आज एका जामीनासाठी कोर्टात जायचा योग आला. ४९८ ची केस होती. आई, वडील, दोन भाउ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन अशी चार मुले, (वय वर्ष १० ते १) चार जामीनदार, दोन वकील असा गोतावळा घेउन आरोपींसह आम्ही कोर्टाच्या आवारात सकाळी बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला पोहोचलो. त्या कुटुंबापैकी एक कोर्टातच नोकरीला असल्याने तशी काळजी फारशी नव्ह्ती. तालुक्याचे कोर्ट असल्याने सगळा खेड्यातील लोकांचा गलबला सुरु झालेला. बिलीफने पुकारा सुरु केला. आमचे चार्जशीट अजुन आले नसल्याने तपास अधिकार्याला फोन केला. त्याने पोलिस स्टेशनवरुनच सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन येत आहे असे सांगितले. आम्ही वाट पाहु लागलो. लोकांचे निरीक्षण करतांना तालुक्याच्या कोर्टातील अनेक नमुने दिसले. एका एस. टी. कर्मचार्याला थोबाडीत मारली म्हणुन आठ वर्षापासुन सुनावणीला आलेला आरोपी व एस. टी. चे कर्मचारी, अधिकारी पाहुन काय म्हणावे तेच समजेना. दुपारी बारा वाजल्यानंतर साहेब चार्जशीट घेउन आले. सहा लोकांना चार्जशीटची प्रत्येकी प्रत न देता एकच प्रत देली. बोटांचे ठसे घेतल्यावर अगदी निर्लज्जपणे प्रत्येकी रु. २००/- ची मागणी केली. कोर्टातील क्लार्क असल्याने त्याने सरळ नकारच दिला. तेव्हा साहेब हक्क असल्याप्रमाणे ओळख दाखवुन मागणी रेटु लागले. शेवटी त्यांच्या भावाने प्रत्येकी रु. १००/- देउन साहेब खुश केला. दोघे भाऊ आपापसात एकमेकांना समजावुन शांत बसले.
हे सगळे करत दुपारचे २ वाजत आले. सकाळीच येतांना पक्षकारांनी सगळ्यांना जेवण दिले होते. अखेरीस ३ वाजेला नावाचा पुकारा झाला व आरोपी कोर्टासमोर हजर झाले. वकीलांनी जामीनासाठी दोन पर्याय तयार ठेवले होते. पहिला म्हणजे जिल्हा न्यायालयाने अटकपुर्व जामीन देतांना प्रत्येकी रु. १५०००/- किंवा समान रकमेचा असा पर्याय दिला असल्याने सर्वांसाठी सोईची म्हणुन सॉल्व्नसी (मराठीत?) रु. २,००,०००/- ची बनवुन घेतली होती. आदल्या दिवशीच न्यायालयाचा अंदाज घेतला असता न्यायाधिश नुकतेच लागलेले असल्याचे समजल्याने जेष्ठ वकीलांनी जामीनदारांना सुध्दा नेण्याचा सल्ला दिला होता. वकीलांनी सॉल्व्नसी न्यायाधिशांसमोर ठेवताच ते म्हणाले अजुन पाच सातबारे कुठे आहेत?
वकील : साहेब सॉल्व्नसी २,००,०००/- ची आहे. सहा जणांचे फक्त ९०,०००/- च होतात.
साहेब : मी अजुन कोणालाही एका सॉल्व्नसी वर सहा जणांना जामीन दिलेला नाही.
वकील : साहेब पण आजपर्यंत आम्हाला अशी अडचण आलेली नाही. (वकील म्हणतो हे एकताच स्टेनो व क्लार्क हसले)
साहेब : बाहेर थांबा. थोड्या वेळाने बोलावतो.
सगळी मंडळी बाहेर येउन चर्चा करु लागली. कोर्टातील आणि नात्यातील संबंधित खात्याच्या लोकांशी बोलल्यावर सॉल्व्नसी चाललीच पाहिजे असा सुर दिसला. १ तासाने सर्व सुनावण्या पुर्ण झाल्यावर बेलिफाचा पुन्हा पुकारा झाला. साहेबांनी वैयक्तीक जाच मुचलक्यावर सोडण्याचे मान्य केले पण सॉल्व्नसी नाकारली. शेवटी वकीलांनी पुढील तारखेला जामीनदार व खातेउतारे हजर करण्याचे कबुल करुन दिवस पास केला.
या सगळ्यात माझ्या मनात काही प्रश्न आले.
१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का?
२. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का?
३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही
हे मान्य करावेच लागले.
४. शासकीय अधिकार्याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट
करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का?
मलातर फार आवश्यक वाटते.
न्यायालयातील एक दिवस
गाभा:
प्रतिक्रिया
24 Sep 2014 - 10:27 pm | एस
मे. कोर्टाचा काहीच अनुभव नाही. पण आपल्याला पडलेले प्रश्न रास्त आहेत...
24 Sep 2014 - 10:54 pm | माम्लेदारचा पन्खा
प्रतीसाद टंकतो निवांतपणे.....
25 Sep 2014 - 10:30 am | सुबोध खरे
१) न्यायालयात निवाडा/ निकाल मिळतो. न्याय मिळतोच असे नाही
२) शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये हे त्रिकाल अबाधित सत्य आहे.
25 Sep 2014 - 11:35 am | देशपांडे विनायक
आता विषय निघालाच आहे तर --
तुम्ही जर न्यायालयात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला
वेळ काढून या कारण तुमचा भविष्य काळातील वेळ सत्कारणी लागण्याची शक्यता तुम्हाला
दिसू लागण्याची शक्यता आहे
न्यायालयात जावेच लागणार असेल तर तेथे जाताना तुमच्या छातीची धडधड थोडी कमी होईल .
असा प्रतिसाद मुद्देसूद नाही हे मला कळतेय पण न्यायालयातील ४० वर्षाचा [ चाळीस वर्षाचा ] अनुभव
लिहिणे या वयात मला नकोसे वाटते . पण बोलण्यास आवडते . खाण्यापिण्यास आवडते .
तेव्हा जरूर या. खातपीत बोलू !!
सांगावयाचे राहिले मी वकील नाही . मी कुणाची वकिलीही करत नाही .
मी लावलेले दावे आणि माझ्यावर लावले गेलेले दावे या करिता गेली ४० वर्षे मी न्यायालयात जात आहे
आता १५ ला जाऊन आलो पुढची तारीख ०८ ऑक्टोबर
25 Sep 2014 - 2:19 pm | कपिलमुनी
लिहा कि एक लेखमाला ..
होउ दे खर्च !
14 Mar 2016 - 4:12 pm | नाखु
होय किमान नवीन लोकांना तरी मार्गदशन होईल
25 Sep 2014 - 12:50 pm | सुहास..
केस काय होती ? आय मीन जामीन कशा बद्दल होता ?
25 Sep 2014 - 5:40 pm | आदूबाळ
असं लिहिलं आहे की त्यांनी.
४९८अ म्हणायचं असावं - कौटुंबिक हिंसाचार.
४९८ "विवाहित स्त्रीला फूस लावून पळवून नेणे" असा काहीसा आहे.
25 Sep 2014 - 3:49 pm | माम्लेदारचा पन्खा
१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का?
सहसा पोलिसांना सणासुदीच्या काळात (आणि सध्या तर कुठल्या न कुठल्या तणावामुळे नेहमीच ) इतर बंदोबस्ताची कामे खूप असतात. त्यांना तिथेही सवलत मिळत नाही. त्यामुळे तिथले कर्तव्य बजावणे महत्वाचे असते.
२. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का?
जामिनाचे विविध असले तरी न्यायाधीशांना समोर असलेल्या परिस्थितीनुसार जामीन ठरवावा लागतो. एखाद्या माणसाने अगोदर कुणाला जामीन दिलेला असल्यास त्याला परत कुणालाही जामीन राहता येत नाही. ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट) हा सोपा उपाय आहे कारण त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ते मिळत नाही.
३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही
हे मान्य करावेच लागले.
हे खरे आहे कारण त्या कोर्टात जोपर्यंत तो न्यायाधीश असतो तोपर्यंत तो त्याला दिलेल्या कायदेशीर सवलतीनुसार त्या कोर्टाचे कामकाज चालवत असतो. मी कित्येक न्यायाधीश असे पाहिलेले आहेत कि जे सकाळी ११ वाजता न्यायासनावर बसून दिवसभराचा बोर्ड तारखा देऊन संपवतात आणि उठून जातात कारण कुठल्यातरी महत्वाच्या केसचे निकाल अथवा अभ्यास करायचा असतो. कोर्टातल्या इतर कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांच्या कार्यपद्धीतीशी जुळवून घेत घेत नाकी नऊ येतात.
४. शासकीय अधिकार्याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट
करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का?
शासकीय अधिकारी तसेच न्यायाधीश ह्यांना रोज त्यांच्या कार्यपद्धतीचा खुलासा अथवा अर्थ सांगणे बंधनकारक नसते तथापि दरवर्षी त्यांचे गोपनीय अहवाल त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकार्यांकडे जातात. ते खराब होऊ नयेत म्हणून ही सर्व मंडळी जीवाचा प्रचंड आटापिटा करत असतात. हलीच आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यान्वये बरीचशी माहिती सामान्य माणसालाही मिळू शकते मात्र त्यासाठी खर्च करावा लागतो.
अवांतर : जामीन देताना अत्यंत सावध राहा कारण त्या माणसाला गरज पडल्यावर कोर्टात सादर करण्याची हमी तुम्ही कोर्टाला देत असता. त्यामुळे विश्वासू माणसाव्यतिरिक्त शक्यतो कोणालाही जामीन राहू नये.
26 Sep 2014 - 6:11 pm | सवंगडी
लई माहिती हाय ओ तुम्हाला !
नक्की तुम्ही कोणत्या माम्लेदाराचा पंखा हो ? मामलेदार मिसळ कि खरा मामलेदार?
26 Sep 2014 - 11:07 pm | माम्लेदारचा पन्खा
काय बाय ऐकाया येतं त्येच सांगतुया....
25 Sep 2014 - 4:08 pm | मदनबाण
अरे वा... वेगळेच अनुभव वाचावयास मिळत आहेत...
बाकी उगाच मला Jolly LLB मधला एक सीन आठवला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!
25 Sep 2014 - 9:34 pm | जानु
श्री. मा. प. - त्या दिवशी कोणताही सण नव्हता. आणि साहेबांना त्या दिवशी एक साक्षही द्यायची होती.
एकदा पुकारा ही झाला होता. एकाच गुन्ह्यात २-३ किंवा अधिक आरोपी असतील तर ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट)चालते असे मत क्लार्क ते दुसरे जज्ज सगळ्यांचे होते.
25 Sep 2014 - 10:16 pm | माम्लेदारचा पन्खा
खास दोस्त असतात.... त्यांच्यात चालतं असं....
वैयक्तीक जातमुचलका हा शक्यतो त्यांच्यासाठी असतो ज्यांना जामीनदार मिळत नाहीत.
25 Sep 2014 - 11:12 pm | जानु
श्री. मा.प. आपण अवांतर केलेली सुचना नक्कीच लक्षात ठेवणार.
23 May 2015 - 11:16 pm | शि बि आय
आहो ... मामलेदारचा पंखा
लय माहित हाये कि राव तुम्हाला… नक्की तुम्ही कोन म्हनायचं नुसतं मामलेदारचा पंखा की आजून कुनी ??
झ्याक सल्ले देता राव… बेश्ट हाय