

पेत्रा दरीत फिरताना एक १०-१२ वर्षांची बदू फेरीवाली मुलगी दरीतल्या फोटोंचा अल्बम घ्या म्हणून मागे लागली. फिरताना डिजीटल कॅमेर्‍याच्या कृपेने मीच दिवसाला १००-२०० फोटो काढत असतो ! म्हणून मी असे फोटो विकत घेत नाही. १०-१२ मीटर पाठलाग करूनही मी दाद देत नाही हे पाहिल्यावर तिने धावत येऊन समोर उभे राहून मला थांबायला भाग पाडले आणि अचानक "दिलीप कुमार, अमिताभ बच्चन..... शाहरुख खान, हृतीक रोशन, अक्षय कुमार..." अशी १५-२० नावे अरबी ठसक्यात धडधडा म्हणून दाखवली. त्या धक्क्यातून सावरायला मला जरासा वेळ लागणारच ना ! पण त्यामुळे तिला मी अजूनही बधत नाही असे वाटले असावे, कारण तिने एक-दोन हिंदी गाण्यांचे मोडकेतोडके तुकडे म्हटले. आतापर्यंत बॉलीवूडचा गंधही नसलेल्या माझ्या काही सहकार्‍यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते ! मुकाट्याने (आणि बर्‍याचशा खुशीने) तिने सांगितलेली किंमत देऊन अल्बम खरेदी केला !

बदूशी लग्न (Married to a Bedouin)

Marguerite van Geldermalsen नावाची न्यूझीलंडची नर्स १९७८ मध्ये पेत्रा दरीत पर्यटक म्हणून आली असता तिथल्या एका गुहेत जन्मलेल्या आणि तेथेच राहिल्या-वाढलेल्या महंमद अब्दुल्लाच्या प्रेमात पडली. त्यांचे लग्न झाले. १९८५ मध्ये बदूंचे दरीबाहेरच्या गावात विस्थापन करेपर्यंत ती महंमदबरोबर त्याच्या २००० वर्षे वयाच्या गुहेत राहत होती. त्यांच्या तीन मुलांपैकी पहिल्या दोघांचा जन्म त्याच गुहेत झाला. मार्गेराईटने आपल्या आयुष्याच्या त्या कालखंडासंबंद्धी "Married to a Bedouin" या नावाने पुस्तक लिहिले आहे.

ती दरीत राहणार्‍या बदूंसाठी अनौपचारिक नर्स म्हणून काम करत असे. तिने दरीत एक भेटवस्तूंचे दुकान थाटले होते, आता ते न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेऊन आलेला तिचा एक मुलगा चालवतो. आमच्या मार्गदर्शकाने त्याची ओळख करून दिली तेव्हाचा हा फोटो...


मार्गदर्शक खमीस आणि मार्गेराईटच्या मुलाबरोबर

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

स्पा's picture

20 Oct 2014 - 11:33 am | स्पा

अप्रतिमच

ह्यात्स ऑफ ;)

मस्त सहल घडली दिवाळीची.

पेत्रा येणार, येणार असे म्हणता म्हणता दिवाळी अंकात उगवले शेवटी! वा, क्या बात है! प्रवासवर्णन आणि छायाचित्रे छानच, पण तेथील भौगोलिक व ऐतिहासिक ओळख जास्त आवडली. अनेकाभार!

मधुरा देशपांडे's picture

22 Oct 2014 - 1:09 pm | मधुरा देशपांडे

कधीपासुन या भागाची वाट बघत होते. माहितीपुर्ण आणि रोचक.

मस्त मेजवानी.. भरपूर नवीन माहिती मिळाली.

सीक घळीचे फोटो पाहून सांदण दरीची आठवण आली.

सांदण दरी.

.

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 6:46 pm | चौकटराजा

पेट्रा ते पेट्रा हे खरेच आहे. पण इथे गेल्याचा काहीसे समाधान , अजंता, कार्ला, आता इथे दर्शविल्या प्रमाणे सांदण दरी तसेच बदामी येथेही मिळेल . आपल्या लेख म्हणजे पेट्रातील कलाकारीचा (मानवी व नैसर्गिक) उत्सवच आहे ! बाकी उंटावर च्या सवारी वर हातात चाबुक व डोक्यावर हॅट का नाही ?

मस्त फोटो आणि सविस्तर माहिती.पेट्रा सुरेख दिसतय.बरिच वाट पाहिली या भागाची.सार्थकी लागली.

सस्नेह's picture

23 Oct 2014 - 3:08 pm | सस्नेह

फोटोतून सुद्धा पेत्राची भव्यता जाणवते आहे. आणि माहिती तर क्लासच !

इस्पिकच्या एक्क्याचे आम्ही 'पंखे' आहोत ते केवळ त्यांची भटकंतीची 'खाज' आणि पर्यटनस्थळाचा सखोल अभ्यास करून स्वच्छ आणि सोप्या शब्दात मांडणी करण्याच्या कलागुणांमुळे. निवृत्तीवयाच्या जसजसे जवळ पोहोचतो आहे तसतसे भटकंतीला सुरुवात केली आहेच. इस्पिकचा एक्का ह्यांची ही प्रवास आणि स्थलकाल वर्णने सर्वांसाठीच मोठी मार्गदर्शक ठरत आहेत. नशिब त्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाही (बाकी, सशुल्क माहितीही उपकारकच ठरावी अशी आहे) हे आमचे भाग्य. अल्फ शुक्रन.

पेठकरांच्या पर्यटन यादीत 'पेत्रा' आलेले आहे.

कैच्या कै फीरता साहेब तुम्ही.
आणि एवढे सुन्दर प्रवास वर्णन... शब्द नाहीत.

प्रचेतस's picture

25 Oct 2014 - 1:45 pm | प्रचेतस

अद्भूत आहे ही पेट्रा दरी.

कुसुमावती's picture

30 Oct 2014 - 5:20 pm | कुसुमावती

इतक्या दिवसांच्या प्रतिक्षे नंतर फायनली पेत्राचे सुंदर दर्शन घडले.

अप्रतिम प्रवास वर्णन. पुभाप्र.

सानिकास्वप्निल's picture

30 Oct 2014 - 6:29 pm | सानिकास्वप्निल

अद्भूत , भव्य आहे पेत्रा व्हॅली.
उत्तम माहितीपूर्ण लेख, सुरेख फोटो.
मजा आली वाचताना :)

जुइ's picture

2 Nov 2014 - 8:30 pm | जुइ

आणि फटु. लेख आवडला!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2014 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पा, जेपी, स्वॅप्स, मधुरा देशपांडे, मोदक, चौकटराजा, इशा१२३, स्नेहांकिता, प्रभाकर पेठकर, खटपट्या, वल्ली, कुसुमावती, सानिकास्वप्निल आणि जुइ : सर्वांसाठी अनेकानेक धन्यवाद !

स्पंदना's picture

7 Nov 2014 - 5:39 am | स्पंदना

१६ नंबरचा फोटो दृष्टीभ्रम करतो. समजतच नाही कसा घेतलाय.
बाकिचे फोटो सुद्धा अतिशय सुंदर.
यावेळी तुमच्या बशीत आम्ही नव्हतो ना भाऊ.. :(

पैसा's picture

8 Nov 2014 - 10:32 am | पैसा

केवळ अप्रतिम आणि अद्भुत!