गेल्या आठवड्यात तळेगांव -दाभाडे , जिल्हा पुणे येथील एका शासकीय कार्यालयात जाण्याचा (कु) योग आला. निमित्त होते आमच्या नव्या सदनिकेचे नोंदणीकरण ! अस्मादिकांबरोबर विटूकाकु , बिल्डर आणि त्याच्या वकीलीण बाई !
दिवस मे महिन्यातला अस्ल्याने सकाळी दहा वाजता तळेगांवात सुद्धा प्रचंड उकडत होते.आभाळ आल्याने आणि आदल्यादिवशी चार शिंतोडे पड्ले असल्याने वातावरण प्रचंड दमट होते. पण नव्या घराची खरेदीचा आमचा उत्साह आणि "कसा पटवला" याचा बिल्डरचा आनंद यामुळे आम्ही सारे जण तसे खुषीत होतो.
ठरल्याप्रमाणे अगोदर महामार्गावर भेटून बरोब्बर १० वाजता मध्यवर्ती तळेगांवात त्या खास शासकीय इमारतीत पोहोचलो.ही इमारत थेट जी.ए.च्या कथेतल्या प्रमाणे बनवून घेण्यात आली असावी. खाली पोष्ट आणि वर रजिष्ट्रीचे हाफीस अशी योजना होती. गाडी लावयला जागा शोधतानाच पहिला अनुभव आला."हिथं गाडी लावायची नायं" रस्त्यावर कपडे धुणार्या माता-भगिनीनीं खास मावळी हेल काढून स्वागत केले. बिल्डरचा माणूस हुषार ( तो असतोच ) , त्याला तिथली सवय होती , त्याने बरोबर नेमकी जागा शोधून दिली.
घाम पुसत इमारतीच्या आत प्रवेश केला. समोर जळ्मटं लागलेली उद्घाटनाची फरशी .. तेच ते .. आपले दादा. त्यांनी हुद्घाट्न केले होते .. म्हणजे इमारत ह्या ८-१० वर्षातील असावी , पण कळा मोगल-कालीन होती. अमोनियाच्या भपकार्याने आमचे स्वागत केले. सबंध इमारतभर तो भपकारा भरुन राहीला होता. सार्या इमारतीला कोळेष्टके लागली होती.दादा येऊन गेल्यानंतर पुन्हा तिथे केर्सुणी फिरली नसावी.
वास्तविक या इमारतीत रोज ( हो रोज )करोडोंची उलाढाल होते. रोजचे (हो रोजचे) इथले सरकारी उत्पन्न काही लाखांच्या घरात असेल,(तिथला कारकूनच लाखभर कमवत असेल!) असे म्हणतात लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागा अतिशय स्वच्छ असावी लागते पण आपले शासन धर्मनिरपेक्ष असल्याने असल्या फुटकळ धार्मिक बाबींना थारा नाही.
आपल्या घराचे नोंदणीकरण करायचे म्हणून आम्ही पंच पंच उषः काली सुस्नात होऊन ठेवणीतले कपडे घालून पुण्यनगरीतील ग्राम दैवताचे स्मरण करुन आलो होतो.. पण त्या इमारतीत पाय ठेववेना !
आमच्या चेहर्यावरचा तिरस्कार वाचून बिल्डरचा माणूस अजीजीच्या स्वरात म्हणाला .. झालेच .. आपले पेपर रात्रीच तयार केलेत आपला नंबर लगेच येईल.!
वरच्या मजल्यावर उजव्या हाताल एक अंदाजे २० बाय २० चा हॉल ! तिथे एका कडेला रांगेने सरकारी माणसे आपले कळकट अवतार आणि त्याहून कळ्कट फाय्ली रचलेल्या टेबलामागे बसली होती. पंखे फक्त त्यांच्याच डोक्यावर गरगरत होते !
बाकी पब्लिक उरलेल्या जागेत ! विरुद्ध बाजूला पब्लिक्साठी खुर्च्या ठेवल्या होत्या.. वातावरणात प्रचंड उकाडा होता.. आणि भरुन राहीलेला घाणेरडा वास.. ..! पंखे नाहीत , पाणी पिण्याची सोय नाही .. एका स्टील च्या पिंपात पाणी भरुन ठेवले होते पण तसले पाणी प्यायला हिम्मत होत नव्हती . स्वच्छता गृहाकडे तर पाहण्याची देखील माझी हिंमत झाली नाही. हॉलला एक बाल्कनी होती, तीच्या दोन्ही बाजूना थुंकून घाण केली होती . त्यात अंग चोरुन उभे रहावे तर मोबाईलवर बोलणारी जन्ता आपल्या कानात कोकलु लागे ! (मोदींना विनंती की ताबडतोब मोबाईलचे दर १० पट वाढवावेत!)
खुर्च्यांचे पाय एकेमेकांला बांधले होते त्यामुळे खुर्ची ओढून थोडे मोकळे बसावे तर ते ही शक्य नव्हते ! त्यातच आज वडगांवचा काम्प्युटर बंद असल्याने ती गर्दी इकडेच येते आहे असे शुभवर्तमान कळाले ! बातमीबरोबरच लोक ही धडकले ! आता त्या हॉलला स्वारगेटच्या फलाटाची कळा आली. त्या तसल्या गर्दीत आमच्या सारखे सुस्नात होऊन आलेले अनेक उत्साही चेहरे होते, लेकुरवाळ्या होत्या , आजी - आजोबा होते. त्यांचे चेहरे आमच्यासारखेच " चिरुन टाक ही मान " अशा अवस्थेत ! कधी एकदा आमचं होतेय हीच चिंता ! त्या जागेवरून अक्षर: उचलून टाकल्यासारखे होत होते . आपले काम कधी एकदा होतयं याचीच सर्वजण वाट पहात होते... स्नशानात पूर्वी कवटी फुटीपर्यन्त थांबावे लागे , तिथेही लोक इतके व्याकुळ होत नसावेत.
आमचा लंबर लागेल म्हणून आम्ही उभयतांही व्याकूळ होऊन उठत बसत होतो. बरं नंबर कधी लागणार हे ही कळत नव्हते ! वाट पहाणे हा नरकच ! पण अनिश्चित काळासाठी वाट पाह्णे म्हणजे कुंभीपाक + रौरव, असा डबल ट्रबल ! सरकारी कारकून आणि बिल्डरची माणसे यांची लगबग सुरु होती. आम्ही आपले वाट पहतोय .. तरी बिल्डरचा माणूस सारख्री अपडेट देत होता. आता पेपेर तयार झाले . आता साहेब येतीलच .. आता शिक्के मारू .. वगैरे वगैरे .. मध्येच दोन - चार तालेवर माण्से आली सह्या केल्या आणि निघून पण गेली... खाली मर्सिडीज लावली होती .. त्यावरुनच लक्षात आले.. आम्ही आपले तिथेच .. दीन .पतित !
साडेबाराच्या सुमारास एकदाचे आमचे नशिब उघडले .. आम्हांला दोघांनाही उत्तम सही करता येते पण आमचे सहिशिवाय फोटो आणि अंगठे ही घेतले. सौ. नी ती अंगठ्याची शाई थोडीशी आपल्या कपड्यानाही लावून घेतली. ( त्याचे झाले असे की तिथे बसलेला एक कळकट माणूस ज्याचा / जिचा अंगठा उठ्वायचा आहे त्याचा अंगठा हातात घेऊन जोराने प्याडवर दाबे .. आणि मग कागदावर उमटवे ..का तर म्हणे ठसा चांगला यावा ... त्याला हिने बाणेदारपणे नकार दिला. थोडी चीड-चीड झाली ..त्या नादात शाई - कपडे ..पर्स.. मोबाईल.. जाउ द्या ) वास्तविक आम्हां दोघानांही उत्तम लिहिता -वाचता येते तरी ही अंगठा का घेतला म्हणून विचारायची सोय नाही ... चुपचाप बिलडरचा माणूस सांगेल तिथे सह्या करत होतो.. साहेबाच्या उघड्या ड्रावर मधल्या नोटा मला दिसल्या नाहीत..पण प्रश्न विचारण्याची सोय नाही... लांडग्याच्या मागे शेळ्या जाव्यात तश्या अवस्थेत आम्ही तो कार्यक्रम एकदाचा पार पाडला. हुश्श !
उपचार म्हणून खाली उतरल्यावर बिल्डरला म्हटले , चला चहा घेऊ ! विटुकाकूने तो प्रस्ताव ताबडतोब फेटाळला , म्हणाली .. मी आता घरी जाऊन अंघोळ केल्याशिवाय काहीही खाणार -पिणार नाही !
चुप-चाप गाडीत बसलो ( बिळ्डर त्याच्या आणि मी माझ्या ) एसी फुल्ल केला आणि गाडी पुण्याकडे भरधाव सोडली ! महामार्गावर आल्यावर खिडकी उघडून छाती भरुन मोकळा श्वास घेतला ......
यानिमित्ताने मला पडलेले काही प्रश्न !
१. लोकांशी व्यवहार करणार्या सरकारी लोकांसाठी काही नियम आहेत की नाही ? रोज दाढी करावी , अंघोळ करावी आणि धुतलेले स्वच्छ कपडे घालावेत अशी किमान अपेक्षा लोकांनी करु नये का ?
२. जिथे पैशाचे व्यवहार होतात, जनता ग्राहक असते तिथे तरी किमान काही सुविधा असायला नकोत का ?
३. शासकीय इमारतींचे लेखा -परिक्षण होते का ?
४. इतक्या मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ऑन - लाइन करणे अशक्य आहे का ?
५. शासकीय कामाचा काही प्रोसेस फ्लो अथवा टाईम स्टडी असतो का ? ( आमचे कागदपत्र "ब्राऊनियन मूवमेंट" प्रमाणे एका टेबलावरुन दुसर्या टेबलावर फिरत होते . दर वेळी वाटे .. आता झाले बहुतेक ! )
६. काही टोकन सिस्टीम करता येणार नाही का ? लोकांना ( कस्ट्मर ) अनंत काळापर्यन्त ताटकळत ठेवण्याचे विकृत समाधान घेण्यात सरकारी कर्मचार्यांना काय आनंद मिळतो?
७. इतरत्र ही असाच अनुभव आहे का ?
८. आमचा पुण्याचा बिल्डर पोचलेला होता , त्याने संध्याकाळी सह्या करायला बोलावले. १० मिनिटांत मोकळे केले. बायको म्हणाली " नया है वह " असा बिल्डर गणिक सरकार भेदभाव का करते ?
९. मला या सबंध अत्याचाराची तक्रार करायची आहे. एक ग्राह़क म्हणून माझ्यावर अन्याय झाला आहे अशी माझी भावना आहे . अशी तक्रार कोठे करता येईल ? ग्राहक न्यायालयात ?
प्रतिक्रिया
15 May 2014 - 4:49 pm | कवितानागेश
ऑफिसमध्ये कुत्रे नव्हते का? की तुमचे लक्ष नव्हतं? पोस्टाची बिल्डिन्ग असली की कुत्री आतपर्यंत येतात.
मागे एकदा पनवेलला अशाच एका ऑफिसमध्ये कुठूनतरी एक पिल्लू मला शोधत येउन बरोब्बर माझ्या दोन्ही पावलांवर अॅडजस्ट होउन झोपून गेले होते ते आठवलं.. :)
15 May 2014 - 5:14 pm | आतिवास
उद्वेगजनक अनुभव आहे खरा.
हल्ली ब-याच सरकारी खात्यांची संकेतस्थळं असतात आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते. आपल्या प्रतिक्रियेचा दरवेळी उपयोगे होतोच असं नाही - पण दिल्ली मेट्रो, दिल्ली वाहतूक पोलिस, पुणे पोलिस अशा ठिकाणी माझी प्रतिक्रिया वाचली गेल्याचा, त्यानुसार काही बदल केले गेल्याचा अनुभव आहे.
'वाचकांची पत्रे' या सदरातही हा अनुभव मांडता येईल.
पण त्या कार्यालयात अजून काम बाकी असल्यास प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करावा ही एक (व्यावहारिक!) विनंती.
16 May 2014 - 1:19 am | मुक्त विहारि
आणि त्याजागी फीडबॅक द्यायची सोय असते.
सरकारी अनुभव
१. आमच्या चौकात ४ दवाखाने आहेत आणि रात्रंदिवस हॉर्नची जुगलबंदी चाललेली असते.त्या त्रासाबद्दलचा एक अर्ज ३/४ वर्षांपुर्वी लिहीला होता.त्याचा फीडबॅक पण आला. जवळ पास २२ सरकारी खात्यात तो अर्ज गेलेला आहे.तशी पोच मेल वर पण आली आणि पोस्टाने पण आली.
पण अजून पुढे काही ढिम्म हालचाल नाही.
२. विमानतळावर खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग मिळतात.१०/१२ रु,चा वडापाव बर्गर स्वरूपात ५०रु.त येतो.(आमचे ठीक आहे, आम्हाला कं. देते भरपाई.. पण गरीबांचे काय?) म्हणून अर्ज लिहीला.त्याची पोच मिळाली.पण पुढे कारवाई शुन्य.
प्रायव्हेट कं.चा अनुभव.
१. जेटने प्रवास असेल, तर आधी फीडबॅक फॉर्म मागायचा.एकाच्या जागी ३ पेग नक्की मिळतील.शिवाय उतरतांना एक पाण्याची बाटली (अमेरिकन स्प्रिंग वॉटर..किंमत १००रु.) आणि चकण्याची ३/४ पाकिटे मिळतात.
२. मेरू टॅक्सी सर्वीस, एकदा बूक करा.तुम्ही टॅक्सीत बसे पर्यंत सेवा देतात.इकडे टॅक्सीचे मीटर चालू झाले की मगच तिथला टेलीफोन ऑपरेटर आपला पिच्छा सोडतो.
जावू दे,
लायकी नसतांना पदोन्नती मिळाली आणि आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी गुर्मी सरकारी चाकरमान्यांत आणि सत्ताधार्यांत चढली की, भले भले देश पण कोसळतात.मग त्यात आपल्या हिंदूस्थानाने तरी मागे का रहावे?
15 May 2014 - 5:16 pm | प्रकाश घाटपांडे
आता या नोंदणी व मुद्रांक खात्यात आयजीआर म्हणुन श्रीकर परदेशी आले आहेत. http://igrmaharashtra.gov.in/default.aspx मला वाटत ते खात्याला बदलू पहात असतील तर खातेच त्यांना बदलून टाकेल.:) आता हे खाते ऑनलाईन सुविधा देउ पहात आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/rent/articleshow...
इथे मुलभुत सुविधांच्या नावाने बोंब आहे.आन हे हायफाय बनू पहातात.
5 Aug 2023 - 10:19 am | कर्नलतपस्वी
खात्याचा कायापालट करून पि एम ओ मधे ओढले गेले आहेत. मला तरी या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे.
15 May 2014 - 5:30 pm | चौकटराजा
आत मोदी प्रधानमंत्री होणार . मग भारतदेशात अनुशासन पर्व चालू होणार ! ( ते विनोबावाले अनुशासन पर्व वेगळे हो विटेकरानु ) .सगळे दक्ष आरम असे शिस्तीत चालणार.
15 May 2014 - 6:18 pm | विटेकर
अहो एकटे मोदी कुठे कुठे पुरे पडणार ?
त्यांना स्वकीयांनीच जेरीस आणले तर पुढे सगळीच वानवा आहे ..
....
असो ,,
आपण श्री साने गुरुजींच्या साथीने म्हणु या ..
ही माय थोर होईल
वैभवी दिव्य शोभेल
जगतास शांती देईल
तो सोन्याच दिन येवो !
15 May 2014 - 5:35 pm | सूड
ह्म्म्म !!
15 May 2014 - 5:44 pm | जेपी
विटुकाका नविन घर घेतल्याबद्दल अभिनंदन .ऍन्जॉय माडी.
15 May 2014 - 6:34 pm | विटेकर
धन्यवाद जे पी !
या सगळ्या गोंधळात तो आनंद साजरा करायचा राहूनच गेला.
बाकी कसलं घरं अन काय ..
मृत्तिका खाणोन घर केलें| तें माझें ऐसें दृढ कल्पिलें |परी तें बहुतांचें हें कळलें| नाहींच तयासी ||३४||
मुष्यक म्हणती घर आमुचें| पाली म्हणती घर आमुचें |मक्षिका म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३५||
कांतण्या म्हणती घर आमुचें| मुंगळे म्हणती घर आमुचें |मुंग्या म्हणती घर आमुचें| निश्चयेंसीं ||३६||
विंचू म्हणती आमुचें घर| सर्प म्हणती आमुचें घर |झुरळें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३७||
भ्रमर म्हणती आमुचें घर| भिंगोर्या म्हणती आमुचें घर |आळीका म्हणती आमुचें घर| काष्ठामधें ||३८||
मार्जरें म्हणती आमुचें घर| श्वानें म्हणती आमुचें घर |मुंगसें म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||३९||
पुंगळ म्हणती आमुचें घर| वाळव्या म्हणती आमुचें घर |पिसुवा म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४०||
ढेकुण म्हणती आमुचें घर| चांचण्या म्हणती आमुचें घर |घुंगर्डी म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४१||
पिसोळे म्हणती आमुचें घर| गांधेले म्हणती आमुचें घर |सोट म्हणती आमुचें घर| आणी गोंवी ||४२||
बहुत किड्यांचा जोजार| किती सांगावा विस्तार |समस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४३||
पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४||
पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५||
तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६||
समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७||
अवघीं घरें भंगलीं| गांवांची पांढरी पडिली |मग तें गृहीं राहिलीं| आरण्यस्वापदें ||४८||
किडा मुंगी वाळवी मूषक| त्यांचेंच घर हेंनिश्चयात्मक |हें प्राणी बापुडें मूर्ख| निघोन गेलें ||४९||
ऐसी गृहांची स्थिती| मिथ्या आली आत्मप्रचीती |जन्म दों दिसांची वस्ती| कोठें तरी करावी ||५०||
19 May 2014 - 12:24 pm | प्रसाद प्रसाद
ह्यावरून एक निश्चित, रामदास स्वामींनाही अशाच रजिस्टार लोकानी त्रास दिला असणार, म्हणूनच सगळ्या गोष्टींचा राग एकत्र निघालाय.......
15 May 2014 - 6:49 pm | आतिवास
उद्विग्नतेच्या नादात 'अभिनंदन' म्हणायचं राहून गेलं :-)
अभिनंदन.
(धन्यवाद जेपी!)
15 May 2014 - 6:15 pm | कंजूस
पूर्वी तळेगावात घर करण्याची फारच टूम निघाली होती .नंतर एक्सप्रेस वे पलीकडच्या अंगाने गेला नी आईटीकरांनी हिंजवडे आपले म्हटल्यावर तळेगावाकडे दुर्लक्ष होऊ लागले असं वाटतंय .काही भागातील कार्यालये फार छान झाली आहेत .नवीन एमपीएससी साहेब (महिला) आहेत .अंगठे ठशासाठी डिजिटल रेकॉरडर वगैरे आधारला वापरतात तशी यंत्रणा आहे .बिल्डरचा वकील नंबर लावून ठेवतो ,दोन साक्षीदारही तयार ठेवतो .आम्ही दोनवेळा डोंबिवलीत अनुभव घेतला .
15 May 2014 - 6:29 pm | कपिलमुनी
आमच्य तळेगावला नावे ठेवता ??
( कुठे आहे बर यांचा फ्लॅट *smile* )
तुम्ही नक्की तळेगावला गेला होता की वडगावला ?
कारण तळेगावामध्ये भूमि अभिलेख कार्यालय नाहीये..
बादवे हा आमच्य नगर पालिकेचा फोटो..इथे पोस्ट नाही..
आणि पुढच्या वेळेस येताना खरड टाका .. मावळी थाट करूया !!
15 May 2014 - 6:41 pm | विटेकर
आपल्या तळेगांवला कशी नावे ठेवीन ?.. सरकारी हाफिसाला नावे ठेवली.
आम्ही आता तळेगावचे सन्माननीय नागरिक ! आप्पा ( दांडेकर ) रहात होते तेव्हापासून आम्हांला तळेगावची ओढ !
आमचा फ्लाट - नभांगण ला ... ठंडा मामला च्या अल्याड .. टकले वस्ती ! अजून पूर्ण व्हायचा आहे.
पुढच्यावेळी येताना नक्की व्य नि करीन !
रच्याकने , तळेगांवचे ग्रामदैवत कोणते आहे ? नेटावर काहीही माहीती मिळाली नाही.
16 May 2014 - 8:34 am | चौकटराजा
तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ हे असून त्याची यात्रा दर गुढी पाडव्यास भरते. बाकी विटेकरश्री तळेगावच्या घरात एक कट्टा होणार आता ! का लगेच सहकुटंब रहायला जाताय ? माझे बालपण गेले तळेगावात.
15 May 2014 - 7:15 pm | जोशी 'ले'
ठाण्यात तरी बरा अनुभव आलाय..आजच नव्या घराची नोंदनी केली सकाळी 7.15 ची वेळ दिलेली 7.36 ला नोंदनी होउन बाहेर, बाकी स्कॅनींग करुन पेपर्स यायला वेळच लागतोय 5/6 दिवस घेतात..
15 May 2014 - 7:22 pm | डॉ. भूषण काळुसकर
नोंदणीकरण च्या निमीत्ताने काही पुण्यातील सरकारी कार्यालयात जाण्याचा योग आला होता. पण इतकी किळसवाणी परिस्थिती कुठे पाहण्यात नाही आली.एखाद्या कथेत वर्णन करावा यापेक्षासुद्धा हा प्रत्यक्ष अनुभव वाईट आहे.
घराला कितपत महत्व द्यावं हे सांगणार्या दासबोधातील समासामुळे द्दानात भर पडली. धन्यवाद
15 May 2014 - 7:26 pm | रेवती
हम्म्म्.....खरच वैताग आहे राव!
असो, तुमचे नवे घर झाले आहे. अभिनंदन!
विटुकाकूंना म्हणावे फार मनास लावून घेवू नका, नव्या घराच्या सजावटीचे कार्य हाती घेतल्यास या आठवणी विसरल्या जातील.
15 May 2014 - 8:27 pm | सुबोध खरे
आपण किती क्षुद्र आहोत हे जाणून घेण्यासाठी एकतर हिमालयात जावे किंवा सरकारी कार्यालयात.
असो नव्या घराबाबत अभिनंदन
15 May 2014 - 9:06 pm | दादा कोंडके
वाट बघणं, (आपल्या एसी कार ला) पार्कींगची सोय नसणं, बेशिस्त आणि अकार्यक्षम कर्मचार्यांचे अनुभव काय येस-फेस करणार्या मोबाईल सेवा केंद्रात पण येतात. पण आजुबाजूच्या अस्वच्छ लोकांचा आणि सिविक सेन्स नसलेल्या लोकांचा अडीच-तीन तास त्रास सहन केल्याबद्दल अभिनंदन. अरे हो, आपल्या दुसर्या की तिसर्या सदनिकेच्या नोंदीकरणाबद्दल ही अभिनंदन. :)
15 May 2014 - 9:43 pm | हुप्प्या
स्वतःचे पैसे भरण्याकरता ज्या कचेरीत जायचे तिथे इतका गलिच्छपणा आणि गैरसोय असताच कामा नये.
आपण त्या कचेरीचे फोटो वा व्हिडियो घेऊन त्याला फेसबुक, युट्युब वा सकाळमधे प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कदाचित लाजेकाजेस्तव सरकारने काही केले असते.
असे काही झटके बसल्याशिवाय सरकारी नोकर सुधारत नाहीत असाच अनुभव येतो.
जमिनीच्या व्यवहाराकरता असणारे सरकारी हापिस हे एक जरा जास्तच अवकळा बाळगून असते असा माझाही अनुभव आहे.
15 May 2014 - 9:54 pm | पैसा
नव्या घरासाठी अभिनंदन! ऑफिस घाण दिसले म्हणून तुम्हाला वाईट वाटले, पण पैसे खायला घालावे लागले नाहीत हे काय कमी! आमच्या क्रॉप लोनच्या मॉर्टगेज रजिस्ट्रेशनच्या कामासाठी गेलो तिथे लगेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी ३००० द्यावे लागले. समजा पैसे दिले नाहीत तर कॉम्प्युटर चालत नाही, वेबकॅम चालत नाही अशी काहीही कारणे सांगतात. आम्हाला फेर्या मारायला वेळ नव्हता त्यामुळे पैशांवर पाणी सोडून आलो.
19 May 2014 - 2:45 am | समिर१२३
पैसा येतो आनि जातो, वेळ नाहि.
15 May 2014 - 10:01 pm | मराठे
सर्कारी कचेर्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासारखं खूप काही आहे. पण करणार कोण हाच खरा प्रश्न आहे.
शेवटी अडला हरी... दुसरं काय. जोपर्यंत वरून दट्ट्या बसत नाही तोपर्यंत कोणी बूड हलवणार नाही. वरून म्हणजे किती वरून हा देखिल प्रश्न आहेच.
15 May 2014 - 10:04 pm | तुमचा अभिषेक
माफ करा पण लेख वाचून अपेक्षाभंग झाला, काहीतरी चवीने वाचायला घेतले आणि मेले नेहमीचेच निघाले. तोच तो सरकारी कार्यालयांचा घीसापीटा अनुभव ..
बाकी नवीन घराबद्दल अभिनंदन, एक फोटोही येऊ द्या त्याचा :)
15 May 2014 - 11:10 pm | शशिकांत ओक
म्हणावे लागेल.
अत्याचार हा शब्द जरा जहाल वाटतो. जर आलेल्या अनुभवावर मात कशी करावी असा सुचवता आले तर बरे झाले असते.
15 May 2014 - 11:10 pm | आत्मशून्य
शक्यतो ऑनलाइन नंबर लावावा, आणी जमल्यास दुपारी ३.४० ची वेळ घ्यावी. ४.३०-५ पर्यंत पोचावे. आपलानंबर येइपर्यंत हम्खास ६.१५-६.३० वाजलेले असतात, उन्हे तिरपी झाल्याने आपलाही त्रास बराच कमी होतो. कर्मचार्यांनाही आता निघायची घाइ झालेली असते व सकाळची तरतरी, उत्साह शार्पनेस कमी झालेला असतो, कगदपत्रांच्या अतिविषेश काळजीपुर्वक तपासण्या होत नाहीत. अशा वेळेत विषेश झोलझाल व्यवहार असेल तर वेळ काढुपणा करण्यापेक्षा चटकन कार्यभाग उरकुन सगळेच हमखास मो़कळे होतात.
16 May 2014 - 12:14 am | नानासाहेब नेफळे
यावर एकच उपाय, लांब निर्जनस्थळी जा. तिथे एक खड्डा खणा .त्यात मोठ्याने ह्या सगळ्या त्रासदायक लोकांच्या माताभगिनींचा जयजयकार करा व परत घरी या.you know subconscious?
16 May 2014 - 4:01 am | स्पंदना
मला तर त्या रजीस्ट्रेशन ऑफीस मधल्या शिक्के मारणार्या माणसाची प्रचंड म्हणजे प्रचंड दया आली.
क्या जींदगी है बेचारेकी.. एका एका रजीस्ट्रेशन साठी जवळ जवळ तिनशे शिक्के???
घाण तर होतीच अन अमोनियाची फॅक्टरी म्हणावी अशी अवस्था होती चेंबुरच्या रजीस्ट्रेशन ऑफीसची.
16 May 2014 - 10:49 am | टवाळ कार्टा
तिकडे काम करणार्यांना गरज पडली नाही साफ सफाइची???
16 May 2014 - 12:36 pm | बॅटमॅन
३०० शिक्के???? बाब्बौ!!!
बाकी अशा ऑफिसांची वर्णने वाचून अन तशी ऑफिसे प्रत्यक्ष पाहून थ्युकिदिदेसने अथेन्स आणि स्पार्टाबद्दल केलेली वक्तव्ये आठवली.
"अथेन्समध्ये इतक्या भव्य अन सुंदर इमारती आहेत की आजपासून हजारो वर्षांनी जेव्हा अथेन्सचे नामोनिशाण उरलेले नसेल तेव्हाच्या लोकांच्या मनात अथेन्सची पॉवर आहे त्यापेक्षा लै मोठी दिसेल. तेच आज स्पार्टावाले लोक पेलोपोनीज भाग पूर्णपणे कंट्रोल करतात, पण तिथे ना मोठ्या इमारती आहेत ना अजून काही. शेकडो वर्षांनी येणार्याला तिथे फक्त खेडवळ घरेच दिसतील आणि एकेकाळी स्पार्टाची ताकद काय होती हे त्यांना कधीच समजणार नाही."
16 May 2014 - 4:32 am | कंजूस
अशा कार्यालयांत काम कराव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुंडलीत कोणते ग्रह/योग असतात ?
16 May 2014 - 11:52 am | मुक्त विहारि
अभिनंदन....
बाकी चौरा काकांच्या मताशी सहमत...
एक कट्टा तळेगांवला
16 May 2014 - 3:42 pm | विटेकर
सर्वांना अभिनंदनाबद्दल धन्यवाद !
आणि कट्टा नक्की करु, अजून घर ताब्यात यायला काही अवधी आहे.
बाकी लेखाच्या विषयावर , मी वाचकांचा पतर्व्यवहार मध्ये लिहावे असा विचार आहे. माहीत नाही , उपयोग होइइल की नाही !
16 May 2014 - 8:40 pm | llपुण्याचे पेशवेll
विटेकर तुम्ही बरेच सुदैवी म्हणायचे. आमच्या बिल्डराने पुष्प मंगल कार्यालयाव्रच्या हापिसात १८ लोकांच्या सामुहीक रजिस्ट्रेशन्ची संपूर्ण तजवीज (सगळ्या कळकट कर्मचार्यांचे खिसे गरम करून) केली होती. परंतु अजून पैसे पाहीजेत म्हणून फ्रँकिंगच्या पावत्या दिल्या जात नव्हत्या. आता ऑनलाईन सिस्टीम असून काय घण्टा भ्रष्टाचार कमी होणार?
18 May 2014 - 5:42 pm | साती
समजा ही सरकारी कामे ऑनलाईन झाली तरी डिजीटली साईन्ड कागदपत्रे येण्याआधी टेबलाचे चित्र असलेला एक पॉप अप येईल.
त्या टेबलाखाली कर्सर नेऊन क्लिक केल्यास चिरीमिरी ऑनलाईन द्यायची सोय असेल.
त्यामुळे ऑनलाईन व्यवहार केल्यास लाचलुचपत थांबेल ही अपेक्षा बाळगू नका.
19 May 2014 - 11:33 am | समीरसूर
नवीन घरखरेदीबद्दल हार्दिक अभिनंदन,विटेकरसाहेब! :-)
शासकीय कार्यालये म्हणजे एक बजबजपुरी असते. अत्यंत निगरगट्ट कर्मचारी आणि असहाय जनता असे चित्र नेहमीच दिसते. कुठलाच कर्मचारी छान हसून, चेहर्यावर प्रसन्न भाव आणून मदत करेल तर यांना पाप लागेल जणू. बरं पैसा बकाबका खातात आणि मुजोरी तितक्याच पटीत दाखवतात.
बिल्डर आणि वकील जेव्हा या कार्यालयामध्ये ग्राहकाच्या नोंदणीची वेळ ठरवतात बहुधा तेव्हाच तिथल्या कर्मचार्यांच्या लॉलीपॉपची संख्या देखील ठरवली जाते. किंबहुना लॉलीपॉप्सची संख्या ठरलेलीच असते. जेवढं काम तितक्या लॉलीपॉप्स. ७-८ वर्षांपूर्वी माझ्या सदनिकेच्या नोंदणीसाठी बिल्डरने जी रक्कम रोख घेतली होती त्यापैकी दोन-तीन हजार रुपये कमी अशी पावती मला मिळाली होती. ती रक्कम लॉलीपॉप्ससाठी राखून ठेवलेली असावी असे वाटते. विचारल्यानंतर असेच काहीसे उत्तर मिळाले होते असे आठवते.
19 May 2014 - 3:49 pm | पियू परी
नुकतेच पुष्पमंगलवरच्या सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायची वेळ आली.
तिथे सगळे एजंट्सचे राज्य होते. नंबर लाऊन ठेवलेल्या फायलींपाशी जाऊन सरळ आपल्या (जे एजंट्सच्या वतीने आलेले नाहीत)क्लाएंट्सच्या फायली वर ठेवत होते. अक्षरशः सकाळी १२ ते संध्याकाळी ७ एवढा वेळ लागला रजिस्ट्रेशनसाठी.
मध्ये मध्ये ते एजंट्स तिथल्या ऑफिसर्सना मस्तानी, स्नॅक्स आणून देत होते. त्या दिवशी तिथे पुण्यातले सुप्रसिद्ध वेफर्सवाले आले होते. त्यांनी तर सगळ्या ऑफिसर्ससाठी आपल्या दुकानातली वेगवेगळी पाकिटे आणली होती. आणि हा सगळा प्रकार आम्ही नुसताच पाहात होतो.
शिवाय अजुन एक सांगण्यासारखा प्रकार म्हणजे आम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी ३ वेळा माहिती काढायला गेलो होतो ऑफिसमध्ये. तिन्ही वेळेला मुद्दाम अर्धवट माहिती सांगितली. ऐनवेळी काही कागदपत्रे आणि आणखी काही साक्षिदार आणायला लावले.
तिथल्या सगळ्या ऑफिसर्सच्या तोंडावर "कराल पुन्हा एजंट थ्रु न येण्याची हिंमत?" असेच भाव होते. इथे असांसदीय भाषेत लिहिण्याची परवानगी असती तर इतक्या शिव्या घातल्या असत्या इथे (आणि तिथेही). :(
19 May 2014 - 3:55 pm | पियू परी
लोक काहीही म्हणोत.. हा अनुभव खरंच अत्याचार झाल्याचा फील देऊन उद्वेग आणतो.
20 May 2014 - 6:45 am | मदनबाण
सरकारी काम म्हंटले की हीच अवस्था नजरे समोर येते... सरकारी बाबु आणि त्यांचा त्यांच्या मर्जीनी चालणारा कारभार !
तिकडच्या दरबारात तर साधा चपराशी सुद्धा आपल्याला "साहेब" ठरतो.स्वच्छतेचा "गंध" तर सर्वत्र पसरलेला असतो. !
5 Aug 2023 - 6:39 am | विटेकर
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही .
२०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,,
वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता ….
गढ्या , आपुले पुणे बरे ….. !
5 Aug 2023 - 6:39 am | विटेकर
पुन्हा तेच ऑफिएस … तेच ते एन तेच ते ,,, ज्यांना विकला ते पोलीस आहेत … पण तरीही त्रास अणुमात्र उणा नाही .
२०१४ साली २७ लाखाला घेतलेला फ्लॅट २०२३ साली २० लाखाला विकला ,,,
वक्त से पहले और किस्मात से ज्यादा …. किसीसे कुच्छ नहीं मिलता ….
गढ्या , आपुले पुणे बरे ….. !