एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.
अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.
अशा ष्टोर्या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.
दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)
एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
प्रतिक्रिया
15 Sep 2014 - 6:12 pm | काळा पहाड
खिक. जीभौंची कीर्तने कशावर असतील हा विचार केलाय का? बाकी भिकार्यांच्या टोळीसाठी लिस्ट बनवा.
3 Sep 2014 - 6:40 pm | रेवती
बाळासाहेब सप्रे यांच्याशी सहमत. कोपरा बळकावून सुरुवात करावी. हळूहळू आजूबाजूची जागा ताब्यात येते, व्यवसायास तेजी येते हे ठीक आहे पण त्याचबरोबर नारळ हार, पेपरवाले, टपरीवाले, वडपावची हातगाडी, इस्त्रीचे दुकान यांन्ला जागा देऊन हप्त्याबरोबर स्वस्तात कपडे इस्त्री करून मिळणे, भूकेला (कोंडा नाही)वडापाव , चहा मिळणे, रोजचे वर्मानपत्र फुकट मिळणे, स्वयंपाकास नारळ मिळणे या गोष्टी करता येतात. त्यांना कमी लेखू नये. रोजचे लैफ पण सोप्पे झाले पायजे राव!
4 Sep 2014 - 3:41 pm | शिद
मंदिरासाठी ह्व्या असलेल्या जागेचा प्रश्न सुटला.
हि आजची म.टा.ची बातमी - धार्मिक संस्थांना भाडेतत्त्वावर प्लॉट
विचार कराच आता मंदिर बांधण्याचा. ;)
5 Sep 2014 - 2:01 am | भाते
काढा रे सगळ्यांनी ५०-५० रुपये. मस्त कट्टा करू, मिसळपाव खात खात पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवू. हाकानाका.
14 Sep 2014 - 8:11 pm | रेवती
हा धागा आठवण्याचे कारण काल घडले. स्वाध्याय परिवारवाले (३ भारतीय) न सांगता सवरता धाड टाकल्यासारखे घरात घुसले. आम्ही प्रचाराला आलो नाहीये म्हणत म्हणत पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या रोह्याच्या कामापासून सुरुवात केली. १० मिनिटे झाल्यावर मी शांतपणे आम्ही इंटरेस्टेड नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी "नाही नाही, तुम्ही फक्त ऐकून घ्या" म्हणाले. मग मी २ मिनिटात उठले तिघांना पाणी दिले आणि नवर्याला सांगितले की तू बैस. त्यातील बाईंकडे बघून सांगितले की मुलाला क्लासहून आणण्याची वेळ झालीये, मी निघते. भयंकर वात आणलाय या स्वध्याय परिवार, सत्यसाई, सामीनायणवाल्यांनी. या लोकांना एकदम घरात घेतल्याचा गैरफायदा घेतला त्यांनी. एकतर भारतीय, सभ्य लोक्स दिसले म्हणून विश्वास ठेवला तिथेच चुकले. मला वाटले शेजारचे घर विकायला काढल्याने ओपन हाऊससाठी काही लोक येऊन जातायत त्यातील असतील व आजूबाजूच्या परिसराची, टाऊन, शाळा याबद्दलची चौकशी करण्यास आले असावेत. आता जेन्युईन लोकांवरही विश्वास ठेवला जाणार नाही.
14 Sep 2014 - 9:52 pm | कवितानागेश
त्यांना विचारायचं आधीच, 'तुम्ही रंजल्यागांजल्यांसाठी समाजसेवा करता का?' हो म्हणाल्यावर त्यातल्या एकाना मुलाला आणायला पाठवायचं. एकाला भाजीला आणि एकाला स्वैपाकघरात घ्यायचं हाताशी. कामं करताकरता बोलू म्हणायचं.. ;)
एकदम घरात घुसले, तर घरच्यासारखंच वागवायचं.
14 Sep 2014 - 9:58 pm | टवाळ कार्टा
=))
14 Sep 2014 - 10:35 pm | एस
_/\_
15 Sep 2014 - 2:19 am | रेवती
महान उपाय. बघता बघता इथं इतके लायक मिपाकर दिसतायत. आपला मंदिर प्रोजेक्ट यशस्वी होणारच्च!
15 Sep 2014 - 1:54 pm | कपिलमुनी
पुढच्या वेळेस उपाय अंमलात आणला जाईल..
घरी सांगून शेपू , मेथी निवडून घेतो अशा माणसांकडून
15 Sep 2014 - 5:15 pm | समीरसूर
'स्वाध्याय', 'ब्रह्मकुमारीज', 'सहजयोग', 'अम्मा भगवान'...काही विचारू नका. अम्मा भगवान यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलात आणि तुमचं काम फत्ते होणार असेल तर त्यांच्या जमिनीवरच्या पादुका आपोआप सरकतात म्हणे. रु. २०००० एवढी फी आहे त्यांच्या पुजेची. दोघे नवरा-बायको टेचात एका सिंहासनावर बसून मनमुराद सेवा करून घेत असतात.
आमच्या इमारतीमधले एक आजोबा आम्हाला आमच्या घराजवळच असलेल्या एका आश्रमात येण्याचा खूप आग्रह करतात. बहुधा निर्मलादेवींचा तो आश्रम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दर्शनाने सगळ्या समस्या सुटतात. मी नेहमी टाळतो. सरळ "माझा विश्वास नाही असल्या थोतांडावर" असं त्यांना सांगून त्यांना दुखवायचं जीवावर येतं. आजकाल कुणाला कशाचा कसा किती राग येईल भरवसा नाही.
(माझ्या एका मित्राने मी व्हॉट्सअॅपला 'फालतू' म्हटलं म्हणून माझ्याशी कट्टी घेतली आहे. :-) कशालाही कुणालाही शिव्या घाला; व्हॉट्सअॅपला शिव्या घालाल तर कित्येक जणांचा राग ओढवून घ्याल अशी परिस्थिती आहे आजकालची. असो. लोकं व्हॉट्सअॅपसाठीच जगतात आजकाल.)
15 Sep 2014 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
(माझ्या एका मित्राने मी व्हॉट्सअॅपला 'फालतू' म्हटलं म्हणून माझ्याशी कट्टी घेतली आहे. Smile कशालाही कुणालाही शिव्या घाला; व्हॉट्सअॅपला शिव्या घालाल तर कित्येक जणांचा राग ओढवून घ्याल अशी परिस्थिती आहे आजकालची. असो. लोकं व्हॉट्सअॅपसाठीच जगतात आजकाल.)
उगाच नाय फेसबुकवाल्या मारक झुकरबर्गनं व्हॉट्सअॅप १९ बिलियन (तेच ते १९ वर नऊsssssssss शुन्ये ! ;) ) मोजून विकत घेतलं :)
15 Sep 2014 - 5:16 pm | समीरसूर
'स्वाध्याय', 'ब्रह्मकुमारीज', 'सहजयोग', 'अम्मा भगवान'...काही विचारू नका. अम्मा भगवान यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलात आणि तुमचं काम फत्ते होणार असेल तर त्यांच्या जमिनीवरच्या पादुका आपोआप सरकतात म्हणे. रु. २०००० एवढी फी आहे त्यांच्या पुजेची. दोघे नवरा-बायको टेचात एका सिंहासनावर बसून मनमुराद सेवा करून घेत असतात.
आमच्या इमारतीमधले एक आजोबा आम्हाला आमच्या घराजवळच असलेल्या एका आश्रमात येण्याचा खूप आग्रह करतात. बहुधा निर्मलादेवींचा तो आश्रम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दर्शनाने सगळ्या समस्या सुटतात. मी नेहमी टाळतो. सरळ "माझा विश्वास नाही असल्या थोतांडावर" असं त्यांना सांगून त्यांना दुखवायचं जीवावर येतं. आजकाल कुणाला कशाचा कसा किती राग येईल भरवसा नाही.
(माझ्या एका मित्राने मी व्हॉट्सअॅपला 'फालतू' म्हटलं म्हणून माझ्याशी कट्टी घेतली आहे. :-) कशालाही कुणालाही शिव्या घाला; व्हॉट्सअॅपला शिव्या घालाल तर कित्येक जणांचा राग ओढवून घ्याल अशी परिस्थिती आहे आजकालची. असो. लोकं व्हॉट्सअॅपसाठीच जगतात आजकाल.)
15 Sep 2014 - 5:24 pm | कपिलमुनी
व्हॉट्सअॅप वाले लै बोअर मारतात आज्कल!
तु माझी पोस्ट वाचलीस का? रीप्लाय नाही दिलास ?
आणि त्याच त्याच पोस्ट पुन्हा पुन्हा !
काही तर "मार्केट मे नया है , जल्दि फॉरवर्ड करो" जाम डोक्यात जातात
15 Sep 2014 - 6:17 pm | रेवती
हेच म्हणते आणि म्हणूनच मी व्हॉटस अॅप वर नाहीये. तसे सांगताच लोकांची हातपाय मोडल्यासारखी अवस्था होते. "मग मी तुला अमूक एक गोष्ट कशी कळवू?" मग आपणच सांगावे लागते की बाई गं, ईमेल कर, फोन कर त्यावर "अरे, हां हां तेही आहेच की!" म्हणतात.