कर्टोली ही खास पावसाळ्यात व त्यातही श्रावणात मिळणारी भाजी. श्रावण सोमवारी उपास सोडताना केळीच्या पानावर ही भाजी हवीच.
माझ्या पत्निच्या वतीने पाककृती येथे देत आहे.
साहित्य
कर्टोली २०० ग्रॅम
भिजवलेली चणा डाळ एक वाटी
हिरव्या मिरच्या ३
फोडणीसाठी तेल २ टेबल स्पून
मोहरी पाव टी स्पून
हिंग पाव टी स्पून
हळद अर्धा टी स्पून
सजावटीसाठी खवलेला नारळ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर
कर्टोलीची दोन्ही बाजूची डेखं कापुन बारीक काचर्या चिराव्या. कर्टोली कोवळीच घ्यावी, त्यातल्या बिया काढाव्या लागत नाहीत. जून असल्यास डेख कापल्यावर ते कोरुन पोकळ करावे म्हणजे बिया निघुन जातील. मग पातळ चकत्या कराव्या.
भिजवलेली डाळ, मिरची थोडं मीठ किंचित पाणी घालुन जाडसर वाटुन घ्यावी
कढईत तेल गरम करुन मोहरी, हळद व हिंगाची खमंग फोडणी करावी
फोडणीत चिरलेली कर्टोली व वाटलेली डाळ घालावी. व्यवस्थित ढवळुन मंद आचेवर झाकण घालुन शिजवावी. भाजी शिजली व डाळ मोकळी झाली की चवीप्रमाणे मीठ घालुन भाजी ढवळुन घ्यावी.
गरम गरम भा़जी वाढपाच्या भांड्यात घेऊन वर खवलेला ओला नारळ व कोथिंबिरीने सजावट करावी.
प्रतिक्रिया
18 Aug 2014 - 1:50 am | प्रभाकर पेठकर
कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही बर्याच दिवसांनी मिसळपावर अवतरले. मजा आली.
भाजी लवकरच करून बघितली (आणि खाल्ली) जाईल.
18 Aug 2014 - 2:51 am | कौशी
आवडली.
18 Aug 2014 - 4:22 am | सानिकास्वप्निल
कर्टोलीची भाजी अतिशय आवडती भाजी पण अनेक वर्ष झाली खाल्ली नाही रॅदर इथे मिळत नसल्यामुळे खाता आली नाही.
मस्तं पाकृ :)
18 Aug 2014 - 7:43 am | अजया
कर्टोली आमच्या इथल्या प्रसिध्द पावसाळी भाज्यांपैकी .या दिवसात रस्त्यावर पावलापावलावर कातकरी बाया ही भाजी घेऊन बसलेल्या असतात.पिकतं तिथे विकत नाही न्यायाने अामच्या घरातली नावडती पावसाळी भाजी!पण अाता चण्याच्या डाळीचे वाटण करुन या पाकृृप्रमाणे बनवुन पाहीन.
18 Aug 2014 - 9:51 am | पैसा
मस्त प्रकार!
18 Aug 2014 - 12:17 pm | प्यारे१
सर्वसाक्षींचे फोटो म्हणजे व्हिज्युअल 'ट्रीट' असते.
बाकी सब लोगा चना चना क्यो बोलते जी? 'हरभरा' नै बोल सकते क्या जी तुमे?
18 Aug 2014 - 12:21 pm | सुहास..
मेड ईन इंडिया ;)
मस्त !! च !!!
18 Aug 2014 - 12:33 pm | पिवळा डांबिस
सध्या रहातो त्या ठिकाणी करटुली मिळण्याची सुतराम शक्यता नाही...
:(
पण त्यानिमित्ताने जागवलेली एक आठवण...
आयुष्याच्या सुरवातीला, तारूण्यकाळी, पहिलाच नव्यानव्हाळीचा जॉब...
ठाणे बेलापूर रोडवरल्या एका कंपनीत, नोसिल होती ना, त्याच लायनीत...
पहिला पावसाळा, श्रावण महिन्यात आमचा शिपाई सोनवणे एक हिरव्या, काटेरी वाटणार्या फळांनी भरलेली एक पिशवी घेऊन डिपार्टमेंटमध्ये येतांना दिसला....
"कायरे, काय घेउन आलायस?"
"काय नाय सायेब, कंटोली"
"कंटोली?"
"हां, भाजी असते सायेब!"
"कुठून पिकवलीस?"
"पिकवली नाय सायेब, ते आपल्या कंपनीचं पाठीमागचं कंपाउंड आहे ना सायेब, ते डोंगराला लागुन असलेलं! तिथे खूप वेल आलेले आहेत सायेब या भाजीचे! तुम्हाला हवी काय?"
"चल आधी ते वेल दाखव!!"
आमच्या डिपार्टमेंटपासून ते कंपाऊंड सुमारे १५-२० मिनिटांवर. जाऊन बघतो तर खरंच सगळं कंपाऊंड या वेलांनी भरलेलं आणि त्यांना अशी शेकडो, छे छे, अगणित फळं लगडलेली!! कुणी लावलेली नाय काय नाय, देवाघरची शेती!!!
"ठीक आहे, दे मला दहा-बारा फळं"
आमच्या सोनावणेनं एक भली थोरली पिशवी भरून फळं दिली. कदाचित सायबाला फक्त दहा-बारा फळंच कशी द्यायची असं त्याला वाटलं असावं...
पिशवी घरी आणुन आईच्या ताब्यात दिली...
"अरे हे काय आणलयंस?"
"कंटोली म्हणतात म्हणे त्याला, आमच्या सोनावणेनं भाजी म्हणुन दिली"
"अरे करटुली ही!! मस्त भाजी होते यांची!!!"
आणि आईने खरोखरच त्यांची भिजलेली चण्याची डाळ घालून मस्त भाजी केली, बेहद्द आवडली...
तेंव्हापासून दर दसर्याला मला कंपनीतून मिळालेली मिठाई सोनावणेच्या हाती. करू दे त्याच्या पोरांना मजा...
आणि दर पावसाळ्यात करटुली, शेवग्याची फुलं, कोवळा टाकळा सोनावणेतर्फे माझ्या हाती!!!!
:)
18 Aug 2014 - 4:57 pm | इरसाल
हे पिवळा डांबिस नावाचे काका खरच डांबिस आहेत. कधीतरीच लिहीतात पण असे काही लिहीतात की वाटते यांनी अजुन लिहावे...पण नाय.
बाकी कटुरलीची भाजी मस्तच हो.
19 Aug 2014 - 12:37 am | मुक्त विहारि
सहमत..
18 Aug 2014 - 12:46 pm | सुहास झेले
सहीच....खूप दिवस झाले कर्टोली खाऊन... :)
18 Aug 2014 - 3:04 pm | दिपक.कुवेत
पण ह्या पावसाळ्यातल्या भाज्यांची कधी चव घेण्याची वेळच आली नाहि. वरील पाकॄमधे सुद्धा भाजी पेक्षा फोटोच भाव खाउन गेलेत.
18 Aug 2014 - 3:18 pm | स्वाती दिनेश
कर्टोली आणि सर्वसाक्षी दोन्ही बर्याच दिवसांनी मिसळपावर अवतरले. मजा आली.
पेठकरांसारखेच म्हणते,
बाकी कर्टोली खूप खूप दिवसात खाल्ली नाहीत..
स्वाती
18 Aug 2014 - 3:51 pm | गणपा
मस्त हो काका. काकुंना मिपाकरांच्यावतीने धन्स कळवा.
आमच्याकडे वालांत टाकुनही करतात.
18 Aug 2014 - 3:59 pm | वेल्लाभट
ऐशप्पथ! बेस्ट. करटुलाची भाजी नक्की कशी करतात याबाबत नीटशी माहिती नसल्याने योग येत नव्हता खाण्याचा. आता नक्की येणार.....
18 Aug 2014 - 4:07 pm | शिद
आम्हीपण कंटोलीच म्हणतो. पावसाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.
माझी आई फक्त कांदा टाकून ह्याची भाजी बनवते. मस्तच.
18 Aug 2014 - 4:27 pm | सर्वसाक्षी
मोहरी पाव टेबल स्पून
हिंग पाव टेबल स्पून
हळद अर्धा टेबल स्पून
हे लिहिताना अनवधानाने टी स्पून ऐवजी टेबल स्पून असे लिहिले आहे. ते कृपया
मोहरी पाव टी स्पून
हिंग पाव टी स्पून
हळद अर्धा टी स्पून
असे वाचावे. गफलत निदर्शनास आणुन दिल्याबद्दल पेठकर साहेबांचे आभार (बायकोने माझी अक्कल काढली हे वेगळे सांगायलाच नको)
18 Aug 2014 - 5:36 pm | भाते
फोटो बघुनच भुक चाळवली गेली. आता पाकृ चांगली का फोटो हे ठरवणे अवघड आहे.
सर्वसाक्षी काका,
वेळ मिळेल तसे किंवा खरंतर, वेळ काढुन मिपावर लिहित जा.
फोटोप्रेमी भाते
18 Aug 2014 - 8:35 pm | सखी
मस्त दिसतेय भाजी. इंगजीमध्ये कर्टोलीला काय म्हणतात माहीती आहे का? इथे मिळते का बघता येईल.
18 Aug 2014 - 8:47 pm | प्यारे१
इंग्रजी नाव , 'इथं' वगैरे असलं की आपण भारताबाहेर आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न असं जुने लोक म्हणतात ब्वा. ;)
18 Aug 2014 - 10:32 pm | पैसा
http://sundayfarmer.wordpress.com/2011/08/29/spine-gourd-anyone/ इथे बघ.
spine-gourd वाटते ते.
18 Aug 2014 - 10:40 pm | मार्क ट्वेन
'इथे' कर्टोली\कंटोली' मिळत नाही असे एकदोन प्रतिसाद दिसले म्हणून लिहितो. इंग्रोमध्ये फ्रोझन फूड सेक्शनमध्ये kantola या नावाने हमखास मिळते. दिसायला अशी दिसते.
जनहितार्थ जारी.
18 Aug 2014 - 11:09 pm | सखी
धन्यवाद पैसाताई आणि मार्क ट्वेन. पटेलच्या फ्रोजन भागात kantola बघितल्यासारखी वाटतेय खरी आता परत नाव वाचेन नीट, मंडळ आभारी आहे :)
19 Aug 2014 - 12:36 am | मुक्त विहारि
झक्कास..
19 Aug 2014 - 4:26 am | रेवती
ही भाजी कधी खाऊन बघितली नाही.
तुम्ही दिलेली पाकृ एकदम छान, साधी आहे.
भाजी मिळाल्यास करून पाहीन.
19 Aug 2014 - 12:17 pm | खुशि
आजच केली कर्टोलीची भाजि आपण दिल्याप्रमाणे करुन बघेन.
19 Aug 2014 - 2:31 pm | प्रभाकर पेठकर
कालच केली होती...मस्तं जमली.
19 Aug 2014 - 4:48 pm | अनन्न्या
आमच्याकडे खूप मिळतात ही कर्टोली, पण भाजी कधीच खाल्ली नाहीय, करून पहायला पाहिजे.
19 Aug 2014 - 6:54 pm | पिंगू
आता कंटोली आणायला शेतावर जायला लागेल..