मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
28 Apr 2014 - 2:27 pm
गाभा: 

पूर्वीचे लेखन
अलिबाबा आणि चाळीशीतले चोर

गांधी आडवा येतो

_________________________________________________________________________________

अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा दूरदर्शन मालिकांतून काम करणारा, अनेक पुरस्कार मिळविणारा एक प्रथितयश कलाकार. सध्या त्याचे दिवस वाईट आहेत. त्याच्याकडे काम येत नाही. त्याचा स्वतःचा टीआरपी घसरल्यामुळे त्याला आता मागणी नाही. मागील २ वर्षात त्याला कामच मिळालेले नाही. त्यामुळे वैतागलेला, निराश झालेला, स्वतःवरच व पत्नीवर चिडणारा. त्याची पत्नी मीरा (मधुरा वेलणकर) बँकेत नोकरी करून घराला हातभार लावणारी. या दोघांचा प्रेमविवाह. पण सध्या दोघात सारखे खटके उडतात. नैराश्यामुळे मीराबरोबर बँकेत काम करणार्‍या रोहनचा (अनिरुद्ध जोशी) अमितला संशय यायला लागलाय. त्यातून रोहन टिपीकल पुणेरी. सारखे टोमणे मारणारा. त्याचा अमितला सारखा संताप येत राहतो. त्याचे व मीराचे साध्यासाध्या कारणावरून खटके उडायला लागतात. अगदी घटस्फोटाचीही भाषा सुरू होते.

अचानक अमितचा जुना मित्र अश्विन (प्रियदर्शन जाधव) घरी येतो. अमितच्या पूर्वी तुफान गाजलेल्या "चाफा बोलेना ..." या अत्यंत लोकप्रिय मालिकेचा तो निर्माता असतो. अमित आपली व्यथा त्याच्याबरोबर बोलून दाखवितो व काहीतरी काम मिळवून देण्याची विनंती करतो.

अश्विनने ५ वर्षे परदेशात राहून भरपूर पैसे कमावलेले आहेत. अश्विन त्याच्यासमोर एका जबरदस्त व अभिनव रिअॅलिटी शो चा पर्याय ठेवतो. बिग बॉस सारख्या रिअ‍ॅलिटी शो सारखा एक नवीन शो करायची त्याचा कल्पना आहे. अमित-मीरा च्या घरामध्ये दोन महिने वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावून त्यांचा लाईव्ह घटस्फोट दाखविण्याची अभिनव कल्पना तो समोर मांडतो. त्यासाठी तो अमितला रोज २ लाख रूपये मानधन देण्याचे आश्वासन देतो.

अमित या लाईव्ह रीअॅलिटी शो च्या कल्पनेने सुरवातीला धास्तावतो व नकार देतो. शेवटी त्यातून मिळणारी प्रसिद्धी व पैसे याचा मोह पडून तो होकार देतो. मीरा बँकेच्या कामासाठी ७ दिवस बाहेरगावी गेल्याची संधी साधून अश्विन त्यांच्या घराचे स्वरूप पालटून टाकतो. दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह अशा अनेक ठिकाणी कॅमेरे बसवून अमितच्या कानात सतत सूचना देण्यासाठी मायक्रोफोन बसवितो व त्याच्या सूचनेनुसार अमितने वागायचे असते. घरातील कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास नको म्हणून कुत्र्यालाही झोपेचे औषध देऊन सतत झोपविले जाते.

मीरा परत आल्यावर सुरवातीला अमितला प्रेमाचे नाटक करायचे असते व नंतर सूचनेनुसार हळूहळू तिच्याशी भांडण सुरू करून ते घटस्फोटापर्यंत न्यायचे असते व शेवटी कॅमेर्‍यासमोर घटस्फोटाचे कागद सही करायचे अशी कल्पना असते. त्याला ते सुरवातीपासूनच खूप जड जाते. अश्विन त्यात मसाला भरण्यासाठी अमितच्या जीवनात एक नसलेली मैत्रीण आणून मसाला भरायचा प्रयत्न करतो. ती एका बनावट पोलिस इन्स्पेक्टरला बरोबर घेऊन मीराच्या उपस्थितीत घरात येऊन अमितने आपल्याला फसविले असा कांगावा करून हाताची शीर कापून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. परंतु मीराचा अमितवर पूर्ण विश्वास असल्याने ती चाल अयशस्वी ठरते.

मीराच्या आपल्यावरील विश्वासाने अमित अस्वस्थ होऊ लागतो. अश्विन नवीन योजना आखून आपल्या योजनेत रोहनला सामील करून घेतो व रोहन-मीराची भानगड जुळवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे अमितचा अजूनच संताप होतो. त्याला नाईलाजाने अश्विन सांगेल तसेच वागावे लागते. अगदी मीरा शयनगृहात कपडे बदलत असतानाचे सुद्धा शूटिंग झालेले बघून तो संतापतो, परंतु त्याला अश्विनसमोर माघारच घ्यावी लागते. तुमचा एक लाईव्ह बेडसीन हवा आहे अशी शेवटी अश्विन मागणी करतो. अमित संतापून नकार देतो, पण आता तो यात पूर्णपणे अडकला आहे.

नाटकाचा शेवट सांगून मी रसभंग करू इच्छित नाही. परंतु हे नाटक फसलेले वाटते. नाटकाची थीम अत्यंत अव्यवहार्य व उथळ आहे. प्रियदर्शन जाधव व मधुरा वेलणकरने चांगले काम केले आहे. परंतु त्यांच्या तुलनेत चिन्मय मांडलेकरचा अभिनय व रंगमंचावरील वावर अतिशय सामान्य व उथळ वाटतो. कोणताही नवरा आपल्या बायकोच्या नकळत तिच्या व्यक्तिगत बाबीचे शूटिंग करून देणे अशक्य आहे. पण या नाटकात ही फँटसी प्रत्यक्षात आणली आहे. प्रेक्षागृहात प्रेक्षकांना दोन दूरदर्शन संचावर कॅमेरा काय टिपत आहे ते बघायला मिळते. नाटकाची कल्पना अभिनव असली तरी या नाटकाची थीम अजिबात पटत नाही. मला हे नाटक अजिबात आवडले नाही. मध्यंतरानंतर तर नाटक बघणे असह्य होते व कधी एकदा शेवट येतो असे वाटत राहते.

संगीत, नेपथ्य व प्रकाशयोजना उत्तम आहे. परंतु हे नाटक अजिबात पटले नाही.

______________________________________________________________________________

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 2:46 pm | मुक्त विहारि

तुम्हाला एखादी कलाक्रुती कशी वाटली, ते तुम्ही निर्भीडपणे सांगीतल्यामुळे.

एकंदर परीक्षणावरुन, ना धड मनोरंजन ना काही संदेश असे नाटक वाटतय. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 10:20 pm | आत्मशून्य

नाटकाची थीम अत्यंत
अव्यवहार्य व उथळ आहे.

नेमके हेच शब्द लेख वाचताना मनात आले होते.

नाटकात फारच अव्यवहारी मसाला भरला आहे खरा पण बेसिक (मूळ) पाया म्हणजे रिअ‍ॅलिटी शो कपल्स आहेत बरं का. कसे काय परवानगी देतात हे लोक काय माहीत :(

आत्मशून्य's picture

29 Apr 2014 - 10:42 pm | आत्मशून्य

आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते.

बाकी कपड़े बदलताना नाटकात कसे दाखवले आहे ? प्रत्यक्ष की सिलहट मधे की साइड स्क्रीनच बसवून प्रत्यक्ष ?

श्रीगुरुजी's picture

30 Apr 2014 - 12:30 pm | श्रीगुरुजी

आर्यन वैद्यचा रिअ‍ॅलिटी शो पाहिलेला नाही. त्यांचा खरोखरच घटस्फोट झाला होता की राखी सावंतच्या स्वयंवराच्या शो प्रमाणे ते छोट्या पडद्यावरील नाटक होते? प्रत्यक्ष घटस्फोट झाला असला तरी पण तो शो अपवाद असावा. असा लाईव्ह घटस्फोट ही कल्पनाच कशीतरी वाटते. कपडे बदलताना किंवा चुंबनदृष्य नाटकात प्रत्यक्षात दाखविलेले नाही. फक्त या घटनांचा संवादातून उल्लेख आहे.

या नाटकाचा सहलेखक क्षितिज पटवर्धन आहे. 'नवा गडी नवे राज्य' या नाटकाचाही तोच लेखक होता. ते नाटकही अतिशय उथळ व पोरकट होते. त्यात उमेश कामत, प्रिया बापट व इतर सर्व कलाकारांच्या भूमिका व कामे अत्यंत उथळ होती. ते नाटकही आवडले नव्हते. एकंदरीत क्षितिज पटवर्धन म्हणजे तरूण नवरा-बायकोच्या समस्यांचे उथळ सादरीकरण असे समजायला हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Apr 2014 - 1:07 pm | श्रीगुरुजी

>>> आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते.

एक शंका. आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते.

पण आर्यन वैद्यच्या शोमध्ये उभयतांना कॅमेर्‍याबद्दल माहित होते का दोघांपै़की फक्त एकालाच त्याची कल्पना होती? जर दोघांनाही कॅमेर्‍याबद्दल माहित असेल तर त्यांनी लिप्सलॉक, मुस्काटीत मारणे असा मसाला जाणीवपूर्वक त्यात भरला असावा.

ते सुधा नॅशनल टेलीविजनवर, बघता घटस्फोट झाला नसता तरच आश्चर्य होते. त्यानेही तिव्र शब्दात या हल्याची निर्भत्सना केली होती विषेशतः त्याने मर्यादा भंग केला नसताना हे पाहणे फार क्लेशदायक होते. (मला तरी मिस्टर इंडीयाची शान गेल्या सारखे वाटले.) पठ्याला या हल्याच्या बाचावासाठी साधी संधी सुधा मिळाली नाही.

तो शो घटस्फोट घडवा म्हणून न्हवे तर टाळता येइल का या साठी आखला होता असे अधिकृत म्हणने आहे. आणी दोघेही कायदेशीर संमती देउनच सामील झाले होते.

आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते.

थोडेसे अवांतर आहे पण चानेल व्ही वर एक शो असतो. आपल्या जोदीदाराचे चिटींग वा एकनीश्टता जगासमोर तपासायचा. यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपरोक्ष चानेल व्ही ला काँटॅक्ट करायचा मग त्यांची टीम हे सर्व रियालीटी शो प्रमाणे जोडीदाराच्या अपरोक्ष इन्वेस्टीगेशन (व त्याचे स्टींग ऑपरेशन) करणार. भयानक प्रकर आहे खाजगी आयुष्य चवाट्यावर आणायचा. स्त्रियाच जास्त चिटींग करताना व पकडल्या गेल्यावर प्रायवसी भंग झाल्याच्या प्रचंड त्रागा करताना आढळल्या आहेत. त्या तुलनेत पुरुषांनी चोरी पकडली गेल्यवर कोणतेही शाब्दीक हल्ले केलेले नाहीत, त्यांनी मुक्त मनाने जे घडले ते स्विकारले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2014 - 12:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला नाटकाची थीम आवडली. नाटक बघायला आवडेल. नक्कीच बघेन.
नाटकावर अजून लिहा....

-दिलीप बिरुटे

नानासाहेब नेफळे's picture

30 Apr 2014 - 6:08 pm | नानासाहेब नेफळे

हेच म्हणतो, थीम छान वाटत आहे. एकदम ट्विस्ट झालेले कथानक बघायला निश्चितच आवडेल.लेखक कोण आहेत.?

श्रीगुरुजी's picture

2 May 2014 - 8:48 pm | श्रीगुरुजी

या नाटकाचा लेखक अस्लम नावाचा कोणतरी एक नवीन लेखक आहे. क्षितिज पटवर्धन हा नाटकाचा सहलेखक आहे.

पैसा's picture

1 May 2014 - 8:36 am | पैसा

पण पैशांसाठी या लेव्हलला माणसे जाऊ शकतात?

नाटकाचे परीक्षण आवडले.

दादा कोंडके's picture

3 May 2014 - 2:41 pm | दादा कोंडके

मागं 'सच का सामना' की असल्याच नावाचा एक रिआलिटी शो होता. बाबौ, काय ते प्रश्न आणि काय ती उत्तरे! यातच विनोद कांबळींनी शे_ खाल्लं होतं. या कार्यक्रमांचे सगळे भाग चवीनं बघणारे प्रक्षक सॅडीस्ट असले पाहिजेत.

विशाल चंदाले's picture

2 May 2014 - 11:02 am | विशाल चंदाले

आवडले . धन्यवाद गुरुजी,आता लिस्ट मधून एक नंबर कमी झाला.

मध्यंतरानंतर तर नाटक बघणे असह्य होते व कधी एकदा शेवट येतो असे वाटत राहते.

- अगदी सहमत. सुरुवातीच्या दहा मिनिटातच असं वाटायला लागलं होतं.

फ्रस्ट्रेट झाल्याचा अभिनय करणे म्हणजे उगाच ओरडत राहणे आणि रंगमंचावर (टणाटणा!) उड्या मारत राहणे असा दिग्दर्शक/अभिनेत्याचा का समज झाला आहे कोण जाणे. त्या मानाने मधुरा वेलणकरांनी शेवटचा प्रसंग वगळता ठीक काम केलं आहे.

नाटकाच्या शेवटी जो ट्विस्ट मिळतो तो मान्य करूनही जे खाजगी प्रसंगांचं चित्रिकरण झालंय ते परत कसं मिळवणार याचं उत्तर काही मिळत नाही.

श्रीगुरुजी's picture

6 May 2014 - 12:25 pm | श्रीगुरुजी

सहमत

इनिगोय's picture

5 May 2014 - 9:21 am | इनिगोय

अलीबाबा आणि गांधींच्या परीक्षणांचे दुवे गंडलेत, कृ दुरुस्त करावेत.

पैसा's picture

5 May 2014 - 9:33 am | पैसा

केले.

श्रीगुरुजी's picture

6 May 2014 - 12:26 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद!