माहिती हवी आहे- (२०१५: बारावीनंतर मेडिकलसाठी )

खेडूत's picture
खेडूत in काथ्याकूट
22 Apr 2014 - 9:59 pm
गाभा: 

अकरावी संपून बारावीचं वर्ष सुरु होतंय अशा मुलांचे आता सुटीतच क्लासेस सुरु झालेत. २०१५ ला ज्यांनी अभियांत्रिकीला जायचं ठरवलंय त्यांना बरंच मार्गदर्शन उपलब्ध आहे- कारण डॉक्टर पेक्षा इंजिनियर होण्याचं प्रमाण खूप जास्त राहिलं आहे, पण मेडिकलसाठी ( विशेषतः MBBS कोर्स) माहिती असल्यास कृपया इथे द्यावी.

१. सी ई टी बाबत अनिश्चितता दरवर्षी असते. यावर्षीपासून ती राज्य पातळीवरच पण केंद्राच्या NEET च्या धर्तीवर होणार असं ऐकलंय/ वाचलंय. मग इतर राज्यात १५% गटातून प्रवेश कसा मिळेल?

२. सरकारी कॉलेजचा प्रवेश थोडक्या गुणांसाठी न मिळाल्यास खासगी कॉलेजचा पर्याय आहेच. पण तो फार महागडा आहे असं ऐकलंय. सी ई टी ला चांगले गुण असतील तर देणगी मध्ये काही फरक पडतो की गल्ल्यावर बसलेल्या शिक्षणसम्राटाला सगळे सारखेच? हे अशासाठी विचारलं, की पुण्यातल्या काही खासगी कॉलेजचे पहिल्या वर्षाचे निकाल अवघे ५० % च्या आसपास दिसतात. म्हणजेच मेरीटवाले काही विद्यार्थी तिथे जात असणार ! किंवा त्याना हवे असणार.

अभिमत विद्यापीठाबाबत मत चांगलं नाही त्यामुळे तिकडे जाऊ नये असं ठाम मत आहे.

३. मेडिकलनंतर पदव्युत्तर करणं आजकाल जवळपास अनिवार्य असल्यासारखंच आहे. तिथेही विशिष्ट अभ्यासक्रमाना तशीच स्पर्धा आहे. खासगी कॉलेजातून MBBS केल्यास पुढे काय समस्या येऊ शकते? पदव्युत्तरसाठी भारताबाहेर थेट विचार होतो की इंग्लंड प्रमाणे आधी त्यांच्या परीक्षा द्याव्या लागतात? सी ई टी ची तयारी करून घेणाऱ्या एका मोठ्या क्लासला भेट दिली तेव्हा त्यांनी देशात एकूण तीस हजार जागा आणि सात लाख जण स्पर्धेत असतात असं सांगितलं.

४. हल्ली नव्याने चीन-रशियात जाउन डॉक्टर होण्याचं मॉडेल उदयाला आलंय. तो पर्याय पण नको आहे!

५. सगळ्यांनी डॉक्टर- इंजिनियर होण्याचे दिवस मागे पडले, इतर पण करियर्स खूप चांगली आहेत, डॉक्टर होता-होता वय खूप वाढतं पुढे स्थिरस्थावर होईतो तिशी उलटते, खूप खर्चिक आहे- हे सर्व मुद्दे आजच्या मुलांना चांगले समजतात. तरीही विचार करून डॉक्टरच होण्याची मुलांची इच्छा असेल तर पालक म्हणून त्यांना सर्व माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देणे पालकांचं कर्तव्यच आहे. म्हणून धाग्याचा प्रपंच.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

22 Apr 2014 - 11:10 pm | विनायक प्रभू

व्य. नी. मधे फोन नं़. कळवा.

बहुगुणी's picture

24 Apr 2014 - 1:30 am | बहुगुणी

..की प्रभू सरांना फोन करा.

[प्रभू सर: कारवां कुठपर्यंत आला आहे?]

विनायक प्रभू's picture

24 Apr 2014 - 1:46 pm | विनायक प्रभू

अपेक्षेपेक्षा जास्त. संपूर्ण ं महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र.

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 9:33 am | सुबोध खरे

प्रभू सर
हे सर्व व्य नि त का सर्वानाच सांगाना. आमच्यासारखे डॉक्टर होऊनही लोकांना काही सांगू शकत नाहीत काय करायचे तेंव्हा आम्हालाही काही ज्ञान प्राप्त होईल. कमीत कमी लोकांच्यापुढे कचरा होणार नाही हो.

कुंदन's picture

24 Apr 2014 - 2:31 am | कुंदन

५ वा मुद्दा लै महत्वाचा.
मध्यमवर्गीयांना अंमळ जड च जाते.अन पुढेही दवाखाना वगैरेला भांडवलही फारच लागते.
त्यापेक्षाही इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत , त्याबाबत जाणकार माहिती देतीलच.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 8:40 am | चित्रगुप्त

शिक्षणानंतर नोकरीसाठी परदेशात जायची इच्छा असेल, तर फिजियोथेरॅपीचा डिग्री कोर्स भारतातून करून एम एस अमेरिकेतून करावे.

पोटे's picture

24 Apr 2014 - 9:45 am | पोटे

मेडिकलचे शिक्षण घेऊन आजकाल फारसा फायदा नाही. ३० लाख घालून एम बी बी एस व्हायचे आणि नंतर ३५ हजाराची नोकरी मिळते. त्यापेक्षा ते तीस लाख एफ डी ला ठेवलेत तर त्याचे व्याज तितकेच होईल .

पी जी करणार असाल तरच मेडिकल करा. अन्यथा नको.

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 10:03 am | सुबोध खरे

माझ्या अल्पमती आणि अल्प माहितीप्रमाणे माहिती देत आहे.
१) सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला ७०-७५ हजार एवढे आहे आणि खाजगी महाविद्यालयाचे शुल्क वर्षाला आठ ते दहा लाख एवढे आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालयाचे शुल्क सरासरी पस्तीस ते चाळीस लाख चार वर्षासाठी होते. एवढे करून तुम्ही "फक्त" एम बी बी एस च असता.
२) या नंतर आपल्याला परत CET ला बसून पदव्युत्तर शिक्षणाची सोय करावी लागते. तेथे जर आपल्याला सरकारी जागा मिळाली नाही तर तीस लाख रुपये ( एखाद्या डिप्लोमासाठी) पासून चार कोटी रुपये(फक्त) एम डी रेडीयोलोजी साठी मोजावे लागतात.
३) मध्यमवर्गीय मुलांना या गोष्टीची कल्पना देणे अतिशय आवश्यक आहे. कारण एवढे सर्व सव्यापसव्य करून वयाच्या २८ व्या वर्षी आपण जगाच्या बाजारात उभे राहतो तेंव्हा आपल्याला कुत्रं विचारत नाही यामुळे नैराश्य येण्याची शक्यता असते. कारण शेजार्यांचा "अलभ्य" किंवा "शाश्वत" आय टी पदवीधर होऊन वर्षाला सात आकडी पगार घेत असतो.(बर्याच वेळेस त्याला डॉक्टर पेक्षा दहावी बारावीला कमी गुण असतात.)
४)एवढे सगळे असूनही एखाद्याला डॉक्टरच व्हायचे असेल तर त्याला पर्याय नाही. मी स्वतः याचे उत्तम उदाहरण आहे. मला सरकारी महाविद्यालयात प्रवेशसाठी बारावीला २ गुण (टक्के नव्हे) कमी पडले.(१९८२ साली मणीपालला वैद्यकीय महाविद्यालयाचे देणगी शुल्क साडे तीन लाख होते जे आमच्या श्रीमंतीच्या स्वप्नाच्याही पलीकडचे होते ) यास्तव मी एक वर्ष फार्मसी केले.तेथे पहिल्या वर्षाला मला प्रथम वर्ग मिळाला होता आणि मी नक्की पी एच डी केले असते. ( आणि जास्त पैसे सुद्धा मिळवले असते). परंतु आपल्याला डॉक्टरच व्हायचे आहे हा विचार माझ्या डोक्यातून कधीही गेला नाही. (इश्क ने निकम्मा कर दिया गालिब). शेवटी दुसर्या वर्षी नशिबाने ए एफ एम सी ला प्रवेश मिळाला आणि मी डॉक्टर झालो. यथावकाश एम डी (रेडीयोलोजी)सुद्धा झालो. पण जर आपल्या मुलाला याच मुलीशी लग्न करायचे असेल तर मग कितीही अप्सरा समोर येऊ द्या. उपयोग नाही.
५) आपल्या मुलाला डॉक्टरच व्हायचे आहे पण खाजगी महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही असे असेल तर भारतात कुठेही सरकारी महाविद्यालयात मिळेल तेथे प्रवेश घ्या. मग ते असं मधील सिलचर असो कि तिरुनेलवेली असो. वैद्यकीय ज्ञानाचा आणि महाविद्यालयाचा फारसा संबंध नसतो. ज्ञान मिळवावे लागते आणि पदवी दिली जाते. एकदा वैद्यकीय महाविद्यालयात शिरला कि केंव्हा तरी मुल बाहेर येतेच. एखादे वेळेस नापास झाल्याने ज्ञानात कमतरता येत नाही किंवा अगदी प्रत्येक वेळेस उत्तम पास झाले म्हणजे उदंड ज्ञान असते असे नाही.
६) तेही मिळत नसेल तर मुलाला एक वर्षाने परत CET /NEET ला बसू द्या ( एक वर्ष फुकट गेल्याने आयुष्यात काहीही फरक पडत नाही).
७) एम बी बी एस नंतर कॅम्पस इंटरव्ह्यू नसतो. तेंव्हा लगेच पैसे मिळवायला लागू हे सुविचार रुजू देऊ नयेत.एम बी बी एस ची परीक्षा होण्यापूर्वी पासून पदव्युत्त परीक्षेचा अभ्यास सुरु करावा लागतो. (मी जवळ जवळ तीन वर्षे असा अभ्यास केला आहे).
८) आपल्याला काय करायचे आहे याची विचारधारा स्पष्ट असणे आवश्यक आहे. आणि आपण आणखी पाच वर्षांनी कुठे असू आणि कुठे जायचे आहे याचा विचार केलेला असणे आवश्यक आहे. आणि हा विचार दर पाच वर्षांनी नव्याने करणे आवश्यक आहे.
९)वरील सर्व विचार हे बबाबे( बडे बाप के बेटे) किंवा राखीव जागा वाल्यांना लागू नाहीत.
एखाद्याला आपल्या मुलाला कडक शब्दात वरील विचार ऐकवायचे असतील तर मला व्यनि करा. सल्ला फुकट मिळेल परिणामांची जबाबदारी तुमची राहील.

मनिष's picture

24 Apr 2014 - 12:44 pm | मनिष

हे खूप जवळून पाहिले आहे. पहिल्या पिढीच्या डॉक्टरला जम बसवायला खूप धडपड करावी लागते आणी उमेदीची बरीच वर्षे वाया जातात, इतर काहीही करता येत नाही - खास करून जर उपकरणांवर अवलंबून असे स्पेशलायझेशन असल्यास (उदा. नेत्रतज्ञ). अगदीच *हेच* करायचे असल्यास डॉक्टर व्हावे, नाहीतर इतर काहिही करावे.

प्रतिसाद आवडला. हे सगळे मझ्या चुलत बहिणीच्या वैद्यकीय प्रवेशावेळी पाहिल्याने त्या आठवणी आल्या.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 11:24 am | चित्रगुप्त

यम-बीबी-यस चे असले त्रांगडे करण्याऐवजी माझ्या मुलाने पंचहात्तर हजार रुपये वार्षिक फी वाली फिजियोथेरापीची डिग्री बंगलोराहून केली (हल्ली फिया काय आहेत, हे ठाऊक नाही), मग दीड वर्ष घरी राहून दिल्लीत नोकरी, मग अमेरिकेत दोन वर्षाची एकूण फी सात लाख रुपये असलेले यम यस (त्यातही बराचसा खर्च असिस्टंटशिप, कँटिनात वगैरे काम करून काढला) लायसनची परिक्षा पास करून आता उत्तम नोकरी करतो आहे. सध्या तरी अमेरिकेत फिजियोथेरापी चे लायसन घेतल्या घेतल्या नोकर्‍या मिळत आहेत.
आजवर त्याला अचाट जाग्रणे वगैरे करून अभ्यास कधीच करावा लागलेला नाही. उलट खेळ, सिनेमे, संगीत, मित्र यातच विद्यार्थी जीवन गेलेले आहे.

सुबोध खरे's picture

24 Apr 2014 - 11:59 am | सुबोध खरे

फिजियो थेरेपी करून अमेरिकेत जाणे हा राजमार्ग आहे आणि एम बी बि एस करून जाण्यापेक्षा बरेच सोपे आहे. शिवाय तेथे या अभ्यासक्रमाला सामाजिक प्रतिष्ठा पण आहे( जी भारतात त्यामानाने नाही ). पण जर डॉक्टर च व्हायचे असेल तर काय?
ज्या मुलाचे "डॉक्टरच" व्हायचे असे ठरलेले नसेल त्याला फिजियो थेरेपी, ऑक्युपेशनल थेरेपी किंवा स्पीच थेरेपी अथवा फार्मसी असे अतिशय चांगले चांगले पर्याय आहेत.(खरं तर एम बी बी एस पेक्षा चांगले) आणि या नंतर अमेरिकेतच नव्हे तर युरोपात किंवा ऑस्ट्रेलियात सुद्धा बराच वाव आहे.

बाबा पाटील's picture

24 Apr 2014 - 1:56 pm | बाबा पाटील

बी.ए.एम.एस. हा देखिल खुपच चांगला पर्याय ठरु शकतो,अन्यथा फिजिओथेरपी देखिल वाईट नाही.(एम.बी.बी.एस.नाही मिळाल तर.कारण पहिल प्रेम.)

खेडूत's picture

25 Apr 2014 - 12:21 am | खेडूत

सर्वांचे आभार. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
पुढे काही नवीन माहिती मिळाल्यास इथे चिकटवू , म्हणजे माझ्यासारख्या इतराना पण उपयोग होईल.

इतर राज्यात १५% कोट्यातून प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरची वेगळी परीक्षा द्यावी लागेल असं समजलं. तसंच ज्या काही वेगळ्या ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न करायचाय , एम्स वगैरे - त्यासाठीच्या वेगळ्या प्रवेश परीक्षेची माहिती घेऊन वेळेत अर्ज करावा लागेल असंही समजलं.