पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते असं कोणी म्हणालं. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते.
उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते. तसेच पुरुषप्रधान पुरुष माझ्या बहिणीचे लग्न मीच लावून देणार म्हणून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ शकतो. शिवाय कमवण्याचा अधिकार माझाच आहे म्हणून बायकोला, मुलीला नोकरी करण्यात बाधा आणू शकतो.
आता कुटुंब एक संस्था आहे नि ती राज्यसभेप्रमाणे चालते असे म्हणता यावे. म्हणजे काही सदस्य सभा सोडतात (दुसर्या कुटुंबांत जातात) वा रिटायर होतात (मरतात) पण जनरली ती एक गोईंग एंटीटी असते. काहींचे म्हणणे असेल कि नवविवाहित नव्या घरात जातात तेव्हा एक नवे कुटुंब चालू होते आणि पैकी शेवटचा मरतो तेव्हा संपते. काही का असेना, कुटुंबाचे कंपोझिशन नेहमी बदलत असते. परिस्थिती नेहमी बदलत असते. वय, गरजा, उत्पन्न, स्थान, सामाजिक स्तर, शैक्षणिक स्तर, आवडी निवडी, इ इ फार बदलत असतात. बहुधा कुटुंबाकडे असलेल्या वेळात नि असलेल्या स्रोतांत सगळ्यांच्या सगळ्या गरजा भागवणे असंभव असावे.
क्षणभर असे समजू की सारे कुटुंबातले सदस्य समजूतदार आहेत. म्हणजे कोणालाही कोणताही अन्याय करायची इच्छा नाही. असेही समजू कि कोणतीही लिंगप्रधानता नाही. पण आपले रास्त सुख हवे आहे. त्यासाठी शांतपणे वाटाघाटी करायच्या आहेत. कुटुंब चालवण्यासाठी, म्हणजे प्रधान म्हणून निर्णय घेण्यासाठी वा अन्यथा, जी शारिरीक क्षमता लागते, बुद्धिमत्ता लागते, समाजशीलता लागते, इ इ लागते, त्यांचा नि लिंगाचा काही एक संबंध नाही.
(माझ्या व्यक्तिगत मताने याला फक्त खालिल अपवाद आहेत -
Unless made clear otherwise through explicit declaration right at the beginning of marriage -
१. मुलाच्या जन्मावेळी स्त्रीयांनी सारे व्यक्तिगत फायदे आवश्यक असल्यास बाजूला ठेवणे. यात नोकरी आली, पदे, प्रमोशने, पैसे, इतर फायदे, इ इ सगळे आले. शिवाय जो डोक्टरही सांगू शकत नाहीत तो स्त्रीयांच्या जीवालाच होणारा ऐनवेळीचा धोका देखिल आला.
२. मुल जोपर्यंत सज्ञान होत नाही तोपर्यंत पालकांनी कोणतेही कॉंप्रो न करता त्याच्या सार्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, वेळ देण्याच्या, इ इ गरजा समाधानकारक रित्या पूर्ण करणे. यातही स्त्रीयांनी मुले विशेषतः लहान असताना जास्त सहभाग घेतला पाहिजे.)
जेव्हा पुरुषप्रधानतेवर टिका होते, तेव्हा त्यात एकूण पुढील प्रमाणे काही म्हणायचे असते - "पुरुष स्वतःच्या स्वार्थासाठी नि स्त्रीया ब्रेन वॉश झाल्याने कुटुंबात पुरुषांच्या हितांचे निर्णय घेतात, जेणेकरून स्त्रीयांवर अन्याय होतो." यात लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे कि टिका पुरुषप्रधानतेवर, तिच्या इंट्रींसिकली (अंतर्भूत) अन्याय्य असण्यावर आहे. शब्दा मग इथे कुटुंबचालकांचे चार प्रकार पडतात १. पुरुषप्रधानवादी पुरुष २. अशीच स्त्री ३. पुरुषप्रधानवादी नसलेला पुरुष ४ अशीच स्त्री.
यातल्या आंतर्भूत शब्दावर मला आपत्ती आहे. उदा. १. मुलीने लग्नानंतर मुलाघरी जायचे नि २. मुलाने लग्नानंतर मुलीघरी जायचे हे दोन आणि दोनच पर्याय असतील आणि त्यातला क्रमांक एक समाजाची निवड असेल तर तो अन्याय ठरत नाही. (इथे दरवेळी भांडायची तेव्हा समाजात इच्छा नव्हती असे धरू.)
(इथे मला पहिला प्रश्न पडतो - "आम्ही पुरुषप्रधानवाद्या पुरुषांसारखे नाही पण आम्हीच (मीच, पुरुषच) घर चालवू" असे म्हणणारे पुरुष वास्तविक पुरुषप्रधानवादी असतात का?)
शिवाय पुरुषप्रधानवाद्यांवर टिका करताना त्यात बर्यापैकी रास्तपणा, सच्चेपणा असावा. म्हणजे आडनाव बदलले अन्याय म्हणता येईल, गुन्हा म्हणता येईल का? नाही. शिवाय अन्याय म्हणताना देखिल थोडा विचार करावा. म्हणजे कोणाच्याही नातेवाईकांत ५०% स्त्रीया असतात. त्यांची (वा पुरुषांचीही)नावे वाचताना होस्टेलच्या सदस्यांची नावे वाचतोय इतकी भिन्न दिसू नयेत. कोणत्या लिंगाचा व्यक्ति लग्नापूर्वी व लग्नानंतर कोणत्या कोणत्या पालकांची किती किती मधली नावे नि आडनावे लावतोय याने घोळ होईल. उदा. अशी नावे ८-१० पिढ्या वापणारांना "तुम्ही मुळचे कुठले?" हा प्रश्न विचारला तर तो "इनव्हॅलिड क्वेश्चन" होईल. मला कोणतेही कपडे आवडत असले तरी कंपनीत जाताना मला तिचे नियम वापरून त्यांच्या संकेतांत बसणारे कपडे घालावे लागतात. आज कंपनी ही एकत्र कुटुंबाचे दुसरे नाव आहे.
शिवाय लिंग एकटेच सारे काही ठरविते हे गृहितक नकळत धरले जाते. नाते, इ देखिल फार महत्त्वाचे असतात. मुलीची मुलगी जनरली भावाच्या मुलापेक्षा प्रिय असते. म्हणून पुरुषप्रधान म्हणून टिका करताना "दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश" पाळू नयेत.
असो. आता प्रश्न येतो कि विभक्त कुटुंबांत, ज्यांत दोन्ही सदस्य (व नंतर येणारी मुले)कोणतीही लिंगप्रधानता पाळत नाहीत त्यांनी निर्णय कसे घ्यावेत? कुटुंब रडरलेस असू शकत नाही. खालिल प्रश्न उद्भवतात -
पून्हा लक्षात घ्या खालील मुद्दे उपस्थित करताना सदस्यांचा स्वार्थ नाही आणि समजूतदारपणा त्यांना शक्य तितका आहे.
१. सहजीवन प्रारंभ करण्यापूर्वी दोघांनी संपूर्ण आयुष्यात महत्त्वाच्या डिसिजन्सवर काय भूमिका असेल यावरचे सारे प्रमुख मतभेद मिटवले पाहिजेत का? ते रेकॉर्ड केले पाहिजेत का?
२. दोघांनी आपापल्या कमाईचे पैसे सवते ठेवले तर - पैसे उसने कधी द्यायचे? व्याज इ लावायचे का? परत घ्यायचे का? एकमेकांना सांगायचे का?
३. नेहमी नात्यासाठी एक्झिट प्रोसिजर बनवून ठेवायची का? कोणाचे असेट कोणते असतील? मुले कोणाची असतील?
४. बायकोला अजून एक मूल नको, नवर्याला हवे. दोघांचे (खूप हुशार असल्याने) बरेच, बराच वेळ युक्तिवाद होणार. काय करायचे? हेच मुलाचे शिक्षणाचे मिडियम, परदेशी पाठवायचे कि नाही, इ इ बर्याच बाबतीत झाले तर? अशा बाबतीत केवळ एक निर्णय होऊ शकत नाही म्हणून घटस्फोट घ्यायचा का?
५. शेवटी मीच का पडती बाजू घ्यायची असे प्रत्येकाला वाटू लागले तर? हा निर्णय मी करणार, पुढचा तू, ही स्टाईल विचित्र नाही का?
६. निर्णयप्रक्रियेच्या अवघडपणामुळे एका जीवनात १-२/३-४/४-५ घटस्फोट नॉर्मल जरी मानले तरी घटस्फोट टू घटस्फोट काळात देखिल निर्णय फार सुखाने घेतले जातील अशी शाश्वती आहे काय?
७. बायकोला तिच्या माहेरी जायचेय, नवर्याला त्याच्या, पैसे नि सुट्या लिमिटेड असतात, दोन्ही आजीआजोबांना नातवंडे पाहायचीत. दोन्हीकडे काहीतरी महत्त्वाचं आहे. कोणीही माघार घेत नाहीय. काय करणार?
८. बायकोचा कझिन (वा एक मित्र) नवर्याला आवडत नाही, नवर्याचा कझिन बायकोला अजिबात आवडत नाही. पण त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही. कसे ठरवणार कोण, कधी घरी येणार?
९. कॉमन खर्च कोण किती करणार? दुसर्याने त्याचे पैसे कसे खर्चावे, खर्चून नये वा गुंतवावे हे पहिल्याला नाही आवडले तर?
१०. बायकोने सिग्रेट प्यायला चालू केली. या विषयावर दोघांची काय स्वातंत्र्ये आहेत यावर पूर्वी काही चर्चा झाली नव्हती. हे नव र्याला अजिबात खपले नाही. कोणाकडे दाद मागणार?
११. नवर्याला बरेच पैसे देवाला वाहायचे आहेत. बायकोला पसंद नाही. काय करणार?
घर ही महत्त्वाची संस्था नाही का? इथे काय निर्णय घेतले जातात त्याने सदस्यांचे सुख ठरत नाही का? जिथे एकवाक्यता आहे तिथे प्रश्न नाही. जिथे मेरिट आहे तिथे पार्टनर कौशल्य मान्य करून निर्णयांचे अधिकार देईल. पण जिथे इच्छांमधे, अधिकारांमधे, स्वतःला एखाद्या विषयात किती अक्कल आहे याच्या जाणिवेत दोहोंत बराच फरक असू शकतो. शिवाय कोणत्याही दोन व्यक्तिंच्या जीवनाच्या सामान्य कल्पनांतील तफावत हे डायरेक्ट त्यांच्या शिक्षणाचे नि पुढील एक्सपोझरचे फंक्शन आहे नि कालाप्रमाने ही तफावत वाढणारच आहे.
सध्याला तरी संपूर्ण जगात पुरुषप्रधानतेचा सूर्य अगदी डोक्यावर आहे. माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात. वडीलांची संपत्ती त्यांच्या नि आईच्या नावावर करणे, ही संपत्ती वारश्याने मुलींनाही समान प्रमाणात मिळणे, असे नसेल तर सासरचा वारसा मुलगी असल्याप्रमाणे (नवर्याला तसेच स्वतःला वेगवेगळा) मिळणे, मूल जन्मण्यापूर्वी न नंतर मिळून किमान दोन वर्षे संपूर्ण फायदे नि संपूर्ण पगार मिळणे सुट्टीसहित मिळणे, आपल्या पालकांना आपल्याजवळ ठेवण्याचा अधिकार असणे, आपले काही उत्पन्न त्यांना देण्याचा अधिकार असणे, चांगल्या नोकर्या सोडाव्या लागतात अशा बदल्या टाळणे, आपल्या उत्पन्नाचा हिशेब नवर्यापासून वेगळा ठेवणे, घरगुती निर्णयांची लेडिज लिस्ट व कंकरंट लिस्ट बनवणे हे खरे विषय असायला हवे. हे फार बेसिक झालं. यानंतर त्या वर दिलेल्या ११ उदाहरणांसारख्या निर्णयप्रक्रिया.
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
नि अजून एक - केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?
प्रतिक्रिया
27 Jun 2014 - 5:33 pm | पिलीयन रायडर
मी खुप मन लावुन लेख वाचला.. काही ठिकाणी भाषा अगदी जटील आहे.. थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत असतं तर बरं झालं असतं.. पण एकंदरीत चर्चा प्रस्ताव चांगला आहे..
तुम्हाला असं म्हणायचय का की पुरुषप्रधान सिस्टीममध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) त्याच्या तुलनेत समताप्रधान कुटुंबामध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) ह्याची तुलना व्हावी, कारण वरकरणी वाटलं तरी समताप्रधान कुटुंब अन्यायमुक्त (किंवा तुलनेनी कमी अन्याय होत असणारं) असेलच असं नाही (कारण तुम्ही वानगी दाखल दिलेले ११ प्रश्न..)
मुळात कोणतीही सिस्टीम फ्लॉलेस नसतेच. त्यामुळे कोणत्याही सिस्टिम मध्ये कुणा न कुणावर अन्याय होत रहाणार हे नक्की. त्यात सुद्धा अन्याय हा कोणत्या एका पक्क्या सुत्राने मोजता येत नाही. स्थल-काल-लिंग सापेक्षता वगैरे मुद्दे तिथे असतात. (केवळ काय मोजतोय ह्याबद्दल नाही तर "कोण" मोजतोय ह्याबद्दल् सुद्धा). त्यामुळे अशी दोन सिस्टीम मधल्या अन्यायाची काटेकोर तुलना करता येईल का हा मुळात मला पडलेला प्रश्न आहे..
पुरुषप्रधान सिस्टिमला जो स्त्रियांकडुन विरोध होतो त्यावर मी एक स्त्री म्हणुन भाष्य करु शकते. (आणि ती सर्वस्वी माझी मते आहेत.. कुणाला दिलेले सल्ले अथवा आरोप नाहीत.. त्यामुळे माझी विधाने केवळ माझे अनुभव असल्याने त्यांना सिद्ध करुन दाखवायची माझी जवाबदारी नाही कारण ती मान्य कराच असा माझा आग्रह नाही)
स्त्री म्हणुन पुरुषप्रधान सिस्टीमला जो विरोध असतो तो केवळ "लिंग" ह्या एका मुद्द्यावर नसावा. इथे मुळात एखाद्याचे जगण्याचे, विचारांचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे हा एक मोठा मुद्दा आहे. "केवळ पुरुष आहे" ह्या एका गोष्टीसाठी अनेक अधिकार पुरुषाकडे असतात. कुटुंब व्यवस्था सोयिस्कर असावी म्हणुन निवडालेला तो एक पर्याय जरी मानला तरी त्यात केवळ गोंधळ नको म्हणुन एकहाती कारभार सोपोवणे हा एकच उद्देश नाही (किंवा उद्देश काहीही असला तरी त्याचा केवळ तोच एक परिणाम नाही). ह्या मध्ये सत्ता हाती यावी म्हणुन "पुरुष ह्या लिंगाला प्राधान्य देणे" ही समस्या निर्माण होते आणि त्यामुळे स्त्री भ्रुण हत्या वगैरे प्रश्नांची मालिका सुरु होते (इथे स्त्रियांना जे काही मुलभुत प्रश्न आहेत.. गर्भात हत्या, आवश्यक शिक्षण न मिळणे. कुपोषण, स्वामित्वाच्या भावनेतुन आणि स्त्रीला भोगवस्तु म्हणुन पाहण्याच्या वृत्तीमुळे झालेले बलात्कार, हुंडाबळी, पळवुन नेऊन विकणे इ समस्या मला अपेक्षित आहेत..). बर एकाधिकार दिले म्हणुन कारभार सुरळित चालु आहे असे तरी आहे का? तर निश्चित नाही..
ह्या व्यतिरिक्त अजुन एक मुद्दा जो मला अत्यंत मह्त्वाचा वाटतो तो असा, की कुटूंबव्यवस्था, समाज सुरळित चालु रहाणं हे महत्वाचं आहे, त्यासाठी व्यक्तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एखादया व्यक्तिच्या आयुष्यात नक्की कुठवर आपण ह्या व्यवस्थांचा हस्तक्षेप चालवुन घेऊ शकतो? म्हणजे माणुस म्हणुन आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर आवळले जाणार असेल तर ती सिस्टीम एक फेल्युअर नाही का? तुम्ही म्हणता की हॉस्टेलची पाटी वाचल्या प्रमाणे एका कुटुंबातली नावे नकोत.. पण Does it really matter? असलीच चोघांची नावं अत्यंत वेगवेगळी तरी त्याचा नक्की किती फरक पडतो? केवळ सोय म्हणुन, किंवा वाचायला बरं (रिदमिक विथ ऑदर मेम्बर्स) वाटतं म्हणुन एखाद्याचं नाव बदलुन टाकणे योग्य ठरते का? तुम्ही मुळचे कुठले ह्या प्रशाचे उत्तर ८-१० पिढ्यानंतर पण देता आले पाहिजे म्हणुन हा खटाटोप करायचा? आणि मग त्या उत्तरासाठी "स्त्री ने लग्न झाले की माहेर विसरून सासरच आपले घर मानावे आणि स्वतःला त्या वंशात विरघळवुन टाकावे" अशा मानसिकतेचा उदय होतो. पण मुळात "तुम्ही मुळचे कुठले" हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे का की ज्या साठी त्या घरात येणारी प्रत्य्के स्त्री गरजे पलीकडे बदलुन जाते?
तुम्ही सिस्टीम कोणतीही निवडा, पण त्यात व्यक्तिस्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर (आणि गरजेपेक्षा जास्त) धोक्यात येणार असेल तर ती माझ्या दृष्टिने फेल्युअर आहे.
बाकी तुम्ही जे ११ प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व घरांमध्ये एकच एक उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे.. तशी न मिळणं ह्यालाच आयुष्य म्हणतात ना...
27 Jun 2014 - 5:51 pm | arunjoshi123
आपल्याला पूर्ण आशय पोचला त्याचा आनंद आहे. आपली जवळजवळ सारी वाक्यं पटणेबल आहेत. एखाद्या विचाराबद्दल अजून काही सुचलं तर अवश्य लिहिन.
2 Jul 2014 - 5:55 pm | मराठी कथालेखक
2 Jul 2014 - 5:57 pm | बॅटमॅन
यात नक्की काय अनझेपेबल आहे ते जरा टेलाल का हो कृपया?
2 Jul 2014 - 7:27 pm | हाडक्या
त्यांच्या अभिव्यक्तीचा तो आविष्कार आहे.. तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंन्त्र्याचा आदर करणार की तुमची 'दाताला खडा' लागल्यासारखी सेन्सॉरशीप लादत बसणार ? ;)
27 Jun 2014 - 6:09 pm | आतिवास
'लिंग' (सेक्स - स्त्री आहे की पुरुष) आणि 'लिंगभाव' (हिंदी भाषेत त्याला 'सामाजिक लिंग' असे म्हटले जाते) या दोन वेगळ्या संज्ञा आहेत - त्यांचा संबंध आहे पण त्या वेगळ्या आहेत.
सामान्यतः लिंगभावाबद्दल चर्चा होत असते.
'लिंगभाव' म्हणजे थोडक्यात सांगायचे तर: व्यक्तीचे लिंग केंद्रस्थान घेते आणि तिच्या/त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात (मोठ्याने बोलू नये, रडू नये इत्यादी) ; कामाची विभागणी होते (स्वयंपाक, नारळ फोडणे इत्यादी) ; विविध साधनं कोणाला प्राधान्याने मिळणार (शिक्षण इत्यादी) हे ठरते, साधनांवर मालकी कोणाची हे ठरते (शेती, घर), निर्णय कोणी घ्यायचे हे ठरते... इत्यादी.
'लिंग' बदलत नाही, ते बदलावे अशी अपेक्षाही नाही; 'लिंगभाव' व्यवहार बदलतो - तो सगळीकडे सारखा असत नाही. पुरुषप्रधान रचनेत एका विशिष्ट प्रकारची लिंगभाव व्यवस्था आहे - असमानता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या लिंगाधारित गरजा (बाळंतपण, राजकीय सहभागाची संधी इत्यादी) लक्षात घेणे म्हणजे 'भेदभाव' नाही. (तुम्ही हे म्हटले नाही इथे, पण जाताजाता लिहिले.)
पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थक फक्त पुरुष असतात असे नाही, स्त्रियाही असतात; लिंगभाव धारणा बदलायला हव्यात असे फक्त स्त्रियांना वाटत नाही, अनेक पुरुषांना वाटते. सर्व स्त्रिया स्त्रियांबाबत संवेदनशील असतील असे नाही, सर्व पुरुष स्त्रियांच्या प्रती असंवेदनशील असतील असे नाही.
संवेदनशीलता, परस्पर आदर नसतो तेव्हा अकराच काय अकरा हजार प्रश्न निर्माण होतात... संवेदनशीलता आणि परस्पर आदर असेल तरीही प्रश्न निर्माण होतातच पण त्यातून मार्ग काढला जातो.
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!
27 Jun 2014 - 7:49 pm | रेवती
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!
भयानक सहमत. माझ्याच निर्णयामुळे आलेली अडचण कशी निस्तरावी या विचार अनेक वर्षे करत होते. परवा सकाळी झोपेतून उठल्यावर त्याचे पर्फेक्ट असे नाही पण चांगले असे उत्तर मिळाले होते. ते श्रेय मात्र माझे नाही. आपण अनेक पुस्तके, लेख, चांगले विचार, मुलाखती ऐकत, वाचत असतो. काही गोष्ती डोक्यात बसतात ते नेहमीच आपल्याला कळत नाही. पण त्या सगळ्यातून आपण (मेंदू)प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो, नकळतपणे आणि असे एखादे दिवशी ते समोर येते, जेंव्हा ते एक्सपेक्टेड नसते. परवाचा सगळा दिवस मनातल्या मनात आश्चर्य करणे, मनाशी हसणे यात घालवला (म्हणजे बाकीही कामे केली हां). ;) कोंडीबद्दलही नाही लिहित.
27 Jun 2014 - 9:14 pm | शेखर काळे
रेवतीताई,
तुमचा उत्क्रुष्ट प्रतिसाद मनात जाउन बसला आहे.त्याला दाद दिल्याविना राहवले नाही.
- शेखर काळे
27 Jun 2014 - 8:58 pm | साती
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
मूळात समताप्रधान अशी समाजव्यवस्था अजूनतरी भारतात निर्माण झाली नाही.
जिथे समताप्रधान व्यवस्था असल्याचे भासते ती 'कमी पुरूषप्रधान' व्यवस्था असते.
जर समताप्रधान व्यवस्था झाली तर तिचा पायाच इतका सामंजस्याचा असेल की असे प्रश्नं निर्माणच होणार नाहीत.
(हे मी बहुसंख्यांकांच्या बाबतीत लिहित्येय, ईशान्येकडील राज्यात अजूनही काही ठिकाणी स्त्रीप्रधान व्यवस्था आहे आणि तिथली समताप्रधान व्यवस्था ही कमी स्त्रीप्रधान असेल याची जाणीव आहे)
तसे तर हॉस्टेलला रहणारे रूममेट मित्रं मैत्रिणीसुद्धा एकमेकांबरोबर थोडे काँप्रमाईज आणि थोडे मॅनिप्युलेट करून रहातो.
इथे तर अख्ख्या जीवनाचा आणि संसाराचा प्रश्नं आहे.
त्यामुळे कुठल्याही सहजीवनात येऊ शकतील असे इश्यूज इथेही येणारच.
ते सोडवायचे कसे हा मुख्य मुद्दा आहे.
बरं हे सोडवतानासुद्धा पारंपारिक वर्चस्ववाल्या गटाने 'मी खरंतर पडतं घ्यायला नको/घेतलं नसतं पण समानतेपायी घेतोय' असा मोठेपणा घेतला जाण्याची किंवा दुसर्या बाजूने दिली जाण्याची शक्यता जास्तं असते.
'माझे मिस्टर सकाळी भाजी चिरून देतात' हे कौतुकाने संगितलं तर पुप्र मानणारी स्त्री.
'मी बायकोला अगदी भाजीही चिरून देतो' असे म्हणणारा पुप्रवाला पुरूष.
खर्या समानतावाल्याना यात काही विशेष सांगण्यासारखे आहे असेही वाटणार नाही.
मग तू घरी किती पैसे दिलेस का दिलेस इ. विचार फक्तं एक व्यवहाराचा भाग म्हणून होतील त्याला रुसवेफुगवे मानापमान याचं ड्रेसिंग लागणार नाही.
त्यामुळे खरी समताप्रधान व्यवस्था जेव्हा येईल तेव्हा त्यात पुरूष व स्त्री यांपैकी कुठल्याही व्यवस्थेत येणारी घुसमट अज्जिबात येणार नाही.
28 Jun 2014 - 5:18 pm | कवितानागेश
मला काही किचकट चर्चा जमत नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात येतेय,
कुटुंबसंस्था ही लहान मुलांच्या सुरक्षित वाढीसाठी आणि म्हातार्या माणसांच्या आधारासाठी आणि काही प्रमाणात 'हक्काच्या' सोबतीसाठी निर्माण झालेली/ केली गेलेली आहे.
या अश्या कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना मात्र मूळात या कशाची तत्क्षणी गरजच नसते. ते केवळ स्वतःच्या सोयीचा/ मनाचा विचार करुन मुक्त राहू शकत असतात. पण त्यांनी त्यांच्या भूतकाळात या संस्थेचा फायदा घेतलेला असतो, आणि भविष्यकाळातही मिळणार असतो.
अशा वेळेस समाज बांधून रहाणं, सुरक्षितता आणि त्यायोगे होउ शकणारी प्रगती यादेखिल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याकडे दुर्लक्ष होताना दिसते...
ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी जर का जे काही आहे ते 'आपलं' आहे आणि 'आपल्यासाठी' आहे, असा विचार केला तर फारसे प्रश्न पडत नाहीत. जर का ' हे 'मला' किती फायदेशीर होईल?' असा विचार केला तर रस्सीखेच जास्त जोरात सुरु होईल...
आणि ती कायम सुरु रहाणार! कारण 'मी' विरुद्ध 'आपण' हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी समोर येतोच.
त्याचे उत्तर कालपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे बदलतं.. अमुक एक मान्य करणं योग्य आणि अमुक एक कृती करणं अयोग्य असं आपल्याला खरोखरच कधी ठरवता येइल का, हे माहित नाही.
28 Jun 2014 - 8:34 pm | पैसा
जिवंत माणसांचा प्रश्न येतो तिथे २+२=४ असं उत्तर नेहमीच मिळत नाही. कधी उत्तर १ असेल तर कधी ६. प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा.
पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही. गावातल्या अशिक्षित स्त्रिया अख्खं कुटुंब चालवत असतात हे अनेकदा पाहिले आहे. सुशिक्षित उच्च वर्गीय कुटुंबातही समानता असमानता दोन्ही प्रकार असतात. हा प्रत्येकाच्या जडणघडणीचा, विचारांचा भाग आहे.
इतर बहुतेक गोष्टी स्त्री -पुरुष कोणीही करू शकत असले तरी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे आणि काही वर्षेपर्यंत त्याचे संगोपन करणे हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यासाठी तडजोडी तिलाच कराव्या लागतात. (मुलांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणा पुरुषाने करियर सोडलेली फार उदाहरणे आजूबाजूला दिसत नाहीत.) इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फार फरक असतो. ते जर कोणाला नको असेल तर मुले न होऊ देणे हा पर्याय उपलब्ध आहेच.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे.
पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही. कारण ते फारच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचं नातं राहील. जो/जी घटक पैसे मिळवत नाही त्याला सतत दबून रहावं लागेल. जिथे आर्थिक विषय महत्त्वाचे होतात तिथे मानवी नातं मागे पडतंच. तसाही इन्कम टॅक्समुळे जमाखर्च आणि इन्वेस्टमेंट्स वेगळ्या ठेवाव्या लागतातच पण घरातले खर्च अगदी वेगळे ठेवता येत नाहीत.
इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्याच्या गावीही नसते.
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
पुन्हा नाही. ती मानवी प्रवृत्ती आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीने वेगळी नावं देतो. शेवट सगळा पॉवरचा, सत्तासामर्थ्याचा आणि संघर्षाचा खेळ आहे.
29 Jun 2014 - 2:42 pm | arunjoshi123
प्रत्येक कुटुंब प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकत नाही. सहसा समाजात काय चालले आहे याचा मोठ्या निर्णयांसाठी आधार घेतला जातो.
सहमत. मी ही असंच म्हटलं आहे.
हे फारसं पटलं नाही. भारतातल्या सर्वात धुरंधर स्त्रीवादी स्त्रीच्या आईच्या नावाने काहीच संपत्ती नसायचीच शक्यता जास्त आहे. " ते समजूनदार पालक आहेत म्हणून त्यांची संपत्ती विभागणे मला गरजेचे वाटले नाही" असे सांगण्यात येईल. याउलट स्त्रीने जीन्स घालू नये असे कोणी म्हटले तर सगळ्या चवताळून उठतील.
मी असा सल्ला दिला नाही. प्रश्न केला आहे. दोघे कमावत असतील, क्षःय रेशोमधे, घरात प्रत्येकाचे वेगवेगळे, एकत्रित खर्च, इ इ ब क ड ई असतील तर निर्णय कसे करणार?
जगातली बहुसंख्य कुटुंबे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावरच चालतात. स्त्रीप्रधान, पुरुषप्रधान वा लिंगनिरपेक्ष अशी कोणतीही व्यवस्था असती तर त्यांना फरक पडला नसता. पण सबब लेखात त्यावर चर्चा करायची नाही. प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते.
पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते. आपण हुंड्याचे उदाहरण घेऊ. मी खालील निरीक्षणे मांडू इच्छितो.
सामान्य कुटुंबांत-
१. स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते.
२. हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल.
३. हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये. संपत्ती पुरुषाकडेच असली तरी कोणाला किती मुली, किती मुले होतील हे सांगता येत नाही.
ज्या कुटुंबांत पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदा घ्यायची वृत्ती आहे-
४. हुंडाबळींची संख्या (मुलीच्या सासरच्या मागण्या न पुरविल्याने, इ) ही हुंडाबळी न ठरलेल्या मुलींच्या मानाने नगण्य असते. या कुटुंबांमधे पुन्हा मुलीच्या पित्याला कर्ज घेऊन, शेत विकून, दागिने विकून, इ इ त्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या असतात. इथे पुरुषप्रधानता केवळ एक निमित्त आहे. मूलतः एका गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संबंध साध्या लोकांशी आला आहे.
५. हुंडा द्या, लवकर द्या, जास्त द्या, इ इ संदेश तीव्र करण्यासाठी जे एक्झिक्यूटीव ऑफिसर असतात त्यांत नवरा हा एकच पुरुष असतो. बाकी स्त्रीयाच असतात. विशेष करून अशाच परिस्थितीतून गेलेली सासू असते. यात लिंगाचा नि हुंड्याचा संबंध दिसतो का? काहीच नाही.
ही सगळी मेस का निर्माण झाली आहे? कारण वारश्याचे नियम नीट नाहीत म्हणून. आदिवास्यांत पोरगीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. त्याचे रेट, नियम फिक्स असतात. म्हणून त्यांच्यात असले गुन्हे होत नाहीत. स्त्रीप्रधानता + व्यवस्थित नियम + प्रोटोकॉल्स अशी ती सिस्टिम आहे.
जी किमान मानवी गुन्हेगारी असणारच आहे, तिचे खापर व्यवस्थेवर (इथे पुरुषप्रधान) फोडू नये. पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्टॅट देत, पोलिस फोर्स डिसबँड करावा असे म्हणू नये. ही चर्चा मेरिट बसिसवर असावी.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल. माझं असं मत आहे कि काही व्यवस्था काही इतर व्यवस्थांपेक्षा जास्त इफेक्टीव असतात. ज्या व्यवस्थांत खासकरून कोणतेच पायंडे नसतात त्या अधिकच अन्यायकारक असतात, कारण त्या सद्य भारतीय लोकशाहीपेक्षाही वाईट चालतील. इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे. कृपया समजूतदारपणाचा इश्श्यू मधे आणू नका. आपण थोड्या गडबड लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्यामुळे समाजात अन्यायाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
उदा घेऊ. परिस्थितीचा फायदा घेऊन कमी जास्त अन्याय करायला २०% लोकांना (१०% स्त्रीया, १०% पुरुष) आवडते असे समजू. समाज लिंगनिरपेक्ष आहे नि केव्हाचा पुरुषप्रधानता विसरला आहे असे समजू. एकत्र कुटुंबे नाहीत नि प्रतिजीवनात २-३ घटस्फोट फार काही नाहीत असे समजू. वैवाहिक लैंगिक निष्ठा अजूनही प्रचलित आहे असे समजू. 'रोजची गैरसोय' टाळण्यासाठी ऑपरेशन करायचे आहे. कोण करायचे यासाठी काहीही बेंचमार्क उपलब्ध नाही असे समजू. हे ऑपरेशन इर्रिवसिबल आहे असे समजू. कोणी करायचे? स्त्रीने? पुरुर्षाने? दोघांनी? घटस्फोटानंतर या ऑपरेशनच्या स्टॅटस्मुळे दुसरा साथी मिळतो का नि त्यास मुले हवीत का असे प्रमुख यांच्यापुढे प्रश्न असतील.
मी हे मुद्दाम कृत्रिम उदाहरण दिले आहे पण आज जशी आपण स्त्रीयांवरील अन्यायाची उदाहरणे देत आहात तसे उद्या "ज्यांच्या स्पाऊसने मुलाला आपले मिडल नेम लावू दिले नाही" अशांवरील अन्यायाची उदाहरणे देत ग्रुप असतील आणि त्यांची सदस्यसंख्या आजच्या मानाने शेकड्याने जास्त असेल.
सहमत.
29 Jun 2014 - 7:43 pm | पैसा
बर्याच अंशी सहमत आहे. आता खरे तर हुंडाबंदी कायदे आहेत. मुलींना पित्याच्या संपत्तीमधे वारसा आहे. हुंडाबळी जाऊ नये म्हणून शक्य तेवढे काळजीपूर्वक कायदे केले आहेत. तरीही गुन्हे होतात. याची तुलना ड्रग्ज घेणे/खून यासंबंधीचे कायदे असले तरी हे गुन्हे होतात याच्याशी करता येईल.
हे जरा गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
मला वाटते, स्त्रीधनात फक्त आईबापाकडून आणि सासरच्या लोकांकडून लग्नात मिळालेले जे दागिने स्त्री वापरते त्याचाच समावेश होतो. पूर्वीच्या काळी मुलींना पैतृक संपत्तीमधे वारसाहक्क नव्हता त्याकाळात या ना त्या स्वरूपात मुलीला संपत्तीचा काहीतरी भाग द्यावा म्हणून दागिने देण्याची पद्धत सुरू झाली. पुढे काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या हावरटपणामुळे त्याचे हुंड्याच्या जाचक प्रथेत रूपांतर झाले. इतर गोष्टी जसे की रोकड/फ्लॅट्/गाडी/फर्निचर्/सासरच्या इतर नातेवाईकांना दिलेल्या भेटवस्तू यांचा समावेश हुंड्यात होतो, पण ते स्त्रीधन नसते. त्या वस्तू सासरचे इतर लोक वापरतात.
स्त्रीधन सर्वात शेवटी वापरले जाते यामागे जास्त भावनिक कारणे असतात. अनेक स्त्रियांकडे मंगळसूत्र/दोनेक बांगड्या याशिवाय काहीच नसते आणि हे सौभाग्यालंकार समजले गेलेले दागिने गहाण टाकणे/विकणे अशुभ समजले जाते. वगैरे. मात्र इतर जास्तीचे दागिने अनेक स्त्रिया घरातील कॅश संपल्यावर आपणहून वापरायला देतात.
मुस्लिमांमधे मेहेर नजर हा प्रकार आहे तो या स्त्रीधनाच्या जवळपास जाणारा वाटतो. तलाक झाल्यास त्यांना तो स्त्रीला परत करावा लागतो. मुस्लिम लोकांत अजूनही स्त्रियांना वारसाहक्क नाही (बहुतेक). यासाठीच जिना हाऊसच्या केसमधे बॅ. जिनांच्या मुलीने आपण मुस्लिम नसल्याचे कोर्टात सांगितले होते.
संपत्तीमधे समान अधिकार जरूर आहे. तसाच हुंड्याविरोधात कायदा आहे. स्त्रिया अनेक कारणांनी तो वापरत नाहीत.
हे पटले नाही. लग्न करणारा पुरुष आपल्या मुलीवर आणि आपल्यावर उपकार करत आहे, या भावनेने आपली मुलगी 'खपावी' म्हणून दिलेली लाच आहे एकप्रकारे. जर पुरुषप्रधानता नसती तर हुंड्याचा जन्मच झाला नसता. काही आदिवासी जमातीत याउलट स्त्रीचे मूल्य तिचा नवरा तिच्या बापाला चुकवतो. कारण तिथे पुरुषप्रधानता नसते.
मात्र कोणत्याही कारणाने सुरू झालेल्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण आहे. जोपर्यंत गुन्हेगारीची प्रवृत्ती जिवंत आहे तोपर्यंत या नाही त्या प्रकारे ती सुरू राहील हे मान्य.
सहमत.
होय.
मला वाटते तुम्हीही हेच सांगत आहात की गुन्हेगारी प्रवृत्ती ही लिंगनिरपेक्ष असते. बहुधा, ही गुन्हेगारी कशी सुरू झाली याबद्दल आपली मते जुळणारी नसली तरी सध्याच्या स्थितीबद्दल जुळणारी आहेत.
2 Jul 2014 - 3:21 am | रामपुरी
पहिली थोडीच वाक्ये वाचली कारण
यापेक्षा मला हिंदी आणि इंग्रजीच्या मराठीवरच्या आक्रमणाचा प्रश्न मोठा वाटतो.
2 Jul 2014 - 11:45 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. आपत्तीच्या ऐवजी आक्षेप असा मराठी शब्द लिह्हीता आला असता. पण असूद्या. बहुधा, लेखक मराठीतच, महाराष्ट्राबाहेरच वास्तव्यास असतात.
3 Jul 2014 - 3:50 am | भृशुंडी
भाषेची शुद्धता पाळत बसणं हा संपून जायचा सोप्पा मार्ग आहे. तेव्हा करा हो जरा इकडचे तिकडचे शब्द स्वीकार.
3 Jul 2014 - 10:18 am | ऋषिकेश
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही
२. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
4 Jul 2014 - 12:40 pm | arunjoshi123
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील राज्यव्यस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही
२. राष्ट्र संस्थेला कोणी एक 'शास्ता' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
असे काहीसे वाचल्यासारखे वाटले. असो.
4 Jul 2014 - 12:38 pm | arunjoshi123
भाषेबद्दल -
प्रमाण भाषा अचूकपणे येणे बर्यापैकी अवघड आहे. त्यासाठी थोडे नशीब, थोडे कष्ट लागतात. शिवाय संकल्पनेचा आशय नीट मांडण्यासाठी एक प्रकारची प्रतिभाच लागते. ती अनेकांना नसते. (ती कैकांना हासिल होत नाही म्हणणार होतो.) एकतर गावात, वर लातूरकडे वाढल्याने, जिथे अशुद्ध वाणी भाषा बोलतात, पेशवे म्हणतात त्याप्रमाणे बराच काळ दिल्लीत वास्तव्य असल्याने, घरातही हिंदी बोलत असल्याने, विचारही हिंदीत करत असल्याने, एकतर आधीच मराठी टायपणे क्लिष्ट, शिवाय पलटून सगळ्या वाक्यरचना दुरुस्त करत बसणे कंटाळवाणे असल्याने अशा वाक्यरचना होतात. नाईलाज आहे. पण चालून जावे.
4 Jul 2014 - 12:43 pm | बॅटमॅन
चालायला हर्कत काहीच नाही. फक्त काहीवेळेस असे होते की महाराष्ट्रात वाढलेल्या आणि आजन्म महाराष्ट्राबाहेर न राहिलेल्या लोकांकडूनही हिंदी प्रभाव असलेले शब्दप्रयोग होतात तेव्हा ते जास्त खटकतं. बाकी महाराष्ट्राबाहेर बराच काळ वास्तव्य असलेल्यांना याचा गंड बाळगण्याचे आजिबात म्ह. आजिबात कारण नाही. हिंदी लहेज्यातली मराठी ऐकायला आणि वाचायलाही तशी मस्त वाटते. (विशेषतः एमपीच्या मराठी पोरींची.....आहाहा नका, नका आठवण करून देऊ!!)