ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे जेव्हा सर्वांना समजेल तो सुदिन.)..
मग चांगली कामगिरी म्हणजे काय ? माझ्या मते स्वत:च्याच उत्तम कामगिरीवर मात करत राहणं आणि ऒलिंपिकसारख्या मोठ्या मंचावरती स्वत:चा बेस्ट परफ़ॊर्मन्स देत राहणं , निदान भारतीय विक्रम मोडत राहणं.. ही अपेक्षा मी करतो....आणि इतपत अपेक्षाच योग्य आहे.
क्षमता :
१९९८ मध्ये इंडिया टुडेमध्ये भारतीय खेळाडूंच्या जागतिक कामगिरीविषयक एक तुलनात्मक लेख आला होता...त्यात बर्याच क्रीडाप्रकारातली भारतीय विक्रम आणि जागतिक विक्रम अशी तुलना केलेली होती...
http://www.india-today.com/itoday/29061998/cover.html
या लेखात कोणताही ब्लेम गेम नव्हता तर केवळ वस्तुस्थिती दर्शवली होती.... मी हा लेख वाचून खचलोच... म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
Throwers eat the same food runners do at the sai centres, only they're allowed a larger quantity. Sports drinks too, unlike water which often merely quenches thirst, reintroduce vital supplements in the body. In the US, Leander would undergo tests merely to measure his sodium loss. Then Dr Michael Bergeron of the Department of Exercise Science, University of Massachussetts, instructed him on his sweat rate (litres/hour) and therefore how much he must replenish. In India, hockey players drink from a tap in the field.
आता काही लोक म्हणतील ध्यानचंद हेच टॆप वॊटर पिऊन खेळायचा ना ? पण अहो असा अद्भुत माणूस शतकात एखादा होतो... सगळ्यांकडून तीच अपेक्षा कशी ठेवता येईल?
टीव्हीवाले वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काहीही बोलत,दाखवत असतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात मतलब नाही पण वृत्तपत्रांचे पत्रकार तरी निदान तारतम्याने लिहितील असं मला वाटत असे.... पण तसे नाही...
काही क्रीडावृत्तपत्रकार भारतातले रेकॊर्ड होल्डर जगात पस्तिसाव्या, चोपन्नाव्या , विसाव्या वगैरे क्रमांकावर आहेत तरी त्यांच्याकडून पद्क अपेक्षतात... मग ती अंजली भागवत असो, अंजू जॊर्ज असो, साईना नेहवाल असो किंवा वीरधवल खाडे....( वर हे आणि की " मग? आम्ही अपेक्षा करणारच.. आमच्या कराच्या पैशातून स्पोर्ट्स मिनिस्ट्री त्यांचा खर्च करते ..." )....आता याला ऒप्टिमिस्टिक राहणं असं ते समजत असावेत.... अशांना ऒलिम्पिक झालं की अपेक्षाभंगाचा मोठा धक्का वगैरे बसतो.... मग हेच पत्रकार "... एक सव्वा अब्ज लोकसंख्येच्या खंडप्राय देशामध्ये दोन तीन पदके मिळू नयेत ? ..." वगैरे लेख पाडण्यात मग्न होतात...
आता या पॆटर्नचाच कंटाळा आलाय अगदी...
आता पहा, वीरधवल पदक मिळवणार पदक मिळवणार , त्याला कशी जनतेने मदत केली म्हणून तो इथवर येऊ शकला... तोच एक ऒलिम्पिकची आशा असले लेख वर्तमानपत्रातून पडायला लागतील, तो मेहेनतीने खेळेल.... चांगली कामगिरीही करेल पण पदक मिळाले नाही म्हणून सामान्य नागरिक त्याला शिव्याही घालेल....पण म्हणून ऒलिम्पिकनंतर त्यातूनच वीरधवल आणि साईना सारख्या खेळाडूंना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच किती वैफ़ल्य येत असेल...
आपल्या खेळाडूंचे जगातले क्रमांक ( रॆंकिंग या अर्थाने ) पाहिले तर पदक मिळवणे ( म्हणजेच पहिल्या तीनात क्रमांक पटकावणे ) जवळजवळ अशक्यच आहे असे कोणीही म्हणेल.... तरीही ९६ ला पेस, २००० ला मल्लेश्वरी आणि २००४ ला राजवर्धन राठोड यांनी पदके मिळवलीच ना... ही अत्यंत अद्भुत कामगिरी आहे आणि मला त्याबद्दल अत्यंत आदर आणि अभिमान आहे.... पण म्हणून मी आता रोज वर्तमानपत्रात लेख वाचतो की बॊक्सिंगकडून पदकाची अपेक्षा, कुस्तीत पदकाची अपेक्षा, बॆडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा हे सारं अंमळ भंपकपणाकडं झुकणारं... म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...
जाताजाता : काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणून माझेच दात माझ्याच घशात घातले तर मला आनंदच होईल हे वे सां न ल.... :)
प्रतिक्रिया
1 Aug 2008 - 6:25 pm | डॉ.प्रसाद दाढे
मला असे वाटते की आपल्या देशात अजुनही क्रीडाप्रकारा॑कडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन फारसा उत्साहवर्धक नाही. क्रिकेट सोडले तर इतर कुठल्याच खेळा॑स (हॉकी, फूटबॉल, बास्केटबॉल इ) प्रेक्षक आणि भाव दोन्ही मिळत नाहीत. त्यामुळे खेळाडू रेल्वेत कि॑वा बॅ॑केत नोकरी मिळेस्तोवर मेहनत घेऊन खेळतात; एकदा उद्दीष्ट साध्य झाल॑ (कायम नोकरी मिळाली) की त्या॑चाही उत्साह ओसरतो. चक दे इ॑डिया चित्रपटात ही कडवी वस्तूस्थिती दाखवलेली आहे.
1 Aug 2008 - 6:31 pm | मदनबाण
आपल्या कडे क्रिकेट एके क्रिकेटच चालत...बाकीच्या खेळांकडे लक्ष ध्यायला वेळ कोणाकडे आहे..ऒलिम्पिक आले की मग आपल्या अपेक्षा मात्र सर्व दुसर्या खेळाडुंकडुन..वर लोक असंही म्हणण्यास कमी करत नाही की आम्ही खेळाडु जिंकण्यासाठी नव्हे तर हारण्यासाठी पाठवतो !!!!
म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
आपल्या देशात प्रत्येक खेळात खेळ कमी आणि राजकारण जास्त असतं त्या ट्रेनिंग वगरैची गरज कशी काय लागणार ??
म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...
अगदी सहमत !!
काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणतील हीच अपेक्षा ठेवतो..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
1 Aug 2008 - 7:10 pm | राधा
ध्यानचंद शतकात एकदाच जन्म घेतो............
डोइजड अशा अपेक्षंच्या खाली आपले खेळाडु खेळत असतात, कस खेळतील ते अपला नैसर्गीक खेळ...........
आज खेळ हा पैशाचा बाझार झाला आहे............
पण आशा करु चमत्काराची.......
1 Aug 2008 - 8:32 pm | चतुरंग
हा एक फारच चर्चिला गेलेला विषय आहे. एका ठराविक चाकोरीतून साध्य होत नाहीत म्हटल्यावर गोष्टींचा वेगळा विचार करावा ह्याची जाण आपल्या माध्यमांना येत नाही कारण परखड लिहून अपरवाद कोण ओढवून घेणार? चालले आहे चालू द्या दुखर्या नसेला धक्का लावाल तर खबरदार!
अहो खेळाडूंनि त्यांच्या कामगिरीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना मानसिक स्वास्थ्य नको का? इथे उद्या काँपिटिशन असली तर आज सकाळी खेळाडू दूतावासात विसा साठी ताटकळत वाट बघत बसलेले, विमानाची तिकिटे न मिळाल्याने विमान चुकून स्पर्धेआधी काही तास तिथे पोचलेले असल्या भोंगळ कारभारतून कोण आणि कशी पदके मिळवणार? आपल्या पाठीशी कोणीही नाही आणि अपेक्षा मात्र भरमसाठ असल्या अवस्थेत कसले पराक्रम आणि कसले विक्रम?! राजकीय इच्छाशक्ती ही फारच लेचीपेची आणि कणाहीन असली की असे होते.
टाईम साप्ताहिकाच्या मागच्या आठवड्यातल्या अंकात 'ऑलिंपिकमधले १०० बघण्याजोगे खेळाडू' ह्या लेखात एकमेव भारतीय नेमबाज खेळाडू राजवर्धनसिंग राठोड ह्याचा समावेश आहे.
आपण कितीही डोळे मिटून बसतो तरी जगाचे बारिक लक्ष असते आणि वेगवेगळ्या देशाचे लोक तुम्हाला सतत आजमावत असतात हे सत्य नजरेआड करुन चालत नाही.
फक्त पाश्चिमात्य देशांतल्या सवलती आणि पैसा हेच यशाचे रहस्य आहे आणि किंवा चीन सारख्या पौर्वात्य देशातल्या हडेलहप्पीमुळे जबरद्स्तीने खेळाडू बनवणार्या लोकांचीच मक्तेदारी आहे असे मानायचे काही कारण नाही. युद्धग्रस्त पॅलेस्टाईन मधल्या नादर अल मसरी सारखे खेळाडू हे त्याचे जिते जागते उदाहरण आहे.
माझ्या जवळच्या वाय. एम्.सी.ए. च्या तरण तलावात स्थानिक खेळाडू इथल्या स्पर्धेच्या तयारीसाठी ज्या प्रकारे पोहोताना मी बघितले आहेत तसे आपल्याकडचे राष्ट्रीय खेळाडू तरी पोहत असतील की नाही अशी शंका येते.
कठोर परिश्रम, अवास्तव अपेक्षा न ठेवणे आणि सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावत नेणे ह्या त्रिसूत्रीचा अवलंब करुन टप्प्याटप्प्याने कुठलेही ध्येय साध्य करता येते - ह्या गोष्टीवर आपला विश्वास नाही हेच यातून सिद्ध होते.
चतुरंग
2 Aug 2008 - 12:18 am | भडकमकर मास्तर
चुकून स्पर्धेआधी काही तास तिथे पोचलेले असल्या भोंगळ कारभारतून कोण आणि कशी पदके मिळवणार? ...
फक्त पाश्चिमात्य देशांतल्या सवलती आणि पैसा हेच यशाचे रहस्य आहे आणि किंवा चीन सारख्या पौर्वात्य देशातल्या हडेलहप्पीमुळे जबरद्स्तीने खेळाडू बनवणार्या लोकांचीच मक्तेदारी आहे असे मानायचे काही कारण नाही.
अगदी खरे.... वेस्ट इन्डीज मधले छोटे छोटे देशही पदके आणतात....
कठोर परिश्रम, अवास्तव अपेक्षा न ठेवणे आणि सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावत नेणे ह्या त्रिसूत्रीचा अवलंब करुन टप्प्याटप्प्याने कुठलेही ध्येय साध्य करता येते
फार छान लिहिलंय...
आणि आपला यावर विश्वास नाही , हेही खरंच...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Aug 2008 - 1:11 am | प्रियाली
आमची कन्यका स्थानिक क्लबसाठी पोहते. पोहणे आवडते म्हणून उत्साहही असतो पण याचबरोबर त्यांना इतके राबवून घेतले जाते की यावर्षीचे सराववर्ग सुरू होण्याची वेळ आल्यावर, उद्यापासून परिक्षा सुरू होणार असे भाव तोंडावर असतात. याचे कारण
१. आठवड्यातून तीन वर्ग भरतात. एकेका तासाचे. त्यात संपूर्ण तास सतत पोहावे लागते. मध्ये विश्रांती नाही. पोहण्याचा एक वेग हवा. टंगळ-मंगळ नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आपली वेळ नोंदवावी लागते. ती उत्तरोत्तर सुधारावी लागते.
२. शरीर बळकट करण्यासाठी व्यायामशाळेत व्यायाम करावा लागतो. पोहताना कधीतरी पाण्याने बांधलेली बादली पायाला बांधली जाते. स्ट्रोक्स चांगले व्हावेत म्हणून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहावी लागते.
३. दर महिन्यात स्पर्धा असतात. प्रत्येक स्पर्धेत नाही तरी काहीत भाग घ्यावाच लागतो आणि आपला स्कोर सतत उंचावतच न्यायला लागतो.
४. वर्गांदरम्यान आणि स्पर्धांदरम्यान पालकांना १५-१५ तास स्वयंसेवा करावी लागते. पैसे फेकले आणि मुलांना क्लासला घातले अशी मुभा नाही. यामुळे घरात सगळेच पोहण्याबाबत गंभीर असतात.
याच बरोबर अतिशय खेळीमेळीचे वातावरण राखले जाते. जिंकण्या-हरण्याची जाणीव दिली जात नाही. कोचेस कधी टोचून बोलणे, ओरडणे इ. गोष्टी करत नाहीत.
आता एकंदरीत भारतीय शरीरयष्टी पाहिली तर धष्टपुष्ट अमेरिकन बच्च्यांसमोर आमची कन्यका पाप्याचं पितर दिसते. तिच्याकडून आम्ही खूप अपेक्षा ठेवत नाही. इथे आम्ही तिला आमचे सुप्रसिद्ध कोच टोनी डन्जी यांचे वाक्य सुनावतो.
इतरांवर जिंकण्यासाठी खेळू नकोस, स्वतःवर विजय मिळव. तुझा यापूर्वीचा स्कोर मोडता येईल का बघ. हळूहळू आपसूक इतरांवर विजय मिळवणे सहजसाध्य होईल.
2 Aug 2008 - 12:53 am | घाटावरचे भट
आपल्या देशात कुठ्ल्याही खेळाकडे बघण्याचा दॄष्टीकोनच मुळी चुकीचा आहे. दाढे काकांनी म्हटल्याप्रमाणे नोकरी मिळेपर्यंतच सगळा उत्साह. खेळ हा साइड बिझनेस कसा होउ शकतो? मी इथे अमेरिकेत एका युनिव्हर्सिटी मधे शिकायला आल्यावर जेव्हा मला कळलं की इथे ४-४ वर्षांचे ऍथलेटिक्स मधले पदवी (आणि पदव्युत्तर सुद्धा) अभ्यासक्रम असतात तेव्हा मी गारच झालो. आपल्या इथेही क्रीडाप्रबोधिनी सारखे काही स्तुत्य उपक्रम आहेत परंतु वर म्हटल्याप्रमाणे त्यांचा वापर 'स्पोर्ट्स कोटा' चे प्रवेशद्वार म्हणून जास्त होतो. आपल्याकडे पैशाची इतकी समृद्धी नाही, हे जरी मान्य केलं तरी कुठे तरी सुरुवात करयलाच हवी. आणि अशी सुरुवात केल्यानंतर पुढे जाउन १०-२० वर्षांनी आपण ऑलिंपिक मधे पदकाची अपेक्षा करायला हरकत नाही.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
2 Aug 2008 - 1:36 am | मानव
अजुन आपल्याइथे मशागत चालु आहे
पिक लागायला अजुन वेळ आहे
जस सानिया ने प्लटफोर्म बनवलाय ,विमबलडन जिन्कायला अजुन २० वर्श जावि लागतिल !
विरधवल खाडे कडून थोडी आशा आहे ! या ओलिम्पिक मधे
काहि चुकल्यास माफि असावि !
2 Aug 2008 - 1:44 am | चतुरंग
तर इतर लोक येऊन बी पेरुन, पीक घेऊन निघून जातील अणि आपण मशागत आणि मळणीच करत राहू! ;)
सातत्य आणि एकामागून एक खेळाडूंची फळी तयार करणे हे महत्त्वाचे.
भाराभर खेळातली शेकड्याने खेळाडूंची टीम पाठवण्यापेक्षा काही मोजके खेळ निवडा त्यावरच मेहेनत घ्या उदा. नेमबाजी, तिरंदाजी, ट्रॅक अँड फील्ड मधल्या एखाद दोन इव्हेंट्स, हॉकी, जलतरण आणि तेवढ्या खेळाडूंवर कसून मेहेनत घ्या. त्यात आपण सलग दोन ऑलिंपिक ब्राँझतरी पदके मिळवायला हवीत. त्यात खेळाडूंची पुढची फळी करावी मग हळूहळू एकेक खेळ वाढवता येईल.
हा एक मार्ग असू शकतो. असेच आणखीनही विचार असतील. वेगळ्या वाटेने विचार महत्त्वाचा.
चतुरंग
2 Aug 2008 - 2:31 am | भडकमकर मास्तर
विरधवल खाडे कडून थोडी आशा आहे ! या ओलिम्पिक मधे
तेच तर म्हणतोय... आपल्या आशा रिअलिस्टिक ठेवायला हव्यात...
वीरधवल भारतात बेस्ट आहेच...
त्याने गेल्या वर्षी १०० मीटर फ्रीस्टाईल पोहण्यात भारतीय रेकॉर्ड केले ते होते ५२.८ सेकंदांचे..... आणि मार्च २००८ मध्ये Frenchman Alain Bernard set a world record for the men's 100 meters freestyle in 47.60sec at the European swimming championships
आता हा फरक किती सेकंदांचा ?? या पाच सेकंदांत काय काय घडेल ? रँकिंगमध्येही तो जगात दहाच्या आत आहे का? मग तो एकदम पहिल्या तीनात येईल का ? या अपेक्षा त्याच्या डोक्यावर द्यायच्या का? किंवा का द्यायच्या? ... या सार्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधायची आहेत...
फारतर तो ज्या वेगाने प्रगती करतो आहे हे पाहता मी त्याच्याकडून त्याचे स्वतःचे भारतीय रेकॉर्ड त्याने तोडावे या अपेक्षेत आहे... बघूया.... वीरधवलला शुभेच्छा....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
2 Aug 2008 - 2:54 am | चतुरंग
वीरधवलला ह्या निमित्ताने ऑलिंपिकचा अनुभव मिळेल तिथल्या दर्जाची थेट ओळख होईल आणि सुधारणा करण्यासाठी एक दिशा मिळेल एवढ्या अपेक्षा ह्या योग्य आहेत.
त्यातूनही त्याने संधी मिळाली तर पदकासाठी प्रयत्न जरुर करावेतच त्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात पण अपेक्षांचे ओझे नको! :)
चतुरंग
20 Jul 2012 - 5:55 pm | विकाल
अरेरे... वीरधवल ऑलिंपिकला नाही जाउ शकणार आहे.. ! !
कोणी गगन उलालमठ जाणार आहे.. हा दुवा
"http://sports.ndtv.com/othersports/swimming/item/193278-olympics-quota-r..." (कुणीतरी ही लिंक चिटकवा रे दुवा म्ह्णून.. ओ संपादक)
काय गोंधळ झाला आहे ते विशद केल आहे!!
24 Jul 2012 - 9:45 am | श्रीरंग
वीरधवलला ऑलिंपिक्स्ला न जाऊ देण्यामागे पूर्णतः वीरेंद्र नानावटी यांची हुकूमत असलेल्या swimming federation of India चा खोडसाळपणा आहे.
"Do you know that the latest performance of these two swimmers has been disheartening? They even failed to make their original timing. Now both Virdhawal and Sandeep Sejwal have already participated in the Olympics, so at least one new swimmer will be getting an Olympic participation," said Virendra Nanavati, Secretary, Indian Swimming Federation.
हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. वाईल्ड कार्डच्या मार्गाने जर एकाच खेळाडूस पाठवणे शक्य होते, तर तो किमान 'ब' पात्रता निकष पार केलेला पाठवता आला असता. भारताकडे असे ४ जलतरणपटू आहेत.
वीरधवल खाडे
संदीप शेजवल
अॅरॉन
सौरभ सांगवेकर.
या कोणालाही न पाठवता गगनसारख्याला पाठवणे ही बौध्दिक दिवाळखोरी आहे.
गगन उल्ललमठ हा माणुस ८०० मीटर फ्रीस्टाईल पोहतो. हा ईव्हेंट ऑलिंपिक्समधेच नाहिये, म्हणून त्यालाच १५०० मी. चा ईव्हेंट पोहायला लावणार आहेत. वास्तवीक, सांगवेकरच्या नावावर १५०० चा राष्ट्रीय विक्रम असून, त्याने 'ब' निकष देखील पूर्ण केला आहे.
गुणी, होतकरू खेळाडूंचं असं खच्चिकरण होत असताना पदकाची आशा बाळगणं मूर्खपणाचं आहे.
31 Jul 2012 - 11:04 am | शिल्पा ब
नविन काय त्यात?
पी.टी. उषा नै का म्हातारी झाली अन परफॉर्मन्स प्रचंड ढासळला तरी फिरायला म्हणुन जात असायची? तसंच!
बोलणार कोण?
2 Aug 2008 - 3:44 am | घाटावरचे भट
क्रिकेट्च्या निवड समितीत माजी क्रिकेटखेळाडूच हवेत अशी जर आपली अपेक्षा असेल, तर बाकीच्या खेळांची जबाबदारी सरकारी अधिकार्यांवर का?
आपल्या ऑलिंपिक समितीने माजी खेळाडूंचे 'टॅलेंट सर्च ग्रुप्स' तयार करावेत, जे देशातील ठिकठिकाणी होणर्या स्पर्धांना हजर राहातील आणि विशेष कौशल्य असणार्या तरुण खेळाडूंना शोधून काढतील. अर्थात, जर माजी खेळाडू सुद्धा बाबू लोकांसारखे वागले आणि वशिल्याने खेळाडू संघात आले, तर अवघड आहे...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
2 Aug 2008 - 12:52 pm | प्रमोद देव
इतके मनाला लावून घेऊ नका. आपले लोक जात्याच खिलाडू वृत्तीचे आहेत. ;)
त्यामुळे पदक वगैरे सारख्या क्षुल्लक गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत. :)
आपल्या सारखे हरणारे लोक स्पर्धेत नसतील तर जिंकणार्यांना काय किंमत असेल? तेव्हा मला अशा भारतीय खेळाडुंचा अभिमानच आहे. त्यांनी ही परंपरा ह्या ऑलिंपिकमध्येही कायम ठेवावी अशी मी अपेक्षा करतो. :P
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
2 Aug 2008 - 1:31 pm | विसोबा खेचर
बाकी काही म्हणा, आमच्या क्रिकेटची मजाच वेगळी!
ऍट अ टाईम, एक किंवा फार फार तर दोन विरुद्ध अकरा, असा हा एकमेव खेळ आहे! :)
इतर खेळांत दोन्ही बाजूंचे सर्व स्पर्धक मैदानात असतात!
तात्या.
2 Aug 2008 - 8:29 pm | नोहिद सागलीकर
बंन्धु हो, या सर्व क्रिया प्रतीक्रिया वचल्यावर मला काय वटल ते सांगतो ............
कोनी तरी लिहलं आहे,
"स्वप्न सोन्या सारखी पहावीत,
सोन्याचि नकोत ,
कारण,
स्वप्न सोन्याची असतील ,
आणि ती भंग पावली तर दु:ख फार वाटतं ,
नी
ती ,खोट्या सोन्याची असतिल तर,
त्याचं इतकं काहि वाटत नाही.''
तसच , आपल्या ऑलंपिक पदकांच सुधा आहे,
3 Aug 2008 - 1:13 pm | मनिष
सहमत!
20 Jul 2012 - 5:01 pm | मन१
सध्या ऑलिम्पिक २०१२ तोंडावर आले आहे, हे लक्षात घेता सध्याच्या समयी समयोचित ठरावा असा लेख.
मुद्दाम वाचनखूणातून वरती काढतोय.
ऑलिम्पिक ला एकदम भारतीयांच्या एकदम chauvinist, बटबटित प्रतिक्रिया येउ नयेत अशी इच्छा. किंवा थोडक्यात, तात्कालिक , प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया ज्या येतात, आणि नंतर कसे एकदम सगळेच सगळ्याच बाबतीत थंडावते ही माझी तक्रार वेगळ्या संदर्भात उचित शब्दांत मांडलेली दिसली.
अर्थात इतके होउनही तत्काळ्,भडक्क प्रतिक्रिया यायच्या थांबणारही नाहीत; झाल्याच तर कमी होतील.
30 Jul 2012 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गगन नारंगला कास्य पदक. ऑलंपिकमधे भारताला १० मि. एयर रायफलमधे पहिलं पदक मिळालं अभिनंदन. :)
-दिलीप बिरुटे
31 Jul 2012 - 10:56 am | शिल्पा ब
गगन नारंगचं अभिनंदन.