वो नही जानते की वफ़ा क्या है

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
13 Oct 2014 - 11:35 am
गाभा: 

हमको है जिनसे वफ़ा की उम्मीद
वो नही जानते की वफ़ा क्या है ?
( गालिब )

निष्ठा हे एक प्राचीन मानवी मुल्य आहे म्हणजे मानवाने निर्माण केलेले मुल्य या अर्थाने. निष्ठा या मुल्याला सर्वसाधारणपणे उदात्त श्रेष्ठ असे मानवी मुल्य समजले जाते.. सध्या सर्व समाजात मुल्यांची घसरण होत आहे अशा नेहमीच्या तक्रारी त जी काय मुल्ये अपेक्षीत असतात त्यात निष्ठा हे एक प्रमुख मुल्य असते. या मुल्याची तटस्थ अभिनिवेशरहीत चिकीत्सा केल्यास आपल्याला या मुल्याचा अर्थ अधिक व्यापकतेने लक्षात येतो तर निष्ठा म्हणजे नेमके काय ? loyalty हा निष्ठे साठी वापरण्यात येणारा इंग्रजी शब्द ज्या loyal शब्दावरुन येतो त्याचा ऑक्सफ़र्ड डिक्शनरी जो अर्थ देते तो रोचक आहे तो असा देते की steadfast in allegiance आणि allegiance चे मुळ बघितले तर ते फ़्रेंच liege या विशेषणात येते या विशेषणाचा अर्थ थोडा नकारात्मक व त्यापेक्षाही तो पुरेसा वाटत नाही. तर तो असा दिलेला आहे की relationship between a feudal superior and a vassal. मात्र इंग्रजी शब्दाचा अर्थ तसा फ़ारच मर्यादीत आहे निष्ठे चे बहुआयामी स्वरुप त्यातुन फ़ारसे स्पष्ट होत नाही.

तर मग फ़क्त प्रामाणिकपणा म्हणजे निष्ठा का ? नाही प्रामाणिकपणा ही वेगळी बाब आहे. एखादा माणुस प्रामाणिक असु शकतो पण तो निष्ठावंत च असेल असे नाही. स्वत:शी प्रामाणिक असलेल्या माणसाला ही इज लॉयल टु हिज सेल्फ़/ फ़ीलींग्ज इ. म्हणु शकतो पण ही स्व-निष्ठा येथे आपला विषय नाही. निष्ठा म्हणजे नकारात्मक रीतीने स्वत:ला कशाशी तरी बांधुन घेणे. जखडुन घेणे (व्यक्ती-विचारसरणी-राष्ट्र-धर्म इ.) हे जखडुन घेणे मानसिक स्वरुपाचे अधिक असते. अजुन सोप करायच तर हे मुल्य समजुन घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतल्यास सोपे जाते निष्ठा ही नेहमीच कुणाशी तरी संबंधित असते. म्हणजे जसे राजकीय पक्षा शी निष्ठा, पति शी निष्ठा , राष्ट्रा शी निष्ठा इ. आणि कुणाची तरी असते जसे कार्यकर्त्यां ची पत्नी ची नागरीकां ची. निष्ठा अनेक क्षेत्रात अनेक नातेसंबंधात अनेक समाजात गटात निरनिराळ्या रुपांत ठेवली जाते तिचा आग्रह धरला जातो.

निष्ठा हे अयोग्य घातक नकारात्मक मुल्य आहे या मुलाधारा वर अगोदर काही सुत्रे मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर च्या विवेचनात निष्ठे च्या काही प्रकारांचा काही उदाहरणांसहीत आढावा घेतो व त्यातच सुत्ररुपात निष्ठे संदर्भात जी माझी मांडणी आहे तिला स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तर निष्ठे संदर्भात सुत्रे अशी की

१- निष्ठा हे मुल्य प्रामुख्याने (येथे मानवी नात्या संदर्भातील निष्ठा) विवीध प्रकारच्या शोषणा साठी शोषणा ला अनुकुल अशी पृष्ठभुमी तयार करण्यासाठी वापरले जाते. निष्ठे चा आग्रह हा शोषकां कडुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केला जात असतो .
२- निष्ठा हे मुल्य मानवी सर्जनशीलतेच्या उन्मुक्त अविष्काराला नेहमीच मर्यादा आणत असते.
३- निष्ठा ही अनेकदा गुणवत्तेचा बळी घेते व अशा इतर अनेक सकारात्मक बाबींचा संकोच करण्यास कारणीभुत होत असते.
४- निष्ठा ही लाचारी, भय, स्वार्थ ,दांभिकता, द्वेष आदि अनेक नकारात्मक बाबींना जन्म देत असते.
५- निष्ठा दरक्षणी बदलत जात असलेल्या परीस्थीतीला/ वास्तवाला निखळ पुर्वग्रहदुषीत प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला संपवुन टाकते.
६- निष्ठा ही नेहमीच निष्ठावंताला विलग करत असते इथे इंग्रजी आयसोलेट शब्द समर्पक आहे. मग असा आयसोलेटेड माणुस इतरांशी कनेक्ट करु शकत नाही. माझ राष्ट्र माझ कुटुंब माझी भाषा माझी विचारसरणी इ. ती अतिंमत: निष्ठावंताला संकुचित करुन सोडते.
७- निष्ठा माणसाची सारासार विवेक/विचार करण्याची न्याय्य भुमिका घेण्याची जी क्षमता असते तिला संपवते. असा माणुस मग योग्य निष्पक्ष तटस्थ निर्णय च घेउ शकत नाही.
८- निष्ठा प्रतिभेला कुंपण घालते.
९- सर्वात महत्वाचे म्हणजे निष्ठा माणसाच मानसिक स्वातंत्र्य हिरावुन घेते. व पुढे जाउन कधी कधी तर निष्ठेच्या बंधनातच माणुस धन्यता मानु लागतो.

अगोदर ढोबळ उदाहरणे घेउन मग अधिक तरल उदाहरणांकडे जाता येते का बघु तर,

राजकीय निष्ठा- राजकीय नेता वा पक्ष या प्रति असलेल्या निष्ठा बघा. औरंगाबाद च्या सभेत कुमारवयीन नेते आदित्य ठाकरेंचे चरणस्पर्श करुन ठाकरे घराण्याप्रति आपली निष्ठा व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते खासदार खैरे किंवा अधिक बटबटीत उदाहरण म्हणजे पनीरसेल्वम हे जयललितांचे निष्ठावंत कार्यकर्ते जे नेहमी जयललिता यांना कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात स्टेजवर पुर्णपणे साष्टांग नमस्कार नेहमीच घालतात. यात निष्ठेचे ओंगळवाणे प्रदर्शन असते. हे सुत्र ४ नुसार लाचारी भय स्वार्थ आदिंचे उदाहरण आहे. निष्ठावंत भयग्रस्त बनतात त्यांना राजकीय नेत्या चा वरदहस्त गमावण्याचे, नाराज होण्याचे भय असते. त्याने ही लाचारी निर्माण होते. या प्रकाराला विरोध केल्यावर मग हे कार्यकर्ते ही आपली भक्ती आहे व आपले नेता कसे पुज्यनीय च आहेत हे पटवण्याचा प्रयत्न करतात यातुन मग दांभिकतेचा जन्म होतो. आपल्या नेत्याविरोधात बोलणारे मग अशा निष्ठावंताच्या द्वेषाचे बळी देखील पडतात. पक्षा प्रति असलेली निष्ठा अनेक नकारात्मक बाबींना जन्म देते. उदा. एखादा कार्यकर्ता जर कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठ असेल तर तो त्याच्यासमोर कीतीही डोके फ़ोडले तरी भांडवलवादाने निर्माण केलेल्या गुणवत्तेच्या उत्पादनाच्या सकारात्मक बाबींना मान्य च करत नाही. तेच उलट बाजुने ही होत असते.

धार्मिक / जातीय निष्ठा- धर्माप्रती जातीप्रती असलेल्या निष्ठेने तर अनेक प्रकारच्या शोषण व्यवस्थांना जन्म दिलेला आहे. इस्लाम मध्ये वा ख्रिश्चन धर्मात निष्ठा ठेवणारा धार्मिक माणुस इतरांना आपल्या धर्मात खेचण्यासाठी वा संपवुन टाकण्यासाठी सर्व प्रकारची नीच कृत्ये करण्यास एका पायावर तयार असतो. त्याची धर्मा/जाती प्रती असलेली निष्ठा त्या माणसाला सुत्र ३ नुसार संकुचित मनोवृत्तीचा बनवत असते. जसे माझ्या धर्मा/ जाती बाहेर काहीच नाही माझाच धर्म/जात श्रेष्ठ इ. धर्माच्या निष्ठेच्या नावावर सती जिहाद इनक्वीझीशन आदि अत्यंत क्रुर क्रुत्ये ही उदात्त ठरवीली जातात. संवेदनशीलता प्रेम आदि सकारात्मक मानवी मुल्यांचा सुत्र ३ अनुसार संकोच होत असतो.

नातेसंबंधा तील निष्ठा- विवीध मानवी नात्यांमध्ये निष्ठे चा आग्रह धरला जातो. उदा. वैवाहीक नात्यात स्त्रीयां कडुन निष्ठेचा कडवा आग्रह ठेवला जातो. हे जरा विचार करण्यासारखे आहे जेव्हा एक पुरुष कींवा स्त्री दुसरया कडुन निष्ठे ची मागणी करतो तेव्हा तो काय म्हणत असतो की तु केवळ माझ्याशी च एकनिष्ठ रहा या मुळ मागणीतच संशय भय सरळ दिसुन येत नाही का ? जर निखळ प्रेम मुलभुत विश्वास व आदर असेल तर निष्ठे ची मागणी च निर्माण होण्याचे कारण नाही. उदाहरणार्थ बॉलीवुड च्या राणी मुखर्जी या अभिनेत्री शी विवाह करण्या अगोदर चोप्रा कुटुंबीया ने तिच्याशी करार केलेला आहे की जर भविष्यात घटस्फ़ोट झालाच तर तिला अमुक अमुक इतकाच हक्क चोप्रा च्या मालमत्तेत मागता येइल इ. या नातेसंबंधात जसे सुरुवातीलाच त्याच्या पाया तच एक संशय भय अविश्वास समाविष्ट आहे त्यात निखळ प्रेम संवेदनशीलता असु शकते का ? नातेसंबंधात केली जाणारी निष्ठे ची मागणी देखील वरील उदाहरणातल्या सारखी सकारात्मक नातेसंबंधाच्या पायाला सुरुवातीलाच तकलादु बनवुन टाकते . नात्यात निष्ठे ची शपथ घेतली जाते वा घातली जाते त्यातच कीती संशय भय आहे हे बघा. अशा दोन व्यक्ती ज्या निष्ठे विषयी अशा रीतीने आग्रही आहेत त्यांच्यातील संबंध त्याची क्वालीटी कशी असेल ?

विचारसरणी वरील निष्ठा- महाराष्ट्रातील तीन विचारवंत बघा स.ह.देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथवा डी.डी. कोसंबी हे जर साम्यवादा च्या विचारसरणी शी जखडले गेले नसते तर ? त्यांच्या असामान्य प्रतिभेला त्यांच्या विचारसरणी वरील निष्ठे ने कुंपण घातलेले दिसुन येते. तिसरे उदाहरण निष्ठामुक्त विचारवंताचे बघा नरहर कुरुंदकर कुठल्याही एका विचारसरणी च्या निष्ठे ला त्यांनी कधीही बांधुन घेतले नाही. आपली प्रतिभा सर्जनशीलता कुठल्याही विचारसरणी वरील निष्ठेला बळी पडु दिली नाही. हे कुरुंदकरांचे उदाहरण बोलके आहे. म्हणुन सर्वच कडवे दलित मुस्लिम हिंदु त्यांच्यावर नाराज असत.

कलेच्या क्षेत्रातील निष्ठा- भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात अनेक प्रतिभाशाली कलाकार झाले मात्र त्यातील घराणेशाही (जो एका संपुर्ण स्वतंत्र लेखाचा विषय आहे ) व घराणेशाही वरील निष्ठे ने अनेकांच्या सर्जनशीलतेचा उन्मुक्त अविष्कार रसिक श्रोत्यांच्या नशिबात अनुभवायला आलाच नाही. भिमसेन जी या तर जसराज जी त्या घराण्याला बांधलेले त्याच्या वरील निष्ठेने वाकलेले नियंत्रीत मर्यादीत झालेले. त्यांनी फ़्युजन प्रयोग करणे टाळले. इतर घराण्यातले चांगले घेण्याचा प्रयत्न केला नाही. अर्थात ते महान कलाकार आहेत मी फ़क्त असे म्हणत आहे की त्या घराण्याच्या मर्यादेत राहुनही त्यांनी इतका आनंद दिला. ही बंधने नसती तर त्यांच्या प्रतिभेने काय अप्रतिम अविष्कार केला असता इतकेच मला म्हणायचे आहे एक खंत या अर्थाने मी म्हणत आहे इतकेच. या बाबतीत कुमार गंधर्व या महान गायकाचे उदाहरण घ्या. यांनी संगीतातील घराणेशाही विरोधात आयुष्यभर आवाज उठवला अनेक नियमांना परंपरांना आव्हान दिले कुठल्याही फ़ालतु सांगितीक घराणेशाही शी गुरुशाही शी निष्ठा ठेउन स्वत:ला जखडुन घेतले नाही. व परीणाम स्वरुप रसिक श्रोत्यांना एक अप्रतिम असा उच्चत्तम कलेच्या अविष्काराचा अनुभव दिला. निष्ठामुक्त प्रतिभेचे हे उत्तम उदाहरण आहे. कुमार गंधर्व नेहमीच प्रयोगशील राहीले चांगल्या गायकाने नुसतचं गाणं नाही तर इतर ही कलां मध्ये रुची घ्यावयास हवी वाचनाचा व्यासंग करायला हवा अस ते म्हणत असत, इतक्या मोकळ्या रीतीने ते आपल्या सृजनशीलतेचा उपयोग करीत.

निष्ठा सारासार विवेक व न्याय्य विचार करण्याच्या मानवी क्षमतेला बाधा आणते. हिटलरच्या काळात बघा अनेक जर्मन स्त्री पुरुष हिटलर वरील निष्ठेने अंध होउन ज्युं चे शिरकाण करीत असत त्यांना यातना देत असत. कुणालाही त्यात काहीही गैर वाटत नसे. यातील फ़ार कमी जण असे होते की ज्यांनी आपली सारासार विचार करण्याची क्षमता शाबुत ठेवली विवेकाला हिटलर वरील थर्ड राइश वरील निष्ठे च्या दावणीला न बांधुन घेता व जे योग्य आहे न्याय्य आहे असे कृत्य केले. शिंडलर्स लिस्ट वाल्या शिंडलर्स चे उदात्त उदाहरण कोण विसरेल. अनेक ज्युं ना त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालुन वाचवले. जेव्हा इतर जर्मन्स हिटलर निष्ठे त विवेक घालवुन बसले होते तेव्हा शिंडलर्स सारखे दुर्मिळ निष्ठामुक्त स्व विवेकाची कास धरुन आपल्या आतील आवाजाला प्रतिसाद देत होते.

रामायणातील बिभीषण हे पात्र बघा हा स्वतंत्र प्रज्ञेचा एकमेव पुरुष. रावणाची अन्याय्य बाजु त्याच्या निष्ठावंताना दिसत नव्हती. निष्ठेने लाचार झालेल्या दांभिक झालेल्यांनी रावणाची अन्याय्य बाजु उचलुन धरलेली दिसते. एकुलता एक बिभिषण रावणा प्रति च्या अंध निष्ठेतुन मुक्त झाला व त्याने रामाची न्याय्य बाजु घेतली. मात्र बिभिषणा कडे पाहण्याचा लोकांचा सर्वसामान्य दृष्टीकोण बघितल्यास असे लक्षात येते की त्याच्याविषयी तिरस्काराची च भावना लोकांत अधिक असते. त्याला घरका भेदी लंका ढाए अशा तिरस्कारयुक्त म्हणींनी दुजोरा मिळतो. हे मोठे रोचक आहे असे का होते ? तर मला वाटतं या मागे लोकांची एक अशी अप्रत्यक्ष अपेक्षा असते की काही का असेना रावण कसा का असेना बिभीषणा ने त्याच्याशी एक भाउ म्हणुन एकनिष्ठ च राहायला हवे होते. किंवा कुटुंबाशी एकनिष्ठ राहायला हवे होते.

निष्ठेच्या मागणीमागे नेहमीच छुपे हितसंबंध, स्वार्थ आदि गुंतलेले असतात. निष्ठेच्या मागणीत केवळ निष्ठा ही एक मुल्य म्हणुन बाय इटसेल्फ़ महत्वाची आहे म्हणुन ती असावयास हवी असे ही नसते. एका राष्ट्राचा गुप्तहेर दुसरया राष्ट्रात मोहीमे वर असेल व तिचा भाग म्हणुन त्याने कोणाशी प्रेमसंबंध निर्माण केले वा तिथे एखाद्या संस्थेत नोकरी केली तर त्याच्याकडुन आमच्या प्रति निष्ठा बाळग मात्र त्यांच्या प्रति निष्टा बाळगु नकोस अशी अपेक्षा असते. तात्पर्य असे की निष्ठा हे एक स्वतंत्र बाळगण्याजोगे स्वयंपुर्ण मुल्य असते की जिच्या पालना तच सार्थकता आहे तर असे झाले नसते पण असे निष्ठेच्या बाबतीत नाहीये.( निष्ठे ची गल्लत प्रामाणिक पणा बरोबर अनेकदा केली जाते मात्र प्रामाणिक पणा हे अगदीच वेगळे मुल्य आहे.) जसे भुतदया हे मुल्य बघितले तर त्यात अशी अपेक्षा नसते की या देशातीलच प्राणी महत्वाचे आहे त्या नाही असे नसते कींवा पर्यावरणा च्या मुल्या च्या बाबतीत बघा. त्या मुल्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचे अप्लीकेशन स्थल/काल निरपेक्ष असते. कारण निष्ठा हे मुल्या पेक्षा ही अधिक एक कनव्हेनिअन्स चे शोषणाचे हत्यार आहे. त्याचा वापर व निष्ठे चा आग्रह च माणसाला दांभिक बनवत असतो.
.
विज्ञानातील/ संशोधनातील निष्ठा- या क्षेत्रातील निष्ठा कीती घातक असु शकते एखादा शास्त्रज्ञ जर न्युटन च्या ३ नियमांवर पुर्ण अंध निष्ठा बाळगत असेल एखादी वैज्ञानिक संस्था जर न्युटन चा उदो उदो करत असेल व त्याच्या नियमांना आव्हान देणे शक्य च नाही या अर्थाने वातावरण निर्मीती करत असेल तर. पुढील संशोधनाला कीती प्रचंड मर्यादा येउ शकतात. चांगला वैज्ञानिक कींवा संशोधक नक्कीच कुठल्याही प्रकारच्या वैचारीक दबावाखाली अमुक एका वैज्ञानिक थेअरीशी निष्ठावंत राहुच शकत नाही. तो नेहमी च तिला आव्हान देणार तिची सत्यता तपासुन पाहणार. मला विज्ञानाच्या क्षेत्रातील उदाहरण सांगता येणार नाही परंतु वैज्ञानिक/संशोधन क्षेत्रात ही अनेक प्रकारच्या कडव्या निष्ठा एखाद्या थेअरी संदर्भात बाळगल्या जात असतात. फ़ार पुर्वी एक डॉक्टर की मौत हा पंकज कपुर चा सिनेमा बघितला होता त्यात या संशोधकीय क्षेत्रातील अशा प्रकारच्या गोष्टी दाखवलेल्या होत्या आता मात्र त्यात नेमक काय होत नीट आठवत नाही. ( या क्षेत्रातील उदाहरणे जाणकारांनी द्यावीत)

सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील संशोधनात तर अशा अनेक कडव्या निष्ठा ( जाती/धर्म/वंश आदिवरील निष्ठा) बाळगुन च अतिशय पुर्वग्रहदुषीत असे संशोधन अनेकदा होत असते.उदा. आर्यांच्या भारतातील आगमनाबाबत वा द्रविड येथील मुलनिवासी आहेत की नाही या विषयावरील संशोधन करतांना संशोधकांच्या त्यांच्या जातीप्रती असलेल्या धर्माप्रति असलेल्या निष्ठा त्यांच्या प्रत्यक्ष कामावर मोठा नकारात्मक प्रभाव पाडत असतात. विशीष्ट जाती तील महापुरुषा विषयीच्या संशोधनात ही अनेकदा कडव्या जातीय निष्ठा बाळगुन संशोधन केले जाते. अर्थातच असे संशोधन सत्य निष्कर्शां पर्यंत पोहोचु शकत नाही. यामागे जाती धर्मा प्रती असलेली निष्ठा प्रभाव टाकत असते.उदा, वा पा,वा, काणे यांचे धर्मशास्त्रा चा इतिहास लिहीतांना केलेले स्वधर्मनिष्ठाप्रेरीत संशोधन वा विरोधी दिशेने के पी जायसवालांचे हिंदु पॉलीटी वरील संशोधन. किंवा पेशव्यांचा घटकंचुकी चा खेळ एक्सप्लेन करतांना डळमळणारी सेतु माधवरावां ची पगडी बघा.

येथे डॉ, असगर अली इंजिनीयर यांचा उल्लेख आवर्जुन करावासा टाकतो. ज्या बोहरी मुस्लिम समाजात ते जन्मले ज्यात प्रत्येक स्त्री-पुरुषाला त्या धर्मातील सर्वोच्च गुरु सय्यदना यांचा मी आयुष्यभरासाठी गुलाम आहे अशी शपथ घ्यावी लागते व अनेक मार्गांनी परंपरांनी आपल्या संपुर्ण निष्ठा त्या धर्मगुरुंच्या पायाशी वाहण्याची कडवी परंपरा आहे. ज्यात तो धर्मगुरु अनेक मार्गाने शोषण करतो त्याच्या विरोधात साधा आवाज उठवणे देखील अतिशय महागात पडते. अशा सय्यदना या धर्मगुरु व त्याच्या शोषणा विरोधात इंजिनीयर यांनी अनेक वर्ष जबरदस्त लढा दिला. त्यासाठी प्रचंड त्रास व विरोध भोगला. परंतु निष्ठे च्या मागे न जाता त्यांनी विवेकाची कास धरलेली दिसुन येते.

एखादा माणुस जेव्हा अतिरेकी निष्ठा बाळगतो विशेषत: इतर माणसांप्रती तेव्हा खर म्हणजे ती विचार करण्यासारखी गोष्ट असते. उदा. एखाद्या कल्ट विषयी जेव्हा कल्ट चा सभासद कडवी निष्ठा बाळगतो त्यासाठी काय वाट्टेल ते करायला प्रसंगी प्राणार्पण देखील करायला तयार होतो तेव्हा यात नक्कीच काहीतरी गडबड असते. ही अतिशय गंभीर बाब असते यात अनेक शक्यता असतात त्याचा पारलौकीक स्वार्थ, ब्रेनवॉशिंग, मानसिक कमकुवतपणा, दबाव टाकुन केलेल कंडीशनींग अनेक बाबी असु शकतात त्याचा विचार केला चिकीत्सा केली तर निष्ठे मागील खरे चित्र समोर येउ शकते अशी चिकीत्सा अत्यावश्यक आहे.

मागे इथेच एका ठीकाणी सामुराई वरील एका चित्रपटावरील आस्वादात्मक लेख वाचला होता त्यात सामुराई च्या कडव्या स्वामिनिष्ठे ची एकंदरीत निष्ठे ची वारेमाप स्तुती केलेली होती. मला यात एक सामुराई मुळात इतका निष्ठावंत कसा “बनवला” जातो यावर देखील चिंतन होणे अगत्याचे वाटते. कुठल्या आर्थिक सामाजिक प्रलोभनांनी कुठल्या ब्रेनवॉशींग ने कुठल्या प्रतिष्ठेच्या कल्पना त्याच्यावर शेकडो वर्षे बिंबविण्यात आल्याने त्याला या निष्ठेची “लागण” होत असते. सामुराई च्या मनात इतकी स्वामीनिष्ठा कशी निर्माण केली जाते त्याची प्रोसेस या निष्ठे मागील सत्यावर शोषणा वर अधिक प्रकाश टाकु शकेल. पण आपल्या कडे सर्वसाधारण निष्ठे च्या प्रशंसे च्या गाना तच सर्व काही बाजुला टाकले जाते. सर्वसाधारणपणे लोकयात्रे त बघा ते कीती कट्टर आहेत आणि तुम्ही ? असे विचारले जात असते या मागे तुमची एखाद्या राष्ट्र/जाती/धर्मा प्रती कमी पडत असलेल्या निष्ठेला बोल लावला जात असतो. मग तिथे निष्ठे मागील मानसिकतेचे विश्लेषण व्हावे ही अपेक्षा थोडी जास्त च झाली म्हणायची. वरील सामुराई सारखे चिंतन अलकायदा वा आयएसआयएस च्या निष्ठावंता च्या कडव्या निष्ठे संदर्भात होणे ही काळाची गरज आहे. तरच त्यामागील निष्ठावंताची खरी प्रेरणा परीस्थीती समोर येईल. अनेकदा कडव्या निष्ठेमागे सोपे अर्थ कारण हे एक कारण ही असु शकते. मग त्या समस्येवरील उपाय देखील शोधण्याची प्रेरणा मिळेल.

विवीध मोठ्या कंपन्या ब्रॅंड लॉयल्टी हा एक कार्यक्रम राबवीत असतात. यामध्ये आपल्या कंपनीच्या उत्पादनाशी ग्राहक निष्ठावंत रहावा यासाठी सर्व योजना आखल्या जातात. यात ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली जातात. जुना ग्राहक असेल तर काही स्कीम्स बक्षीस देउन त्याची निष्ठा प्रोत्साहीत केली जाते इ. अनेक प्रकार केले जातात. मात्र यात कंपन्या आपला आर्थिक स्वार्थ काही लपवत नाही. त्यांची मार्केटींग टीम हे सर्व उघडपणाने करत असते. यात जशी निष्ठे ची मागणी सरळसोट दिसुन येते यातील आर्थिक स्वार्थ जसा अगदीच उघड असतो. सर्व मामला खुल्लमखुल्ला असतो.

असे मात्र इतर निष्ठांच्या बाबतीत होत नाही खास करुन नातेसंबंधाच्या निष्ठे संदर्भात तेथे स्वार्थ शोषण वेगवेगळे अलंकारीक नाव घेउन समोर येतात. कमावणारया सदस्या कडुन कुटुंबा प्रती च्या निष्ठे ची मागणी. कमावणारया एन आर आय कडुन पधारो म्हारे देस आपल्या मातृभुमी त इनव्हेस्ट करा ची मागणी ही फ़ार सोज्वळ पडदया आडुन दांभिकतेने होत असते. यात स्वार्थ लपवला जातो निष्ठा आक्रमकतेने आग्रहाने मागितली जाते. मग त्यामागुन त्याखाली अर्थातच त्याग मागितला जातो. जशी कंपनी च्या वरील उदाहरणाच्या बाबतीत निष्ठे च्या मागणी मागील यंत्रणा सहज लक्षात येते तसे इतर निष्ठांच्या मागील शोषण यंत्रणा सहजा सहजी लक्षात येत नाही त्यावर पुरेसा विचार केला जात नाही इतकेच म्हणायचे आहे.

निष्ठावंत जर कुटुंबाप्रती निष्ठावंत असेल तर तो त्याच्या कुटुंबा बाहेर बघत नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या हिताचा स्वार्थ जपण्यासाठी तो इतरांवर अन्याय करण्यास कचरत नाही. इतरांच्या कडे तो एक अंतर राखुन वागतो. राष्ट्र निष्ठ लोक देखील पर्यावरणाचा विचार करतांना केवळ आपल्याच राष्ट्रातील पर्यावरणासंबधी जागरुक राहुन इतर देशांच्या पर्यावरणासंदर्भात मात्र दांभिक भुमिका घेतांना दिसतात. कार्बन क्रेडीट्स संदर्भातील प्रगत देशांचे विकसनशील देशांप्रती असलेले धोरण या संदर्भात महत्वाचे आहे. यात मला असे म्हणावयाचे आहे की निष्ठा कसा संकुचित विचार करण्यास भाग पाडते. यात एकंदरीत पृथ्वीचे पर्यावरण असा विशाल विचार व्हावयास हवा पण तो तसा होत नाही. राष्ट्र निष्ठे च्या संकुचिततेतुन या संकुचित मानसिकतेतुन अशा महत्वाच्या विषया कडे देखील अशा संकुचीत रीतीने बघितले जाते. हेच जर राष्ट्र निष्ठा नसती तर ? मग एकुण पर्यावरण असा विचार झाला असता.

ब्रिटीश जनतेची राणी व राजपरीवारा प्रती असलेली बिनडोक निष्ठा तर कहरच आहे. डायना ने असे कुठले कर्तुत्व गाजवलेले होते ? कुठल्या क्षेत्रात नेमके कुठले असामान्य योगदान दिले होते ? माहीत नाही परंतु तीच्या मृत्युनंतर काय तिचा उदो उदो ब्रिटीश जनतेने मांडला होता. राजपरीवारा कडुन मिळणारया पदव्या सम्मान यासाठी ब्रिटीश माणुस वेडा होत असतो.एल्टन जॉन हा नाइटहुड ला जागुन डायना साठी कॅंडल इन विंड काय बनवतो सगळा मजेदार मामला होता. रश्दींना तर नाइटहुड मिळाल्यावर इतके गहीवरुन आले होते की ब्रिटीश राज च्या वेळच्या राय बहादुरांना ही आले नसेल. त्यासाठी राणी समोर गुडघ्यावर बसायला एका पायावर ( ही पुरस्कार स्वीकारण्याची एक प्रोसीजर आहे ) तयार होतात. त्यांचा लोकांनी निवडलेला पंतप्रधान देखील राणी प्रती आपली निष्ठा जाहीरपणे व्यक्त करत असतो. मागे गल्फ़ कंट्री पैकी एक अशा लहान देशाविषयी (नाव आठवत नाही बहुधा सौदी अरेबीया) एक लेख वाचलेला आठवतोय तिथे एका मोठ्या राजपरीवाराची सत्ता आहे. व मग तेथे मुळ राजपरीवार त्याचे मधले वर्तुळ मग त्याच्या बाहेर त्यांच्या नातेवाइकांचे दुसरे वर्तुळ मग नातेवाइकांच्या नातेवाइकांचे तिसरे वर्तुळ मग त्यांच्या जवळच्या मित्रांचे चौथे अशी अनेक वर्तुळे आहेत. प्रचंड लाळघोटेपणा चालतो. तिथे काहीही व्यवसाय करावयाचा असेल तर वर्तुळाची मर्जी मिळवल्याखेरीज पर्याय नसतो असे काहीसे त्यात वर्णन होते.

निष्ठावंतांचा असा फ़ायदा होत असतो. निष्ठावंत हे अनेकदा गुणवंतां पेक्षा अधिक पगारवाढ अधिक संधी सुविधा मिळवत असतात. निष्ठे चा हा आणखी सर्वात मोठा दुष्परीणाम असतो. चमच्यांना लाळघोटेपणा करणारया कर्तुत्वहीनांना तुलनेने अधिक कर्तुत्व असलेल्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी निष्ठा अनेकदा उपयोगी पडत असते. कार्यालयीन कामात हा अनेकांचा अनुभव असावा. माणसाच्या गुणवंत असण्यापेक्षा त्याचे निष्ठावंत असणे हेच कधी कधी अतिशय महत्वाचे बनवुन टाकण्यात येते. याचा गुणवंतांना फ़ार जाच होतो. व नालायक माणसे यामुळे कधी कधी महत्वाच्या पदांवर केवळ निष्ठेची शिडी वापरुन चढुन जाउन बसतात.

निष्ठे च्या बंधनातच निष्ठावंत धन्यता मानु लागतो ही पतनाची सर्वात शेवटची पायरी असते.अस असत बघा की गुलामीच्या तीन पातळी असतात पहील्या पातळीवर गुलाम बंडखोरी करत असतो जिवाच्या कराराने झगडतो उठाव करतो क्रांती करतो. दुसरया पातळीवर गुलाम परीस्थीतीच्या दबावापुढे झुकतो त्याला गप्प बसावे लागते. परंतु तो आतल्या आत खदखदत असतो. त्याच्या मनातील गुलामी चा विरोध जिवंत असतो. तो फ़क्त संधी ची वाट पाहत असतो. तिसरी पातळी मात्र गुलामाच्या मनातील बंडखोरीची आस पुर्ण संपवुन टाकत असते. व बंडखोरीची स्वातंत्र्याची आस जाउन तीच्या जागी एक अशी लाचारी निर्माण होते की गुलामाला बंधनातच सुख वाटु लागते. तो बंधनातच धन्यता मानु लागतो त्यालाच आपले प्राक्तन समजुन घेतो. उदा. हींदी सिनेमातील हे गीत बघा यातील या स्त्रीच्या भावना बघा रजनीगंधा फ़ुल तुम्हारे महके यु ही जीवन मे, यु ही महके प्रित पिया की मेरे अनुरागी मन मे. पुढे ती व्हिस्परींग टोन मध्ये ( कमाल प्रभाव गाठण्यासाठी व्हिस्परींग टोन वापरणे एक जुनी मजेदार ट्रीक आहे ) तर ती म्हणते कीतना सुख है बंधन मे ! वरील विवेचन व उदाहरण ने इतकच म्हणायच आहे की निष्ठे चा अतिरेक झाल्यावर ( परस्पर संबधात) निष्ठावंताची मानसिकता या प्रकारची ची होत असते. निष्ठावंताना आपल्या बंधनातच सुख वाटु लागत. त्यातच ते धन्यता मानु लागतात.

तर मला स्वत: ला निष्ठा या मुल्याविषयी असे वाटते. हे माझे मत वा विचार आहे. हेच निष्ठे विषयीचे अंतिम सत्य आहे असा काही दावा नाही. हे माझे आजपर्यंतचे आकलन आहे इतकेच. निष्ठा या मुल्याची चिकीत्सा व्हावी यावर मंथन व्हावे असे जरुर वाटते. या संदर्भात जाणकार अनुभवी व्यक्ती कसा विचार करतात या कडे ते कसे बघतात हे जाणुन घ्यायला मनापासुन आवडेल. कारण या पलीकडे देखील निष्ठा या मुल्याची काही बाजु असु शकते जी कदाचित मला जाणवलेली नसेल ही. मला उत्सुकता आहे की निष्ठे ची कुठली बाजु सकारात्मक असु शकते ? उदा. माझे हिंदी सिनेमातील एक आवडते गाणे आहे. त्यात कवि ( याला गीतकार म्हणवत नाही) असा ही सल्ला देतो की
गरजपरस्त जहॉ मे वफ़ॉ तलाश ना कर
ये शै बनी है कीसी दुसरे जहॉ के लीये.
ही कुठली वफ़ॉ आहे आणि कुठल्या जगा साठी ती बनलेली आहे मला तरी माहीत नाही. तुम्हाला माहीत आहे का ?

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

13 Oct 2014 - 12:09 pm | प्रसाद१९७१

वो नही जानते की वफ़ॉ क्या है ?

हे "प्रश्नचिन्ह" इथे नको आहे. हा प्रश्न नाही तर statement आहे.

प्रसाद१९७१'s picture

13 Oct 2014 - 12:10 pm | प्रसाद१९७१

राजकीय निष्ठा- राजकीय नेता वा पक्ष या प्रति असलेल्या निष्ठा बघा. औरंगाबाद च्या सभेत कुमारवयीन नेते आदित्य ठाकरेंचे चरणस्पर्श करुन ठाकरे घराण्याप्रति आपली निष्ठा व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते खासदार खैरे

ह्याला "निष्ठा" म्हणत नाही हो. हा फक्त उघडा नागडा "स्वार्थ" आहे.

मागे आपण राष्ट्रवाद यावर लिहिलं होतंत. आज निष्ठा. मला आश्चर्य वाटतं की ह्याच दोन शब्दांनी मलाही कायम कोड्यात टाकलेलं आहे. माझ्याप्रमाणेच कोड्यात पडलेले कुणी आहे-(किंवा नाही- आपण आपल्यापुरतं कोडं सोडवलेलं दिसतंय) हे कळल्यावर नाही म्हणलं तरी जरा बरं वाटलं.

निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे.

पण आपले निष्कर्श मी मान्य करू शकत नाही. निदान ज्या पद्धतीने आपण मांडला आहे, त्या पद्धतीने तरी!

अति सर्वत्र वर्जयेत. अतिरेक हा नेहेमीच वाइट. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती नकोशी होते, म्हणजे मुळात ती गोष्टच नकोशी होते असे आपले म्हणणे आहे का? कारण आपण जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व अतिरेकी पद्धतीची आहेत. आपण स्वतःही अतिरेकी निष्ठा असे शब्द वर वापरलेले आहेत.

बंधनाबद्द्लही तेच. अतिरेकी बंधनं वाइट. आता एखादा म्हणेल की रस्त्याच्या डाव्याच बाजुने गाडी चालवायचं तरी बंधन कशाला हवं, मग?

मुळात बंधनं पाळणारे हे जनसामान्य असतात. असामान्य क्षमतेचे लोक वेळीच सर्व बंधनं ओळखून त्यांना पार करायला बघतात, त्यामुळेच तर ती असामान्य होतात.

आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.

आनन्दा's picture

13 Oct 2014 - 6:59 pm | आनन्दा

आपले सर्व आक्षेप हे ह्या गोष्टींच्या अतिरेकाविरुद्धचे दिसताहेत. त्यामुळे आपला लेख मुलभूत होऊ शकलेला नाही. मुळात आपण निष्कर्श सुरुवातीस मांडल्यामुळे असं वाटत रहातं की आपण हे सर्व गृहित धरून त्याला साजेशी उदाहरणे शोधत आहात, किंवा पूर्वग्रहदुषित आहात. तसे आपण आहात की नाहीत हे आपणच चांगले ठरवू शकता, पण असं वाटतं हे मात्र खरं.

त्यांनी आपली निष्ठा निष्ठेच्या विरुद्ध वाहिली आहे असे दिसतेय..

मी निष्कर्श अगोदर मांडले व नंतर उदाहरणे दिली म्हणुन माझ्या विचारांचा आरंभ हा पुर्वनिश्चीत निष्कर्शांपासुन होत आहे अस जर आपल्याला वाटत असेल तर ते तसे वाटण्यात गैर नाही. कारण मी लेखाची एक गरज एक रीत म्हणुन असे ठरवले की अगोदर सुत्र मांडतो मग उदाहरण. पण मी आपल्यास खात्रीने सांगु शकतो की जरी असे लेखात असले तरी प्रत्यक्षात तसा क्रम नाही. तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते. आणि व्याकुळता वाईट च का मानावी नेहमी. उलट आत्मसंतुष्टी ची भिती वाटावयास हवी.
अस आहे बघा अकाउंट चा एक नियम सांगतो नॉमिनल अकाउंटचा की डेबीट द एक्सपेन्सेस अ‍ॅंड लॉसेस क्रेडीट द इनकम अ‍ॅन्ड गेन्स. पण जीवनावर हा नियम लाउन बघितला तर काय दिसते ?
डेबीट प्रत्येक डेबीट प्रत्येक केलेला खर्च आपल्याला आनंद च देत नाही का ? सिनेमा बघण्यासाठी , कार घेण्यासाठी, हॉटॅल मध्ये खाण्यासाठी केलेला प्रत्येक डेबीट हा आपला खर पाहता गेन च नसतो का आनंदाचा गेन नाही होत का ?
मग हट्टाने आपण अकाउंटचाच नियम जिवनाला लाउ लागलो तर तो वर्क करत नाही त्यात एरर येते.
तसे आपल्या प्रोग्र्मिंग मधील एरर काढणे शोधणे आपले कर्तव्य नाही का ?
आपली मुल्ये आपली विचारसरणी तपासणे हे व्याकुळतेच्या च प्रेरणेने घडुन येत असते ना ?
त्यात काय कचरायचे भिडायला हव आपण जे काय संचित ताकत आहे आपल्या कडे त्याच्या सहाय्याने
मी असा विचार करतो आपल्याला काय वाटते ?

संचित's picture

14 Oct 2014 - 7:11 pm | संचित

हल्लीच्या काळात पक्षाशी निष्ठा नसलेल्याचा शशी थरूर होतो. :)

आपण वर जे काही लिहिले आहे ते आणि माझा प्रतिसाद याचा एकमेकांशी काय संबंध आहे? लिहिण्यातला 'नेमकेपणा' या मुल्याविषयी आपले काय मत आहे? तेही बंधनकारक आणि सर्जनशीलतेला जखडणारे नकारात्मक मुल्य आहे का?

माझे असे म्हणणे आहे, की निष्ठा योग्य की अयोग्य हा विचार करण्यासारखा विषय आहेच! पण त्यासाठी केवळ अतिरेकी उदाहरणे देऊन या विषयाचा निकाल लावता येणार नाही. सर्व प्रकारची उदाहरणे घ्यावी लागतील. खाली संक्षी सर म्हणतात तसे, जर बंधन नसेल तर कुणाचा पायपोस कुणाच्या पायात रहाणार नाही. त्यामुळे बंधन आवश्यक तर आहेच. तसेच निष्ठाही आवश्यक आहे. प्रगतीसाठी संस्था जर आवश्यक असतील, आणि जर संस्थेतल्या प्रत्येकामध्ये संस्थेबद्द्ल निष्ठेचा अभाव असेल, तर अशी संस्था कुठल्या दिशेने जात असेल? एकंदरीत समाजाची अशा वेळी प्रगती होत असेल की अधोगती?

आपली उदाहरणे अतिरेकी नसून सर्वसमावेशक आहेत असे आपल्याला वाटते का?

वर आपल्या प्रतिसादात एक वाक्य आहे-

तुमच्या मांडणीत एक व्याकुळता जाणवते की कशातच निष्ठा नाही ठेवायची तर मग कसे चालेल? पण मला त्या अगोदर त्याची त्या मुल्याची तपासणी होणे अगत्याचे वाटते.

(ते व्याकुळता वगैरे जाऊ दे. तो मुद्दा नाहीये.) माझ्या प्रतिसादात मी पण हेच तर म्हणतोय.-

निष्ठा हा शब्द विचार करण्यासारखा आहे, यात आपले आणि माझे एकमत. शिवाय प्रत्येक गोष्ट विचार करून पारखून घ्यावी यावर आपल्याप्रमाणेच माझीही निष्ठा आहे.

म्हणजे इथे खरं तर आपले एकमत होत आहे, पण आपला सूर असा आहे की आपण मला विरोध करत आहात. तसे नको साहेब. मी या विषयावर विचार करायला तयार आहे. फक्त आपण थोडे मुद्देसूपणे पुढे या.

संजय क्षीरसागर's picture

14 Oct 2014 - 12:44 am | संजय क्षीरसागर

निष्ठा चा साधा अर्थ कमीटमंट असा आहे. कमीटमंट हे एका अर्थानं बंधन आहे आणि त्यामुळे विकल्पावर बंधनं येतात हे नक्की.

पण निष्ठेशिवाय (प्रथम चरणात), `मानसिक एकसंधता' असंभव आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते, लग्नात एका व्यक्तीशी एकनिष्ठ राहिले नाही, तर त्या नात्याला अर्थच उरत नाही.

जसजशी प्रगल्भता वाढते तशी निष्ठा (पत्नीचा अपवाद वगळता) १८० अंशाचं वळण घेते. व्यक्ती स्वतःशी एकनिष्ठ होते. याचा अर्थ ती एककल्ली होते असा नाही, तर `स्वतःच्या विचाराप्रती प्रामाणिक राहून' इतर विकल्पांच्या संभावनांचा वेध घेते.

उदाहरणार्थ, एकदा गाणं आत्मसात झाल्यावर(च) व्यक्ती, इतर घराणी किंवा दिग्गजांच्या गायकीचा वेध घेऊ शकते आणि जेजे भावेल ते स्वतःच्या गायकीत समाविष्ट करुन घेऊ शकते. याचा अर्थ ती स्वत:च्या गुरुला डावलते असा नाही तर, व्यक्तीपेक्षा सुद्धा `गायकी' महत्त्वाची होते. आणि अशी व्यक्तीच संगीताला नवं परिमाण देऊ शकते.

आध्यात्मात तर याही पेक्षा अलौकिक प्रकार घडतो. एकदा सत्य गवसल्यावर मूळ गुरुप्रती कृतज्ञता तर दृढ होतेच (कारण गुरुमुळेच तर उलगडा झालेला असतो), पण इतर ज्ञानीपुरुष देखिल तेच सत्य किती विविधांगांनी मांडतायंत याची प्रचिती येते.

ओशो म्हणतात, `ग्रंथ पढनेका असली मजा तो, सत्य समझनेके बाद ही आता है! जैसे की एक दिया हो और उसे रंगबिरंगे कागज़ोंमे लिपटा हो. उजाला तो एक ही है, लेकिन हर ग्यानीका उसे जतानेका अंदाज़ अलग अलग है'|

थोडक्यात, सुरुवात निष्ठेनं होते (कारण निष्ठेशिवाय दिशा नाही) आणि मग तिचं रुपांतर सर्वसमावशकतेत होतं.

मात्र निष्ठा हा जर प्रेस्टीज पॉइंट झाला तर (तुम्ही म्हटल्याप्रमाणे) ती, व्यक्तीच्या संभावना संपवते.
_____________________________

तुमच्या मांडणीच्या बाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते. `बेअर फॅक्ट्स' प्रती निष्ठेला दुसरा पर्याय नाही.

उदाहरणार्थ, अकौंटींगचे तीन नियम. हे नियम लावल्याशिवाय अकौंटींग होणंच असंभव आहे. ते नियम रोजच्या जगण्याला जसेच्यातसे लावता येत नाहीत कारण ते जगण्याचे नियम नाहीत, `अकौंटींग' या शास्त्राचे आहेत.

ग़ालिबच्या या ओळी : हमको उनसे वफ़ाकी है उम्मीद, जो नही जानते वफा़ क्या है, प्रेयसीच्या संदर्भात आहेत. आणि प्रेयसी, प्रियकराला `हो' म्हणत नाही, त्याला (इतरांबरोबर) झुलवत ठेवते हाच तर उर्दू शायरीचा प्राण आहे. जर ती एकाच प्रियकराशी राजी झाली तर त्यांचं लग्न होईल आणि शायरी संपेल!

या उलट पती-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ नसले तर विवाहच टिकणार नाही. आपत्य नक्की कुणाची? हा बेसिक प्रश्न निर्माण होउन आणि कुटुंबसंस्थेचा बाजा वाजेल. जगात अनौरस आपत्यांचं काहूर माजेल.

थोडक्यात, निष्ठेला निश्चित मूल्य आहे. जीवनाच्या विविध डायमेन्शन्समधे ते कसं वापरायचं हा व्यक्तीगत प्रगल्भतेचा भाग आहे.

मारवा's picture

15 Oct 2014 - 12:36 am | मारवा

उदाहरणार्थ, कोणत्याही कलेत किंवा आध्यात्मात सुरुवात एकाच गुरु पासून करावी लागते,
अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ? समजा एक नविन वाद्य आहे जसे मोहनवीणा जिचा शोध विश्वमोहन भट्ट यांनी लावला किंवा सितार जिचा शोध वा निर्मीती अमिर खुसरो ने केली.. कींवा नोएटीक्स ही नवी कोरी शास्त्र शाखा. असे असेल तर अमिर खुसरो ला गुरु ची गरज लागेल का ? कुठे ना कुठे प्रत्येक शाखेची शास्त्राची कधी ना कधी कोणी ना कोणी इंडीव्हीज्युअल च सुरुवात करत असतो. त्यातील एक एक माइलस्टोन्स ही एक एक च माणुस ठेवत असतो.
म्हणजे थोडा व्यावहारीक फायदा आहे. एक एक शाखा विकसीत होत होत अनेक वर्षांचा शतकाचा कालावधी जाउ शकतो मग मोठा डेटा मोठ स्कील प्रोसिजर्स विकसीत होतात. एक एक्सपर्ट असेल गुरु असेल तर तो गाईड तुमची बरीच एनर्जी वेळ वाचवुन तुम्हाला नेमक काय हव देउ शकतो. मात्र हा व्यावहारीक भाग झाला, गुरु असावाच अशी गरज मुलभुत आहे का? जे जे नविन निर्माण वा शोध केला जातो त्यात जिथे प्युअर निर्मीती असते तिथे गुरु काय शिकविणार ? त़्ंत्र फार तर. हा एक भाग
दुसरा मुद्दा असा की ठीक आहे व्यावहारीक बाबींसाठी गुरु केला तर मात्र जिथे स्टेक्स अधिक मोठे आहेत अशा जिवनाच्या आकलनासाठी तात्विक शोधासाठी श्रेयस शोधण्यासाठी गुरु करण योग्य आहे का ? नाही इथे तुम्हाला स्वतःच शोध घेण आवश्यक आहे. ठेचकाळत पडत धडत का होइना तुम्हाला इथे उधार कस काय कामात येईल तुमचा क्रुस तुम्हाला वाहण भाग आहे. रेडीमेड उत्तरे मिळतील पण ती तुमची आंतरीक तहान कशी शमवणार ?
अजुन एक जर तुम्ही अगोदरच कनफ्युज्ड आहात अगोदरच विचलीत आहात तर तुम्ही योग्य गुरु कसा शोधु शकणार ? तुमचि निवड ही चुकीची च असणार नाही का ? तुम्ही तुम्हाला हवा असलेला दिलासा च नाही का शोधणार ?
आणि ते संबंध तुमच्यात कसे असतील सहज संबध असु शकतात ? म्हणजे असे की उदा. तुम्ही एका नविन शहरात गेलात एखाद्या रस्त्याने जात असलेल्या स्थानिक माणसाला तुम्ही रस्ता विचारला अगदी सहज त्याने ही तुम्हाला अगदी सहज पटकन उत्तर दिले की असे असे जा. तुम्ही त्याला धन्यवाद देता तो हसुन मागे न बघता पुढे निघुन जातो. यात त्याने तुम्हाला मार्गदर्शन केलेले असते. तुम्हाला माहीत नसलेला रस्ता दाखवुन तो निघुन जातो. तुम्ही त्याच्या विषयी व तो तुमच्याविषयी कुठलाही विचार तरंग ही माग न ठेवता आपापल्या रस्त्याला लागतात.
आता इथे गोष्ट साधी होती शिकण्याची पण जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ? घडु शकते का इतका सहज गुरु आणि शिष्य (गंडा आदि काही च न बांधता एकमेकाशी रीलेट होउ शकतात का ?)]
स्व-शोधा त गैर काय ? तुम्ही ज्या ओशों ना कोट केल त्यांनी तर कोणताही प्रचलित गुरु केला नाही. प्रत्येक बाब स्वतः तपासुन बघितली कुठलीही श्रद्दा ब्लाइंडली स्वीकारली नाही. आयुष्यभर एक्सपेरीमेंटल असे ते राहीले.
बुद्ध स्वतः ६ वर्षे शोध घेत होते. जे जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले किंव नवनिर्मीती केली.
खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ?
सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?

पैसा's picture

15 Oct 2014 - 9:38 am | पैसा

गेल्या काही दिवसांत तुमचे प्रतिसाद वाचते आहे. ग्रेस, कविता, दुर्बोधता या निमिताने आणि इथेही आलेले. चांगलं लिहिताय. अनेक गोष्टीत मूलभूत विचार करताय हे जाणवलं. छान! मात्र शक्य झालं तर लिखाणात जरा सोपेपणा आणि सुसूत्रता आणता आली तर बघा. म्हणजे तुम्ही काय म्हणताय त्याचा विपर्यास होणार नाही. पूर्वीच्या काही धाग्यांवर असं झालं असावं असं आता विचार केल्यावर वाटतंय.

आपल्या सुचना पुर्णपणे पटल्या मला असेच आणखी काही जणांकडुन सुचवण्यात आले. सुसुत्रता साधण्याचा प्रयत्न करतो.
मार्मिक सुचनेसाठी मनापासुन धन्यवाद !

प्रसाद१९७१'s picture

15 Oct 2014 - 10:03 am | प्रसाद१९७१

सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?

अंतिम उत्तर वगैरे भंपक पणा आहे. मिळालेले उत्त्तर अंतिम आहे का नाही हे कोण ठरवणार?

@ मारवा - तुम्ही भारंभार लिहीत आहात पण एक तर त्यात नुस्ताच पसारा आणि शब्दांचा फुलोरा आहे. नक्की काय म्हणायचे आहे ते कळतच नाही. पुन्हा इतके मोठे लिहुन त्यात प्रश्नच आहेत, तुमचे मत काय ते सांगा.

जे महान पुरुष होउन गेले त्यांनी स्व-शोध स्व्-संघर्ष स्व्-अनुभवाने सत्य शोधले

सत्य शोधले म्हणजे काय? का त्यांना जे पटले त्याला त्यांनी सत्य म्हणले? तेच सत्य होते कशावरुन?

फारच सरधोपट विचार करत आहात.

प्रसाद१९७१'s picture

15 Oct 2014 - 10:10 am | प्रसाद१९७१

वो नही जानते की वफ़ॉ क्या है ?

ह्या ओळी मधला प्रश्नचिन्ह काढुन टाका हो, तो चुकीचा.

प्रसाद भाउ
तुझ म्हणण शंभर टक्के मान्य आहे बाबा. ते स्टेटमेंटच आहे यात शंकाच नाही. माझा मुद्दा ठसवण्यासाठी सहज थोड मॅनिप्युलेट करुन तो शेर वापरला इतकच. ( मला थोड टायटल भडक करायची खोड च आहे रे काय करु पण याने मी नेहमीच अडचणीत येतो तरी जित्याची खोड काही जात नाही )
तु म्हणतोस तस ते खुपतय हे ही खरय
पण मिसळ पाव वर एकदा लिहीलेल संपादीत कस कराव मला खरच माही नाही.
तरी संपादकांना नम्र विनंती करतो की तो प्रश्नचिन्ह काढुन टाकावा म्हणजे माझ्या ही डोक्यावरच ओझ उतरेल
प्रसाद भाउ आता तुम्ही आणि संपादक काय ते बघुन घ्या बर
तु

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2014 - 1:12 pm | संजय क्षीरसागर

अध्यात्मात किंवा कलेत गुरु ची गरज का लागावी. किंवा कोणत्याही गोष्टी त ?

याचं साधं कारण असं की कुणी तरी आधीच बेसिक गोष्टी शोधून ठेवल्यात आणि त्या वर्षानुवर्ष वेरिफाय झाल्यात. तस्मात, पुन्हा त्याच गोष्टी शोधण्यात साधकाचा (किंवा कलाकाराचे) वेळ आणि श्रम वाया जात नाहीत. उदाहरणार्थ, स्वर आणि त्यांचं माधुर्य, त्यांचे एकमेकांशी मेळ यावर आधीच मेहेनत घेतली आहे.

शरीरशास्त्राचा आधीच प्रगाढ आभ्यास झालायं, आता पुन्हा नव्यानं बेसिक्स करण्यात अर्थ नाही.

तस्मात, प्रथम चरणात गुरु आणि त्याप्रती निष्ठा अनिवार्य आहेत.

_________________________

दुसरी गोष्ट, गुरुची निवड जो तो त्याच्या कुवतीनुसार करणार हे उघड आहे. पण मुळातच समज कमी असेल (तुम्ही म्हणता तशी कन्फ्युज्ड व्यक्ती असेल) तर अदरवाइज सुद्धा तिच्याकडून काही अलौकिक होण्याची शक्यता नाही.

सो स्टेबिलिटी इज प्रायमरी. तिचा आणि `गुरु न करण्याचा' संबंध नाही.

____________________________

जर स्टेक्स मोठे आले आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्वपुर्ण बाब शिकायची आहे इ. इ. मग वरील प्रमाणे सर्व घडेल का ?

अर्थात. सर्वात ज्यास्त स्टेक्स आध्यात्मात आहेत आणि तिथे गुरुची निवड निर्णायक ठरते.

ओशोंनी रुढार्थानं गुरु केला नाही असं जरी असलं तरी त्यांचं वाचन अफाट होतं. आज सुद्धा आश्रमात त्यांनी वाचलेली सुमारे एक-दीड लाख पुस्तकं, त्यांच्या समाधीच्या पूर्वकक्षात जतन करुन ठेवली आहेत. ते ग्रंथच त्यांचे गुरु ठरले आहेत.

ओशोंचा (आणि त्यांच्या साधनांचा) तर मी इतका सखोल आभ्यास केलायं (जवळजवळ सलग सहा वर्ष) की त्यांचं एकही पुस्तक वाचायचं राहिलेलं नाही. शिवाय खुद्द कम्युनची माझ्याकडे लाईफ मेंमबरशिप आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती इतक्या व्यासंगानं आणि अनेकविध विषयांवर भाष्य `स्वतःच्या प्रयत्नांनी' करणं अशक्य आहे हे सिद्ध झालंय.
_____________________________

स्व-शोधा त गैर काय ?.....खरच कोणी कोणाला काहीही शिकवु शकतो का ?

तुम्हाला म्हणायचंय, सगळं (पहिल्यापासनं) स्वतःच शोधण्यात काय गैर आहे? याविषयी सुरुवातीला सांगितलंय.

__________________________________

सर्व च प्रश्नांची उत्तरे अंतिम मिळालीच पाहीजे असा अट्टहास ही का असावा ?

हा प्रश्न कुठे आहे?

आवडीच्या विषयाचा व्यासंग करता यावा, त्यासाठी गुरु असावा, आणि गुरुप्रती निष्ठा असावी. एकदा विषयात पारंगत झालो की नवनिर्मितीची संभावना निर्माण होते,

मारवा's picture

15 Oct 2014 - 12:50 am | मारवा

He who is in the grip of doubt and meaninglessness can not liberate himself from this grip;
But he asks for an answer which is valid within it and not outside the situation of his despair.
He asks for an ultimate foundation. of what we have called the
"Courage of Despair "